डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

या भागातील आदिवासी स्त्रिया गोंडी भाषा बोलतात, थोडीफार हळबी बोलतात. मला अवघड जाते गोंडी भाषा शिकायला. फक्त एक-दोन वाक्येच येतात गोंडीमधली. ‘बंजेर तोहा’ म्हणजे जीभ दाखवा, एवढे एक वाक्य बोलले तरी स्त्रिया खुद्‌कन हसतात आणि मोकळेपणाने बोलू लागतात. पुढचे सारे मग मितानी मला हिंदीमध्ये भाषांतर करून सांगते. अधेमधे पूर्वी बिजापूरला तपासणीसाठी आलेल्या ओळखीच्या रुग्ण स्त्रिया भेटत होत्या, मला तिथे पाहून खूश होत होत्या. मितानी त्यांचे गाऱ्हाणे सांगत होत्या की, ‘लोक कसे त्यांचे ऐकत नाहीत. सिर्फ समझदार औरतेही हमारा कहना मानती है और जाँच के लिये आती है. बाकी तो आते ही नही, कितना भी समझाये तो भी.’ मग त्यांना मी प्रोत्साहन देत राहिले की, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुमच्यामुळे इतक्या स्त्रिया तरी रुग्णालयात पोहोचत आहेत, वगैरे...

बिजापूर जिल्हा रुग्णालयात 27 एप्रिल 2018 रोजी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व प्रकारच्या अवघड-दुर्मिळ शस्त्रक्रिया करणे, 100-150 शस्त्रक्रिया तीन-चार दिवसांत पार पाडणे- अशी संकल्पना आहे. त्यासाठी सध्या जिल्हा रुग्णालयातर्फे गावा-गावांत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्याद्वारे गरजू रुग्ण शोधून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे, तपासण्या करणे- अशी सर्व कामे चालू आहेत. दररोज वेगवेगळ्या विशेषज्ञांची टीम बनवून, वेगवेगळ्या गावांत रुग्णतपासणीसाठी शिबिराचे आयोजन होत आहे. बिजापूर जिल्ह्यातील चारही प्रभाग- बिजापूर, भैरमगड, भोपालपट्टणम व हुसूर- यातील काही गावे निवडण्यात आली आहेत.

आज आमची टीम ‘बिजापूर’ या प्रभागातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील ‘गंगालूर’ या गावात आरोग्यशिबिरासाठी निघाली होती. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.तामस्कर, बालरोगतज्ज्ञ डॉ.लोकेश, शल्यविशारद डॉ.सूरज, मेडिकल ऑफिसर डॉ.विकास, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. पुष्पेंद्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मी- अशी आमची टीम होती. डॉ. विजय हे बिजापूर प्रभागाचे प्रमुख असल्याने त्यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी होती. ‘खुनी रोड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिजापूर- गंगालूर या 25 किलोमीटरच्या रस्त्यावरून जाताना कोणालाही दिवसा-ढवळ्याही भीती वाटतेच; पण अलीकडच्या काही दिवसांत घडलेल्या चिंताजनक घटनांमुळे आज सर्वांसोबत असूनही वातावरणात जास्तच तणाव जाणवत होता. याच रस्त्यावर पाच किलोमीटरवर पामलव्हाया नावाची सुंदर आणि बऱ्याच मोठ्या अंतरावर पसरलेली नर्सरी लागते. रस्त्यात तीन ठिकाणी C.R.P.F. चे कॅम्प लागतात.

गंगालूरमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा गर्दी पाहून लक्षात आले की, आज तिथे आठवडी बाजार आहे. CHC (Community Health Centre) समोर रुग्णांना उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठा मंडप घातला होता. रुग्णालयात डॉ.विजय यांनी रुग्णतपासणीसाठी आवश्यक अशी सर्व व्यवस्था केली होती. नर्सिंग स्टाफही जय्यत तयारीत होता. सर्व डॉक्टर्स आपापल्या जागेवर स्थानापन्न होताच, रुग्णांची एकच गर्दी उडाली. मी स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने, माझ्याकडे गर्भवती महिलांची तपासणी, पाळीच्या विविध समस्या असे रुग्ण येत होते. सुरुवातीला गर्दी पाहून वाटले की, या गर्दीमध्ये अशा शिबिराचा नक्की किती फायदा होणार लोकांना? पण मग दूर-दूरच्या गावांतून, कधीही दवाखान्यात न आलेल्या गर्भवती महिला आज या शिबिराच्या निमिताने पहिल्यांदाच आरोग्यसेवेसाठी सरकारी रुग्णालयाची पायरी चढताना पाहून मला समाधान वाटले. गर्भ आठ-आठ, नऊ-नऊ महिन्यांचा झाला तरी आत्तापर्यंत कधीच रुग्णालयात न आलेल्या स्त्रिया मी पाहत होते. त्यांचे कुपोषण, रक्तक्षय, बिघडलेले आरोग्य, त्वचेचे रोग, तशीच कष्टांची सवय, कुटुंबीयांची अनास्था... एकूणच त्यांचे ‘हाल’ पाहून मला त्रास होत होता.

त्या ठिकाणी जितकी तपासणी करता येईल व जी औषधे देता येतील, तितकी मी देत होते. ज्यांना सोनोग्राफीची गरज आहे, जास्त तपासण्यांची गरज आहे- अशांना बिजापूरला येण्याची विनंती करत होते. मितानी स्त्रियाही त्यांच्या परीने रुग्णांना समजावत होत्या. (मितानी म्हणजे सरकारने गावातील थोड्याफार शिकलेल्या स्त्रीला, प्रशिक्षण देऊन गर्भवती महिलांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन येण्याच्या कामी नियुक्ती केलेली महिला कार्यकर्ती.) एक गर्भवती मितानीच स्वतः रुग्ण म्हणून आली होती. बिजापूरचे डॉक्टर आज आपल्या गावात आपल्या आरोग्य तपासणीसाठी आले आहेत, हे पाहून लोकांना सरकारी आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास वाटत होता आणि बिजापूरला पुढच्या उपचारासाठी यायला काही स्त्रिया तयारही होत होत्या.

अशातच सात महिन्यांची एक गर्भवती स्त्री आली. अंगाला हात लावला, चटका बसला, तेव्हा तिने सांगितले की, तीन दिवसांपासून अंगात ताप आहे. रक्त तपासले, तर मलेरिया निघाला आणि हिमोग्लोबिन केवळ सहा ग्रॅम. मलेरियाच्या उपचारांसोबतच तिला तातडीने रक्त देण्याचीही गरज होती. इतक्या कमी हिमोग्लोबीनमुळे बाळंतपणादरम्यान किंवा नंतरही गर्भवतीचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गर्भावस्थेत मलेरिया जीवघेणा ठरू शकतो. तिला बिजापूरला येऊन भरती होण्यासाठी मी बराच वेळ समजावत राहिले. पण ती एकटीच आलेली, सोबत कोणी नातेवाईक नाही. मितानी तरी बिचारी काय करणार? मग तिला तिथेच गंगालूरला CHC मध्ये भरती होऊन मलेरियाचे उपचार घ्यायला सांगितले. कशी तरी त्यासाठी ती तयार झाली. मी मनाशीच विचार केला की, आज ना उद्या तिथले डॉक्टर तिला रक्त देण्यासाठी समजावून पाठवतील बिजापूरला.

अशीच आणखी एक गंभीर रुग्ण. मितानी तिला घेऊन आलेली. अवघी 25 वर्षांची. थरथरणारे अंग, बारीकशी अंगकाठी, वेगाने पडणारे नाडीचे ठोके... सगळी लक्षणे थायरॉईडच्या आजाराशी संबंधित. इतक्या तरुण वयातच तिचे गर्भाशय बाहेर आलेले. बऱ्याच महिन्यांपासून ते तसे बाहेर आलेले असल्याने, त्यावर झालेल्या जखमा. हे कसे झाले विचारल्यावर कळले की, पाच वर्षांपूर्वी ती गर्भवती झाली. इतर सर्वांप्रमाणेच घरीच बाळंतपण केले. पहिले बाळ बाहेर आल्यावर लक्षात आले, अजून दुसरे आत आहे. दुसरे काही बाहेर येईना. बराच वेळ वाट पाहून तिथून तिला 25 किमी अंतरावरील बिजापूरला आणले. तिथे उपचार यशस्वी झाले नाहीत, तिथून पुढे 100 किलोमीटरवर जगदलपूरला नेले. तिथे दुसरे बाळ बाहेर आले, पण त्यासोबत तिचे गर्भाशयही. तेव्हापासून, म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून ते तसेच बाहेर लोंबकळत आहे आणि त्यानंतर आज ती रुग्णालयात पहिल्यांदाच आली होती. तिला ताबडतोब बिजापूरला येण्याची विनंती करत राहिले. मितानीने स्पष्ट सांगितले, हिच्या घरचे हिला येऊ देणार नाहीत तिकडे. मी सुन्न झाले. ही अशी किती दिवस जिवंत राहील, हिचा नवरा हिला घरात ठेवेल का, अशा थरथरणाऱ्या अंगाने ही रोज कशी चालते, काय खाते, कशी काम करते... बाहेर गर्दी उडालेली. एका नर्ससोबत मी तिला डॉ.विजयकडे पाठवले की, आपण हिच्यासाठी काही करू शकतो का?

गंगालूर हे पूर्वी नक्षलवाद्यांनी कब्जा केलेले गाव. सध्या ते प्रमाण खूप कमी झाले आहे, परंतु अजूनही धोका आहे. तिथून आत असलेल्या गावातून लोकांना बाहेर ये- जा करायला अजूनही नक्षली लोकांची परवानगी घ्यावी लागते. काही अतिसंवेदनशील गावात तर कोणी कितीही आजारी पडले, गर्भवतीला कळा सुरू झाल्या, बाळाला न्यूमोनिया झाला- काहीही झाले; तरी नक्षली लोक त्यांना गावाबाहेर जाऊ देत नाहीत, उपचारासाठी बिजापूरला जायची परवानगी देत नाहीत. अशा गावात घरीच होणारी बाळंतपणे आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या, मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. दुपारी तीनला जेवणाचा ब्रेक घेतला. पुन्हा उरलेले रुग्ण तपासले.

या भागातील आदिवासी स्त्रिया गोंडी भाषा बोलतात, थोडीफार हळबी बोलतात. मला अवघड जाते गोंडी भाषा शिकायला. फक्त एक-दोन वाक्येच येतात गोंडीमधली. ‘बंजेर तोहा’ म्हणजे जीभ दाखवा, एवढे एक  वाक्य बोलले तरी स्त्रिया खुद्‌कन हसतात आणि मोकळेपणाने बोलू लागतात. पुढचे सारे मग मितानी मला हिंदीमध्ये भाषांतर करून सांगते. अधेमधे पूर्वी बिजापूरला तपासणीसाठी आलेल्या ओळखीच्या रुग्ण स्त्रिया भेटत होत्या, मला तिथे पाहून खूश होत होत्या. मितानी त्यांचे गाऱ्हाणे सांगत होत्या की, ‘लोक कसे त्यांचे ऐकत नाहीत. सिर्फ समझदार औरतेही हमारा कहना मानती है और जाँच के लिये आती है. बाकी तो आते ही नही, कितना भी समझाये तो भी.’ मग त्यांना मी प्रोत्साहन देत राहिले की, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुमच्यामुळे इतक्या स्त्रिया तरी रुग्णालयात पोहोचत आहेत, वगैरे. मितानींशी गप्पा मारल्या की, त्यांनाही हुरूप येतो कामाचा.

काम संपत आले तसे आम्ही सर्व एकत्र गोळा झालो. बालरोगतज्ज्ञ डॉ. लोकेश यांचेही अनुभव माझ्यासारखेच होते. त्यांनी गंभीर आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या मुलाला बिजापूरला घेऊन येण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना समजावले, पण ते तयार झाले नाहीत यायला. पाच वाजता आम्ही बाहेर पडलो. फोटो काढले, गाडीची वाट पाहत उभे होतो. तेवढ्यात मी तपासलेली एक गर्भवती स्त्री आली, ती काय करतेय हे लक्षात यायच्या आत वाकून तिने माझ्या पायाला स्पर्श केला. माझ्याशेजारी नव्याने रुजू झालेला डॉ. विकास होता, तो दचकला ते पाहून. मला मात्र आदिवासी भागात पूर्वीही काम केल्यामुळे अशा अनुभवांची सवय झालेली. एकमेकांची भाषा येत नसते, तेव्हा काही सिग्नल असतात- जे बिनासंवादाने समजतात. समोरच्याकडे पाहून स्मित करणे हे जसे, तसेच रुग्णांचे वाकून डॉक्टरच्या पाया पडणे, हाही एक आदर व्यक्त करायचा सिग्नल! तिने रुग्णालयाकडे हात दाखवला. मी निमूटपणे तिच्या मागोमाग गेले. तीन स्त्रिया तपासणीसाठी उशिरा आल्या होत्या. डॉक्टर निघाले असे नर्सेसने त्यांना सांगितल्याने ती रुग्णा मला बोलावण्यासाठी आली होती.

मग उरलेल्या त्या तिघींनाही मी तपासले, औषधे दिली. डॉ.विकासही परत येऊन मला मदत करत होता. त्याला म्हटले, ‘एक काम कर, तू आता इथेच तीन-चार दिवस राहून सर्व भाग पाहून घे, रुग्ण तपास.’ कुप्रसिद्ध अशा त्या गंगालूरमध्ये राहण्याच्या कल्पनेने घाबरून जाऊन तो म्हणाला, ‘रॅगिंग घेताय का तुम्ही माझी?’ परतीच्या मार्गावर प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉ.पुजारींसोबत बस्तरबद्दल गप्पा रंगल्या होत्या. तुलार गुफा, ढोलकल ट्रेक, बैलाडीला खाणी, वगैरे. आमच्या मनातील तणाव निवळला होता. जाताना डॉ.पुष्पेंद्र म्हणाला होता, ‘अपना बिजापूर बाकी देससे बीस साल पिछे है, और ये मेन रोडसे सिर्फ 10-20 किलोमीटर गाव बिजापूरसे और बीस साल पिछे.’ त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडला होता. आज आरोग्यसुविधा इतक्या आतल्या भागात पोहोचत आहेत, बिजापूरला इतके सुविधासंपन्न रुग्णालय सेवा देत आहे, याचा अभिमान मनात दाटून आला. तशीच जबाबदारीची जाणीवही वाढली. जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी यांच्याप्रति आदर आणखी वाढला.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोहक वृक्षराजी पसरली होती आणि सूर्यास्ताच्या लाल रंगाने आकाश व्यापले होते. मी आणि डॉ.सूरज दोघेही फोटो काढत होतो. दुसऱ्या दिवशी बिजापूरच्या माझ्या ओपीडीमध्ये एक गर्भवती स्त्री आली. तिचा तपासणी पेपर पहिला, तर कालचा गंगालूरचा पेपर.

‘आपने सोनोग्राफीके लिये बुलाया, मै आ गायी. डिलिवरीके वक्त जरुरत लगी इधर आने की, तो पता होना चाहिये, इसलिये बिजापूर का ये अस्पताल देखने के लिये आयी.’

‘कैसे आयी?’

‘कमांडर में.’

‘किसके साथ आयी हो? पती आया है तुम्हारे साथ?’

‘नही. वो नहीं आएगा. इसलिए मै भाभी को बोली चलो मेरे साथमे.’

कमांडर म्हणजे खासगी वाहतूक करणारी जीप, ज्यात तीस-पस्तीस माणसांना कोंबून बसवले जाते. मी भयानक खूश. मग तिच्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करत तिची सर्व तपासणी, सोनोग्राफी केली. माझे अतिप्रेमाचे वागणे पाहून माझ्या नर्सेस गोंधळात पडल्या. ‘एवढे काय या बाईचे लाड?’ माझ्यासाठी मात्र गंगालूरहून आलेली महिला म्हणजे प्रतीक होती की- आम्ही बिजापूरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स विश्वास जिंकतोय या अतिदूर, नक्षलग्रस्त गावात राहणाऱ्या आदिवासी महिलांचा. ही छोटी सुरुवात आहे. पण अशी एक स्त्री बळ देते, अविरत प्रयत्न करत राहण्यासाठी.

Tags: स्वास्थ्य शिबीर गंगालूर बिजापूर डायरी swasthya shibir gangalur bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात