डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लेखनासंदर्भात बोलताना एलकुंचवार म्हणतात की, लेखकाला स्वत:कडे, स्वतःच्या अंतरंगाकडे, स्वतःचं अंतरंग स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेकडे अधिक जाणीवपूर्वक पाहता यायला हवं. नाटकांमध्ये आपण दहा पात्रांबद्दल लिहितो, पण ललित लेख हे तसं फार आत्मपर माध्यम आहे. यामध्ये स्वतःला तपासता येतं. लेखकाने आत्मपरीक्षण करायला हवे की, मी आतून स्वच्छ झालो आहे का? आपल्या नीतिमत्तेच्या कल्पना ह्या कालबाह्य, विसंगत व हास्यास्पद आहेत. आपल्याला सतत दुसऱ्याचं मोजमाप करायचं आहे. एखादा व्यक्ती दारू पीत असेल म्हणून तिच्यातला माणूस पाहायचा नाही का? उदाहरणार्थ दोस्तोवस्की हा दारुड्या, जुगारी, व्यसनी होता पण त्याचं मन हे कमालीचं स्वच्छ होतं. त्याचं लोकांवर प्रेम होतं. बरेचदा वैज्ञानिक जिथे पोहोचतात तिथे कलावंत व तत्त्वज्ञ आधीच पोहोचलेले असतात.

भारतात 1980 नंतर समाजात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक स्थित्यंतरे दिसू लागली. या काळात धनशक्तीने विवेकापासून फारकत घ्यायला सुरुवात केली. समाजाला मूल्यांची चाडही वाटेनाशी झाली. केवळ वित्ताचे आकर्षण वाटू लागले. यातून मग मोठ्या प्रमाणात व्यक्तिवाद बोकाळायला सुरुवात झाली. पण या सगळ्यांचं योग्य असं अर्थघटन करून ते इतरांना समजावून सांगणार कोण? उत्तम साहित्याची जबाबदारी जी सुरू होते ती इथूनच! साहित्य म्हणताच त्यात नाटक, कथा, कादंबरी निबंध हे सर्वच रस येतात. या सर्व माध्यमांतून समाज म्हणून आपण नक्की कुठून कुठे चाललो आहोत किंवा कुठून कुठे पोहोचलो आहोत? हा आरसा आपल्याला सकस साहित्य दाखवत असतं. आपल्या आजूबाजूला बदलणाऱ्या गोष्टींना टिपणारं कसदार असं साहित्य हे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करत असतं. या साहित्याच्या वाचनातून वाचकाची संवेदनशीलता वाढत असते. प्रश्नांना कोणत्या पद्धतीने भिडायचं याचं दिग्दर्शन आपल्याला या साहित्यातून होत असतं. हे अंगी बाणवण्यासाठी काय करावं लागतं, हा बदल समजून घ्यायला आपण कमी पडत असू तर काय करावं? याचं उत्तर आहे त्यातलं ज्यांना कळतं, ज्यांना यातला दांडगा अनुभव आहे, ज्यांनी हा काळ अनुभवला आहे अशा ज्येष्ठ मंडळींच्या शेजारी बसून त्यांना ऐकावं. त्यांच्या सोबत साधलेला संवादाचा रियाज करावा. स्वतःला सतत वाढवत न्यावं त्यासाठी प्रसंगी अजून प्रवास करावा, अखंड वाचन करावं. जे माहीत नाही तिथे शिरण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सतत कार्यरत राहावं.

वरील या सर्व गोष्टी ज्यांच्या नाटकातून, ललित निबंधातून मराठी वाचकांपर्यंत गेल्या पन्नास वर्षांत पोहोचवल्या आहेत ते ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकरांनी साधलेला संवाद म्हणजे ‘बोलिले जे...’ हे पुस्तक होय. मनोविकास प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रा.महेश एलकुंचवार हे 1967 पासून लिहीत आहेत. त्यांची ‘सुलतान’, ‘रक्तपुष्प’, ‘रुद्रवर्षा’, ‘झुंबर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’ ही सगळी नाटकं एकानंतर एक येत गेली. त्यानंतर त्यांनी ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘प्रतिबिंब’, ‘आत्मकथा’, ‘वासांसी जीर्णानि’ ‘एक नटाचा मृत्यू’ अशी महत्त्वाची नाटके लिहिली आहेत. त्यांची नाटकं बहुतेक सर्व भारतीय भाषांत पोहोचली आहेत. बंगालमध्ये तर त्यांना सर्व लोक बंगालीच समजतात, इतकी त्यांची नाटकं बंगाली भाषेमध्ये झालेली आहेत. जर्मनी, फ्रान्स या देशांत सातत्याने त्यांची नाटकं झालेली आहेत.

निसर्गाचं, मानव्याचं, संस्कृतीचं होत असलेलं नुकसान याचं जे चित्रण एलकुंचवारांच्या नाट्यत्रयी (वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त)मध्ये आपल्याला वाचायला मिळतं त्याकडे कसं पाहायचं? या प्रश्नाला उत्तर देताना एलकुंचवार म्हणतात की, हे सगळं जे नुकसान होत आहे त्याला व्यक्ती म्हणून माझा किती हातभार लागलेला आहे? याचा प्रथम मी विचार करावा. सत्तर-ऐंशीच्या दशकानंतर जगात मूल्यांचं किती अवमूल्यन झालं आहे, होतं आहे, मूल्यं किती ढासळायला लागलीत. तेव्हा या प्रक्रियेला माझाही कुठे तरी हातभार लागलेला आहे की नाही, हे माझं मला तपासून पाहता यायला हवं. मी स्वतः कसा जगतो आहे, जगण्याची माझी मूल्यव्यवस्था काय आहे? याकडे आपल्याला डोळसपणे पाहता यायला हवं. या सर्व मूल्यव्यवस्थेला जोपासणारा एक वर्ग होता. तो म्हणजे मध्यम वर्ग हा होय. या मध्यम वर्गीयांमधून मूल्यव्यवस्था जाणे, संवाद नष्ट होणे हे अधःपतनाकडे जाण्याचे लक्षण आहे. मध्यम वर्गीयांच्या अधःपतनाला एलकुंचवारांनी आपल्या नाट्यत्रयीमध्ये रंगवलं आहे. ‘वाडा चिरेबंदी’मध्ये सत्तरीच्या अगोदर लोक स्वार्थासाठी का होईना एकमेकांना धरत होती. ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये हा मध्यम वर्ग गुन्हेगारीकडे वळला- तर ‘युगान्त’मध्ये सगळंच संपलं आहे. वाडा ‘त्रयी’मध्ये सगळ्यांत ठळक दिसणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पर्यावरणाचा होत गेलेला ऱ्हास. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे मानवी मूल्यांचा ऱ्हास हे समीकरण एलकुंचवार आपल्या नाटकांमधून मांडत आलेले आहेत. ‘युगान्त’मध्ये सलग आठ वर्षे पाऊस पडत नाही. विहिरी, नद्या कोरड्याठाक पडलेल्या असतात. झाडं वठलेले असतात. एकाच वेळी निसर्गातील आणि मानवी नात्यातील जिव्हाळा ओसरून भयाण वैराणता पसरलेली दिसते. या नाट्यत्रयीची प्रेरणा कशात होती? हे सुचलं कसं? त्याचं उत्तर देताना एलकुंचवार म्हणतात, की माझं बालपण खेड्यात गेलं. घरातील सर्व मंडळी उत्तम शिकलेली होती. असं असलं तरी आमचं राहणीमान हे ‘स्पार्टन’ म्हणावं इतकं साधं होतं. कधी एखादी वस्तू घरात आणायची आहे असे वडिलांना विचारले असता ते उलट प्रश्न करत असत की, कशाला हवी आहे? अमुक एका व्यक्तीकडे अमुक एक वस्तू आहे तेव्हा ती आपल्याही घरी असलीच पाहिजे का? आमच्या घरात पुस्तके आणण्यावर मात्र बंदी नव्हती. मग ती पुस्तके कितीही महागडी का असेना, ती आणण्यावर मात्र बंधनं नसत. आज कुटुंबातला नात्यातला जिव्हाळा, घरोबा कमी झालेला जाणवतो, अशी खंत एलकुंचवार व्यक्त करतात. सुबत्तेसोबत टोकाचा व्यक्तिवाद बोकाळला आहे- या व्यक्तिवादामुळेच मी माझंच पाहणार. तंत्रज्ञानाने एकत्र राहण्यावरच घाव घातला आहे. शेतकऱ्यांचा जीवनावरचा विश्वास उडत चालला आहे. शेतकरी आत्महत्या या केवळ दारू, वैफल्यग्रस्त असल्यामुळेच होतात असं नाही तर जीवनावरचा त्यांचा विश्वास उडाल्यामुळेही होतात. तरुणांना आज संवादापेक्षा टंकलिखित संदेश सोपा व सुरक्षित वाटतो. दूरभाष्य करताना त्या क्षणी काही बोलावं लागतं. हे स्वयंस्फूर्त बोलणं टाळण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.

सत्तरोत्तर काळात मध्यम वर्गीयांमध्ये पैसा खेळू लागला. तंत्रज्ञान विकसित होऊ लागल्यामुळे वेळ वाचू लागला. तो मशिन्स विकत घेऊ लागला. वेळ ही वाचवायलाच हवी. स्वयंपाकघरात वस्तू आल्यामुळे स्त्रियांचे कष्ट वाचले. वेळ तर वाचला. पण या वाचलेल्या वेळेचं आपण केलं काय? वेळ व पैसा यांचा विनियोग सुसंस्कृत पद्धतीने आपण कसा करू शकतो याचा विचार करायला पाहिजे असं एलकुंचवार म्हणतात. हे सर्व वाचून आपल्याला वाटेल की माणसांनी मग गरीबच राहायला हवं होतं असं सुचवायचं होतं का एलकुंचवारांना? तर तसंही काही नाहीये. उलट ते म्हणतात की, कुणीही गरीब राहू नये. गरिबी अक्षरशः पाप आहे. गरिबीमुळे माणसं मोडून पडतात. त्यांना अपमान सहन करावे लागतात. त्यांचा चांगल्या प्रेरणांवरचा विश्वास उडायला लागतो. मध्यम वर्गीयांनी पहिले आपले अग्रक्रम ठरवावे. या अग्रक्रमांमध्ये पुस्तकं, सामाजिक संस्थांची जोडून घेणे, गरजूंना मदत करणं, कलांची अभिरुची यात मध्यम वर्गाचा टक्का कमी झाला आहे. जे जे अनावश्यक आहे ते ते असुंदर आहे. हाच नियम ते नाटकांना साहित्यालाही लावतात. ही शिस्त जीवनातदेखील आणयचा ते आग्रह धरतात.

‘मोअर यू पर्सनल मोअर यू युनिव्हर्सल’ या इंग्रजी उक्तीप्रमाणे व्यक्ती ही जितकी स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतेे तितकी ती विश्वाशी जास्त जोडली जाते. एलकुंचवारांची नाट्यत्रयी ही काही केवळ काळानुरूप स्वतःमध्ये बदल न केल्यामुळे वाताहत होत गेलेल्या एका कुटुंबाची कहाणी नाहीये, तर ते कुटुंब हे आपल्या सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करते. देऊळगावकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, हे लिखाण आत्मपर असले तरी ते इतके खोलवर, इतकं आत, मूळ प्रवृत्तींचा शोधात जातं की ते सार्वत्रिक होऊन जातं. त्यांचा आत्मसंवाद हा लोकसंवाद होतो. ‘स्व’ ते ‘विश्व’ ते पुन्हा ‘स्व’ असा वाचकांचा प्रवास होतो. ‘मौनराग’मधील शब्दसौंदर्य हे शब्दांच्या पलीकडचा अनुभव वाचकांना देते. त्याबद्दल एलकुंचवार म्हणतात, ‘‘प्रेमाने, श्रद्धेने आपण अनुग्रहित होत आहोत अशा भावनेने कोणी कोणाला काही देणे आणि घेणाऱ्यानेही तितक्याच उत्कट कृतज्ञतेने घेताना संकोच न बाळगता, उपकाराचे ओझे न होऊ देता, आपल्याला समृद्ध करणारी ठेव म्हणून ते स्वीकारणे यासारखे विलोभनीय दृश्य नसेल. अपेक्षारहित देण्यात सौंदर्य आहेच, पण ते घेताना देणाऱ्याच्या हेतूंची शंका न घेणारा नम्रपणा घेणाऱ्या जवळ असेल तर देण्या-घेण्यातले सौंदर्य डागाळत नाही. तो फक्त व्यवहार उरत नाही.’’

लेखनासंदर्भात बोलताना एलकुंचवार म्हणतात की, लेखकाला स्वत:कडे, स्वतःच्या अंतरंगाकडे, स्वतःचं अंतरंग स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेकडे अधिक जाणीवपूर्वक पाहता यायला हवं. नाटकांमध्ये आपण दहा पात्रांबद्दल लिहितो, पण ललित लेख हे तसं फार आत्मपर माध्यम आहे. यामध्ये स्वतःला तपासता येतं. लेखकाने आत्मपरीक्षण करायला हवे की, मी आतून स्वच्छ झालो आहे का? आपल्या नीतिमत्तेच्या कल्पना ह्या कालबाह्य, विसंगत व हास्यास्पद आहेत. आपल्याला सतत दुसऱ्याचं मोजमाप करायचं आहे. एखादा व्यक्ती दारू पीत असेल म्हणून तिच्यातला माणूस पाहायचा नाही का? उदाहरणार्थ दोस्तोवस्की हा दारुड्या, जुगारी, व्यसनी होता पण त्याचं मन हे कमालीचं स्वच्छ होतं. त्याचं लोकांवर प्रेम होतं. बरेचदा वैज्ञानिक जिथे पोहोचतात तिथे कलावंत व तत्त्वज्ञ आधीच पोहोचलेले असतात. कलावंत हा अंत:प्रेरणेने जात असतो तसाच वैज्ञानिकही आपल्या अंतःप्रेरणेने पुढे पुढे जात असतात. ज्या लेखनाला अनेकार्थता प्राप्त होऊ शकते ते लेखन चांगलं आहे असं समजावं. संगीत जिथं पोहोचतं तिथं शब्द पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच साहित्यही पोहोचू शकत नाही.

आपल्या भारतीय समाजात लेखक ही अत्यंत दुय्यम, बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते. चित्रकार, संगीतकार यांना तरी मानानं वागवलं जातं. एक बरडपणा, कोरडेपणा हा नुसता पर्यावरणातच नव्हे तर तो मानवी संबंधांतही आलेला आहे. सगळं विषाक्त वातावरण झालेलं आहे. नाट्यलेखनात माझा भ्रमनिरास झाला, असे मत एलकुंचवार नोंदवतात. कारण नाटक करण्याकरता जे येतात त्यांना या शिडीचा वापर करून सिनेमात, मालिकेत जायचे असते. आपण सगळे मिळून कशाचा तरी शोध घेत असतो ही गोष्टच हरवली आहे नाटकांमधून. मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एलकुंचवार म्हणतात, की मराठी भाषा टिकवण्याची सगळी जबाबदारी आपण शासनावर कशी टाकू शकतो? आपण स्वतः शोध घेतला आहे का? मराठी टिकवण्याची जबाबदारी बोलणाऱ्यांवर नाहीये का? मराठी माणसात बौद्धिक आळस फार आहे. जर तो कमी झाला तरच काही खरं आहे! हिंदीमध्ये गजानन माधव मुक्तिबोध यांच्या ‘एक साहित्यिक की डायरी’ या पुस्तकाचं जे स्थान आहे ते मराठीत ‘बोलिले जे...’ हे निर्माण करेल. ही दोन्ही पुस्तकं लिखाणामागची प्रेरणा काय असते, याचं आपापल्या परीने उत्तरे शोधण्याचा, उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. ‘एक साहित्यिक की डायरी’मध्ये मुक्तिबोध जसा स्वतःशी संवाद साधतात मग तो सर्जनशीलतेच्या, काव्याच्या, सौंदर्याच्या अंगाने असेल तसाच संवाद एलकुंचवारांच्या नाटकांमधून, ललितकृतींमधून आपल्याला मानवी नात्यांमधल्या ऱ्हासाबद्दल, पर्यावरणाबद्दल साधलेला दिसतो. विवेकाच्या वाटेने स्वतःकडे पाहणारे कमी लोक असतात. त्यात एलकुंचवारांचा क्रमांक फार वरचा आहे.

बोलिले जे...
अतुल देऊळगावकर
मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत – 150

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके