डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गायकाचा आवाज शरीरातून किंवा मुखावाटे निघण्याची प्रक्रिया खुद्द गायकालाच इतकी कष्टप्रद वाटत असेल तर ऐकणाऱ्याला ती कशी वाटेल, याचा विचार कोण करणार? ग्वाल्हेर घराण्यात पूर्वी आवाजाचा गुण सांगताना अशी उपमा देत की जो सुईच्या अग्रासारखा निमुळता असला पाहिजे आणि हत्तीच्या पायाइतका वजनदार आणि भरीव असला पाहिजे. या दोन्ही टोकांना एकत्र गुंफणं ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी निश्चितच कष्टसाध्य आहे यात शंका नाही.

'नाम गुम जाएगा, चेहरा भी बदल जाएगा 
मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे'

अशा ओळी एका लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतात येतात. हे गाणं पंधरा-वीस वर्षांपूर्वी अनेकांच्या ओठांवर होतं. यात 'आवाज' या गोष्टीबद्दल फार महत्त्वाचं विधान आहे असं मला वाटतं. 'माझा आवाज म्हणजेच माझी ओळख' असं हे विधान, गाण्याचा प्रकार कोणताही असो; गाणाऱ्याचा आवाज कसा आहे आणि तो कितपत व्यक्त करू शकतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आवाज या गोष्टीवर गाणाऱ्याची सर्व मदार आहे असं मानलं जातं. एखाद्या गायकाचं संपूर्ण व्यक्तिमत्त्वच त्याच्या आवाजातून साकार होतं असंही मानलं जातं. आवाज या माणसाच्या गुणधर्माचं शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा माझा उद्देश नाही. परंतु आवाज आणि संगीतातील अभिव्यक्ती यांच्या समीकरणाचा शोध घेण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे.

आवाजाबद्दल माणसांच्या ठरावीक कल्पना असतात. एखाद्या गायकाबद्दल नाकं मुरडताना काही जण म्हणतात. ‘‘बाकी सर्व ठीक आहे हो! पण 'आवाज’ पाहिजे ना! देवाने 'आवाज' दिला नाही बिचाऱ्याला!" समाजवादी चळवळीतले त्यागी आणि निष्ठावंत, विचारवंत साथी विनायकराव कुलकर्णी आणि मधु लिमये यांचे अनेक विषयांवर मैत्रीपूर्ण वाद चालत आणि रंगतही. त्यापैकी एक विषय म्हणजे कंठसंगीत विरुद्ध वाद्यसंगीत. लिमये सर्व प्रकारचं संगीत चवीने ऐकत. अली अकबर खानांचा सरोद, रविशंकर-विलायत खान-अब्दुल हलीमजापूरखान-इमसखान यांची सतारही ते ज्या प्रेमाने कुमार गंधर्वांचं किंवा भीमसेनचं गाणं ऐकत तितक्याच प्रेमाने ऐकत. एखाद्याच्या वादनाची ते विनायकरावांकडे वाखाणणी करायला लागले की विनायकराव लिमयेंना मध्येच रोखत आणि म्हणत, "छ्‌या! पण 'नरडं’ नाही तर काय उपयोग?" यावरून असा अर्थ लागतो की, माणसाच्या कंठातून अथवा गळ्यातून जे व्यक्त होऊ शकतं ते इतर कोणत्याही वाद्यातून होत नाही असं विनायकरावांसारख्या श्रोत्याला वाटत असतं. मधु लिमयेंबाबत आणखी एक आठवण सांगितली पाहिजे. कारण ती या विषयाशी निगडित आहे. एकदा 'दादर माटुंगा कल्चरल सेंटर’च्या सभागृहात ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीवर एक कार्यक्रम होता. त्यातील पूर्वार्धात माझी पत्नी आणि गुरू नीला भागवत गायली. आणि उत्तरार्धात मुंबईतील एक बुजुर्ग गायक गायले. लिमये त्या कार्यक्रमाला आले होते. उत्तरार्धातल्या बुवांचं गाणं सुरू झाल्यावर लिमयेंनी दहा मिनिटांच्या आत 'सभात्याग' केला. मी त्यांच्याबरोबर अदबीने बाहेर आलो तेव्हा ते म्हणाले, "हा बुवा विद्वान असेल! पण त्याचा आवाज 'सखा' आहे." 'सखा' म्हणजे लिमयेंना काय अभिप्रेत होतं? त्या बुवांचा आवाज आणि म्हणून गाणं कोरडं आणि शुष्क आहे असं लिमयेंना वाटत होतं. लिमये किंवा विनायकराव हे तज्ज्ञ नव्हेत. पण गाण्याचा स्वीकार करण्याची किंवा ते ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्यात होतीच.

अनेकदा असं वाटतं की, ऐकणाऱ्याचं आवाजाबद्दलचं ‘आकलन' आणि 'मूल्यमापन' व्यक्तिसापेक्ष असतं. क्ष गायकाचा आवाज एखाद्याला अत्यंत आवडतो अथवा गोड वाटतो; दुसऱ्याला तो रुक्ष किंवा रठ्ठ वाटू शकतो. एखाद्या गायिकेला कुणी 'नाईटिंगेल' म्हणेल; तर कुणी म्हणेल ‘‘काय ही बाई किंकाळ्या फोडून गात आहे!’’ पुन्हा ज्या प्रकारचं संगीत तुम्ही गाता त्यावरही बरंच काही अवलंबून असतं. शाहीर अमर शेख जेव्हा शिवाजी पार्कच्या मैदानावर डफावर थाप देऊन 'सुटला वादळी वारा' गात असत, तेव्हा त्यांच्या आवाजातील रांगडेपणा आणि त्याची फेक ऐकणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उठवत असे. पण जाहिरातीतील जिंगल्समध्ये किंवा दूरचित्रवाणी मालिकेच्या पार्श्वसंगीतात देवकी पंडितसारखी गायिका ज्या लकेरी घेते, त्या रागदारी संगीतात अस्थानी वाटतात. त्या आवाज या गोष्टीवर बरंच काही अवलंबून असतं. आवाजाची कितपत खोली, कुठे आणि कशी वापरली जाते यालाही महत्त्व असते. आवाजाचा एक वरवरचा स्तर असतो आणि एक गर्भातून उमटणारा स्तर असतो. कुठला स्तर किती प्रमाणात वापरला जातो, यावर या आवाजाने श्रोता कितपत प्रभावीत होतो हेही ठरत असतं.

जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक नाटक आहे. त्याचं नाव आहे 'डॉक्टर्स डिलेमा'. त्यात शॉने एका पात्राच्या तोंडी एक वाक्य घातले आहे.... "क्लोरोफॉर्म हॅड एनेबल्ड एव्हरी फूल, टु बिकम ए सर्जन," म्हणजे माणसाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्याचं जे तंत्रज्ञान विकसित झालं, त्यामुळे कुठल्याही मूर्खाला शल्यविशारद बनणं शक्य झालं. यातला अतिरेक सोडून देऊ या, पण आवाजाच्या किंवा गाण्याच्या बाबतीत हे लक्षात येतं की आवाजाचा ‘व्हॉल्युम' (ध्वनिशक्ती) हा एरवी कळत नाही, पण ज्या आवाजाला 'व्हॉल्युम’ नसेल तो आवाज तितकासा परिणाम साधू शकत नाही. पूर्वीच्या काळात ध्वनिवर्धक नसत. त्यामुळे गायकाला त्या परिस्थितीत आपलं गाणं पोचवावं लागे. त्या काळात पुरुष वरच्या पट्टीत म्हणजे पांढरी चारमध्ये गात. वयोमानानुसार ही पट्टी खाली उतरवली पाहिजे. भीमसेन जोशी किंवा मल्लिकार्जुन मन्सूर हे पांढरी चारवरून काळी एकवर आले आणि त्यांनी योग्यच केलं. पण आवाज पोहोचवण्यासाठी जो रियाझ केला जात असे, त्यातून स्वाभाविकपणेच व्हॉल्युमची जोपासना होत असे. आताच्या जमान्यातले गायक याकडे दुर्लक्ष  करू शकतात. कारण ते 'माइक’चे गुलाम असतात. पाश्चात्त्य देशात अनेक ठिकाणी सभागृहांची रचना अशा प्रकारे केलेली असते की मायक्रोफोनची गरज लागू नये. 'मायक्रोफोन'मुळे गाणाऱ्याचा खरा आवाज कळत नाही आणि आवाजाची 'मोडतोड' होते, असं मानणारा एक वर्ग फक्त पाश्चात्त्य देशांतच आहे असं नाही, इथेही आहे. पु.ल. देशपांडे जेव्हा एनसीपीएचे संचालक होते तेव्हा मायक्रोफोनशिवाय मैफली आयोजित करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. इंदिरा गांधींच्या हस्ते टाटा सभागृहाचं उद्घाटन झालं. त्यानंतर तिथे मैफली सुरू झाल्या तेव्हा 'माईक' नसेच. पण नंतर तो दिसू लागला आणि ‘ऐकू' येऊ लागला. लिटल थिएटरबाबत तर आयोजकांचा फारच आग्रह असे. आज लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेल्या दोन गायकांचे माइकविरहित कार्यक्रम तिथे ऐकले होते. या गायकांचे कार्यक्रम निष्प्रभ झाल्याचं फक्कं आठवतं. जयतीर्थ मेबुंडी आणि संजीव अभ्यंकर! या दोघांनीही गाण्यावर मेहनत केली आहे किंवा तानेवर प्रभुत्व मिळवलं आहे यात वादच नाही. पण 'व्हॉल्युम' जोपासनेकडे लक्ष दिलेलं नाही हे ध्यानात येत. 

प्रा. बा. र. देवधरांनी आपले आवाज जोपासना शास्त्रातील गुरू जिओव्हानी स्क्रिंझी यांच्याबद्दल लिहिलं आहे. 1922 साली विष्णू दिगंबर पलुस्करांनी सँडहर्स्ट रोडवरच्या गांधर्व महाविद्यालयाच्या पटांगणात संगीत परिषद भरवली होती. त्या वेळी त्या काळातील दिग्गज कलाकार गायनासाठी उपस्थित होते. गायकांचं खाकरणं, खोकणं, अंगाला हिसडे देऊन आवाज गळ्यातून काढणं, चेहरा वेडावाकडा करणं, अंगविक्षेप करणं हे आवश्यक आहे का, असा प्रश्न स्क्रिंझींना आणि देवधरांना पडला. आवाज शरीरातून किंवा मुखावाटे निघण्याची प्रक्रिया खुद्द गायकालाच इतकी कष्टप्रद वाटत असेल तर ऐकणाऱ्याला ती कशी वाटेल? याचा विचार कोण करणार? ग्वाल्हेर घराण्यात पूर्वी आवाजाचा गुण सांगताना अशी उपमा देत की जो सुईच्या अग्रासारखा निमुळता असला पाहिजे आणि हत्तीच्या पायाइतका वजनदार आणि भरीव असला पाहिजे. या दोन्ही टोकांना एकत्र गुंफणं ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी निश्चितच कष्टसाध्य आहे यात शंका नाही. आवाज आणि गाणं या विषयावरचं हे मुक्त चिंतन आणखी पुढेही नेता येईल.

Tags: कंठसंगीत व वाद्यसंगीत ‘व्हॉल्युम’ जोपासना आवाज आणि गाणे ‘आवाज की दुनिया’ Voice Music and Instrumental Music ‘Volume’ Preservation Voice and Song ‘World of Voice’ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके