डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तानातल्या रागदारी संगीतावर बेघर होण्याची पाळी आली आहे!

भारताबरोबर झालेल्या प्रत्येक लढाईनंतर पाकिस्तानातल्या संगीताची पिछेहाट होत गेली आहे. सारा झमान या स्त्री ने 'इल्म-ए-मौसिकी' उर्फ कलासंगीत आपल्याला शिकायचं आहे, म्हटल्यावर उस्तादाला फक्त हुंदका फुटणं बाकी होतं. एके काळी लाहोर रेडिओकडे कान लावून हिंदुस्थानातले गायक आणि श्रोते बसत असत, कारण अफलातून तयारीचं गाणं तिथून ऐकायला मिळे. आता पाकिस्तानातल्या रागदारी संगीतावर बेघर होण्याची पाळी आली आहे.

संस्कृती संगीतशास्त्र नावाची एक ज्ञानशाखा आहे. संगीताचं संस्कृतीशी असलेल अनेक पदरी आणि अनेक स्तरी नातं हा या ज्ञानशाखेच्या आस्थेचा विषय आहे. या शास्त्रातले तज्ज्ञ नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगतात. "बाबांनो, जगाचा नकाशा काढताना कृपा करून राजकीय नकाशावर, म्हणजे राष्ट्रसीमांनुसार आखण्यात आलेल्या विभागणीवर विसंबून राहू नका. सांस्कृतिक सलगतेचा विचार करा." या मंडळींच्या प्रतिपादनातलं तथ्य जाणवण्यासाठी आपल्या दृष्टीने एकच गोष्ट पुरेशी असते. ती म्हणजे पाकिस्तानातल्या माणसांना भेटणं. धर्माच्या नावावर हिंदुस्थानची फाळणी करण्यात आली. त्यातून भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. पण सांस्कृतिकदृष्ट्या मूळ अविभाजित हिंदुस्थानचे तुकडे करणं किती कठीण होतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा नव्याने आला, तो युसूफ सईद या दिल्लीतल्या चित्रपट दिग्दर्शकाचा 'ख्याल दर्पण' हा अनुबोधपट पाहताना.

युसूफ सईद हा तरुण अत्यंत उत्साही आणि आशावादी आहे. 2005 साली त्याला एक संशोधन-शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या निमित्ताने पाकिस्तानात सहा महिने राहण्याची संधी मिळाली. लाहोर, कराची आणि इस्लामाबाद या तीनच शहरांमध्ये राहण्याची आणि फिरण्याची त्याला परवानगी मिळाली होती. युसूफ सईदने या संधीचा फायदा घेऊन तिथल्या संगीतकारांच्या, संगीत समीक्षकांच्या आणि संस्थाचालकांच्या भेटी घेतल्या. त्यांना बोलतं केलं आणि त्यांच्या मुलाखती  कॅमे-यावर टिपल्या. 1947 साली झालेल्या फाळणीनंतर पाकिस्तानतल्या हिंदुस्थानी संगीत परंपरेची काय अवस्था झाली हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेने त्याने हा शोध घेतला. 105 मिनिटांचा हा अनुबोधपट पाहून एकीकडे खिन्न आणि उदासवाणं वाटतं. पण दुसरीकडे एकाच उगमातून निपजलेल्या या दोन देशांना एकत्र गुंफण्याची ताकद संगीतातच आहे हीही लक्षात येतं.

फाळणीपूर्वीच्या पंजाबात हिंदुस्थानी संगीताचा प्रसार चांगलाच झाला होता. भास्करबुवा बखले, कृष्णराव शंकर पंडित, रामकृष्णबुवा वझे हे गेल्या पिढीतले बुजुर्ग गायक तिथे लोकप्रिय होते. लाहोर, कराची, पेशावर अशा ठिकाणी संगीताचे कार्यक्रम होत. आपल्याकडून हिराबाई, सरस्वतीबाई, गंगूबाई वगैरे कलाकारही तिथे जात आणि त्यांच्या मैफली झडत. वसंतराव देशपांडे तर लाहोरमध्ये राहिले होते. तिथे आशिक अलीने विहिरीत डोकं घालून 'सा' लावण्याचा कानमंत्र त्यांना दिला आणि 'मारवा' राग शिकविला. तो त्यांना आयुष्यभर पुरला. मुद्दा असा की लाहोरमध्ये संगीताची संस्कृती चांगलीच बहरलेली होती, म्हणूनच विष्णू दिगंबर पलुस्करांना 1901 साली गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करण्याची प्रेरणा तिथे झाली. युसूफ सईदच्या अनुबोधपटात लाहोरचं पुष्कळ चित्रण आहे. लाहोरच्या 'ताकिया मिरासियाँ’ नावाच्या मशिदीजवळच्या परिसरात गाण्या-बजावण्याच्या ऊरुसांना अपार महत्त्व होतं आणि येथील रसिकांच्या पसंतीची पावती मिळालेला कलाकार जगात कुठेही यशस्वी होत असे. असे बड़े गुलामअलींचा पुतण्या निसारअली सांगतो. बडे गुलामअली हे ‘कसूर’चे अल्लारखांही त्याच परिसरातले. सलामतअली आणि नजाकतअली हे जुगलबंदी गायक त्याच भागातले. त्यांचं घराणं 'श्यामचौरासी' असलं तरी त्यांचं वास्तव्य पाकिस्तानातलंच. युसूफच्या अनुबोधपटात बडे गुलामअली, सलामत-नजाकत यांचे आवाज गाण्याच्या रूपाने आले आहेत. 'बाजूबंद खुल खुल जा या भैरवी' ठुमरीवर भारतात श्रोत्यांप्रमाणे पाकिस्तानातल्या रसिकांच्या इतकाच हक्क आहे असं हे पाहताना आणि ऐकताना जाणवल्यावाचून राहत नाही.

युसूफच्या अनुबोधपटात आणखी एक आवाज ऐकायला मिळतो आणि चेहराही पाहायला मिळतो, तो म्हणजे रोशनआरा बेगमचा. तिचं गाणं ऐकून कान भरून जातात. आमच्या लहानपणी पु. ल. देशपांडेंच्या नावावर एक किस्सा खपवला जात असे. पु. लं. ना विनायकराव पटवर्धनांचं 'कवायती' गाणं आवडत नसे. तर एकदा भारत-पाक वाटाघाटींच्या संदर्भात त्यांनी भारत सरकारला असा एक तोडगा सुचवला की पाकिस्तानने विनायकराव पटवर्धनांना घेऊन जावं आणि रोशनआरा बेगमला भारताच्या स्वाधीन करावं. यातला खट्याळपणा बाजूला ठेवला तरी रोशन आरा बेगमचा परिपक्क आणि दमदार सूर ऐकल्यावर गाण्याची ही परंपरा पुढे खंडित झाल्याचं दुःख झाल्यावाचून राहत नाही. फाळणीनंतरच्या काळात आपला इतिहास आणि परंपरा या बाबतीत पाकिस्तानसमोर फार मोठे प्रश्न उभे राहिले. अडीच-तीन हजार वर्षांच्या परंपरेचं काय करायचं? त्यातली कोणती आपली म्हणून तिच्यावर हक्क सांगायचा? आणि कोणती हिंदू' म्हणून निकालात काढायची? त्यातून रागदारी संगीताकडे कसं पाहायचं किंवा त्याला कोणत्या श्रेणीत ढकलायचं याचा निवाडा होईना.

धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे धर्मांधांच्या कधी लक्षातच येत नाही. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. पाकिस्तान हे इस्लामला प्राधान्य देणारं राष्ट्र म्हणून जन्माला आलं आणि वावरलं. हिंदू संस्कृतीतून निपजलेल्या गोष्टी 'धर्मबाह्य' म्हणून 'त्याज्य' ठरवण्याची मोहीम सुरू झाली. नभोवाणीवरून गायल्या जाणाऱ्या 'शंकरा', 'दुर्गा'सारख्या रागांची नावं बदलण्यात आली. 'शिवकल्याण'चा 'शबकल्याण' झाला. पण ज्यात हिंदू देवदेवतांची नावं आहेत त्या रचनांचं काय करणार? या अनुबोधपटात बद्रुझ्झमान या गायकाची मुलाखत आहे. तो म्हणतो की चिजांमध्ये धर्मानुरूप बदल करण्याचा प्रयत्न झाला. पण पारंपरिक चिजांमध्ये बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही, म्हणून तो सोडून देण्यात आला. सीमेपलीकडच्या शंकर जयकिशनच्या रचनांचा कार्यक्रम करायची सुरू असल्याचं एक दृश्य आहे. लोक भले बेसूरपणे त्यांची गाणी गात असतील; पण प्रेमाने गातात हेही लक्षात येतं. 'कब लोगे खबर मोरे राम, कब आओगे तुम घनश्याम' अशी गाणी हौशी कलावंत रंगात येऊन गातात.

भारताबरोबर झालेल्या प्रत्येक लढाईनंतर पाकिस्तानातल्या संगीताची पिछेहाट होत गेली आहे. सारा झमान या स्त्रीने ‘इल्म-ए-मौसिकी' उर्फ कलासंगीत आपल्याला शिकायचं आहे, म्हटल्यावर उस्तादाला फक्त हुंदका फुटणं बाकी होतं. ख्याल आणि ध्रृपदाची वाताहत झाल्यावर ‘गझल’ आणि 'कव्वाली' गायलो तरच आपला निभाव लागू शकेल, असं रागदारी संगीताच्या गायकांना वाटू लागलं. त्यातूनच मेहदी हसन, गुलामअली आणि नुसरत फतेह अलीसारखे कलाकार निर्माण झाले आणि मोठे झाले. एके काळी लाहोर रेडिओकडे कान लावून हिंदुस्थानातले गायक आणि श्रोते बसत असत, कारण अफलातून तयारीचं गाणं तिथून ऐकायला मिळे. आता पाकिस्तानातल्या रागदारी संगीतावर बेघर होण्याची पाळी आली आहे.

Tags: एकात्म संगीत पाकिस्तानी संगीत भारतीय संगीत  संगीतविषयक integrated music     pakistani music indian music musical weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके