डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आशा खाडिलकरांच्या ‘वद जाऊ कुणाला' आणि 'जोहार मायबाप’ मध्ये तारुण्यसुलभ जोम होता. त्यांच्या आवाजाची फेक प्रभावी होती. कुमार गंधर्वांना 'भैरवी'चा मान मिळाला हे उचितच होतं. गंधर्वगायकीवर अधिकारवाणीने पण संवेदनशीलतेने बोलणारे आणि तिचं प्रात्यक्षिक दाखवणारे तेच आहेत. 'नयने लाजवीत' हा धीमा 'कल्याण' आणि ‘प्रभू अजि गमला' ही चपळ भैरवी विशेष रंगली.

गुरुवार तारीख 25 जून 1987! 25 जून या दिवसाबरोबर आपण भारताच्या इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट कालखंडाशी नातं जोडतो. पण परवाचा 25 जून वेगळा होता. हा दिवस महाराष्ट्रातल्या तमाम सुसंस्कृत जनांच्या दृष्टीने आगळा आणि महत्वाचा दिवस होता. कारण या दिवशी 'बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षा' ची नांदी झाली. मुंबईच्या रवीन्द्र नाट्य मंदिरात हजारो प्रेक्षकांनी मध्यरात्र जागवून गंधर्वांच्या शताब्दीचं दोन्ही हात पसरून स्वागत केलं. एच्. एम्. व्ही. आणि विल् टेक् या कंपन्यांनी पुरस्कृत केलेला कार्यक्रम म्हणजे 1987 तली मोठी सांस्कृतिक घटना होती असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

या 'नयनोत्सवाचं' दृश्य पहाण्यासारखं होतं. रवीन्द्र नाट्यमंदिर प्रकाशानं न्हाऊन निघालं होतं. सर्वत्र 'मोगरा फुलला' होता. ठेवणीतले कपडे काढून लोक आनंदोत्सवात सामील झाले होते. रोषणाई होती, झगमगाट होता. पण भपका नव्हता. समारंभ होता; पण औपचारिकपणाचा लवलेश नव्हता. अत्यंत मोकळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा समारंभ पार पडला याचं मुख्य श्रेय सूत्रधार वसंत बापट यांच्या संचालनाचं!

वसंत शांताराम देसाई आणि वसंत कानेटकर यांची समयोचित भाषणं या प्रसंगी झाली. देसाईंनी तरुण पिढीला असे आवाहन केल की, त्यांनी बालगंधर्वांची गायकी अभ्यासून छोखून आपल्या गळी बसवण्याचा प्रयत्न करावा. वसंत कानेटकर यांनी संगीत नाटकांच्या ऐतिहासिक संदर्भात गंधर्वांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. 'जागतिक रंगभूमीला मराठी रंगभूमीने दिलेली देणगी' असं बालगंधर्वांचं वर्णन अल् काझींनी केलं होतं. त्याचा उल्लेख कानेटकरांनी केला. आपल्या 'मत्स्यगंधा' नाटकावर गंधर्व- युगाचा प्रभाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. 'मत्स्यगंधा या नाटकाला गंधर्वांनी अप्रत्यक्षपणे कशी दाद दिली? देवा मला या नाटकात काम करायला आवडलं असतं,' असं सांगून!

या कार्यक्रमाला बालगंधर्वांच्या कन्या नलिनी वाबळे उपस्थित होत्या. त्यांनी 'मम आत्मा गमला' हे पद उत्तम ढंगात सादर केलं. गंधर्वांचे खास खटके त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळाले. राम मराठे यांनी दोन अभंग सादर केले. गंधर्व आणि मास्तर कृष्णराव यांची गायकी त्यांच्या गळ्यातून साकार झाली. जयमाला शिलेदार यांनी 'खरा तो प्रेमा' आणि 'पतित तू पावना' ही दोन पद म्हटली. त्यांच्या गाण्यात खास लाडिकपणा होता. दुसऱ्या पदातला 'नारायणा' हा शब्द त्यांनी बहुधा हेतुपुरस्सर खेळवला असावा. त्यातून वेगळा परिणाम साधला गेला. आशा खाडिलकरांच्या ‘वद जाऊ कुणाला' आणि 'जोहार मायबाप’ मध्ये तारुण्यसुलभ जोम होता. त्यांच्या आवाजाची फेक प्रभावी होती. कुमार गंधर्वांना 'भैरवी'चा मान मिळाला हे उचितच होतं. गंधर्वगायकीवर अधिकारवाणीने पण संवेदनशीलतेने बोलणारे आणि तिचं प्रात्यक्षिक दाखवणारे तेच आहेत. 'नयने लाजवीत' हा धीमा 'कल्याण' आणि ‘प्रभू अजि गमला' ही चपळ भैरवी विशेष रंगली. 'प्रभु अजि'तल्या लडिवाळ तानांच्या लडी मोहक होत्या. एकूण सर्वांची गाणी, गाणारे आणि ऐकणारे यांच्यातला दुजा भाव मिटवणारी होती. 

गंधर्वांवर अरुण आठल्येंनी बनवलेला स्लाईड-शो नेत्रदीपक होता. ‘स्वयंवरा'तल्या पोझचा सुरुवातीचा क्लोज-अप पाहूनच 'दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी' अशी स्थिती झाली. हा देखणा शो सर्वत्र दाखवला पाहिजे.

केन्द्रीय मंत्री वसंत साठे यांनी गंधर्वांच्या नव्या तबकडीचं प्रकाशन केलं. ते या समारंभाला आवर्जून उपस्थित राहिले. वसंत बापटांनी 'सोनियाचा दिवस' म्हणून या दिवसाचा उल्लेख केला. वसंत साठेंनी त्याचा पुनरुच्चार केला. आणि गंमत अशी की बापटांना 'सोनियाचा' जो अर्थ अभिप्रेत होता तोच साठ्यांना होता!

Tags: वसंत शांताराम देसाई नलिनी वाबळे रवींद्र नाट्य मंदिर वसंत बापट वसंत कानेटकर बालगंधर्व Vasant Shantaram Desai Nalini Wable Ravindra Natya Mandir Vasant Bapat Vasant Kanetkar Balgandharva weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके