डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आयुष्यात पर्पज असणे हे महत्त्वाचे वाटत असले तरी त्या पर्पजची मुळात संकल्पनाच चुकीची असेल, तर पर्पज कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी तो काही मिळणार नाही. अंगठी हरवली एकीकडे आणि शोधतो आहोत दुसरीकडे, अशी ती अवस्था होईल. भारताच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने पर्पजयुक्त जीवन जगायचे असेल तर- त्यांनी सक्रियपणे लांब पल्ल्यांच्या ध्येयाचा शोध घेणे, ते करत असताना वैयक्तिक अर्थपूर्णतेचा विचार करणे आणि निव्वळ मी व माझे जग अशा संकुचित विचारांच्या सीमा ओलांडून काम करणे उचित ठरेल. हा प्रवास सुकर होण्यासाठी पालक, शिक्षक, ॲकॅडेमिशियन्स, वरिष्ठ सहकारी, मेंटॉर्स, पॉलिसी मेकर्स आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःला काय करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करणे ही काळाची गरज आहे.  

‘युथ इन इंडिया-2017’च्या अहवालानुसार, भारताची 22 टक्के लोकसंख्या 18-29 वर्षे वयोगटात येते. हा तरुणवर्गाचा आकडा 26 कोटी म्हणजे पाकिस्तानच्या पूर्ण लोकसंख्येपेक्षासुद्धा जास्त आहे. भारताला जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न या युवावर्गाच्या उपयुक्त सहभागाशिवाय, त्यांच्या प्रगतीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. थोडक्यात, हा तरुणवर्ग आपल्या देशाचा चेहरा, भविष्य आणि खूप मोठे सामर्थ्य आहे. त्यांच्याशिवाय नवराष्ट्रनिर्मितीचा पाया रचणे शक्य नाही. 

शास्त्रीय भाषेत 18-29 वर्षे या वयोगटाला ‘इमर्जिंग ॲडल्टहूड’ असे म्हणतात. पाश्चात्त्य देशांत या वयोगटावर बरेच संशोधन झालेले दिसते. या वर्गाची वैशिष्ट्ये काय, त्यांचा ट्रेंड काय, त्यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे- त्यांना कुठले प्रश्न पडतात, यावर संशोधन झालेले दिसते. अर्थातच त्यांच्या प्रश्नांवर काम केले जाते. याउलट, भारतात मात्र तरुणांचा विकास कसा करावा, त्यांना समृद्ध बनण्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावर कोणतीही पद्धती अथवा कार्यप्रणाली अस्तित्वात नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि सामाजिक बदल घडवू इच्छिणाऱ्या युवकांना संघटित व संवर्धित करण्यासाठी ‘निर्माण’ या युवा उपक्रमाची सुरुवात झाली. सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ.अभय बंग व पद्मश्री डॉ. राणी बंग आणि एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक श्री.विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माणने गेल्या दशकात भारतातील 20 राज्यांतील हजारो तरुणांसोबत काम केलेले आहे. 

गेली चार वर्षे निर्माणच्या शैक्षणिक प्रक्रियेत सामील झालेल्या इमर्जिंग ॲडल्ट्‌सना, ‘सध्याच्या घडीला तुम्हाला कुठले प्रश्न पडतात?’ असे आम्ही विचारले. तेव्हाअस्तित्व आणि आध्यात्मिक प्रकारांच्या प्रश्नांच्या श्रेणीमध्ये ‘माझा पर्पज काय?’, ‘मी कोण?’, ‘माझा जन्म कशासाठी झाला?’, ‘माझ्या जीवनाचा अर्थ काय?’ असे प्रश्न सर्वाधिक पडतात, हे दिसून आले. हे सगळे प्रश्न व्यक्तीच्या जीवनातील पर्पजशी निगडित आहेत. 

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील सुप्रसिद्ध व्यवस्थापनाचे प्राध्यापक क्लेटन क्रिस्टनसन असे म्हणतात, 'If young people take the time to figure out their life purpose, they'll look back on it as the most important thing they discovered. But without a purpose, life can become hollow. जीवनातील पर्पज हा या तरुण पिढीच्या विकासाचा एक महत्त्वाचा निर्णायक घटक आहे. 

विल्यम डेमॉन व केंडल ब्राँक या मानसशास्त्रातील अमेरिकन संशोधकांनी तेथील तरुणांवर केलेल्या पर्पजच्या अनेक दशकांच्या अभ्यासावरून ‘पर्पज म्हणजे नक्की काय?’ याची व्याख्या बनवली. त्या अनुसार, A purpose in life is a stable and generalized intention to accomplish something that is at once personally meaningful and at the same time leads to productive engagement with some aspect of the world beyond the self. 

या व्याख्येनुसार पर्पजच्या रचनेत मुख्यतः तीन घटक अंतर्भूत आहेत. पहिला- दूर क्षितिजापलीकडील ध्येये म्हणजेच जीवनाची अंतिम गोल्स (Far horizon aims). वीकएंडला ट्रेकिंगला जाणे, पीजीची (पोस्टग्रॅजुएट) परीक्षा पास करणे किंवा डॉक्टर बनणे याला तुमच्या आयुष्याचा पर्पज म्हणता येणार नाही. ते काही जीवनाचे अंतिम ध्येय नव्हे. परीक्षा, डिग्री, ट्रेकिंग या साऱ्या काही दिवसांत किंवा वर्षांत पूर्ण होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजेच ती शॉर्ट-टर्म गोल्स आहेत. याउलट, एखाद्या गावाची अथवा शहराची आरोग्यव्यवस्था सुधारणे, एखादी नवी कंपनी काढून त्याद्वारे गावांतील 100 युवांना रोजगार देणे- लांब पल्ल्यांची अथवा अंतिम ध्येये म्हणता येतील. 

दुसरा घटक पर्पजच्या वैयक्तिक अर्थपूर्णतेला महत्त्व देतो (Personal Meaningfulness). आयुष्याचे ध्येय साध्य करत असताना तुम्हाला त्यातून किती आनंद मिळतो? ते पूर्ण करीत असताना आतून कोणती प्रेरणा मिळते? काम करताना मागे वळून बघितल्यावर समाधानी असल्याची भावना निर्माण होते का? पर्पज स्वतःला अर्थपूर्ण वाटणेही खूप महत्त्वाचे आहे, कारण तसे असेल तरच वाटेत कितीही आव्हाने व अडचणी आल्या, तरीही ती व्यक्ती स्वतः कृतिशीलपणे आणि जबाबदारी घेऊन त्याच्या ध्येयाकडे सतत वाटचाल करत राहील. उदा.- आरोग्यव्यवस्था सुधारणे या ध्येयाने प्रेरित असाल तर मेडिकलच्या कॉलेजमधला पाच वर्षांचा अभ्यास, त्यानंतर ग्रामीण भागात करावी लागणारी आरोग्यसेवा याचे बाकी कितीही अडचणी आल्या तरी ओझे वाटत नाही. आज अनेक युवांमध्ये पर्सनल मीनिंगफुलनेसपेक्षा पॅरेन्ट विशफुलनेस आणि पिअर ट्रेंडफुलनेस दुर्दैवाने जास्त बघायला मिळतो. म्हणजे कामाची किंवा जीवनातील इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची निवड करताना मला काय अर्थपूर्ण वाटतं, माझ्या मूल्यांशी काय सुसंगत आहे- यापेक्षा पालकांची काय अपेक्षा वा आकांक्षा आहे, इतर मित्र काय करत आहेत, सध्या काय ट्रेंड आहे, याला अवास्तव महत्त्व दिले जाताना दिसते. यामुळे नजीकच्या काळात सुरक्षितता वाटू शकते पण लांब पल्ल्यामध्ये घुसमट तयार होते, फ्रस्ट्रेशन तरी वाढते किंवा ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी निमूटपणाची प्रवृत्ती वाढीस लागते. पैसे व बाकी अनेक सुविधा मिळतात म्हणून आय.टी क्षेत्रात आहे, पण काम करण्याची दुसरी कुठलीही प्रेरणा नाही असे अनेक जण आढळतात. पद आणि पॅकेज सोडून कामात दुसरा कुठलाही हेतू नसेल, तर अशा जगण्याला/पर्पजला फारसा अर्थ उरत नाही. पर्पज म्हणजे अशी मौल्यवान चीज- जिच्यासाठी अख्खं आयुष्य झोकून द्यावेसे वाटणे! 

तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे, स्वच्या पलीकडे जाऊन इतरांना मदत करण्याची प्रेरणा (Beyondthe self Orientation). माझ्या पर्पजचा मी सोडून इतरांना काही उपयोग होतो का? सेलिब्रिटी बनणे किंवा सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनणे हे आयुष्याचे लांब पल्ल्याचे ध्येय असू शकते, त्याने मला वैयक्तिक पातळीवर अर्थपूर्ण आणि समाधानीही वाटू शकते. पण या ध्येयाचा किमान काही अंश भाग तरी इतरांना मदत करण्यासाठी हवा; नाही तर अशी फक्तच वैयक्तिक मान्यता देणारी वा स्वत:भोवती घोटाळणारी ध्येये तुमचा पर्पज दर्शवत नाहीत, असे या विषयातील अग्रगण्य संशोधकांचे म्हणणे आहे. किंबहुना, पर्पजची व्याख्याच तसे बाध्य करते. स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पैसे कमविणे स्वतःपलीकडचा पर्पज असू शकतो, परंतु यासोबतच एक व्यापक मार्गदेखील असू  शकतो. तुम्ही या जगात कोणता बदल घडवून आणू इच्छिता/शकता? तुमचा पर्पज तुमच्यासोबतच आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो का? हा आहे प्रो-सोशल म्हणजेच सामाजिक पर्पजचा मार्ग! वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी काम करणे, दुष्काळी भागात भूजल पातळी वाढवणे, दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवणे- परिणामी आरोग्यव्यवस्था सुधारणे, हे सर्व पर्पज या प्रकारांत मोडतात. सामाजिक ध्येयांनी युक्त असलेला पर्पज हा त्या व्यक्तीच्या भविष्यातील निरंतर आरोग्याचा सर्वोत्तम प्रेडिक्टर/ अनुमानक आहे, हे सिद्ध झालेले आहे. लांब पल्ल्याचे ध्येय, वैयक्तिक अर्थपूर्णता आणि स्वच्या पलीकडची अभिमुखता या तिन्ही घटकांच्या योग्य प्रमाणातून, त्यांच्या संतुलित मिश्रणातून पर्पजची पौष्टिक रेसिपी बनते! 

भारतातील युवांना पर्पज या संकल्पनेबद्दल काय माहिती आहे, हे सांगणारी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. निर्माणच्या शैक्षणिक प्रक्रियेत निवड झालेल्या सध्याच्या बॅचमधील इमर्जिंग ॲडल्ट्‌सना ‘तुमच्या मते पर्पज म्हणजे काय?’ किंवा ‘पर्पज या संकल्पनेची तुमची समज काय?’ असा प्रश्न आम्ही विचारला. एकूण 149 जणांनी त्यांची उत्तरे नोंदवली. साधारणपणे एक परिच्छेदभर असलेल्या या प्रत्येक उत्तराला आम्ही पर्पजच्या वरील तीन घटकांमध्ये मोजले. त्यांत 28 टक्के युवांना पर्पज म्हणजे आयुष्याचे लांब पल्ल्याचे/अंतिम ध्येय साध्य करण्याचा हेतू, असे वाटते. 21 टक्के युवांच्या उत्तरांत पर्पजमध्ये वैयक्तिक अर्थपूर्णता हा घटक येतो आणि 26 टक्के युवांच्या उत्तरांत स्वतःपलीकडे काही तरी बदल घडवणे याचा उल्लेख आलेला आहे. तिन्ही घटक समाविष्ट करणाऱ्यांची संख्या फक्त 3 टक्के आहे आणि तब्बल 46 टक्के युवांच्या उत्तरांत यापैकी एकाही घटकाचा उल्लेख नाही. ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. युवांच्या फ्लारिशिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या घटकाविषयी त्यांच्या मनात अपरिपूर्ण समज असणे, हे फारसे आश्वासक वा समाधानकारक नाही. 

आयुष्यात पर्पज असणे हे महत्त्वाचे वाटत असले तरी त्या पर्पजची मुळात संकल्पनाच चुकीची असेल, तर पर्पज कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी तो काही मिळणार नाही. अंगठी हरवली एकीकडे आणि शोधतो आहोत दुसरीकडे, अशी ती अवस्था होईल. वयाच्या 50 व्या वर्षी एखाद्या गृहस्थाला आयुष्यभर चांगलं काम करून, स्वतःचं  घर-गाडी असे सर्व घेऊनही ‘काही तरी राहून गेले’ अशी अपूर्णतेची भावना ती याच कारणामुळे येत असावी का, असा प्रश्न पडतो. पर्पजचा अभाव हा मिडलाईफ क्रायसिसचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरुणपणात पर्पजची योग्य संकल्पना न कळाल्याने असे होत असावे का? अशा व्यक्ती कुठलेच ध्येय नसलेल्या असतात, असे नाही. पण ही ध्येये फक्तच ट्रेडमिलच्या टार्गेट्‌सप्रमाणे एकामागोमाग पूर्ण केली जातात का? ट्रेडमिलचे टार्गेटस म्हणजे जसे स्वास्थ्य नव्हे, तसेच शॉर्ट टर्म गोल्सचा संच म्हणजे पर्पज नव्हे! आत्ताच्या युवा पिढीची भविष्यात अशी अवस्था होऊ नये असे वाटत असेल, तर आधी पर्पज म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे निर्णायक ठरते. 

पर्पजबद्दलच्या अर्धवट माहितीव्यतिरिक्त, तरुणांना त्यांचा पर्पज मिळवण्यासाठी योग्य मार्ग शोधणे आणि त्यानुसार जगणेदेखील अवघड वाटते. पर्पजविषयी प्रश्न जरी पडत असले तरी ती काही तरी अवघड गोष्ट आहे, त्याच्याकडे नंतर बघू किंवा जे होईल ते होईल- असा पवित्रा अनेकदा घेतला जातो. शिवाय कॉलेजमधील मित्र- मैत्रिणी, नातेवाईक, शिक्षक यांच्यासोबत या विषयासंदर्भात फारसे बोलणे होत नाही व तसे वातावरण मिळत नाही. काही वेळा पर्पज महत्त्वाचा आहे हे माहिती असते; पण तो कसा मिळवायचा याबद्दल संदिग्धता असल्याने त्यांचे सध्याचे दिवस फक्त मन रमवण्यासाठी नेटफ्लिक्सवर सिरीज बघत राहणे, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम व व्हाट्‌सॲप या साधनांमध्येच व्यातीत जातात. 

जेव्हा एखाद्या तरुण मुलाला त्याच्या आयुष्यातील पर्पजबद्दल विचार करायची संधी मिळते आणि पुढे तो ठरवलेल्या पर्पजच्या मार्गावर वाटचाल करायचे जाणीवपूर्वक निवडतो, तेव्हा काय होते? 

डॉ. अक्षय वाघ मूळचा नाशिकचा! त्याने वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या सुप्रसिद्ध के.ई.एम. कॉलेजमधून पूर्ण केले. निर्माणच्या 8 व्या बॅचचा विद्यार्थी असलेला अक्षय असे म्हणतो, 'NIRMAN not only gave me amazing friends but also helped me to find the real me, and made me confident about my goal of social problem solving. Now, I have a glorious purpose to live!' मागच्या वर्षी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोविडच्या आव्हानात्मक काळात त्याने पूर्ण एक वर्ष गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिले. त्याने त्याचा पर्पज जगायला सुरवात केली होती- ज्यामुळे यू.जी. झाल्या-झाल्या लगेच पी.जी.च्या रॅट रेसमध्ये न अडकता जिथे गरज आहे तिथे वर्षभर सेवा देण्याचे सामर्थ्य त्याच्यात आले. त्या कामाकडे वळून बघताना ‘माझ्या 25 वर्षांच्या आयुष्यातील हे सर्वांत सुंदर वर्ष होते’, असे तो म्हणतो. आयुष्यात पर्पज मिळून त्यानुरूप जगण्यातील अशी ही सुंदरता आहे! अक्षयच्या बाबतीत जे घडले, ते भारतातील कोट्यवधी इतर युवांच्या बाबतीतही घडू शकेल? 

भारताच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने पर्पजयुक्त जीवन जगायचे असेल तर- त्यांनी सक्रियपणे लांब पल्ल्यांच्या ध्येयाचा शोध घेणे, ते करत असताना वैयक्तिक अर्थपूर्णतेचा विचार करणे आणि निव्वळ मी व माझे जग अशा संकुचित विचारांच्या सीमा ओलांडून काम करणे उचित ठरेल. हा प्रवास सुकर होण्यासाठी पालक, शिक्षक, ॲकॅडेमिशियन्स, वरिष्ठ सहकारी, मेंटॉर्स, पॉलिसी मेकर्स आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःला काय करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करणे ही काळाची गरज आहे. Lives of the youth are not a product to be sold in Profit Economy but an ocean to be explored in the Purpose Ecology.  

- अमृत बंग, प्रकल्पप्रमुख - निर्माण 
- जुई जामसांडेकर, प्रकल्प समन्वयक - निर्माण सर्च, गडचिरोली – 442605

nirman@gmail.com,
Website:  https://nirman.mkcl.org/  

युवांना स्वत:च्या पर्पजविषयी विचार करायला चालना मिळावी आणि काही उपयुक्त मदत मिळावी, म्हणून निर्माणने भारतातील अशी एक ‘युथ पर्पज प्रश्नावली’ प्रथमच विकसित केली आहे. ही मराठी व इंग्रजीमध्ये पूर्णत: ऑनलाईन उपलब्ध असून https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर बघता येईल. युवांच्या सर्वांगीण विकासाकरिता, फ्लरिशिंगकरता पर्पज जसा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तसे इतर घटक काय; तरुणांचा विकास म्हणजे नेमकं काय- याकरता निर्माणने एक सैद्धांतिक प्रारूप तयार केले आहे. हे ‘निर्माण युथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क’ https://nirman.mkcl.org/media/nirman-youthflourishing-framework  या संकेतस्थळावर बघता येईल.     

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके