डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लोहियांची त्रिसूत्री आचरणात आणणारा कार्यकर्ता

अरुणचं आयुष्य मोठं कष्टाचं होतं. वडिलांचं छत्र फार दिवस लाभलं नाही. आईने कष्टाने संसाराचा गाडा चालवला. अरुण हा पूर्णवेळ कार्यकर्ता जरी बनू शकला नाही, तरी त्याची निष्ठा पूर्णवेळ कार्यकर्त्याइतकीच प्रखर होती. संघटना बांधणीत काय गुंतून राहिलं तरी स्वत:च्या वैचारिक आणि सैद्धान्तिक विकासाकडे तो कायम लक्ष पुरवत राहिला. त्याचे काही लेख या संकलनात आहेत त्यावरून त्याची खात्री पटते. 1989 मध्ये रा.स्व. संघाच्या हुकूमशाहीच्या संभाव्य धोक्याद्दल त्याने लिहिलं होतं. त्यातून त्याची वैचारिक स्पष्टता दिसून येते. ‘‘संघ ही निव्वळ राजकीय संघटना आहे आणि या समाजाची लोकशाही पायावर असलेली रचना मोडून तिची वांशिक, धार्मिक दुरभिमानावर पुनर्रचना करणं, त्या आधारावर या समाजाचं संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी शासनसंस्था ताब्यात घेणं हे संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे.’’

समाजवादी चळवळीतले निष्ठावंत आणि विचारशील कार्यकर्ते अरुण ठाकूर यांचं दोन वर्षांपूर्वी अकाली निधन झालं. अरुण ठाकूर यांचं वास्तव्य नाशिकला असे. तिथे राहून त्यांनी समाजवादी चळवळीत तर आपला वाटा उचललाच. शिवाय ‘आनंद निकेतन’सारखी आदर्श मराठी शाळा सुरू करून आणि हिमतीने यशस्वीपणे चालवून विधायक कामाचा जणू एक वस्तुपाठच घालून दिला. राममनोहर लोहियांनी पन्नासच्या दशकात समाजवादी चळवळीसमोर ‘तुरुंग, फावडं आणि मतपेटी’ अशी त्रिसूत्री मांडली होती. अरुण ठाकूर हा लोहियांचा अस्त झाल्यानंतरच्या काळात समाजवादी चळवळीत दाखल झाला होता. पण ही त्रिसूत्री आचरणात आणून त्याने आपल्या नंतरच्या पिढीतल्या तरुण कार्यकर्त्यांनाही प्रेरणा दिली.

‘अरुण : वसा आणि वारसा’ हे पुस्तक मार्च महिन्यात म्हणजे अरुणच्या दुसऱ्या स्मृतिदिनी प्रसिद्ध झालं आहे. सुनील तांबे आणि सुनीती सु. र. या अरुणच्या सहकाऱ्यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की यात विविध विषयांवरचं अरुणचं वैचारिक लेखन तर आहेच; शिवाय त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या विविध पैलूंवर त्याच्या पुरुष आणि स्त्री स्नेह्यांनी मनमोकळेपणाने आणि भावनांना निष्कारण बंध न घालता लिहिलेली स्वगतं आहेत. यांत अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी किंवा गजानन खातू जसे येतात, तसेच डॉ. बाबा आढाव, डॉ. दीपक वार, जगदीश खैरालिया, सुरेश भटेवराही येतात. तशाच निशा शिवूरकर, विनोदिनी काळगी, राजश्री देशपांडे, अनिता पगारे आणि पुष्पा चोपडेही येतात. एक अत्यंत सालस, क्रियाशील आणि चिंतनशील सहकारी तसंच सर्वांना जीव लावणारा मित्र अवेळी आपल्यातून निघून जातो याबद्दलची वेदना या पुस्तकातल्या हृद्य आठवणींच्या रूपाने प्रकट होते. त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय झालं आहे.

महाराष्ट्रात एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून समाजवादी पक्ष 1977 पर्यंत कार्यरत होता. 1934 साली नाशिकच्या तुरुंगात ‘काँग्रेस सोशलिस्ट’ पक्षाची स्थापना झाली. योगायोग असा की 1948 साली नाशिकलाच झालेल्या अधिवेशनात काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा आणि ‘सोशलिस्ट पार्टी’ या नावाने स्वतंत्रपणे राजकारणात उतरण्याचा समाजवादी नेतृत्वाने निर्णय घेतला. पुढे ‘सोशलिस्ट पार्टी’त आचार्य कृपलानींचा पक्ष विलीन झाल्यानंतर ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’ अस्तित्वात  आली. 1955 मध्ये तिच्यात फूट पडून लोहियांची ‘सोशलिस्ट पार्टी’ पुन्हा अस्तित्वात आली. मग परत दोन पक्षांचं एकत्रीकरण झालं आणि ‘संयुक्त समाजवादी पक्ष’ असं नाव धारण करणारा पक्ष स्थापन करण्यात आला. आणि पुन्हा त्यात फूट पडून ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’ने आपली वेगळी चूल मांडली. 1971च्या इंदिरा लाटेत दोन्ही पक्षांनी खरपूस मार खाल्ल्यानंतर ते एकत्र झाले आणि त्यांनी पुन्हा ‘सोशलिस्ट पार्टी’ हे नाव धारण केलं.

ही ‘सोशलिस्ट पार्टी’ 1971 ते 1977 या काळात अत्यंत सक्रिय होती. विशेषत: महागाई, बेकारीविरोधी आणि दुष्काळविरोधी आंदोलने, रेल्वे संप, जयप्रकाशांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि आणीबाणीविरोधीचा लढा यात ‘सोशलिस्ट पार्टी’चा नजरेत भरण्याजोगा सहभाग होता. इंदिराजींच्या हुकूमशाहीला पराभूत करण्याच्या उद्देशाने आता पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणून इतर इंदिराविरोधी पक्षांमध्ये तो विलीन करून हुकूमशाहीला नेस्तनाबूत करावं असा विचार प्रबळ ठरला. त्यामागे प्रामुख्याने जयप्रकाशांचा आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे ‘सोशलिस्ट पार्टी’चे नेते त्याला बळी पडले. ‘सोशलिस्ट पार्टी’ ही एका विचारसरणीवर आधारलेली आणि तिचा पाठपुरावा करणारी ‘आयडिऑलॉजिकल पार्टी’ होती. जनसंघासारख्या छुपा धर्माधिष्ठित अजेंडा असणाऱ्या आणि रा. स्व. संघाच्या तालावर नाचणाऱ्या पक्षाबरोबर एकत्रीकरण करण्याची कल्पना अनेक कट्टर समाजवादी कार्यकर्त्यांना असह्य वाटली.

अशांनी नव्याने स्थापन होऊ पाहणाऱ्या जनता पक्षात सामील होण्याचे नाकारले. विशेषत: महाराष्ट्रात अशा विचारांचे अनेक तरुण कार्यकर्ते होते. ते समाजवादी पक्षात होते किंवा राष्ट्र सेवा दल, युवक क्रांती दल आणि तत्सम समविचारी संघटनांमधून काम करणारे होते. ‘धर्माधिष्ठित राजकारण’ आणि ‘एकचालकानुवर्तित्व’ या तत्त्वांवर दृढ विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनसंघाबरोबर कोणताही संघटनात्मक संपर्क ठेवायला ते तयार नव्हते. म्हणूनच त्यांचा स्वतंत्र आणि स्वायत्त गट तयार झाला. या समूहात अरुण ठाकूर पहिल्यापासून होता. ‘राष्ट्र सेवा दल’ पुरेशी जहाल राजकीय भूमिका घेत नाही; मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात संघटना या नात्याने सामील होत नाही म्हणून सेवा दलाविषयी भ्रमनिरास झालेले ठिकठिकाणचे तरुण कार्यकर्तेही या गटाला येऊन मिळाले. अशा रीतीने बांधिलकी मानणारी अभ्यासू आणि अत्यंत निरलस तरुण कार्यकर्त्यांची एक फळी महाराष्ट्रात निर्माण झाली. अरुण ठाकूर त्यापैकी एक प्रमुख कार्यकर्ता होता हे या पुस्तकातल्या सुनील तांबे, गजानन खातू, अर्जुन कोकाटे, जगदीश खैरालिया वगैरेंच्या लेखातून स्पष्ट होतं.

अरुणचं आयुष्य मोठं कष्टाचं होतं. वडिलांचं छत्र फार दिवस लाभलं नाही. आईने कष्टाने संसाराचा गाडा चालवला. अरुण हा पूर्णवेळ कार्यकर्ता जरी बनू शकला नाही, तरी त्याची निष्ठा पूर्णवेळ कार्यकर्त्याइतकीच प्रखर होती. मराठवाडा  विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्याने आपल्या सरकारी नोकरीची पर्वा न करता तुरुंगवासही भोगला. आंदोलनात सक्रिय राहिलं आणि संघटना बांधणीत काय गुंतून राहिलं तरी स्वत:च्या वैचारिक आणि सैद्धान्तिक विकासाकडे तो कायम लक्ष पुरवत राहिला. त्याचे काही लेख या संकलनात आहेत त्यावरून त्याची खात्री पटते. 1989 साली रा. स्व. संघाच्या हुकूमशाहीच्या संभाव्य धोक्याद्दल त्याने लिहिलं होतं. त्यातून त्याची वैचारिक स्पष्टता दिसून येते. ‘‘संघ ही निव्वळ राजकीय संघटना आहे आणि या समाजाची लोकशाही पायावर असलेली रचना मोडून तिची वांशिक, धार्मिक दुरभिमानावर पुनर्रचना करणं, त्या आधारावर या समाजाचं संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी शासनसंस्था ताब्यात घेणं हे संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे.’’ जयदेव डोळे या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे अरुणचा हा इशारा तंतोतंत खरा ठरतो आहे.

गेल्या सात वर्षांत भारताच्या शासनसंस्थेवर संघाने मिळवलेला कब्जा ही खरी चितेंची बाब आहे. एकीकडे संसदेतल्या बहुमताचा वापर करून संविधानाला धर्माधिष्ठित बनविण्याचे मनसुबे आखले जात आहेत. दुसरीकडे ‘जय श्रीराम’ छाप सवंग घोषणाबाजी करून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे निवडणुका लढवून सत्तेवरची पकड आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरसिंह राव सरकारने पारित केलेला धार्मिक स्थळांसंबंधीच्या कायद्याला बगल देऊन काशी आणि मथुरा या ठिकाणच्या मशिदींबाबत तंटे विकोपाला नेऊन त्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगली घडवून आणि धार्मिक दुफळी माजवून जे मॉडेल बनवले तेच अवघ्या देशावर साळसूदपणाचा आव आणत लादलं जात आहे. 1978 साली आंध्र प्रदेशात चक्रीवादळ आलं होतं, त्या वेळी संघाने मोठं मदतकार्य उभं केलं होतं असा डांगोरा टिपण्यात आला होता आणि ‘ही सांस्कृतिक संस्था आहे,’ असं भाबडेपणाने काही उदारमतवादी विचारवंत म्हणत असत. परंतु संघाचा अजेंडा पूर्णपणे राजकीय आहे हे अरुणने नेमकं ओळखलं आहे हे त्याच्या टिपणावरून स्पष्ट होतं.

मुसलमानांचं दैत्यीकरण करणं हा अनेक किंवा बहुसंख्य विचारवंतांचा आवडता उद्योग बनला आहे. मुसलमान समाजातल्या उदारमतवादाच्या शक्यता अरुण ठाकूरने धुंडाळल्या आहेत. इस्लामच्या पायावर आणि भारतद्वेषावर पोसलेल्या पाकिस्तानमध्येही उदारमतवादाची पदचिन्हं अरुणला आढळतात. ‘आपण द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त मानत नाही आणि पाकिस्तानात राहणारे हिंदू, ख्रिस्ती, शीख, अहमदिया हे सारे माझे बांधव आहेत’, असं ठासून सांगणाऱ्या मारवी सिरमद पाकिस्तानात आहेत याकडे ठाकूर लक्ष वेधतो. मुसलमान समाजातही परिवर्तन घडू शकतं; पाकिस्तानने भारताप्रमाणे आधुनिक मूल्यांचा स्वीकार करायला हवा असं म्हणणारी शोएब मन्सूरसारखी माणसं तिथे अस्तित्वात आहेत. मुसलमान समाजातल्या उदारमतवादी प्रवाहाचा सहृदयपणे शोध घेण्याचा इथे प्रयत्न दिसतो.

‘आनंद निकेतन’सारखी मराठी माध्यमाची शाळा अरुणने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शून्यातून उभी केली आणि ती अत्यंत कार्यक्षमतेने आणि यशस्वीपणे चालवली. ‘मातृभाषेतून शिक्षण’ या ध्येयावर निष्ठा असली आणि तिचा पाठपुरावा करण्याची जिद्द आणि चिकाटी असली की ध्येय कसं साध्य होतं हे दीपक पवार, विनोदिनी काळगी, आनंद नाडकर्णी वगैरेंच्या लेखांतून स्पष्ट होतं. स्वत: अरुण अकरावीपलीकडचं औपचारिक शिक्षण घेऊन शकला नव्हता. पण त्याने  स्वत:ला विचारपूर्वक आणि मोठ्या कष्टाने घडवलं होतं. ‘आकलनापेक्षा पोपटपंची करून गुण मिळवणारी’ आणि ‘स्पर्धेच्या बागुलबुव्यामुळे’ ज्यांचं बालपण करपून गेलं आहे अशी मुलं हे शिक्षणक्षेत्रातलं वास्तव पाहून या मंडळींना ‘आनंद निकेतन’सारखी वेगळी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली हे विशेष. आपला विद्यार्थी हा चांगला माणूस, विज्ञाननिष्ठ आणि विचारी कसा बनेल याकडे लक्ष देऊन शाळेचं व्यवस्थान करण्यात आलं.

‘स्त्री-पुरुष मैत्र आणि त्याचे विविध स्तर आणि पदर’ हा या पुस्तकाचा एक विशेष भाग आहे. निशा शिवूरकर, सुनीता  सु. र., राजश्री देशपांडे, पुष्पा चोपडे यांचे लेख वाचल्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तींची निकोप मैत्री कशी असू शकते याचं उदारहण अरुणच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. गांधी स्त्री आणि पुरुष यांना समान लेखत असत. त्यामुळे पुरुष आणि स्त्री यांच्यात मित्रता असणं किंवा सामाजिक कार्याच्या निमित्ताने त्यांनी एकत्र वावरणं अथवा प्रसंगी एकत्र राहणं याला गांधी अथवा गांधीवादी अनैसर्गिक अथवा आक्षपोर्ह मानत नसत. या पुस्तकात अरुण ठाकूरबरोबरच्या आपल्या शुद्ध मैत्रीबद्दलचं निशा शिवूरकर, सुनीता  सु. र. अथवा राजश्री देशपांडे तसेच पुष्पा चोपडे यांचे लेखन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अरुण, प्रकाश यांच्यासोबत औरंगाबादला आपण एका ‘कॉम्युन’मध्ये कसे राहिलो यांची प्रांजळ हकिकत निशा शिवूरकरने लिहिली आहे. तिथे एका व्यसनी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एका स्त्रीने स्वत:ला जाळून घेतलं. निशा त्या प्रसंगाची प्रत्यक्ष साक्षीदार होती आणि त्यातून ती हादरून गेली होती. तिला अरुणने या अवस्थेतून बोलून आणि सांगून-सवरून कसं बाहेर काढलं हे तिने लिहिलं आहे. आपला मित्र हा केवळ राजकीय आणि सामाजिक कार्यालाच आपला सहकारी नाही; त्या पलीकडे तो व्यक्तिगत सुखदु:ख, आनंद यांत सहभागी होतो. आणि प्रसंगी व्यक्तिगत पातळीवर समुपदेशनही करू शकतो ही गोष्ट बाईला केवढा मोठा मानसिक आधार देणारी असू शकते हे यावरून दिसून येतं.

अरुण ठाकूर आणि महंमद खडस यांनी ‘नरकसफाईची गोष्ट’ हे पुस्तक बरंच संशोधन करून आणि कष्ट करून लिहिलं. सफाई कामगारांच्या भयाण आयुष्यावर अशा प्रकारचा तपशील उपलब्ध करून देणारं मराठीतलं किंवा कदाचित भारतीय भाषांमधलंही हे पहिलंच पुस्तक असावं. महंमद खडस ही समाजवादी चळवळीतली एक अफलातून वल्ली होती. त्यांनी चळवळीसाठी अनेकदा तुरुंगवास सोसला आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना आधार दिला. महंमद आणि त्यांची पत्नी फातिमा यांच्यावरचा अरुणचा लेखही हृद्य आहे. त्यातल्या एका त्रुटीकडे मात्र निर्देश करायला हवा. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळात कम्युनिस्ट पक्ष आणि प्रजा समाजवादी पक्ष यांच्यात कुरबुरी चालत. हंगेरीवर सोव्हिएत रशियाने रणगाडे घालून तिथला लोकशाही-प्रेमींचा उठाव चिरडून टाकला होता. ही घटना कुरबुरीचं एक कारण होती. प्रा.राम जोशींनी कम्युनिस्ट पक्षाची नाकेबंदी करण्यासाठी मुंबई महापालिकेत हा मुद्दा उपस्थित केला होता. हंगेरीऐवजी युगोस्लाव्हिया असा उल्लेख यात आला आहे. हंगेरीतल्या लोकशाहीवादी नेत्याचं नाव इम्रे नागी असं होतं. प्रखर लोकशाही असणाऱ्या प्रजा समाजवादी पक्षाने इम्रे नागीवर आणि हंगेरीतल्या स्वातंत्र्याकांक्षी जनतेवर रणगाडे घालणाऱ्या सोविएत युनियनचा निषेध करून मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाला कोंडीत पकडावं असा आग्रह प्रा. राम जोशींनी धरला होता.

अरुण ठाकूर हा सहृदय आणि संवेदनशील समाजवादी होता. अभिजात संगीताची त्याला आवड होती की नाही याची कल्पना नाही. परंतु हिंदी चित्रपटगीतं तो सतत गुणगुणत असे आणि त्यातून त्याच्या सहकाऱ्यांचं मनोरंजन होत असे, असं या पुस्तकातल्या अनेक लेखांवरून दिसून येतं. ऐन उमेदीत असताना, भरीव काम करत असताना अचानक साथ सोडून गेलेल्या या साथीचा उचित गौरव या ग्रंथाद्वारे झाला आहे.                                

अरुण : वसा आणि वारसा
सुनील तांबे/सुनीती सु.र.
प्रकाशक : निशा शिवूरकर
पृष्ठे : 248 किंमत : 300

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके