डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्रवणातून 'पॅसिव्ह नॉलेज' मिळत जातं

हळूहळू चढणाऱ्या मद्यासारखा हा आनंद आहे. श्रोता, कार्यकर्ता, संगीतावरचा लेखक, आयोजक आणि अखेरीस गायक अशा चार भूमिकांमधून मी वावरलो आहे. अनेकदा लोक मला विचारत असत, "तुम्ही संगीताचा किंवा संगीत-आस्वादाचा 'कोर्स' केला आहे का?" किंवा "तुम्ही 'प्रथमा', 'मध्यमा', 'अलंकार' वगैरे परीक्षा उत्तीर्ण झाला आहात का?'' या प्रश्नांचं पूर्वी मला हसू येत असे. आता ते मी आवरतो. संगीताचं शिक्षण हे श्रवणातून सुरू होतं आणि खऱ्या अर्थाने ते कधीही थांबत नाही, म्हणजे निदान श्रवणयंत्र काम करत आहे तोपर्यंत.

'Music is the art which is most nigh to tears and memory.' असं ऑस्कर वाइल्ड या लेखकाने म्हटलं आहे. अश्रू आणि स्मृती यांच्याइतकी जवळ जाणारी खरोखरच अन्य कोणतीही कला नाही. एखाद्या गाण्याबरोबर आपल्या कुठल्या ना कुठल्या स्मृती निगडीत असतात. ते गाणं मन:पटलावर कायमचं कोरलेलं असतं. त्या गाण्याचे शब्द, त्याची चाल, त्या शब्दांना आणि सुरांना सजीव करणारा आवाज, या सर्वांचं मिळून एक रसायन बनून जातं. काही जणांना गाण्याचे शब्द आठवतात आणि चालीची रूपरेषा अंधुकपणे दिसत असते. काहींना फक्त चाल आठवते; सूर आठवतात, पण शब्द अपहृत सीतेने भिरकावलेल्या अलंकारासारखे वाटेवर अंतराअंतराने पडल्यासारखे वाटतात. माझे वडील हे संगीतरसिक होते; परंतु गायक मात्र खचितच नव्हते. लहानपणी आम्हाला झोपताना ते हमखास काही ना काही गुणगुणायचेच. गजानन वाटवेंचं 'मोहुनिया तुज संगे नयन खेळले जुगार' हे भावगीत किंवा माणिक वर्माचं 'सावळाचि रंग तुझा' हे गीत त्यांच्या खास आवडीचं. या गाण्यांच्या चाली आणि सुरावटी संस्कारक्षम वयात असतानाच इतक्या फिट्ट कानात आणि मनात बसल्या की त्यांच्याबरोबर कायमची दोस्ती झाली. ही गाणी 'शिवरंजनी' रागातली आहेत.

पण वडिलांना हे निश्चितच माहीत नसणार. कारण त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण पुढे 'तुम पुछो और मैं बताऊं ऐसे तो हालात नहीं, एक जरासा दिल टूटा और कोई तो बात नहीं' अशी बेगम अख्तरची दिल खोलून केलेली कैफियत ऐकताना ती तीरासारखी काळजात घुसली कारण ज्या 'शिवरंजनी 'चा लिबास घालून ती आली होती, ती 'शिवरंजनी' वडिलांच्या अंगाई गीताच्या माध्यमातून चांगलीच परिचित झाली होती आणि त्याहीनंतर स्वत: कलाकार म्हणून 'साजन बिन रोए जोगनिया हाय राम' ही ठुमरीवजा रचना, गाण्याचा प्रसंग येतो तेव्हा 'शिवरंजनी'ची ही सर्व रूपं आणि 'पांघरशी जरी असला कपडा' किंवा 'आवाज देके हमें तुम बुलाओ'सारखे दर्दभरे आविष्कार स्मृतिपटलावर गर्दी करतात आणि त्यांच्या सामुदायिक घुसळणीतून आपल्या गळ्यावाटे तसं काहीतरी वेगळंच बाहेर पडतं.

मी स्वत:विषयी या लेखात बोलतो आहे याचं अनेकांना आश्चर्य वाटेल, पण तसं करण्यामागचा उद्देश स्वत:चे ढोल बडवणं हा नसून, आपले अनुभव इतरांबरोबर वाटून घ्यावेत आणि इतरांना मनमोकळेपणाने सांगावेत हा आहे. त्यातून इतरांचा फायदा झाला न झाला तरी तोटा निश्चितच होणार नाही. मी नेमका काय आहे? आणि कोण आहे? असा प्रश्न निदान संगीताच्या बाबतीत अनेकांना पडतो. मुंबई महानगरीतल्या शिवाजी पार्क परिसरात वाढलेली व्यक्ती सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिकवाल्यांना, ज्या काळात सतत सामोरी जात असे असा तो काळ. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन टिपेला पोचलेला असताना आचार्य अत्रे, ना.ग.गोरे, एस.एम.जोशी वगैरेंची भाषणं जितक्या सहजपणे कानावर पडायची; किंवा प्रभाकर पाध्ये, पां.वा.गाडगीळ, वि.ह.कुलकर्णी, अनंत काणेकर यांनी रंगवलेले साहित्यिक वाद जितक्या सहजपणे परिचयाचे व्हायचे, तितक्याच सहजपणे राम मराठे, यशवंतबुवा जोशी, शरश्चंद्र आरोलकर, कृष्णा गुंडो गिंडे, चिदानंद नगरकर, शरद साठे यांच्या गळ्यातून निघणारे रागदारी संगीताचे स्वरही कानावर पडत राहायचे. या सुरांची खास समज त्या काळात होती असे अजिबात नाही. किंवा एका मोठ्या अभिजात कलेतल्या निर्मितीप्रक्रियेची किंवा निर्मिती व्यापाराची आपल्याला लहान वयात ओळख पटली किंवा समज आली अशातलाही भाग नाही. संगीताची 'लाइव्ह' मैफल म्हणजे काहीतरी रोमहर्षक प्रकार असतो, याचा प्रत्यय वयाची सोळा वर्षे गाठण्यापूर्वीच अनेकदा येऊन गेला आणि हा अनुभव एक मूलभूत अनुभव ठरला.

'लाइव्ह' मैफलीत आणि विशेषत: रागदारी संगीताच्या प्रत्यक्ष मैफलीत एक प्रकारचं घडणं असतं. मुख्य कलाकार गायक असो अथवा वादक! तो आयुष्यभर स्वत:च्या अंतरंगात मुरवलेलं गाणं श्रोत्यांसमोर मांडत असतो. आज त्याला किंवा तिला जे सुचेल ते किंवा तसे उद्या सुचेलच असं नाही. 'त्या त्या क्षणी जे डोक्यात येईल ते बेधडकपणे मांडण्याची जागा म्हणजे मैफल' असं ऐकणाऱ्याच्या, अर्थात तो संवेदनशील असेल तर लक्षात येऊ लागतं. मुख्य कलाकाराचे साथीदार या प्रक्रियेत त्या कलाकाराची जशी तबीयत असेल त्यानुसार कमी-अधिक प्रमाणात सहभागी होतात. त्यातून या जिवंत मैफलीच्या नशिलेपणात अधिकच भर पडत जाते. त्याची चटक एकदा श्रोता म्हणून लागली की ती कायमची लागते.

आता आपल्याकडचं राग-संगीत हे जगातलं सर्वश्रेष्ठ संगीत आहे, असा तोरा मिरवण्याची हौस अनेकांना असते. विशेषतः संगीताकडे अभिव्यक्तीचं साधन म्हणून न पाहता केवळ परदेशात जाऊन किफायतशीरपणे करण्याचा धंदा म्हणून पाहणाऱ्या कलाकारांकडून तर हा टेंभा फारच मिरवला जातो. रागाच्या चौकटीत राहून त्या चौकटीत ठराविक स्वरांचे नवनवीन समूह शोधत राहणं किंवा असं करण्याला वाव असणं हे आपल्या संगीताचं एक वैशिष्ट्य आहे यात वाद नाही. पण डॉ.अशोक रानडे म्हणतात त्याप्रमाणे कधीकधी यावर फाजील भर दिला जातो. इतर संगीत संस्कृतीमध्ये 'इम्प्रोव्हायझेशन स्ट्रॅटेजीज' निश्चितच आहेत. कुमार गंधर्व जेव्हा म्हणत की, "तुम्ही फक्त पाठांतर का गात बसला आहात? जरा गाणं म्हणा की!" त्यावेळी गवयांना राग येत असे. कुमारांच्या किंवा डॉ.रानडेच्या म्हणण्यात तथ्य आहेच, पण रागाची अक्षर गोडी आणि त्याच्या पोटात दडलेल्या अगणित आणि अमर्याद शक्यता, यातच राग-संगीताचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे यात शंका नाही.

या सर्वांचा प्रत्यय श्रोता म्हणून पहिल्या फटक्यात निश्चितच येणार नाही. हळूहळू चढणाऱ्या मद्यासारखा हा आनंद आहे, श्रोता, कार्यकर्ता, संगीतावरचा लेखक, आयोजक आणि अखेरीस गायक अशा चार भूमिकांमधून मी वावरलो आहे. अनेकदा लोक मला विचारत असत, "तुम्ही संगीताचा किंवा संगीत-आस्वादाचा कोर्स केला आहे का?" किंवा "तुम्ही 'प्रथमा', 'मध्यमा', 'अलंकार' वगैरे परीक्षा उत्तीर्ण झाला आहात का?'' या प्रश्नांचं पूर्वी मला हसू येत असे. आता ते मी आवरतो. संगीताचं शिक्षण हे श्रवणातून सुरू होतं आणि खऱ्या अर्थाने ते कधीही थांबत नाही, म्हणजे निदान श्रवणयंत्र काम करत आहे तोपर्यंत. श्रवणातून ज्याला 'पॅसिव्ह नॉलेज' म्हणतात तसं शिक्षण मिळत जातं. ज्याला श्रवणातच आनंद मानायचा आहे तो आयुष्यभर ऐकत राहतो आणि तसे जरूर करावं. ज्याला एखादी कला आतून जाणून आणि समजून घ्यायची आहे, तो अधिक खोलात जाऊन शिकू मागतो आणि त्यावेळी हे 'पॅसिव्ह नॉलेज' नक्कीच कामी येतं. 

गाण्या-बजावण्याच्या क्षेत्रात पारंपरिक वातावरण असतं आणि उस्ताद/शागीर्द किंवा गुरु/शिष्य असा वर्गभेद/वर्गवारी असते. त्याचे फायदेही मोठे आणि तोटेही मोठेच. पण 'बारा साल सुनना, बारा साल सीखना और बारा साल रियाझ करना' ही एक 'कमांडमेंट' पूर्वीच्या काळी असे. त्याच्याशी निगडीत अन्यायाचा आणि शोषणाचा भाग वगळला तर संगीत कला आत्मसात करण्याविषयीचं एक फार मोठं सत्य त्यात दडलं आहे, याबाबत संदेह नाही. आणि हे माझे स्वानुभवावर आधारीत असं अनुमान आहे.

Tags: मैफल. कुमार गंधर्व शिवाजी पार्क शिवरंजनी श्रोता धुन शब्द गाणी अमरेंद्र धनेश्वर Maifal. #संगीत Kumar Gandharva Shivaji Park Shivranjini Listener Tune Words Songs Amrendra Dhaneshwar Music weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके