डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेली स्कॉलर कन्या मला सहजपणे आणि कौतुकाने म्हणाली, ‘मोदींनी आख्या देशाला वेठीला धरले वा, काय हिंमत आहे!’ भारतीय जनता तिचे हाल झाले म्हणून आनंदोत्सव साजरा का करते आहे? ही काय भानगड आहे? या प्रश्नाने मला फार अस्वस्थ केले. मी संशोधन सुरू केले आणि जे लक्षात आले, ते धक्कादायक वाटले.

नोटाबंदीमुळे किती काळा पैसा नष्ट झाला, किती खोटा पैसा नष्ट झाला, अतिरेक्यांना मिळणारा पैसा किती बंद झाला- याबद्दल मोदीसमर्थक आणि मोदीविरोधक यांच्यात नक्कीच मतभेद आहेत. पण भारतातल्या जनतेला निदान पन्नास दिवस तरी हाल भोगावे लागले, याबद्दल कोणाचेच दुमत नाही- अगदी मोदींचे स्वतःचेसुद्धा दुमत नाही. या काळात गरिबांचे रोजगार बुडाले, किराणा घ्यायला पैसे नाहीत म्हणून उपासमार झाली, अंगणवाडीत मुलांना खायला मिळाले नाही, बियाणे घ्यायला पैसे नाहीत म्हणून पेरणी करता आली नाही, बँकांच्या रांगेत उभे असताना जीव गेले, इत्यादी-इत्यादी. पण भारतातल्या जनतेने हे हाल निमूटपणे सहन केले. हाल निमूटपणे सहन केले इतकेच नाही, तर आपण किती हाल सोसले याची रसभरीत वर्णने इतरांना सांगितली. मी अशी जी वर्णने ऐकली, त्यामध्ये मला दु:ख नाही तर आनंद जाणवला, अभिमान जाणवला. मोदींनी आपल्याला देशासाठी कष्ट भोगण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मोदींबद्दल कृतज्ञतेची भावना जाणवली. या हाल भोगण्यात आनंद मानणाऱ्यांना काळा पैसा काय असतो, तो कोठून येतो, कुठे जातो याबद्दल विशेष काहीच माहीत नव्हते. आपले हाल झाले, याबद्दल आनंद होता. वानगीदाखल : विठ्ठल सुरवसेचेच उदाहरण घ्या. तो माझ्या गाडीचा सारथी आहे. आम्ही खूप वेळ एकत्र असतो, त्यामुळे आमच्यात बरा संवाद आहे. एका रस्त्यावरच्या मारामारी आधीच इजा झालेल्या त्याच्या पायाला परत मार बसला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याच्या पायावर नोटाबंदीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील फार मोठ्या खासगी, धर्मादाय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. सात दिवसांनंतर हॉस्पिटल सोडायच्या वेळी अंदाजे १५,००० रुपये बिल येणार होते. विठ्ठलकडे, त्याच्या नातेवाइकांकडे एवढे पैसे १००च्या नोटांमध्ये रोख नव्हते. माझ्याकडे असलेली, वापरता येणारी रोकड ५,००० पेक्षा कमी होती आणि मला बाहेर गावी जायचे होते. मग मी माझे एक क्रेडिट कार्ड विश्वासाने विठ्ठलकडे ठेवले, एक चेकही देऊन ठेवला. प्रत्यक्ष पैसे भरण्याची वेळ आली, तेव्हा हॉस्पिटलने स्वाईप मशीन चालत नाही म्हणून क्रेडिटकार्ड घ्यायला नकार दिला. नोटाबंदीमुळे काम खूप वाढले म्हणून सात दिवस झाले होते तरी माझा स्थानिक चेक विठ्ठलच्या खात्यात जमा झाला नव्हता. विठ्ठल हॉस्पिटलमध्ये कैदी झाला. मी पुण्याला परत आल्यावर विठ्ठलची सुटका झाली! आणि मग मला नंतर जे पहायला मिळाले, ते पूर्णत: अनपेक्षित होते. मोदींवर आणि नोटाबंदीवर विठ्ठल चिडला असणार, अशी माझी अपेक्षा होती. बरे, तो मोदींचा पाठीराखा नव्हता, तर मनसेवाला. पण हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर तो त्याला झालेल्या त्रासाच्या हकिगती मला मोठ्या आनंदाने सांगत होता आणि शेवटी म्हणाला, मोदींनी लय भारी काम केलंय.’ हा काय प्रकार आहे, मला काही कळेना. मग मला पाच-सहा लोकांकडून असेच अनुभव आणि निष्कर्ष ऐकायला मिळाले. अगदी अलीकडे माझ्या समाजवादी मित्र-मैत्रिणीची २१ वर्षे वयाची बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेली स्कॉलर कन्या मला सहजपणे आणि कौतुकाने म्हणाली, ‘मोदींनी आख्या देशाला वेठीला धरले- वा, काय हिंमत आहे!’ भारतीय  जनता तिचे हाल झाले म्हणून आनंदोत्सव साजरा का करते आहे? ही काय भानगड आहे? या प्रश्नाने मला फार अस्वस्थ केले. मी संशोधन सुरू केले आणि जे लक्षात आले, ते धक्कादायक वाटले.

