डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948) भाग 2

गुहांच्या या पुस्तकात गांधी आणि आंबेडकर यांच्यातील संबंधाबद्दल तपशीलवार विश्लेषण आहे. गांधी सुरुवातीपासून अस्पृश्यतेला हिंदू धर्मावरील कलंक मानीत होते. दक्षिण आफ्रिकेतून ते हिंदुस्थानात कायमचे आले, तेव्हा त्यांनी अहमदाबादला साबरमती आश्रम सुरू केला. त्यात पूर्वास्पृश्य इतरांच्या बरोबरीने राहतात, हे एका प्रमुख देणगीदाराला कळले; तेव्हा पूर्वास्पृशांना आश्रमातून काढून टाकण्यात यावे, असा दबाव गांधींवर येऊ लागला. गांधींनी त्याला सपेशल नकार दिला आणि देणगीवर पाणी सोडले. गांधींनी पूर्वास्पृश्यांना ‘हरिजन’ ही संज्ञा दिली. कारण सर्वांना हिंदू समाजाच्या सदसद्‌विवेक बुद्धीला टोचणी लागावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी केरळमधील गुरुवायूर मंदिरापासून मदुराईतील मीनाक्षीपुरम मंदिराविरुद्ध त्यांनी लढा दिला.

‘आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून गांधींनी जवाहरलाल नेहरूंची निवड केली आणि वल्लभभाई पटेलांना दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला, असा आरोप गांधींवर केला जातो; तो सर्वस्वी अनाठायी आहे. राजाजी, पटेल आणि जवाहरलाल हे आपले तीन सहकारी म्हणजे आपला मेंदू, हात व हृदय आहेत, असे गांधी म्हणत. त्यांपैकी राजाजी व पटेल हे वृद्धत्वाकडे झुकलेले होते, पण नेहरू तुलनेने तरुण आणि जनमानसांत खोलवर ठसलेले असे होते. त्यांचा त्याहूनही महत्त्वाचा गुण म्हणजे, गांधींची धर्मनिरपेक्ष विचारसरणी त्यांनी पूर्णतया अंगीकारलेली होती याची गांधींना खात्री होती. याचा निर्वाळा रामचंद्र गुहांनी दिला आहे. 

मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचा पाकिस्तान ठराव 1940 मध्ये फझलुल हक यांनी मांडला होता. ‘चले जाव आंदोलन’ 1942 मध्ये सुरू असताना बंगालमध्ये संयुक्त आघाडीचे सरकार होते आणि त्या सरकारात हक हे मुख्यमंत्री तर हिंदू महासभा नेते श्यामाप्रसाद मुखर्जी हे मंत्री होते. ‘चले जाव आंदोलना’चा बंगालमध्ये जबरदस्त जोर होता. एकीकडे जीना आणि दुसरीकडे वि.दा. सावरकरांचा ‘चले जाव चळवळी’ला फक्त विरोधच होता असे नाही, तर ब्रिटिश सत्ताधारी वर्गाला विनाशर्त सक्रिय पाठिंबा होता. त्या संदर्भातले बंगालचे हिंदू सभा नेते निहाररंजन चॅटर्जी यांचे मत गुहांनी नोंदवले आहे. बंगालमध्ये समस्त हिंदू बांधव गांधींच्या पाठीशी आहेत आणि ‘चले जाव चळवळी’च्याही पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांना विरोध करणाऱ्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार व्हावे लागेल. वीर सावरकरांनी ‘चले जाव’ला विरोध करणारे निवेदन केले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे बंगालमध्ये हिंदू महासभेची मोठी अडचण झाली आहे. मुसलमानांनी आंदोलनापासून दूर राहावे, असे जीनांना वाटते; तर दुसरीकडे हिंदूंनी आंदोलनाला विरोध करावा, असे सावरकर म्हणतात, ही मोठी नवलाईची गोष्ट आहे. निहाररंजन चॅटर्जींचे सुपुत्र सोमनाथ चॅटर्जी हे पुढे मार्क्सवादी पक्षातर्फे लोकसभेवर निवडून आले आणि 2004 मध्ये लोकसभचे सभापतीही बनले, हा जाता-जाता उल्लेख. 

फझलुल हक हे नंतर म्हणजे 1946 पर्यंत जीनांपासून वेगळे झाले होते. जीनांना बंगाली मुसलमानांविषयी काही देणे-घेणे नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यांचे प्रतिस्पर्धी सुऱ्हावर्दी हे बंगालचे मुख्यमंत्री झाले होते. पाकिस्तानचा ठराव मांडणारे फझलुल हक हे गांधींचे नौआखालीतील शांतताकार्य पाहून एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपले उर्वरित आयुष्य हिंदू आणि मुसलमानांमध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी वेचण्याचे ठरविले. हीच गोष्ट सुऱ्हावर्दींच्या बाबतीत ही पुढे घडली. त्या वेळी दिल्लीत फिलिप टालबोट नामक एक अमेरिकन पत्रकार होता, नौआखालीतील गांधींच्या शांतियज्ञाची हकिगत त्याच्या कानांवर पोचली होती. तो चक्षुर्वैसत्यम्‌ पाहायला तिथे गेला. शांतीचे मंत्र आणि गाणी गात-गात शेकडो आबालवृद्ध स्त्री-पुरुषांचा जथा गांधींच्या मागोमाग एका खेड्यातून दुसऱ्या खेड्याकडे मार्गक्रमण करताना त्याने पाहिला, आणि तो हेलावून गेला. ‘जर कुणाला संताचे दर्शन घ्यायचे असेल, यात्रा प्रत्यक्ष पहायची असेल तर- हे दृश्य पाहा. हिंदुस्थानात संतत्वाची संकल्पना इथे प्रत्यक्षात साकार झालेली मी पाहिली. एक कृश वृद्ध देह. त्याने सर्व ऐहिक सुखाचा त्याग केला आहे. तो अनवाणी पायाने थंड धरतीवर चालत-चालत एका महान मानवी ध्येयाचा पाठपुरावा करतो आहे!’ 

देशाचे विभाजन रोखण्यासाठी जीनांना गांधी अनेकदा भेटले. मुसलमानांच्या मानसावर जीनांनी आपली छाप उमटवली आहे, हेही त्यांनी दिलदारपणे मान्य केले. सिरिया, यमन, अरबस्तान वगैरेंप्रमाणे पाकिस्तान हाही एक इस्लामी देश म्हणून प्रत्यक्षात अवतरेल, असे स्वप्न मुसलमानांच्या गळी उतरवण्यात जीना यशस्वी झाले होते. दि.6 मे 1947 रोजी दिल्लीत झालेल्या भेटीत जीनांनी गांधींना स्पष्ट सांगितले, की पाकिस्तानची निर्मिती ही केवळ अपरिहार्य नसून देशापुढील समस्येवरचे ते एकमेव व्यवहार्य उत्तर आहे. त्यावर गांधींचे उत्तर होते, ‘It would be blunder of the first magnitude for the British to be a Party any way whatsoever to the division of India’. (हिंदुस्थानच्या फाळणीला कोणत्याही प्रकारे राजी होणे, ही ब्रिटिशांच्या दृष्टीने महाघोडचूक ठरेल.) 

गांधी आपल्या रोजच्या प्रार्थनासभांमधून धार्मिक सद्‌भावनेचा संदेश देत राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस हा फक्त हिंदूंचा पक्ष बनणार नाही; तसा बनविण्याचा कुणी प्रयत्नही करू नये, असा इशारा त्यांनी दिला. मुसलमान, शीख, जैन, पारशी वगैरे अन्य धर्मीयांना सर्व अधिकार असतील. हिंदुस्थान हे राष्ट्र विभिन्न धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना एकत्र येऊन बनविले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पाकिस्तानची संकल्पना लीगने प्रथम मांडायला सुरुवात केली, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी तिची खिल्ली उडवली होती. ती विक्षिप्त, आर्थिक दृष्ट्या कल्पनारम्य/अवास्तव आणि पूर्णपणे विचारातही न घेण्याच्या लायकीची ठरवली होती. एक महाकाय राजकीय वास्तव म्हणून ती एखाद्या दैत्यासारखी पुढे उभी राहिली होती. त्याची किंमत म्हणजे, लाखो लोकांचे जीव आणि त्यांच्या आयुष्याची होरपळ. जीनांना याची कल्पना होती काय? गुहा म्हणतात की, गांधींप्रमाणे जीनांनी सार्वजनिक रीत्या आपले मन कधीच उघडे केले नाही. पत्रकार कुलदीप नय्यर यांनी आपल्या आत्मचरित्रात जीनांबरोबरच्या हेलिकॉप्टर प्रवासाचा उल्लेख केला आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही बाजूंकडे आणि बाजूंकडून येणारे-जाणारे निर्वासितांचे तांडे पाहून जीना ख्रिन्न झाले होते. ते म्हणाले, ‘‘मी हे काय करून बसलो आहे?’’ ब्रिटिशांनी हिंदू आणि मुसलमानांसाठी 1909 मध्ये विभक्त मतदारसंघ बनवले आणि त्यांना परस्परविरोधी राजकीय एककांत विभागून टाकले. त्याची तार्किक परिणती अपरिहार्यपणे फाळणीत झाली, असे गुहांचे निरीक्षण आहे. 

गांधींचे शांतता प्रस्थापनेसाठी असलेले उपवास सुरूच राहिले. कलकत्यात 2 सप्टेंबर 1947 रोजी दंगली पुन्हा उसळल्या. गांधींनी त्याच दिवशी हिंसाचाराच्या विरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात लढून आपण स्वातंत्र्य मिळविले आहे; ते टिकवायचे असेल, तर आपण ‘लिंच’ला (जमावाने एकट्या-दुकट्याची ठेचून हत्या करण्याच्या पद्धतीला) कायमची तिलांजली द्यायला हवी, असे गांधी म्हणाले. राजाजींची बंगालच्या राज्यपालपदी नुकतीच नेमणूक झाली होती. त्यांनी गांधींना सबुरीचा सल्ला देताना सांगितले, ‘‘तुम्ही दगावलात, तर परिस्थिती आणखी चिघळेल.’’ त्यानंतरही गांधींचा निर्धार कायम होता. ‘‘मी मेलो, तर निदान उघड्या डोळ्यांनी हिंसाचार पाहण्याची वेळ माझ्यावर येणार नाही.’’ असे ते म्हणाले. गांधी कलकत्त्यातील मुस्लिम वस्तीतील हैदरी मंझिल या इमारतीत राहात होते, तेव्हा हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी या इमारतीला घेरून तिच्यावर दगड-विटांचा हल्ला केला होता.  

गांधींचा उपवास सुरू असताना वातावरण हळूहळू बदलत गेले. श्यामप्रसाद मुखर्जींनी येऊन गांधींना सांगितले की, आता वातावरण निवळेल. मुख्य म्हणजे, ज्या हिंदू गुंडांनी ‘हैदरी मंझिल’वर हल्ला केला होता, त्यांनी पश्चात्ताप-दग्ध भावनेतून गांधींपुढे शरणागती पत्करली आणि हातातली शस्त्रे टाकली. गांधींनी त्यांना एकच सांगितले, ‘‘तुम्ही मुसलमानांकडे जा, ‘आम्ही तुमचे संरक्षण करू’ अशी हमी त्यांना द्या. तुमचे खरोखरच हृदयपरिवर्तन झाले आहे, अशी माझी खात्री पटली की, मी माझे उपोषण सोडेन.’’ त्यानंतर त्यांनी शांतता राखण्याची शपथ घेतली आणि त्यात सर्वधर्मीयांना सामील करून घेतले. गांधींनी आपले नैतिक बळ पणाला लावून बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचार आटोक्यात आणला, हे पाहून माउंट बॅटननी त्यांचे वर्णन ‘वन मॅन बाऊंड्री फोर्स’ असे केले. जगातल्या अनेकांनी गांधींचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचविले. त्यांचा अहिंसक सत्याग्रहाचा दांडीतील प्रयोग पाहून अमेरिकेतील जनमतावर एवढा प्रभाव पडला होता की, 1930 मध्ये त्यांची ‘टाइम’ या साप्ताहिकातर्फे ‘मॅन ऑफ द इयर’ म्हणूनही निवड झाली होती. 

स्वातंत्र्य तर मिळाले होते, पण पंजाबमधून उखडल्या गेलेल्या निर्वासितांचे लोंढे दिल्लीत रोज येत होते. त्यांच्या डोळ्यांत एकीकडे उद्‌ध्वस्त झाल्याची खिन्न भावना होती आणि दुसरीकडे तिथल्या मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांबद्दलची खुन्नस होती. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अकाली दल खतपाणी घालून त्यांना पेटवू पाहत होते. दिल्लीतल्या मुसलमानांना बेदखल करून त्यांच्या जागा बळकावण्याचा हीन प्रयत्न सुरू होता. एम.एस. सथ्यू यांच्या ‘गर्म हवा’ या चित्रपटात याचे वास्तवदर्शी चित्रण आहे. बिहार आणि बंगालला शांत करून आलेल्या गांधींनी आता आपला मोहरा दिल्लीकडे वळवला. हिंदू आणि शीख वस्तीत जाऊन गांधी सांगू लागले, ‘‘फाळणीनंतर जे मुसलमान इथे राहिले आहेत, त्यांना सन्मानाने आणि या देशाचे समान अधिकार असणारे नागरिक म्हणून जगू दिले पाहिजे. मी आता पाकिस्तानात जाणार आहे, सोडणार नाही. मी तिथल्या हिंदूंसाठी आणि शिखांसाठी आनंदाने मरण पत्करेन. पाकिस्तानच्या भूमीवर मी आनंदाने अखेरचा श्वास घेईन.’’ 

दोन नवस्वतंत्र राष्ट्रांमध्ये परस्पर-सहकार्याची भावना असावी, आपापल्या राष्ट्रातील अल्पसंख्याकांची पुरेशी काळजी घेण्याची हमी द्यावी- यासाठी एक निवेदन तयार करण्यात आले होते. गांधींनी त्यावर स्वाक्षरी केली होती. हिंसाचारापासून दूर होऊ पाहणाऱ्या सुऱ्हावर्दींनी कराचीला जाताना हे निवेदन सोबत नेले आणि जीनांना त्यावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. जीनांनी त्यांना फटकारले आणि वर हे ऐकवले, ‘‘गांधींनी तुम्हाला मस्त फसविले आहे.’’ सुऱ्हावर्दीनी ही गोष्ट गांधींना सांगितल्यावर गांधी विद्ध होऊन म्हणाले, ‘‘माझी याहून अधिक वाईट बदनामी कुणी केली नसेल. पण तुम्ही तुमचा शांतता प्रस्थापनेचा मार्ग सोडू नका.’’ 

दिल्लीतले दंगे थांबावेत यासाठी गांधींनी आपल्या आयुष्यातला अखेरचा उपवास 13 जानेवारी 1948 रोजी सुरू केला. त्यांचा पाकिस्तानात चांगलाच प्रभाव पडू लागला. धनझफर अलीखान, फिरोजखान नून, मुमताज दौलताना आदी नेत्यांनी गांधींच्या शांतताकार्याबद्दल त्यांची हात न राखता प्रशंसा केली. बिर्ला हाऊसमधल्या प्रार्थना सभेत गांधी म्हणाले, ‘‘मी राजकोटमध्ये लहानपणी होतो तेव्हा हिंदुस्थानात हिंदू, मुसलमान, शीख, पारशी आणि ख्रिस्ती असे सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतील, असे स्वप्न पाहत असे. आता माझे मरण समीप आले आहे. या घटकेला जर हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले, तर मी आनंदाने नाचेन.’’ 

दिल्लीतल्या दंगली आटोक्यात येऊ लागल्यावर 18 जानेवारीला गांधींनी उपवास सोडला आणि दिल्लीजवळच्या मेहरौलीच्या कुतुबद्दीन बख्तियारचा उरूस सुरळीत पार पडावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ते स्वत: कुतुबुद्दीनच्या दर्ग्यात यासाठी गेले. देवळात अथवा अन्य धार्मिक स्थळांमध्ये जाण्याची त्यांची प्रथा नव्हती. यापूर्वी ते मदुराईतील मीनाक्षी मंदिरात गेले होते. कारण त्या मंदिराने हरिजन प्रवेशबंदीची शतकानुशतकांची प्रथा संपुष्टात आणली होती. फाळणीमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या ओल्या जखमांवर मलमपट्टी करण्याच्या हेतूने मेहरौलीच्या दर्ग्यात ते गेले. 

नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी गांधींची हत्या केल्यानंतर अवघे जग शोकसागरात बुडाले. गांधींचा दक्षिण आफ्रिकेतला सहकारी हेन्री पोलॉक याने 1934 मध्येच भाकीत केले होते की, एखाद्या ध्येयासाठी देहत्याग करण्याची गांधींची प्रवृत्ती आहे. त्यांना साधारण मरण येणार नाही, अत्यंत नाट्यपूर्ण प्रकारे त्यांची जीवनयात्रा संपेल. हे भाकीत खरे ठरले. अर्थात, त्यांचे जीवन म्हणजे एखाद्या  ग्रीक शोकनाट्यासारखे भव्य आणि दिव्य होते. 

गांधींच्या मृत्यूनंतर हे लक्षात आले की, पाकिस्तानातही त्यांच्या त्यागाची आणि मिशनची कदर करणारे लोक होते. सुशीला नय्यर जेव्हा मुलतानला होत्या, तेव्हा त्यांना तिथली जनता विचारत होती की- गांधी इथे कधी येणार आहेत? मियाँ इफ्तिकारुद्दीन हा नेता पूर्वी काँग्रेसमध्ये होता, नंतर तो लिगी बनला. सुशीला नय्यरना पाहताच त्याला रडू कोसळले आणि ‘आपण सर्वच गांधींच्या मृत्यूला जबाबदार आहोत’, असे म्हणत तो हुंदके देऊ लागला. गांधी हे हिंदू समाजाचे महान नेते होते, एवढेच म्हणण्याचा कोतेपणा जीनांनी दाखवला. ‘पाकिस्तान टाइम्स’ने अत्यंत मनापासून गांधींच्या मोठेपणाला कुर्निसात केला. 

‘आपल्याच (धर्माच्या) लोकांसाठी मरणारे इतिहासात अनेक जननायक होऊन गेले, परंतु दुसऱ्या (धर्माच्या) लोकांसाठी आपल्याच धर्माच्या लोकांशी प्रसंगी लढणारे योद्धे इतिहासात फारसे आढळणार नाहीत. गांधी हे असे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.’ 

जगभरातल्या मान्यवरांनी आणि सामान्यांनी गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विन्स्टन चर्चिल, डॉ.आंबेडकर, लिनलिथगो यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बिर्ला हाऊसमध्ये गांधींच्या अंत्यदर्शनाला आंबेडकर गेले, गांधींचे कलेवर पाहून ते भावनाविवश झाले होते. गांधींच्या अंत्यविधीलाही ते काही काळ उपस्थित होते. डॉ. शारदा कबीर यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘माझे गांधींशी काहीही देणे-घेणे नाही. माझ्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक घडणीशी त्यांचा कसलाही संबंध नाही. तरीही त्यांच्या हत्येची वार्ता ऐकून मला दु:ख झाले. महान नेते आपल्या देशाची पुष्कळ सेवा करतात, पण देशाच्या प्रगतीच्या मार्गातला ते अडसरही ठरतात.’ दक्षिण आफ्रिकेत असताना आपला पुतण्या मगनलाल याला गांधींनी लिहिले होते, ‘हिंदू आणि मुसलमानांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत, ते हिंदुस्थान जनतेचे शत्रू आहेत. हिंदू- मुसलमान ऐक्यासाठी कुणाला तरी आपला जीव पणाला लावावा लागणार आहे. ती संधी मला मिळाली, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन.’ 

गांधींची स्वत:विषयीची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. दिल्लीतल्या हिंदू- मुसलमान दंगली शमविण्यासाठी 1924 मध्ये गांधींनी उपोषण आरंभले होते. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘या दोन धार्मिक समुदायांना एकत्र बांधून ठेवणारे सिमेन्ट बनण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो आहे. आवश्यक असेल तर माझ्या रक्ताने हे सिमेंटचे काम करावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण हे करू शकण्यापूर्वी मी मुसलमानांना हे पटवून देऊ इच्छितो की, माझे हिंदूंवर जितके प्रेम आहे तितकेच मुसलमानांवर आहे. माझ्या धर्माने मला हेच शिकविले आहे की, सर्वांवर सारखेच प्रेम करावे.’’ गांधींनी स्वत:चे उद्‌गार खरे करून दाखवले, यात शंका नाही. 

गुहांच्या या पुस्तकात गांधी आणि आंबेडकर यांच्यातील संबंधाबद्दल तपशीलवार विश्लेषण आहे. गांधी सुरुवातीपासून अस्पृश्यतेला हिंदू धर्मावरील कलंक मानीत होते. दक्षिण आफ्रिकेतून ते हिंदुस्थानात कायमचे आले, तेव्हा त्यांनी अहमदाबादला साबरमती आश्रम सुरू केला. त्यात पूर्वास्पृश्य इतरांच्या बरोबरीने राहतात, हे एका प्रमुख देणगीदाराला कळले; तेव्हा पूर्वास्पृशांना आश्रमातून काढून टाकण्यात यावे, असा दबाव गांधींवर येऊ लागला. गांधींनी त्याला सपेशल नकार दिला आणि देणगीवर पाणी सोडले. गांधींनी पूर्वास्पृश्यांना ‘हरिजन’ ही संज्ञा दिली. कारण सर्वांना हिंदू समाजाच्या सदसद्‌विवेकबुद्धीला टोचणी लागावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी केरळमधील गुरुवायूर मंदिरापासून मदुराईतील मीनाक्षीपुरम मंदिराविरुद्ध त्यांनी लढा दिला. 

जगन्नाथ पुरीच्या मंदिरातही हरिजनांना प्रवेश नव्हता. गांधी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई आणि त्यांचे कुटुंब पुरीला गेले होते. गांधींच्या दौऱ्याचा तो एक थांबा होता. गांधींना न सांगता कस्तुरबा आणि महादेवभार्इंचे कुटुंब पुरीच्या जगन्नाथाच्या दर्शनाला गेले. याची तक्रार महादेवभार्इंचा 10 वर्षांचा मुलगा नारायण देसाई यांनी गांधींकडे केली. त्यातून गांधींना इतके क्लेश झाले की, त्यांचा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढला. आपल्याबरोबर पन्नास वर्षे संसार केल्यानंतरही कस्तुरबांना खरे धर्माचरण कशात आहे हे का कळले नाही, असा प्रश्न त्यांना छळत राहिला. सनातनी मंडळी अस्पृश्यतेला शास्त्रसंमत मानून सुधारणावाद्यांना विरोध करत असते. गांधींनी सुरुवातीपासूनच लिखित शास्त्रवचनांपेक्षा स्वत:च्या विवेकबद्धीला आणि नैतिकतेला प्राधान्य दिले. माझ्या विवेकबुद्धीला न पटणारी अस्पृश्यतेसारखी प्रथा मी कधीही मान्य करणार नाही, असे ते म्हणत. म्हणजे याबाबत त्यांची भूमिका नि:संदिग्ध होती.  

वर्णाश्रम धर्माबाबत गांधींचे विचार सुरुवातीच्या काळात प्रतिगामी वाटणारे होते, त्यामुळे अरुंधती रॉय यांच्यासारखे अतिउत्साही तथाकथित पुरोगामी त्यांच्यावर प्रतिगामित्वाचा शिक्का मारून मोकळे होतात. रॉय तर त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या संदर्भात वंशवादीही ठरवतात. गांधी या दोन्ही बाबतींत कसे बदलत गेले आणि पुरोगामी भूमिकेच्या समीप आले, हे गुहांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यांत गांधींनी सवर्ण/ दलित अशा आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. गांधींच्या विचारांमध्ये सातत्य (कन्सिस्टन्सी) नव्हते, अशी टीका केली जाते. ‘कन्सिस्टन्सी इज द व्हर्च्यू ऑफ द फूल’ (मूर्ख माणसाचा गुण) असे बनॉर्ड शॉ म्हणत असे. हर्बर्ट फिशर या जर्मन अभ्यासकाने गांधींविषयी म्हटले आहे कीत् यांच्या सातत्य नसण्यातही एक प्रकारचे सातत्य होते, हेच खरे आहे. वर्णाश्रम धर्माबाबत त्यांची भूमिका बदलण्यात आणि ती प्रगतिशील बनण्यात डॉ.आंबेडकरांचा निग्रही लढा कारणीभूत होता, असे गुहा म्हणतात आणि हेच निदान समाजवादी नेते मधू लिमये यांनी आपल्या ‘डॉ.आंबेडकर : एक चिंतन ’ या पुस्तकात केले आहे. 

गुहा यांनी असे म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर 14 ऑगस्ट 1931 रोजी गांधींना प्रथम भेटले. यापूर्वी ‘यंग इंडिया’मध्ये त्यांनी आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाबद्दल स्तुती केली होती. दोघांनाही एकमेकांविषयी माहिती होती आणि आंबेडकरांच्या सत्याग्रहामागे गांधींचीच प्रेरणा होती. दोघांच्यात वीस वर्षांचे अंतर होते. गांधींना आंबेडकरांच्या पार्श्वभूमीची पुरेशी कल्पना नव्हती, हे दुर्दैव! आंबेडकर हे टिळक किंवा गोखले यांच्याप्रमाणे उच्चवर्णीय होते, असा गांधींचा गैरसमज झाला होता. एखाद्या उच्चवर्णीय समाजसुधारकाशी उत्तेजन देत बोलावे, तसे गांधी आंबेडकरांशी बोलले. त्यातून आंबेडकर दुखावले गेले. कारण त्यांनी अस्पृश्यतेचे दाहक चटके सोसले होते. त्यांच्या मनात त्यामुळे गांधीविषयी कटुता निर्माण झाली असावी. 

काँग्रेस सर्वसमावेशक आहे आणि सर्वांचे प्रतिनिधित्व करते, हा गांधींचा आणि काँग्रेसचा दावा जीनांनी जितक्या त्वेषाने व तुच्छतेने ठोकरून लावला होता, तितक्याच प्राणपणाने आंबेडकरांनी त्याला सतत विरोध केला. गोलमेज परिषदेच्या वेळी आंबेडकरांनी निकराचा विरोध केला, तरी गांधींनी त्यांच्यासमोर नमतेच घेतले. ‘आंबेडकरांच्या मनात कटुता असली, तर ते समजण्यासारखे आहे. कारण त्यांनी तसे भोगले आहे; ते संयमी आहेत म्हणूनच आमची डोकी फोडत नाहीत’, या शब्दांत त्यांनी आंबेडकरांचा गौरव केला होता. गांधींनी आपला अग्रक्रम 1932 नंतर बदलून स्वराज्यप्राप्तीपेक्षा अस्पृश्यता-निवारणाच्या कार्याला अधिक महत्त्व देऊन अवघा हिंदुस्थान पिंजून काढला. याचे कारण आंबेडकरांच्या रूपाने त्यांच्यासमोर एक आव्हान उभे राहिले होते, असे गुहा स्पष्टपणे म्हणतात. आंबेडकर तर सरळ सांगत- ‘‘माझ्या जन्म पूर्वास्पृश्य जातीत झाला असल्यामुळे माझे प्रथम कर्तव्य म्हणजे या जातीच्या हिताचे संरक्षण करणे हे आहे. राष्ट्राप्रत असणारे कर्तव्य त्यानंतर येते.’’ त्यातूनच गांधी आणि आंबेडकर यांच्या वाटा वेगळ्या होत राहिल्या. गांधींनी ‘हरिजन सेवक संघ’ स्थापन केला, त्यामागेही वरच्या पातळीवरून उत्तेजन देण्याची अभावित कार्यपद्धती असल्यामुळे आंबेडकर व त्यांच्या अनुयायांबरोबर मनोमीलन होऊ शकले नाही आणि गांधींच्या व काँग्रेसच्या जवळ आंबेडकर आले नाहीत. 

प्रांतिक सरकारांच्या 1937 च्या प्रयोगानंतर तर ते कट्टर काँग्रेसविरोधी कळपात गेले. जीनांच्या बरोबरीने 1940 मध्ये सभा घेऊन त्यांनी ‘मुक्तिदिन’ही साजरा केला. ‘हिंदुस्थानला स्वातंत्र्याची हमी न देता जर्मनीविरुद्धच्या युद्धात ओढू नका’, अशी ताठर व निग्रही भूमिका घेऊन गांधी आणि काँग्रेस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू केला. त्याची परिणती ‘चले जाव चळवळी’त झाली. त्या वेळी जीना, आंबेडकर आणि सावरकर हे गांधींविरोधी ब्रिटिशांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. आंबेडकरांची तर व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर नेमणूक झाली. आपल्यावर हिंसाचाराला उत्तेजन दिल्याचा आरोप ब्रिटिश सरकारने केला, म्हणून गांधींनी तुरुंगात असताना उपवास केला. गांधींची सुटका करावी म्हणून व्हाईसरॉयच्या कौन्सिलच्या फक्त तीन सदस्यांनी राजीनामे दिले. ते होते माधवराव अणे, होमी मोदी (पिलू मोदींचे वडील) आणि निहाररंजन सरकार. गांधींचा उपवास सुरू होता, त्या काळात परिस्थितीचे अवलोकन करण्याच्या हेतूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी आपला खास दूत विल्यम फिलिप्स याला हिंदुस्थानात पाठवले होते. गांधींच्या या उपवासामुळे त्यांना जनतेची प्रचंड सहानुभूती होती, हे त्यांच्या ध्यानात आले. जे.पी. श्रीवास्तव या व्हाईसरॉय कौन्सिलच्या सदस्याने ‘इंपीरियल हॉटेल’मध्ये 100 लोकांसाठी एक खास भोजनसमारंभ आयोजित केला होता, परंतु निम्म्या आमंत्रितांनी गांधींच्या उपवासाबद्दल सहानुभूती म्हणून अंग काढून घेतले होते. आंबेडकर मात्र उपस्थित होते आणि गांधींचा उपवास व त्यामुळे निर्माण झालेली खळबळ याबद्दल त्यांनी फिलिप्सकडे चांगले उद्‌गार काढले नाहीत. 

एखाद्या ज्येष्ठ माणसाच्या वागणुकीत वयाने अथवा अनुभवाने लहान असणाऱ्या माणसांशी वागताना एक प्रकारचा आविर्भाव असतो, तसा गांधींचा आंबेडकरांबाबत होता, असा गुहांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे त्यांचे मैत्र जमले नाही आणि सूर जुळले नाहीत. ‘चले जाव चळवळी’च्या संदर्भात 1942 मध्ये ब्रिटिश सरकारने गांधींना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले होते. त्या कारावासाच्या सुरुवातीच्या काळातच गांधींसोबत स्थानबद्ध असणारे त्याचे सचिव आणि जीवाभावाचे सोबती महादेव देसाई अचानक निवर्तले. गांधींना तो फार मोठा धक्का होता. महादेवभार्इंची रक्षा कपाळावर भस्माप्रमाणे फासून गांधी आपला शोक व्यक्त करत होते, हे कस्तुरबांना आवडले नव्हते. पुढे कस्तुरबाही निवर्तल्या. 

कस्तुरबांना ‘पेनिसिलिन’ची आवश्यकता होती; परंतु गांधींनी हट्टीपणे ते देऊ दिले नाही, असे अन्यत्र लिहिले गेले आहे. (ॲलेक्स व्हॉन तुझंल मन : द इंडियन समर) पण गुहा यांनी इथे स्पष्टीकरण दिले आहे. आपला धाकटा मुलगा देवदास याला गांधी म्हणाले, ‘‘या मरणासन्न अवस्थेत तुझी आई पाच इंजेक्शन्स सहन करू शकेल का? मला वाटत नाही.’’ डॉ. सुशीला नय्यर आणि तुरुंगाचे डॉक्टर गिल्डर यांनाही गांधींनी हाच प्रश्न विचारला. ‘त्या इंजेक्शनचा उपयोग होईल, असे आम्ही बापूंना सांगू शकलो नाही’, असे सुशीला नय्यर यांचे म्हणणे गुहांनी उद्‌धृत केले आहे. 

कस्तुरबांच्या तुरुंगातल्या निधनानंतर गांधींना जगभरातून शेकडो सांत्वनपर संदेश आणि पत्रे आली. ब्रिटनचे माजी गृहमंत्री डेव्हिड लॉइड जॉर्ज, माजी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन अशा सत्ताधाऱ्यांपासून अनेक सामान्यांचे आणि मान्यवरांचे संदेश आले होते. गुहांना तेव्हाचे निष्ठुर व्हाईसरॉय लिनलिथगो, डॉ.आंबेडकर, बॅ.सावरकर किंवा बॅ.जीना यांनी पाठविलेले शोकसंदेश मात्र आढळले नाहीत. मुस्लिम लीगला पाठिंबा देणाऱ्या ‘डॉन’ या वर्तमानपत्राने मात्र कस्तुरबांचा गौरव केला. गांधींनी कस्तुरबांच्या स्मरणार्थ एक विश्वस्त संस्था स्थापन केली. त्यातून गरजू, गरीब स्त्रिया आणि लहान मुलांना- विशेषत: ग्रामीण भागातल्यांना मदत करावी आणि रुग्णालये उघडावीत, तसेच प्रसूतिगृहे उघडावीत अशी योजना होती. मुंबई सरकारने कस्तुरबा फंडाला मदत करण्यास सरकारी नोकरांना मनाई केली. गांधींविषयी आणि काँग्रेसविषयी कमालीचा द्वेष व्यक्त करणारे निवेदन बॅ.सावरकरांनी प्रसृत केले. हिंदू संघटनांनी काँग्रेसच्या कस्तुरबा फंडाला एका पैशाचीही मदत करू नये, असा इशारा सावरकरांनी दिला. ‘‘या फंडाचा उपयोग तथाकथित हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी केला जाईल आणि त्यातून मुसलमानांचे खिसे गरम होतील’’, असेही सावरकर म्हणाले. 

गुहांना आंबेडकरांचा गांधीविरोध समजू शकतो, पण गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध अखिल हिंदुस्थानभर चळवळ उभारली आणि शास्त्रे व शास्त्रवचने नाकारली; तसेच ‘मी फक्त सवर्ण आणि हरिजन यांच्यात होणाऱ्या आंतरजातीय विवाहालाच उपस्थित राहीन’ अशी प्रतिज्ञा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात केली, याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याकरता गांधींना कर्मठ हिंदूंचा रोष पत्करावा लागला. त्यांनी गांधींना ख्रिस्ती मिशनऱ्यांचे दलाल ठरविले. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांना काळे झेंडे दाखवले. ‘महात्मा नव्हे, तर दुरात्मा’ अशा घोषणा दिल्या, इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगावर विष्ठाही फेकली. पुण्याच्या तुळशीबागेत 1934 मध्ये त्याच्या सभेवर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्नही केला. गांधी आणि आंबेडकरांच्या भूमिका आणि कार्य परस्परपूरक होते, असा समन्वयवादी दृष्टिकोन गुहा घेतात. अस्पृश्यता- निवारणासाठी गांधींनी जितके कार्य केले, तितके अन्य कोणाही सवर्णाने केले नाही. दलितांमधून उदयाला आलेला सर्वांत महान नेता म्हणजे डॉ.आंबेडकर. या दोघांचा वारसा एकत्रितपणे पुढे चालविण्यातून दलितांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव कमी होईल, असा विश्वास गुहांना वाटतो. 

(क्रमश:) 

(रामचंद्र गुहा यांच्या नव्या पुस्तकाचा परिचय करून देणारा दीर्घ लेख तीन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा दुसरा भाग... संपादक)    

या लेखाचा पहिला भाग येथे वाचागांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948) भाग 1

Tags: गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड अमरेंद्र धनेश्वर रामचंद्र गुहा महात्मा गांधी गांधी चरित्र पुस्तक परीचय gadhi the years that changed the world India and Gandhi Gandhi history amarendra dhaneshwar on Gandhi new biography by Ramchandra guha guha historian Mohandas Karamchand Gandhi amarendra dhaneshwar on ram guha new book mahatma Gandhi amarendra dhaneshwar book review book review Ramchandra guha on mahatma Gandhi Gandhi biography by Ramchandra guha mahatma gandhi new biography ramchandra guha on Gandhi ram guha Gandhi ram guha new book on Gandhi ram guha new book New book of Ramchandra guha साधनासाप्ताहिक साधना विकलीसाधना Sadhana Sadhanasaptahik weeklysadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके