डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दोन-तीन महिने गेले असावेत आणि बापटकाका परत घरी आले. ते म्हणाले, ‘‘वर्गणीदार म्हणून तुमच्याकडे या वेळेचा साधनाचा अंक यायला उशीर होईल. या वेळी तो कुमार विशेषांक आहे.’’ मला अंक देऊन म्हणाले, ‘‘बघ त्यात तुझी कविता छापून आली आहे. तुला पहिले बक्षीसही आहे.’’ मला खूपच आनंद झाला.

एक आठवण माझी स्वतःची मी तेव्हा इयत्ता चौथीत होतो, सन 1959 असावे.मी सारख्याच कविता ऐकायचो, कारण भाऊंनी (विंदा करंदीकर) दुपारी कॉलेजमधून घरी आल्यावर कविता लिहिली की मी आणि माझी बहीण जया त्यांना समोर सापडायचो, आई शाळेत शिकवायला गेलेली असायची. जी कविता लिहिली असेल ती ते आम्हां दोघांना ऐकवायचे. त्या काळात त्या बालकविता नव्हत्या. मोठ्यांसाठीच्या कविता होत्या. बहुतेक मला कळायच्या नाहीत. वैतागून मी म्हटले, ‘‘मीपण कविता करतो.’’ आणि मी एक कविता केली.

पूर्ण लक्षात नाही. कवितेचे नाव होते ‘माझी कोष्टके’. सुरुवात होती : ‘किती माती म्हणजे झाडे? किती झाडे म्हणजे पान?’ शेवट होता, ‘ किती दैत्य म्हणजे माणूस?’ या शेवटच्या ओळीत माझा फक्त चक्रम प्रश्न विचारण्याचा प्रयत्न होता. त्यातून मानवाच्या स्वाभाविक प्रवृत्तीवर भाष्य आहे ही समज मला तेव्हा नव्हती, आताही बहुतेक नाही. भाऊंना मी ती कविता दाखवली. भाऊंनी वाचून काही न बोलता मला परत दिली.

थोड्या वेळाने वसंत बापटकाका काही कारणाने घरी आले. मी हौसेने त्यांना ती कविता वाचायला दिली. त्यांनी विचारलं ‘‘तुला पाठ आहे का?’’ मी म्हटलं ‘हो’. त्यांनी कवितेचा कागद घडी करून स्वतःच्या खिशात ठेवला. म्हणाले, ‘‘तुझ्यासाठी परत लिहून काढ.’’ मी प्रत काढली की नाही हे लक्षात नाही.

दोन-तीन महिने गेले असावेत आणि बापटकाका परत घरी आले. ते म्हणाले, ‘‘वर्गणीदार म्हणून तुमच्याकडे या वेळेचा साधनाचा अंक यायला उशीर होईल. या वेळी तो कुमार विशेषांक आहे.’’ मला अंक देऊन म्हणाले, ‘‘बघ त्यात तुझी कविता छापून आली आहे. तुला पहिले बक्षीसही आहे.’’ मला खूपच आनंद झाला.

थोड्या दिवसांनी बापटकाकांनी फोन करून आईला सांगितले की, बालमोहन विद्यामंदिरमध्ये बक्षीस समारंभ आहे. नंदूला घेऊन या. आई, मी, जया आणि भाऊ बक्षीस समारंभाला गेलो. सेनापती बापट यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. मी पारितोषिक स्वीकारायला मंचावर गेलो. बापटकाका समारंभाचे आयोजक होते. मला काकांनी हसत हसत विचारले, ‘‘एवढ्या लहान वयात तुला बक्षीस मिळाले, आता अशाच कविता करणार ना?’’ मी काही विचार न करता सांगितले, ‘‘मजेत लिहिली, कविता करणे फारच सोपे आहे, इतके सोपे काम मी परत करणार नाही!’’ सभागृहात हशा पिकला. बापट त्या हशात दिलखुलासपणे सामील झाले.

माझ्या उत्तरात विंदा आणि बापट या दोन समारंभात हजर असलेल्या कवींबद्दल मी जाहीरपणे उद्धट बोललो, असे करू नये, असे आईने मला नंतर सांगितले. पण मला बापटांचा चेहरा आठवतो आणि बापटांनी त्यातील विनोदच फक्त घेतला याची अजूनही खात्री वाटते.

माझी बहीण जया (जयश्री काळे) हिच्या दोन आठवणी.

जयाने सांगितलेली आठवण पहिली : विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर खूप गाजले. या तिघांनी मिळून मराठीतील सर्व कवींच्या कवितांवर जो ‘काव्यदर्शन’ कार्यक्रम केला, त्याचेही खूप प्रयोग झाले. हे सर्व प्रयोग करण्यात बापट यांचा उत्साह हा मुख्य रेटा असायचा. कार्यक्रमाची जागा ठरवणे, आयोजकांशी बोलणी करणे, स्वतःची गाडी काढून, इतर दोघांना बसवून, प्रवास करणे, ही सगळी कामे बापट उत्साहाने आणि नीटपणे करत. त्यांचे नियोजन आणि आयोजन यांच्यामुळेच हे कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकले.

एकदा या तिघांना दुबईहून कार्यक्रम करण्याचे आमंत्रण आले. विंदांनी ‘व्हिसा वगैरेंची नको ती झगझग’ अशासारखी कारणे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. बापटांनी काही वाद न घालता सर्व कारणे दूर केली आणि त्यांचा मध्य-पूर्वेतील दौरा काहीही विपरीत न घडता छान पार पडला.

कार्यक्रम झाला की मानधन आणि प्रवासखर्चाचे पैसे आयोजकांकडून बापट ताब्यात घेत आणि मग ते तीन पाकिटांत घालत- करंदीकरांना एक आणि पाडगांवकरांना एक पाकीट देत. पाकीट देताना ते सांगायचे, ‘‘मोजून घ्या.’’ विंदांचे उत्तर ठरलेले होते, ‘‘मी मोजणार नाही, मला माहिती- आहे काही चूक झालीच तर मला एखादी नोट जास्तीची येईल, कमी येणार नाही.’’ विनोदात पुस्ती जोडायचे, ‘‘मी मोजले आणि जास्तीची नोट दिसली तर ती परत द्यावी लागेल. मी मोजणार नाही.’’

जयाने सांगितलेली आठवण दुसरी : ही आठवण त्या मानाने अलीकडच्या काळातील आहे. जया पुण्यात भांडारकर रोडच्या कोपऱ्यावर राहते आणि अनेक वेळा सकाळी बीएमसीसी कॉलेजच्या मैदानात चालायला जाते. बापट पुण्यात आले की डेक्कनवर स्वत:च्या घरी उतरत. एका सकाळी जयाला बापट बीएमसीसी कॉलेजच्या मैदानात एका मोठ्या कुत्र्याला घेऊन चालायला आलेले दिसले. कुत्रा धिप्पाड होता. कुत्र्याच्या गळ्यात अडकवलेल्या पट्‌ट्याला जोडलेला पट्टा बापटांच्या मनगटाभोवती घट्ट होता. अचानक आजूबाजूची मोकाट कुत्री बापटांच्या कुत्र्यावर भुंकायला लागली. बापटांच्या कुत्र्याला ते सहन झाले नाही. त्याने सर्व ताकदीनिशी त्या मोकाट कुत्र्यांवर हल्ला करण्यासाठी उडी मारली. बापटांना अनपेक्षित होते. कुत्र्याबरोबर बापट ओढले गेले, रस्त्यावर पडले, त्यांना बरेच खरचटले. पण बापट उठून, कुत्र्याला चालवत, परत घरी गेले.

नेमके त्याच वेळी भाऊ जयाकडे पुण्याला आले होते. जया घरी आली आणि भाऊंना घेऊन बापटांच्या समाचाराला गेली. बापटांनी हसत दोघांचे स्वागत केले आणि विचारले, ‘‘काय रे तुझी तब्येत कशी आहे?’’ भाऊ म्हणाले, ‘‘अरे, मी तुझ्या समाचाराला आलो, तू मलाच काय विचारतोस तू कसा आहेस?’’ बापट म्हणाले, ‘‘अरे त्यात काय, कुत्राच तो, असे व्हायचेच, माझे हाड मोडले नाही, बघ मी मजेत आहे.’’ आपल्यावर आलेल्या संकटाचा बाऊ करायचा नाही असा बापटांचा स्वभावच होता.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके