डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतात सारंगी ऐकू येण्याचा हमखास प्रसंग म्हणजे आकाशवाणीवरचं शोकसंगीत. इकडे सारंगी वादनाचे कार्यक्रम ठरवायचे, म्हणजे आयोजक विचारतात की, 'इसको कौन सुनेगा?' आणि फ्रान्स, इटलीमध्ये आपल्या हॉटेलमध्ये सारंगी वाजत राहिली तर चार गिऱ्हाईक अधिक येतील असा मालकाला पक्का विश्वास वाटतो.

इटलीत 'टुरिनो' नावाचं शहर आहे.  या शहरात अनेक प्रकारची उपाहारगृहे आहेत. भारतीय पद्धतीचं जेवणखाण म्हणजे परदेशातल्या लोकांच्या दृष्टीने खास आकर्षण वाटावं असा प्रकार असतो.  भारतीय पद्धतीचे जेवणखाण म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर देणंही तसं कठीणच आहे. पंजाबी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, राजस्थानी, मराठी वगैरे अनेक पद्धती एकमेकांपासून आपलं वेगळेपण राखून आहेत. पुन्हा मराठी म्हटलं की वेगवेगळ्या जातींच्या किंवा महाराष्ट्रातल्या विविध भागांच्या लोकांच्या रुचीशी निगडित असे प्रकार आणि शैली आहेत.

हे सर्व 'भारतीय' या सदराखाली येतं.  पण तरीही 'भारतीय' आणि 'बिगर भारतीय' या दोन कोटी अगदी ढोबळ असल्या तरी वेगवेगळ्या दाखवता येतात.  तर अशा या 'टुरिनो' शहरात प्रामुख्याने पंजाबी पद्धतीचं भारतीय जेवण खिलवणारा मालक आपल्या उपाहारगृहाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगत होता, आणि तो केवळ सांगत होता असं नव्हे तर कान उघडे ठेवून वावरणाऱ्या सर्व गिऱ्हाईकांना ते स्पष्टपणे जाणवतही होतं.  हे वैशिष्ट्य कोणतं? तर गिऱ्हाईकांना खूष ठेवण्यासाठी आणि भोजनप्रक्रिया अधिक सुखकर व्हावी यासाठी तो जोडीला भारतीय संगीत आणि विशेषकरून 'सारंगी' वादनाच्या ध्वनिमुद्रिका लावत होता. 

'सारंगी' हे वाद्य गिहाईकांना आकर्षित करण्यासाठी इटलीतल्या टुरिनोसारख्या शहरात एखादा कल्पक उपाहारगृह संचालक वापरतो हे पाहून आणि प्रत्यक्ष ऐकून मी अक्षरशः थक्क झालो.  माझ्यात एक सारंगीप्रेमी पहिल्यापासून दडलेला आहे.  पण या वाद्याचा अशाप्रकारे उपयोग केला जाऊ शकतो हे स्वप्नातसुद्धा शक्य वाटलं नसतं.  सारंगीचा नाद भारतीय संगीताशी पूर्णपणे निगडित असा विशिष्ट नाद आहे. या नादावर माझ्यासारख्या संगीताच्या विश्वात 24 तास वावरणारा मनुष्य फिदा असणं एकवेळ समजण्यासारखं आहे.  पण टुरिनो शहरातला 'खवैय्या' ही त्यावर लुब्ध असावा! ही गोष्ट अद्भुत वाटते.  आपल्या मधुर नादाने अनेक प्रकारच्या संस्कृतीमधल्या लोकांना भुरळ घालणारी ही सारंगी आली कुठून? 'बाडे इन्स्ट्रुमेंट' किंवा 'गजाचं वाद्य' हे अधिक प्रदीर्घ मुदतीचा नाद निर्माण करते.  तंतुवाद्यातून निर्माण होणारा नाद हा आघातातून निर्माण होत असल्यामुळे त्याची लांबी मर्यादित असते.  आपल्याकडल्या दंतकथेनुसार सारंगी हे वाद्य म्हणजे 'रावणहत्या' या लोकसंगीतातल्या वाघाचं विकसित आणि उन्नत स्वरूप आहे.  'रावणहत्या' या वाद्याच्या नावावरूनच लक्षात येतं की त्याचा संबंध रावणाशी आहे.

सध्याच्या काळात राजकारणात रामाचं प्रस्थ इतकं वाढलं आहे की रामाशिवाय अजूनही काही मंडळींचं पान हलत नाही.  मुंबईत भाजपचं रौप्यमहोत्सवी अधिवेशन नुकतंच पार पडलं. त्यात पुन्हा रामनामाचा जप करण्यात आला आणि अयोध्येत 'त्याच' जागेवर 'वही' मंदिर बांधायची प्रतिज्ञा नवनियुक्त अध्यक्षांनी केली. या साऱ्या गदारोळात रावण महाशयांच्या कामगिरीकडे किंवा 'काँट्रिब्यूशन'कडे सर्वांचं दुर्लक्ष झालं नाही तरच नवल.  श्रीलंकाधिपती रावण हा शिवभक्त होता आणि शिवाची आराधना करण्यासाठी तो संगीताचे माध्यम वापरत असे ही गोष्ट तशी सर्वांच्याच परिचयाची आहे.  पूर्वी आपल्या मराठी भाषेत लंकादहन आणि तत्सम विषयावर एक चित्रपट निघाला होता. त्यात रावणाच्या तोंडी एक गाणं होतं.  संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी रचलेलं हे गाणं चित्रपटातल्या इतर गाण्यांपेक्षा अधिक लोकप्रिय ठरलं.  

त्या गाण्याचा मुखडा होता, 'रम्य ही स्वर्गाहुनी लंका'. पु. ल.  देशपांडेंच्या नावावर या संदर्भातला एक विनोद नेहमी खपवला जातो.  म्हणे पुलंनी वसंत देसाईंना विचारलं, "रावणाच्या गाण्यासाठी उसना आवाज कुणाचा वापरला आहे?" वसंत देसाई म्हणाले "भीमसेन जोशींचा", त्यावर पु. ल. 
म्हणाले, "हो! रावणासाठी गायला रावणच पाहिजे. " भीमसेननी गायलेलं हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं. आज या संगीतप्रेमी रावणाकडे रावणहत्याचं आणि पर्यायाने सारंगीचं जनकत्व जातं असा एक मतप्रवाह आहे.  दक्षिण भारतात अप्पार स्वामिगल अथवा थिकनब्बू क्कारसार आणि थिकज्ञासंबंदर हे संत कवी होऊन गेले. ते शिवभक्त होते. त्यांनी केलेल्या शिवस्तुतीपर रचनांमध्ये अशी एक गोष्ट आहे की रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतापलेल्या शंकराने त्याला पर्वताखाली चिरडायचं ठरवलं.  अशा संतप्त शंकरापुढे रावणाने आधी शिरसाष्टांग नमस्कार घातला आणि नंतर त्याने सात तारांचं एक वाद्य वाजवून शंकराचं मन प्रसन्न केलं.  तोच हा रावणहत्या आणि सारंगीचा पूर्वज.  

मुसलमानांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांनुसार सारंगीची निर्मिती एका विद्वान हकिमाकडून झाली.  एकदा तो दूरच्या प्रवासाला पायी निघाला होता.  उन्हाने आणि चालण्याच्या श्रमामुळे तो थकून गेला आणि एका विस्तीर्ण वृक्षाखाली काही काळ विसावला.  इतक्यात त्याच्या कानावर संगीताचे मधुर स्वर येऊ लागले.  काही केल्या तो आवाज कुठून येतो आहे हे त्याला कळेना. शेवटी त्याने वर पाहिले तेव्हा कळलं की एका मृत माकडाचं कातडं झाडाच्या दोन फांद्यांमध्ये ताणलं गेलं होतं आणि त्यावरून वारा वहात असल्यामुळे कर्णमधुर नादाची निर्मिती होत होती. त्याने ती चामडी झाडावरून उतरवली आणि लाकडी सांगाड्यावर चढवली.  त्यातून आजची सारंगी निर्माण झाली.  संगीतातली विविध वाद्यं आणि त्यांच्या निर्मितीबद्दलच्या कथा आणि दंतकथा अत्यंत चित्तवेधक असतात.  त्यात मालमसाला आणि तिखटमीठ असलं तरी सत्याचा अंशही असतोच. अशी ही सारंगी ख्यालाचा निर्माता 'सदारंग' किंवा 'सारंग' याच्या नावाशीही निगडित आहे.  'ख्याल' या गायनशैलीची निर्मिती 18व्या शतकाच्या मध्याला मोगल सम्राट महंमदशाह रंगीले याच्या दरबारातल्या गायकांनी केली, पण त्यासंबंधी नंतर कधीतरी. 

तर मानवी आवाजाच्या सर्वाधिक जवळ जाणाऱ्या सारंगीने अवघ्या जगाला वेड लावलं. येहुदी मेनुहीन सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा व्हायोलिनवादक रामनारायण या आपल्याकडल्या जगद्विख्यात वादकाची सारंगी ऐकून चकित झाला आणि म्हणाला की मला याच्याबरोबर जुगलबंदी करायला आवडेल.  सारंगी वाजवायला आणि शिकायला महाकठीण आणि मुळात हे साथसंगतीचं वाद्य.  फ्रान्समधून पैदा झालेली आणि पुढे युरोपातून हद्दपार झालेली हार्मोनियम 19व्या शतकात आली आणि ती वाजवायला तसंच हाताळायला सोपी होती. तिने सारंगीला हळुहळू स्थानभ्रष्ट करायला सुरुवात केली.  आर्य समाजाने हिंदू धर्मात सुधारणा करायचा प्रयत्न केला तिथवर ठीक होतं.  

पण शुद्धीकरणाचा आर्य समाजाने हव्यास धरला आणि त्यातून आचरट शुद्धीकरणाला प्रारंभ झाला. नाचगाणी करणाऱ्या तवायफ कलावंतीणींबरोबर संगीतासाठी 'सारंगी' हे वाद्य असे म्हणून त्यावर 'कोठी' संस्कृतीचा शिक्का मारण्यात आला आणि ते त्याज्य ठरवण्यात आलं.  या सर्वांचा संकलित परिणाम असा झाला की आजही जगाला वेड लावणारी सारंगी भारतात मात्र मागे पडत गेली. भारतात सारंगी ऐकू येण्याचा हमखास प्रसंग म्हणजे आकाशवाणीवरचं शोकसंगीत. इकडे सारंगी वादनाचे कार्यक्रम ठरवायचे, म्हणजे आयोजक विचारतात की, 'इसको कौन सुनेगा?' आणि फ्रान्स, इटलीमध्ये आपल्या हॉटेलमध्ये सारंगी वाजत राहिली तर चार गिऱ्हाईक अधिक येतील असा मालकाला पक्का विश्वास वाटतो. आहे की नाही गंमत?

Tags: आर्य समाज रामनारायण ख्याल संगीत शंकर रावण इटली अमरेंद्र धनेश्वर संगीत  सारंगी Shankar Arya Samaj Ramnarayan Khyal music Ravan Italy Amrendra Dhaneshwar Music Sarangi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके