डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कल्याणकारी राज्याचे फायदे सर्वांना मिळावेत व मानवजातीचे अधःपतन टाळावे यासाठी नवी मांडणी करण्याची निकड विचारवंतांना वाटू लागली आहे. चांगला समाज निर्माण करण्यासाठी 'माणूस' बदलणे हाच सगळ्यांत महत्त्वाचा पर्याय वाटतो, अशी मांडणी करणारा सुप्रसिद्ध विचारवंत अम्लान दत्त यांचा हा लेख.

सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबतींत लवकरात लवकर नव्याने मांडणी करण्याची निकड विचारवंतांना वाटू लागली असल्याचे जाणवू लागले आहे. याची दोन कारणे संभवतात. पहिले कारण म्हणजे कल्याणकारी राज्याचे फायदे सर्वांना मिळावेत व दुसरे म्हणजे मानवजातीचे अधःपतन टळावे. दुसऱ्या कारणातील मानवाबद्दलचा निराशाजनक विचार काहींना आवडणार नाही, काहींना दुसरे कारणच वास्तववादी वाटेल. कोणत्याही उपायाने जग वाचणार नाही अशी त्यांची खात्री झाली आहे. पण या टोकाच्या निराशावादामुळे विधायक विचार करण्याची शक्तीच संपते. टोकाच्या आशावादाचाही हाच परिणाम होतो. समाजाच्या मूलभूत तत्त्वावर विचार करण्याची वेळ हीच आहे. 

प्राचीन काळापासूनची मांडणी 

नैतिक मूल्ये एका बाजूला व दुसऱ्या बाजूला राजकारण व अर्थकारण, याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध तत्त्ववेत्त्यांची, विचारवंतांची मांडणी व सामाजिक परंपरांमधून आलेली मांडणी या दोन्हीमध्ये सहज लक्षात येण्याइतकी विसंगती भरलेली आहे. कोणत्याही मांडणीत संदिग्धता हेच वैशिष्ट्य आहे. युरोपमध्ये आधुनिक जगाची सुरुवात झाली तेव्हा मॅकिएव्हिलीने, 'समंजस राज्यकर्त्याने स्वतःच्या स्वार्थाच्या विरुद्ध गोष्टींवर विश्वास ठेवू नये' असे लिहून ठेवले आहे. पण हा विचार नवा नाही. यापूर्वी कौटिल्याने हाच विचार मांडला आहे. वास्तविक दोघांची मांडणी त्यांच्या वेळेच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात होती. सामाजिक, विशेषतः धार्मिक परंपरेच्या विरोधात होती. धर्माच्या अधीन राहून संपत्ती व मनःशांती मिळवावी, शिवाय सत्याचा आधार असावा व जीवनाचे साध्य आत्मशांती व मुक्ती आहे असे भारतात सांगितले जाते. शेजाऱ्यावर व शत्रूवर प्रेम करा असे ख्रिश्चन धर्म सांगतो, तर मॅकिएव्हेलीने जी राजाची कर्तव्ये दिली आहेत त्यांचा ख्रिश्चन धर्माशी काडीचाही संबंध दिसून येत नाही. मॅकिएव्हिली व इतर विचारवंतांनी केलेली राजकीय तत्त्वज्ञानाची मांडणी नैतिक मूल्ये व धर्मापासून फारकत घेणारी आहे.

आधुनिक आर्थिक मांडणी

राजकीय क्षेत्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती आर्थिक क्षेत्रात झाली. आर्थिक क्षेत्रात अॅडम स्मिथला आधुनिक आर्थिक मांडणीचे जनकत्व दिले जाते. स्मिथ व त्याच्यानंतरचे जे प्रसिद्ध आर्थिक विचारवंत झाले त्या सर्वांची मांडणी नैतिक मूल्यांकडे झुकणारी होती. स्मिथने आपल्या लेखात सहानुभूती हा मानवी स्वभावाचा महत्त्वाचा घटक मानला आहे. मिलने समाजवादाची मांडणी केली. पण त्याचा भर आर्थिकऐवजी नैतिक व सांस्कृतिक मूल्यांवर होता. केंब्रिजच्या परंपरेतील आल्फ्रेड मार्शल यांची मांडणी स्पष्टपणे नैतिकतेला धरून होती. अशी खूप नावे सांगता येतील. हे जरी असले तरी आर्थिक क्षेत्रातील पारंपरिक प्रवाहाची वाटचाल विरुद्ध दिशेने चालू होती. बेंथाम (1748-1832) यांनी आपला ‘उपयुक्ततावादा’चा इकॉनॉमिक मॅन (Utilitarianism) सिद्धान्त मांडला व सर्व अर्थशास्त्राला या मांडणीने भारून टाकले.

आत्मकेन्द्री, बुद्धिनिष्ठ, सुखाच्या मागे धावणारा माणूस म्हणजे इकॉनॉमिक मॅन असे चित्र रंगविले जाऊ लागले. आर्थिक धोरणे ठरविताना हाच विचार डोळ्यांपुढे ठेवून धोरणे ठरविली जाऊ लागली. व्यक्ती आपले आर्थिक धोरण ठरवताना, उद्योग-व्यवसाय करताना फक्त स्वतःचा स्वार्थ पाहू लागली. इतरांचे काहीही होवो अशी मांडणी होऊ लागली. व्यक्तिअंतर्गत उपयुक्ततेची तुलना करण्याची कल्पना आर्थिक विचारवंतांनी फेटाळून लावली.

व्यक्तिअंतर्गत उपयुक्ततेची तुलना टाळण्याची जी भूमिका घेतली गेली त्याची दोन कारणे संभवतात. प्रत्येक माणसाची आवडनिवड, संवेदनशीलता व सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात आणि म्हणून अशी तुलना करण्यासाठी आधार नाही, असे एक कारण दिले जाते. दुसरे कारण असे दिले जाते की, जे जास्त वास्तववादी आहे. ते म्हणजे, उपयुक्तता वापरावर अवलंबून आहे. उपयुक्ततेची काही एक मर्यादा ठरलेली असते. या मर्यादेपलीकडे थोडा जरी वापर जास्त झाला तरी त्याची उपयुक्तता कमी होत जाते.

सार्वजनिक धोरण ठरविण्यावर याचा फार मोठा प्रभाव पडला आहे. गरीब माणसाच्या उत्पन्नात थोडी जरी अधिक भर पडली तर त्या वस्तूची उपयुक्तता वाढते; पण अशी थोडी वाढ श्रीमंतांच्या उत्पन्नात झाली तर उपयुक्ततेवर त्याचा काही परिणाम होत नाही हे यात गृहीत धरले आहे. व्यक्तिअंतर्गत उपयुक्ततेची तुलना केली तर गरिबांच्या बाजूने उत्पन्नाचे आमूलाग्र फेरवाटप उपयुक्ततेच्या आधारावर करणे योग्य ठरते. पण उत्पन्नाच्या विषम वाटपामुळे बचत वाढते व उत्पादनाला प्रोत्साहन मिळते असे विरुद्ध बाजूने प्रतिपादिले जाऊ लागले. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न आधुनिक विचारवंतांनी थोडा आर्थिक व थोडा मानवी आधार घेऊन केला.

ठरावीक मर्यादेपर्यंत शैक्षणिक सुविधा व आरोग्य संरक्षण याची तरतूद केली. यामुळे उत्पादन वाढेल व आर्थिक प्रगती होईल. तसेच याचा फायदा औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांना व अविकसित देशांना होईल असे कारण दिले गेले. ही मांडणी होऊनही काही त्रुटी राहिल्याच. सुरक्षित जीवन व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी यापेक्षा आणखी जास्त विधायक विचारसरणीची गरज भासू लागली. म्हणून सध्याच्या जगात ज्या आर्थिक विचारसरणीने जगाला प्रभावीत केले त्याची फेरतपासणी करण्याची वेळ आली आहे. बुद्धिनिष्ठ, स्वयंकेन्द्रित व सुखाच्या मागे धावणारा असा आजचा माणूस आहे. सुखोपभोगी, चंगळवादी आयुष्य जगण्याच्या कल्पनेने सध्याच्या जगाला ग्रासलेले आहे.

अगदी उच्च वर्गापासून तळातल्या सामान्य माणसापर्यंत माणसाच्या या प्रवृत्तीबद्दल 100 वर्षांपूर्वी आल्फ्रेड मार्शल या विचारवंताने लिहून ठेवले आहे, ‘‘वरच्या समाजात श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची जी वृत्ती आहे त्याचा प्रभाव इंग्लंडमधील कारागीर वर्गावरही जाणवू लागला आहे.’’ या वृत्तीचा मार्शलने निषेध केला आहे. सुखाच्या मागे किती धावावयाचे याची काहीएक मर्यादा आहे. प्रत्येक जण असे वागू लागला तर त्याचा एकूण परिणाम समाजाला घातक होईल. पण असा माणूस (बुद्धिनिष्ठ, स्वयंकेन्द्रित, सुखासीन) हा समाजातील प्रातिनिधिक माणूस म्हणता येणार नाही. म्हणून याच्या पलीकडे जाऊन विचार करणे शहाणपणाचे ठरेल.

विनाशाकडे वाटचाल

आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले लक्ष असले पाहिजे. राष्ट्रीयत्व व औद्योगीकरण हे आधुनिक राष्ट्राचे सूत्र बनले आहे. बऱ्याच देशांत सत्तेचे केन्द्रीकरण, लष्करीकरण व आधुनिक तंत्रज्ञान यांची एकत्रित वाढ होत आहे. याचे वाईट परिणाम जाणवू लागले आहेत. हे काही अपघाताने घडलेले नाही. लष्कर सुसज्ज करण्यासाठी शास्त्रीय संशोधन राबवले जात आहे. 'स्वसंरक्षणार्थ' असे गोंडस नाव याला दिले गेले. संरक्षण व सुरक्षिततेच्या नावाखाली प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्या मागे धावत आहे व यामुळे कोणाच्या मनात असो वा नसो, सर्व जगाची विनाशाकडे वाटचाल चालू आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून नवीन आर्थिक विचारांचा वेध घेतला पाहिजे. एका बाजूला भांडवलशाही तर दुसऱ्या बाजूला सरकारने जास्तीतजास्त व्यापलेले औद्योगिक क्षेत्र. या दोन विचारधारांपैकी एक स्वीकारणे भाग पडत होते, ही जुनी विचारसरणी झाली. नवीन आर्थिक धोरण या दोन्हींच्या आधारावर असता कामा नये याची जाणीव ठेवली पाहिजे. सत्तेच्या विकेन्द्रीकरणाबाबत हल्ली लोक सतत बोलत असतात, पण जुन्या आर्थिक विचारधारांमुळे ही कल्पनाही संकुचित झाली आहे. 

पंचायत राज 

बहुसंख्य जनता खेड्यात राहते ही भारतामधील वस्तुस्थिती आहे. पंचायतींना अधिकार बहाल करणे हा सत्ता विकेन्द्रीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण येथेसुद्धा महत्त्वाचे राजकीय पक्ष, राज्याची नोकरशाही यांमधून पंचायतीवर नियंत्रण केले जाते. यातून सुटका होत नाही. यामुळे ज्या प्रमाणात पंचायतीने सत्ता स्वतंत्रपणे राबवावी अशी कल्पना होती ती फलद्रूप होत नाही. याशिवाय खेड्‌यांतील वरच्या वर्गाची हुकूमशाही, जुन्यापुराण्या अंधश्रद्धा, परंपरा, चालीरीती या सर्वांचा लोकशाही रुजविण्यात अडथळा येतो. वास्तविक खेड्यांतच विकासकामांची क्षेत्रे आहेत. ही करण्यासाठी खेड्यातील सर्वांचे सहकार्य घेण्याची जरुरी आहे. खेड्यांतील जनतेकडे असलेल्या कारागिरीचा उपयोग करून घेतला पाहिजे. नव्या समाजाचे चित्र त्यांच्यापुढे उभे करून त्यांना उद्युक्त केले पाहिजे. 

परिवर्तनाचे स्पष्ट चित्र 

यासाठी अर्थातच शिक्षणाला अग्रक्रम हवा. लोकसंख्या इतकी, प्रांत एवढा. यात शिक्षित-अशिक्षित, साक्षर-निरक्षर प्रमाण हे ठोकताळे सोडून दिले पाहिजेत. समाज परिवर्तनाचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे ठेवून शिक्षणक्रम आखला पाहिजे. स्थानिक गरजा व स्थानिक परिसर यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम पाहिजेत. शिक्षणक्रमात एकसूत्रता असावी म्हणून प्रांताच्या पातळीवर नेमलेला अभ्यासक्रम स्थानिक गरजा भागवू शकत नाही. राजकीय अर्थकारण ही स्थानिक गरज भागवू शकेल का, तसेच नवीन समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण उपयोगी पडेल का, हे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत. सत्तेचे विकेन्द्रीकरण प्रभावी करावयाचे असेल तर आणखी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

देशात शांतता असणे ही महत्त्वाची गरज आहे. शांततेसाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा अचूक वापर. औद्योगीकरण तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. पण तंत्रज्ञानाचा प्रभाव समाजावर असतो. फक्त सामाजिक संस्था बदलून हा प्रभाव कमी होणार नाही. मार्क्सपेक्षा एंजल्सने हे ओळखले होते, म्हणून त्याने लिहून ठेवले, 'माणसाने जरी आपल्या हुशारीने निसर्गास शरण आणले असले तरी निसर्ग दुसऱ्या बाजूने त्याचा सूड घेत असतो.' म्हणून स्वतंत्र व शांततापूर्ण समाज पाहिजे असेल तर तंत्रज्ञानाच्या वापरात बदल करणे योग्य होणार आहे. वास्तविक ही गोष्ट मानवाच्या आवाक्याबाहेर नाही. चांगला समाज निर्माण करण्यासाठी 'माणूस बदलणे’ एवढाच पर्याय आपल्या हातात आहे. त्याचा वापर करण्यावर मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे.

('स्टेट्समन'वरून रूपांतरीत - रूपांतर : श्री. कृ. रा. लंके)

Tags: परिवर्तन विनाशाकडे वाटचाल रचना नवे सुरक्षित जग वैचारिक change path to destruction construction new safty world idiological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके