आता दोष चालकाचा होता की दोष गाडीत होता, हे बातमीदाराला किंवा तिथे पोहोचलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना लगेच कसे कळते? ते कळण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हे अन्वेषण पद्धतीने अपघाताचे कारण शोधले पाहिजे. असे अपघाताचे कारण शोधून जर त्यातून असे निष्पन्न झाले की बसगाडीमध्ये बिघाड होता, तर तसे सांगितले पाहिजे. असे का केले जात नाही? रस्त्यावर होणाऱ्या अपघातात गाडीतील दोष हे किती वेळा कारणीभूत असतात? गाडीत दोष निर्माण होण्याचे मुख्य कारण काय असते? दुरुस्ती आणि देखभाल करताना तिच्यात खोटे बनावट सुटे भाग बसवले जातात, हे वाहनांना अपघात होण्याचे आणि प्रवाशांचे आणि वाहन-चालकांचे मृत्यू होण्याचे महत्त्वाचे कारण किती वेळा असते?
व्यक्तिगत निवेदन
वाहनांच्या बनावट सुट्या भागांविरुद्ध काम करण्याची संधी मला टाटा मोटर्समध्ये मिळाली आणि काही यशही प्राप्त झाले. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिक अनुभवाचे संदर्भ येतील. माझी स्वतःची थोरवी सांगण्यासाठी ते मी दिलेले नाहीत, तर हकिकतीला विश्वासार्हता यावी म्हणून दिलेले आहेत. शिवाय, संघटितपणे आणि पद्धतशीरपणे बनावटांविरुद्ध कारवाई केली, तर ती यशस्वी होऊ शकते, हे आशावादी चित्रही मला या लेखात मांडायचे आहे.
वाचक हे समजून घेतील, अशी मी आशा करतो.
जानेवारी, 2014, बातमीदार : ‘आळेफाट्याहून अर्नाळ्याकडे जात असलेली एसटी बस आज (गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास माळशेज घाटात कोसळून झालेल्या अपघातात एसटीतील 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीअनुसार, माळशेज घाटात टोकावडे येथे हा अपघात झाला. ठाणे आगाराची ही बस असून, ती अर्नाळ्याकडे जात असताना एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला. घटनास्थळी ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढत, जखमींना मुरबाड आणि टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनीही बचावकार्यात मदत केली.’ (खबरबात) (बातमीतील अधोरेखीकरण आणि ‘च’चा जाड ठसा हे मी केलं आहे.)
वरच्यासारख्या बातम्या वेळोवेळी आपल्या वाचनात येतात. मेलेल्या प्रवाशांबद्दल आपण हळहळ व्यक्त करतो, वाहनाच्या चालकाला मनातल्या मनात दोष देतो आणि पुढील बातमी वाचायला लागतो. वाहन-चालकाच्या म्हणजे ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात झाला, असे आपण गृहीत धरून टाकतो. कारण, बातमी देताना आपला तसा समज व्हावा अशा प्रकारे ती बातमी दिलेली असते. म्हणजे, वरील बातमीत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले हे वाक्य दोनदा आले आहे आणि दुसऱ्यांदा तर त्यामुळेच हा अपघात झाला, असे जोरकसपणे सांगितले आहे. मग, सर्वसामान्य वाचकाचा असा समज झाला की, हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला तर यात वाचकाचा दोष नाही.
पण थोडा अधिक विचार केला तर असा प्रश्न पडला पाहिजे की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले? की बस चालकाच्या नियंत्रणात राहिली नाही? या दोन प्रश्नांतील फरक वरकरणी अगदी थोडासा असला, तरी अर्थाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. गाडीवर चालकाचे नियंत्रण राहिले नाही, हा चालकाचा दोष आहे; तर, गाडी चालकाच्या नियंत्रणात राहिली नाही, यातून दोष गाडीत होता असे सूचित होते.
आता दोष चालकाचा होता की दोष गाडीत होता, हे बातमीदाराला किंवा तिथे पोहोचलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना लगेच कसे कळते? ते कळण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हे अन्वेषण पद्धतीने अपघाताचे कारण शोधले पाहिजे. असे अपघाताचे कारण शोधून जर त्यातून असे निष्पन्न झाले की बसगाडीमध्ये बिघाड होता, तर तसे सांगितले पाहिजे. असे का केले जात नाही? रस्त्यावर होणाऱ्या अपघातात गाडीतील दोष हे किती वेळा कारणीभूत असतात? गाडीत दोष निर्माण होण्याचे मुख्य कारण काय असते? दुरुस्ती आणि देखभाल करताना तिच्यात खोटे बनावट सुटे भाग बसवले जातात, हे वाहनांना अपघात होण्याचे आणि प्रवाशांचे आणि वाहन-चालकांचे मृत्यू होण्याचे महत्त्वाचे कारण किती वेळा असते?
या आणि अशासारख्या प्रश्नांचा ऊहापोह मी या लेखात करणार आहे. कारण, वाहनांच्या बनावट खोट्या सुट्या भागामुळे दरवर्षी भारतात तीस हजारांहून, हो... तीस हजारांहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडतात, असा अंदाज आहे.
या प्रकरणातील मांडणी चार उपविषयांत क्रमवार पद्धतीने केली आहे. हे चार उपविषय आहेत :
1. विषयाचे महत्त्व : वाहनांच्या सुट्या बनावट भागामुळे किती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात? त्याबद्दलची माहिती का गोळा केली जात नाही? ड्रायव्हर जबाबदार असण्याचे प्रमाण कमी का असते? बनावट सुटे भाग बनवणाऱ्या निर्लज्ज नफेखोरीकडे दुर्लक्ष करून कष्टाळू- पण गरीब असलेल्या ड्रायव्हरला का दोषी धरले जाते?
2. वाहनांच्या सुट्या बनावट भागांमुळे अपघात का घडतात?
3. वाहनांच्या बनावट सुट्या भागांचा काळा धंदा किती मोठा आहे आणि तो केवढ्या वेगाने का वाढतो आहे?
4. काय केले पाहिजे? भांडवलशाहीच्या चौकटीत राहूनही दूरदृष्टी असलेल्या एका जबाबदार कंपनीने बनावट भागांविरुद्धची लढाई कशी जिंकली? अजून काय करता येईल?
1. विषयाचे महत्त्व : वाहनांचे बनावट सुटे भाग हा प्रश्न सर्वसामान्यांच्या दृष्टीने कितपत महत्त्वाचा आहे? हा प्रश्न वाहनकंपन्या, वाहनदुरुस्ती करणारी गॅरेजेस, ट्रक आणि बस यांच्या साहाय्याने वाहतूक करणाऱ्या कंपन्या, वाहनांचे चालक आणि वाहनांचे मालक यांच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच. अगदी दुचाकीच्या मालकाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पण सर्वसामान्य नागरिकांसाठीही हा प्रश्न महत्त्वाचा आहे; कारण, बनावट सुट्या भागांमुळे मोठे अपघात घडतात आणि त्यामुळे ड्रायव्हर, बसमधील प्रवासी किंवा रस्त्यावरून चालणारे नागरिकही मरण पावतात.
वाहनांना होणाऱ्या अपघातांना कारणीभूत वाहनात असलेले दोष असतात याचे किती प्रमाण असते? वाहनातले दोष किती प्रमाणात वाहनात बसवल्या जाणाऱ्या कमी प्रतीच्या बनावट सुट्या भागांमुळे निर्माण झालेले असतात? या प्रश्नांकडे भारतात सामान्यतः पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची प्रथा आहे. या बाबतचा अलीकडचा आणि शेवटचा उपलब्ध अभ्यास हा पंचवीस वर्षांपूर्वीचा 1997-98 सालचा आहे.
Automotive Component Manufacturers Association of India, (ACMA) यांनी केलेल्या या अभ्यासानुसार 1997-98 सालात एका वर्षात वाहनांच्या बनावट सुट्या भागांमुळे 66,330 अपघात घडले. (बातमीची लिंक)
या अपघातात 13,180 लोकांचे प्राण गेले आणि 65,550 लोकांना गंभीर शारीरिक इजा झाली. (ACMA) त्या वेळी भारतात 38 लाख वाहने होती. आता ती एक कोटीपेक्षा जास्त आहेत. एकूण विकल्या जाणाऱ्या सुट्या भागांमध्ये बनावट सुट्या भागांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचा परिणाम बाजूला सोडला आणि निव्वळ वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघात आणि मृत्यू वाढले आहेत, असे गृहीत धरले, तर साध्या गुणोत्तरानुसार 2021 मध्ये एका वर्षात बनावट सुट्या भागांमुळे झालेल्या वाहनांच्या 1,74,553 अपघातांत 34,684 मृत्यू आणि 1,72,500 व्यक्तींना जबर इजा झाली असावी, असा अंदाज करता येतो.
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2018 मध्ये भारतातील रस्त्यांवर एकूण 4,67,044 अपघात झाले आणि त्यामध्ये 1,51,417 लोक मृत्युमुखी पडले. अजून एका अंदाजानुसार भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी 3 ते 5टक्के वाटा रस्त्यांवरील अपघातात वाया जातो. अजून एका अंदाजानुसार भारतातील 20टक्के अपघात हे बनावट सुट्या भागांमुळे होतात. हे विविध स्रोतांतून उपलब्ध झालेले अंदाज एकत्रितपणे लक्षात घेतले की, वाहनांच्या बनावट सुट्या भागांमुळे 2021 या एका वर्षात, बनावट सुट्या भागांमुळे वाहनांचे एक लाखाहून अधिक अपघात झाले, आणि त्यात चौतीस हजार लोक मरण पावले, हे विश्वसनीय वाटते.
अर्थात, वाहनांच्या बनावट भागामुळे हे अपघात झाले, याची नोंद सरकारी दफ्तरात केली जात नाही. सामान्यत: हे अपघात ‘वाहनचालकांची चूक’ या सदराखाली नोंद केले जातात. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अपघाताची गुन्हा म्हणून चौकशी करण्याची कुवत पोलीस यंत्रणेत नाही. त्यासाठी ज्या प्रकारचे तांत्रिक ज्ञान आणि शोध घेण्याची क्षमता आवश्यक आहे ती अपघातांची नोंद घेणाऱ्या आणि चौकशी करणाऱ्या पोलिसांमध्ये नसते, असे अभ्यासकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. दुसरे कारण म्हणजे जर अपघात बनावट भागामुळे झाला याची नोंद केली, तर तो बनावट भाग ज्यांनी बनवला आणि ज्यांनी बसवला त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाला कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंदवावा लागेल. एकदा वाहनचालकाची चूक असे म्हटले की, पुढची चौकशी टळते, आणि तपासयंत्रणेचे काम फार सोपे होते!
ड्रायव्हर दारू प्यायलेला होता असेही कारण बऱ्याच वेळा नोंदवले जाते. ट्रक आणि बस ड्रायव्हर उपजीविकेचे साधन म्हणून वाहन चालवतात. त्यांच्यापैकी कोणीही दारू पिऊन वाहन चालवले तर इतर ड्रायव्हरांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे सर्व ड्रायव्हर आपल्यापैकी कोणी दारू पिऊन गाडी चालवत नाही, याबद्दल सजग असतात. हायवेच्या धाब्यावर जर चुकून एखादा, दारू प्यायलेला ड्रायव्हर (ड्युटीवर नसलेलासुद्धा) सापडला, तर इतर ड्रायव्हर त्याचे काय हाल करतात, हे मी स्वतः पाहिले आहे. रात्री पार्टी केल्यावर दारूच्या नशेत गाडी चालवणे हा शहरातील उच्च-मध्यम वर्गीयांतर्फे केला जाणारा गुन्हा आहे; ट्रक आणि बसचे व्यावसायिक ड्रायव्हर तो गुन्हा करतात असे गृहीत धरणे या उच्च-मध्यम वर्गीयांना सोयीचे असते.
ट्रक आणि बस ड्रायव्हर हे रोजच दूर पल्ल्याची गाडी हाकत असतात. त्यांच्यात गाडी चालवण्याचे पुरेसे कसब आणि सावधानता नसेल, तर ते वर्षानुवर्षे अपघात न करता गाडी चालवू शकणार नाहीत. त्यामुळे ड्रायव्हरची चूक हे कारण निव्वळ अधिक चौकशी करायला नको, म्हणून दिलेली सबब असते. म्हणून मग, बनावट सुट्या भागामुळे अपघात झाले, अशी नोंद कागदोपत्री होत नाही.
2. वाहनांच्या सुट्या बनावट भागांमुळे अपघात का घडतात? कुठले बनावट भाग अपघातांना जास्त कारणीभूत होतात?
वाहने रस्त्यावर वेगाने धावत असतात. एका वाहनामध्ये 1800 हून जास्त भाग असतात. यातील कुठलाही भाग अचानक काम करेनासा झाला, तर वाहन चालकाच्या नियंत्रणात राहत नाही आणि वाहन दरीत कोसळू शकते, समोरच्या वाहनावर आदळू शकते, किंवा बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्यांना धडकू शकते.
बनावट भाग हे निकृष्ट दर्जाचे असतात. त्यांच्यामध्ये वापरलेला कच्चा माल हलक्या प्रतीचा असतो. ते तयार झाल्यावर त्यांच्या दर्जाची तपासणी केली जात नाही.
वाहनातल्या प्रत्येक भागाला जबरदस्त धक्के (Shocks) हे सतत बसत असतात. खूप ताण (Load) सहन करावा लागतो, हा ताण एकसारखा कमी-जास्त होत असतो. (Cyclical Load). हे धक्के, ताण सहन करण्याची बनावट भागाची क्षमता फारच कमी असते.
शिवाय, वाहनातील भागांचे एकमेकांशी सातत्याने घर्षण होत असते, त्यामुळे त्यांची झीज होत असते. बनावट भाग फार लवकर झिजतात आणि कमजोर होतात. याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :
- बनावट टायर रस्त्यांवरची पकड सोडतात.
- इंजिनाला आग लागते.
- सीटबेल्ट ताण बसल्यावर आपोआप निघून येतो.
- वाहनाला धडक बसली की डोक्यावरचे छत आतल्या बाजूला वाकते आणि खाली बसलेल्या प्रवाशाचे डोके फुटते.
- बनावट काचा फुटल्यावर त्यांचे लहान गोल गोळे होत नाहीत, तर त्यांचे टणक आणि अणकुचीदार तुकडे होतात. ते प्रवाशांच्या डोळ्यांत घुसून त्यांना आंधळे करतात.
- रात्री काळोखात गाडी चालवत असताना अचानक समोरचे दिवे काम करेनासे होतात आणि वाहनचालकासमोर फक्त अंधार पसरतो. गाडीचे बनावट व कमी क्षमतेचे समोरचे दिवे हे रात्री गाड्यांना होणाऱ्या अपघातांचे 50 टक्के कारण आहे, असे अमेरिकेतील एका पोलिसप्रमुखाने आवर्जून सांगितले आहे. गाडीची नियमित देखभाल करताना समोरच्या दिव्यांची क्षमता तपासली जात नाही, ती नियमितपणे तपासावी असेही त्याने सांगितले आहे.
- ऐन वेळी वाहनाचे ब्रेक लागत नाहीत आणि वाहन दरीत कोसळते.
- वाहनाची वळवण्याची यंत्रणा अचानक तुटते, चालक वेगात असलेली गाडी वळवू शकत नाही. मग, गाडी समोरच्या गाडीवर आदळते किंवा दरीत कोसळते. इ.
बनावट सुट्या भागांमुळे झालेल्या अपघातात भारतात दर वर्षी चौतीस हजारांहून जास्त लोक मरतात आणि अंदाजे एका लाख सत्तर हजार लोक जबर जखमी होतात. तेव्हा, वाहनातील बनावट सुटे भाग, त्यांच्यापासून असलेला धोका हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने गंभीर आहे, महत्त्वाचा आहे.
3. वाहनांच्या बनावट सुट्या भागांचा काळा धंदा किती मोठा आहे आणि तो एवढ्या जोमाने का फोफावतो आहे?
वाहनांच्या बनावट सुट्या भागांचा धंदा हा जागतिक स्वरूपाचा प्रश्न आहे. लवकरच, म्हणजे या वर्षात, जगभरातील हा काळा धंदा 2.3 ट्रिलियन डॉलर्स एवढा होईल, असा अंदाज आहे. तुलनाच करायची झाली तर, हा काळा धंदा कॅनडा, ब्राझील किंवा इटली यांच्या वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असेल.
भारतात वाहनांच्या बनावट भागांचा हा काळा धंदा 2018मध्येच बावीस हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. हा धंदा ट्रक, मोटारी आणि दुचाकी यांच्यातील विक्रीमध्ये होणाऱ्या वाढीपेक्षा वेगाने वाढतो आहे; 2014 ते 2018 या काळात त्यामध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली. चालू वर्षात हा धंदा वाढून तीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असेल. (तुलना करायची झाली तर, 2020-21 या आर्थिक वर्षात टाटा मोटर्स या भारतातील वाहनक्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपनीची विक्री ही सत्तेचाळीस हजार कोटी रुपये होती.)
बनावट सुट्या भागांचा हा विषय इथेच संपलेला नाही. पुढील लेखात आपण बनावट सुट्या भागांचा काळा धंदा फोफावण्याची कारणे आणि काय केले पाहिजे हे जाणून घेऊ या.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या