स्वपीडन आणि परपीडन : आज भारतातील जनता सामूहिक स्वपीडनाच्या विकृतीने जर्जर झाली आहे का? स्वपीडन (मासोकिझम, masochism)1 हा एक मानसिक आजार आहे, की मानसिक विकृती आहे? की स्वपीडन अल्प प्रमाणातील लोकांमध्ये, असलेला वेगळेपणा आहे? की स्वपीडन बहुसंख्य लोकांमध्ये छुपा’ असलेला स्वभाव आहे? याबद्दल तज्ज्ञांमध्ये अनेक मते आहेत. स्वत:ला वेदना करून घ्यायच्या आणि त्यात आनंद मानायचा, हे स्वपीडन करणारी व्यक्ती करते, असे वैद्यकीय मानसशास्त्रात सांगितले आहे. स्वपीडनातील वेदना या शारीरिक असतात तशाच मानसिकही असू शकतात. स्वपीडन करणारी व्यक्ती स्त्री असू शकते तशीच पुरुषही असू शकते, परपीडन (सॅडिझम sadism) हाही मानसिक आजार किंवा मानसिक विकृती आहे. परपीडन आजाराने जर्जर व्यक्ती दुसऱ्याला वेदना-क्लेश देऊन आनंद मिळवते. स्वपीडन जर्जर व्यक्ती आणि परपीडन विकृती असलेली व्यक्ती यांचे एकमेकांशी चांगले जुळते. ते एकमेकांच्या गरजा पुऱ्या करतात आणि सुख भोगतात. स्वपीडनाची गरज असणारी व्यक्ती सामान्यत: मानसिक उपचारांसाठी जात नाही. स्वपीडनाची गरज असणारी व्यक्ती आपली गरज पुरी करू शकेल, असा परपीडक सहकारी शोधते. स्वपीडक आणि परपीडक ज्या वेदना किंवा क्लेश अनुभवतात, ते मुख्यत: लैंगिक व्यवहाराशी संबंधित असतात.

पुरुषाने स्त्रीला देलेल्या शारीरिक वेदना हे या संबंधांचे अधिक आढळून येणारे रूप आहे. समाजात स्वपीडक आणि परपीडक व्यक्ती किती असतात याचा अंदाज करता येणे कठीण आहे, कारण अशा व्यक्ती आपल्यातील विकृती जाहीर करत नाहीत. ते मानसोपचारासाठी क्वचितच डॉक्टरकडे जातात. अर्थात बायकोला नवऱ्याने मारहाण करणे, क्लेश देणे हे फक्त पुरुषातील परपीडन विकृती आणि स्त्रीतील स्वपीडन विकृती यांच्यातूनच होते असे नाही. पुरुषवंशक, पुरुषसत्ताक, पुरुषप्रधान समाजातील मर्दानगीच्या संस्कृतीतून आणि योनिशुचितेच्या व्यवहारातूनही स्त्रीला शारीरिक-मानसिक यातना दिल्या जातात. त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या एकूण अत्याचारा’वरूनही समाजातील स्वपीडन आणि परपीडन विकृती किती लोकांना आहे याचा अंदाज करता येत नाही. अमेरिकेत याबाबत ज्या सामाजिक पाहण्या गेल्या तीस वर्षांत झाल्या आहेत, त्यात अमेरिकेच्या एकूण  लोकसंख्येतील स्वपीडक आणि परपीडक यांच्या प्रमाणांचे अंदाज १०% ते ८५% इतके कमालीचे वेगवेगळे सांगण्यात आले आहेत. पण या दोनही विकृतींबद्दल वैद्यकीय मानसशास्त्रात ज्या मोठ्या प्रमाणावर लिखाण झाले आहे, त्यावरून या विकृती समाजात नगण्य प्रमाणात आहेत असे वाटत नाही. स्वपीडन आणि परपीडन यांना इंग्रजीत अलीकडे एकत्रितपणे BDSM (Bondage, Dominance, Sadism, Masochism यातील आद्याक्षरे) म्हणतात. मी माहिती आंतरजालात गुगलद्वारे BDSM चा शोध घेतला. या विषयावरची माहिती देणारी ३२ कोटी ६० लाख संकेतस्थळे उपलब्ध असल्याचे गुगलने मला एक सेकंदाहून कमी वेळेत सांगितले. ही संख्या किती कमी- जास्त आहे याचा अंदाज येण्यासाठी मी काही इतर शब्दांचा शोध घेतला. या शब्दांबद्दल माहिती असणाऱ्या संकेतस्थळांची संख्या अशी आहे : feminism : ५ कोटी ७६ लाख, democracy: २३ कोटी ३० लाख, BDSM : ३२ कोटी ६० लाख, marriage: ५६ कोटी ६० लाख.

सामाजिक आजार : ज्या विकृती एकेका माणसामध्ये संभवू शकतात, त्यांपैकी काही विकृती समाजात सामूहिक पातळीवरही संभवू शकतात. माणसामधल्या हिंसक प्रवृत्तीबद्दल हे फार खरे आहे. रस्त्यावर एखाद्या खिसेकापूची धुलाई सुरू असली; तर ‘जाता-जाता हात साफ’ करून घेणारे मध्यमवयीन, मध्यमवर्गीय ‘सभ्य’ पुरुष आपल्याला नेहमीच दिसतात. धार्मिक दंगा उसळला की, त्यात नेहमी शांत असणारे पुरुषच नाहीत तर स्त्रियाही सामील होतात. ‘त्यांच्या’ बायकांवर बलात्कार करायला या स्त्रिया ‘आपल्या’ पुरुषांना प्रोत्साहन देतात! स्वपीडन तसेच परपीडन हे हिंसेचेच एक रूप आहे. विशिष्ट परिस्थित संपूर्ण समाज, समाजाचा फार मोठा गट पीडनाच्या विकृतीने जर्जर होऊ शकतो.

जनतेमध्ये ही जी स्वपीडनाची वृत्ती निर्माण होऊ शकते, तिला मानसशास्त्रात Mass Masochism म्हणजे ‘सामुदायिक स्वपीडन’ असा शब्द वापरण्यात येतो. मानसशास्त्राच्या शब्दकोशात Mass Masochism म्हणजे ‘सामुदायिक स्वपीडन’ याचा पुढील अर्थ देण्यात आला आहे : सामूहिक त्याग, आहुती व इतर क्लेश होऊ देणे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करणे. विशेषत: अशी कृती एका भुरळ पाडणाऱ्या हुकूमशहाच्या संदर्भात करून त्याला आपले अधिकार आणि आवाज सुपूर्त करणे... इतिहासात सामुदायिक स्वपीडन साजरे करणारे काही समाज, काही संस्कृती होऊन गेल्या आहेत.

ऐतिहासिक उदाहरणे : माणसांमध्ये सत्तेला शरण जाण्याची प्रवृत्ती असते, हा वाईट व दु:खद धोका रशियातील क्रांतीचे नेते आणि थोर मार्क्सवादी विचारवंत लेनिन यांना जाणवला होता. १९०५च्या रशियातील सैनिकांच्या बंडाबद्दल ते लिहितात- शेतकऱ्यांबद्दल सैनिकांना अपार सहानुभूती होती. जमिनीचा उल्लेख केला तरी सैनिकांचे डोळे भरून यायचे. सैनिकांनी स्थानिक लष्करी सत्ता अनेक वेळा ताब्यात घेतली, पण त्या सत्तेचा ठरवून वापर त्यांनी कधीच केला नाही. अत्याचारी अधिकाऱ्याची हत्या केल्यावर ते भांबावून जायचे. इतर अत्याचारी अधिकाऱ्यांना सोडून द्यायचे. सत्ताधाऱ्यांना बिनशर्त शरण जायचे, स्वत: गोळ्या खायचे. अत्याचारी सत्ताधाऱ्यांचे जोखड गुमानपणे मानेवर घ्यायचे.2

लेनिनना सैनिकांमधील या स्वपीडन व्यवहाराबद्दल दु:ख होते. त्यातून त्यांना बाहेर काढायचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यानंतर काहीच वर्षांत शेजारच्या जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरने जनतेतील या स्वपीडन प्रवृत्तीचा कमालीचा फायदा उठवण्याचे ठरवले. हिटलर त्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहितो- जे शक्तिशाली आणि अविचल आहेत, तेच नेते सर्वसामान्य जनतेच्या मनावर कब्जा करू शकतात. जनता स्त्रीसारखी आहे. स्त्रीचे अंतर्मन हे कार्यकारण विचारांनी ठरत नाही; तिचे अंतर्मन हे धूसर भावनिक गरजांनी ठरते. तिला कोणाचा तरी आधार हवा असतो. कोणा कमजोरावर सत्ता गाजवण्यापेक्षा शक्तिशाली पुरुषाला शरण जाणेच स्त्री पसंत करते. जनतेचेही तसेच आहे. जनतेला ठोस निर्णय घेऊन तो राबवणारा शक्तिशाली नेता हवा असतो. त्यातच त्यांना आधार वाटतो. जनतेला  निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नको असते. त्याबद्दल त्यांना लाज वाटत नाही. त्यांना वैचारिक कोंडी झाल्याचे दु:ख होत नाही. एक माणूस म्हणून असलेल्या त्यांच्या हक्कांची पायमल्ली त्यांना हवीशी वाटते. क्रूर सत्ताधाऱ्यांनी त्यांची केलेली ससेहोलपटच त्यांना हवीशी वाटते.3

जिच्यावर राज्य करायचे, ती जनता स्त्री आहे. राज्यकर्ते पुरुष आहेत. जनतेला- म्हणजे स्त्रीला पुरुष राज्यकर्त्यांकडून दमन हवेच असते, असा विचार भारतात रुजवण्याचा प्रयत्न इंग्रज राज्यकर्त्यांनीही केला. पुष्पा भावे लिहितात- वसाहतवादाच्या काळात राज्यकर्ते आणि प्रजा दोन्ही बाजूंना पौरुषप्रतिमांचा तुलनात्मक वापरही झाला. यात जीत आणि जेते यांच्यामधील नात्याला ‘पौरुष-स्त्रैण’ हे स्वरूप देण्यात आले. विजय हा नेहमी पुरुषी यामुळे पाश्चात्त्य जगातून आलेले जेते पुरुष, तर आशियाई जीत हे स्त्रैण- अशी विधाने झाली. भारतात इंग्रजांनी स्वत:ला पुरुष मानून बंगाली पुरुष ‘बायकी’ आहेत, असे विधानही केले.4

विचारवंतांचे विचार : जर्मनीतील नाझींच्या उदयानंतर युरोपमधील अनेक विचारवंतांनी जनतेवर फॅसिझम कसा लादला गेला, जनतेने फॅसिझम का स्वीकारला- याबद्दल अभ्यास करून विचार मांडले आहेत. त्यामधे विल्हेल्म रिच, सर्जे चाखोटिन, एरिक फॉर्म या तीन प्रमुख विचारवंतांनी जनतेतील स्वपीडन प्रवृत्ती आणि नेत्याची परपीडन वृत्ती यांच्या परस्परपूरक व्यवहारातून फॅसिझम राष्ट्रावर कब्जा करतो, हे आग्रहाने व स्पष्टपणे मांडले आहे.

विल्हेल्म रिच हे त्यांच्या ‘मास सायकॉलॉजी ऑफ फॅसिझम’ या पुस्तकात सांगतात- लैंगिक दडपणूक आणि लैंगिक भीती यांच्यामधून हुकूमशाही रचनांची पायाभरणी होते. आर्थिक पिळवणूक झालेल्या माणसाची मानसिकता लैंगिक दडपणुकीतून अशा तऱ्हेने बदलली जाते की त्याच्या भावना, विचार व कृती स्वत:च्या भौतिक हितसंबंधांच्या विरोधात काम करू लागतात.5

सर्जे चेखोटिन या शास्त्रज्ञांनी नाझींविरुद्ध प्रचाराची मोठी आघाडी उघडली होती. चेखोटिन लिहितात- व्यक्ती व्यक्तींनी वेगवेगळे जगण्याच्या या युगात व्यक्ती या हुकूमशहांच्या हातातील साधने बनतात. ही माणसे घाबरलेली असतात. मानसशास्त्राची उपजत जाण असलेले, कोठलेही नीती-नियम न पाळणारे हुकूमशहा त्यांच्या बाहुल्या बनवतात. यालाच मी एक प्रकारचा मानसिक बलात्कार म्हणतो.6

एरिक फ्रॉम लिहितात- माणसांना स्वातंत्र्याची जशी स्वाभाविक गरज असते, तशीच दुसऱ्याच्या अधीन होण्याचीही स्वाभाविक गरज असते का? असे जर नसेल, तर आज घडीला फॅसिझमचे जे आकर्षण लोकांना वाटते ते का, याचा उलगडा कसा होणार? फॅसिझम लोक का स्वीकारतात हे समजायचे असेल, तर आपल्याला मानसशास्त्राचा आधार घ्यावाच लागेल. कारण माणसातल्या ज्या राक्षसी प्रवृत्ती इतिहासजमा झाल्यात असे आपल्याला वाटत होते, त्या परत आल्या आहेत.7

या अभ्यासातून मला नोटाबंदीमुळे झालेले हाल-छळ यातून जनतेला आनंदोत्सव साजरा का करावासा वाटला, हे काहीसे कळले. पण मला आता नवाच प्रश्न जास्त भेडसावतो आहे. जनतेला आपण परपीडक हुकूमशहाच्या हातातील बाहुल्या, स्वपीडनात आनंद मानणाऱ्या बाहुल्या झाल्या आहोत- हे केव्हा आणि कसे कळेल?

संदर्भ-

1. Pam MS, psychologydictionary.org/massmasochism

2. Vladimir Lenin, Uber Religion, p. 653

3.ॲडॉल्फ हिटलर, Mein Kampf: My Struggle : (Vol. I & Vol. II) -(Complete & Illustrated Edition) Ceapest Books, Newyork, 2016, pp38

4. पुष्पा भावे, मिळून साऱ्या जणी, मार्च २०१६, पृ.२१

5. Wilhelm Reich,The Mass Psychology Fasism,Orgone Institute Press, pp27

6. Tchakhotine S. Le viol des foules par la propagande politique (1952), 140,1 345-47

7. Erich Fromm,The Fear of Freedom, 1942, pp 5-7.

Tags: नरेंद्र मोदी काळा पैसा नोटाबंदी आनंद करंदीकर नोटाबंदी आणि जनतेचा आनंदोत्सव abnormality deformity distortion examples Notabandi aani jantecha Aanad Utsav hellcast tendency giantess tendency Devilish tendency Erich Fromm Scientis Sergei Chakhotin The mass psychology of Fascism Minder Ideologist Thinker Villem Rich Adolf Hitler fascism Society Peoples Community Modi Oppositer Modi Supporter Notabandi Scientist Urope Western world Ingraj British bangali Powerful Leader Jermany Soldier Farmer Lenin Historical Emotional Need Mass Masochism marriage democracy feminism BDSM weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके