डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डॉ. टिकेकरांची वैचारिक मांडणी सौम्य आहे. त्यांचं लिखाण संथखोल असतं. वरची पट्टी ते वर्ज्य मानतात. आपल्या मतांवर ते ठाम असतात, दुराग्रही कधीच नसतात. धारदार तर्क, बुद्धिवाद आणि विवेक या गुणाुंळे त्यांचं लिखाण उजळून निघतं. एक सुसंस्कृत, बुद्धिमान पुरंध्री हातांत दिवा घेऊन स्वत:च्या भव्य, खानदानी वाड्यातून आपल्याला फिरवून आणते आहे असं डॉ. टिकेकरांची पुस्तकं वाचताना वाटत राहतं.

एकोणिसाव्या शतकाला एक मोठी फेरी मारून न्या. महादेव गोविंद रानडे, सर भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, शेजवलकर, माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन, श्री. रा. टिकेकर अशा वैभवशाली नगरांधून मजल दरमजल करत एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या अखेरच्या महिन्याचा किनारा गाठायचा. अंळ विसावा घेतला की थेट पानिपतकडे कूच करायचं अन्‌ मग एकदम भविष्याच्या दिशेनं एक मोठी सुपरसॉनिक झेप घ्यायची... डॉ. अरुण टिकेकरांच्या गप्पा म्हणजे एक रोलरकोस्टर राइड असते. अन्‌ प्रवास संपताना घडतं इतिहासाचं भव्य, थ्री-डायमेन्शनल दर्शन. शिलालेख, बखरी, रोजनिश्या, पोवाडे अन्‌ पत्रांच्या ढिगाऱ्यातून इतिहास एका दिव्य क्षणी बाहेर पडतो आणि सगळे भेद, सगळ्या सीमा ओलांडून एक निखळ सत्य म्हणून उभा राहतो. स्वत:तल्या सामर्थ्यानं तेजाळत असतो. हे सगळं प्रकरण फार गुंतागुंतीचं आणि थक्क करून टाकणारं असं असतं. ते समजून घेण्याची एक सूक्ष्म, चिकित्सक दृष्टी - एक खास ‘नजर’ - डॉ. टिकेकरांकडे आहे. मुळातच इतिहास हा डॉ. टिकेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

‘स्थल-काल’ या ग्रंथातल्या पहिल्याच लेखात ते म्हणतात : इतिहास ही संवेदना आहे. अधिक सक्षम करण्यासाठी तिला खतपाणी घालून वाढवावी लागते. ती मुळातच नसेल तर बाणवावी लागते, जोपासावी लागते. एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्यावर भग्न, विदीर्ण वास्तूच्या दर्शनानं त्या वास्तूशी संबंधित एखादी ऐतिहासिक घटना नजरेसमोर तरारत नसेल, एखाद्या इतिहास पुरुषानं वापरलेली चीजवस्तू, त्यानं लिहिलेलं पत्र वा हाताळलेला, अभ्यासलेला ग्रंथ आपल्या हाती आल्यास आपल्या शरीरात अनोख्या आनंदाची शिरशिरी येऊन अंग पुलकित होऊन उठत नसेल, तर आपली ही संवेदना हरपली आहे, असंच समजावं लागेल. मुळातल्या जिव्हाळ्याला तर्कशुद्ध विचारांची बैठक लाभली. चतुरस्त्र वाचन आणि चिंतनामुळे डॉ. टिकेकरांचं संशोधन सर्वंकष आणि सर्वस्पर्शी झालंय. एक श्रेष्ठ संशोधक म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवर डॉ. टिकेकरांनी मोठी मान्यता मिळवली आहे. हा मान त्यांना शोभून दिसतो. डॉ. टिकेकर सोलापूरचे. तिथल्या एका विद्याप्रेी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपण पुस्तकांच्या सहवासात गेलं. त्यांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे मराठीचे पहिले स्तंभलेखक. ते ‘केसरी’त ‘धनुर्धारीचे वाग्बाण’ नावाचं सदर लिहित असत.

‘वाईकर भटजी’ या कादंबरीचे कर्ते रामचंद्र विनायक टिकेकर. डॉ. टिकेकरांचे वडील चिंतामणी रामचंद्र ‘दूत’ नावाचं मासिक चालवत असत. कारखानदारी या विषयाला वाहिलेलं ‘दूत’ हे मराठीतलं पहिलं मासिक. आपल्या गुरूंचं ऋण मान्य करताना डॉ. टिकेकर सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक के.पं. मंगळवेढेकर, प्राध्यापक भोगीशयना आणि मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक जी.सी. बॅनर्जी या त्रिमूर्तींचा आवर्जून आणि कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. तर विख्यात पत्रकार-लेखक श्री.रा. टिकेकर आपल्या पुतण्याचे आधारवडच ठरले. ग्रंथप्रे, वाचन-संस्कृती आणि संशोधनवृत्ती हे संस्कार डॉ. टिकेकरांना काकांकडून मिळाले. श्री.रां.नीच त्यांच्यासमोर एकोणिसाव्या शतकातला महाराष्ट्र सादर केला. इतिहासाचार्य राजवाडे, सर जदुनाथ सरकार, श्रीधर व्यंकटेश केतकर, त्र्यंबक शंकर शेजवलकर, अनंत काकबा प्रियोळकर, सेतुाधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, न.र. फाटक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. दुर्गाबाई भागवत, इरावतीबाई कर्वे अशा उत्तुंग विद्वानांच्या इतिहासविषयक संशोधनाचा आवाका आस्ते आस्ते पुतण्याच्या लक्षात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध वैचारिक परंपरेचं मोठेपण समजत गेलं. त्यातूनच डॉ. टिकेकरांच्या कामाचं स्वरूप निश्चित झालं. कामाला वेग आला. 

डॉ. टिकेकर स्वत:चं वर्णन नि:पक्ष आणि उदारमतवादी - नॉन-कॉन्फर्मिस्ट लिबरल - असं करतात. ते न्या. रानडे ‘स्कूल’चे आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एकोणिसाव्या शतकातल्या ‘रेनसां’ चळवळीचा महाराष्ट्रावर अतिशय खोल आणि दूरगामी असा परिणाम झाला. माणुसकी, उदारमतवाद आणि विवेक या त्रिसूत्रीवर आधारलेल्या या सामाजिक-वैचारिक उन्नयनाचे आद्य प्रणेते म्हणून न्या. रानडे यांचा मान आहे. भारतासारख्या देशात सामाजिक सुधारणेची गती मंद असेल. समाज टप्प्याटप्प्यानं, सावकाश चालीनं संक्रमित होत जाईल. परंपरेशी पूर्णपणे फारकत घेऊन सुधारणा शक्य नाही, अशी न्या. रानडेंची भूमिका आहे. त्यांनी पाश्चात्य उदारमतवाद आणि भारतीय धर्मविचार यांची सांगड घातली. हे सगळं डॉ. टिकेकरांना मान्य आहे. मात्र, न्या. रानडेंची धर्मपरायणता आणि ईश्वरलीनता त्यांना मंजूर नाही. डॉ. टिकेकरांनी आगरकरांचा प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला आहे.

म्हणजे त्यांनी न्या. रानडे आणि आगरकर यांची सांगड घातली आहे. हे लक्षात घेतलं तर डॉ. टिकेकरांचा विचार-व्यूह आपल्याला बराच समजेल. डॉ. टिकेकरांची वैचारिक मांडणी सौम्य आहे. त्यांचं लिखाण संथखोल असतं. वरची पट्टी ते वर्ज्य मानतात. आपल्या मतांवर ते ठाम असतात, दुराग्रही कधीच नसतात. धारदार तर्क, बुद्धिवाद आणि विवेक या गुणाुंळे त्यांचं लिखाण उजळून निघतं. एक सुसंस्कृत, बुद्धिमान पुरंध्री हातांत दिवा घेऊन स्वत:च्या भव्य, खानदानी वाड्यातून आपल्याला फिरवून आणते आहे असं डॉ. टिकेकरांची पुस्तकं वाचताना वाटत राहतं. डॉ. टिकेकरांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ‘द किंकेडस्‌’ हा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध (1992 साली गं्रथरूपानं प्रकाशित झाला) अतिशय गाजला. किंकेड पिता-पुत्र भारतात अंलदार म्हणून कार्यरत होते. दोघांचा काळ भिन्न, त्या काळाची परिस्थिती वेगळी. त्यांच्या कारकीर्दीची आणि एकोणिसाव्या शतकातल्या धकाधकीची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण अशी समीक्षा डॉ. टिकेकरांनी या पुस्तकात केली आहे. ‘कालमीमांसा’मध्ये त्यांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांतल्या अपूर्व अशा वैचारिक संक्रमणाचा वेध घेतला आहे. ‘शहर पुणे’चे दोन्ही खंड म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरांचा मौल्यवान दस्तावेज.

तर, ‘द क्लॉयस्टर्स पेल’ : अ बायोग्राफी ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे’ हा केवळ मुंबई विद्यापीठाचा इतिहास नसून शिक्षणामुळे सर्वांगानं बहरून आलेल्या समाजाचा चित्तवेधक वृत्तांत आहे. डॉ. टिकेकरांचं लिखाण जड असतं असं काहींचं म्हणणं असतं. या आक्षेपाला ‘जन-मन’ या पुस्तकानं चोख उत्तर दिलंय. जन (पॉप्युलर) आणि महाजन (एलिट) यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंधांचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाची शैली सुगम आणि रसाळ आहे. थोर व्यासंगी डॉ. अशोक रानडे ‘जन-मन’ विषयी म्हणतात : ‘...टिकेकरांच्या कामाचे अप्रूप एवढ्यासाठी आहे, की अभ्यासाची संदर्भसामग्री असंख्य जीवनक्षेत्रांतून गोळा करावी लागते. ही सामग्री व्यवस्थित लावलेली, एकत्रित कधीच मिळत नाही. क्षुद्र वाटणाऱ्या तपशिलातून, गृहीत धरून दुर्लक्ष केलेल्या जीवन व्यवहारातून, लिखित-मुद्रितग ्रथित नसलेल्या ‘पुराव्यांवरून’ अंदाज बांधत संस्कृतीचे स्वरूप जाणण्याकरिता आवश्यक ते संदर्भ पुरवणारी सामग्री खरे पाहता निर्माण करावी लागते. टिकेकरांच्या प्रयत्नांच्या स्वरूपाचे ‘कल्चरल डॉक्युेंटेशन’ असेच वर्णन करता येईल... टिकेकरांच्या लिखाणाकडे माणसे आवडीने वळतील, कारण माणसाच्या आवडीच्या वस्तूंचे गुण गाण्याचे पथ्य ते आनंदाने पाळतात.’ केवळ क्रियापदापुरतं मराठी बोलणाऱ्यांना सोप्या, सुटसुटीत मराठीतला हा डॉ. अशोक रानड्यांचा अभिप्रायही क्लिष्ट वाटू शकतो!

डॉ. टिकेकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात अध्यापनानं केली यात नवल नाही. ते एम.ए.साठी मुंबईला आले (साल : 1964-65, अंदाजे. अस्सल पुरावा डॉक्टरसाहेबांकडून काढायला हवा) तेव्हा त्यांना पैशाची चणचण भासत होतीच. त्यांना महिना रु. 75ची एक शिकवणी मिळाली. त्यांतले रु. 37.50 पैसे ते सोलापूरच्या घरी पाठवत. रु. 10ची मनीऑर्डर एका जवळच्या महिला नातेवाईकाला दरमहा जात असे. उरलेल्या रु. 27.50 पैसे या घसघशीत रकमेवर महिना काढायचा. मुंबईतल्या चार प्रतिष्ठित महाविद्यालयांध्ये अध्यापनाचं काम केल्यानंतर डॉ. टिकेकर 1976 साली नवी दिल्लीतल्या यु.एस. लायब्ररी ऑफ काँग्रेस या मातब्बर संस्थेत ॲक्विजिशन स्पेशलिस्ट म्हणून काम पाहू लागले. यु.एस. लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी योग्य त्या पुस्तकांची निवड करणं, ती मिळवणं, पुस्तकांचं क्षे-कुशल पाहणं असं या कामाचं स्वरूप होतं. पाच वर्षांनंतर डॉ. टिकेकर मुंबईला परत आले आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कार्यालयात संदर्भविभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. हा महत्त्वाचा टप्पा. यानंतर डॉ. टिकेकरांची कारकीर्द बहरते.

श्री. गोविंदराव तळवलकरांची सूचना म्हणा किंवा आग्रह, डॉ. टिकेकरांनी ‘टाइम्स’च्या संदर्भविभागातून आपलं बिऱ्हाड ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये हलवलं. ‘म.टा.’मध्ये ते 1985 साली ज्येष्ठ साहायक संपादक या पदावर रुजू झाले. तिथं साडे-चार वर्षं काम केल्यानंतर ‘टाइम्स’च्या अर्काव्हयल रिसर्च विभागाचे प्रमुख म्हणून दोन वर्षं काम केलं आणि 1991 साली ते ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. ‘लोकसत्ते’चं कप्तानपद त्यांनी अकरा वर्षं समर्थपणे सांभाळलं. वाचन-व्यासंगाच्या शिस्तीत वाढलेला डॉ. टिकेकरांसारखा माणूस पत्रकारितेच्या तात्कालिक आणि विलक्षण घाईगर्दीच्या; लहरी (वाचकांची लहर सांभाळून पेपर चालवावा लागतो) आणि बेभरवशाच्या (मालकाचा भरवसा देता येत नाही, सहकाऱ्यांचाही नाही) जगात येतो आणि वीसेक वर्षं छान रमतो ही खरं तर विसंगती वाटते. डॉ. टिकेकरांना मात्र तसं वाटत नाही. संशोधन आणि पत्रकारिता या परस्परपूरक गोष्टी आहेत असं ते मानतात. ते आपण मान्य करू आणि डॉ. टिकेकरांच्या पत्रसृष्टीतल्या कारकीर्दीचा विचार करू. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात डॉ. टिकेकर पत्रकारितेत रीतसर दाखल होतात. हा काळ महत्त्वाचा मानला पाहिजे. एकीकडे पत्रसृष्टीचा विस्तार होत असताना भारतातल्या मध्यमवर्गाचे सरळसरळ दोन भाग पडले. उच्च शिक्षण आणि तंत्रकौशल्याच्या बळावर वरचा भाग 

डॉ. टिकेकरांची वैचारिक मांडणी सौम्य आहे. त्यांचं लिखाण संथखोल असतं. वरची पट्टी ते वर्ज्य मानतात. आपल्या मतांवर ते ठाम असतात, दुराग्रही कधीच नसतात. धारदार तर्क, बुद्धिवाद आणि विवेक या गुणाुंळे त्यांचं लिखाण उजळून निघतं. एक सुसंस्कृत, बुद्धिमान पुरंध्री हातांत दिवा घेऊन स्वत:च्या भव्य, खानदानी वाड्यातून आपल्याला फिरवून आणते आहे असं डॉ. टिकेकरांची पुस्तकं वाचताना वाटत राहतं.

अधिकाधिक वर जाऊ लागला. याच वर्गातले बरेचसे उच्चशिक्षित आणि तंत्रनिष्णात (आय.आय.टी., वर्ल्ड बँक, व्यवस्थापन या क्षेत्रांतले) तरुण 1980च्या दशकात पत्रकार-संपादक झाले. या मंडळींनी पत्रकारितेची नवी मांडणी केली. सत्ताधीशांना वठणीवर आणायचं, त्यांना सतत धारेवर धरायचं आणि मीडियाची सत्ता निरंकुश कशी राहील ते पाहायचं असा हा अजेंडा होता. आणीबाणीच्या काळात आपण हताश झालो, सत्ताधीशांपुढे आपण नांगी टाकली याबद्दलची मध्यमवर्गाची चीड, खंत या अजेंड्यातून ठळकपणे व्यक्त होते. राजकारण आणि मीडिया ही दोन तुल्यबळ सत्ताकेंद्रं एकमेकांसमोर उभी ठाकणार हे तर उघडच होतं. याच सुारास कॉर्पोरेट सेक्टरनं मीडियावर आपलं जाळं टाकलं. जाहिरात कंपन्यांचं प्रस्थ वाढलं. यातून एक फार वेगळीच आणि विलक्षण धोकादायक अशी ‘पेट्रनाज’ संस्कृती तयार झाली. त्याचे भयानक परिणाम आज आपल्यासमोर येत आहेत. मनोरंजन आणि ग्लॅरचा आधार घेऊन मीडियानं आपला व्याप वाढवला. रंगीत पुरवण्या, गुळगुळीत छायाचित्रं, उत्तम छपाई यांसाठी बराच पैसा लागतो. त्यामुळे निर्मितीचा खर्च बेसुार वाढला. हे सगळं लचांड समजून घेण्यासाठी अन्‌ पुढं रेटण्यासाठी संपादकाकडे ‘मॅनेजरिअल स्किल्स’ असलेच पाहिजेत असं मालकांनी ठरवलं.

व्यासंगापेक्षा व्यवस्थापनाला महत्त्व आलं. अशी ही मांडणी आहे. या नव्या मांडणीत स्कॉलर-एडिटरला फारसा वाव नाही हे डॉ. टिकेकरांच्या लक्षात आलं असणारच. तरीही ते पत्रसृष्टीत येतात आणि वाचन-संस्कृती, नि:पक्ष, मुद्देसूद प्रतिपादन, संयम आणि फॅक्टस्‌चा आग्रह ही संशोधनक्षेत्रातली मूल्यं पत्रकारितेत रुजवतात. हे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. वर्तानपत्र हे वाचकांच्या उपयोगी पडलं पाहिजे हे ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून डॉ. टिकेकरांचं ब्रीद होतं. तसंच, त्यांनी विश्वासार्हतेला सर्वांत अधिक महत्त्व दिलं. वर्तानपत्रांचे वाचक नानाविध विचारांचे, मतांचे आणि भिन्न आवडनिवड जोपासणारे असतात. प्रत्येक वाचकाला सकस आणि दर्जेदार असं वाचायला मिळावं याकडे डॉ. टिकेकरांचं विशेष लक्ष असायचं. लोकरंग, रंग-तरंग, चतुरंग वगैरे पुरवण्यांधून चटकदार, रंजक आणि माहितीपूर्ण लेख येत असत. यासाठी डॉ. टिकेकरांनी मान्यवर लेखकांचं आणि तज्ज्ञांचं लेखनसाहाय्य मिळवलं. सार्वजनिक प्रश्नांवर ‘लोकसत्ता’ने अनेक कॅम्पेन्स केले. त्याचप्रमाणे विधायक कामांची आवर्जून नोंद घेतली. डॉ. टिकेकरांच्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत ‘लोकसत्ता’ला चळवळीचं स्वरूप आलं. सहासष्टाव्या वर्षी डॉ. टिकेकरांच्या डोक्यात अनेक संकल्पांचा खर्जभरणा सुरू आहे. द रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेतच. शिवाय, पानिपत, गांधीहत्या आणि शिवसेना या महाराष्ट्राच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर विश्लेषणपर लिहावं असं त्यांच्या मनात आहे.

शिवसेनेनं मराठी अस्मितेची चुकीची मांडणी केली. त्यामुळे मराठी समाज इंग्रजीपासून दूर झाला. परिणामी, वैचारिक क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट झाली, असं डॉ. टिकेकरांचं म्हणणं आहे. ‘‘एके काळी महाराष्ट्राची बायलिंग्वल परंपरा होती. ती शिवसेनेनं संपवली. न्या. रानडे, भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, डॉ. आंबेडकर यांनी मराठीप्रमाणेच इंग्रजीतही दर्जेदार लिखाण केलं. त्यामुळे वैचारिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा राहिला. आज मात्र तशी परिस्थिती नाही. ‘‘आज बंगाली विचारवंतांना देशपातळीवर आणि जगात मोठा मान मिळतो. याचं कारण बंगाली माणूस आपल्या मातृभाषेचा, संस्कृतीचा अभिमान धरतो, परंतु इंग्रजीचा दुस्वास करत नाही’’, हे डॉ. टिकेकरांचं मत कुणीही नाकारणार नाही. ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ अशी आजची एकूण परिस्थिती असली तरीही महाराष्ट्राचं कोंडलेलं क्षितिज लवकरच मोकळं होईल असा विश्वास डॉ. टिकेकर व्यक्त करतात. ‘‘राजकारण, समाजकारण किंवा मीडिया या क्षेत्रांत सध्या जे काही सुरू आहे ते तसं फार काळ चालणार नाही. हा धुरळा आस्ते आस्ते खाली बसेल आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा र्झीीश ींर्हेीसहीं कडे, कला-शास्त्र आणि ज्ञानाकडे वळेल. आणि व्यासंगाचं एक अभिजात पर्व पुन्हा सुरू होईल’’, असं त्यांना वाटतं. भूतकाळाचं ओझं वाहणाऱ्या महाराष्ट्राच्या दणकट खांद्यावर इतिहासाचं फुलपाखरू अल्लद बसावं हीच डॉ. टिकेकरांची इच्छा आहे. 

Tags: अरुण टिकेकर लेखक संपादक पत्रकार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके