डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अमेरिका आणि चीन यांच्यात 1972 मधील निक्सन यांच्या चीन भेटीमुळे चांगले संबंध प्रस्थापित झाले असले, तरी यासंबंधाचा आधार रशियाविरोध हाच होता. सुरक्षिततेसाठी माओ यांना अमेरिकेशी मैत्री हवी होती, तर शीत युध्दात रशियाला शह देण्यासाठी रशियाच्या दक्षिण सीमेवरील कम्युनिस्ट विचारधारा असणारा चीन हा अमेरिकेला मोठा ॲसेट वाटत असे. जेव्हा 1973 मध्ये किसिंजर चीन भेटीवर आले, तेव्हा अमेरिका व रशिया यांच्यासंबंधात थोडी जवळीक आणि काही बाबतींत सामंजस्य निर्माण झाले होते. अमेरिकेच्या जवळ जाण्याच्या विचाराने माओ हे अतिशय अस्वस्थ असत. याबाबतीत माओची मोठी तक्रार अमेरिकेशी सांमजस्याने वागणाऱ्या झाऊ. एन. लाय. यांच्या विरोधात होती. रशियाचे अध्यक्ष ब्रेझनेव्ह यांनी 1973 मध्ये अणवस्त्रबंदी करारासंबंधी अमेरिकेला भेट दिल्यानंतर तर माओ पराकोटीचे क्रुध्द झाले. चीनने अमेरिकेकडे यासंदर्भात औपचारिक तक्रार तर केलीच, परंतु चीनची सुरक्षासुध्दा धोक्यात आली असल्याचेही चीनने अमेरिकेला कळविले. 

जिआंझी येथील वास्तव्यात डेंग यांचे ‘भविष्यकाळात बीजिंगमध्ये सत्तेच्या केंद्रभागी कसे जाता येईल आणि माओंशी जुळवून घेऊन पुढील राजकीय वाटचाल कशी करता येईल,’ यासंबंधी चिंतन चालू असतानाच चीनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी होत होत्या. त्याबद्दल डेंग यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या माहिती मिळत असे. या घडामोडींचा चीनमधील पुढील वाटचालीशी, सांस्कृतिक क्रांतीशी आणि 1978 नंतर डेंग यांनी काही महत्त्वाची पावले उचलून अर्थव्यवस्थेला जी गती दिली, त्याच्याशी निकटचा संबंध होता. पहिले म्हणजे- रशिया व चीन यांच्यातील संबंधांत जो एक मोठा तणाव होता, तो आता शिगेला पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत रशियाचे वर्चस्व मोठे होते. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाच मुळी रशियाच्या आशीर्वादाने व प्रोत्साहनाने झाली होती. चीनमधील कुओमिंगटांग आणि कम्युनिस्ट यांच्यातील यादवी युध्दातही रशियाने कम्युनिस्ट पक्षाला मदत केली होती. 

पुढे 1950 च्या शतकात चीनने विज्ञान, तंत्रज्ञान व विकासविषयक बाबतीत रशियाचीच मदत घेतली होती. 1960 च्या दशकात रशियाने आपले वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली व चीनवरील दबाव वाढला. या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा डेंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरसचिव होते तेव्हाही चीन व रशियामधील संबंध ताणले गेले होते. या काळात चीनकडून रशियाला महत्त्वाची नऊ पत्रे पाठविण्यात आली होती. त्यात आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत चीनची स्वतंत्र भूमिका स्पष्ट करण्यात आली होती, तसेच रशियाच्या वर्चस्वाला विरोध दर्शविला गेला होता. परंतु 1968 पासून चीनला सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या उत्तर सीमेवर रशियाची भीती वाटायला लागली. दक्षिणेकडून व्हिएतनाम व उत्तरेकडून रशिया या दोन्ही बाजूने चीनला घेरले गेल्याची भावना होत होती. या दोन्ही सीमांवर सुरक्षितता कशी प्राप्त करायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 

पाश्चिमात्य देशांकडे पूर्णपणे पाठ फिरवून त्या देशांना आपले दरवाजे बंद केलेल्या चीनला आता अमेरिका व युरोपमधील पाश्चिमात्य देशांची गरज भासू लागली. माओंच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी 1966 मध्ये सुरू झालेल्या सांस्कृतिक क्रांतीने 1970 पर्यंत विपरीत वळण घेतले होते. झुंडशाहीचे राज्य सुरू झाल्याने सर्व प्रशासन ठप्प झाले व राज्यकारभाराच्या सर्व संस्था कोलमडून पडल्या होत्या. विद्यापीठे, शैक्षणिक संस्था अक्षरशः बंद पडल्या होत्या. विज्ञान-संशोधन संस्थाही बंद झाल्या होत्या. तरुणांना व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात पक्षसेवा करण्यासाठी पाठविण्यात आले. अनेक वरिष्ठ नेत्यांना विजनवासात पाठविले होते. बुध्दिमंतांना व विचारवंताना तर यापूर्वीच देशोधडीला लावले होते. समाजजीवन ठप्प झाले होते. त्याचे विपरीत परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर व प्रशासनावर दिसू लागले होते. आता हे कोठे तरी थांबले पाहिजे, असे माओंनाही वाटू लागले. या साऱ्यातून थोडी सुटका करून घेण्यासाठी तसेच रशियाच्या दबावाला शह देण्यासाठी अमेरिकेबरोबर व इतर पाश्चात्त्य देशांबरोबर संबंध सुधारावेत, असेही वाटू लागले. यासाठी माओंनी स्वतः एडगर स्नो या प्रभावशाली अमेरिकन पत्रकाराला चीनमध्ये खास पाचारण करून त्याच्यामार्फत अमेरिकन सरकारशी संपर्क करण्याची तयारी चालविली होती. चीन व कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध 1970 मध्ये सुरू झाले. युनोमध्ये चीनला 1971 मध्ये अधिकृत मान्यता देण्यात आली आणि तैवानऐवजी युनोच्या सुरक्षा परिषदेचा सभासद चीन झाला. तसेच इतर 11 देशांनीही चीनला अधिकृत मान्यता दिली. 

दुसऱ्या महायुध्दात होरपळलेल्या जपानने अमेरिकेचीच मदत घेऊन मोठी आर्थिक प्रगती साध्य केली, हे माओ पाहत होते. तैवान, हाँगकॉग व सिंगापूर या देशांमध्ये चिनी लोक बहुसंख्येने आहेत. या देशातल्या अर्थव्यवस्थाही वेगाने प्रगती करीत होत्या. याप्रमाणेच चीनलाही पाश्चात्त्य देशांच्या मदतीने मोठी आर्थिक प्रगती करणे शक्य आहे, असे सगळ्यांना जाणवू लागले. जगभरात टीव्हीचे आगमन होत असताना चीनमधील लोकांकडे रेडिओसुध्दा नव्हते. चीन व अमेरिका जर जवळ येत असतील तर त्यात चीनचा मोठा फायदा आहे, हे माओंसह साऱ्यांना समजत होते. अमेरिकेलाही शीत युध्दादरम्यान रशियाला त्याच्या सीमेवर शह देऊ शकेल व रशियावर दबाव निर्माण करू शकेल, अशा मित्र राष्ट्राची नितांत गरज होती. त्या दृष्टीने अमेरिकेनेही चीनशी संबंध सुधारता येतील का, याची चाचपणी सुरू केली होती. पाकिस्तानचे चीनशी व अमेरिकेशी जवळचे संबंध होते. पाकिस्तानमार्फत चीनशी संपर्क करून अमेरिकेने चीनशी मैत्रीचे नाते सुरू करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या वेळचे अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर 1971 मध्ये भारत व पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. पाकिस्तानमध्ये त्यांचा मुक्काम असताना ते ‘आजारी’ पडले आणि तेथे त्यांनी दीड दिवसाची ‘विश्रांती’ घेतली. प्रत्यक्षात मात्र त्या काळात त्यांनी पाकिस्तानमधून बीजिंगला गुप्तपणे प्रयाण केले.

तिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या पुढील वर्षात होणाऱ्या चीनभेटीची पूर्व तयारी म्हणून चिनी मुत्सद्दी व राजकारण्यांची भेट घेतली. काही दिवसांनी अमेरिकन सरकारने किसिंजर यांच्या चीनभेटीचे गुपित उघड करून जगाला मोठा धक्का दिला. ही घटना चीनसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण अमेरिकेबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधाने चीनला रशियापासून सुरक्षितता तर लाभलीच; शिवाय पुढे 1978 नंतर चीनला प्रगत आधुनिक तंत्रज्ञान, पाश्चिमात्य देशातील मोठ्या गुंतवणुकी, आर्थिक प्रगती अशा अनेक गोष्टींचा लाभ झाला. अमेरिकेबरोबर उत्तम संबंध चीनने ठेवले नसते, तर चीनला इतक्या सहजतेने प्रगतिपथावर जाता आले नसते. डेंग जिआंझी येथे असताना चीन व अमेरिका अशा रीतीने जवळ येत होते. याच काळात चीनमध्ये अंतर्गत राजकीय उलथापालथ होणारी दुसरी महत्त्वाची घटना घडली. 1950 व 1960 च्या दशकात माओ हे डेंग झिओपेंग व मार्शल बिआओ या दोघांना आपले संभाव्य वारसदार समजत. बिआओ हे सेनादलाचे प्रमुख होते. डेंग यांच्यापेक्षाही बिआओ हे माओंच्या अधिक नजीक असत. बिआओ व डेंग परस्परांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांच्यात चढाओढ होती. डेंग व इतर वरिष्ठ नेत्यांना 1966 नंतर विजनवासात पाठविल्यानंतर बिआओ हे माओंच्या आणखी नजीक आले. मात्र माओ यांचा स्वभाव अत्यंत संशयी होता. त्यामुळे त्यांना सातत्याने असुरक्षित वाटत असे. नजीकचे सारे नेते आपल्याला पदच्युत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांना तीव्रपणे वाटायचे. बिआओंची तब्येतही चांगली राहत नसे. त्यामुळे ते माओंच्या फार निकट जाण्याच्या कल्पनेनेच बिथरले होते. माओंनाही बिआओबद्दल फार भरवसा वाटत नव्हता. 

असुरक्षित माओंना 1971 मध्ये बिआओंनाच दूर करावयाचे होते आणि म्हणून त्यांनी बिआओ यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. आपली धडगत नाही, तेव्हा चीनमधून पलायन करावे, अशा निर्णयाप्रत आलेल्या बिआओ यांनी खास विमानाने मंगोलियाहून रशियामध्ये पलायन करण्याची तयारी केली. दुर्दैवाने मंगोलियामध्येच त्यांच्या विमानाला अपघात होऊन ते कोसळले; त्यात बिआओ आणि त्यांचे सारे सहप्रवासी ठार झाले. बिआओ यांच्या अपघाती मृत्यूची अनौपचारिक बातमी डेंग यांना ताबडतोब मिळाली. मात्र औपचारिक रीत्या त्याची दखल घेण्यास प्रशासनास दोन महिने लागले. बिआओ यांच्या मृत्यूनंतर डेंग यांच्या बीजिंगला परतण्याच्या आशा पुन्हा पालवल्या. डेंग यांनी माओंना स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाची विनंती करणारे एक खासगी पत्र पाठविले. मात्र या पत्राचे डेंग यांना उत्तर आले नाही. बिआओ हे माओ यांचे नुसते निकटवर्तीय नव्हते; त्यांच्याकडे माओंचे वारस म्हणून पाहिले जाई. बिआओ यांच्या अपघाती मृत्यूनंतर, होत असलेल्या तर्कवितर्कावर व त्यावरील चर्चेला कसे सामोरे जायचे, हा माओंपुढे प्रश्न होता. बिआओ यांचा अपघाती मृत्यू ही माओंच्या जीवनातील आणि चीनमधील राजकारणातील एक महत्त्वाची घटना होती. इतक्या जवळच्या नेत्याने चीनचा त्याग करून रशियाकडे पलायन करण्याचा प्रयत्न करावा, याचा विपरीत अर्थ घेतला जाईल, हे माओंनी ताडले. अशा परिस्थितीत बिआओंबद्दल काही तरी भूमिका घेणे त्यांना भाग होते. 

माओ यांना सांस्कृतिक क्रांतीचा फोलपणा 1972 मध्ये समजून आला होता आणि त्यांना आता तर सांस्कृतिक क्रांतीच मागे घ्यावयाची होती. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान झुंडशाही व अत्याचाराबरोबरच महत्त्वाच्या संस्थांची पडझड झाली होती. याची जबाबदारी स्वतःकडे न घेता बिआओंवर टाकली तर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असा विचार माओंनी केला. अशी संधी त्यांना दोन महिन्यातच मिळाली. नोव्हेंबर 1971 मध्ये सैन्यदलाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भात जी बैठक झाली, तीत बोलताना माओ यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर रेड गाडर्‌सकडून हल्ले करविण्याची कल्पना मुळात बिआओ यांचीच होती व त्याची फारशी कल्पना आपणास नव्हती, अशी भूमिका घेतली. जानेवारी 1972 मध्ये मार्शल चेन यी यांचे निधन झाले. ते 1945 मध्ये क्रांतीच्या ऐन धुमश्चक्रीत हुआई हुआ युध्दमोहिमेत डेंग यांचे सहकारी होते. ते शांघायचे पहिले मेयरही होते. त्यांच्यावरही रेड गाडर्‌सनी हल्ला केला होता. चेन यी यांच्या दफनविधीच्या वेळी माओ हजर होते. चेन यी यांना श्रध्दांजली वाहताना त्यांनी भाषणात सांस्कृतिक क्रांतीदरम्यानच्या साऱ्या झुंडशाहीला बिआओ यांना जबाबदार धरले. वस्तुस्थिती अर्थातच सगळ्यांना माहिती होती. 

चेन यीसारख्या वरिष्ठ पक्षनेत्यावर माओ यांच्या संमतीशिवाय रेड गाडर्‌स हल्ला करतील, हे शक्य नव्हते. एकंदरीत सांस्कृतिक क्रांतीचा शेवट करून अर्थव्यवस्था व प्रशासन सुधारले पाहिजे, हे माओंना पटले होते. मात्र तत्पूर्वी त्याची सर्व जबाबदारी त्यांनी बिआओवर टाकून हात झटकले. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान आपल्याशी मतभेद असणाऱ्या नेत्यांवर हल्ले करण्यासाठी, टीका करण्यासाठी माओंनी आपल्या पत्नीचा- जियांग शिंगचा खुबीने वापर करून घेतला होता. आता सांस्कृतिक क्रांतीचा शेवट करून अर्थव्यवस्था व राजकारण सुधारावयाचे होते. सांस्कृतिक क्रांतीत होरपळलेल्या वरिष्ठ नेत्यांना सन्मानपूर्वक बोलावून पार्टीत जागा देण्यासाठी जियांग शिंगचा उपयोग नव्हता. ती अत्यंत पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी होती. माओ तिचा उपयोग आपल्या विरोधकांवर टीका करण्यासाठी वा त्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यासाठी करीत असत. चांगल्या कामाकरता तिचा उपयोग नव्हता. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात जियांग शिंग आणि तिच्या सहकाऱ्यांनी झाऊ, डेंग व इतर वरिष्ठ नेत्यांना बराच त्रास दिला. 

अशा परिस्थितीत माओ आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याकडे- झाऊ एन लायकडे वळले. पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे वरिष्ठ नेते माओंचे जवळचे सहकारी होते. त्यापैकी बिआओ मृत्यू पावले होते, त्यांचे सहकारी चेन बोडा तुरुंगात होते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख कांग शेंग कॅन्सरने त्रस्त होते. म्हणजे पंतप्रधान झाऊ एन लाय हेच सांस्कृतिक क्रांतीनंतर लोकांमध्ये व वरिष्ठ नेत्यांमध्ये विेश्वास निर्माण करू शकत होते. झाऊ एन लाय यांनी या काळात बरीच खटपट करून अनेक वरिष्ठ नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला; परंतु बिआओ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची अवस्था पाहून तेही हवालदिल झाले होते. शिवाय संशयी व मानसिक दृष्ट्या असुरक्षित माओंच्या जवळ जाणेही धोकादायक होते. पुढे दुर्दैवाने झाऊ यांना 1972 मध्ये ब्लॅडरचा कॅन्सर झाला. तरीही सांस्कृतिक क्रांतीच्या पडझडीतूनही चीनने विकासाची कास धरून प्रगती करावी, अशा विचाराने ते शेवटपर्यंत काम करीत राहिले. अनेक वरिष्ठ नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणाऱ्या झाऊंबद्दल चीनमध्ये, विशेषतः वरिष्ठ नेत्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये व बुध्दिमंतांमध्ये- आदराची भावना होती. मात्र असे असले तरी झाऊ यांना माओंच्या कलाने काम करावे लागे. अशा रीतीने सांस्कृतिक क्रांतीच्या शेवटाकडे येत असताना डेंग यांच्या दृष्टीने वातावरण निवळत होते. मात्र सरकारमध्ये परत वरिष्ठ पदावर पोहोचण्यासाठी डेंग यांना 1973 पर्यंत वाट पाहावी लागली. 

माओंचे मत 1972 पासून डेंग यांच्याबद्दल अनुकूल होऊ लागले होते. प्रथम एप्रिल 1972 मध्ये जिआंझी येथील पक्ष कार्यालयाने डेंग यांचा लहान मुलगा झिफॉग याला जिआंझी येथील ‘कॉलेज ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश दिला, तर मुलगी रोंग डेंग हिला जिआंझी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर डेंग व त्यांची पत्नी झुओलिना यांचे जिआंझी येथे आल्यानंतर कमी केलेले पगार वाढवून पूर्वीइतके केले. जिआंझीमध्ये असणारे डेंग यांचे सहकारी चेन यी यांना बीजिंग येथे बोलावून घेण्यात आले. मात्र तरीही डेंग यांचा मूळ पदावर जाण्याचा रस्ता अद्यापही मोकळा नव्हता. मात्र डेंग यांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य यथावकाश मिळाले आणि 1972 च्या शेवटी ते बिजींगला रवाना झाले. एप्रिल 1973 मध्ये झाऊ एन लाय यांनी डेंग यांना माओंच्या परवानगीने त्यांच्या हाताखाली उपपंतप्रधान हे पद दिले व परराष्ट्र खात्याचे काम पाहण्यास सांगितले. जियांग शिंगने डेंग परत येऊ नये म्हणून प्रयत्न केले; परंतु तिला त्यात यश आले नाही. डेंग यांना पॉलिट ब्युरोच्या स्टँडिंग कमिटीचे सदस्य केले गेले नाही, परंतु महत्त्वाच्या विषयासंबंधात ते पॉलिट ब्युरो स्टँडिंग समितीच्या बैठकीत हजर राहत. त्याच वर्षांत ऑगस्टमध्ये दहाव्या पार्टी काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. त्याच्या केंद्रीय समितीत मात्र डेंग यांचा समावेश केला गेला. 

दहाव्या पार्टी काँग्रेसनंतर डिसेंबर 1973 मध्ये डेंग पॉलिट ब्युरो सदस्य झाले, तसेच अत्यंत महत्त्वाच्या अशा सेंट्रल मिलिटरी कमिशनचेही सदस्य झाले. माओंनी 1971 व 1972 या दोन वर्षांत हुआ गुओफेंग, वँग हाँगवेन आणि वू डे या तीन तरुण व होतकरू नेत्यांना पक्षात महत्त्वाची पदे दिली. कष्टकरी, कामगारवर्गातून आलेले, कमालीचा आत्मविश्वा स असलेले आणि पक्ष व माओ यांच्यावर वैयक्तिक निष्ठा असलेले वँग हाँगवेन हे माओंना प्रिय होते. हाँगवेन यांना पुरेसा अनुभव नव्हता, मात्र जाज्वल्य पक्षनिष्ठा व माओनिष्ठा यामुळे त्यांच्याकडे माओंचे महत्त्वाचे वारसदार म्हणून पाहिले जाऊ लागले. पुढे माओ जसजसे अधिकाधिक विकलांग होत गेले तसतसे इतिहासातील स्वतःचे स्थान कसे असेल, याविषयीच्या चिंतेने त्यांना ग्रासून टाकले. कम्युनिस्ट चीनच्या पुनर्बांधणीत- विशेषतः ग्रेट लीप फॉरवर्ड व सांस्कृतिक क्रांतीदरम्यान- मोठ्या प्रमाणावर झालेली मनुष्यहानी व लोकांची झालेली वाताहत यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये, अशी माओंची इच्छा होती. 

झाऊ हे माओंचे सारे काही ऐकत, तरीही माओ संशयी होते. झाऊसारख्या तुलनेने सुसंस्कृत, सभ्य व मुत्सद्दी नेत्याकडे सत्ता गेल्यानंतर इतिहासात आपली नोंद कशी होईल, याविषयी चिंता त्यांना लागून राहिली होती. ऑगस्ट 1973 मध्ये दहावी पार्टी काँग्रेस झाली. ती माओ यांची शेवटची पार्टी काँग्रेस होती. त्यात प्रामुख्याने तीन विषय होते. बिआओ यांची निभर्त्सना व त्यांनी केलेले नुकसान हा अर्थातच प्रमुख मुद्दा होता. 

बिआओ यांच्या मृत्यूनंतर प्रशासन व पक्षात केले गेलेले बदल- विशेषतः सांस्कृतिक क्रांतीदरम्यान ज्या वरिष्ठ नेत्यांना पदच्युत केले होते व ज्यांना रेडगाडर्‌सनी देशोधडीला लावले, त्यांतील अनेकांचे पुनर्वसन करणे- हा  दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता. तिसरा मुद्दा 1973 पासून सुरू होणाऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा होता. बिआओ यांच्या काळात केंद्रीय समितीत आलेल्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांना आता घरी पाठविण्यात आले आणि त्याऐवजी पदच्युत केलेल्या जुन्या नेत्यांना परत आणले गेले. नव्या सेंट्रल कमिटीच्या 191 सदस्यांपैकी 40 सदस्य हे पुनवर्सन केलेले जुने वरिष्ठ नेते होते. हे पुनर्वसन पाहता, माओंनी आता सांस्कृतिक क्रांती संपवून राष्ट्रउभारणीच्या कामास प्राधान्य देण्याचे ठरविले होते, असे दिसते. मात्र हाँगवेनसारख्या अननुभवी व्यक्तींना पार्टीचे उपमुख्य पद देऊ केल्यामुळे अनेक वरिष्ठ नेते नाराज होते. अमेरिका आणि चीन यांच्यात 1972 मधील निक्सन यांच्या चीन भेटीमुळे चांगले संबंध प्रस्थापित झाले असले, तरी यासंबंधाचा आधार रशियाविरोध हाच होता. सुरक्षिततेसाठी माओ यांना अमेरिकेशी मैत्री हवी होती, तर शीत युध्दात रशियाला शह देण्यासाठी रशियाच्या दक्षिण  सीमेवरील कम्युनिस्ट विचारधारा असणारा चीन हा अमेरिकेला मोठा ॲसेट वाटत असे. 

जेव्हा 1973 मध्ये किसिंजर चीन भेटीवर आले, तेव्हा अमेरिका व रशिया यांच्यासंबंधात थोडी जवळीक आणि काही बाबतींत सामंजस्य निर्माण झाले होते. अमेरिकेच्या जवळ जाण्याच्या विचाराने माओ हे अतिशय अस्वस्थ असत. याबाबतीत माओची मोठी तक्रार अमेरिकेशी सांमजस्याने वागणाऱ्या झाऊ एन लाय यांच्याविरोधात होती. रशियाचे अध्यक्ष ब्रेझनेव्ह यांनी 1973 मध्ये अणवस्त्र बंदी करारासंबंधी अमेरिकेला भेट दिल्यानंतर तर माओ पराकोटीचे क्रुध्द झाले. चीनने अमेरिकेकडे यासंदर्भात औपचारिक तक्रार तर केलीच, परंतु चीनची सुरक्षासुध्दा धोक्यात आली असल्याचेही चीनने अमेरिकेला कळविले. चीन-अमेरिकेतील संबंध 1976 पर्यंत सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षा होती. मात्र 1973 मध्येही अमेरिका तैवानशी उत्तम संबंध ठेवून आहे, तसेच तैवानला संरक्षणसामग्री पुरविण्याचा करार झालेला आहे, ही बाबही माओंच्या पचनी पडणे शक्य नव्हते. किसिंजर 1973 मध्ये चीनला परत आले, तेव्हा झाऊ यांचे अधिकार फार कमी झालेले त्यांना आढळले. झाऊ यांच्यावर ते कन्फ्युशियन (फारच सौम्य) आहेत, असाही आरोप होत होता. चीन परंपरेतील कन्फ्युशियसचे तत्त्वज्ञान हे समाजात सुसंवाद निर्माण करणारे असल्याने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारानुसार कन्फ्युशियन तत्त्वज्ञान हे फारच सौम्य, स्थितिवादी आणि क्रांतिविरोधी समजले जात असे. तैवानशी अमेरिकेने चांगले संबंध ठेवणे याचा अर्थच जगात दोन चीन अस्तित्वात आहेत, असे म्हणण्यासारखे होते.

बीजिंगमध्ये कम्युनिस्टांची क्रांतिकारी राजवट 1949 मध्ये स्थापन होत असतानाच कुओमिंगटांगच्या नेत्यांनी तैवानमध्ये चिनी प्रजासत्ताक स्थापन केले. तेव्हापासून तैवान हा अतिशय संवेदनशील मुद्दा झाला होता. चीनच्या दृष्टीने ते अवमानकारक होते. झाऊ एन लाय व किसिंजर यांच्या चर्चेत चीनने अमेरिकेबरोबर करार करावा, हा मुद्दा येताच झाऊ यांच्या सौम्यपणावर माओ इतके भडकले की, त्यानंतर त्यांच्या विरोधात पक्षातील जहालांनी हल्ले व जहरी टीका सुरू केली. जियांग शिंग हिने संधी न दवडता झाऊंवरील हल्ल्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यापूर्वी जेव्हा सोव्हिएत युनियनविरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न आला, तेव्हा डेंग हे खंबीर भूमिका घेत असत. नोव्हेंबर-डिसेंबर 1973 मध्ये किसिंजर यांची पाठ वळताच पॉलिट ब्युरोमध्ये झाऊ यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आणि याला माओ व त्यांची पत्नी दोघेही प्रोत्साहन देत होते. इतकेच नव्हे, तर पुढे जाऊन डेंग यांनाही पॉलिट ब्युरोत झाऊ यांच्यावर टीका करण्यास सांगण्यात आले. फ्रान्समध्ये 1921-24 च्या कालावधीत तसेच शांघायमध्ये आणि नंतर 1950 च्या दशकात सुरुवातीला झाऊ व डेंग यांनी बराच काळ एकत्र काम केले होते. 1931 पासूनच्या दशकात डेंग हे माओच्या जवळ होते. 1971 मध्ये झाऊ यांनी डेंग यांच्या पुनर्वसनात त्यांना मदत केली असली, तरी हे पुनर्वसन डेंग व माओ यांच्यातील मूळच्या निकटच्या संबंधांवर आधारित होते. झाऊ यांच्यावर पॉलिट ब्युरोमध्ये टीका करणे, याचा अर्थ माओ यांचा विश्वा स संपादन करणे, हे डेंग जाणून होते. त्यामुळे त्यांच्या सत्तेचा मार्ग सोपा होणार होता. त्यामुळे फारसा विधिनिषेध न बाळगता त्यांनी झाऊंवर टीका केली. अपेक्षेप्रमाणे माओ खूष झाले आणि त्यानंतर डेंग यांना पॉलिट ब्युरोचे व सीएमसीचे सदस्य करण्यात आले. डेंग यांचे अशा रीतीने सत्ताकेंद्री पूर्णपणे पुनर्वसन झाले. 

संयुक्त राष्ट्रसंघात चीनतर्फे भाषण करण्यासाठी 1974 मध्ये झाऊ जाणार होते. त्याऐवजी अर्थातच डेंग गेले. दि.1 जून 1974 रोजी झाऊ कर्करोगावरील शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल झाले आणि त्यानंतर परराष्ट्र व्यवहार खाते पूर्णतः डेंग यांच्याकडे आले. झाऊ हे अतिशय सुसंस्कृत नेते होते. सांस्कृतिक क्रांतीत पोळलेल्या अनेकांचे त्यांनी जोखीम घेऊन पुनर्वसन केले होते. डेंग यांनाही झाऊ यांनी अनेकदा मदत केली होती. अनेक बाबतींत ते डेंगचे गुरू व वरिष्ठ सहकारी होते. डेंग यांचे राजकीय पुनर्वसन होताच त्यांनी उलटून झाऊ यांच्यावरच माओंच्या सांगण्यावरून हल्ले चढवावेत, हे क्लेशदायक होते. ही घटनाच त्या वेळची चीनमधील परिस्थिती, माओंची कार्यपध्दती व वरिष्ठ नेत्यांची हतबलता यावर बराच प्रकाश टाकते. 

Tags: चिनी महासत्तेचा उदय अमेरिकेशी जवळीक mao china and america weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात