डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुढे गावोगावी इंटरनेट पोहोचले आणि इंटरनेटचा उपयोगही आम्ही वेगवेगळे विषय शिकविताना करू लागलो. दरम्यान 2014 मध्ये पाटीलसर दहिवडीच्या शाळेत रुजू झाले, तर 2016 मध्ये मीसुद्धा याच शाळेत दाखल झालो. एन. डी. पाटीलसर म्हणजे गणित सोपे करून शिकविणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटीलसरांचे सुमारे 17 वर्षांचे ज्ञान आणि गणित सोपे करण्याची हातोटी आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवणे मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे. या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार मी करू लागलो. मग स्मार्टफोनच्या साह्याने पाटीलसरांच्या गणिताच्या मी छोट्या छोट्या क्लृप्त्यांचे, व्हिडिओचे चित्रीकरण करायला लागलो. हे व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. हा प्रयोग मुलांना फारच आवडला.

 

दि. 17 जुलै च्या साधना अंकातील संपादकीय वाचून याबाबत मी व माझे सहकारी शिक्षक यांनी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गणिताबाबतचा केलेला उपक्रम आठवला तो आपल्याला पाठवत  आहे. आशा आहे की, आपल्या उपक्रमास चालना मिळेल.

गणिताचं नाव काढलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो, मोबाइल किंवा कॉम्प्युटरमधल्या कॅलक्युलेटरशिवाय आकडेमोड करायची म्हटले, तर मग घामच फुटतो!! विद्यार्थिदशेतले अवघड पाढे, त्रैराशिके, समीकरणे डोळ्यांसमोर नाचायला लागतात आणि मग भीती आणखी वाढते. अशा वेळी वाटते, गणित सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे कोणी शिक्षक आपल्याला लाभले असते, तर किती चांगले झाले असते! कारण गणित हा साऱ्या तर्कबुद्धीचा पाया असतो, जो आयुष्याला योग्य दिशा देतो. एखाद्या शाळेतील गणिताचे शिक्षक फार सोप्या पद्धतीने शिकवीत असतात, पण ते त्यांच्याच शाळेपुरते मर्यादित राहतात. आमच्याही दहिवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणिताला सोपे करणारे एन.डी. पाटीलसर आहेत, त्यांचे हे कौशल्य आमच्या शाळेपुरतेच का मर्यादित ठेवायचे, असा विचार मनात आला आणि मग 2017 पासून आम्ही गणिताला सुलभ बनविण्यासाठी मार्गदर्शन करणारे यू-ट्यूब चॅनल सुरू केले Ajay Kale-Tech Guru  या नावाने!!

अर्थात हे यू-ट्यूब चॅनल सुरू करण्याचा प्रवास सोपा नव्हता. या तंत्रज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात झाली 2009 मध्ये. शिक्षण विभागातर्फे तेव्हा पहिलीचा अभ्यासक्रमा-साठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी मी आणि पाटीलसर गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघे तासगाव तालुक्यातच काम करीत असलो तरी आमच्या शाळा मात्र वेगवेगळ्या होत्या. मी सिद्धेवाडीच्या जि.प.प्रा शाळेत होतो, तर पाटीलसर वायफळेच्या जि.प.प्रा शाळेत होते. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आम्हांला एक प्रश्न विचारला, ‘‘घरात पडलेली गाडगी-मडकी, चाक, मातीनं मळलेले कपडे पाहून कुंभाराचे घर सहज ओळखू येते. शिक्षकाचे घर असे समाजात वेगळे ओळखता येते का? त्यासाठी काय करावे लागेल?’’

या प्रश्नाने खरंच आम्हांला विचारात पाडले. आपण ज्ञानदानाचे काम करतो, विद्यार्थ्यांना घडवितो, असे म्हणतो, तर मग आपल्या घरी काही वेगळे दिसते का? शिक्षक म्हणून आपण आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे, वेगवेगळ्या विषयांची किमान शंभरेक पुस्तके, उत्तमोत्तम मासिके, जागतिक दर्जाचे चित्रपट आपल्या संग्रही हवेत. आधुनिक काळाच्या अनुषंगाने मुलांना घडवायचे असेल, तर काळाची गरज बनलेला कॉम्प्युटरही आपल्याकडे हवा; याची जाणीव झाली. आपण भरपूर वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, तरच एक चांगले शिक्षक म्हणून आपण काम करू शकू, हे आम्हांला पटले.

मी आणि पाटीलसर या प्रशिक्षणातून नवीन दृष्टी घेऊन बाहेर पडलो आणि 2009 मध्ये स्वतःच्या कमाईतून सर्वप्रथम आम्ही दोन लॅपटॉप खरेदी केले. त्यासाठी आम्हांला सुमारे 70 हजार रुपयांचा खर्च त्या वेळी आला. आम्ही मुद्दाम डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपची निवड केली, कारण लॅपटॉप आम्हांला शाळेत आणि घरी दोन्ही ठिकाणी सहज उचलून नेता-आणता येणे शक्य होते. शिवाय सततच्या भारनियमनामुळे घरून एकदा चार्ज केलेला लॅपटॉप शाळेत किमान तीन तास वीज पुरवठा नसतानाही वापरणे शक्य आहे. लॅपटॉप हा जादाचा खर्च नव्हता, तर ती एक योग्य गुंतवणूक होती, हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.

सुरुवातीला आम्ही दोघे आपापल्या शाळेत या लॅपटॉपचा वापर करून त्या काळी प्रचलित असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या सीडी दाखवायचो. पण 90 मिनिटांत पूर्ण पुस्तक संपविणाऱ्या या सीडीज्‌ काही मुलांना फार मार्गदर्शक ठरत आहेत, असे आम्हांला वाटेना. त्यामुळे मग आम्ही शाळेत वेगवेगळ्या पाठांवरचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून वर्गातील मुलांना दाखवू लागलो उदा. इतिहासातील ‘पन्हाळगडास वेढा’ आणि ‘बाजी प्रभूंचा पराक्रम’ हा पाठ शिकवायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा, पन्हाळगड, सिद्दी जोहरने दिलेला वेढा, शिवाजी महाराजांचा वेष घेणारे शिवा काशिद आणि छत्रपती शिवराय विशाळगडावर पोहोचेपर्यंत जिद्दीने घोडखिंड लढविणारे बाजी प्रभू देशपांडे ही सगळी कथा आम्ही शक्य त्या फोटो आणि व्हिडिओ व संगीताच्या साह्याने सांगून घोडखिंडीचे नाव कसे पावनखिंड झाले, हे समजावायचो. विद्यार्थ्यांना हे सगळे फारच आवडायचे.

पुढे गावोगावी इंटरनेट पोहोचले आणि इंटरनेटचा उपयोगही आम्ही वेगवेगळे विषय शिकविताना करू लागलो. दरम्यान 2014 मध्ये पाटीलसर दहिवडीच्या शाळेत रुजू झाले, तर 2016 मध्ये मीसुद्धा याच शाळेत दाखल झालो. एन. डी. पाटीलसर म्हणजे गणित सोपे करून शिकविणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटीलसरांचे सुमारे 17 वर्षांचे ज्ञान आणि गणित सोपे करण्याची हातोटी आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवणे मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे. या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार मी करू लागलो.

मग स्मार्टफोनच्या साह्याने पाटीलसरांच्या गणिताच्या मी छोट्या छोट्या क्लृप्त्यांचे, व्हिडिओचे चित्रीकरण करायला लागलो. हे व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. हा प्रयोग मुलांना फारच आवडला. पारंपरिक पद्धतीने वह्या-पुस्तके वापरण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले हे व्हिडिओ पाहून गणिताचा तो घटक समजून घेण्यात मुले रंगून जायची. आमचा हा प्रयोग तासगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांना फार आवडला. मात्र हा प्रयोग दहिवडी शाळेपुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा इतर शाळांपर्यंतही कसा पोहोचवता येईल याचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.

त्यांच्या कौतुकाने माझा हुरूप आणखी वाढला आणि मग विचार करता एक कल्पना सुचली, यू-ट्यूब चॅनलची!! मी तोपर्यंत स्वतःचे यू-ट्यूब चॅनल सुरू केलेले नव्हते, पण आत्तापर्यंत शिक्षण विभागातर्फे झालेली तंत्रस्नेही शिक्षकांची प्रशिक्षणे, त्यात उपक्रमशील शिक्षकांशी झालेली ओळख, त्या तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग या सगळ्याचा मला हे यू-ट्यूब चॅनल सुरू करताना चांगलाच उपयोग झाला. यू-ट्यूब चॅनल कसे सुरू करावे, ते कसे चांगले बनवावे, हे मी ऑनलाइन ट्युटोरियलमधूनच शिकलो. आणि मग आकाराला आले आमचे Ajay Kale-Tech Guru  चॅनल.

या यू-ट्यूब चॅनलच्या संपूर्ण चित्रीकरण, संकलन, संपादनाची जबाबदारी मी स्वीकारली आणि गणितासारख्या अवघड मानल्या गेलेल्या विषयाला मराठीतून सोपे करण्याचे आव्हान एन. डी. पाटीलसरांनी पेलले. गणिताचा अभ्यास फक्त घोकंपट्टी करून होत नसतो, त्यातील नियम, सूत्रे फक्त पाठ करण्यापेक्षा ते नियम असे का आहेत, त्यामागची कारणे व तर्क काय हे समजावले की गणित सोपे होते, असे पाटीलसर मानतात. त्यामुळे आमच्या यू-ट्यूब चॅनलवर ‘एक’ ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ संख्याही नाही, या पाठीमागचे कारण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना नेहमी एक द्वितीयांशच (1/2) का वापरतो, किंवा पायची  (π)  किंमत नेहमी 22/7 किंवा 3.14 च का घेतात, भागाकाराची सुरुवात नेहमी डावीकडूनच का करायची, अशा अनेक ‘का?’ची उत्तरे तुम्हांला या यू-ट्यूब चॅनलवरून मिळतील.

याशिवाय भागाकार करताना होणाऱ्या सामान्य चुका, 2 ते 10 चे पाढे वापरून पुढील कोणत्याही संख्येचा पाढा कसा तयार करावा, अपूर्णांकांचा लहान-मोठेपणा ठरविण्याच्या सोप्या पद्धती, गुणोत्तर आणि प्रमाण कसे ठरवावे, सरळव्याज कसे काढावे, अपूर्णांकांचा सोप्या पद्धतीने गुणाकार-भागाकार कसा करावा, अशा अनेक गोष्टींच्या सोप्या युक्त्या पाहायला मिळतील. आमच्या यू-ट्यूब चॅनलवर जसे कोन आणि कोनांचे प्रकार यांसारखे पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे व्हिडिओ आहेत, तसेच अगदी एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणारे त्रिकोणी संख्येबाबतच्या प्रश्नांवरील मार्गदर्शनही आहे.

तेव्हा आमच्या Ajay Kale- Tech Guru  यू-ट्यूब चॅनलला जरूर भेट द्या, सबस्क्राइब करा ही विनंती! कारण, आमचे यू-ट्यूब चॅनल शिक्षकांना गणिताचा बागुलबुवा कसा दूर करावा हे शिकविते, तर विद्यार्थ्यांना ‘अवघड सोपे झाले हो’ असे म्हणायला लावते!

लेखन : अजय काळे, उपशिक्षक,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी, जि. सांगली.

Tags: शिक्षण गणित अजय काळे ganit maths shikshan ajay kale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके