डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजकारणाद्वारे सत्तेत पोचून शासनयंत्रणा ज्यांच्या ताब्यात गेलेली असते, त्यांचा व्यवहार वेगळा असतो. प्रबोधनाचं महत्त्व कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ सारख्या गीताचा सामान्यांच्या मनावर जो संस्कार होतो तो कुठेतरी खोलवर जाऊन रुजतो हे नाकारण्यात अर्थ नसतो.

आज ज्यांची पन्नाशी किंवा साठी उलटली आहे, अशी मंडळी चित्रपट संगीताची शौकिन असली तर त्यांना रेडिओ ‘सिलोन’ वरचं संगीत नक्कीच आठवत असेल. तो काळ म्हणजे 'सिलोन’चं ‘श्रीलंका’ असं नामकरण होण्यापूर्वीचा. मुंबई आणि पुणे अशा उच्चभ्रूंच्या शहरातही घरात रेडिओ सेट असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात असे. रेडिओवरून क्रिकेटच्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकणं किंवा बुधवारी रात्री आठ ते नऊ या काळात 'बिनाका गीतमाला' ऐकणं म्हणजे चैन करण्याबाबतची परमसीमा मानली जात असे. स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक सुबत्ता मध्यम वर्गाच्या वाट्याला अजून यायची होती. सार्वजनिक क्षेत्रात या अनिर्बंध विकासातून आलेली नोकरीची हमीही आवाक्यात यायची होती. अशा काळात कुटुंबं एकत्रित असायची आणि 'रेडिओ’ सारख्या चैनीच्या वस्तू परवडणं शक्य नसल्यामुळे, आम जनतेच्या दृष्टीने असलेले मनोरंजनाचे कार्यक्रम ज्याच्या घरात 'रेडिओ' असे, त्याच्या घरात एकत्र जमून ऐकले जात. तसं पाहिलं तर आज ‘थ्री बीएचके', 'पार्किंग प्लॉट, कॉम्प्युटर, फ्रीज, टेलिविजन, सॅन्ट्रो मोटार’ या चीजवस्तू आणि क्रेडिट कार्ड सहजपणे बाळगणाऱ्या मध्यमवर्गाच्या तुलनेत हा फारच खडतर काळ होता. पण या काळात चित्रपट जगतात जे संगीत निर्माण झालं, त्याला अक्षरशः तोड नाही.

‘नेहरूवियन’ समाजवादाचा उत्कर्षाचा काळ म्हणजे 1950 ते 60हे दशक, नेमकं हेच दशक सिनेसंगीताच्या दृष्टीने परमोत्कर्षाचं शिखर ठरणारं. यात केवळ योगायोग आहे, की परिस्थितीने विशिष्ट दिशेने कलेला आकार दिला असल्याचं प्रमाण आहे, याचा फैसला आपण नंतर करू. पण एकीकडे राज कपूर, बिमल रॉय, गुरुदत्त, देव आनंद, बी.आर. चोप्रा, मेहबूब यांच्यासारखे संवेदनशील निर्माते आणि दिग्दर्शक होते. इथे आपण जनप्रिय संगीताचा विचार करीत आहोत. त्यांच्या कल्पना पडद्यावर साकार करण्यासाठी अशोक कुमारपासून नूतनपर्यंत आणि बलराज साहनीपासून वैजयंती मालापर्यंत समर्थ अभिनेते होते. चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप अशी गीतरचना करणारे शैलेंद्र, साहिर, राजेंद्र, मजरूह, राजा मेहंदीअली, प्रदीप वगैरे गीतकार होते. आणि त्या गीतांना स्वरसाज चढविणारे अनिल विश्वास, बर्मन, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, नौशाद, शंकर जयकिशन, सलील चौधरी यांच्या तोडीचे संगीतकार होते. या रचनांना आवाज देणारे लता, आशा, गीता, शमशाद, तलत, मुकेश, रफी, मन्ना डे, किशोरकुमार वगैरे अत्यंत गुणी गायक कलाकार होते. या सर्व कलाकारांच्या कलागुणांचा असा सुरेख संगम, त्या काळातल्या चित्रपट संगीतात झाला की पाच दशकं उलटल्यानंतरही त्यातील गोडी अवीट राहिली. 

1950 नंतरच्या काळात निर्माण झालेल्या जनप्रिय चित्रपट संगीताने आणि चित्रपटांनी भारतासारख्या खंडपाय देशाला एकत्र सांधण्याचं काम केलं आहे. हे सत्य समाजशास्त्रज्ञांनी आणि इतिहासकारांनीही निर्विवादपणे मान्य केलं आहे. सरकारी प्रसारमाध्यमांमधून कृत्रिम आणि वरकरणी ऐक्यावर भर देण्यात येतो. त्याला सतत उपदेशाची दुर्गंधी येत असते. कारण राजकारणाद्वारे सत्तेत पोचून शासनयंत्रणा ज्यांच्या ताब्यात गेलेली असते, त्यांचा व्यवहार वेगळा असतो. प्रबोधनाचं महत्त्व कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ सारख्या गीताचा सामान्यांच्या मनावर जो संस्कार होतो तो कुठेतरी खोलवर जाऊन रुजतो हे नाकारण्यात अर्थ नसतो.

1950च्या दशकातल्पा संगीताची सर्व श्रीमंती त्याच्या विविधतेत दडलेली आहे. रागदारीचा आधार घेऊन थेट रागदारी वाटाची गाणी तर निर्माण झालीच. 'लपक झपक तू आरे बरखा' (बूटपॉलिश) किंवा 'झनक झनक पायल बाजे’चं शीर्षक गीत म्हणजे रागदारी ढंगाच्या जलद चीजाच की! ‘मनमोहना बडे झूठे’ (सीमा) हे लताने गायलेलं 'सीमा' चित्रपटातलं गाणं म्हणजे द्रुत, एकतालात बांधलेल्या 'जयजयवंती' रागातल्या चीजेसारखंच. तिथे गाण्याला खास 'ऑर्केस्ट्रेशन'चा जामानिमा नाही, पण भैरव रागातल्या 'जागो मोहन प्यारे' (जागते रहो) या रागदारी चीजेला चित्रपटाला अनुरूप असा 'कोरस'चा आणि ऑर्केस्ट्रेशन वा स्पर्श लाभला की त्याचा किती वेगळा परिणाम होतो! आपण गरीब आहोत आणि फाटकेतुटके कपडे घालतो म्हणून दुनिया आपल्याकडे 'चोर' असल्याच्या नजरेने पहाते; पण म्हणून आपण अपराधी भावना बाळगून जगायचं आणि वावरण्याचं कारण नाही, याची जाणीव एक निरागस लहान मुलगा नायकाला करून देतो आणि 'जिसने मनका दीप जलाया, दुनियाको उसनेही उजल पाया', अशा प्रकारचं आत्मज्ञान नायकाला होतं. भावना उचंबळून येतील असा कथानकाचा टप्पा; चित्रपटातील दृश्य आणि 'कोरस’च्या माध्यमातून येणारे ‘भैरव' रागातल्या उत्तरांगातील सूर असा प्रभावी संगम इथे दिसतो. रागदारीला 'ऑर्केस्ट्रेशन' आणि 'कोरस'चं परिमाण लाभलं, की काय नवल घडू शकतं, याचं एक उत्तम उदाहरण.

याच काळात पंजाबी वळणाचं आणि ठेक्याचे संगीत आपल्याकडं आलं. 'हवा में उड़ता जाए, मोरा लाल दुपट्टा मलमलका' (बरसात), 'कोई ना भई कोई ना' (जागते रहो). 'ये देस है वीर जवानों का, अलबेलोंका' किंवा रेशमी सलवार कुडता जालीका' (नया दौर) वगैरे गीतं पंजाबी लोकसंगीतातून आली. बंगालच्या कीर्तन संगीतातून 'आज सजन मोहे अंग लगालो’ (प्यासा). 'आन मिलों श्याम सांवरे' (देवदास), यांसारखी गाणी किंवा बांगला संगीतातून आलेलं 'सुनो मेरे बंधू रे'(सुजाता) किंवा 'ओरे मांझी, मोरे साजन है उस पार' (बंदिनी) यांसारखी गाणी चित्रपटांना समृद्ध करून गेली. उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागातलं लोकसंगीत 'गाडीवाले गाडी धीरे हाक रे' (मदर इंडिया), 'दूर कोई गाए धुन ये सुनाए' (बैजू बावरा), 'बारबार तोहे क्या समझाऊ पायल की झंकार' (आरती) अशा चित्रपटांच्या गाण्यांमधून झळकलं. 'मेरी और उनकी प्रीत पुरानी' (नई दिल्ली) यांसारख्या गाण्यातून मराठमोळी लावणीही झळकली. संस्कृती संगीतशास्त्र (एथनो म्युझिकॉलॉजी) ही अलीकडच्या काळात विकसित झालेली ज्ञानशाखा आहे. भारतासारख्या देशात संगीताची अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अशी संस्कृती पसरलेली आहे. असं या शास्त्राचे शास्त्रज्ञ वारंवार सांगत असतात. त्याचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपट संगीतातून पहायला मिळतं, आणि 1950च्या दशकातलं चित्रपट संगीत याचा भरपूर पुरावा उपलब्ध करून देतं.

केवळ विविध प्रदेशांच्या लोकसंगीताच्या शैलींचा मिलाफ हा एक भाग झाला. परंतु विविध प्रकारची वादयं आणि त्यांचा नाद हाही तितकाच समृद्ध करणारा. बंगालच्या भक्तिसंगीतात वाजणारं 'खोल' हे एक तालवाद्य आपल्याकडील लोकसंगीतातील 'ढोलकी' आणि 'डफ'; तसंच पंजाबी 'ढोलक'. पाश्चात्य देशांतून आलेली 'चेलो', 'पियानो', 'अ‍ॅकॉर्डियन' आणि 'ट्रंपेट', 'सॅक्सफोन'सारखी अगणित वाद्यं इथे येतात आणि आपल्या जनप्रिय संगीताच्या माहौलमध्ये बेमालूमपणे मिसळून जातात. जे जुनं होतं त्याला कवटाळून बसायचं आणि नव्याला हिणवत रहायचं असा हेतू नाही. पण जुन्यातलं काय चांगलं होतं आणि ते का अक्षय आहे, हे समजून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

Tags: भारताच्या विविध भागातील संगीताचे फिल्मी संगीत द्वारे एकीकरण रेडियो ची महत्ता संगीत 50 आणि 60 दशकाचे Unification of India through the local music from different parts of the India Importance of Radio Music era of 50s and 60s weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके