डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948) भाग 3

पाश्चिमात्य देशांच्या औद्योगिकीकरणाचे अंधानुकरण हिंदुस्थानने करू नये, असा इशारा गांधी सुरुवातीपासून देत आले. हिंदुस्थानच्या जनतेची दारिद्र्यातून मुक्तता व्हावी, अनारोग्य व अज्ञान दूर व्हावे आणि सर्वांच्या हाताला काम मिळून सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा व्हावा, अशी तळमळ त्यांना होती. मनुष्यमात्राची उत्पादकता वाढवावी आणि त्यासाठी आधुनिक विज्ञानाचीही कास धरावी, पण साधनसंपत्तीच्या वापरावर अतीव भर देणारा तसेच ऊर्जेच्या अतिरिक्त वापरावर विसंबणारा औद्योगिक प्रगतीचा मार्ग आपण चोखाळू नये, असेही त्यांचे स्पष्ट मत होते. आज पर्यावरणाची प्रचंड हानी झाल्यामुळे मानवजातीवर कोरोनासारखे संकट कोसळले आहे, असा संदेश पर्यावरणतज्ज्ञ वारंवार देतच आहेत. गांधींच्या एकूण योगदानाविषयी काय म्हणता येईल. 

सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत गांधींनी अन्याय केला, असा आरोप केला जातो. परंतु गुहांच्या मते, वल्लभभाई पटेलांना सुभाषबाबू नको होते. पटेलांचा काँग्रेस संघटनेवर पगडा होता आणि सुभाषबाबूंवर त्यांचा व्यक्तिगत रागही होता. त्यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई 1933 मध्ये निवर्तले. विठ्ठलभार्इंच्या अखेरच्या आजारपणात सुभाषबाबूंनी त्यांची शुश्रूषा केली होती, त्यामुळे प्रसन्न होऊन विठ्ठलभार्इंनी आपल्या मृत्युपत्राद्वारे आपली तीन-चतुर्थांश संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे ठेवली होती. ‘इतर देशांत हिंदुस्थानची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि हिंदुस्थानच्या हितासाठी या संपत्तीचा विनियोग करावा’, अशी त्यांची इच्छा होती. वल्लभभार्इंनी या मृत्युपत्राच्या सत्यासत्यतेबाबत शंका उपस्थित केली. न्यायालयात हे प्रकरण गेले आणि प्रदीर्घ काळ रेंगाळले. अखेरीस निकाल वल्लभभार्इंना हवा तसा लागला आणि त्यांच्या जवळच्या नातलगांना संपत्ती मिळाली. 

या वैयक्तिक दुस्वासाव्यतिरिक्त सुभाषबाबूंचे डावीकडे झुकणारे राजकारणही पटेलांना पसंत नव्हते. गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंचे नाव 1938 मध्ये सुचविले होते, तेव्हा पटेलांनी विरोध केला होता. गांधींनी तो जुमानला नाही. पुन्हा 1939 मध्ये सुभाषबाबूंनी अध्यक्ष बनण्यासाठी व्यूहरचना केली, तेव्हा पटेलांनी विरोध करण्याचे ठरवले आणि सुभाषबाबू जिंकल्यानंतर त्यांच्याशी सहकार्य न करण्याचे धोरण अमलात आणून वर्किंग कमिटीचा राजीनामा दिला. पण या पुस्तकाच्या निमित्ताने गुहांनी जे दस्तावेज धुंडाळले आहेत, त्यात त्यांना रवींद्रनाथ ठाकूरांचे एक पत्र मिळाले. त्यातून या महाकवीच्या अंतर्मनातील प्रादेशिकतावाद आणि भाषिक दुराग्रह दिसून येतो. आत्यंतिक राष्ट्रवाद हा कसा धोकादायक असतो, यावर त्यांनी गांधींना 1920 च्या असहकार आंदोलनावेळी उपदेश केला होता. 

सुभाषबाबूंनी लागोपाठ काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा दावा केल्यानंतर त्यांच्यासाठी गांधींकडे रदबदली करताना रवींद्रनाथांनी बंगालवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे तुणतुणे वाजवले. सुभाषबाबूंची शौर्यगाथा सर्वांना परिचित आहे. त्यांचे पोलिसांची नजर चुकवून परदेशी जाणे, आझाद हिंद सेनेची उभारणी, अक्ष राष्ट्रांबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न- वगैरे वगैरे. 

पण गुहा हे एका वेगळ्या बाबीकडे लक्ष वेधतात. काँग्रेसशी मतभेद होऊन जरी सुभाषबाबू आपल्या स्वतंत्र मार्गाने गेले असले, तरी त्यांचे काँग्रेसवर असलेले प्रेम आणि काँग्रेसविषयीची आस्था यत्किंचितही ओसरली नव्हती. आझाद हिंद सेनेच्या तीन ब्रिगेड्‌सना त्यांनी अनुक्रमे गांधी, नेहरू आणि मौलाना आझाद यांची नावे दिली होती. गांधी आणि नेहरूंप्रमाणेच सुभाषबाबू हे हिंदू-मुसलमान सौहार्दाचे पुरस्कर्ते होते. दि.2 ऑक्टोबर 1943 हा गांधींचा वाढदिवस. सुभाषबाबूंनी बँकाँक नभोवाणीवरून राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि गांधींचा ‘ग्रेटेस्ट लीडर’ म्हणून गौरव केला. इतकेच नव्हे, तर गांधींविषयी परम आदरभाव व्यक्त करताना त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. सुभाषबाबूंचे वैचारिक अपहरण करून गांधी आणि नेहरूंना दूषणे देणाऱ्यांनी सत्याचा अपलाप चालवला आहे. लेखकाच्या मते, गांधींशी अहिंसेच्या मुद्यावर आणि नेहरूंशी दोस्त राष्ट्रांविषयी की अक्ष राष्ट्रांविषयी सहानुभूती- यांबाबत सुभाषबाबूंचे मतभेद होते. तिथपर्यंतच ते मर्यादित होते. 

भगतसिंग यांना फाशी दिले, त्याबाबत गांधींनी काहीही केले नाही म्हणून ते खलनायक ठरतात; असा अपप्रचार केला जातो. भगतसिंगांचे प्राण वाचावेत, म्हणून इतर कुणी काय प्रयत्न केले? सावरकरांनी? सुभाषबाबूंनी? पटेलांनी? दोष फक्त गांधींच्याच माथी मारण्यात येतो. परंतु भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून गांधींनी अखेरपर्यंत निकराचे प्रयत्न केले होते. गोलमेज परिषदेत सामील होण्यापूर्वी व्हाईसरॉय आयर्विन यांच्याबरोबर गांधींच्या ज्या भेटी झाल्या, तेव्हा गांधींनी भगतसिंगांची फाशी रद्द करावी अथवा पुढे ढकलावी, अशी विनंती आयर्विन यांना केली होती. त्यामुळे शांतता प्रस्थापनेला मदत होईल, असे गांधी म्हणाले. त्यावर आयर्विन यांचे उद्‌गार मुळातून उद्‌धृत करण्यासारखे आहेत. 'I am impressed that the apostte of non-violence should so earnestly be pleading the cause of a creed so fundamentally opposite to his own'... ‘अहिंसेच्या प्रेषिताने आपल्या विश्वासाच्या पूर्णपणे विरोधात असणाऱ्या एखाद्या ध्येयाच्या/तत्त्वाच्या बाजूने इतकी तळमळीने वकिली करावी, हे पाहून मी प्रभावित झालो आहे,’ असा आयर्विनसाहेबांच्या उद्‌गारांचा मथितार्थ आणि भगतसिंगाच्या बहादुरीचे प्रमाणही गुहांनी दिले आहे. ‘ब्रिटिश शासनसंस्थेविरुद्ध आम्ही युद्ध पुकारले, हा आमचा अपराध आहे ना? म्हणजे आम्ही युद्धकैदी आहोत. आमची एकच मागणी आहे की, आम्हाला फासावर लटकवण्याऐवजी गोळ्या घालून ठार मारावे,’ असे भगतसिंगाने तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितले होते. ‘स्वातंत्र्यवीर’ या उपाधीला तोच खरोखर पात्र ठरतो. आणखी काय म्हणावे? 

अमेरिकेतल्या ‘टाइम’ या साप्ताहिकाने गांधींची ‘मॅन ॲाफ द इयर’ म्हणून 1930 मध्ये निवड केली होती. गांधी अमेरिकेत कधीही गेले नाहीत, पण त्यांनी यावे आणि जागोजागी व्याख्याने द्यावीत, म्हणून अनेकदा प्रयत्न करण्यात आले होते. अल्बर्ट आइन्स्टाईनसारखा जगप्रसिद्ध व्यक्ती गांधींना ‘सुप्रीम मॉरल कंपास’ (नैतिकतेचा सर्वोच्च निकष) मानत असे. त्याच्या बर्लिनच्या अभ्यासिकेत न्यूटन, मॅक्सवेल आणि फॅरॅडे या तीन शास्त्रज्ञांनी छायाचित्रे टांगलेली असत. नाझीकडून होणाऱ्या छळाच्या भयाने तो अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात 1935 मध्ये दाखल झाला. त्याच्या तिथल्या अभ्यासिकेत चौथे चित्र गांधींचे लावले गेले. पुढे 1954 मध्ये एक शास्त्रज्ञ प्रिन्स्टनला गेला असता आइन्स्टाईनने इतर शास्त्रज्ञांची चित्रे काढून फक्त गांधींचे चित्र ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याबद्दल त्याने पृच्छा करताच आइन्स्टाईन म्हणाला, ‘‘आपल्या युगातला सर्वश्रेष्ठ माणूस म्हणजे गांधी.’’ 

प्राणजीवन मेहता हे गांधींचे सुरुवातीपासूनचे समर्थक आणि सल्लागार होते. ते गांधींबरोबर लंडनमध्ये शिकायला होते. ते जवाहिरे असल्यामुळे गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या कार्याला ते आर्थिक पाठबळ देऊ शकले. गांधींना ‘महात्मा’ ही पदवी त्यांनी प्रथम दिली आणि आफ्रिकेतील काम आवरून हिंदुस्थानात लवकरात लवकर परतावे, अशी गळ घातली. मातृभूमीला तुमची गरज आहे, असे त्यांनी गांधींना वारंवार सांगितले. गांधी आणि जीना हे दोघेही गोपाळकृष्ण गोखलेंना आपले गुरू मानत. गोखले हे हिंदू होते, पण अत्यंत योग्य अर्थाने. एकदा एक हिंदू संन्यासी गोखलेंना भेटायला आला आणि म्हणाला, ‘‘हिंदूंचे हितरक्षण होईल आणि मुसलमानांना चेपता येईल, अशी एक योजना माझ्याकडे आहे. आपण हिंदू धर्माला जागून या योजनेची पाठराखण करा.’’ त्याला गोखलेंनी सपेशल नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी हिंदू आहे की नाही हे ठरण्यासाठी मी हे करावे अशी अपेक्षा असेल; तर मी हिंदू नाही, हे  जगजाहीर करा.’’ गोखलेंनी दाखविलेला आणि चोखाळलेला धार्मिक सद्‌भावनेचा मार्ग गांधींनी सोडला नाही. जीना मात्र सपेशल विरुद्ध टोकाला भरकटत गेले. 

गांधींमध्ये अजिबात दोष नव्हते आणि ते परमेश्वरासमान (सर्वगुणसंपन्न) होते, असा गुहांचा अजिबात दावा नाही. गुण आणि दोष काही ना काही प्रमाणात सर्वांमध्ये असणारच, असा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून चरित्रकाराने लेखन करायला हवे. गांधींमध्ये एक अधिनायकवादी हुकूमशाही वृत्ती दडली होती. विशेषत: आपल्या मुलांबाबत आणि त्यातल्या त्यात हरिलालबाबत ते अतिकठोरपणे वागले. त्याला जे काही करायचे होते, ते करू दिले नाही. त्याच्या विवाहासंबंधीच्या बाबतीत फार ढवळाढवळ करून आपले अनाठायी हट्ट चालवले. हरिलालला लग्न करायचे होते, तर त्याला ‘आपली कामवासना आवर’ म्हणून निष्कारण उपदेश केला. 

मणिलालला एका फातिमा नामक मुसलमान युवतीशी लग्न करायचे होते. हा विवाह गांधींनी होऊ दिला नाही. एक कारण म्हणजे. त्यांची हेकेखोरी आणि अधिकारशाही गाजविण्याची वृत्ती. दोन विभिन्न धर्मांतील व्यक्तींमध्ये विवाहसंबंध असण्याला त्यांचा विरोध होता. विजयालक्ष्मी पंडित एक उच्च विद्याविभूषित मुसलमान युवकाच्या प्रेमात होत्या. गांधींनी त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाला सक्त विरोध केल्यामुळे तो विवाह होऊ शकला नाही. पुढे त्यांचा रणजित पंडितांशी विवाह झाला. गांधींना मणिलालच्या बाबतीत आणखीही एक धास्ती होती. त्या वेळी नवरा-बायकोने आपापला धर्म हवा तर पाळावा, यावर त्यांचा विश्वास नव्हता. कदाचित त्या काळात फार क्वचित असा विश्वास आढळेल. खिलाफत चळवळीच्या काळातले हिंदू-मुसलमान ऐक्य संपून दुफळीला सुरुवात झाली होती. अशा काळात आपण एखाद्या मुसलमान युवतीचे धर्मांतर घडवून आणले आणि तिला सून करून घेतले, तर मुसलमान समाजात आपल्याविषयी अप्रीती निर्माण होईल, अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे मणिलाल-फातिमा यांच्या प्रेमकथेची आहुती स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात पडली. 

गांधींना आणि त्यांच्या पिढीला प्रेमविवाह ही संकल्पना मुळी मान्य नव्हती. आई-वडिलांनी लग्न ठरवावे आणि अपत्याने ते निमूटपणे स्वीकारावे, अशी विवाहाची दंडेलीयुक्त संकल्पनाच त्यांना माहीत होती. त्यामुळे आपला सर्वांत धाकटा मुलगा देवदास याला त्याच्या विवाहासंबंधी निर्णयावरून त्यांनी भरपूर छळले, असेच म्हणावे लागेल. देवदास हिंदीच्या प्रचारासाठी दक्षिणेत आणि विशेषत: मद्रासमध्ये वारंवार जात असे. मद्रासमध्ये त्याचे राजगोपालाचारींकडे (राजाजी) वास्तव्य असे. राजाजी हे गांधींचे सर्वांत ज्येष्ठ सहकारी होते आणि गांधी त्यांच्या मताला-सल्ल्याला फार किंमत देत असत. राजाजींची मुलगी लक्ष्मी आणि देवदास यांचे प्रेम जुळले. आपली लग्न करण्याची आपली इच्छा त्या दोघांनी आपापल्या वडिलांकडे व्यक्त केली. गांधी आणि राजाजी या दोघांनीही विरोध केला. त्यामागे दोघांची जात वेगवेगळी असल्याचं कारणही होतं आणि प्रेमविवाह म्हणजे गैर, असे सुचविणेही होते. ही गोष्ट 1924 मधली. या दोन प्रेमिकांचे खरोखरच एकमेकांवर प्रेम आहे की त्यांना तत्कालीन आकर्षणाच्या मोहाने पछाडले आहे, हे तपासून पाहण्यासाठी गांधी आणि राजाजींनी त्यांचे संपूर्ण विलगीकरण केले. पाच वर्षांनंतर हे प्रेम खरे आहे असे पटले, तरच लग्न करण्याची परवानगी मिळेल, अशी निर्दयी अट घालण्यात आली. नशिबाने या दिव्यातून हे दोघे पार पडले. 

गांधींमुळे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर राजकारणात आणि समाजकारणात आल्या, हे ऐतिहासिक सत्य आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सत्याग्रहात उडी घेतली आणि समाजकार्यात त्या सहभागी होऊ लागल्या. चंपारणमधल्या लढ्यापासून ते पडदाप्रथेच्या विरोधात सडेतोडपणे सातत्याने बोलत आले. ही प्रथा क्रूर आहे, तिला तिलांजली द्यायला हवी, असे ते स्पष्टपणे सांगत. गांधींवर मुसलमानांचा अनुनय करण्याचा आरोप केला जातो, त्यांनी हा पडदाविरोध लक्षात घ्यायला हवा. पण आजकालच्या जमान्यात स्त्रीमुक्तीवादी महिला ज्यांची ‘पेट्रियार्क’ अथवा ‘मेल शॉविनिस्ट’ म्हणून संभावना करतात, तशा प्रकारचे अरोपही गांधींवर होऊ शकतात, अशा प्रकारची वक्तव्ये गांधीसाहित्यात गुहांना आढळली आहेत. स्त्रियांनी नट्टापट्टा करू नये, फॅशनच्या मागे लागू नये, पुरुषांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी खटपटी करू नयेत, म्हणजे अनिष्टकारक प्रसंग उद्‌भवणार नाहीत. गांधींचे वक्तव्य मुळातूनच द्यावेसे वाटते. "I have a fear that the modern girl loves to be Juliet to half a dozen Romeos. She loves adventure." (आधुनिक काळातील युवतींना साहस हवे असते. त्या ज्युलिएट बनून  एकाच वेळी अर्धा डझन तरुणांना भुलवू पाहतात.) आजच्या युगात हे शब्द फक्त कडव्या सनातनी/कर्मठ विचारांच्या पुरुषांच्या तोंडी शेाभून दिसतील. याबद्दल गांधींवर स्त्रीमुक्तीवादी तुटून पडल्या, तर ते समजण्यासारखे आहे. 

रवींद्रनाथांबरोबर गांधींचे सौहार्दाचे नाते होते, पण त्यांचे जाहीर मतभेदही झाले होते. 1920-21 च्या असहकार आंदोलनामुळे हिंदुस्थानभर राष्ट्रवाद उफाळून आला होता. रवींद्रनाथ तेव्हा नुकतेच पाश्चात्त्य देशांचा दौरा करून परतले होते. तिथे मानवाचे आणि मानवतेचे ऐक्य घडवून आणण्यासाठी धडपडणारी विशाल दृष्टीची माणसे भेटली. राष्ट्रवादाची बेडी तोडून मानवतेला एका सूत्रात बांधू इच्छिणारी. त्या पार्श्वभूमीवर त्यांना गांधींच्या चळवळीमुळे उसळून वर आलेला राष्ट्रवाद हा नकारार्थी वाटला, याची गांधींना त्यांनी जाणीव करून दिली. गांधींनी रवींद्रनाथांना तत्काळ उत्तर दिले आणि सांगितले की- हिंदुस्थानचा राष्ट्रवाद हा आक्रमक, विनाशकारक किंवा अमुक एका समूहाला वगळणारा नाही; तो सशक्त मानवतावादी आणि अध्यात्मप्रवण आहे. 

गांधी 1934 मध्ये अस्पृश्यतेच्या विरोधात आणि दलितांच्या उन्नतीसाठीच्या लढाईत पूर्णपणे मग्न होते. इतके की पटेल, नेहरू, सुभाषबाबू आदी सहकाऱ्यांना आता गांधींचे स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. त्याच वेळी बिहारमध्ये मोठा भूकंप झाला. अस्पृश्यतेचे पाप केल्याबद्दल सवर्ण हिंदू समाजाला परमेश्वराने केलेली शिक्षा आहे, असा त्या भूकपांचा अशास्त्रीय आणि विज्ञानविरोधी अर्थ गांधींनी लावला होता. रवींद्रनाथांनी त्यावर स्पष्ट शब्दांत टीका करून निषेध नोंदवला. हेकेखोरी आणि अधिकारशाही गाजविण्याची गांधींमध्ये खुमखुमी असे. त्यांचे जीवाभावाचे सवंगडी कालेनबाख हे त्यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेत 1904 पासून होते. ते पेशाने आर्किटेक्ट होते. गांधींनी जसे वकिली सोडून समाजकार्याला वाहून घ्यायचे ठरविले, तोच कित्ता कालेनबाखनी गिरवला. 

कालेनबाख हे गांधींचे निस्सीम भक्त होते. इतके की, दक्षिण आफ्रिकेतले लोक त्यांना गांधीचे ‘हनुमान’ म्हणत. गांधी जेव्हा हिंदुस्थानात यायला निघाले, तेव्हा कालेनबाखनीही त्यांच्याबरोबर यायचे ठरविले. कालेनबाखना काहीशा ऐषोरामी जीवनशैलीची आणि आधुनिक उपकरणांची गोडी होती. गांधींनी त्यांना बऱ्याच सवयी बदलायला लावल्या, पण अद्ययावत तंत्रज्ञानाची त्यांची आवड मात्र कायम राहिली. आफ्रिकेतून लंडनकडे बोटीने जाताना कालेनबाख यांच्याकडे अत्यंत महागडी पण प्रभावी दुर्बीण असल्याचे गांधींनी पाहिले. ती अनावश्यक आणि महागडी आहे, असा हट्ट गांधींनी धरल्यामुळे कालेनबाखनी ती समुद्रात भिरकावून दिली. 

गुहांच्या या पुस्तकात गांधींच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि गांधींचे कामजीवन याविषयी सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे. त्यात आंबटशौकिनपणा अथवा गैर वाटावे, असे काहीच नाही. स्वत: गांधींनीच आपले आयुष्य पारदर्शकपणे मांडले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. दक्षिण आफ्रिकेत असताना सोंजा श्लेसिन, मिली पोलॉक आणि मॉड पोलॉक या तीन महिलांबरोबर त्यांचे दृढ स्नेहसंबंध होते. सोंजा ही त्यांची स्वीय सहायक होती. मिली ही हेन्री पोलॉक या जीवश्चकंठश्च स्नेह्याची पत्नी आणि मॉड ही त्यांची बहीण होती. यांपैकी मॉडचे गांधींवर प्रेम होते, पण तिला गांधींनी प्रतिसाद दिला नाही. मिली आणि सौंजा त्यांच्याशी बेधडकपणे स्पष्ट बोलू शकत अन्‌ टीकाही करू शकत. परपस्परांविषयी आदर हा मैत्रीचा पाया होता. 

हिंदुस्थानात परतल्यानंतर सरलादेवी चौधरानी या महिलेच्या प्रेमात गांधी पडले. ती रवींद्रनाथांची भाची होती आणि गांधींहून तीन वर्षांनी लहान होती. याशिवाय ती स्वरूपसुंदर होती. गायन आणि चित्रकलेत पारंगत होती. इंग्रजी साहित्याची पदवीधरही होती. वंदे मातरम्‌ला पहिल्यांदा चाल लावण्याचे श्रेयही सरलादेवींना जाते. ब्राऊनिंग, कीट्‌स आणि शेलींच्या काव्यगुणांवर रवींद्रनाथांशी तासन्‌तास चर्चा करण्याची ताकद व कुवत तिच्यात होती. गांधी लाहोरला प्रथम गेले, तेव्हा तिच्या घरी राहिले होते, तेव्हापासून त्यांचे सूर जुळू लागले. इतके की, गांधींनी कालेनबाखना लिहिले की, ‘मला एक आध्यात्मिक पत्नी भेटली आहे.’ गांधी आणि सरलादेवी यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत; परंतु गांधी इतके वाहवत गेले की, त्यांनी आपल्या या दुसऱ्या पत्नीसंबंधी आपली बाजू जाहीर करण्याचेही ठरविले होते. 

गांधींचे ज्येष्ठतम सहकारी राजाजी यांनी गांधींना रोखले. ‘‘आपल्याकडे जनता ‘महात्मा’ म्हणून पाहते. आपले असलेले संतत्वाचे वलय या तथाकथित दुसऱ्या विवाहामुळे नष्ट होईल. आपल्या शुद्धत्वामुळे आणि त्यागमय नि:संगपणामुळे आपण हिंदुस्थानचे आशास्थान बनला आहात. हे सर्व आगीत होरपळून जाईल’’, असा इशारा त्यांनी दिल्यावर गांधींनी हा विचार सोडून दिला. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे, साबरमती आश्रमात गांधींचा जो पत्रव्यवहार आणि अन्य कागदपत्रे होती, त्यातील सरलादेवींसंबंधींचे दस्तऐवज गांधींच्या कुटुंबाने नष्ट केले असल्याचे रामचंद्र गुहा यांच्या ध्यानात आले. 

यौनसंबंधांविषयी वा कामवासना विषयावर गांधींच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती, हे त्यांच्या आत्मचरित्राद्वारे सर्वांना ज्ञात झाले आहेच. आपल्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात आपण त्यांच्या सेवेत राहायला पाहिजे होते, परंतु आपल्याला वासनेवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांच्या अखेरच्या क्षणी आपण पत्नीबरोबर रममाण होण्यात मग्न होतो, ही खंत त्यांनी आयुष्यभर बाळगली. वीर्य हे जतन करून ठेवायला हवे, पुरुष हा पशू असतो आणि तो स्त्रीवर आपली वासना बळजबरीने लादून तिची शिकार करतो, असा ग्रह त्यांनी आयुष्यभर बाळगला. 1940 च्या दशकात संततिनियमनाबाबत स्त्रियांची बाजू पटविण्यासाठी, त्यातून स्त्रियांचे हित कसे साधले जाईल, हे सांगण्यासाठी अमेरिकन विदुषी मार्गारेट सॅगर वर्ध्याला आल्या होत्या. त्यांच्याशी बोलतानाही गांधींनी अशीच हुज्जत घातली होती. 

गांधींनी 1906 मध्ये म्हणजे वयाच्या 36 व्या वर्षी ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, ती त्यांनी मरेपर्यंत पाळली; परंतु ब्रह्मचर्याचे त्यांनी अवास्तव अवडंबर माजवले. आपल्या आश्रमातील तरुण सहकाऱ्यांवर नैतिक दडपण आणून त्यांना ब्रह्मचर्याच्या शपथा घ्यायला लावल्या. त्यात जयप्रकाश नारायण यांची पत्नी प्रभावतीदेवी याही होत्या. आपण जितक्या कठोरपणे ब्रह्मचर्य पाळू तितका आपला प्रभाव बाह्य परिस्थितीवर पडेल आणि हिंसाचार, भ्रष्टाचार, एकूण अनाचार नियंत्रणाखाली येईल, असे विचित्र व विवेकबुद्धीला न पटणारे समीकरण ते मांडत असत. एक प्रकारे त्याची मुळे अहंकारात गुंतली होती, असे म्हणता येईल. दि.14 एप्रिल 1938 रोजी रात्री झोपेत वीर्यपतन झाल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. मीराबहेन, अमृतकौर या आपल्या जवळच्या सहकाऱ्यांकडे त्यांनी आपली व्यथा बोलून दाखविली. गांधींनी स्वत:ला दोषी ठरविले. अमृतकौरनी त्यांना स्त्रियांशी आणि तरुणींशी संपर्क येऊ देऊ नका, असा सल्ला दिला. तेव्हा गांधी म्हणाले, ‘‘दोष  स्त्रियांचा नाही, माझा आहे.’’ गांधींना याविषयी ‘हरिजन’मध्ये मनमोकळेपणे लिहिण्याची इच्छा होती. पुन्हा त्यांना राजगोपालाचारींनी रोखले. गांधी त्यांना आपल्या सदसद्‌विवेकबुद्धीचे रखवालदार म्हणत, ते योग्यच होते. 

नौआखालीच्या दंग्याच्या वेळी शांतता प्रस्थापनेचे जे महान कार्य त्यांनी अंगीकारले होते, त्या वेळी त्यांनी ब्रह्मचर्याचे विचित्र प्रयोग सुरू केल्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. नौआखलीतील किंवा एकूण देशभरातील हिंसाचाराचा जो वडवानल पेटला होता, तो पाहता त्याची मुळे ते स्वत:च्या कमतरतांमध्ये किंवा वैगुण्यांमध्ये शोधत होते. ‘माझ्यात दोष आहेत, मी परिपूर्ण नाही. त्यामुळे समाजात विकृती आढळत आहेत आणि त्यांनी हिंसाचाराचे रूप धारण केले आहे’, असा त्यांचा ठाम विश्वास बनत चालला होता. 

आपल्यातील वैगुण्य किंवा कमतरता म्हणजे आपले ब्रह्मचर्य दुबळे असणे, त्यामुळे आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी आपली तरुण नात मनू हिच्याबरोबर नग्न अवस्थेत एकाच अंथरुणात निजण्याचा प्रयोग सुरू केला. त्याबद्दल अनेकांनी विरोधी मते नोंदवली, तरी गांधी आपला हेका सोडेनात. विनोबा भावे आणि ठक्कर बाप्पा या गांधींच्या वैचारिक अनुयायांबरोबरही पत्रव्यवहार व चर्चा झाली. पण गांधींना इतरांचे म्हणणे- विशेषत: असा विचित्र प्रयोग सुरू ठेवू नये, यासंबंधीचे- पटले नाही. वल्लभभाई पटेलांनी तर त्याला सक्त विरोध केला. भोवतालच्या समाजातील नृशंस अत्याचार रोखण्यासाठी आपल्या अंतर्मनातील पशुतुल्य वासनांना लगाम घालून त्यांच्यावर विजय मिळवता आला पाहिजे, असा गांधींनी पण केला होता. वासनारूपी समंधाने त्यांचा अजिबात कब्जा घेतलेला नव्हता, तरीही ते असा प्रयोग करायला प्रवृत्त झाले होते, असा निर्वाळा गुहांनी दिला आहे. 

गोलमेज परिषदेसाठी गांधी लंडनला गेले होते, तेव्हा त्यांना भेटायला चार्ली चॅप्लिन आला होता. त्या वेळी तो जागतिक पातळीवर अक्षरश: लोकप्रियतेच्या शिखरावर होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेबद्दल त्याला आस्था होती. परंतु गांधी यंत्रांना विरोध का करतात, हे त्याला उमजत नव्हते. गांधींनी आपला विरोध यंत्रांना नसून यंत्रांमुळे माणसे बेकार होतील त्या प्रक्रियेला आहे, असे सांगितले. अन्न आणि वस्त्र या दोन बाबतींत प्रत्येक राष्ट्र स्वयंपूर्ण असायला हवे. एके काळी हिंदुस्थान तसा होता, ती अवस्था पुन्हा यायलाच हवी. गमतीची गोष्ट म्हणजे, चार्ली - चॅप्लिनविषयी गांधींना सुतराम माहिती नव्हती. कारण त्यांनी तोपर्यंतच्या आयुष्यात कधी चित्रपट पाहिलाच नव्हता. पुढे एम.एस. सुब्बलक्ष्मींच्या आग्रहामुळे त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मीरा’ हा चित्रपट त्यांनी पाहिल्याची इतिहासात नोंद आहे. 

पाश्चिमात्य देशांच्या औद्योगिकीकरणाचे अंधानुकरण हिंदुस्थानने करू नये, असा इशारा गांधी सुरुवातीपासून देत आले. हिंदुस्थानच्या जनतेची दारिद्र्यातून मुक्तता व्हावी, अनारोग्य व अज्ञान दूर व्हावे आणि सर्वांच्या हाताला काम मिळून सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा व्हावा, अशी तळमळ त्यांना होती. मनुष्यमात्राची उत्पादकता वाढवावी आणि त्यासाठी आधुनिक विज्ञानाचीही कास धरावी, पण साधनसंपत्तीच्या वापरावर अतीव भर देणारा तसेच ऊर्जेच्या अतिरिक्त वापरावर विसंबणारा औद्योगिक प्रगतीचा मार्ग आपण चोखाळू नये, असेही त्यांचे स्पष्ट मत होते. आज पर्यावरणाची प्रचंड हानी झाल्यामुळे मानवजातीवर कोरोनासारखे संकट कोसळले आहे, असा संदेश पर्यावरणतज्ज्ञ वारंवार देतच आहेत. 

गांधींच्या एकूण योगदानाविषयी काय म्हणता येईल, याविषयी गुहा संक्षेपाने एका वाक्यात समारोप करतात. सत्याग्रहाची शिकवण, आंतरधर्मीय सद्‌भावना, पर्यावरणविषयक जबाबदारीविषयी जागरूकता, ब्रिटिश साम्राज्याचा अस्त, अस्पृश्यता- निवारणाची देशव्यापी मोहीम, सत्याचे प्रयोग व पालन तसेच सत्याचा अदम्यपणे घेतलेला आणि पुष्कळ अंशी यशस्वी शोध... एकोणऐंशी वर्षांच्या आयुष्यात या माणसाने जगासाठी केवढं मोठं संचित ठेवलं आणि तो निघून गेला! 

गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948) 
लेखक : रामचंद्र गुहा
पेंग्विन / ॲलन लेन 
पृष्ठे : 1129, किंमत : रु. 999 

(रामचंद्र गुहा यांच्या नव्या पुस्तकाचा परिचय करून देणारा दीर्घ लेख तीन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा तिसरा आणि शेवटचा भाग... संपादक)    

या लेखाचा पहिला भाग येथे वाचा : गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948) 

Tags: गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड अमरेंद्र धनेश्वर रामचंद्र गुहा महात्मा गांधी गांधी चरित्र पुस्तक परीचय gadhi the years that changed the world Gandhi history India and Gandhi guha historian new biography by Ramchandra guha amarendra dhaneshwar on Gandhi Mohandas Karamchand Gandhi new book mahatma Gandhi amarendra dhaneshwar on ram guha amarendra dhaneshwar book review book review Ramchandra guha on mahatma Gandhi Gandhi biography by Ramchandra guha new biography mahatma gandhi ramchandra guha on Gandhi ram guha Gandhi ram guha new book on Gandhi ram guha new book weeklysadhana New book of Ramchandra guha साधनासाप्ताहिक साधना विकलीसाधना Sadhana Sadhanasaptahik weeklysadhana साधनासाप्ताहिक साधना विकलीसाधना Sadhana Sadhanasaptahik गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड अमरेंद्र धनेश्वर रामचंद्र गुहा महात्मा गांधी गांधी चरित्र weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके