डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

भ्रष्टाचार सरकारी यंत्रणेच्या नसानसांत रुजलेला आहे. आम्हा दोस्तमंडळींतही बऱ्याचदा चर्चा होते की, सरकारी यंत्रणेसोबत काम करायचे, की खाजगी क्षेत्रात, की एनजीओसोबत? बिजापूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत डॉ.अय्याजसर यांच्यामुळे भ्रष्टाचाराला बराच आळा बसला आहे. अय्याजसर कधी कुठे टपकतील आणि कुणाला रंगेहाथ पकडून लगेच त्यावर कारवाई करतील, सांगता येत नाही. एकदा शवविच्छेदन करणाऱ्या ठिकाणी पोहोचले. तेथील कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला कधी पाहिले नसल्याने सरांसमोर त्याने नातेवाइकाकडून पैसे बिनदिक्कत घेतले आणि मग त्याला सरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील मोठ्या पातळीवर चाललेली प्रकरणेही अय्याजसरांनी बंद केल्याने ‘तांबोळीसर का ट्रान्स्फर कब होगा?’ यावर इथे सतत चर्चा चालू असते.

किती तरी रुग्ण स्त्रिया व त्यांची कुटुंबे कायमसाठी माझ्या मनात रुतून राहतात आणि न चुकता नित्यनेमाने आठवत राहतात. अशीच एका रात्री आमच्या डिलिव्हरी रूममध्ये ‘सुकली’ आली. नववा महिना आणि बाळंतपणाच्या कळा सुरू झालेल्या. वय 40 वर्षे आणि दहाव्या वेळी गरोदर राहिलेली. आधीची सर्व मुले-मुली मोठी झालेली. त्यामुळे हिला वाटले की, आता या वयात गर्भ राहणार नाही, म्हणून कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रियाही न केलेली. मी तिला तपासले, तर तिच्या जननांगावर मोठ्या प्रमाणात सूज आलेली. तो भाग सुजून आधीच्या आकाराच्या चार पट झालेला. बऱ्याचदा अशी सूज बीपी वाढलेल्या रुग्णांमध्ये आढळते; पण हिचा बीपीही नॉर्मल आणि बाकी शरीरावर कुठेच सूज नाही. सुकलीने स्वतःच सांगितले, तिला गेल्या तीन-चार गर्भारपणांत आठव्या महिन्यापासून अशीच सूज येते आणि बाळंतपणानंतर काही महिन्यांनी उतरते. तोपर्यंत उठता- बसताना त्रास सहन करायचा.

आत्तापर्यंतची तिची सर्व बाळंतपणे घरीच झालेली. या वेळेस आमची हुशार मितानी तिला रुग्णालयात घेऊन आली होती. तपासणीत रक्तातील साखर वाढलेली- 400. तिच्यावर उपचार सुरू केले. रात्रीतून तिची डिलिव्हरी झाली.

‘‘इसके पहले तुम क्यो नही आये जाँच के लिये अस्पताल मे?’’

‘‘दीदी, बहोत दूर गाव है हमारा. बीच मे नदी आता है, नही आ पाते. घर में भी तो काम होता है. वो छोड के नही आ सकते.’’

हे सर्वच महिलांचे प्रातिनिधिक उत्तर. रुग्णालयात येणे ही एखादी चैनीची गोष्ट केल्यासारखा अपराधी भाव. ही चैन नसून, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आणि हक्क आहे, हे त्यांना समजवायची आमची धडपड. दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंड घेताना मी तिच्या कॉटजवळ गेले. ती थकून झोपलेली. शेजारी मांडी घालून बसलेली एक तीक्ष्ण चेहऱ्याची मुलगी आणि तिच्या मांडीवर सुकलीचे बाळ. ‘‘ये कौन है?’’

‘‘मेरी लडकी.’’

‘‘तुम्हारा नाम क्या है?’’

‘‘सरिता.’’

‘‘स्कूल जाती हो?’’

ती गप्प. मग जास्त चौकशी केल्यावर कळले, ती आठवीमध्ये शिकत होती. तिला शिकण्यासाठी बिजापूरला होस्टेलमध्ये ठेवले होते. पण जशी सुकली गर्भवती झाली, तशी तिला मदत करायला सरिता गावी गेली, ती घरीच राहिली. शाळेसाठी परत बिजापूरला येऊच शकली नाही. घरची सारी कामे तिच्या अंगावर येऊन पडली होती. आता तर मांडीवरचे ते बाळ जसे काही सुकलीचे नाही, तर तिचीच जबाबदारी होते.

आदिवासी लोकांची संख्या कमी आहे, त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे कुटुंबनियोजन करायला नको, असे म्हणणारा एक मित्र आठवला. अनियंत्रित संततीमुळे जर नव्या पिढीचे शिक्षण बंद होत असेल, तर अशी लोकसंख्या वाढवून आपण काय साध्य करत आहोत, हा मला नेहमीचा पडणारा प्रश्न. एक स्त्रीरोगतज्ज्ञ या दृष्टीने ‘कुटुंबनियोजन’ हे मला स्त्रीचा अधिकार वाटते आणि स्त्री सक्षमीकरणासाठी एक अंगभूत अस्त्र. सुकलीला तपासायला गेले की सरिताला शाळेत जाण्यासाठी समजावत राहणे, हा माझा उपक्रमच बनवून गेला. त्याचा योग्य परिणाम होऊन सरिताने शाळेत जाऊन चौकशीही केली की, ती येणाऱ्या परीक्षेला बसू शकते का? तिने सांगितले की, शाळेत तिच्या खूप सुट्‌ट्या पडल्याने तिला लिहून द्यायला सांगितले आहे. मग त्याच्यावरही मी तोडगा काढला, ‘‘मी तुझ्यासोबत येते शाळेत, आपण तुझ्या शिक्षकांना विनंती करू की, तुला परत येऊ द्या शाळेत. आणि इथून पुढे तू सुट्‌ट्या घेऊ नकोस, म्हणजे तुला परीक्षा देता येईल.’’

याबरोबर मी सुकलीलाही रोज समजवायचे की, तिने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे किती गरजेचे आहे ते. पण ती ऐकायलाच तयार नाही. ‘‘मै जंगली जडीबुटी खाऊँगी.’’ इथे कुटुंबनियोजनासाठी जंगली वनस्पती मिळते. फक्त एकदाच खायची; त्याने पुढे बरेच महिने गर्भधारणा होत नाही, असा समज. तो इलाज बऱ्याचदा फसतो आणि मग गर्भपात करून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करायला किंवा तांबी बसवायला रुग्ण दवाखान्यात येतात. सुकलीनेही जंगली बुटी खाल्ली होती आणि ती अयशस्वी झाली होती. मी तिच्या मागेच लागल्यावर तिने खरे सांगितले, ‘‘मुझे ऑपरेशनसे डर लगता है, मै मर जाऊँगी. ऑपरेशनसे लोग मर जाते है.’’ इथे सर्वांना- विशेषतः स्त्रियांना- कसल्याही ऑपरेशनची खूप भीती. मग पुन्हा माझे तिला समजावणे, ‘‘हम रोज ऑपरेशन करते है यहाँ, कुछ नही होगा तुम्हे, मै हूँ ना...’’

खरे तर आम्ही सर्व काळजी घेतली तरी शस्त्रक्रियेत जीवाला धोका असतो, तशी सहीसुद्धा आम्ही घेतो शस्त्रक्रियेपूर्वी. त्यामुळे माझे तिला असे म्हणणे कायद्याने चुकीचे होते. शेवटी ती तयार झाली आणि दहा मिनिटांची तिची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली. मी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसांनी संध्याकाळी मी राऊंडला गेले तेव्हा नर्सने सांगितले, ‘‘मॅडम, सुकली और सरिता बिना बताये कही तो जा रहे थे.’’ चौकशीनंतर कळले, संध्याकाळी सुकलीच्या पोटात दुखू लागले होते. तिला वाटले, ती आता मरणार. त्या दोघीही भयानक घाबरल्या आणि त्यांनी ठरवले- मंदिरात देवीकडे जायचे, म्हणजे देवी तिला  वाचवेल. नशिबाने एका नर्सने ते पाहिले, तिला इंजेक्शन दिले आणि तिचे दुखणे थांबले. मग दोघी शांत झाल्या. मी सुन्न. काय बोलणार? त्यांच्या मनातील श्रद्धेला विरोध करायचा नाही, हे ‘सर्च’मध्ये राहून अंगी बाणवलेले सूत्र.

दोनच दिवसांत हट्टाने दोघीही सुट्टी घेऊन घरी गेल्या. त्यांना तिच्या पोटावरचे टाके काढायला पाच दिवसांनी बोलावले. त्या मायलेकी उगवल्या एका महिन्यानंतर. टाक्यांत सर्व पस भरलेला. ‘‘बारिश के कारण नदी भर गयी, इसलिये आ नही पाये.’’ मग पुन्हा तिला भरती करून तिची जखम बरी केली. या वेळेस मात्र सुकलीचा पूर्ण विश्वास होता रुग्णालयावर. कसला हट्ट नाही, त्रागा नाही. पुन्हा सरिताला शाळेबद्दलचे माझे प्रश्न. पण सुकलीचे बाळ सांभाळायला तिची घरी गरज होती. तिला म्हटले, ‘‘माझ्याकडे येऊन राहा. तुझा पुस्तकांचा-कपड्यांचा खर्च आपण करू.’’ पण सगळ्याला तिचा नकार. मला उत्तर समजून गेले होते. तरीही माझे प्रत्येक वेळेस प्रयत्न. जातानाही तिला मी विनवत राहिले, ‘‘स्कूल के लिए वापस लौट के आ जाओ बिजापूर मे.’’

ती भेटली काही महिन्यांनी. तिच्या एका शेजारणीसोबत बाळंतपणासाठी आलेली. रुग्णांना त्यांच्या गावी सोडायला रुग्णवाहिकेची मोफत सोय असते. बरेच रुग्णवाहिकेचे चालक पैसे मागतात अडाणी लोकांना. ती सरळ माझ्यासमोर आली तक्रार करायला. तिच्या शेजारणीचे मूल पोटातच मेले होते. डिलिव्हरीनंतर मृत बाळाला न्यायला ‘मुक्तांजली’ नावाची शववाहिका असते. त्याच्या चालकाने तिच्याकडून आणि आणखी एका कुटुंबाकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले. मी सरिताला आणि आणखी एका म्हाताऱ्या आजीला घेऊन, वाहनचालकाची ओळख पटवायला रुग्णवाहिकेजवळ घेऊन गेले. दोघींनी बरोबर ओळखले. तो कबूल झाला नाही. मुख्य मेडिकल ऑफिसर डॉ.पुजारीसरही तिथे आलेले. त्यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी पाचशे-पाचशे काढून त्या दोघींना दिले. ‘‘मरे हुए बच्चे के तुम पैसे लेतो हो, शरम नाही आती?’’ माझा रागाचा पारा चढलेला.

नंतर मात्र त्याने चूक कबूल करून माफी मागितली. भ्रष्टाचार सरकारी यंत्रणेच्या नसानसांत रुजलेला आहे. आम्हा दोस्तमंडळींतही बऱ्याचदा चर्चा होते की, सरकारी यंत्रणेसोबत काम करायचे, की खाजगी क्षेत्रात, की एनजीओसोबत? बिजापूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत डॉ.अय्याजसर यांच्यामुळे भ्रष्टाचाराला बराच आळा बसला आहे. अय्याजसर कधी कुठे टपकतील आणि कुणाला रंगेहाथ पकडून लगेच त्यावर कारवाई करतील, सांगता येत नाही. एकदा शवविच्छेदन करणाऱ्या ठिकाणी पोहोचले. तेथील कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला कधी पाहिले नसल्याने सरांसमोर त्याने नातेवाइकाकडून पैसे बिनदिक्कत घेतले आणि मग त्याला सरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील मोठ्या पातळीवर चाललेली प्रकरणेही अय्याजसरांनी बंद केल्याने ‘तांबोळीसर का ट्रान्स्फर कब होगा?’ यावर इथे सतत चर्चा चालू असते.

माझे शिक्षण सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे, ज्यामुळे माझी शस्त्रक्रियाकौशल्ये आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने विकसित झाला. परंतु नंतर मात्र सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट कारभार पाहून माझा विश्वासच उडालेला. त्यामुळे महाराष्ट्रात असताना सरकारी रुग्णालयात मी कधीच काम केले नाही. डॉ.अय्याजसरांमुळे इथे बिजापूर जिल्हा रुग्णालयात आले आणि इतके दिवस सरकारी यंत्रणेला बाहेरून नावे ठेवणारी मी आज या यंत्रणेचा भाग बनून काम करते आहे. सरांच्या कुशल धोरणांमुळे इथे सर्व डॉक्टर्स समाधानाने आणि प्रामाणिकपणे काम करू शकतात. कोणालाही समस्या असल्यास अय्याजसरांकडे मोकळेपणाने बोलता येते आणि सरांचे सहकार्य लाभते. सर विश्वासाने तुमच्यावर जबाबदारी टाकतात आणि मग यंत्रणेचा भाग करून काम करणे, हा एक नावीन्यपूर्ण आणि तुम्हाला जास्त जबाबदार व परिपक्व बनवणारा अनुभव ठरतो.

शेवटी सरकारी यंत्रणेमध्ये तरी कोण असते? तुम्ही- आम्ही मिळूनच ही यंत्रणा बनते. तिला नावे ठेवून दूर लोटायचे की, स्वतःची जबाबदारी उचलून तिला सक्षम व विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न करायचा? ज्याचे-त्याचे उत्तर वेगळे असू शकेल. सरिताने माझ्याकडे येऊन त्या वाहनचालकाची तक्रार करणे माझ्यासाठी समाधानकारक होते. कारण याचा अर्थ तिला माझ्याबद्दल विश्वास वाटला की, मी तिचे ऐकून घेईन आणि तिला मदत करेन. जाताना तिला विचारले, ‘‘स्कूल का क्या हुआ?’’ इतर सर्व रुग्णांसमोर तिला शिक्षण घेणे कसे महत्त्वाचे आहे, या विषयावर मी अर्धा तास तळमळीने दिलेले भाषण ऐकून, खालमानेने ती निघून गेली. त्या परीक्षेत मात्र मी नापास झाले होते.

Tags: सरकारी रुग्णालय चिकित्सालय छत्तीसगढ बिजापूर डायरी government hospital chikitsalay chattisgadh bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात