ॲलन मार्शल हे ऑस्ट्रेलियातले लेखक. वयाच्या 7 व्या वर्षी पोलिओने ते पंगू झाले. त्यांनी लिहिलेली स्वतःचीच गोष्ट आहे ही! मनाने हिंमत धरली ना, तर काय होऊ शकते, त्याची ही कहाणी. आज ॲलनसाहेब 80 वर्षांचे आहेत बरं का. स्वतःच्या गाडीची चाकं स्वतः ढकलीत त्यांनी फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हॉलंडचा दौरा केला. (खरंच! शप्पथ!) तुम्ही विचारणार, इतक्या देशांच्या भाषा? त्या त्यांना कुठे येत होत्या? ऐका तर, ते स्वतःच म्हणतात, ‘माझ्या गोष्टीतून लोक मला ओळखतात. त्यांच्या तोंडावर आनंद पाहतो, आणि मग मला सारं काही भरून पावतं!’ त्यांची 25 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या गोष्टीवर सिनेमाही निघालाय. वाचू या तर त्यांची गोष्ट: आय कॅन जंप पडल्स्. भाषांतर केलेय् श्री. कमलिनी काटदरे यांनी, तुम्हाला आवडणारच! या अंकापासून ती क्रमाने तुम्हाला देऊ. आवडल्याचे कळवा. बरं का!
माझी आई एका आडोशाच्या खोलीत झोपली होती. उंचच उंच असलेली डिंकाची झाडं एकमेकांना टकरावत हालत होती. घराच्या मागे हिरवीगार टेकडी, गवतातून जात होत्या वाऱ्याच्या थंडगार झुळका, पण काळ्या ढगांनी सगळंच झाकून टाकलं होतं. आई सुईणबाईची वाट पहात होती. मधेच ती बाबांना म्हणाली. ‘हा मुलगा होणार आहे बरं का, आज मुलाचा दिवस आहे!’ बाबांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं, ‘हं मी त्याला चांगला बुलमन, आपल्या इथल्या झाडाझुडपातून विनधोक चालणारा व वेगानं धावणारा मुलगा बनवीन.’ मोठ्या खात्रीने बाबा आईला म्हणाले. हो, तसे माझे बाबा सडसडीत बांध्याचे पण थोडे पुढे वाकलेले होते. त्यांची अरुंद बैठक, अंग दुमडून बसण्याची पद्धत आणि जुडीसारखी पायाची घडी बहुतेक सारखं घोड्यावर बसावं लागल्यानं झाली असली पाहिजे! आमच्या स्टेटमधून म्हणजे व्हिक्टोरियाहून क्वीन्सलँडपर्यंत त्यांना नेहमीच घोड्यावरून जावं यावं लागे. कारण तेव्हा जवळ पास एकदेखील शाळा नव्हती. जेव्हा तांबड्या प्लॅनलच्या कपड्यात गुंडाळून सुईणबाईनी मला बाबांच्या हातात दिलं तेव्हा बाबा लगेच म्हणाले, ‘हं, बरं का रावसाहेब- मी तुला पुष्कळ काही काही शिकवणार आहे. असं तुझं शरीर धष्टपुष्ट तयार करीन की येव! तू, ॲलन-उत्तम घोडेस्वार होशील. माझ्यासारखाच तू होणार यात शंका नाही.’
मेरी आणि जेन ह्या माझ्या दोघी बहिणींना भाऊच हवा होत. माझं नाव ॲलन. हे माझ्या जन्मापूर्वीच सर्वांनी ठेवलं होतं! मी शाळेला जायला लागून फार दिवस झाले नसतील तोच पोलिओ (इन्फंटाइल पॅरालिसिस्): मला झाला. 1900 साली ती पोलिओची साथ सगळ्या शहरातच पसरली. खेड्यातून दूरवर पसरलेल्या, एकाकी असलेल्या झोपड्यांतली कितीतरी लहान मुलं ह्या दुखण्याला बळी पडली! आमच्या टरूला नावाच्या खेड्यातला मात्र मीच एकटा साथीला बळी पडलो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून माझे पाय गेल्याची बातमी तेव्हाच पसरली. मग लोकांनी आपली मुलं अगदी गरम कपड्यांत गुंडाळून ठेवायला सुरवात केली. त्यांची मनं पार हादरून गेली. ती भीती ते लपवू शकत नव्हते. अर्धांग हा शब्द तर त्यांनी वेडेपणाशीही जोडून टाकला होता. प्रत्येकजण बाबांना विचारी, ‘काय हो, त्याच्या मनावर पण परिणाम झालाय का?’ आमच्या शेजारची मंडळी चटकन् घरासमोरून जात. जुन्याच सालप्याच्या वरून डोकावून ते माझी मोडकी खेळणी पहायचे. माझं पिस्तूल, भुश्याच्या खोलीच्या दाराशी पडलेली माझी तीनचाकी सायकल पाहून अरेरे, काय झालं हे! म्हणून चचच म्हणत, ते पुढे जात.
‘देवानं चांगलाच टोला दिला म्हणायचा तुला!’ असं मि. कार्टर, बायबलचा क्लास घेणारे सुपरिटेंडेंट बाबांना म्हणाले. ‘अरे हो, पाठ ही ओझं वाहण्याकरिताच आहे.’ असं मोठा धार्मिकपणाचा आव आणून सर्वशक्तिमान परमेश्वराला आपण मानतो असं दाखवून, परमेश्वराबरोबर बाबांनाही खूश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं असं धीरगंभीर, मानभावी बोलणं व ते तत्त्वज्ञान बाबांना मुळीच आवडलं नाही. ते जरा आवाज चढवूनच तिरस्कारानं म्हणाले, ‘माझ्या मुलाची पाठ ओझं वाहण्याकरिता नाही बरं का, आणि तुला सांगून ठेवतो, त्याचं मला पण मुळीच ओझं नाहीये.’ माझ्या बिछान्याजवळ येऊन बाबांनी मला थोड्या काळजीच्या स्वरातच विचारलं, ‘ॲलन्, पायात काही दुखावल्यासारखं वाटतं का रे?’ ‘नाही बाबा, ते पाय आता मला असून नसल्यासारखेच वाटतात.’ ‘अरे बापरे, हाय रे माझ्या देवा! असा काही तरी उच्चार त्यांनी केला. त्यांचा चेहरा पण जास्तच काळा झाल्यासारखा मला वाटला. तसा त्याचा तोंडाचा, चेहऱ्याचा भाग बुशमनसारखा राकट होता. थोडा पिंगट रेषा असलेला, तीक्ष्ण निळे डोळे, त्या गालाच्या सुरकुत्यात बसवल्यासारखे दिसत असत. झाडाझुडुपांतून येणारी उन्हाची तिरोप चुकविण्याची डोळ्यांना सवय लागून ते असे सुरकुतले असावेत.
तेवढ्यात झाडाझुडुपातून शेळ्या मेंढ्यांच्या मागे हिंडणारा त्यांचा एक मित्र त्यांना ‘हॅलो!’ म्हणत आत येत होता. बाबा त्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. ‘काय रे, बील, तू अजून एमूसारखा कसा चालतोस?’ हो, तस् बाबांचं चालणं हलक्या पावलांचं. पायांनी गवत बाजूला करत चालल्यासारखं ते वाटायचं खरं. पुढची जागा साफ सुचर बघून चालायची त्यांना सवय लागली होती. ‘अरे मी सापांच्या देशातून आलोय ना, तेव्हा माझं चालणं असं झालंय खरं’ ते म्हणाले. घोड्यावर त्यांचं जीवन अवलंबून होतं म्हणून नव्हे, पण माझ्या बाबांना नाही तरी घोडे फार प्रिय होते. घोड्यावर रिकोबीत पाय घालून, असा ऐटीत लगाम ओढायचे, टाळ्यांची दाद घेतल्यासारखी मान लववून, हॅट हालवून, स्वयंपाक घराच्या दाराशी उभ्या असलेल्या आईला हसत निरोप देऊन, तोंडाने चमत्कारिक आवाज काढून लगाम खेचायचे व क्षणात पार कुठल्या कुठं जायचे!
एखादे वेळेस एक दोन ग्लास घेतलेले असले म्हणजे ते यार्डमधेच हातात छडी फिरवत क्योंक, कव्यॉक करणाऱ्या बदक-कोंबडयांमधून तोंडाने स्वतः आवाज काढीत चकरा मारीत असत. ‘अरे घोडे हे मनुष्यप्राण्यासारखेच असतात बरं का ॲलन, त्यांना तुम्ही छडीनं एकदा जरी मारलंत, तर ते इतके रागवतील, काही दिवस अबोलाही धरतील, अगदी लहान मुलाप्रमाणं’ असं म्हणत. तसं बाबांचं शिक्षण फार झालं नव्हतं. पण ह्या घोड्याच्या खाचाखुणा त्यांना साऱ्या अवगत होत्या. घोड्यावरून त्यांनी बराच प्रांत पायाखाली घातला होता. ‘तुला पण एकदा सारं दाखवीन, तिकडं नेईन.’ म्हणाले, अन् ते एकदम गप्प झाले. माझ्या पायाकडे त्यांचं लक्ष गेलं असावं. थोड्याच दिवसांत मी पायांनी खरंच दुर्बल झालो. आतले सारे स्नायू मुळी आखडतच चालले व त्याबरोबर सरळ, ताठ असलेली माझी पाठ पण वाकायला लागली. आई बिचारी, माझ्या पायाला ब्रॅन्डी, ऑलिव्ह तेल लावलावून चोळत असे. पण छे, त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एक दिवस माझे पाय पुरे गुडघ्यांतच वाकून केले. तरी माझी आई जवळच असलेल्या डॉ. कॉफर्डकडे जाई. केविलवाणा चेहरा करून त्यांना विचारी, ‘काही औषधं, उपचार नाहीत का हो? त्याला सरळ चालता येईल ना हो डॉक्टर?’ पुनः पुनः विचारायला जायची. बाबांना काहीतरी सांगायची. माझ्या गमावलेल्या पायांपेक्षा आईकडे पाहूनच वाईट वाटे मला.
एकदा डॉ. कॉफर्ड आणखी दोन डॉक्टर्सना घेऊन आले. तसं त्यांना 4, 5 मैल लांब यावं लागलं होतं. सर्व डॉक्टरांनी हात लावून, परत परत पाय वर- खाली करून पाहिलं. यावर काही इलाज नाही म्हणून शब्दशः त्यांनी हात टेकले. फक्त परमेश्वरच तुम्हाला साह्य करो, हा विशेषतः लहान मुलांना होणारा ‘अर्धांगाचा रोग आहे’ - असं निदान जाहीर करून रोगाचं भलं मोठं नाव सांगून गेले. डॉ. क्रॉफर्डनी मग आईलाच शेवटी माझे पाय ताठ करण्यासाठी एक उपाय सांगितला. रोज ती मला टेबलावर पालथं निजायला लावी. स्वतःचा सगळा भार हळूहळू माझ्या गुडघ्यांवर टाकून ते ताठ करण्यासाठी ती 5 मिनिटं तशीच उभी राह्यची. डोळ्यांतलं पाणी ती पापण्यांत कसंबसं अडवून ठेवायची. ते मला दिसायचं नाही, पण तिच्या श्वासोश्वासाने ते जाणवे. मी समोरच भिंतीवर असलेलं घोड्याचं चित्र बघत असायचो. ‘दुखतं का रे ॲलन?’, तिनं विचारावं. मी ‘अंऽऽ, ॲऽऽ, आऽऽई ग’ करायचो. फिरून घोड्याच्या चित्राकडे नजर लावायचा प्रयत्न करत असायचो व अग आई, ते घोडे-घोडे ऽ करत ओरडत रहायचो. ‘झालं हं, झालंच आता’ म्हणून आई समजूत घालीत राही.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या