डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोरियन युद्धानंतरच्या 60 वर्षांत हे मेंदू-धुलाईचे तंत्र किती तरी अधिक विकसित करण्यात आले आहे. हे तंत्र विकसित करणाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धा-अगोदरचा हजारएक वर्षांचा अनुभवही नीट आत्मसात केला आहे. शिवाय, आधुनिक मानसशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धतीचाही वापर ते करतात. त्यामुळे हे तंत्र अधिक सहज आणि अधिक प्रभावी बनले आहे. मेंदू-धुलाई हे म्हणणे आता फॅशनेबल राहिलेले नाही. आता याला मेंदू-कब्जा (Mind Control) यासारखे अधिक स्पष्ट नाव वापरले जाते; तसेच पुन:शिक्षण (Re-education) यासारखे मिळमिळीत आणि फसवे नावही वापरले जाते.

विषयाचे महत्त्व :

भारत सरकारचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुवाहाटीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संमेलनात भाषण केले.‌‍‌1 ते म्हणाले, ‘‘काही भारतीय तरुण ‘इसिस’कडे आकर्षित झाले, ही चिंतेची बाब आहे. आम्ही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही हे आव्हान समजतो....’’ याच संमेलनात इसिसमध्ये (ISIS) भरती होण्यासाठी जाणाऱ्या 18 भारतीय युवकांना अटकाव करण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली.2

इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲन्ड सिरिया (इसिस) ही मुसलमानांमधील जहाल सुन्नी पंथीयांची संघटना आहे. इराक आणि सिरिया या देशांमधील मोठा प्रदेश या संघटनेच्या ताब्यात आहे. जून 2014 मध्ये त्यांनी खिलाफत स्थापन केल्याची घोषणा केली.3 भारतातून दखलपात्र प्रमाणावर (म्हणजे 100 वगैरे) तरुण इसिसमध्ये दाखल झाल्याचे वृत्त नाही.

राजनाथ सिंह त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले,4 ‘‘अल्‌ कायदाने ‘कायदा उल जिहाद’ अशी नवी शाखा स्थापन केली आहे. या शाखेचा उद्देश बंगाल, आसाम, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि देशाच्या इतर काही भागांत आतंकवादी पकड बसवणे, असा आहे. आपला देश ते कदापि होऊ देणार नाही... भारतात मुसलमान मोठ्या संख्येने आहेत. अनेक अतिरेकी संघटनांना त्यातून मुसलमान राजवट निर्माण करण्याकरता तरुण मिळतील, असे वाटते; पण तसे होणार नाही. भारतातील मुसलमान देशभक्त आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मातृभूमीच्या रक्षणासाठी ते लढत आले आहेत. देशाची अखंडता आणि सुरक्षितता यासाठी लढण्याची तयारी मुसलमान तरुणांनी नेहमीच दाखवली आहे. म्हणूनच मुसलमान तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात अतिरेकी गट यशस्वी होणार नाहीत.’’

राजनाथ सिंह यांनी भारतातील मुसलमानांबद्दल दाखवलेला विश्वास योग्यच आहे. त्याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. पण दुसऱ्या बाजूला इंग्लंड आणि बाकीच्या युरोपमधून हजारो युवक इसिसमध्ये सामील होत आहेत,5 याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या विषयावर ‘अन्वयार्थ’चे लेखक म्हणतात 6 :

‘‘इसिस या अतिरेकी इस्लामी बंडखोर संघटनेत दाखल झालेला आरिफ मजिद नावाचा तरुण भारतात परत आल्यामुळे या धोक्याच्या घंटा अधिकच तीव्रपणे वाजू लागल्या आहेत... कोणत्या तरी अविचाराने बहकून अतिरेकी कृत्ये करू पाहणाऱ्या तरुणाईला वळणावर आणण्याची आवश्यकता आहे, याची खूणगाठ तरी आता यानिमित्ताने पक्की झाली आहे. सुशिक्षित तरुणांना दहशतवादाच्या आकर्षणापासून मुक्त करण्याकरिता नवी पावले उचलण्याचे नवेच आव्हान आता निर्माण झाले आहे. मात्र, ते केवळ सरकारसमोरील आव्हान नाही; पालकांनाही या आव्हानाचा भार उचलावाच लागणार आहे. ती जबाबदारी ओळखली नाही; तर पश्चात्तापाची वेळ दूर नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.’’

अन्वयार्थकारांनी पालकांवरची गंभीर जबाबदारी स्पष्टपणे सांगितली आहे. ही चर्चा इसिसच्या संदर्भात पुढे आली आहे. पण प्रश्न इसिसपुरता मर्यादित नाही. अधिक गंभीर धोका आहे तो भारतातल्या, या भूमीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या धर्मांध संघटनांचा. त्यात फक्त मुसलमानधर्मीय अतिरेकी संघटना नाहीत. त्यांत शीखधर्मीय होत्या आणि आहेत. त्यांत हिंदूधर्मीयही आहेत. जहाल नक्षलवादी संघटनाही आहेत. इसिससारख्या परकीय संघटनांकडे भारतातील तरुणाई फार कमी आकृष्ट होते आहे, हे खरे; पण भारतातल्याच एतद्देशीय अतिरेकी संघटनांमध्ये ओढले जाऊन हजारो माथेफिरू तरुण हिंसाचार करायला उद्युक्त होत आहेत. हा धोका आपल्याच घरातला आणि फार गंभीर आहे.

‘पालकांनाही या आव्हानाचा भार उचलावाच लागणार आहे,’ असे अन्वयार्थचे लेखक बजावतात. पण पालकांनी करायचे काय? मुलांचा टीव्ही, कॉम्प्युटर- सगळे बंद करायचे? मुलांना घरात कोंडून ठेवायचे? त्यांचे मोबाईल काढून घ्यायचे? हे तर शक्य नाही. तरुणांशी अतिरेकी संघटना विविध माध्यमांतून संपर्क साधतात, संवाद साधतात. अतिरेकी संघटनांनी फेकलेले हे भावनिक, वैचारिक जाळे आहे. त्या जाळ्यात एकदा का तरुण अडकला तर, तो अधिकच अडकत जातो, अधिकच गुंतत जातो. याबाबत पालकांच्या व तरुणांच्या दृष्टीने वाईटात चांगली गोष्ट इतकीच की : अतिरेकी संघटना हे जे जाळे टाकतात, ते एक विशिष्ट जाळे आहे; सगळ्या अतिरेकी संघटनांची जाळी एकाच सामाईक तंत्राचा वापर करतात; या तंत्राचे नाव आहे Brain Washing. म्हणजे ‘मेंदूची धुलाई’.   

आपल्यावर ‘मेंदूच्या धुलाई तंत्राचा’ वापर केला जात आहे, हे तरुणाला लवकर समजले; तर जाळ्यात अडकण्यापूर्वीच तो सावध होतो. मग त्याची शिकार साधणे अतिरेक्यांना जमत नाही. पालकांनी याबद्दल ज्ञान करून घेतले, तर ते आपल्या पाल्याचे अशा धुलाईपासून संरक्षण करू शकतील. मेंदू-धुलाई तंत्राचा कमकुवतपणा हा आहे की, या तंत्राचा आपल्यावर वापर होत आहे, हे ‘सावजां’च्या वेळीच लक्षात आले; तर शिकारी अतिरेकी काहीही करू शकत नाहीत. सावज सहीसलामत स्वत:चा बचाव करू शकते, करते. अतिरेक्यांच्या ‘मेंदू-धुलाई’च्या जाळ्यात सापडण्यासाठी सावजाचा बेसावधपणा ही अत्यावश्यक अट आहे.

अतिरेकी आणि कुटील पंथीय लोक ‘मेंदू-धुलाईचे तंत्र’ कसे वापरतात, हे तरुणाईने आणि पालकवर्गाने समजून घेतले; तर अतिरेक्यांना ‘सावज’ मिळणार नाहीत. म्हणजे तरुणाईला आणि पालकांना ‘मेंदू-धुलाई’ हा विषय सोपेपणाने समजावा; त्यांना तो इतरांना समजावून देता यावा, हा या लेखाचा उद्देश आहे.

विषयप्रवेश :

Brain Washing म्हणजे मेंदूची धुलाई, हा शब्द दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच झालेल्या कोरियातील लढाईवेळी प्रथम वापरात आला. या युद्धात अमेरिकी सैनिक कोरियाच्या ताब्यात बंदिवान झाले. कोरियाच्या तुरुंगात पद्धतशीरपणे त्यांच्या मेंदूची धुलाई करण्यात आली. सैनिक कैद्याचा कमालीचा शारीरिक-मानसिक छळ करायचा, मग त्याने थोडे ‘योग्य’ विचार आणि आचार दर्शविले; तर छळ एकदम कमी करावयाचा आणि त्याला शाबासकी म्हणून पोटभर जेवण द्यायचे. हे सत्र परत-परत राबवले की, कैदी सैनिक ‘नवे’ व ‘योग्य’ विचार हळूहळू स्वीकारतो. काही वेळा हा कार्यक्रम इतका यशस्वी होतो की, कैदी त्याचा छळ करणाऱ्याच्या प्रेमात पडतो. पण सामान्यत: अशा जबरी, छळावर आधारित मेंदूच्या धुलाईचे परिणाम फारसे टिकाऊ नसतात. मेंदू-धुलाई करण्यात आलेले हे सैनिक स्वगृही परतले की, थोड्या अवधीतील मानसोपचारांनीही धुलाई केलेला मेंदू पूर्ववत होतो, असे लक्षात आले आहे.

कोरियन युद्धानंतरच्या 60 वर्षांत हे मेंदू-धुलाईचे तंत्र किती तरी अधिक विकसित करण्यात आले आहे. हे तंत्र विकसित करणाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धा-अगोदरचा हजारएक वर्षांचा अनुभवही नीट आत्मसात केला आहे. शिवाय, आधुनिक मानसशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धतीचाही वापर ते करतात. त्यामुळे हे तंत्र अधिक सहज आणि अधिक प्रभावी बनले आहे. मेंदू-धुलाई हे म्हणणे आता फॅशनेबल राहिलेले नाही. आता याला मेंदू-कब्जा (Mind Control) यासारखे अधिक स्पष्ट नाव वापरले जाते; तसेच पुन:शिक्षण (Re-education) यासारखे मिळमिळीत आणि फसवे नावही वापरले जाते.

मेंदू-धुलाईची एकूण 10 प्रमुख तंत्रे आजघडीला विकसित करण्यात आली आहेत; वापरात आहेत, असे लक्षात येते. ती पुढीलप्रमाणे-

1. शस्त्रशिक्षण

2. कवायत

3. न्यूनगंडनिर्मिती

4. आपणभाव

5. पुनरावृत्ती

6. विचारबंदी

7. हिंसावृत्ती-संवर्धन

8. ग्रंथप्रामाण्य

9. आजन्म नेतृत्वापुढे शरणागती

10. कुजबुज प्रचार

काही कुटील संघटना यांतील दोन-तीनच तंत्रे वापरतात. काही संघटना (उदाहरणार्थ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इंडियन मुजाहिदीन, इसिस.) यांतील बहुतेक सर्वच तंत्रे वापरतात. मेंदू-धुलाईच्या प्रत्येक तंत्राबद्दल या लेखात माहिती सांगितली आहे. ती सांगताना, हा लेख वाचून या तंत्राचा आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर वापर होत आहे हे वाचकाच्या लक्षात यावे, असा उद्देश आहे. ही तंत्रे वापरण्यात वाचक वाकबगार व्हावा किंवा त्याला ही तंत्रे वापरण्याची इच्छा व्हावी, असा उद्देश नाही. किंबहुना, वाचकाला या मेंदू-धुलाई तंत्राबद्दल शिसारी यावी, अशीच आमची इच्छा आहे.

शस्त्रशिक्षण : मेंदू-धुलाईचे तंत्र क्रमांक 1

शस्त्रवापराच्या शिक्षणातून एक विशिष्ट मानसिकता घडवायला अनुकूलता निर्माण होते. हाती शस्त्र आले की युयुत्सू, पुरुषी, आक्रमक मानसिकता घडत जाते.

याबाबत आमचे मित्र विवेक सावंत एक उद्‌बोधक गोष्ट सांगतात. ती अशी- एक स्वामी होता. त्याने घोर तपश्चर्या सुरू केली. तो अन्नग्रहण न करता शिवनामाचा जागर अनेक दिवस अहोरात्र करीत होता. त्याची कीर्ती दूरवर पसरू लागली. स्वामींना शिवजी प्रसन्न होणार, ते पृथ्वीतलावरील सर्वांत ताकदवान पुरुष बनणार, अशी खात्री त्यांचे भक्तगण व्यक्त  करू लागले. हे राजाच्या हेरांनी राजाच्या कानांवर घातले. राजा हादरला. आपल्या सत्तेला निर्माण होणारा हा धोका कसा रोखावा, हे त्याला कळेना.

मग त्याने राज- विदूषकाचा सल्ला घेतला. विदूषकाला मानवी मनाची उत्तम पारख होती. त्याने राजाला युक्ती सांगितली. राजा स्वामींच्या भेटीला गेला. स्वामींना राजा म्हणाला, ‘‘स्वामिमहाराज, मी पुढे हिमालयात पर्यटनाला जातो आहे. माझी ही तलवार फार जड आहे. गिरिभ्रमण करताना तिची अडचण होणार आहे. कृपया काही दिवस ती आपल्याकडे ठेवा. ही शिवजींची तलवार आहे, अशी आमची श्रद्धा आहे. तुम्ही शिवभक्त आहात. मी परत येईपर्यंत आपण ही तलवार सांभाळा.’’

स्वामींच्या होकाराची वाट न बघता राजा डोंगराच्या दिशेने निघून गेला. स्वामिजींना कुतूहल वाटले, शिवजींची तलवार आहे तरी कशी? त्यांनी म्यानातून तलवार उपसली आणि समोर धरली. भेटायला आलेले भक्तगण भयभीत झाले. त्यांना वाटले, स्वामींनी आपल्यावरच तलवार उगारली आहे. अंगावरचे होते नव्हते ते जवाहीर आणि सर्व रोकड स्वामींपुढे ठेवून भक्तांनी स्वामींना लोटांगण घातले. स्वामींना हसू आले. भक्तांना वाटले, स्वामींना हेच हवे होते; स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले. स्वामींना हा अनुभव गुदगुदल्या करणारा होता. थोडा कंटाळा आला की, स्वामी तलवार मधून-मधून उपसू लागले. धनसंचय वेगाने होऊ लागला. तलवारीच्या धाकाने स्वामींना काहीही हवे ते भक्त द्यायला लागले! पण लूट होते, म्हणून भक्तांची गर्दी कमी झाली. स्वामींना आता द्रव्याचे महत्त्व कळले होते. भक्त येत नाहीत म्हटल्यावर, स्वामी तलवार घेऊन रस्त्यावर उतरले. बघता-बघता स्वामी एक दरोडेखोर बनले. राजा लक्ष ठेवून होताच. विदूषकाची युक्ती यशस्वी झाली होती. राजाने सैनिकांना पाठवून स्वामी-दरोडेखोराला जेरबंद करून आणले. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी या डाकू-दरोडेखोराला त्याने फाशी दिली.

साध्यसाधनविवेक आवश्यक असतो, तो यामुळेच. साधन हिंसक असले की, हिंसा हेच साध्य बनते. (नक्षलवाद्यांना हे कळत नाही; पण तो वेगळा विषय आहे.) त्यामुळेच हिंसा हेच ध्येय असणाऱ्या इसिससारख्या मुसलमान जहाल दहशतवादी संघटना, नव्याने सामील होणाऱ्या तरुणांच्या प्रशिक्षणात शस्त्रशिक्षणाला अग्रक्रम देतात. शस्त्र वापरायचे कौशल्य तरुण आत्मसात करतात. पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या तरुणांमध्ये आक्रमक, हिंसक वृत्ती निर्माण करून ती जोपासली जाते आणि ही या अतिरेकी संघटनांसाठी मुख्य फायद्याची गोष्ट असते.

मानसिकता घडवण्यासाठी जे शस्त्रशिक्षण दिले जाते, त्यात कोणत्या शस्त्राचे शिक्षण देणे जास्त उपयुक्त असते? रिमोट कंट्रोलने बॉम्ब कसा उडवावा याचे प्रशिक्षण कमी उपयोगाचे असते, कारण त्यामध्ये शस्त्र आणि हिंसा यांचा प्रत्यक्ष शारीरिक संबंध शस्त्र वापरणाऱ्याशी नसतो. शस्त्राचा वापर शिकताना शिकणाऱ्याच्या नसानसांत वाढीव टेस्टीटेरॉन संचारत नाही, त्याची मानसिकता घडत नाही. मात्र हातात तलवार, लाठी घेऊन आक्रमक घोषणांच्या साथीने शिकलेले वार यासाठी फार उपयोगी असतात. मग त्याला स्वसंरक्षणासाठीचे शस्त्रशिक्षण म्हटले म्हणून काही फरक पडत नाही.

कवायत : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 2

कवायत करणे म्हणजे आज्ञेची अंलबजावणी लगेच करून अर्थहीन, उद्देशहीन शारीरिक हालचाली करणे. ‘बाए मुड’ म्हटले की, लगेच डावीकडे वळणे; ‘दाए मुड’ म्हटले की, लगेच उजवीकडे वळणे इ. हे करण्यामागे आज्ञाधारकपणा ‘अंगी’ मुरवणे, हाच उद्देश असतो. कवायत म्हणजे सांघिक व्यायाम किंवा सांघिक खेळ नव्हे. सांघिक व्यायामात शरीराला चांगला व्यायाम घडवणे, हा मुख्य उद्देश असतो. सांघिक खेळात खेळाचा आनंद लुटणे, हा मुख्य उद्देश असतो. कवायतीत शारीरिक व्यायाम, आनंद मिळवणे असा उद्देश नसतो; अंगात आणि मनात आज्ञाधारकपणा राबवणे एवढाच उद्देश असतो.

युद्धभूमीवर अधिकाऱ्याने मार म्हटले की, सैनिकाने शत्रूला मारण्याची गरज असते. मनात किंतु येऊ न देता माणसाला मारणे- मग तो शत्रू असला तरी- सोपे नसते. अर्जुनाच्या मनातसुद्धा ऐनवेळी असा किंतु निर्माण झाला, तो दूर करण्यासाठी श्रीकृष्णांना भगवद्‌गीता सांगावी लागली. त्यांनासुद्धा एक-दोन वाक्यांत सहजासहजी, अर्जुनाच्या मनातील किंतु दूर करता आला नाही. असा किंतु निर्माण झाला, तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्या सैनिकाला मार्गदर्शन करावयाला श्रीकृष्ण उपलब्ध नसतात. त्यामुळे किंतु मनात आला आणि तो सैनिक काही क्षण जरी भांबावला, तरी तो शत्रूच्या गोळीला बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘गोळी मार’ अशी आज्ञा कानी पडली की, सैनिकाने विचार न करता लगेच गोळी मारणे अत्यंत गरजेचे असते. कवायतीमधून त्याचे मन आणि बुद्धी यासाठी तयार केली जाते. मग असे सैनिक, असे तरुण - आदेश मिळाल्यावर काय प्रकारची हिंस्र, क्रूर, विघातक कृती करू शकतात, ते आपण पाहिलेच आहे. त्यांतल्या काहींची आठवण :

0 जनरल डायरनी आज्ञा दिल्यावर ते आपल्या नि:शस्त्र देशबांधवांवर, आया-बहिणींवर, लहान मुलांवर जालियनवाला बागेत नेम धरून गोळ्या घालतात.

0 ज्यूंना गॅस चेंबरमध्ये घालून मारतात.

0 पाकिस्तानातून हुकूम आला की, निष्पाप नागरिकांच्या चिंधड्या उडवण्यासाठी मुंबईत बाँब पेरतात.

0 तोडा म्हटले की, ऐतिहासिक धर्मस्थळे जमीनदोस्त करतात.

0 बायकांवर अहमदाबादच्या रस्त्यांवर खुलेआम बलात्कार करतात.

0 पेशावरमध्ये 137 शालेय मुलांची कत्तल करतात.

0 गस्त घालणाऱ्या सी.आर.पी.एफ. जवानांना शहीद करतात.

0 ताजमहाल, ओबेराय हॉटेलमधील बेसावध नागरिकांवर गोळ्या चालवतात- इत्यादी, इत्यादी, इत्यादी.

या कवायतींमुळे मानसिकता कशी घडते याचे चांगले वर्णन विजय तेंडुलकरांनी केलेले आहे. ते लिहितात - 7 ‘‘शाखेच्या रोजच्या ‘रूटिन’ला मी फार कंटाळण्याच्या आत दसरा आला आणि संघाच्या कार्यालयात बनवून घेतलेला खाकी गणवेश चढवून, त्यावर ‘रा.स्व.सं.’ अशी चकचकीत पॉलिश केलेली, सोनेरी अक्षरे असलेली पितळी बकले दोन खांद्यांकडे अडकवून, डोक्यावर संघाची टोकदार काळी टोपी आणि ज्यात चेहरा दिसेल असे चकचकीत पॉलिश केलेले बूट पायांत, कमर तितक्याच चकचकीत पट्‌ट्याने कसलेली आणि काखेत झोकदार काठी पकडलेली- असा मी सकाळी मैदानात हजर होऊन माझ्याचसारख्या शेकडो स्वयंसेवकांमधून लष्करी बिगुल व बँडच्या तालावर डावा-उजवा करीत छाती पुढे काढून निघालो; तेव्हा मला जे अननुभूत सार्थक वाटले, त्याला तुलना नाही.’’

विजय तेंडुलकरांना जे ‘अननुभूत’ वाटले, ते काय होते याचे वर्णन तेंडुलकर करीत नाहीत. त्यांना ‘सार्थक’ का वाटले याचा शोधही ते घेत नाहीत. मेंदू पूर्ण रिकामा आणि छातीत सांघिक ताकदीचा मोठा श्वास- असा तो ‘अननुभूत’कारी अनुभव आहे. तेंडुलकरांसारख्या समर्थ लेखकाला तो शब्दबद्ध का करता आला नाही? त्या वेळी त्यांच्या बुद्धीची धुलाई चालू होती. आपल्या बुद्धीची धुलाई होते आहे याची जाणीव तेंडुलकरांना नव्हती, हेच तेंडुलकरांची सर्जनशीलता कुंठीत होण्याचे कारण आहे?

‘कवायत तंत्र’ आणि ‘शस्त्रशिक्षण तंत्र’ यांची उत्तम भेळ केली की, दोन्ही तंत्रे अधिक प्रभावी होतात. स. ह. देशपांडे त्यांचे अनुभव सांगताना लिहितात - 8

‘‘प्रत्यक्ष लष्करी शिक्षणाखेरीज वीरवृत्ती जोपासणारे दुसरेही कार्यक्रम असत. मी ‘बाला’चा ‘तरुण’ झाल्यावर लाठीचं शिक्षण मला मिळू लागलं. लाठीच्या शिक्षणाचा एक भाग कवायतीच्या स्वरुपाचा व दुसरा लढाईच्या स्वरुपाचा असे. ‘समद्वंद्व’- दोन सारखी शस्त्रं घेतलेल्यांमध्ये होई. वेगवेगळी शस्त्रं घेणाऱ्यांमध्ये ‘विषमद्वंद्व’ होई. कधी एकावर अनेक जण एकाच वेळी तुटून पडत. अशा वेळी एकाकी लढणारा माणूस लाठी स्वत:भोवती ‘भर्राट’ वेगानं फिरवीत शत्रूंचा समाचार घेण्याचा प्रयत्न करी आणि एखादा बेसावध दिसला की, नेमका वार करी. असा फटका लागून माझ्या उजव्या हाताचं मनगट मोडलं होतं. याशिवाय ‘वेत्रचर्म’ (गदकाफरी) म्हणजे कातड्याची ढाल व वेत यांनी खेळावयाचं युद्ध असे. त्याचे सपासप वळ लागून ढोपरं काळी-निळी होत...

संघात जोपासल्या जाणाऱ्या या वीरवृत्तीचा कधी कधी अतिरिक्त आणि हास्यास्पद आविष्कार व्यवहारात घडे. एखाद्या स्वयंसेवकाच्या लग्नाच्या वेळी त्याचे मित्र त्याला वर्गणी करून खंजिराचा आहेर देत... पितळी वाघनखांचा काही दिवस प्रसार झाल्याचं मला आठवतं. हे वाघनख बोटात घालून मूठ बंद केली म्हणजे बोटांवर अंगठ्या आहेत, असं वाटे. आत मात्र टोकदार, कुणाच्याही मांसात रुतून बसतील असे किंचित वळलेले दाते असत. पण ही वाघनखं हातात घालणं किंवा जवळ ठेवणं, हा फॅशनचाच एक प्रकार असे.’’

न्यूनगंडनिर्मिती आणि निराकरण : मेंदू-धुलाईचे तंत्र क्रमांक 3

नव्याने प्रवेश घेणाऱ्या तरुणांमध्ये न्यूनगंड निर्माण करायचा आणि आपल्या पंथात, संघटनेत सामील होणे हाच या न्यूनगंडावर मात करण्याचा उपाय आहे, असे त्याला सांगावयाचे; अशी ही नीती आहे. अमेरिकेत छोटे-छोटे धार्मिक पंथ या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि कौशल्याने करतात, असे तेथील मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. म्हणजे ‘‘आपल्या आयुष्यातल्या चुका, आपल्यातील कमतरता, आयुष्याचा फोलपणा, याची तीव्र जाणीव तरुणांमध्ये निर्माण केली जाते.’’9

सैन्यामध्ये या तंत्राचा अत्यंत पद्धतशीरपणे वापर केला जातो. कवायत घेण्यासाठी नेलेला ड्रिल सार्जंट या तंत्राचा वापर करण्यात वाकबगार असतो. नव्याने भरती झालेल्यांना गौणत्व देऊन वागवणे, त्याच्यावर आरडाओरडा करणे, त्याची छोटीशी चूक काढून त्याला सर्वांसमोर शिक्षा भोगायला लावणे, त्याच्यावर रॅगिंग करणे, हा याच तंत्राचा- म्हणजे त्याचा मेंदूच्या धुलाईचा भाग असतो.

या न्यूनगंडनिर्मिती आणि निराकरण तंत्राचा माझा स्वत:चा अनुभव सांगावासा वाटतो. मी तेव्हा दहावीच्या वर्गात शिकत होतो. मी मुंबईतील बेडेकर सदन या चित्तपावन ब्राह्मणांच्या चाळीत राहायचो. आमच्या खाली डॉ.सहस्रबुद्धे राहावयाचे. (ते जनसंघातर्फे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून ती हरले होते.) आमच्या चाळीतील माझ्याच वयाच्या दहा-बारा मुलांना त्यांनी स्वत:च्या घरी उपयुक्त मार्गदर्शनासाठी बोलावले. त्यांत माझ्याच वर्गात शिकणारा त्यांचा मुलगाही होता. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि अनुभवी कार्यकर्ते. त्यांनी ‘हस्तमैथुन’ या विषयावर 45 मिनिटे आमचे बौद्धिक घेतले. ‘‘हस्तमैथुन करणे वाईट आहे. त्यामुळे शक्तिक्षय होतो. पुरुषत्व कमी होते. त्याचे व्यसन लागले की, पुरुष नपुंसक बनतो. ही कृती तुम्ही करता कामा नये. असे करावेसे वाटू नये म्हणून शाकाहारी आहार करावा, थंड पाण्याने अंघोळ करावी आणि रोज संध्याकाळी शाखेत यावे.’’ हे त्यांनी या बौद्धिकात परत-परत सांगितले.

न्यूनगंड तयार करायचा आणि त्यावर मात करायचा सोपा मार्ग सांगायच्या तंत्राचा हा माझ्यावरचा पहिलाच प्रयोग होता! माझे वडील (विं.दा. करंदीकर) आमच्या चाळीतील ‘सांस्कृतिक’ घडामोडींबाबत जागरूक होते. कशावर बौद्धिक झाले, ते त्यांनी मला विचारले. विषय कळल्यावर ते म्हणाले, ‘‘कुठलाही अतिरेक वाईट; पण हस्तमैथुनाने वाईट काही घडत नाही.’’ त्यांनी नंतर मला एक इंग्रजी पुस्तक वाचायला दिले. त्यात याबद्दल मला अधिक माहिती वाचायला मिळाली. त्या बौद्धिकाला उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी ती माहिती सांगितली. बहुधा त्यामुळेच असावे, पण ‘गार पाण्याने अंघोळ’, ‘शाकाहारी जेवण’ हे कठीण मार्ग किंवा ‘शाखेत जाण्याचा’ सोपा मार्ग असे पर्याय सांगितले गेले असताना, शाखेत जाण्याचा सोपा पर्याय माझ्या कुठल्याच मित्राने स्वीकारला नाही- अगदी डॉ.सहस्रबुद्धेंच्या मुलानेसुद्धा!

या माझ्या उदाहरणावरून ‘न्यूनगंडनिर्मिती आणि निराकरण’ हे तंत्र तर स्पष्ट होतेच; पण मुलाची मेंदू-धुलाई न होऊ देण्यासाठी सावध आणि चांगल्या पालकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, तेही स्पष्ट होते.

न्यूनगंड निर्माण करण्यासाठी स्त्री-पुरुष शरीर-संबंध आणि लैंगिक विषयांचा वापर अनेक कुटील पंथांत व संघटनांत केला जातो. यामध्ये ख्रिस्ती कुटील पंथ आघाडीवर असलेले दिसतात. मार्स हिल चर्च ही अमेरिकेतील अशीच एक कुटील संस्था आहे. या ‘चर्च’चा सभासद अँड्र्यू यांनी एक ब्लॉग प्रकाशित केला.10 (अर्थात, हे चर्चला अजिबात मान्य नाही.) या ब्लॉगमध्ये चर्चने अँड्र्यूवर केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईची माहिती आहे. अँड्र्यूने एका स्त्रीचे (आपली पत्नी नसणाऱ्या) तिच्या संमतीने चुंबन घेण्याचा गुन्हा केला. चर्चमधील वातावरणामुळे अँड्र्यूने या गुन्ह्याची कबुली आपल्या गटातील वरिष्ठांना दिली. त्यानंतर या गुन्ह्याबद्दल ॲन्ड्र्यूला पुढील शिक्षा सांगण्यात आल्या :

1) ‘चर्च’मधील सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या.

2) एक महिनाभर त्याला विविध बैठकांमध्ये आपल्या गुन्ह्याची परत-परत कबुली द्यावी लागली.

3) ‘चर्च’मधील कोठल्याही बाईशी कोठलेही संबंध ठेवायला बंदी आणि

4) आपल्या लैंगिक पापांचा पूर्ण इतिहास चर्चला लिहून देणे.

इराणमध्ये धर्मांध मुसलमानांचा एक मुजाहिदीन गट रझावी आणि त्यांची बायको असे दोघे चालवतात. इराणमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य यांची स्थापना करण्यासाठी त्यांनी युद्ध पुकारले आहे. ‘लोकशाही’ आणि ‘स्वातंत्र्य’ याचे आकर्षण वाटून जगभरचे हजारो मुसलमान युवक रझावींच्या मुजाहिदीनमध्ये सामील होतात. या गटात सामील झालेल्यांना घटस्फोट घ्यावा लागतो, प्रेयसी असल्यास तिच्याबरोबरचे सर्व संबंध तोडावे लागतात. या गटातून आता बाहेर पडलेले एक मोराडी नावाचे गृहस्थ सांगतात - 11 ‘‘आम्हाला स्त्रियांसंबंधी आमच्या मनात आलेले सर्व विचार, कल्पना लिहिण्याची सक्ती होती. दर आठवड्याच्या बैठकीमध्ये आम्हाला ते सर्वांना जाहीरपणे सांगावे लागत असे. आमच्यावरील इराणी संस्कृतीच्या प्रभावामुळे आम्हाला हे करणे फार क्लेशकारक वाटे.’’

आपण आणि आपले : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 4

जहाल अतिरेकी लोक सर्व माणसांची विभागणी दोन स्पष्ट गटांत करतात- आपण आणि ते. जे आपल्यात नाहीत, असे सगळे ‘ते’मध्ये मोडतात. ‘आपण’ सर्व मित्र, ‘ते’ सर्व शत्रू- हे त्याच्या बरोबरीने असलेले समीकरण असते.

कुटील पंथीय आपली वेगळी ओळख निर्माण करतात. ती पोशाखात असते, भाषेत असते, एकमेकांना संबोधण्याच्या पद्धतीत असते, भेटायच्या जागांबाबत असते. आपल्यांबाबत दाखवायच्या आपुलकीत असते, समाजात वावरायच्या रीती-रिवाजात असते.

‘बॉर्न अगेन’ ख्रिस्ती पंथीय मग लंडनच्या ट्यूब रेल्वेमध्ये आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर आपल्या ख्रिस्तप्रेमाचे प्रदर्शन करीत गाणी गातात. (काही कट्टर ‘हरे कृष्ण’ पंथीयही लंडनमध्ये ह्यांचे अनुकरण करताना माझ्या पाहण्यात आले.)

मुसलमान कट्टर पंथीय मग आधीचा, परिसरातील लोकांसारखा वेष वर्ज्य मानतात. ते डोक्यावर विशिष्ट पद्धतीची जाळीदार टोपी, मिशा न राखता वाढलेली दाढी, पठाणी पद्धतीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा घालू लागतात. लाल मांस खाणे पवित्र आणि आवश्यक मानू लागतात. ते मांस ‘हलाल’ पद्धतीचेच असले पाहिजे, याचा तीव्र आग्रह धरतात. आधी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग म्हणणारे सुशिक्षित तरुण आता- विशेषत: आपल्या माणसाला- ‘सलाम आलेकुम’, ‘वालेकुम सलाम’ म्हणूनच संभाषण सुरू करतात, इ.इ.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हा ‘आपण’- भाव कसा आचरणात आणतात याचे उत्तम वर्णन स. ह. देशपांड्यांनी केले आहे. ते लिहितात - 12 ‘‘पुण्यात मी आलो, तेव्हा शाळेतली मुलं आडनावानं आणि व्यवच्छेदनासाठी ते उपयुक्त नसेल तर आद्याक्षरं व आडनावं मिळून हाक मारीत. संघात मात्र जवळीक प्रस्थापित करण्यासाठी पहिलं नाव आणि आडनाव यांचा संयोग करण्यात येई... नव्या स्वयंसेवकाला आत्मसात करण्यासाठी जुने स्वयंसेवक त्याच्यावर मैत्रीचा वर्षाव करीत. एवढंच नव्हे, तर त्याच्या आप्तांनाही या धाग्यात गोवू पाहत. स्वयंसेवकाचं मित्राच्या बायकोला ‘वहिनी’ म्हणून संबोधणं, हे याच वृत्तीचं एक रूप. कुणी आजारी पडलं, तर त्याच्यावर प्रेमाचा मारा करायला स्वयंसेवकांना पर्वणीच लाभे, असं म्हणायला हरकत नाही. आजारी स्वयंसेवकाकडं विचारपूस करणाऱ्यांचा इतका ओघ लागे की, त्यामुळं आजाऱ्याला आणि त्याच्या घरातल्यांनाही नकोसं होऊन जाई... बाहेरच्या समाजाला आवाहन करतानाही संघ अशीच जवळिकीची क्लृप्ती वापरतो. संघाच्या उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेची सुरुवात- ‘आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अमुक-अमुक उत्सव’ अशी असते. तिऱ्हाइतालाही एखाद्या कार्यक्रमाला बोलावण्याचा प्रसंग आला, तर स्वयंसेवक बेदरकारपणे म्हणतो, ‘आपले मुंबई जिल्ह्याचे कार्यवाह त्या वेळी येणार आहेत’...’’

पुढे जाऊन स. ह. देशपांडे असा सारांश सांगतात, ‘‘या सगळ्यांच्या मुळाशी दृढ विश्वास असा की, माणूस प्रेमाने जिंकता येतो.’’ पुढे जाऊन ते असेही बिनदिक्कत म्हणतात, ‘‘गांधीजींनी जसे प्रेमाचे टोक गाठले, तसे संघानेही.’’ देशपांडे हे विसरतात की, संघाचे प्रेम हे फक्त ‘आपल्यांसाठी’- परिवारातल्या लोकांसाठी असते. हे प्रेम गांधीजी किंवा सानेगुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सर्वांवरच्या प्रेमाचे नसते.

संघाच्या किंवा सर्वच अतिरेकी संघटनांच्या ‘आपल्यां’वरील प्रेमाला दुसऱ्यांचा द्वेष-तिरस्कार यांची जोड असते. मुसलमान अतिरेकी एकमेकांना मिठ्या मारतात; पण त्याच वेळी ते ‘काफीर’ संपवण्याच्या आपल्या जबाबदारीची जाणीव एकमेकांना करून देतात. अतिरेकी संघटनांमधील गाभ्याची भावना ‘इतरांचा द्वेष’ ही असते. ‘त्यांनी’ आपल्यावर अन्याय केला आहे, ‘त्यांनी’ आपल्या बायकांची अब्रू लुटली आहे; आपण त्यांना अद्दल घडवली पाहिजे, त्यांचा सूड घेतला पाहिजे, असा विखार मनात असतो. मग ते निग्रोंना गोळ्या घालणारे अमेरिकेतील कु क्लक्स क्लान असोत, उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत ‘सूड उगवा’ भाषण करणारे अमित शहा असोत, की खर्डाला नितीन आगेला भर दिवसा हालहाल करून मारणारे जातीयवादी असोत!

गांधीजींचे प्रेम हे सूडबुद्धीवर आधारित नव्हते. गांधीजी म्हणाले होते, ‘An eye for an eye will make the whole world blind’ (आमचा डोळा गेला तर तुमचाही डोळा काढू, असे वागलो; तर सर्व जग आंधळे होईल.) गांधीजींची जागतिक प्रेमभावना आणि संघाची द्वेषाधारित आपल्यांबद्दलची स्वार्थी-संकुचित प्रेभावना या एकच आहेत असे भासवणे, ही निव्वळ फसवेगिरी आहे. स.ह.देशपांडे अशी मांडणी करतात. यातून संघाने केलेली मेंदूची धुलाई किती परिणामकारक आणि टिकाऊ असते, हेच दिसून येते.

‘आपलेपणा’चा सर्वांत मोठा आधार हा ‘आपल्या’ वर्चस्वाचा, वरिष्ठपणाचा, श्रेष्ठत्वाचा असतो. याची काही उदाहरणे आपण लक्षात घेऊया.

जर्मनीमध्ये नाझींनी ‘आर्य’ हा सर्वश्रेष्ठ वंश असल्याचे जाहीर केले. आपण ‘आर्य’ असल्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत, सर्व लोकांवर सत्ता गाजविण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे- एवढे म्हणून त्यासाठी जागतिक (आणि आत्मघातकी) युद्ध पुकारून ते थांबले नाहीत; ज्यूंना शासन करण्याचे, त्यांना श्रम-गुलामीला जुंपण्याचे आणि तिथे ते निरुपयोगी वाटल्यावर त्यांना गॅस चेंबरमध्ये घालून त्यांची ‘दयाळू’ कत्तल करण्याचे ‘आपले’ पवित्र कर्तव्यही त्यांनी कसोशीने व सचोटीने पार पाडले.

अमेरिकेतील कु क्लक्स क्लान या संघटनेने आफ्रिकी काळ्यांची सातत्याने ‘शिकार’ केली. त्यासाठी त्यांनी ‘गोरा’ श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले. ‘आमचा वंश हेच आमचे राष्ट्र’ एवढी व्यापक आणि उद्धट घोषणा करून त्यांनी आपल्या अनुयायांना ते जन्मत:च श्रेष्ठ असल्याची खात्री दिली. मग पळून गेलेल्या निग्रो गुलामापासून ते गोऱ्या बाईकडे बघण्याचा गुन्हा करणाऱ्या निग्रोपर्यंत प्रत्येकाला शोधून ठार करण्याची कृती ते नैतिक जबाबदारी म्हणून पार पाडू शकले.  

हिंदुस्थानात इतरांपेक्षा हिंदू श्रेष्ठ आहेत, हे संघाने वेळोवेळी सांगितलेच आहे; पण गोळवलकरगुरुजी एवढ्यावर थांबले नाहीत. हिंदूंमध्येसुद्धा कोण श्रेष्ठ आहेत आणि हिदूंमधील या श्रेष्ठांनी काय केले पाहिजे, याविषयी त्यांचे विचार उद्‌बोधक आहेत.

गुजरात विद्यापीठातील School of Social Sciences मध्ये भाषण करताना त्यांनी सांगितले,13 ‘‘आजकाल वंशसंकराचे प्रयोग फक्त प्राण्यांवर केले जातात. असे प्रयोग माणसांवर करण्याचे धाडस स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवणारेसुद्धा करीत नाहीत. आज जर माणसांमध्ये वंशसंकर पाहायला मिळत असेल; तर तो वैज्ञानिक प्रयोगांचा भाग नसतो, तर निव्वळ लैंगिक भुकेचा परिणाम असतो. आता आपण या क्षेत्रात आपल्या पूर्वजांनी काय प्रयोग केले, ते बघूया. वंशसंकरातून मानवी वंश सुधारण्याचा हा प्रयत्न होता. उत्तरेतील नंबुद्री ब्राह्मणांना केरळमध्ये वसवण्यात आले. नंबुद्री कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न केरळमधील फक्त वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र समाजातील मुलीशीच होईल, असा नियम करण्यात आला. दुसरा अधिक धाडसी नियम असा होता की, कोठल्याही समाजातील लग्न झालेल्या स्त्रीचे पहिले अपत्य हे नंबुद्री ब्राह्मणाच्या संकरातून जन्मले पाहिजे. त्यानंतर तिला आपल्या नवऱ्यापासून मूल होण्याची परवानगी होती. आज या प्रयोगाला विवाहबाह्यसंबंध म्हटले जाईल; पण ते योग्य होणार नाही, कारण हा नियम फक्त पहिल्या मुलाबद्दल आहे.’’

‘हिंदुस्थानात हिंदू श्रेष्ठ’ यापेक्षाही गोळवलकरांची ही भूमिका हिंदूंमध्ये ब्राह्मण आणि त्यातही उत्तरेतले नंबुद्री ब्राह्मण श्रेष्ठ, इतकी नेमकी आहे. अर्थात, गोळवलकरांची ही भूमिका फॅसिस्ट नाझींपेक्षा किती तरी अधिक ‘दयाळू’ आणि ‘समावेशक’ आहे. ते इतर सर्व वंशांचा नाश करायचा म्हणत नाहीत; वंशसंकरातून इतर वंश सुधारायचे म्हणतात!

मुसलमानांतील अतिरेकी अपेक्षेप्रमाणे ‘मुसलमान सर्वश्रेष्ठ’ असल्याचे सांगतात. ‘हसते लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान’ या मुस्लिम लीगच्या घोषणेच्या पूर्वार्धामध्ये एक उद्दाम वरिष्ठपणा आहे. मुस्लिम अतिरेक्यांच्या प्रचारात हिंदूंचा उल्लेख ‘नपुंसक-घाबरट’ असा सर्रास केला जातो. पण मुसलमानच सर्वश्रेष्ठ असतात, असा समज ही घोषणाबाजी आणि शिवीगाळीपुरता मर्यादित नाही; त्यासाठी पुढील हकिगत बोलकी आहे.

‘‘दि. 1 जानेवारी, 2008 रोजी, सुदानमध्ये अमेरिकी राजनैतिक अधिकारी जॉन ग्रॅनविले आणि त्यांचा ड्रायव्हर अब्बास यांचा खून करण्यात आला. या खुनाबद्दल कोर्टाने चार मुसलमानांना फाशी सुनावली. सुदानमध्ये मुसलमान धर्माचा प्रभाव आहे. तिथे ज्याचा खून झाला, त्यांच्या नातेवाइकांनी खुन्याला माफी दिली; तर खुन्याची फाशी रद्द होते. अब्बास ड्रायव्हरच्या नातेवाइकांनी खुन्यांना माफी दिली. जॉन ग्रॅनविलेच्या नातेवाइकांनी खुन्यांना माफी देण्यास नकार दिला. कोर्टाने फाशीची शिक्षा कायम केली. या विरुद्ध मुसलमान अतिरेकी मूलतत्त्ववाद्यांनी आघाडी उघडली. ‘लेजिटिमेट लीग ऑफ स्कॉलर्स ॲन्ड प्रीचर्स इन सुदान’ (Legitimate Leaque of Scholars and Preachers in Sudan) या वरकरणी सौम्य प्रकृतीचे नाव असणाऱ्या संघटनेने काय म्हटले, ते पाहा.14

‘‘सर्व मुसलमानांच्या रक्ताची किंमत सारखी आहे, पण मुसलमान नसलेल्यांच्या रक्ताची किंमत त्याहून खूपच कमी आहे. प्रत्यक्ष कुराणातच असे सांगितले आहे (उदाहरणार्थ 2:221) की, खालच्यात खालचा मुसलमान हा मुसलमान नसलेल्या कोणापेक्षाही श्रेष्ठ आहे. कोठल्याही बिगर- मुसलमानाच्या रक्तासाठी मुसलमानाचे रक्त सांडले जाता कामा नये.’’

सर्वच कुटील संघटना आणि अतिरेकी संघटना ‘आपण’ इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असे आपल्या अनुयायांना सांगतात. लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की- या वरिष्ठतेचे, उच्चतेचे कारण सभासदाच्या किंवा संघटनेच्या कर्तबगारीत नसते. नाझी, कु क्लक्स क्लान, रा.स्व.सं., मुसलमान अतिरेकी हे सर्व गट श्रेष्ठतेचा, उच्चतेचा दावा करतात; त्याचा आधार अनुक्रमे आर्य वंश, गोरा रंग, जात आणि रक्त हा आहे. म्हणजे हे सर्व जन्मसिद्ध आहे. त्यामुळे या जन्मात तरी ते कर्तबगारीने बदलता येत नाही. थोडक्यात काय तर, अनुयायांमध्ये आधी न्यूनगंड निर्माण करायचा, मग त्याची छाती फुगवायची- असे हे तंत्र आहे. मेंदूच्या धुलाईचे हे फार प्रभावी तंत्र आहे. म्हणूनच सर्व कुटील पंथ, अतिरेकी संघटना त्याचा एकाच पद्धतीने आणि हमखास वापर करतात.

पुनरावृत्ती आणि विचारबंदी : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 5, 6

जर एखाद्या गटात तेच ते पुन: पुन्हा पुरेशा वेळा सांगितले, तर ऐकणारे असे समजू लागतात की; जे सांगितले आहे, ते गटाला मान्य असलेल्या ‘विश्वासाचा’ भाग आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की- गटातील एका माणसाने जर तेच मत तीन वेळा सांगितले, तर गटातील इतर किमान तीन माणसांची मते बदलून त्याच्यासारखी होण्याची संभाव्यता 90 टक्क्यांहून जास्त असते. याबाबतच्या प्रयोगात असेही लक्षात आले आहे की- एकाच माणसाने तेच ते मत परत-परत मांडणे, हे तीन लोकांनी तेच मत सांगण्यापेक्षा तिपटीने अधिक प्रभावी आहे! एक-दोनदा ऐकले की, ते मेंदूत ठसते आणि मग परत ऐकले की, ते आपल्याच मेंदूतून आले, असा आभास निर्माण होऊन ते आपलेच मत वाटते. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील संशोधकांनी याला ‘स्मृतीची विकृती’ (memory distortion) असे नाव ठेवले आहे.15

अलीकडे, मानसशास्त्रात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एन.एल.पी.) (Neuro linguistic Programming-NLP) नावाची शाखा विकसित झाली आहे. मेंदूमध्ये संदेशांची देवाण-घेवाण कशी होते; मेंदूच्या कोठल्या भागात काय आठवणी- माहिती-ज्ञान साठवले जाते, इत्यादी प्रश्नांचा शारीर-वैज्ञानिक अभ्यास जगभर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातून येणारे निष्कर्ष मानवी वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी वापरायचे, हा या एन्‌.एल.पी.चा एक भाग आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठात मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत चालणारे संदेशवहन आणि वर्तणूक यांवर पुनरावृत्तीचा काय परिणाम होतो, याचे सांख्यिकी मोजमाप करण्यात आले.16 मेंदूतील संदेशवहन मोजण्यासाठी Function MRI या तंत्राचा वापर करण्यात  आला. या संशोधनातून असे दिसून आले की पुनरावृत्तीमुळे मेंदूच्या समोरच्या भागातील संदेशांचे दळणवळण अशा प्रकारे कमी होते की, ज्यामुळे वर्तणूक घडवणे सोपे जाते.

अतिरेकी संघटना जेव्हा पुनरावृत्तीचे तंत्र वापरतात, तेव्हा त्याला दोन गोष्टींची जोड देतात. पहिली गोष्ट म्हणजे, सभासदांना स्वत: विचार करण्यापासून परावृत्त करणे- तो जवळपास गुन्हाच ठरवणे. दुसरी गोष्ट म्हणजे- ज्या संदेशाची पुनरावृत्ती करायची, तो संदेश ‘द्वेषकारक’ ‘हिंसावृत्तीवर्धक’ आहे, हे पाहायचे. मुळात पुनरावृत्ती हे मेंदू-धुलाईचे प्रभावी तंत्र आहे. ते तंत्र रिकाम्या मेंदूवर वापरले आणि संदेश ‘विद्वेषकारक-हिंसावर्धक’ असला की ते तंत्र अधिक प्रभावी ठरत असले पाहिजे, असे मला वाटते. पण याबाबत मला शास्त्रीय संशोधन पाहावयास मिळाले नाही. पुनरावृत्ती तंत्राचा वापर नीट लक्षात येण्यासाठी ‘मेंदू विचारमंद’ करणे आणि संदेश ‘द्वेषभावी, हिंसावर्धक’ करणे याचे काही नमुने लक्षात घेण्याची गरज आहे.

इंग्लंडमधल्या आणि आता सिरिया व इराकमधल्या काही शाळा मुसलमान मूलतत्त्ववाद्यांनी ताब्यात घेतल्या. तिथे आता विज्ञान, भाषा, कला यांच्या शिक्षणाऐवजी कुराण पठणावर भर दिला जातो. मुलांना अरेबिक भाषा शिकण्याचे आवाहन केले जाते आणि कुराणाचा आम्ही सांगू तोच अर्थ खरा कसा? असा प्रश्न विचारलात तर तो गुन्हा आहे, असेही सांगितले जाते.17 अमेरिकेत डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकवायला ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांचा विरोध आहे. जग देवाने सहा दिवसांत निर्माण केले (आणि सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली), अशी त्यांची श्रद्धा आहे. एवढेच नाही, तर या श्रद्धेला बाधा येईल असे काहीही शिकवायला त्यांचा प्रखर आणि कृतिशील विरोध आहे. अमेरिकेतील काही राज्यांत ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांचा जोर आहे. तिथे उत्क्रांतिवाद शिकविण्यावर कायद्याने बंदी आहे. टेनिसी राज्यात उत्क्रांती शिकवली म्हणून जॉन स्कोप या शिक्षकाला 1925 मध्ये शिक्षाही झाली होती. (नंतर ती तांत्रिक कारणांसाठी रद्द झाली.)

ज्ञान आणि विचार यांचा विरोध खूप व्यापक, सर्वस्पर्शी असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ते रमेश पतंगे हे आणीबाणीच्या काळात (1975-77) ठाण्याच्या कारागृहात बंदी होते. त्या वेळी त्यांच्याबरोबर संघाचे अनेक कार्यकर्ते बंदिवान होते. त्या वेळच्या अनुभवांबद्दल ते लिहितात,18 ‘‘माझ्यासारख्या संघाच्या प्रमुख कार्यकर्त्याला आंबेडकरांच्या कार्याची जाणीव नव्हती; मग सामान्य स्वयंसेवकाची काय परिस्थिती असेल? हा विचार फार अस्वस्थ करणारा होता. (जातिव्यवस्थेचा) प्रश्न समजला नाही म्हणून ही अस्वस्थता नव्हती; पण या प्रश्नाबद्दल कधी चर्चाच होत नव्हती, म्हणून माझी अस्वस्थता होती. जेव्हा प्रश्नच नसतात, तेव्हा त्यांची उत्तरे शोधण्याची आवश्यकताच निर्माण होत नाही... मला जरी असे वाटले की, माझ्या मनातले प्रश्न माझ्यापुरतेच आहेत, तरी तसे ते नव्हते. इतर अनेक स्वयंसेवकांना अशाच प्रकारच्या शंकांनी ग्रासले आहे, असे माझ्या लक्षात आले. सुखदेव नवले, भिकू इदाते हे त्यांपैकी प्रमुख होते.’’ (इंग्रजीवरून मराठी अनुवाद)

संघातील ‘विचारबंदी’बद्दल स. ह. देशपांडे स्पष्टपणे लिहितात,19

‘‘जिला निदान दुय्यम बौद्धिकता म्हणता येईल, तीसुद्धा संघाने गुंडाळून ठेवली. स्वतंत्र विचार नसो; पण आपला म्हणून जो विचार आहे, त्याचा प्रचार करणं आणि त्यासाठी कमीत कमी बौद्धिक सामग्री जमवून तिची मांडणी करणं, हेही संघाने टाळलं. फॅसिस्ट स्वरुपाच्या संघटना मुख्यत: मनोवैज्ञानिक तंत्र वापरीत, हे खरं; पण त्यांनीदेखील बौद्धिक किंवा अर्ध-बौद्धिक व्यवहारांकडं दुर्लक्ष केलं नाही, हे ध्यानात घेता, संघाची ही पद्धत फारच आश्चर्यकारक वाटते.’’ (स.ह.देशपांड्यांनी संघातले दिवस ‘चांगले’ वर्णिले असले, तरी फॅसिस्ट संघटनांबद्दलचे त्यांचे आकलन मर्यादित होते, हेही या परिच्छेदातून कळते; पण तो मुद्दा वेगळा)

हिंसावृत्ती संवर्धन : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 7

हिंसावृत्ती ही शस्त्रशिक्षणातून जोपासली जाते. याबद्दल आधी लिहिले आहे. पण अतिरेकी संघटनांत हिंसावृत्ती जोपासण्याचे इतरही अनेक मार्ग वापरले जातात. उदय माहूरकर यांनी इंडियन मुजाहिदीन ही संघटना मेंदू-धुलाई करताना हिंसाचाराला कसे आवाहन करते, याबद्दल लिहिले आहे. 20

‘‘इंडियन मुजाहिदीनची स्थापना करण्यात स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंटच्या (सिमी- Simi) नेत्यांनी पुढाकार घेतला. सफ्दर नागोरी, कमरुद्दीन नागोरी, अमीर परवाझ हे सिमीचे प्रमुख नेते होते. त्यांनी जिहादी वाङ्‌मय, मुसलमानांवर झालेल्या ‘अत्याचारांच्या’ चित्रफिती,  जिहादींनी केलेले आत्मघातकी हल्ले, अल्‌ कायदा नेत्यांची द्वेषभावी भाषणे यांचा वापर केला. गुजरात पोलिसांना इंडियन मुजाहिदीनकडे ज्या प्रचारकी सीडी मिळाल्या, त्यात हिंसाचारच हिंसाचार आहे. त्यांत इस्रायलने पॅलेस्टाइनवर केलेले हल्ले आहेत, तालिबानच्या संशयितांवर अमेरिकी सैन्याने केलेले हल्ले आहेत, अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी शाळांवर टाकलेल्या बाँबचे चित्रण आहे आणि प्रतिशोध घेण्यासाठी जिहादींनी जगभर केलेल्या हल्ल्यांचेही चित्रण आहे.’’ (स्वैर भाषांतर) इसिस संघटना लहान मुलांच्या बुद्धिधुलाईवर भर देते. अली हसन हे इजिप्तमधील सामाजिक-राजकीय संशोधक आहेत. त्यांनी अल्‌ अहराम या कैरोमधून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकात ’The ISIS and Brainwashing’ शीर्षकाचा लेख लिहिला आहे. 21 या लेखातील काही उद्‌बोदक भाग खालील परिच्छेदात उद्‌धृत केला आहे.

‘‘पुढे दिलेले संभाषण हे वडील आणि मुलामधले आहे. वडील हे मूळचे मोरक्कोचे, आता बेल्जियमचे नागरिक आहेत. ते आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन ‘इसिस’च्या ताब्यात असलेल्या सिरियामध्ये आले. त्यांच्यामधील संभाषणाची सीडी गुप्तपणे रेकॉर्ड करून सिरियाच्या बाहेर चोरून आणण्यात आली. सीडीवरील संभाषणाचा काही भाग :

वडील : तुला बेल्जियमध्ये परत जायचे आहे का?

मुलगा : नाही, मला तिथे परत जायचे नाही. बेल्जियम ही नास्तिकांची भूमी आहे. तिथे धर्मद्वेष्टे (Infidets) राहतात. सिरियामध्ये इस्लामिक स्टेटचे राज्य आहे.

वडील : तुला जिहादी व्हायचे आहे, की तुला वीरमरण येईल अशा योजनेत सहभागी व्हायचे आहे?

मुलगा : मला जिहादी व्हायचे आहे.

वडील : तुला धर्मद्वेष्ट्यांना का मारायचे आहे?

मुलगा : कारण ते मुसलमानांना मारतात. (थोडा विलंब) आपण युरोपमधल्या सर्व धर्मद्वेष्ट्यांना मारणार आहोत ना?

वडील : (युरोपमधल्या सर्वांना उद्देशून) तुम्ही आमच्या स्त्रियांना गुलाम बनवलेत, आता आम्ही तुमच्या स्त्रियांना गुलाम बनवू. तुम्ही आमच्या मुलांना अनाथ बनवलेत, आता आम्ही तुमच्या मुलांना अनाथ बनवू.’’

अली हसन यांच्या सांगण्याप्रमाणे, वरील संभाषण हे प्रतिनिधिक आहे. ते पुढे सांगतात ISIS कधी कधी मुलांना पळवून नेते आणि त्यांची मेंदूधुलाई करते. अलेप्पो (Aleppo) शहरात इसिसने 250 मुलांचे अपहरण केले. त्यांपैकी 100 मुलांना लगेच सोडले, उरलेल्या 150 मुलांची पूर्ण मेंदू-धुलाई केली. त्यासाठी मारहाण, उपासमार, प्रचारकी सिनेमे, शिरच्छेदाच्या देखाव्यांचे उदात्तीकरण इत्यादी मार्ग वापरण्यात आले. लेखाच्या शेवटी अली हसन हताशपणे म्हणतात, ‘‘इसिसला मुले मिळण्यात काही अडचण नाही. युद्धाने राखरांगोळी झालेल्या प्रदेशात मुले खेळ म्हणून युद्धच खेळतात!’’

मुसलमान धर्मद्वेष्टे आपल्या कूट आणि क्रूर कारवायांसाठी वेळोवेळी कुराणाचा आधार घेतात. हे इसिस, मुजाहिदिनी आता करतात; पण इतर धर्मांप्रमाणेच मुसलमान धर्मातही धर्मग्रंथांचा स्वार्थी आणि आंधळा वापर करण्याची परंपरा जुनी आहे. उमय्याद, अब्बासिड व ओत्ताम या मध्य-पूर्वेतल्या पंथांनी आपल्या स्वार्थी आणि आक्रमक युद्धपिपासूपणासाठी कुराणाचा हवाला वेळोवेळी दिला आहे. कुराणात स्वसंरक्षणासाठी केलेल्या युद्धांचे समर्थन आहे; स्वार्थी, युद्धपिपासू, आक्रमक युद्धांचे समर्थन केलेले नाही, याचा या कुटील धर्मद्वेष्ट्यांना विसर पडतो.

ग्रंथप्रामाण्य : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 8

सामान्यत: यासाठी वापरला जाणारा ग्रंथ हा धर्मग्रंथ असतो. अशा धर्मग्रंथाचा वापर मेंदू-धुलाईसाठी करण्यामध्ये ज्यू, ख्रिस्ती आणि मुसलमान कुटील पंथीय आघाडीवर आहेत. धर्मग्रंथांचा असा वापर हिंदूधर्मीय अतिरेकी संघटना फारसा करीत नाहीत. हिंदू हा बहुप्रवाहवादी धर्म आहे. हिंदूंच्या पंथाप्रमाणे, जातींप्रमाणे वेगवेगळ्या देव-देवता आहेत. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत अशा वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. त्यामुळे कोठल्या एका धर्मग्रंथात सर्व प्रश्नांवर अंतिम उत्तरे सांगितली आहेत, असा दावा करणे- तसा भ्रम निर्माण करणे- हिंदू अतिरेकी संघटनांना अवघड आहे. ज्यू, ख्रिस्ती आणि मुसलमान यांना एक धर्मग्रंथ आहे. कट्टर ख्रिस्ती पंथाच्या उत्क्रांती शिकवायला असलेल्या विरोधाचा उल्लेख आधी आलाच आहे, तो या ग्रंथप्रामाण्याचाच आविष्कार आहे.

आधीचे धर्मग्रंथ- म्हणजे ओल्ड टेस्टामेन आणि बायबल हे अनुयायांनी नासवले, विपरीत केले; आमचे कुराण तसे विकृत केले जाऊ शकतच नाही, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. त्यामुळे कुराणातील एक-एक वाक्य वेगळे काढून त्याचा मेंदू-धुलाईसाठी वापर करणे मुसलमान अतिरेकी संघटनांना सोपे जाते. विरोधकाचा गळा  तलवारीने हळूहळू कापून, त्याला यातना देत त्याचा खून करायचा आणि या खुनाचे अंगावर शहारे आणणारे चित्रण माहिती नभोमंडळावर प्रसारित करायचे- असे तंत्र अल्‌ कायदाने परत-परत वापरले आहे. कुराणातील पुढील वचनांचा ते यासाठी सर्रास वापर करतात. 22

‘‘जेव्हा युद्धभूमीवर तुमची गाठ देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांशी पडेल, तेव्हा जोपर्यंत त्यांचा पूर्ण बीमोड होत नाही, तोपर्यंत त्यांची मुंडकी उडवा.’’ (‘मुंडकी उडवा’- ऐवजी ‘मानेवर वार करा’ असेही भाषांतर केले जाते.)

‘‘देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांची मने मी भीतीने भरून टाकेन. त्यांच्या मानेवर वार करा, त्यांच्या साऱ्या बोटांवर वार करा.’’

या वचनांचा आधार घेऊन मुसलमान युवकांना हिंसाचार करण्याचे आवाहन मुजाहिदीन आणि अल्‌ कायदाचे नेते करतात. हा कुराणातील वचनांचा कमालीचा दुरुपयोग आहे, हे मुसलमान जगतातील अनेक अभ्यासकांनी परत-परत दाखवून दिले आहे. कुराणातील वचने ही रानटी टोळ्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, यासाठी आहेत. ती एका विशिष्ट ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीत म्हणजे 1500 वर्षांपूर्वी मध्य-पूर्वेतील स्वसंरक्षक युद्धासाठीची आहेत. कुराणातील आधीचे आणि नंतरचे म्हणणे लक्षात घेतले; तर कुराणात नि:शस्त्र नागरिकांवर अत्याचार करण्याचे, त्यांचे हाल करून त्यांना मारण्याचे सांगितलेले नाही. पण स्वार्थी मूलतत्त्ववाद्यांना सत्याची चाड कधीच नसते. अल्‌ कायदा- मुजाहिदीन यांनी धर्मग्रंथ हे विरोधकांत दहशत निर्माण करण्याचे आणि अनुयायांना हिंसेची व्यसनी चटक लावण्याचे साधन बनवले आहे.

आजन्म नेतृत्वापुढे शरणागती : मेंदू-धुलाई तंत्र क्र. 9

अतिरेकी संघटनेला एक आणि एकच नेता असतो. तो स्वयंभू तरी असतो किंवा आधीच्या नेत्याने त्याची नेमणूक केलेली असते. भांडवलशाहीमध्ये भांडवली कंपन्यांची मालकी आणि बहुतेक वेळा नेतृत्व हे आनुवंशिक पद्धतीने वडिलांकडून मुलाकडे (काही अपवाद वगळता) जाते. सरंजामशाहीमध्येही राजाचा मुलगा राजा बनतो. लोकशाहीमध्ये देशाचा, पक्षाचा, संघटनेचा नेता सामान्यत: नागरिकांकडून, सभासदांकडून निवडला जातो; निदान तसा नियम असतो आणि त्या नियमाचे पालन केल्याचा देखावा निर्माण केला जातो. अतिरेकी संघटनांचा नेता हा स्वघोषित तरी असतो किंवा आधीच्या नेत्यांनी नेमलेला असतो. अतिरेकी संघटनांत या नेत्याच्या नेतृत्वाची कालमर्यादा अमर्याद असते. मरेपर्यंत किंवा स्वत:ची इच्छा असेपर्यंत तो नेता असतो.

अतिरेकी संघटनांत नेता म्हणेल ती पूर्व दिशा असते. प्रत्येक सभासदाने या नेत्याचा आदेश पाळायचाच असतो. नेत्याच्या आदेशामागचा विचार किंवा उद्देश अनुयायांनी विचारायचा नसतो. अनुयायाने संघटनेच्या नेत्याला प्रश्न विचारला; तर तो निव्वळ उद्धटपणा समजला जात नाही, तो गंभीर शिस्तभंग समजला जातो. त्याला देहांतापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

तरुण-तरुणीला संघटनेमध्ये स्वीकारले जाणे हे त्याने- तिने नेत्यासमोर पूर्ण बौद्धिक आणि शारीरिक शरणागती पत्करली आहे, याची खातरजमा होण्यावर अवलंबून असते. आदेश आला की, सांगितलेला गंभीर गुन्हा तो करतो का- अशी परीक्षा घेण्याची पद्धती अनेक कुटील पंथीय संघटनांत आहे. अमेरिकेतील माफियांमध्ये याला Making Bones अशी संज्ञा आहे. याचा अर्थ- आदेश मिळाला की, सांगितलेल्या माणसाचा खून करणे. कारण न विचारता असा खून केला की, तो माफियाचा सदस्य बनतो. यातून त्या तरुणाच्या मनात अपराधित्वाची भावना निर्माण होते, न्यूनगंड बळकट होतो.

दुसऱ्या बाजूला- आता तू शिस्तभंग केलास, संघटना सोडलीस; तर पोलिसांना तुझ्याबद्दल कळवू, अशी त्या तरुणावरची टांगती तलवार नेत्याच्या हातात येते. मग त्या तरुणांना अधिकाधिक शरणागतीच्या, आत्मसमर्पणाच्या कृती करायला भाग पाडणे सोपे होते. मग नवे गुन्हे, अधिक गंभीर गुन्हे, अधिक न्यूनगंड, शिस्तभंगाच्या कृतीचे अधिक भय- असे दुष्टचक्र सुरू होते. त्यातून आता तो तरुण सुटणे कठीण बनते.

अतिरेकी संघटनेच्या या नेत्याचे पूर्वचरित्र गूढ ठेवले जाते. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती सामान्य जनतेलाच नव्हे, तर संघटनेच्या कार्यकर्त्यालाही उपलब्ध नसते. स. ह. देशपांडे हे एक अभ्यासू आणि जिज्ञासू व्यक्ती होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. ते लिहितात-

‘‘हेडगेवारांचं चरित्र वाचलं की, त्यांच्या उग्र देशभक्तीपुढं मान लवते, त्यांची कणखर वास्तव दृष्टी पदोपदी प्रत्ययास येते. शिवाय असंही कळतं की, स्वयंसेवक संघासारख्या अखिल भारतीय संघटनेचा हा सरसंचालक... पाहुण्याला जेवायला घालून स्वत: अर्धपोटी राहत होता. याचं कारण, त्यांनी म्हटल्याप्रमाणं, रोखठोक ‘याचि देही याचि डोळा’ काही घडवून आणण्याचा वसा त्यांनी घेतला होता.’’ 23

‘‘पण हे डॉक्टर हेडगेवार संघात असताना कुणाला माहीतच नव्हते... एवढीच कुणकुण होती की, पूर्वाश्रमी बंगालमधल्या क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध होता आणि शरच्चंद्रांनी आपल्या एका कादंबरीत त्यांच्यावर एक पात्र आधारलेलं आहे. पण त्यांच्या संपूर्ण आणि समृद्ध राजकीय जीवनाविषयी संघाच्या स्वयंसेवकांना माहिती असती; तर हेडगेवार ज्याला धार देत राहिले ते शस्त्र काय हेतूनं निर्माण केलं, हे त्यांच्या ध्यानात आलं असतं आणि आपण ज्याचे एकनिष्ठ स्वयंसेवक आहोत, तो संघ व हेडगेवारांना अभिप्रेत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचं नेमकं नातं काय, असा प्रश्न त्यांना कदाचित पडला असता.

‘‘पण असं व्हायचं नव्हतं. एका छोटेखानी चरित्राचा अपवाद सोडता हेडगेवारांचं समग्र आणि तपशीलवार चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल वीस वर्षांनी- एकोणीसशे साठमध्ये प्रसिद्ध झालं.’’

नेत्यांसमोर संपूर्ण शरणागतीला काहीही मर्यादा नसतात. कुटील पंथीय नेता जिम जोन्स याने त्याच्या अनुयायांना ‘जिम रायन’ या अमेरिकी काँग्रेस सदस्याची हत्या करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर त्याने आपल्या सर्व अनुयायांना आत्महत्या करण्याचा आदेश दिला. सायनाइड  असलेले शीत पेय प्यायला जिम जोन्सच्या काही अनुयायांनी नकार दिला. त्यांची अधिक निष्ठावान अनुयायांनी गोळ्या घालून हत्या केली. अनेक धार्मिक कुटील पंथांत नेत्यांचे आज्ञापालन म्हणून खून करण्यात आले आहेत. अशा पंथांमध्ये- मरमॉन, हरे कृष्ण, ब्रँच द्रावेडियन आणि ओ शिनरिक्यो (Aum Shinrikyo) या पंथांचा समावेश आहे. 24

संघटनेच्या कार्यकर्त्यांना जे नियम लागू असतात, ते अतिरेकी संघटनेच्या नेत्यांना लागू नसतात. हे असेच असणार, हे संघटनेच्या सभासदांनी निमूटपणे मान्य करायचे असते. नेत्यापुढे पूर्ण शरणागती स्वीकारण्याच्या संस्कारांचाच तो एक भाग असतो. इराकमध्ये जोरात असलेल्या अतिरेकी संघटनेचे सभासद झालेल्यांना आपल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यावा लागतो, प्रेयसीला सोडून द्यावे लागते. या संघटनेच्या नेत्याला हा नियम लागू नाही. त्याची पत्नी आहे; इतकेच नाही, तर ती नवऱ्याच्या बरोबरीने या संघटनेची नेता आहे! नागपूरला दसऱ्याच्या दिवशी हजारो स्वयंसेवक गणवेश घालून संचलन करतात; पण सरसंघचालक मुफ्तीतच (सामान्य नागरी पोशाख) असायचे आणि स्वयंसेवकांची सलामी स्वीकारायचे!

कुजबूज : मेंदू-धुलाई तंत्र क्रमांक 10

संघटनेच्या सभासदाच्या मनात ‘मला हे विशेष कळले आहे, ते इतरांना उपलब्ध नाही’- अशी भावना पैदा केली की; मग तो सभासद आपल्याला मिळालेली ही ‘विशेष’ माहिती तपासून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. ती माहिती ‘खासगी’ असल्यामुळे त्याला ती तपासता येणे शक्यही नसते. ती खास माहिती दुसऱ्या सभासदाला सांगून आपण कसे श्रेष्ठींच्या जवळ आहोत, असा स्वत:बद्दलचा भ्रमही त्याला निर्माण करता येतो.

कुजबुजीसाठी आपल्या लोकांचे वेगळे हुद्दे, वेगळी सांकेतिक भाषा वापरणे, हे कुटील पंथीयांचे एक ठळक लक्षण आहे. अमेरिकेत काळ्या लोकांची शिकार करून हत्या करण्यासाठी कुक्लक्स क्लान ही संघटना प्रसिद्ध आहे. ती अमेरिकेत गेली 150 वर्षे कार्यरत आहे. त्यांच्या संघटनेतील गुप्त हुद्दे आणि सांकेतिक भाषा आता उघड झाली आहे. त्यांतील काही नमुने खाली दिले आहेत. 25 त्यावरून ही काय प्रकारची भानगड असते, ते वाचकांच्या लक्षात येईल.

हुद्दे :

Klaliff (क्लालिफ) म्हणजे उपाध्यक्ष

Klokard (क्लोकार्ड) म्हणजे व्याख्याता

Kliqrapp (क्लिगरॅप) म्हणजे सेक्रेटरी

Klabee (क्लाबी) म्हणजे खजिनदार इ. इ.

सांकेतिक शब्द :

A.Y.A.K. Ayak अयक म्हणजे ‘तू क्लानचा सभासद आहेस का?’ A.Y.I.A. Akia अकिआ, म्हणजे ‘मी क्लानचा सभासद आहे.’ O.R.I.O.N. ‘Our Race is Our Nation’’- ‘आपला वंश हेच आपले राष्ट्र.’

गुप्त बैठका, विशिष्ट वेगळे विधी, सांकेतिक शब्द यांचा प्रभावी वापर क्लानने केला. त्यातून त्यांनी कुजबुजीचे तंत्र खूप विकसित केले. कुजबुज करण्याचे हे तंत्र किती महत्त्वाचे आहे? स्टेटसन केनेडी हे ‘क्लान बस्टर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी क्लानविरुद्ध प्रचाराची आघाडी उघडली. सांकेतिक शब्द जाहीर करणे, हा त्यांचा क्लान- विरोधी प्रचाराचा एक मुख्य कार्यक्रम होता. अलीकडच्या काळात अमेरिकेत क्लानचा ऱ्हास झाला आहे, याचे एक महत्त्वाचे कारण केनेडींनी क्लानचे सांकेतिक शब्द जाहीर करून त्यांना सर्वसामान्यांच्या विनोदाचा विषय बनवले, यात आहे- असे ‘फ्रीकॉनामिक्स’ या गाजलेल्या पुस्तकात लेव्हिट आणि डब्नर या लेखक द्वयांनी सांगितले आहे. 26

कुजबुजीचे हे तंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कसे वापरले जाते याचे एक नमुनेदार वर्णन स. ह. देशपांडे यांनी अजाणतेपणाने, पण फार उत्तम केले आहे. ते लिहितात, 27 ‘‘एकदा श्यामाप्रसादांचं टिळक मंदिरात भाषण होतं. श्यामाप्रसादांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरं झाली. त्या वेळी सभेत बसलेल्या शि. ल. करंदीकरांनी त्यांना प्रश्न विचारला- ‘आर वुई धिस टाइम गोइंग टु सेंड अवर रिप्रेझेंटेटिव्हज्‌ ॲब्रॉड फॉर प्रॉपॅगँडा?’ ‘‘श्यामाप्रसादजींनी उत्तर दिलं : ‘ऑफ कोर्स वुई शॅल.’

सभा संपवून बाहेर आल्यावर वसंतानं मला विचारलं, ‘ह्या प्रश्नोत्तरांचा तुला अर्थ कळला का?’

मला अर्थातच तो कळला होता आणि सुबोध मराठीत मी त्याचं भाषांतर त्याला सांगितलं.

वसंता हसला आणि म्हणाला, ‘असं नाही आहे ते. जर्मनी-जपानकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळवायचा प्रयत्न होणार आहे की नाही- असा त्याचा अर्थ.’

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला- हा आणखी एक  स्पर्श... आणखी एक हुलकावणी.’’

अलीकडे या कुजबुजीसाठी माहिती नभोमंडळाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. त्यातल्या वेबसाइट्‌स, ब्लॉग, टि्‌वट इ. इ. कोण चालवतो, हे नक्की कळत नाही. अनेकांना, ‘ही माहिती खास तुमच्यासाठी आहे,’ असे भासवता येते. ‘तुम्ही ती फक्त तुमच्या खास मित्रांना सांगा,’ असे आवाहन केले जाते. त्याला तरुणाई बळी पडते.

ब्रिटनच्या ‘चॅनल फोर’ या वाहिनीने इसिसचा माहिती नभोमंडळामधला प्रमुख प्रचारक प्रत्यक्षात बंगळुरूमध्ये वास्तव्य करतो, असे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी तेथील मेहदी विश्वासला अटक केली. हा 24 वर्षीय युवक एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होता. माहिती नभोमंडळातील त्याच्या कारवायांवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला 28 तो असा-

‘‘मेहदी चालवत असलेल्या या खात्याला 17 हजार 700 फॉलोअर्स आहेत. तो ‘इसिस’बाबतची माहिती टि्‌वट करून त्याबाबत येणाऱ्या प्रतिक्रियांचा अभ्यास करत होता. दिवसा काम करून रात्रीच्या वेळी इंटरनेटचा वापर करत ‘इसिस’ची माहिती गोळा करत होता. यासाठी त्याने 64 जीबीचे इंटरनेट कनेक्शन घेतले होते. याचा वापर करून तो ‘इसिस’बाबतच्या बातम्या मिळवून त्यांचा अभ्यास करत होता. त्याला भूमध्य समुद्राच्या भागातील देशांमधील घटनांमध्ये अधिक रस होता. कुटुंबाची जबाबदारी असल्याने ‘इसिस’मध्ये सामील झालो नसल्याचेही त्याने सांगितले.

‘शमी विटनेस’ या खात्याच्या टि्‌वटमध्ये जिहादी मजकूर आणि ठार झालेल्या दहशतवाद्यांची स्तुती करणारा मजकूर होता. या घटनेनंतर ‘शमी विटनेस’ हे खाते बंद करण्यात आले आहे.’’

कुजबुजीच्या तंत्राची ताकद तीन प्रकारची आहे. पहिले म्हणजे- अशी ‘कुजबुज’ चालू आहे, हे विरोधकांच्या आणि पोलिसांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. दुसरे म्हणजे- या माध्यमातून कितीही खोटा, कितीही आततायी प्रचार केला, तरी त्यावर बंदी येत नाही. तिसरे म्हणजे- ही कुजबुज व्हायरल म्हणजे एकाने दोघांना सांगणे, त्या दोघांनी चौघांना सांगणे... या प्रकारे चक्रवाढ गतीने पसरत जाणारी असते. ती बघता-बघता हजार, लाख, कोटी लोकांची मेंदू-धुलाई करू शकते. या सर्व कारणांमुळे आणि माहिती नभोमंडळाच्या वाढत्या प्रसारामुळे अतिरेकी संघटना आता कुजबुज तंत्राचा अधिकाधिक वापर करू लागल्या आहेत.

सैन्य आणि अतिरेकी संघटना यांमधला फरक :

या लेखात सांगितलेली बुद्धिधुलाईची अनेक तंत्रे सैन्यामध्येसुद्धा वापरली जातात. सैन्याने जे केले ते चालते; मग आम्ही केले तर वाईट काय? -असा बुद्धिभ्रम करणारा प्रश्न अतिरेकी संघटनांचे प्रवक्ते करतात. ते पुढे जाऊन असेही म्हणतात की- ‘‘सैन्य हे अन्यायकारक राजवटीचे (किंवा भांडवलशाहीचे किंवा काफिरांचे) हस्तक असते. आम्ही तर धर्मासाठी (किंवा संस्कृतिरक्षणासाठी, किंवा श्रमिकमुक्तीसाठी) लढतो. आमच्या लढ्याची उदात्त उद्दिष्टे लक्षात घेता, आम्ही करतो ती मेंदू-धुलाई योग्यच आहे. सैन्यामध्ये केली गेली तर मेंदू-धुलाई चालते; मग आम्ही केलेली मेंदू-धुलाई चाललीच पाहिजे, ती योग्यच आहे.’’

सैन्य आणि अतिरेकी संघटना, कुटील पंथ यांना एकच नियम लागू होत नाहीत; कारण त्यांच्यामध्ये खूप फरक आहेत. सैन्यामध्ये माणूस स्वत: निर्णय करून सहभागी होतो; फसवणूक होऊन किंवा जबरदस्तीने माणूस सैन्यात दाखल होत नाही. सैन्यात आपण काय उद्देशाने जात आहोत, याची सैन्यात सामील होणाऱ्याला चांगली कल्पना असते. सैन्यात शिस्तीची अनेक बंधने स्वीकारावी लागतात, सैन्यामध्ये शत्रुसैनिकांना कंठस्नान घालण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. वेळ आली तर युद्धभूमीवर शत्रूसैनिक मारावे लागतील, याची स्पष्ट कल्पना सैन्यात सामील होणाऱ्या माणसाला असते.

कुटील पंथ आणि अतिरेकी संघटना नवा तरुण जाळ्यात ओढताना त्याला पुढे काय वाढून ठेवले आहे, याची माहिती देत नाहीत. त्या मुख्यत: स्वर्गात तुम्हाला सुंदर बायका आणि बिर्याणी कशी मिळेल किंवा मातृभूमीचे थोर सेवक म्हणून तुमची कीर्ती दिगंत कशी होईल, हे सांगतात. सैनिकाचा सैन्याशी स्पष्ट, कायदेशीर करार असतो. ठरावीक मुदत संपली की, सैनिक सैन्यातून मानाने बाहेर पडतो. अतिरेकी संघटना, कुटील पंथ मात्र येणाऱ्या तरुणाशी कोठलाही करार करत नाहीत. आलेल्याने आयुष्यभर संघटनेत, पंथात राहावे- अशी अपेक्षा असते. तो बाहेर पडू लागला, तर तो वाळीत टाकला जातो.

सैन्य हे अखंड राष्ट्ररक्षणासाठी असते. अतिरेकी संघटना या फक्त स्वपंथ, स्वजन यांच्या रक्षणासाठी असतात; त्यासाठी त्या देशातीलच इतर लोकांशी लढा पुकारतात. अतिरेकी संघटना सर्वसामान्य, शस्त्र नसलेल्या नागरिकांवर हल्ले करतात. सैन्य निष्पाप नागरिकांवर दहशतवादी हल्ले करीत नाहीत. युद्धात निष्पाप नागरिकांचे प्राण जातात, हे खरेच- मग तो अणुबॉम्बचा वापर असो की ड्रोनचा वापर असो- पण निष्पाप नागरिकांना मारणे, हा सैन्याच्या हल्ल्याचा प्रमुख हेतू नसतो. क्वचितच वेळा आपल्याच देशाचे निष्पाप नागरिक सैन्याकडून मारले जातात, हे खरे आहे; पण काश्मीरमध्ये असे अपवादात्मकरीत्या घडले, तर त्याला जबाबदार असणाऱ्या सैनिकी अधिकाऱ्यांना शिक्षा दिली जाते. निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना शासन करणे तर राहू द्याच; पण अतिरेकी आणि कुटील गट अशा माथेफिरू खुन्यांना हीरो बनवतात- मग ते खून रेल्वे बॉम्बस्फोट करून केलेले असोत, की जंगलामध्ये पोलिसांची जीप सुरूंग लावून उडवून देऊन केलेले असोत, की अहमदाबादच्या वस्तीमध्ये जातीय दंग्यात सुरे खुपसून केलेले असोत.

सैन्य हे सरकारला आणि सरकार हे लोकांना जबाबदार असते. अतिरेकी हे संघटनेच्या नेत्याला जबाबदार असतात आणि अतिरेकी संघटनेचा नेता हा कोणालाच जबाबदार नसतो. आणखी एक महत्त्वाचा फरक हा हिंसेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. आपले कमीत कमी सैनिक मरावेत, असा सेनापतींचा उद्देश असतो. अतिरेकी संघटना मात्र हिंसा हेच उद्दिष्ट मानायला लागतात आणि आपल्या सभासदांच्या हौतात्म्याचे गुणगानच करतात असे नाही, तर तेच ध्येय असल्याचे आपल्या सभासदांच्या मनावर बिंबवतात. ‘जिहाद पुकारून शहीद होणे’, ‘धर्मरक्षणासाठी बलिदान करणे’ हेच आयुष्याचे ध्येय बनवले जाते. आपल्या सैनिकांचा मृत्यू हे उद्दिष्ट सैन्याचे नेतृत्व ठेवत नाही. आपल्या सैनिकांना ‘हुतात्मा’ बनवणे, हा सैन्याच्या नेतृत्वाचा उद्देश नसतो.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकी फौजांचे यशस्वी नेतृत्व करण्यात जनरल पॅटन फार प्रसिद्ध होते. त्यांच्या जीवनावर ‘पॅटन’ नावाचा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटात सैनिकांना उद्देशून भाषण करताना जनरल पॅटन सांगतात- ‘‘आपले कोणी अक्करमाशे (Bastard) सैनिक मातृभूमीसाठी शहीद झाले म्हणून आपल्याला युद्ध जिंकता येत नाही.शत्रूच्या अक्करमाश्या सैनिकांना त्यांच्या मातृभूमीसाठी शहीद करतच आपण युद्ध जिंकणार आहोत.’’

तेव्हा, अतिरेकी संघटना आणि कुटील पंथ यांनी केलेल्या मेंदू-धुलाईचे समर्थन लोकशाही देशातील सैन्याचे उदाहरण देऊन करणे साफ चुकीचे, गैरलागू आणि भ्रामक आहे. (सैन्याने सैनिकांची केलेली मेंदूची धुलाई नेहमीच योग्य असते, असे नाही; पण तो विषय वेगळा आहे.)

तर-तमभावाची गरज :

मेंदू-धुलाई सगळेच करतात. शाळेत छडीचा सर्रास वापर करणारे मास्तर करतात, कुटुंबात मुलांना शिस्त लावणारे वडील आणि आई करतात, नोकरीच्या ठिकाणी ‘साहेब’ करतात, पोलीस करतात, धर्मगुरू करतात, राजकीय नेते करतात- इत्यादी. त्यात विशेष ते काय? या सगळ्यांना आपण कुठे-कुठे, कधी-कधी विरोध करणार? आपणास काय तेवढाच उद्योग आहे? हे सहज पडणारे प्रश्न आहेत. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा मेंदू-धुलाई चाललेली दिसेल, तिथे-तिथे प्रत्येक वेळी तिचा विरोध करणे तुम्हाला आणि आम्हालाही शक्य नाही; पण जेव्हा अशा मेंदू- धुलाईपासून आपल्या आयुष्याचा नाश होण्याची शक्यता निर्माण होते, आपल्या आप्तेष्टांचे कुटील क्रूरकर्म्यांमध्ये पद्धतशीर परिवर्तन होताना दिसते, आपल्या समाजात-देशात हिंसक द्वेषभावना उफाळून येईल, अशी परिस्थिती निर्माण होते; तेव्हा मात्र आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.

मार्क्सने समाजजीवनातील बदलांबद्दल Quantity changes into Quality म्हणजे संख्यात्मक बदलाचे रूपांतर गुणात्मक बदलामध्ये होते, असा सिद्धान्त लक्षात आणून दिला. रूपकात्मक उदाहरण म्हणजे- नदीच्या पात्रात मूठभर खडे टाकले, तर ते पात्रातील गाळ होतात; पण जर लक्षावधी ट्रक भरून खडे टाकले, तर ते पाणी अडवून धरणारे धरण बनतात. मेंदू-धुलाईच्या तंत्रांचेही तसेच आहे. कोणी एखादे तंत्र कधी काळी वापरले, तर ती वाईट वागणूक म्हणता येईल. पण जेव्हा एक संघटना यांतील अनेक तंत्रे एकत्रितपणे अनेकांवर एकाच वेळी वापरते, तेव्हा तो समाजविघातक आणि मानवी वृत्तीला नष्ट करणारा गुन्हा ठरतो. त्याबद्दल सावधानता आणि विरोध हा आपल्या, आपल्या आप्तेष्टांच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या रक्षणासाठी आवश्यक बनतो.अशी दुष्ट मेंदू-धुलाई करणाऱ्या संघटनांतही प्रतवारी याच कारणाने करण्याची गरज आहे. ‘याच्या लाथा, त्याचे बुक्के; सब घोडे बारा टक्के’ असे म्हणून चालणार नाही. काही संघटना अधिक धोकादायी, काही कमी धोकादायी असतात. संघटना मेंदू-धुलाईची किती तंत्रे केवढ्या सातत्याने आणि सार्वत्रिकपणे वापरते, यानुसार त्या संघटनेच्या धोक्यापासूनची प्रतवारी केली पाहिजे. शेवटी अल्‌ कायदा ते हिंदू महासभा ते नक्षलवादी सगळे सारखेच, असे म्हणून आपण आपलीच फसवणूक करून घेता कामा नये.

1. शस्त्रशिक्षण : या संघटनेत हातात धरून वापरायच्या शस्त्राचे शिक्षण किती दिले जाते?एखाद्या संघटनेपासून मेंदू-धुलाईचा धोका किती जास्त आहे, हे मोजण्यासाठी पुढील दहा प्रश्न विचारावेत :

2. कवायत : सामूहिक कवायत ही संघटनेच्या रोजच्या कार्यक्रमात किती महत्त्वाची आहे?

3. न्यूनगंड निर्मिती : सभासदांमध्ये पद्धतशीरपणे न्यूनगंड निर्माण केला जातो का?

4. आपणभाव : आपण ‘उच्च’ या आधारावर आपला वेगळा गट जोपासला जातो का?

5. पुनरावृत्ती : कार्यकर्त्यांच्या शिक्षणामध्ये पुनरावृत्तीचा वापर किती प्रमाणात केला जातो?

6. विचारबंदी : संघटनेमध्ये प्रश्न विचारणे, मतभेद व्यक्त करणे यावर किती बंदी आहे?

7. हिंसावृत्ती संवर्धन : विशिष्ट समाजगट हा ‘शत्रू’ आहे, त्यांच्यावर ‘हल्ला’ केला पाहिजे अशी हिंसावृत्ती जोपासली जाते का?

8. ग्रंथप्रामाण्य : एका ग्रंथात लिहिले आहे ते आणि तेच अंतिम सत्य आहे, अशी शिकवण संघटनेत दिली जाते का?

9. आजन्म नेता : संघटनेचा नेता ‘आजन्म’ आहे का?

10. कुजबूज : संघटनेच्या अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये आणि कार्यकर्ते व जनता यांच्यामध्ये संवादाचे कुजबूज हे महत्त्वाचे माध्यम आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून मेंदू-धुलाई करणाऱ्या काही प्रमुख संघटनांची आम्ही केलेली प्रतवारी वरील कोष्टकात दिली आहे.

संदर्भ :

1. Rajnath Singh, "India youth Attracted to ISIS….’’, Press Trust of India, November 29, 2014. - www.ndtv.com

2. Reuters, December 08, 2014. Afghan stuents.

3. Reuters, उपरोक्त.

4. राजनाथसिंह, उपरोक्त.

5. Reuters, उपरोक्त.

6. ‘उंबरठ्यावरचे नवे आव्हान’, लोकसत्ता, सोमवार, दि. 1 डिसेंबर 2014, पृ. 7.

7. विजय तेंडुलकर, ‘तें दिवस’, राजहंस प्रकाशन, पुणे 2009, पृ. 68-69.

8. स. ह. देशपांडे, ‘संघातील दिवस आणि इतर लेख’, सुवर्ण प्रकाशन, पुणे 1983, पृ. 10,11.

9. unravellingtheweb.com - unraveling the web mind control

10. Bredman Kiley, "Church or Cult- The Control-Freaky Ways of Mavs Hill Church’’ www.thestranger.com

11. Ali Hassan, "The IS and brainwashing" Al-Ahram weekly, issue1221, 13th November 2014.

12. स. ह. देशपांडे, उपरोक्त, पृ. 32, 33.

13. Orgnisor, January 2, 1961, P. 5. As quoted in kafila.org - golwalkar guruji super human or less than human

14. Raymond Ibrahin, "Muslim blood superior to infidel blood", www.thecommentator.com - muslim blood superior to infidel blood

15. "Repeating Your Opinion makes people belive it, no matter how stupid it is’’ www.cracked.com

16. Luigi Muccotta, Randy Buckner, et al, "Evidence of Neural Effects of Reproduction that Directly correlate with Behaviural priming’’Journal of Congitic Neuroscience, November 2004, Vol 16, No. 9, PP 1625-1632

17. Andrew Gillgan, www.telegraph.co.uk - muslimparent radical school is brainwashing our children  

18. रमेश पतंगे, मी मनू आणि संघ, विवेक, दिवाळी 1994. www.hindunet.org

19. स. ह. देशपांडे, उपरोक्त, पृ. 35

20. Uday Mahurkar "M adopt brainwashing tactics to turn Muslim youth into Jihadis". 

21. Ali Hassan, उपरोक्त.

22. www.aleteia.org - does the koran command behedi

23. स. ह. देशपांडे, उपरोक्त, पृ. 23.

24. अधिक माहितीसाठी : Bovenkevk F, Chalcur B A "Terrosism and organized Crime", www.dotcstom.com

25.’Klan bustor’ Stetson Kennedy who exposed the Ku Klux Klan. www.dailymail.co.uk.

26. Stevon Levitt & Stephen Dubner, ‘Freakonowics’, Penguin Book, London.

27. स. ह. देशपांडे, उपरोक्त, पृ. 25.

28. ‘इसिससाठीची टिवटिव बंद’, सकाळ, पुणे, 14.12.2014, पृ. 1.

Tags: तरूणाई सैन्य ख्रिश्चन मुस्लिम हिंदू हिंसा तंत्र कू क्लक्स क्लान हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंडियन मुजाहिद्दीन इसिस संघटना अतिरेकी प्रशिक्षण मेंदू धुलाई आनंद करंदीकर मेंदू धुलाई: सावधान तिपाई विशेषांक Youth Army Khrist Muslim Hindu Violence Technique Ku Klux Klan Hinu Mahasabha Rashtriya Swayansewak Sangh Indian Mujahiddin ISIS Organization Terrorist Training Brainwashing Aanand Karandikar Mendu Dhulai: Savadhan Tipai Visheshank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके