डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. श्रीराम लागू : माझा दादा (पूर्वार्ध)

सिनेमा व नाट्यक्षेत्रात जवळपास 50 वर्षे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन 17 डिसेंबर 2019 रोजी झाले. त्यांचा पाहिला स्मृतिदिन या आठवड्यात आहे. त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव आनंद लागू यांनी लिहिलेला दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. नाटक व सिनेमा या क्षेत्रांतील डॉ.श्रीराम लागू यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय भूमिकांविषयीही विविध माध्यमांतून बरेच काही प्रसिद्ध झालेले आहे. पण त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी व कौटुंबिक जीवनाविषयी खूपच कमी प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांच्या बालपणातील आठवणीमधून दिसणारे डॉ. लागू क्वचितच कोणाला माहिती असतील. डॉ.श्रीराम लागू यांचे ‘लमाण’ हे आत्मकथनात्मक पुस्तक वीस वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकातूनच लेखमाला स्वरूपात क्रमश: प्रसिद्ध झाले होते.
...संपादक

माझा जन्म पुण्यातला. 1953 मधला. दादा तेव्हा 26 वर्षांचा होता. लहानपणापासून आम्ही त्याला ‘अरे दादा’ असंच म्हणायचो. अगदी लहान असताना आम्हाला त्यात काही वेगळं वाटायचं नाही. पण आमचं एकत्र कुटुंब होतं. आजोबा-आजी, आई-दादा, धाकटी बहीण बिंबा, काका (विजय), धाकटी आत्या (उषा)  असे सगळे मिळून आम्ही आठ-दहा लोक होतो. आजोबांना सगळेच ‘अहो’ म्हणायचे. मी साधारण चार-पाच वर्षांचा असताना शाळेत जायला लागलो. त्यानंतर आजोबांनी म्हणजे अण्णांनी आम्हाला सांगितलं की, आता तुम्ही वडलांना ‘अहो’ म्हणायला पाहिजे. मी म्हटलं- पण आम्हाला त्यानेच सांगितलंय की, मला ‘अरे’ म्हणायचं. मी दादाकडे गेलो आणि त्याला सांगितलं की, अण्णा असं असं म्हणत होते. आता मी काय करू? त्याने मला विचारलं, तू आईला काय म्हणतोस? मी म्हटलं, ए आई... मग वडलांना का ‘अहो’ म्हणायला पाहिजे? असं काय त्यांच्यामध्ये विशेष आहे? तू मला ‘अरे’च म्हणत जा. हे त्याचं सगळ्या बाबतीत शेवटपर्यंत होतं. त्यामुळे मी, माझ्याहून दोन वर्षांनी लहान असलेली बिंबा, तन्वीर आम्ही सगळे तर त्याला ‘अरे दादा’ म्हणायचोच; पण माझी भाची अंजलीसुद्धा त्याला ‘अरे दादा’च म्हणायची. आजोबांना ‘अरे’ म्हणणारी मुलं अजूनही दुर्मिळच असतात. अर्थात माझ्या धाकट्या काकांचं लग्न होऊन काकू (निर्मला) घरी आली, तेव्हा मग ती दादाला ‘अहो दादा’ म्हणत असे. त्या वेळी त्याचा तुम्ही मला ‘अरे’च म्हटलं पाहिजे, असाही आग्रह नसायचा. कुटुंबातल्या प्रचलित पद्धती मान्य करायला त्याची काही हरकत नसायची. जबरदस्ती कशाचीच नव्हती, पण समानतेची त्याची जाणीव फार खोल होती. 

माझा जन्म झाला तेव्हा त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं होतं आणि नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञ म्हणून त्याने पहिली प्रॅक्टिस सुरू केली होती. आमच्या आजोबांचा दवाखाना होता. तिथेच तोही प्रॅक्टिस करत असे. त्या वेळी पुण्याला ‘ताराचंद रामचंद’ नावाचं एक हॉस्पिटल होतं. ते पुण्यातल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाशी संलग्न होतं. तिथे तो ऑनररी सर्जन म्हणून जात असे. माझी आईसुद्धा डॉक्टर होती. बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये ती दादाची सहाध्यायीच होती, दोन वर्षांनी त्याच्या मागे.  बी.जे.मेडिकल कॉलेज सुरू झालं तिथे त्यापूर्वी  L.C.P.S.हा डिप्लोमा देणारं मेडिकल स्कूल होतं. दादाने बी.जे.मध्ये प्रवेश घेतला, तेव्हा ते कॉलेजचंही पहिलंच वर्ष होतं. त्यांच्या बॅचमध्ये फक्त चाळीसेक विद्यार्थी होते. त्यामुळे ते सगळे जण एकमेकांचे अगदी घट्ट मित्र. त्यानंतरच्या काही बॅचेसमध्येही सगळे एकमेकांना ओळखत होते. तिथे दादाची व आईची मैत्री झाली आणि त्यांनी लग्न केलं. लागू हे कोकणस्थ ब्राह्मण आणि माझी आई रेगे, म्हणजे सारस्वत. आजी-आजोबा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चळवळीत भाग घेतलेले, त्यामुळे त्यांचाही समानतेवर विश्वास होता. पण आजी-आजोबा दोघेही देवाला मानणारे. आजोबा शेवटपर्यंत रोज संध्या करत असत, यथासांग पूजा वगैरे करत असत. राम हे त्यांचं आराध्य दैवत. त्यामुळेच दादाचं नाव त्यांनी ‘श्रीराम’ ठेवलं होतं. आजीचा दादावर फारच जीव. त्या काळातल्या प्रचलित संकेतांनुसार आजी-आजोबांचं त्यांच्या लहान वयात लग्न झालं होतं. लग्न झालं तेव्हा आजी 12 वर्षांची होती. त्या काळात पहिली दोन-तीन अपत्यं काही तरी आजाराने दगावायचीच. तसं घडून मग 1927 मध्ये दादाचा जन्म झाला. त्यामुळे तिचं दादावर अतोनात प्रेम होतं.

दादाविषयीची माझी पहिली आठवण माझ्या तिसऱ्या वाढदिवसाची आहे. दादाने माझ्या वाढदिवसाला मला तीनचाकी सायकल घेतली, त्याची. तेव्हा ‘पोरवाल सायकल कंपनी’ हे अशा सायकली विकणारं पुण्यातलं एकमेव दुकान होतं. लक्ष्मी रोडवर सिटी पोस्ट चौकाच्या अलीकडे ते अजूनही आहे. दादा आणि त्याचा धाकटा चुलतभाऊ- नाना या दोघांनी आपापल्या दोनचाकी सायकली काढल्या. दादाच्या पुढ्यात, त्याच्या सायकलच्या दांडीवर मी बसलो. असे आम्ही तिघे त्या दुकानात गेलो. तिथे माझ्यासाठी ती तीनचाकी सायकल विकत घेतली. दोघे पुन्हा आपापल्या सायकलींवर बसले, मला बसवलं. ती नवी सायकल दोघांनी मध्ये धरली आणि तसेच आम्ही  मैल-दीड मैल अंतर कापून आमच्या घरी आलो. आमचं घर तेव्हा विजय टॉकीजपाशी होतं. हा प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यांपुढे आहे. ती दादाची हौस होती. घरी त्या वेळी आजोबांची गाडी होती. पण अशा कामासाठी ती कशाला वापरायची, म्हणून त्याने ती नेली नाही.

दादाला फोटोग्राफीचा छंद होता. त्या काळी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती. फोटो काढण्याबरोबरच त्याचं प्रिंटिंग करायचं, एन्‌लार्जिंग करायचं आणि मग त्याचा अल्बम तयार करायचा, याचीही त्याला आवड होती. त्या वेळी आतासारखी ‘बेबी बुक्स’ मराठीत उपलब्ध नव्हती. त्यामुळे दादाने एक साधासाच अल्बम आणून त्याची पानं सुटी केली आणि प्रत्येक काळ्या पानाच्या मधे हिरव्या कागदाचा एक फिटेज घातला. आणि त्याच्यावर अतिशय सुंदर अक्षरात (दादाचं हस्ताक्षरही अतिशय सुंदर होतं.) बाळाची जन्मतारीख, पहिल्या महिन्यात काय झालं, दुसऱ्या महिन्यात काय झालं, हा बोलायला केव्हा लागला, चालायला केव्हा लागला वगैरे माईलस्टोन्स लिहिले. त्यात त्याने स्वतः काढलेले आणि डेव्हलप केलेले फोटो होते. अजूनही तो अल्बम माझ्याकडे आहे. मुलांच्या बाबतीत त्याचा उत्साह मोठा होता. जे काही करायचं ते उत्साहाने करायचं, आपल्याला आवडणारी गोष्ट करायची आणि एकदा करायला घेतल्यानंतर ती मनापासून आणि अतिशय सुंदर करायची, असं त्याचं होतं. नाटक मला जास्त आवडतं म्हणून वैद्यकीय व्यवसाय सोडून नाटक करण्याचा इतका महत्त्वाचा निर्णय त्याने त्यामुळेच घेतला. एकदा करायला घेतल्यानंतर ती गोष्ट तो पूर्ण आनंदाने करायचा आणि तिची गुणवत्ता जितकी वाढवता येईल तितकी वाढवायचा. 

फोटोग्राफी करायची म्हणून त्याने त्या वेळी महाग असलेला ‘ रोलिकॉर्ड’ नावाचा जर्मन कॅमेरा घेतला होता. आता तो कॅमेरा आपल्याला कुठे पाहायलाही मिळत नाही. त्या कॅमेरातून फोटो काढण्यासाठी त्याच्यात वरून पाहावं लागायचं. वर आणि खाली अशा त्यात दोन लेन्स असायच्या. वरून पाहिल्यावर त्यात इमेज दिसायची आणि खालच्या लेन्समधून फोटो निघायचे. त्यात जी फिल्म असायची, त्यावर फक्त 12 फोटो यायचे. त्या फिल्म्स्‌ बऱ्यापैकी महाग होत्या. त्या कॅमेऱ्याला लाईट मीटर नव्हता. त्यामुळे आजूबाजूचा प्रकाश कसा आहे, त्यानुसार त्याचं एक्सप्लोझर वगैरे स्वतः ठरवावं लागायचं. नारायण करंदीकर नावाचे आमचे एक नातलग होते. त्यांना आम्ही नानामामा  म्हणायचो. ‘प्रभात’मधून निघालेल्या ज्या काही चित्रपट कंपन्या होत्या, त्यांच्यामध्ये त्यांनी काही वर्षं  ‘स्टिल फोटोग्राफर’ म्हणून काम केलं होतं. दादा त्यांच्याकडून कॅमेरा वापरायला शिकला. इंटरनेट तर तेव्हा नव्हतंच, पण ‘फोटोग्राफी शिका’ अशा प्रकारची फारशी पुस्तकंही नव्हती. त्यामुळे कुणी स्वतः शिकवलं, तरच ते येणं शक्य होतं. आणि एनलार्जिंग करणं, वगैरे फोटोग्राफीच्या पुढच्या गोष्टी तर गुप्त विद्या असल्याप्रमाणे कुणी कुणाला सांगत नसत. तयार मिळणारे एनलार्जर फार महाग होते. मग काय- स्वत:च एनलार्जर बनवा! पूर्वी ‘बेलोज’ कॅमेरे असायचे. नाना करंदीकरांनी दादाला सांगितलं की, त्याचा एनलार्जर बनवता येतो. दादाने जुन्या बाजारात जाऊन तो बेलोज कॅमेरा आणला. त्याच्या मागच्या बाजूला एक प्लेट असते. त्यामध्ये निगेटिव्ह ठेवायची व त्याच्यावर एकसारखा प्रकाश देणारा दिवा. आणि हे सगळं एकत्र करून डार्करूममध्ये बसवायचं. असा तो सगळा प्रकार आठवतो. 

आमचं घर दुमजली होतं. सगळ्यात वरच्या मजल्यावर गच्ची होती आणि गच्चीला लागूनच एक बाथरूम होती. त्या बाथरूमचा विशेष वापर नव्हता. त्यामुळे दादाने तिची डार्करूम केली होती. तिथे इनॅमलचे दोन-चार ट्रे, त्यात डेव्हलपर, वॉश, फिक्सर असं सगळं असायचं. रात्री अंधार झाल्याशिवाय ती डार्करूम ‘डार्क’ करणं अवघड होतं. त्यामुळे हे सगळं रात्रीच चालायचं. तेव्हाचं पुणं असं होतं की, आमचं घर लक्ष्मी रोडवर असूनही नऊ वाजून गेले की, रस्त्यावर अजिबात रहदारी नसायची, अंधार असायचा. बाथरूमच्या खिडकीवर काळा पडदा लावायचा. मग एका लाल दिव्याच्या प्रकाशात सगळं काम चालायचं. त्या वेळी आम्ही जर त्याला म्हटलं की, आम्हाला हे कसं करतात ते बघायचं आहे; तर त्याने आम्हाला कधीही नाही म्हटलं नाही. मुलांनी सगळं बघावं, असं त्याला वाटायचं. निगेटिव्हवरच्या छायाचित्राला ‘एक्स्पोज’ केलेला तो  कागद ‘डेव्हलपर’मध्ये टाकला की, त्या लाल प्रकाशात त्याच्यावर उमटत जाणारी इमेज... हे अक्षरशः जादूसारखं वाटायचं. आजच्या इन्स्टंट फोटोग्राफीच्या काळात कुणाला त्याचं महत्त्व कळणार नाही. ‘अरे व्वा! काय छान फोटो आलाय!’ असे नानामामा आणि दादा यांचे संवाद मला अजून आठवतात. 

फोटोग्राफीप्रमाणेच त्याला रंगकाम आणि पेंटिंग करण्याचीही अतिशय आवड होती. तो स्वतः फार सुंदर चित्रं काढायचा. पेंटिंगही सुंदर करायचा. आम्ही अगदी चार-पाच वर्षांचे असताना मला आणि माझ्या बहिणीला पाठोपाठ गोवर आणि कांजिण्या झाल्या होत्या. आठ-पंधरा दिवस आम्ही आजारी होतो. तेव्हा दादाने रोज आमच्या शेजारी बसून आम्हाला निसर्गचित्रं कशी काढायची, वॉटर कलरने ती कशी रंगवायची ते शिकवलं होतं. प्रायमरी कलर्स कुठले, निळा आणि पिवळा मिसळला की हिरवा होतो, हे सगळं तो आम्हाला करून दाखवायचा.  

आजोबांच्या दवाखान्यात त्यांची एक्झामिनेशन रूम होती. त्यात एक ऑपरेशन टेबलही होतं. कारण आजोबा जुन्या काळातले जनरल प्रॅक्टिशनर. त्यामुळे त्यांना सगळंच करावं लागे. त्यांनी जेव्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, तेव्हा आजूबाजूच्या गावातून बोलावणं आलं तर तिथे जाऊन ॲपेंडिक्स काढणं वगैरे अशा छोट्या शस्त्रक्रियासुद्धा त्यांना कराव्या लागायच्या. पण त्या ते नेहमी करत नसत. त्यामुळे शेजारी पुस्तक ठेवूनच त्यांना त्या शस्त्रक्रिया कराव्या लागत वगैरे आजी सांगत असे. हे आज आपण कादंबरीत वाचतो किंवा सिनेमात पाहतो. पण अशी परिस्थिती त्या काळात भारतामध्येच, पुण्याजवळ होती. दादाने जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा त्याला या टेबलचा उपयोग झाला. त्या काळात लहान मुलांच्या टॉन्सिल्स्‌ काढणं हा प्रकार सर्रास होता. आता ते खूप कमी झालं. पण त्या काळात टॉन्सिल्स्‌ वाढल्या आणि वारंवार दुखायला लागल्या की, त्या काढून टाकत असत. ‘ईएनटी’च्या शस्त्रक्रियांमधली ही एक नित्याची शस्त्रक्रिया होती. टॉन्सिलचं प्रत्यक्ष ऑपरेशन 30-40 मिनिटं चाले आणि चारेक तासांत रोगी घरी जाऊ शके. दादा त्या शस्त्रक्रिया दवाखान्यातल्या ऑपरेटिव्ह रूममध्ये करत असे. ती सर्जरी सकाळी लवकर सात वाजता असे, कारण आजोबांचा दवाखाना सकाळी नऊ वाजता सुरू व्हायचा. त्यामुळे त्याच्या आधी टॉन्सिलचा पेशंट ऑपरेशन होऊन तिथून बाहेर यावा लागे. भूल देणारे डॉक्टरसुद्धा त्यासाठी भल्या सकाळी लवकर येत.

चार-पाच वर्षांचे असताना मी किंवा बिंबाने एकदा त्याला विचारलं की, तू हे काय करतोस? त्या वेळी त्याने आम्हा मुलांना सांगितलं की, उद्या मी सर्जरी करणार आहे, तर तुम्ही या आणि थोडं दूर उभं राहून ती बघा. याचा आमच्यावर परिणाम काय होईल, असा विचार त्याने केलाच असणार. (टॉन्सिलच्या सर्जरीमध्ये फार काही रक्त-बिक्त येत नाही.) पण तिथली गंभीर शांतता, सगळे जण ठराविक पद्धतीने काम करत आहेत, पेशंट ऑपरेशन टेबलवर आहे, आजूबाजूला हिरव्या चादरी आहेत- असं तिथलं चित्र अजूनही डोळ्यांपुढे येतं. मी आणि बिंबा दोघेही डॉक्टर झालो, त्याला या अनुभवाचा हातभार लागला असणार!

वरून लादलेल्या शिस्तीवर त्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे तो आम्हाला मारणं तर सोडाच, कधी फारसं रागवतही नसे. रागवण्याचे प्रसंगही फारच क्वचित असत. एकच प्रसंग मला आठवतो. मी तिनेक वर्षांचा असेन. आम्हाला मुलांना तो दाढी करत असताना बघणं फार आवडायचं. जुन्या पद्धतीने साबणाचा फेस वगैरे करून तो बेडरूममध्ये आरामात दाढी करायचा. आमच्या त्या दुमजली घरात मोरी, पाणी तापवण्याचा बंब वगैरे सगळं खालच्या मजल्यावर होतं आणि बेडरूम वरती. दादा खालून गरम पाणी घेऊन वर येऊन दाढी करायचा. त्याचे दाढीचे सगळे सोपस्कार बघायला आम्हाला आवडायचं. एकदा मी त्याच्याबरोबर गरम पाणी आणायला खाली गेलो. त्याच्या हालचाली फार चपळ होत्या. (हे कदाचित टेनिसमुळे असावं-  नाटकामध्ये स्टेजवर ते आपण अनेकदा पाहिलंच आहे) हातामध्ये पाणी भरलेला मग घेऊन तो पळत-पळत जिन्यातून वर जायचा, पण एक थेंबसुद्धा खाली सांडायचा नाही. तर त्या दिवशीही पाणी घेऊन दादा पळत-पळत जिना चढून वर गेला. मी मात्र खालीच थांबलो. दादाने वळून पाहिलं आणि मला म्हणाला, ‘ये ना!’ मी फुरंगटून म्हटलं, ‘तू का वर गेलास? खाली ये आणि मला वर घेऊन जा.’ मी काही एकट्याने वर जायला तयार नव्हतो. मी तिथेच बसून राहिलो. दादा दाढी संपवून आला. त्याला पुढे दवाखान्यात जायचं होतं. मग मी रडायलाच सुरुवात केली. तेव्हा दादा मला म्हणाला, ‘तू असा रडत बसलास तर मी तुला कोंडून ठेवीन.’ तरीही मी बधलो नाही. मग अगदी हद्द झाल्यानंतर त्याच्या खोलीत त्याने मला नेऊन ठेवलं. दार उघडंच ठेवून तो गेला. पण मी तिथून बाहेर यायला तयार नव्हतो. आई मला समजवायला आली. पण मी सांगितलं की, मी दादा आल्याशिवाय बाहेर येणार नाही. मग थोड्या वेळाने तो आला आणि मी खोलीतून बाहेर आलो.  

लहान मुलांना खोकला झाला किंवा घसा दुखायला लागला की, दादा एक औषध जिभेच्या मागे घशात लावायचा. आजोबाही तसेच घशाला औषध लावत असत. पण दोघांमध्ये फरक होता. आजोबा सिल्व्हर नायट्रेट नावाचं औषध लावायचे. रोगजंतू जागीच नष्ट करण्याची ती जुनी ट्रीटमेंट होती. ते औषध चवीला अतिशय कडू असतं. दादा जे औषध लावायचा, ते तपकिरी रंगाचं औषध छान गोड लागायचं. पण आजोबांचा जुन्या पद्धतीवर विश्वास. ते कधीच ते गोड औषध लावायचे नाहीत! त्यामुळे आम्हाला कुणाला असं काही झालं तर आम्ही म्हणायचो- आपण दादाकडे जाऊ, अण्णांकडे नको. दवाखान्यातच दादाची ईएनटी पेशंट तपासण्यासाठीची विशिष्ट खुर्ची, त्याचा विशिष्ट दिवा असं सगळं होतं. ईएनटी डॉक्टरने डोक्यावर घालायची एक रिंग आणि तिला मधोमध भोक असलेला गोल आरसा असतो. त्यामुळे समोरचा प्रकाशझोत पेशंटच्या नाकात, कानात किंवा घशात परावर्तित करून डॉक्टरला बघता येतं. दादाचं तसं रूप अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. 

आम्हाला उन्हाळ्यात पोहायला जायची हौस असायची. टायफॉईड, कॉलरा या आजारांचं प्रस्थ त्या वेळी इतकं होतं की, पोहायला जाण्यापूर्वी सगळ्यांना इंजेक्शन घ्यायला लागायचं. तेसुद्धा आम्हाला दादाकडूनच घ्यायला आवडायचं. त्याचा हात इतका हलका होता की, इंजेक्शन देताना सुई आमच्या हातात कधी गेली, ते कळायचंच नाही. त्याच्या हातातच तो गुण होता आणि वैद्यकी शिकत असताना त्याने तो आत्मसात केला होता. मी स्वतः डॉक्टर झालो तोपर्यंत त्याने प्रॅक्टिस बंद केली होती. पण तो स्वतः त्याच्या विषयातला निष्णात डॉक्टर होता, याविषयी माझ्या मनात काहीच संशय नाही. ईएनटी सर्जरी करणारे तेव्हा फारसे कोणी पुण्यात नव्हते. दादा हा पुण्यातला बहुधा पहिला-दुसरा ईएनटी सर्जन असावा. त्यामुळेच या विषयात जास्तीत जास्त प्रावीण्य मिळवलं पाहिजे, असं त्याला वाटत असणार. 

त्या काळात टेलिव्हिजन नव्हताच. सिनेमे बघणं हेही आमच्या घरामध्ये अतिशय कमी होतं. मुलांनी वर्षाकाठी एक किंवा दोन सिनेमे बघितले म्हणजे खूप झालं! आणि तेसुद्धा ठरावीक मुलांचे सिनेमे असायचे. मी ‘नूमवि’मध्ये होतो. तिथे वार्षिक स्नेहसंमेलनावेळी एक सिनेमा दाखवायचे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत आणखी एखाद-दुसरा. एकत्र कुटुंब असल्यामुळे मुलांनी काय करायचं वगैरे गोष्टी बहुतेक आजी ठरवत असे. मोठ्या कुटुंबात तो अधिकार आजीला पूर्वीच  मिळालेला होता. कारण 1917 मध्ये तिचं लग्न झालं. त्यानंतर 1918-19 मध्ये फ्ल्यूची (इन्फ्ल्युइन्झा) साथ आली होती. तिच्यामध्ये माझी पणजी आणि पणजोबा दोघेही गेले. माझे आजोबा भावंडांत सगळ्यात मोठे. त्यांच्या मागे चार भाऊ आणि एक बहीण. हे सगळे जण त्यानंतर आजीच्या माहेरी सातारला एक-दोन वर्षं राहिले. तोपर्यंत आजोबांचं डॉक्टरी शिक्षण पूर्ण झालं आणि ते प्रॅक्टिस करायला लागल्यावर सगळे पुण्यात आले. त्यामुळे वयाच्या 17-18 व्या वर्षापासून आजीने दीर-भावजया असलेलं असं हे मोठं कुटुंब सांभाळलं होतं. पुण्यामध्ये कुमठेकर रस्त्यावर दांडेकरांच्या रामाच्या देवळाला जोडून असलेल्या वाड्यात सर्व जण राहायला गेले. चार-सहा खोल्यांच्या जागेत हे सगळे राहत असत. त्या रामाच्या देवळातल्या जागेतच दादाचा जन्म झाला. आजी-आजोबांची रामावर खूप श्रद्धा होती आणि या सगळ्याचा परिणाम दादाच्या मनावर झालेला असणार. दादा नऊ वर्षांचा असताना आजोबांनी लक्ष्मी रस्त्यावर बांधलेल्या ‘रमा निवास’मध्ये सगळे आले. रमा निवासमधल्या देवघरातही फार सुंदर रामपंचायतन होतं.  

त्या काळात ‘पीडीए’मधलं दादाचं काम जोरात चालू असणार; कारण भालबा (केळकर), जया (जयंत धर्माधिकारी), राम (खरे), अरुण (जोगळेकर), ताराबाई (घारपुरे) आदींचे उल्लेख वारंवार होत. दादाचं ‘वेड्याचे घर उन्हात’ नाटक अगदी अंधुक आठवतं, त्यातल्या दिवास्वप्नांच्या प्रवेशातील रंगीत प्रकाशयोजनेमुळे. नंतर केलेलं  ‘देवांचं मनोराज्य’ नावाचं नाटक जास्त आठवतं. त्या नाटकात एक अशी कल्पना आहे की, सगळे देव पृथ्वीवर येतात. आणि त्यांना इथे आल्यावर जे काही दिसतं ते पाहून देव म्हणतात, हे सगळं आपणच तयार केलं की काय! आता हे सगळं आपण कसं बदलणार? स्वर्गातले सीन, सिंहासनं, मोठमोठे सोनेरी मुकुट असं बरंच होतं त्यामध्ये. त्या नाटकात दादा विष्णूचं काम करायचा. भरत नाट्य मंदिरात तेव्हा अगदी साधं, फळकुटं असलेलं स्टेज होतं. गावामध्ये गणपती उत्सवासाठी स्टेज करतात तसं ते भरत नाट्यमंदिरचं स्टेज तेव्हा होतं. तिथे आम्ही दादाचं ते नाटक बघायला गेलो होतो. मध्यंतरामध्ये काकांबरोबर मी दादाला भेटायला स्टेजच्या मागे गेलो. तेव्हा दादाला देवाच्या रूपात बघितल्याचं आणि नाटक म्हणजे छानच काही तरी आहे, असं काही तरी वाटल्याचं मला आठवतं. 

एकूण, त्या वेळी डॉक्टरकी आणि नाटक यांत दादा बुडालेला होता. पण महिन्यातल्या निदान एका रविवारी दादा आणि आई आम्हाला ‘बंड गार्डन’ला घेऊन जायचे. कोणत्या दिवशी जायचं वगैरे ते त्यांचं ठरवून होत असणार. त्यासाठी घरातली गाडी ते वापरायचे. आणि मग तिथे गेल्यावर घोड्यावरून रपेट मारायचो, खारे दाणे खायचो. 

जेव्हा मी पहिली संपवून दुसरीत गेलो (सहा-सात वर्षांचा असताना), तेव्हा मुलं पुरेशी मोठी झालेली आहेत आणि आता पुढचं शल्यचिकित्सेचं शिक्षण घेतलं पाहिजे, असं त्याला वाटू लागलं. ईएनटीचं भारतात तोपर्यंत जे काही शिक्षण उपलब्ध होतं, ते त्याने घेतलेलं होतं. आणि विलायतेला जाऊन चांगलं शिक्षण मिळतं, अशी त्या काळात समजूत होती. त्यामुळे त्याने कॅनडाला अर्ज केला. तेव्हा आतासारखं ‘ग्रीन कार्ड’ वगैरे काही नव्हतं. कॅनडात मोठ्या हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर म्हणून सरळ प्रवेश मिळे. दादा 1959 मध्ये मॉट्रियलला (Montrial) गेला. तिथून तो अतिशय सुंदर पत्रं पाठवत असे. ‘लमाण’मध्ये आपल्याला जाणवतं की, साध्या घटनेचं त्याने केलेलं वर्णन अतिशय चित्रपूर्ण असतं. तशी ती पत्रं असायची. त्यातली काही पत्रं आम्हा मुलांचा वाढदिवस वगैरे असला तर खास आमच्यासाठी लिहिलेली असायची. तिथे तो हाऊसमन म्हणून काम करत होता. पण त्या हाऊसमनच्या दोन-अडीचशे डॉलर पगारातूनही काही पैसे वाचवून तो भारतात पाठवायचा. सबंध वर्षामध्ये त्याचा फक्त एकदाच फोन आला होता. त्या काळी परदेशातून फोन येणार असेल, तर सकाळी टेलिफोन ऑपरेटरकडून आधी हे सांगण्यासाठी फोन यायचा की, आज संध्याकाळी तुम्हाला कॅनडातून फोन येणार आहे. त्या तीन मिनिटांच्या फोनसाठी तेव्हा 20-25 डॉलर असे काही तरी जबरदस्त पैसे त्याला तेव्हा द्यावे लागले असणार. पण तीन मिनिटांच्या फोनमध्ये काय बोलणार? एकेकाने ‘हॅलो’करण्यातच तो वेळ संपून गेला. आई आमच्यासोबत पुण्यातच होती आणि आमची शाळा वगैरेही जोरात चालू होती. आजोळही जवळच असल्यामुळे त्यांच्याकडे जाणं-येणं होतंच. या सगळ्यात दादा कुठे तरी दूर गेलाय, असं काही फार जाणवत नसे. माझ्या आतेभावांचे आई-वडीलही पूर्वी इंग्लंडमध्ये जाऊन परत आले होते. त्यामुळे हे असं असतंच, सगळ्यांचे आई-वडील परदेशात जातात आणि येतात- असंच वाटायचं.  

कॅनडामधून एक वर्षाने दादा ईएनटीचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेला. ‘डीएलओ’ नावाचा तो पुढचा डिप्लोमा होता. लंडनमध्ये पुन्हा निवासी डॉक्टर म्हणून नोकरी करून, शिवाय हा अभ्यास करून त्याने परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर त्याने आईला सांगितलं की, तू आता इकडे ये, मग आपण भारतात परत येऊ. तेव्हा इंग्लंडला जाणं त्यामानाने सोपं होतं. पण तो कॅनडाला असताना मात्र कुणी त्याच्याकडे नुसतं भेटायला म्हणून जाणं अशक्यच होतं. त्याप्रमाणे आई काही दिवसांसाठी इंग्लंडला त्याच्याकडे गेली आणि भारतात परत येण्यापूर्वी सुट्टीत स्कॉटलंडमध्ये प्रवास करत असताना एका अपघातामध्ये ती गेली. दि.3 जुलै 1961 ही तारीख होती ती. तो धक्का सगळ्यांसाठीच फार जबरदस्त होता. जिथे अपघात झाला तिथून फोन करणं शक्यच नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी केसरीला टेलिप्रिंटरवर पहिल्यांदा ती बातमी आली आणि तिथून कुणी तरी घरी फोन करून आजोबांना सांगितलं असणार. आम्ही शाळेत गेलो होतो. माझी चौथी नुकतीच सुरू झाली होती. बातमी कळल्यावर मला आणि बहिणीला दादाच्या काकांनी येऊन शाळेतून घरी आणलं. आजोबांनी जवळ बसून, सगळं सांगितलं. हा धक्का पुरेसा नव्हता म्हणून की काय, त्यानंतर लगेचच 11 जुलैला पानशेतचा पूर आला. आमच्या घराचा एक सबंध मजला पाण्याने भरून जाऊन पाणी आणखी वर आलं. त्यामुळे आम्ही सगळे तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाऊन बसलो. त्यातच पाऊस सुरू झाला. सगळ्या बाजूंनी घोंघावणारं पुराचं पाणी. आजूबाजूची काही घरे पडली. वेगवान पाण्याच्या प्रवाहात एक-दोन बैल माना वर ठेवायचा प्रयत्न करत असहायपणे नदीच्या पात्राकडे ओढले जात होते. प्रचंड भीती म्हणजे काय असते, हे त्या वेळी मला जाणवलं. हा सगळ्याचा शेवट आहे, असं काही तरी मला त्या वेळी वाटत होतं. पण संध्याकाळपर्यंत पाणी ओसरलं. आमच्या घरामागची  बरीच कच्ची घरं पडली होती. आमच्या घराला काही झालं नव्हतं, पण घराभोवती आणि मधल्या अंगणात खूप चिखल साठला होता. दिवे गेले होते. नळाला पाणी नव्हतं. पण घरात झोपणं शक्य होतं. 

आजोबांनी  दुसऱ्या दिवसापासून साफ-सफाईची सुरुवात करून दिली. घरातली मोठी माणसं कामाला लागली आणि शिवाय बाळूकाका (आजोबांचे भाऊ) आणि त्यांच्या घरचे मदतीला आले. बाजूच्या विहिरीतून पाणी आणून आठवडाभरात सगळा चिखल स्वच्छ केला. मी नुसता बघण्यापेक्षा काही करण्याच्या मानसिक अवस्थेत अजून नव्हतोच. नंतर  दहाएक दिवसांत दादा येण्याची वेळ आली. त्याला आणायला आम्ही मुंबईला गेलो होतो. आमच्यासोबत- मला वाटतं- आजोबा आले होते. कस्टमसमधून दादाला यायला बराच वेळ गेला. मी खूप अस्वस्थ झालो होतो. (आता आपण ज्याला PTSD म्हणतो. तसं गेल्या दोन आठवड्यांत घडलेल्या दोन घटनांनी माझं झालं असणार) अजून कसा येत नाही दादा बाहेर, असं मला वाटत होतं. नंतर या उशिराचं कारण कळलं. दादाने आईचे दागिने व इतर काही वस्तू एका हँडबॅगमधून आणल्या होत्या. कस्टम ऑफिसरने ‘काय काय आणलंय तुम्ही?’ असं दादाला विचारलं. त्याने सगळं सांगितलं. दागिने जुने आहेत म्हणून ड्युटी लावू नये, असा काही फॉर्म भरायला तो आणि दादा शेजारच्या केबिनमध्ये गेले. परत आल्यावर दादाने पाहिलं, तर ती हँडबॅग नाही.. कुणी तरी ती चोरून नेली होती! आजूबाजूचे अधिकारी, पोलीस यांपैकी कोणीच अर्थात काही पाहिले नव्हते! दादा बाहेर आला, तेव्हा घडल्या प्रकारामुळे अस्वस्थ होता. त्याला पाहून आम्हाला आनंद झाला. ब्राऊन चौकटींचा त्याने घातलेला अर्ध्या बाह्यांचा शर्ट अजून आठवतो. त्याला न्यायला आम्ही बापूकाकांची (आजोबांच्या दुसऱ्या भावाची) गाडी आणली होती (आमची गाडी पुरात वाहून गेली होती!), तिच्यात बसून आम्ही पुण्याला यायला निघालो. 

मुंबईहून पुण्याला येताना लागणारा खंडाळ्याचा जुना घाट त्या काळात अतिशय अवघड होता. मुंबईहून आम्ही निघालो तेव्हा दादाचा चुलतभाऊ गाडी चालवत होता आणि त्यातल्या एका वळणापाशी गाडी बंद पडली. पुन्हा सुरू करताना ती चढावरून मागे घरंगळायला लागली. तेव्हा दादा त्याला म्हणाला, ‘तू थांब. मी बघतो.’ दादा पटकन ड्रायव्हर सीटवर बसला आणि त्या बिकट वळणावरून त्याने गाडी सहज बाहेर काढली. तिथून पुढे मग त्यानेच गाडी चालवली. ‘दादा आता आला आहे, आता काही काळजी करायचं कारण नाही’ असं मला 15-20 दिवसांनी प्रथमच वाटलं. 

त्याच्या व्यक्तिमत्त्वातच असा काही तरी गुण होता की, तो असला म्हणजे सगळं ठीक होणार, असंच वाटायचं. पण पुण्यात आल्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा इंग्लंडला गेला. घाईघाईने भारतात परत आल्यामुळे तिथली बरीच आवराआवर करायची राहिली होती. DLO परीक्षेचा दुसरा भाग पूर्ण करायचा होता. तिथे तो पुन्हा वर्षभर राहिला. तो पुन्हा परत आला, तेव्हा माझी पाचवी इयत्ता नुकतीच सुरू झाली होती. 

(उत्तरार्ध पुढील अंकात)

(शब्दांकन : सुहास पाटील)

Tags: रंगायन विजया मेहता माझा दादा मराठी नाटक नाटक श्रीराम लागू आनंद लागू natak shreeram lagoo natak shreeram lagoo first marriage dr shreeram lagoo anand lagoo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आनंद लागू,  अमेरिका
anand.lagoo@duke.edu

ड्युक युनिव्हर्सिटी येथे रोगनिदानशास्त्राचे (पॅथॉलॉजी) प्राध्यापक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके