डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्राचं आणि संगीताचे नातं अतूट आहे. येथे अभिजात संगीताची उज्ज्वल परंपरा आहे. गेल्या दशकात ज्या कलावंतांनी ही परंपरा समृद्ध केली त्यांची ही रसीली ओळख.

महाराष्ट्राचं आणि संगीताचं नातं अतूट आहे. चालुक्यांच्या आणि देवगिरीच्या यादवांच्या काळापासून महाराष्ट्रात संगीत आहे. गोपाल नायक हा गायक यादवांच्या दरबारात होता. अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर दिल्लीला जी लूट नेली त्यात गोपाल नायकाला नेलं, अशी कथा आहे. बाराव्या शतकापासून ते विसाव्यापर्यंत महाराष्ट्राच्या कलात्मक जीवनात अभिजात संगीताला महत्त्वाचं स्थान लाभलेले आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी नाट्यसंगीताने अभिजात संगीताला उठाव दिला नाटयसंगीताने महाराष्ट्रात अभिजात संगीत रुजवलं, पण या प्रक्रियेत मूळ ख्यालाच्या स्वरूपाला धक्का लागला, हे अमान्य करण्यात अर्थ नाही.

काही दिवसांपूर्वी इंग्रजीतून गाण्यावर समीक्षण करणारे माझे ज्येष्ठ मित्र मला खिन्नपणे म्हणाले, आपल्याकडे झालेला गाण्याचा विकास हा हॉरीझॉन्टल (आडवा ) आहे आणि व्हर्टिकल (उभा) नाही.' या त्यांच्या उद्गारांवर मी बराच काळ विचार करत होतो. त्यांच्या विधानात एक प्रकारचा सिनिसिझम् असला तरी तथ्यांशही होता. गाण्याच्या प्रसाराबरोबरच त्याचा दर्जाही टिकला पाहिजे, एवढंच नव्हे तर सुधारलाही पाहिजे. पण शेवटी चांगले गाणं म्हणजे तरी त्याचे निकष कोणते?

कोणत्याही संगीताचे मूळ घटक तीन असतात. सूर, लय आणि शब्द. याचीच रूप म्हणजे राग, ठेका आणि कविता. या तीन घटकांच्या मीलनातून ख्याल गायकी निर्माण झाली. 'बोल आलाप' या माध्यमावाटे विशिष्ट रागातली बंदिश मांडणं आणि ती खुलवणं हे मूळ खयालाचं उद्दिष्ट होतं. हे करताना आवाजाचे विविध लगाव वापरून स्वरमय शब्दकृती तयार करणं हे गाणाऱ्याचं ध्येय असलं पाहिजे. हे आवाज वळवण्याचे प्रकार म्हणजे मींड, गमक, आंदोलन, पटल, खटका, झमझमा वगैरे. इतकी सर्वागसुंदर आणि परिपूर्ण गायकी सादर करू शकणारा कलाकार विरळाच. या लेखात महाराष्ट्रातल्या गेल्या दहा-पंधरा वर्षांतल्या मी ऐकलेल्या कलाकारांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यातले सर्व कलाकार आपापल्या कलेशी प्रामाणिक आहेत. मेहनती आहेत. परंतु एखाद्या गायिकेचा अपवाद वगळता संगीताच्या वरील तिन्ही घटकांचा संपूर्ण विचार करून गायकी मांडणारा गायक किंवा संगीतकार आज दृष्टिपथात येत नाही! या घटकांपैकी राग किंवा ठेका या घटकांना प्रमाणाबाहेर महत्त्व देऊन, मुख्यतः ‘आकारावाटे’ स्वरविस्तार करून 'बंदिश’ न मांडता 'राग' मांडण्याकडे बव्हंशी गायकांचा कल असतो. त्यामुळे बोलाच्या अंगाची ऊमज ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे.

ही चौकट माझ्या डोळ्यांपुढे आहे. वरील तीन घटकांपैकी एक अथवा दोन घटकांद्वारे आपली कला सादर करणाऱ्या महाराष्ट्रातल्या गेल्या दहापंधरा वर्षांतल्या काही प्रमुख संगीतकारांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

पद्मा तळवलकर आणि श्रुती सडोलीकर या नव्या जमान्यातल्या प्रमुख गायिका आहेत. पद्मा तळवलकर सुरुवातीला मोगूबाईंकडे शिकल्या. त्यानंतर गजाननबुवा जोशींकडे त्यांची तालीम चालू आहे. जयपूर गायकीची पेचदार तानक्रिया त्यांच्या गळ्यात चांगलीच बसली आहे. त्यांचे गाणं पुष्कळसं आक्रमक आहे. जोडीला सुरेलपणा आहेच. त्यामुळे ते चटकन प्रभाव पाडतं. लयकारी हेही त्यांच्या गाण्याचं प्रमुख आकर्षण ठरावं, पद्मा तळवलकरांच्या गाण्यात जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्यांचा संगम आहे' असं काही समीक्षकांचं मत आहे. मला ते मान्य नाही. प्रामुख्याने जयपूर शैलीने त्या गातात. ग्वाल्हेरच्या सर्वज्ञात बंदिशी मात्र त्यांना गजाननबुवांकडून मिळालेल्या आहेत. श्रुती सडोलीकर आपल्या वडिलांकडून शिकली आहे. वामनराव सडोलीकरांना अल्लादियाखाँसाहेबांकडून विद्या मिळाली आहे. श्रुतीच्या आवाज लहान मुलीसारखा अल्लड आणि काहीसा अशक्य आहे. व्यक्तिमत्त्व मोहक आहे. तालाचे खंड दाखवत, लयीचे आघात दाखवत एक तानक्रियेतून आणि अलंकारिक पालट्यांवाटे अनवट राग मांडणं ही जयपूरची वैशिष्ट्य श्रुतीच्या गाण्यात ठळकपणे दिसतात.

अलीकडे वीणा सहस्रबुद्धे ही पुण्याची गायिका नावारूपाला आली आहे. 1985 साली मुंबईच्या एन्. सी. पी. ए. या संस्थात त्यांची सायंकालीन मैफल झाली. या मैफलीवर मुंबईतल्या प्रमुख दैनिकांतून उत्तम अभिप्राय आले. त्यानंतर वीणा सहस्रबुद्धे यांच्या सर्व कार्यक्रमांना अपार गर्दी लोटू लागली. ऱ्हिदम हाऊसने त्यांच्या दोन कॅसेट काढल्या. वीणा सहस्रबुद्धे यांच्या गायकीची वैशिष्ट्य कोणती? त्यांचे गुरू कोण? या प्रश्नांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे पलूस्करी ग्वाल्हेर परंपरेतल्या त्या सर्वांत चमकदार कलावंत आहेत. त्यांचे वडील शंकरराव बोडस हे विष्णु दिगंबरांचे शिष्य होते. त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव काशिनाथपंत बोडस यांना शिकवून तयार केली. वीणा आपल्या वडीलांकडून तसंच आपल्या बंधूंकडून शिकलेली आहे. बळवंतराय भट्ट यांच्याकडेही तिची तालीम झाली आहे.

पलूस्करी गाण्यात एक प्रकारचा गोडवा असतो तो वीणाच्या गाण्यात दिसतो. तिच्या आवाजात स्त्री-सुलभ सौंदर्य आहे. व्यक्तिमत्त्वात सोज्वळपणा आहे. आपल्याकडे मान खाली घालून तोडावरची रेष न हलवता गाणाऱ्या गायिकांची पिढी होऊन गेली. ‘पायाच्या अंगठ्याने जमीन कोरणाऱ्या’ नायिकेच्या प्रतिमेशी गायिकेच हे रूप जुळणारं होतं. वीणाच्या बाबतीत जरा वेगळं घडतं. गाताना हावभाव आणि हातवारे करायला न भिणारी आणि आपल्या गाण्याचा आनंद मुक्तपणे उधळणारी गायिका या स्वरूपात वीणा श्रोत्यांसमोर येते आणि तिचं हे दर्शन श्रोत्याला भावतं. नैसर्गिक प्रवाहीपणा हा गायकाचा एक मोठा गुण असू शकतो. वीणाच्या गाण्यात तो स्पष्टपणे पुढे येतो. गेली दोन वर्ष मी या गायिकेचे कार्यक्रम ऐकतोय. तिच्या तानेची तयारी उत्तरोत्तर सुधारू लागली आहे हे दिसून येत. वेगवान अवरोही तान घेण्यात ती पटाईत आहे. तयारीच्या बाबतीत ती पुढे जात असली तरी संकल्पनात्मक बाबतीत विकास होत असल्याची लक्षणं मात्र फारशी दिसत नाहीत.

अश्विनी भिडे ही गायिका गेल्या तीनचार वर्षांत चमकू लागली आहे. किशोरी आमोणकर यांच्या शिष्या माणिक भिडे यांची अश्विनी ही मुलगी. आपल्या आईकडून तिने विद्याग्रहण केले आहे. किशोरी आमोणकरांच्या भाववादी शैलीचा मोठा प्रभाव अश्विनीच्या गाण्यावर दिसतो. 'जयपूर गायकीची शिस्त, तिबी चुस्त चौकट, रेखीवपणा आणि दीलदारपणा किशोरीने सोडून दिला, तिने जयपूर गायकीची पकड पुष्कळ ढिली केली असं संगीतशास्त्र वामनराव देशपांडे यांनी म्हटले आहे. जयपूरची लय आणि किराण्याची स्वर- प्रधानता अशी सांगड किशोरी आमोणकरांच्या शैलीत दिसते. अश्विनी भिडेवर हा संस्कार असल्याचे दिसून येतं. आपली स्वतंत्र सांगीतिक पहचान बनवण्याच्या प्रयत्नात ही गायिका कदाचित असेल. परंतु आज मात्र तीच गाणं पूर्णपणे 'किशोरी' घराण्याचं’ वाटत.

आरती अंकलीकर ही आणखी एक लोकप्रिय तरुण कलाकार, अत्यंत लहान वयात ती पुढे आली. हसरा चेहरा, मनस्वीपणा आणि मधुर आवाज हे तीचे प्रमुख गुण आहेत. तिच्याही गाण्यावर किशोरीबाईचा जबरदस्त पगडा आहे, पं. वसंतराव कुलकर्णीकडे शिकल्यामुळे काही परंपरागत ग्वाल्हेरी चिजाती गाते. परंतु मांडणीत आत्मा वावरतो तो किशोरीबाईच्या शैलीचा. तिच्या गाण्यावर सामान्य श्रोता खूप असतो आणि 'सुराचा’ आनंद मिळाल्याने समाधानी असतो. कुंदा वेलींग, वृंदा मुंडकुर या गायिकाही आता गाऊ लागल्या आहेत.

सध्या एकूण चलती आहे ती गायिकांची, तरुण गायक तसे मोजकेच आहेत. पण तरीही गेल्या दहा वर्षात पुढे आलेले लोकप्रिय आणि ताज्या दमाचे गवई म्हणून अजय पोहनकर, विद्याधर व्यास, सत्यशील देशपांडे, मुकुल शिवपुत्र कोमकली, चंद्रकांत सरदेशमुख, विजय कोपरकर, मिलिंद चित्ताळ यांचा उल्लेख करावा लागेल, अजय पोहनकर यांच्या गानशैलीवर अमीरखा, कुमार गंधर्व आणि थोडाफार वसंतराव देशपांडे यांचा प्रभाव जाणवतो. सहजपणा आणि सुरेलपणा यांच्या जोरावर ते ओत्याच्या मनाची पकड घेतात. विद्याधर व्यास हे मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत. ते नारायण राव व्यास यांचे चिरंजीव, नारायणराव व्यासांनी एक काळ गाजवला होता, सोपेपणा आणि गोडवा ही वडिलांची वैशिष्ट्ये विद्याधर यांच्या गाण्यात दिसतात. विद्याधर यांनी पं. डा.व्ही. पलुस्कर यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. पलुस्करी ग्वाल्हेरच्या चिजा ते आकर्षक ताना आणि बोलताना यांचावर भर देऊन डा. व्ही. पलुस्कर याच्या पद्धतीने सादर करतात. सत्यशील देशपांडे, मुकुल आणि चंद्रकांत सरदेशमुख हे कुमार गंधर्वांचे शिष्य. सत्यशीलची गायकी ही फक्त कुमारांची गायकी वाटत नाही. तालाची उत्तम जाण आणि भावप्रधान मांडणी ही त्यांची जमेची बाजू. मुकुल हा खऱ्या अर्थान कुमार घराण्याचा. त्याची उपज, त्याचे आवाजाचे लगाव, तान- फीस्त, बंदिश पेश करण्याचा ढंग आणि एकूण सौंदर्यदृष्टी शंभर टक्के कुमार घराण्याची आहे. मिलिंद चित्ताळ हा फिरोज दस्तूर आणि यशवंतबुवा जोशी यांचा शिष्य आहे. दस्तुरांकडून सुरात रममाण होण्याची कला तो शिकला आहे. यशवंतबुवांकडून तो दमदार गायकी आत्मसात करीत आहे. विजय कोपरकर, उल्हास कशाळकर हेही ताज्या दमाचे प्रभावी गायक आहेत.

या लेखाच्या सुरुवातीला चांगल्या गायनाचे निकष मी स्पष्ट केले आहेत. राग, कविता आणि ठेका याचा समन्वय साधणारी श्रेष्ठ ख्याल गायकी सदारंग-अदारंग यांनी निर्माण केली. काळाच्या ओघात या गायिकेचा शुद्धत्व आणि सौंदर्य 'मास लेव्हल' वर टिकू शकलं नाही. पं.शरदचंद्र आरोलकरांसारख्या या परंपरेतल्या गवयाने हे स्वरूप जतन करून ठेवलं हे आजच्या पिढीचं भाग्य आहे. आवाजाचे अष्टांगी लगाव आणि ख्यालनुमा, धूपद, तराणा, ठप्पा, ठुमरी, होरी, गजल, अष्टपदी वगैरे गानप्रकार सहजपणाने हाताळणं हे सच्चा ग्वाल्हेरचे विशेष आहेत. या परंपरेतली एक गायिका हल्की पुढे येऊ लागली आहे, तिचं नाव नीला भागवत. प्रस्तुत लेखकाचं आणि तिचं पति-पत्नीचे आणि शिष्य-गुरूच नातं असलं तरी संगीतातल्या तिच्या स्थानाविषयी वस्तुनिष्ठपणे मतप्रदर्शन करताना त्याला संकोच बाळगावासा वाटत नाही. निसर्गत:च कोकिळेसारखा आवाज लाभलेल नसतानाही प्रभावी गायिका बनता येतं हे तिच्या उदाहरणावरून दिसतं. आवाज हा कमवावा लागतो. मल्लिकार्जुन मन्सूरांचं गाणं ऐकल्यावर कष्टसाध्य आवाजाची ताकद काय असते याची कल्पना यावी. “परंपरा ही वेडी बनू नये. शिडी बनावो!" असं एका ख्यातनाम पाश्चात्य संगीतज्ज्ञाने लिहिले आहें. कुमार गंधर्वांसारख्या प्रतिभाशाली कलावंताने संगीताचा सर्वव्यापी शोध घेताना हेच ब्रह्मवाक्य मानलं. नव्या आणि आधुनिक संदर्भात ख्यालाचं आणि आयुष्याचा नातं शोधत असताना नीलासारख्या कलाकारासमोर आदर्श असतो तो कुमारांच्या निर्मिती क्षमतेचा आणि चिंतनशीलतेचा राजकीय आणि सामाजिक चळवळीचं भान आणि कलेच्या इतर माध्यमांची असलेली जाणी व यामुळे आपलं स्वतंत्र कलात्मक व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रेरणा आणखी उत्कट होत जाते. ही उत्कटता नीलाच्या गाण्यातून अभिव्यक्त होते.

कलेच्या माध्यमाद्वारे कलाकार आपले अनुभव मांडत असतो. साहित्य, चित्रपटकला, चित्रकला ही माध्यम अनुभव पोचवण्याच्या किंवा व्यक्त करण्याच्या दृष्टीने फार प्रभावी माध्यम आहेत. " ख्यालाला अजून पुष्कळ व्यक्त करायचं आहे. पुष्कळ लांबचा पल्ला गाठायचा आहे." असं कुमार गंधर्व म्हणतात ते अक्षरशः खरं आहे. ख्यालाची शब्दसृष्टी मर्यादित वाटली तरी भाषा श्रीमंत आहे; ताकद अमर्याद आहे. ही भाषा, ही अनुभवसृष्टी जर समृद्ध झाली, वाढली, कालप्रवाहाबरोबर पुढे जात राहिली तर ख्याल टिकेल. नाही तर ख्याल गायकीचे पुराणवस्तूत रूपांतर होईल. तंत्राची साधना आवश्यक असली तरी तंत्रापलीकडचाही विचार ख्याल गायकाने करायला हवा. आज असा विचार करणारे गायक-गायिका अभावानेच आढळतात. तंत्रावर सामर्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करीत असतानाच आपली राजकीय, सामाजिक आणि कलात्मक जाण जोपासण्याचा कलावंताने प्रयत्न करायला हवा. तरच रूपाल- संगीत पुढे जाईल. अन्यथा ते अवरुद्ध होईल.

आज टी. व्ही. हे माध्यम सर्व प्रयोगसिद्ध कलाना प्रचंड आव्हान देऊन राहिलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी प्रसिद्ध कलाकारांच्या मैफलीना चांगली गर्दी लोटत असे. आता परिस्थिती झपाट्याने बदलू लागली आहे. श्रोत्यांची संख्या रोडावू लागली आहे. बुधादित्य मुखर्जी, शमीम अहमद यांच्यासारखे कसलेले सतारवादक किंवा वीणासारखी लोकप्रिय गायिका फारतर अडीचशे-तीनशे श्रोत्यांना आकर्षित करू शकते. लोकप्रिय होण्यासाठी व गर्दी वाढवण्यासाठी चमत्कृतीपूर्ण कला सादर करणं किंवा जरा हुलक्या अर्थने लोकानुनय करणं हा एक मार्ग होऊ शकतो. काही कलाकार हेच करतात. पण कलेच सत्य आणि अस्सलपण टिकवीत ती पुढे नेणं हे खरं आव्हान आहे. हे आव्हान कठीण असले तरी ते पेलणं अशक्य नाही. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचा बहुमुखी विस्तार होतो आहे. या भोवतालाचा कलाकाराने डोळसपणे विचार केला तर काही तरी नक्कीच निष्पन्न होईल. अन्यथा विष्णु दिगंबरांनी लोकांपर्यंत आणलेलं संगीत पुन्हा 'चेंबर'मध्ये बंद होईल...

महाराष्ट्रात वादकांना फारशी दाद मिळत नाही अशी तक्रार करण्यात येते. त्यात थोडंफार तथ्य असेल, परंतु वाद्यसंगीतात प्रावीण्य मिळवणारे अनेक कलावंत निर्माण होत आहेत. सरोदवादकांत झियामोईनुद्दीन डागर यांचे शिष्य सुभाष नारिग्रेकर, अन्नपूर्णा देवीचे शिष्य प्रदीप बारोट, प्रभु तेंडूलकर यांची नावं डोळ्यापुढे येतात. सतारवादक शाहीद परवेझ, सारंगीवादक ध्रुवज्योती घोष, संतूरवादक उल्हास बापट, व्हायोलिनवादक अरुण डहाणूकर, बासरीवादक नित्यानंद हळदीपूर आणि रूपक कुलकर्णी हे आणखी काही तरुण वादक. नयन घोष, विजय जयंत, अनीश प्रधान, ओंकार गुळवडी, सदानंद नायमपल्ली, गिरीश नलावडे, विभव नागेशकर, सुहास कबरे, मंगेश मुळ्ये या तबलावादकांनीही आपली छाप श्रोतमनावर पाडली आहे. आवान मिस्त्री आणि सीमा मिस्त्री या स्त्रियाही अनुक्रमे तबला आणि पेटीवादनात निष्णात आहेत. 

Tags: Shruti Sadolikar. Padma Talwalkar Aarti Ankalikar Ashwini Bhide Kishori Amonkar Milind Chittal Mukul Satyasheel Deshpande Ulhas Kashalkar Vijay Koparkar P.Sharadchandra Mallikarjun Mansur श्रुती सडोलीकर पद्मा तळवलकर आरती अंकलीकर अश्विनी भिडे किशोरी आमोणकर मिलिद चित्ताळ मुकुल सत्यशील देशपांडे उल्हास कशाळकर विजय कोपरकर पं.शरदचनंद्र मल्लिकार्जुन मन्सूर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके