डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दर वर्षी हिवाळ्यात अंगात ऊब यावी म्हणून मी त्यांना मसाला पोचवतो. दुसरं, मी त्यांच्या गावचा आहे. तिसरी गोष्ट, माझ्या वडिलांनी एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगून त्यांना परमनंट करायला लावलं, चौथी गोष्ट, त्यांच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी मी त्यांच्या हेड ऑफ डिपार्टमेंटच्या तासाला वर्गात फटाके वाजवले होते, नि शिक्षण समितीसमोर प्रो. खन्नांचे इंप्रेशन वाढवलं होतं.

सार्वजनिक बागेतील झाडावरून कोकिळेने कुहकुहू केलं नि विद्यार्थी-विद्यासागरने लगेच गाईड काढून अभ्यासाला सुरुवात केली. खिडकीबाहेर रस्त्यावरून डुरकत जाणाऱ्या सांडाकडे पाहिलं. अन् तो स्वतःशीच म्हणाला, ‘विद्यासागर, सीरियस बना. परीक्षा जवळ आली आहे, सीरियस व्हा. विद्यासागर लगेच सीरियस झाला हातातील गाईड खाली ठेवून तो खोलीबाहेर आला, सडकेवर जाऊन दोन ग्लास उसाचा रस घेऊन प्याला. रसवाल्याने विचारले, "दादा, आज तर तुम्ही दोन ग्लास प्यालात." विद्यासागर म्हणाला, 'हो. रस प्यायला पाहिजे. त्यामुळे बुद्धी ताजी तवानी बनते.' "बुद्धी?"- पैसे घेत रसवाला उत्तरला.

0  0   0 

खोलीत येऊन विद्यासागर अभ्यासाला बसला. पण अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण अभ्यासासाठी इतकं काही असतं की, अभ्यास न करणं हाच सर्वात सोपा मार्ग असतो. विद्यासागरने आठवायला सुरूवात केली, की आपले कोणकोणते विषय कशी आहेत? आणि सर्वच विषय को आहेत हे बघून त्याला समाधान वाटले समाधान अशासाठी की, विद्यार्थी ज्या विषयात चांगला असतो, त्यात त्याला प्रथमश्रेणीचे गुण मिळविण्याची चिंता असते. पण सर्व विषय कच्चे असले की ही चिंता आपोआपच संपते. हा काय कमी फायदा झाला? आता विद्यासागरला पुढला मार्ग मोकळा होता. त्यानं ठरवलं की, अभ्यासाशिवाय परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे इतर मार्ग असतात, तेच त्याला सोयीचे आहेत. तो खरं तर त्याच योग्यतेचा आहे. त्याच मार्गाचा तो अवलंब करील. तो उठला आणि आपला परममित्र सरस्वतीकुमार याची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडला. सरस्वतीकुमार रिपीटर होता. आणि शिक्षणाच्या बाबतीत घाई करण्याच्या विरुद्ध होता. 

'हेस्ट मेक्स वेस्ट ' या तत्त्वाचा पालनकर्ता होता. "काय, कसला अभ्यास चाललाय?" विद्यासागरने सरस्वतीकुमारला विचारलं. “इकॉनॉमिक्स" सरस्वतीकुमार उत्तरला.. हे ऐकून विद्यासागरला अत्यंत दुःख झालं. अत्यंत व्याकुळ स्वरात त्याने विचारलं. "किती वाचलं?" सरस्वतीकुमारने हसून उत्तर दिलं, अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. कव्हर बघत होतो." "बस्स! इतकंच!" समाधान पावत विद्यासागर म्हणाला. सरस्वतीकुमारच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज झळकले. गांभीर्याने तो म्हणाला, "नाही. पुढेही वाचून झालंय. प्रकाशकाचं नाव, पुस्तक छापल्याचं वर्ष, पहिल्या आवृत्तीच्या प्रती, प्रास्ताविक- हे सर्व वाचून झालंय.

"पुढे नाही वाचलं?" “नाही. पुढे नाही वाचले. पण आज प्रस्तावना वाचली, तर उद्या एखादं प्रकरण वाचण्याची उमेद निर्माण झाली आहे." सरस्वतीकुमार उत्तरला विद्यासागर अतिशय व्यथित झाला. त्याने तर अद्याप प्रस्तावनाही वाचली नव्हती. काही वेळ शांततेत गेला. थोडया वेळानं दुःख थोडं हलकं झाल्यानंतर विद्यासागरने विचारलं, "दोस्ता, पास होण्यासाठी दुसरा काही उपाय नाही का? तुला तर माहीतच आहे की, वाचून, अभ्यास करून पास होणं आपल्याला जन्मात जमणार नाही. जे परीक्षेला घाबरून अभ्यास करतात. ते वाचून पास होतात इतका भ्याडपणा आपल्यात नाही. त्याच्या या बोलण्याला सरस्वतीकुमारने संमती दर्शविली. तो म्हणाला, 'यार, माझ्या मनचं बोललास बघ, चल प्रोफेसर खन्नांकडे जाऊ. त्यांच्याकडून 'गेस' घेऊ. विद्यासागरने विचारलं. “पण ते देतील का?" कोपऱ्यातली हॉकी स्टिक उचलून ती फिरवीत सरस्वतीकुमार म्हणाला, "देणार का नाही? त्यांच्याशी माझे कितीतरी चांगले संबंध आहेत. 

दर वर्षी हिवाळ्यात अंगात ऊब यावी म्हणून मी त्यांना मसाला पोचवतो. दुसरं, मी त्यांच्या गावचा आहे. तिसरी गोष्ट, माझ्या वडिलांनी एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगून त्यांना परमनंट करायला लावलं, चौथी गोष्ट, त्यांच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी मी त्यांच्या हेड ऑफ डिपार्टमेंटच्या तासाला वर्गात फटाके वाजवले होते, नि शिक्षण समितीसमोर प्रो. खन्नांचे इंप्रेशन वाढवलं होतं. प्रा. खन्नांनी मला जूनमध्येच सांगितले की होते की, खा, पी, मजा कर. फेब्रुवारीत माझ्याकडून अपेक्षित' घेऊन जा." हे ऐकून विद्यासागरचा जीव भांड्यात पडला. खरं तर त्याला परीक्षेत पास होण्याची एवढी चिंता नव्हती. चिंता होती, ती ही की कु. पुष्पा बन्सल जर पास होऊन एक वर्ष त्याच्यापुढे गेली असती, तर काय? या गोष्टीची. पुष्पावर तो प्रेम करीत होता. ती पुढे गेली असती तर, न जाणो कुणा दुसऱ्यावर प्रेम करू लागली असती. म्हणजे जर पुष्पा बन्सल नापास होणार असेल तर नापास होण्यास त्याचीही हरकत नव्हती. मग नापास व्हायला तोही तयार होता. 

पण अभ्यासानंतर- प्रेमाशिवाय अभ्यासाला अधिक महत्त्व असतं, बुद्धीला स्थान असतं, आणि हा तर त्याचा 'वीक पॉईंट' होता. प्रा. खन्नांना मुलींनी घेरलेलं होतं आणि ते त्यांच्या डिफिकल्टीज सोडवीत होते. वर्गात ते डिफिकल्टीज निर्माण करायचे आणि त्या सोडविण्यासाठी घरी एक्स्ट्रा पीरियड्स घ्यायचे. आज घरी हेच काम चाललं होतं. कॉलेजला अभ्यासासाठी सुट्ट्या लागल्या होत्या. नि मुलींना त्यांच्या घरी जाण्यास आवडे विद्यासागरने पाहिलं की, त्यांच्या दोघांशिवाय तिथं कुणी मुलं नव्हती. त्याने हळूच सरस्वतीकुमारच्या कानात आपली शंका बोलून दाखवली, "यार, इथं तर पोरीच पोरी आहेत." सरस्वतीकुमार म्हणाला, "हो, सर फक्त मुलींनाच घरी येऊ देतात. घरी यायला मुलांना परवानगी नाही. विद्यासागर गप्प झाला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून मुलींकडे पाहू लागला. त्या वेळी आपण नापास होणार, ही अटळ गोष्टही तो विसरून गेला. 

मुलींच्या शंका संपल्यानंतर प्राध्यापक खन्नांनी सरस्वतीकुमारकडे वळत विचारलं, "काय सरस्वतीकुमार, काय काम काढलं आज?" सरस्वतीकुमार म्हणाला, "तुम्हांलाच भेटायला आलो होतो सर. परीक्षा जवळ आल्यात. तुमच्याकडून 'अपेक्षित' घेण्यासाठी आलो होतो." त्याच्या हो ला हो लावीत विद्यासागर म्हणाला, “यस्सर. आम्ही दोघं 'गेस’ साठी आलो आहोत." पण प्राध्यापक खुराणांनी तुम्हाला ‘अपेक्षित' दिलंय ना?" प्रा. खन्नांनी विचारलं. ताडदिशी सरस्वतीकुमार म्हणाला, "होय सर, त्यांनी दिलंय. पण तुमचे ‘अपेक्षित' अचूक असतात, आपण दिलेले ‘अपेक्षित' सेंट-परसेंट येतातच. खुराणा सर द्यायचे म्हणून देतात झालं." हे ऐकून प्रोफेसर खन्ना खुलले, म्हणाले, "पण काहीजण तर म्हणतात प्रा. खुराणा फार चांगले शिकवतात. म्हणून. "सर, वाईट वाटून घेऊ नका. त्यांना बनवण्यासाठी आम्ही तसं म्हणतो. ज्याला बनवायचं, त्याची आम्ही स्तुती करतो." प्राध्यापक खन्ना आणखीन खुलले, म्हणाले, "बरोबर आहे. तुम्ही सांगता ते बरोबर आहे. 

मी सुद्धा त्यांना सांगत असतो की, तुम्ही चीप पॉप्युलॅरिटीच्या मागे लागू नका. पण ते ऐकताहेत कुठे? स्टाफ रूममध्ये यावरून सर्वजण त्यांची टिंगलही करतात." दोघे सत्शिष्य आपल्या गुरूजवळ सरकले. आपल्या परमपूज्य गुरूच्या तोंडचे अक्षर न् अक्षर ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे बोलणे संपताच सरस्वतीकुमार म्हणाला, "सर, एक गोष्ट विचारू?" 'एक का? दोन विचारा "गुरू म्हणाले. "सर, पेपर आपणच काढलेत, ही गोष्ट खरीय ना?" प्रा. खन्नांनी स्मित केलं म्हणाले, "नाही. पण मी इतकं सांगू शकेन की, पेपर्स तपासायला कोणाकडे जाणार. सरस्वतीकुमार आणि विद्यासागर अत्यंत पुलकित झाले. सरस्वतीकुमार म्हणाला, "सर, या वर्षी तुम्ही सुपरव्हिजन घेणार ना?" "हो, हो, नक्कीच." "हॉल नंबर तीनमध्ये तुम्ही येऊ शकाल?" होऽऽ. जरूर," ते दोघेही विद्यानुरागी अत्यंत खूश झाले इतका संवाद झाल्यानंतर त्या गुरूंनी 'अपेक्षित ' दिले, नि नंतर ते दोघे विद्याप्रेमी घरी गेले.

0 0 0 

घरी गेल्यावर विद्यासागर म्हणाला, “यार सरस्वती, प्रश्न तर मिळाले, पण याची उत्तरे कोण घोकणार?" सरस्वतीकुमार म्हणाला, "उत्तरं घोकली जाणार नाही, लिहिली जातील." "कुठे?" सरस्वतीकुमारने शेल्फमधून एक दस्ता कोरे कागद काढले. आणि म्हणाला,"यावर. आता या कागदांचे मी लहान लहान तुकडे करतो. तू बारीक अक्षरात त्यावर उत्तरं लिही. हे तुकडे परीक्षेच्या वेळी हॉलमध्ये कामी येतील." आणि पकडले गेलो तर?" सरस्वतीकुमार बालसुलभ सहजतेनं म्हणाला, "कसे पकडले जाऊ?" आणि त्यानं टेबलाच्या डॉवरमधून एक वस्तु काढून दाखवली. ती वस्तू म्हणजे एक रामपुरी चाकू होता - बारा इंची.

अनुवादक : चंदुलाल सावज

Tags: विद्यासागर सरस्वतीकुमार प्रो. खन्ना चंदुलाल सावज अनुवादक अजातशत्रू Saraswatikumar< vidyasagar Prof. Khanna Chandulal Savaj Transleter Ajatshatru weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके