डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मूळ तुळू कविता : अमृत सोमेश्वर : जन्म : 1935. 
तुळू व कन्नड भाषांत लेखन. तुळूमध्ये दोन कवितासंग्रह, सहा नाटके, दोन अनुवादित पुस्तके. 
कन्नडमध्ये सतरा यक्षगाने व चार कथासंग्रह. मानव संसाधन विभाग पारितोषिक व कर्नाटक साहित्य अकादमी पारितोषिक.
पत्ता : ‘ओलुमे', कोटेकर, 574152 डी. के., कर्नाटक.
 

माझे घर आहे जुनंपानं-
फार पूर्वीच डागडुजी केलेलं-
त्याचा तळ प्राचीन; भिंती नव्यानं उभारलेल्या
आणि त्याचं छत कालच दुरुस्त केलेलं.

जुना, गंभीर, हलता पलंग
पूर्वेकडच्या निवांत कोपऱ्यात
ठेवून टाकलेला कुलदैवतासाठी
आणि दुसऱ्या बाजूला ठेवलेला 
सतत बडबडणारा नवीन टेलिव्हिजन.

आतमधे, एक बाळ झोपलेलं
जुन्या करकरत्या पाळण्यात, 
आणि एक वाळून सुकलेली आजीबाई, 
वर्षांच्या ओझ्यानं वाकलेली, 
हलवतीय त्याला, अंगाईगीत गुणगुणत.

माझ्या जुन्यापुराण्या विहिरीतून उपसतो मी 
ताजं, निर्मळ, जिवंत झऱ्याचं पाणी 
आणि माझ्या डोलणाऱ्या नारळीला पाणी देताना
मी बघतो वरती आणि न्याहाळतो एक विनम्र आठवण 
प्रेमळ अतीताच्या माझ्यावरच्या विपुल कर्जाची.

जुनं पवित्र वृंदावन 
माझ्या घरासमोरचं 
जोपासतं नव्या, उत्फुल्ल तुळशीला. 
त्याच्या शेजारी प्राजक्ताचं झाड
चमकणाऱ्या सुगंधाची उधळण करणारं.

आजीचे जुने दागिने 
नव्या घडणीत पुन्हा घडवलेले
आता चमकवताहेत नातीच्या अंगोपांगांना
आणि मी चढवतो ताजा, नवीन अभ्रा 
माझ्या जुन्या, मेणचट उशीला 
आणि घोरतो खुशाल शांत झोपेमधे.

पण जेव्हा मी उठतो 
आणि विचार करतो या सगळ्याविषयी 
तेव्हा कळत नाही मला 
नवं काय आणि जुनं काय ते.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके