डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी शक्यतो तिच्या पंच्चाण्णवातील खोलीवर जात नाही. मनातून मी स्वत:च तिचे हे दुसरे नाते स्वीकारले नाही, सरंजामदारी मानसिकतेने ग्रस्त मी. फुटपाथवर उभा राहून तिला हाका मारतो मावशी...

आज खालीच बसलोय तिच्यासोबत, रात्री वाचलेले तिला गिरीश कार्नाडांचे चरित्र सांगतो. मावशीला चोपन्नच्या राज कपूरच्या ‘अंदाज’पासून अमिताभच्या ‘दीवार’पर्यंतचा हिंदी सिनेाचा इतिहास माहीत.

            

‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ अशा ओळीची, शाळेला असताना एक कविता होती. तेव्हा लहानपणी वाटायचं, यात कसलं कौतुक? ठरल्याप्रमाणे नेहमीच येतो पावसाळा. पण गेल्या दहा वर्षांत बरोबर कधीच न आलेला मृग नक्षत्राचा पाऊस महाराष्ट्रात या वर्षी बरोबर सात जूनलाच सुरू झाला. ही केवळ कौतुकाची नव्हे, तर आश्चर्याची गोष्ट. या वर्षी वळवाचा पाऊस माणदेशात काही गावपरिसरात कोसळला. माणदेशातली माणसे या वळिवाच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. वळीव ढासळला की, रानाच्या मशागती करता येतात. इकडचे लोक तेवढ्या पावसावर कमी पाणी लागणाऱ्या पिकांची अन्‌ कडधान्यांची पेरणी करतात.

जून म्हणजे भारतीय ज्येष्ठ महिना. मला आवडतो, वर्षाची सुरुवात असलेला चैत्र. या महिन्यात लग्नांच्या तिथी निघत नाहीत, तसेच पुढे आषाढातही नसतात. म्हणजे लग्नाच्या अखेरच्या तिथी ज्येष्ठात. या महिन्यापासूनच सुरू होते नवे शैक्षणिक वर्ष. विद्यार्थीं- युवकांच्या भविष्यातील स्वप्नांचा हा पहिला महिना. या सरत्या ग्रीष्माच्या महिन्यात वैशाख-वणवा जाणवत नाही. पाऊस घेऊन येणारे पश्चिमेचे वारे नवजात बालकाच्या मुलायम जावळासारखे भुरूभुरू वाहत राहते. मशागत अन्‌ पेरणीची कामे म्हणजे माणसाचे आदिम काळापासूनचे रानाशी असलेले अभिन्नत्व. मागचं सारं विसरून येणाऱ्या वर्षाचे आशादायी संकल्प. स्वप्नं पेरण्याचा हा महिना.

जून महिना मला आवडतो.

दुष्काळी दोन-अडीच वर्षांच्या दीर्घ काळानंतर माणसांच्या रया गेलेल्या चेहऱ्यावर आनंदाचे भरतं आणणारा हा पाऊस अनुभवण्यासाठी शामगावचा घाट ते झरे विरळीपर्यंतचा शंभरएक मैलांचा प्रवास मोटरसायकलने केला आम्ही दिवसभर. दरम्यान, माझ्या अंगावरील कपडे भिजले, तसेच तरसवाडीपासून सुरू होणाऱ्या वेगवान वाऱ्याने सुकले. परत संध्याकाळी हा पाऊस सोबतीला घेऊन हिवरवाडीच्या छावणीवर रात्र काढली.

म्हटले, आता थोडी उसंत घ्यावी. आमच्याही बिघाभर रानाची पाइपलाइन अन्‌ नांगरट करायची होती. त्यात दोन-चार दिवस गेले आणि मग मी मुंबईला गेलो.

त्याचा हा जसा व्यक्तिगत, तसा सामूहिक वृत्तांत.

बारा जूनला मित्राच्या मुलाचे लग्न नायगाव पोलीस कार्यालयात. मित्र लहानपणापासूनचा. तो अकाली वारलेला. संबंध घरोब्याचे म्हणून आम्ही दोघेही लग्नाला असणे आवश्यक. मुंबईचा मावसभाऊ नुकताच रिटायर्ड झाला, तो वरळीहून घाटकोपरला राहायला गेलेला. आम्ही उतरायचे कुठे? म्हणून ‘लोकवाङ्‌मय’वर फोन केला. विश्वासराव म्हणाले, कोल्हापूरचे कार्यकर्ते येणार आहेत, पण या तुम्ही. ऐनवेळी असे विचारणेच मुळी चुकीचे, म्हणून मग कृष्णा किंबहुनेला फोन केला. त्यांनी ‘मुंबई मराठी’च्या इमारतीत विचारून ठेवले. वाटले, दोन्हीपैकी कुठे तरी सोय होईल. लग्न संध्याकाळी सहा वाजता. दादरला आम्ही चारला पोहोचलो. बाहेर पाऊस. दादरहून नायगावला टॅक्सी मिळत नाही. तसेच पावसातून लग्नाच्या हॉलवर चालत. हातात बॅगा. हा माझा पहिला पाऊस. पूर्ण भिजत आम्ही वराअगोदर हॉलवर.

रात्री ॠत्विक- माझा दुसरा मुलगा- म्हणाला, ‘चला गोरेगावला.’ तो अन्‌ त्याचा पार्टनर अविनाश सप्रे यांचा मुलगा निहार राहताहेत. टॅक्सीतून गोरेगाव साडेअकरानंतर. सोबत पाऊस. पश्चिम खारनंतरचा सगळा परिसर मला अपरिचित. पावसात जुहू चौपाटी अन्‌ पुढे गोरेगाव.  खोली बरी आहे त्यांची. निहारने आवर्जून चहा केला. खूप बोलत बसलो- साहित्य, संगीत, चित्रकला. ही तरुण पोरं माझ्या बऱ्यापैकी ओळखीची आहेत. कादंबरी अन्‌ नंतर या दुष्काळावरील लेखांमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे कॉल आले. निहार अन्‌ ॠत्विकच्या बोलण्यातून जाणवले, चांगली जाण आहे तरुण पिढीला. वाईट फक्त एवढेच की, जागतिकीकरणाच्या जॉब या संकल्पनेला वेळेचे बंधन नाही, बारा-बारा तास काम. राबवून घेतलं जातंय त्यांना. विश्रांती अन्‌ सृजनाला उसंत नाही.

रात्री तीन वाजता झोपलो.

गेल्या वर्षभरात मुंबई फिरताना एकच गाणं असतं माझ्या मनात, ‘एक अकेला इस शहरमें, रात में या दोपहर में.’ नाही सापडत ते घर... माझ्या आवाक्याच्या पलीकडे होत चाललं आहे. मुंबईत असे बेवारस होऊन फिरताना खूप उदास होतो मी आणि वरून हा धुवांधार पाऊस. बेघर माणसे कसे दिवस काढतात?

आईकडचे सर्व नातेवाईक इथे स्थायिक झाले, मीच असा शहर सोडून गावी आलो. आता नोकरी अन्‌ शिक्षणासाठी पोरे परत या शहरात. ती राहणार कुठे? इथे आल्यावर आपण निराधार असल्याची जाणीव प्रकर्षाने होतच राहते.

सकाळी पावसातून गोरेगावच्या रॉयलपाम इथे खोलीच्या शोधार्थ, संध्याकाळपर्यंत. सोबतीला पाऊस. आपणाला न परवडणारे रूमचे भाडे. त्यांनी पंधरा तारखेला खोली मालकासोबत बैठकीला बोलवले. बघू या, काय कमी झाले तर. परत नाराज. संध्याकाळी जेवण केले. रात्री गौतमीला गावाला निघावं लागणार, म्हणून पावसात अकरा-साडेअकराला परेल एसटी डेपोत. तिला गाडीला बसवून मुक्कामाला मी थोरला मुलगा विप्लवसोबत चर्चगेटच्या होस्टेलवर.

चौदाला सकाळी पाऊस नव्हता आणि मी दक्षिण मुंबईची सकाळ पाहिलेली नाही. एवढ्या श्रीमंत परिसरात कोणी मित्रही नाहीत आपले. मग नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी मनमुराद भटकलो- विप्लवसोबत. यजदानी या बावाच्या बेकरीत कडक बुरून-मस्कासोबत चहा घेतला. बाजूलाच पीपीएच बुक स्टॉलचे दुकान. गिरीश कार्नाडांचे चरित्र घेतले.

दुपारी परत मुंबई विद्यापीठ, कलिना. तिथे धो-धो कोसळणारा पाऊस. प्रा. रमेश कांबळेंनी जेवण दिले. चांगला बुद्धिमान अन्‌ संवेदनशील माणूस आहे प्रा. रमेश. सोबतीच्या सुबोधला, मोरेला आणखी कुठं काम नेहमीसारखेच

 मी एकटाच बसस्टॉपवर. आता मात्र पाऊस जाणवू लागला. थांबेनाच, खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रासारखा तो अविरत बरसत राहिलेला. ठीक आहे- बरस माझ्या राजा. पण इथे मला कुठे धड बसताही येईना. अस्सा उभा. हातात नावाला छत्री. त्याने मला धुतले. अक्षरश: काही बोलता येत नव्हते. गेल्या वर्षापासून त्याची-माझी भेट नाही, दडून बसला होता कुठे! तो नसल्याने साऱ्या धरतरीचे वाळवण झालेले मी पाहिलेय. मीच नव्हे; महाराष्ट्रातील सारे देव, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अन्‌ तमाम सगळी जनता त्याची प्रार्थना करीत होती. कुठे बेपत्ता झालेला- आम्ही शोधत होतो त्याला.

आता तो मला या सोयऱ्याच्या शहरात भेटला. इथल्या लोकांना कितीसे कौतुक असणार त्याचे? पवई अन्‌ तानसा तलाव भरण्याइतपत त्याने हजेरी लावली की, त्यांच्यासाठी पाऊस पुरेसा. शिवाय या शहरात येताना त्याने अगोदर सांगायला हवे. शक्यतो रविवारी येणार असाल तर उत्तम, नाही तर कामाला जाण्याची पंचाईत. लोकल बंद, घरी माणसे वाट पाहत असतात. पाणी साचले तर बस-कार बंद, वाहतूक ठप्प. महापालिकेला शिव्या. विरोधी पक्षांना तेवढेच एक निमित्त. त्यांना रोड चांगले असावे लागतात. आपल्या समृद्धीचा स्तर जगाला वाढवून दाखवण्यासाठी त्यांनी कितीही केला प्लॅस्टिकचा कचरा, तरी त्यांना गटारे स्वच्छ हवी असतात. अशा रीतीने सगळ्या गोष्टींचा राग आपण सरकारवर काढायला लागतो.

एरवी पाऊस गावच्या जवळच्या नातेवाइकासारखा आवडत असला, तरी या शहरात थोडा गैरसोईचा. रात्री आपण घरी पोहोचल्यानंतर तो घनघोर पडावा, सकाळी कसं ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या...’ मोहकतेने सूर्याचे दर्शन घडावे. पावसाने कसे आषाढ-श्रावणातील सरीसारखे बरसावे अन्‌ चोचीने चातकाला ते वर्षाॠतूचे पाणी पिता यावे, अशी त्याच्याकडूनची आपणा सर्वांची अपेक्षा. तास झाला तरी बस येत नव्हती. मी सदतीस नंबरच्या बसने मावशीला भेटायला जाणार होतो. तो म्हणाला- राहू दे, कुणाकुणाची रिकाम्या मनात आठवण काढणार आहेस? आज मी आहे ना तुझ्यासोबत! मग त्याच्या सोबतच सांताक्रूझ स्टेशनला गेलो. सर्वत्र त्याचे अस्तित्व जाणवत होते. कोणती जागा त्याने कोरडी ठेवली नव्हती. उभ्याने चहा घेतला. परत होस्टेल.

उठलो. आज पाऊस बघायचा. डोक्यावर बादलीभर  गरम पाणी ओतून घेतले. अंगात शर्ट, पोराचा बर्मुडा घातला आणि बाहेर पडलो. जरा आनंदी मूडमध्ये ‘एक अकेला इस शहर में...’ आणि आकाश असे धरेला भेटायला आलेले. अहाहा, सुंदर मुंबई! मला लहानपणापासून आवडते. एक वर्ष शाळेत मी गेलोय इथे. बेकारीत तीन अन्‌ नोकरीची पाच अशी आठ वर्षं वावरलो- या अशोक शहाणे, अरुण कोलटकर, किरण नगरकर, अन्‌ श्रीधर पवारच्या गावात. हे माझेही शहर आहे. पूर्वीच्या लोकवाङ्‌मयच्या अंकात मी एक कथा लिहिलीय ‘बॉम्बे मेरी जाँ!’ एक अर्धवट आणि अजूनही कुठे राहायला मिळाले तर जी मला नव्याने लिहिता येईल अशी ‘वरळी इंजनछेडा’ नावाच्या कादंबरीची शंभरएक पानं लिहिलीत मी इथे... इथेच वरळी बीडीडी चाळीच्या तळात बसून लिहिल्या काही कविता... आणि मग शेवटी चांदण्या रात्री हे शहर सोडून निघून जायची गायली विलापिका आणि खरेच निघून गेलो इथून कायमसाठी.

 तरीही परत-परत आलो इथे- कधी मोर्चासोबत, कधी गौतमीच्या दवाखान्यासाठी, कधी नातेवाईक अन्‌ मित्रांच्या कार्यात, तर कधी पुस्तके घेण्यासाठी. सहज आठवण झाली म्हणून या शहराला भेटण्यासाठी मी येत राहिलो, महिन्यातून किमान एक वेळ तरी.

इथेच आहे- जिने माझे भावविश्व आईएवढेच व्यापून टाकलेले अन्‌ तिच्यावर अवाढव्य कादंबरी लिहिता येईल, ती मनस्विनी माझी मावशी. मुंबईतच आहेत त्या अनाम वाटेवर- मला सोडून गेलेले आणि आज माझ्यासोबत असलेले मोबाईलच्या एका कॉलवर मला भेटायला येणारे जिवलग मित्र. ज्याच्याकडे मी कोणत्याही क्षणी जाऊ, राहू शकतो, तो माझा एक मावसभाऊ. आपुलकीने माझी ऊठ- बस करणारे असंख्य नातेवाईक इथलेच. ज्याने मला आयुष्यभरासाठीची भाकरी, आत्मीय मित्र, विचार अन्‌ संवेदनशीलता दिली- हेच ते शहर, माझे आजोळ मुंबई.

या शहरात कुणीच नाही आपले आणि एवढा वेळ थांबायचे तरी कुठे, म्हणूनच फोर्टध्ये माझ्यासाठी असलेले एकमेव हक्काचे ठिकाण पीपल्स बुक हाऊस. कंटाळलो तर मेट्रोच्या पाठीमागचे राम साळुंखे या मित्राचे मोदी थ्रेड ऑफिस. पूर्वी तासन्‌तास वाद घालीत बसलो, ती तुरळक इराण्यांची हॉटेले. भूक लागली अन्‌ खिशात पैसा असेल, तर दक्षिण भारतीय उडप्यांची हॉटेले. केवळ वासाने भुका जाग्या करणाऱ्या पारश्यांच्या बेकरीज. स्वस्त मालवणी खानावळी. वाफाळत्या चहाच्या हिंदू मारवाड्यांच्या बोळकांड्या टपऱ्या

 नंतर मित्रांसोबत एक वाळकेश्वर वगळता नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंचा सगळा समुद्र आपलाच.

हे लांबच लांब गर्दीचे परिचित रस्ते. नंबरासहित ओळखीच्या बसेस. सदासर्वदा आपल्यासाठी ताटकळत असलेल्या तिन्ही लाईनच्या लोकल्स.

जागोजाग मला परिचित अन्‌ जागा मिळेल तिथे जीवाच्या आकांताने टिकून असलेली माझी प्रिय झाडे. मिळतेय म्हणून मुबलक खाऊन माजलेल्यांसारखीच ऐसपैस कुत्री. अजूनही बिल्डरांची नजर न पडलेल्या आपला स्वत:चा एक इतिहास असलेल्या जुन्या सुंदर इमारती. जाता-येता किमान आपल्याकडे पाहावे म्हणूनच वाट पाहत असल्यासारखे हे निर्विकार देखणे पुतळे.

मोगरा अन्‌ पिवळ्या चाफ्याचे हार करून विकणाऱ्या कुठल्या प्रदेशातून आलेल्या अन्‌ रिकाम्या फुटपाथवर स्थिरावलेल्या निर्वासित बायका-बापये अन्‌ त्यांची निरक्षर कुपोषित मुले. हे रंगीबेरंगी फुगे, बुढीचा बाल अन्‌ सिग्नल पडताच छुप्या डेबोनॉरसारखी जवळपास पिवळी मासिके... फुले विकणारी कुठून आली इथे रया गेलेली माणसे? सर्व बाजूंनी ज्यांची पिळवणूक होतेय, अशा अगतिकपणे भीक मागणाऱ्या वेडसर तरुण स्त्रिया कुठल्या? हे दिवसभर खांद्यावर जू टाकून जनावरासारखे हमालगाड्या ओढणारे अन्‌ रात्र होता घाईघाईने उपनगरांच्या झोपड्यांत जाणारे माथडे, ऑफिसबॉय, पेंटर अन्‌ कष्टाची कामे करणारे- सर्व माझ्या ओळखीचे आहेत.

आठवत नाही नेमके, पण त्यांना मी कुठे तरी पाहिलेले आहे. ते माझ्या दुष्काळी प्रदेशातून तर आलेले नाहीत? एरवी लोकलमध्ये जागा मिळालीच तर मोबाईलमध्ये जे मग्न, क्वचित कोणी पेपर अथवा पुस्तक वाचीत आहे... वा लांबच्या प्रवासात फुकट पुण्य पडावे पदरात म्हणून भजने गात आहेत... किंवा लोंबकळताना थकून पेंगत आहेत; ते तमाम सर्व माझे नातेवाईक, सगेसोयरे आणि गाववाले आहेत. त्यांना भेटण्यासाठी तर मी येत असतो इथे.

खूप दिवसांनंतर आज मला मावशीला भेटायचे आहे. मागे एप्रिलमध्ये आलो, तेव्हा ती या शहरात अचानक आलेल्या तापाने आजारी होती. वरळी-नायगाव-डिलाईल रोड अन्‌ शिवडीच्या जुन्या बीडीडी चाळींसारखे या पुनर्वसनाला आलेल्या चाळीसोबत तिच्या आयुष्याचा पट मांडायला हवा.

शहाऐंशीची एकमेव मध्यमवर्गीय बस जांबोरी मैदानात जाणारी. उतरलो. हा सगळा परिसर मला परिचित. एकोणपन्नासच्या कोपऱ्यावरचा फेमस बटाटा वड्याचा स्टॉल. त्या चाळीतच मराठा मंदिर हायस्कूल. इच्छा असून मला शिकता आले नाही तिथे. बाजूच्या पन्नासमधील मॅटर्निटी कामगार वर्गीयांचेच हॉस्पिटल. या दोन चाळींमधून रस्ता वरळी इंजनछेडाला जातो. रस्त्याकडेला तर आहे एकोणन्नवद चाळ. पहिल्या मजल्यावर मामांची एकवीस नंबरची खोली- मावशीच्या पहिल्या नवऱ्याची. माझ्या भावाची पंचवीस नंबरची खोली, दादरजवळ भारत सातपुतेची. इथेच माझी उमेद अन्‌ संस्काराची वर्षं गेली.

मावशी आता पंच्याण्णवात, वर्कीकरांच्या माझ्या दुसऱ्या काकाच्या खोलीत राहते. तिचे सासरे धोंडिराम गायकवाड बाबासाहेबांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातील सक्रिय कार्यकर्ते. त्यांचा वारसा राहिला नाही पुढे. मावशीचा नवरा, दुसऱ्या काकाचा थोरला मुलगा रवी दारूडा, नंतरचे दोघे वेडे. महेश मरण पावला, विजय कुठे पुण्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये. या वयातही मावशी त्याला भेटायला जातेच. माझ्या बहिणी तेवढ्या शहाण्या. मावशीची काळजी वाहणारा पहिल्या काकांचा मुलगा माझा भाऊ अरुण.

आता ती एकटीच असते. ज्याच्यावर मी कविता लिहिलीय ‘आपल्यातून जो परागंदा झालाय’ तो दारूडा भाऊ येतो, आठवडाभर राहून मावशीला त्रास देतो. त्रास... खूप सोबर शब्द मी वापरतोय. आईशी कसे वागावे याविषयी आपले काही संकेत असतात, या साऱ्या संकल्पना तो उद्‌ध्वस्त करतो. दारूने किती पाशवी होत जातो माणूस याचे जितजागते उदाहरण आहे माझा भाऊ. आणि मग परत निघून जातो, कुठे तरी दोन-चार महिन्यांसाठी. कुठे, आम्हाला माहीत नाही. मावशीच त्याची काळजी करीत राहते.

एका चाळीत ऐंशी खोल्यांपैकी साठ खोल्यांत हेच चित्र. हेच झोपडपट्टीत अन्‌ गावात आणि आपण दारूचे समर्थन अथवा विरोध करीत नसतो. एकूणातच खूप त्रयस्थ बनत चाललोय आपण. निश्चितच समाजस्वास्थ्यासाठी हे चांगले नाही.

मी शक्यतो तिच्या पंच्चाण्णवातील खोलीवर जात नाही. मनातून मी स्वत:च तिचे हे दुसरे नाते स्वीकारले नाही, सरंजामदारी मानसिकतेने ग्रस्त मी. फुटपाथवर उभा राहून तिला हाका मारतो मावशी...

आज खालीच बसलोय तिच्यासोबत, रात्री वाचलेले तिला गिरीश कार्नाडांचे चरित्र सांगतो. मावशीला चोपन्नच्या राज कपूरच्या ‘अंदाज’पासून अमिताभच्या ‘दीवार’पर्यंतचा हिंदी सिनेाचा इतिहास माहीत.

पाऊस थांबलेला आहे माझ्यासाठी. तिला इंजनछेड्याचा सगळा इतिहास माहीत आहे. लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सारे तिला परिचित. येऱ्या-जाणाऱ्याला आस्थेने ती विचारते, ‘कुठे चाललायसा शाळगावकरीन, आता बरे हाय?’ मधेच, ती विसरून गेलेल्या खटावकराची ओळख करून देते. वारांसहित तिला सारे आठवते. मारक्वेज सांगतात तसे- ‘तो बिस्तरवार होता’ - तसे तिचे आख्यान सुरू होते. शांत बसत नाही, रेल्वेच्या प्रवासात कुणाकुणाच्या ओळखी काढीत राहाते. कदाचित तुम्हालाही भेटली असेल कुठे माझी मावशी. मी तिचे चपात्यांसाठी मळलेल्या पिठासारखे मऊसूत हात आपल्या हातांत घेतो. सुरकुत्या पडल्या, थकलीय ती आता. अजूनही तिच्या हातची नुकतीच तव्यावरून काढलेली चार घड्यांची चपाती चहासोबत खायला मला आवडते. तिच्या अवघ्या आयुष्याचा सारीपाट टेप करून घेण्याच्या क्षमतेचा मोबाईल माझ्याजवळ नाही.

खरेच ही वरळी वेडे करते मला. पण इथे राहता येत नाही. तिला असं गावी बोलवता येत नाही. हा सगळा माहोल तिच्या समोर हवाय. अन्‌ मी असा तिच्या गोत्रातला. तिला सर्वार्थाने समजून घेणारा एकमेव एकटा. मी उदास होतो. दिवस तर निघून जाताहेत. मी जन्मलो त्या दिवशी तिला नहाण आलं. तिनेच मला सांगितले. तो ‘सोवार’ होता. अन्‌ आज, आठ दिवसांनंतर संक्रांत म्हणून माझ्या जन्माचे साल मला काढता आले. म्हणजे मावशी पंच्याहत्तरची झाली. हे सर्व कधी तरी मला उरकायला हवे. आज अरुणही भेटला. बीडीडी चाळ सत्तर अन्‌ चौऱ्याण्णवातील इराण्याची हॉटेले बंद झाली. आम्ही तिघे माय-लेकरे सत्याण्णवात नव्यानं सुरू झालेल्या हॉटेलात चहा घेतो. या दुर्मिळ क्षणाचा कोणीतरी आमचा फोटो घ्यायला हवा होता.

संध्याकाळी खोलीसाठी बैठक होती दिंडोशीच्या मॉल सेंटरवर. वरळीतूनच पाऊस माझ्या सोबतीने आला. एवढ्या पावसातून चार मजल्यांच्या आणि आतून असंख्य उघड्या दालनांच्या ह्या मॉलमध्ये स्त्रिया, लहान मुलं आणि तरुण ओसंडून वाहत आहेत. ही एक स्वच्छ नीटनेटकी जत्रा आहे. एक प्रदर्शन आहे, आपल्यातील मूठभर समृद्धीचे. मी  आक्रसून जातो. अचंबित. चिरंजीव म्हणतो- लेखकाला हे जगसुद्धा माहीत असायला हवं. पार्टी आली; जुळला नाही आमचा व्यवहार.

उदास, ‘आबोदाना ढूंढता है, आशियाना ढूंढता है... एक अकेला इस शहर में.’ मॉलमधले मला सगळे वर्ज्य- कोल्ड कॉफी अथवा शीत पेय.

बाहेर आलो. सिमेंट काँक्रीट फुटपाथवर शॉवरसारखा बरसणारा लंपट ओला पाऊस. आम्ही एका कनिष्ठ मध्यमवर्गीय मालवणी हॉटेलात जेवलो. इतके महाग आपणाला परवडणार नाही, बघू आपण दुसरी- जेवताना एकमेकांची समजूत काढीत होतो.

 मला परत होस्टेलवर जायचं होतं. गोरेगाव स्टेशनपर्यंत ॠत्विकसोबत.

एवढ्यात जयंत पवारचा फोन आला- ‘हॅलो, अंधा पाऊस पाडला तरी... तुझा लोकसत्तामधील लेख वाचला. आवडला. कळवायला उशीर झाला. आता पाऊस पडतोय का तुझ्या माणदेशात? महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस झालाय, असे ऐकतोय.’ इथे मी पावसात सचैल न्हात होतो आणि अजूनही आटपाडी, जत, खानापूर, माण अन्‌ कवठेहंकाळ बहुतांश कोरडाच होता.

रात्री अकरा वाजता तिकीट काढून मी ट्रेन पकडली... मला एकटे वाटायला नको, म्हणून ॠत्विक जोगेश्वरीपर्यंत सोबत राहिला.

उशिराने असे रिकाम्या डब्यातून एकट्याने अनोळख्या ठिकाणी जाणे थोडे धाकधुकीचे, पण बाहेर पाऊस होताच. गुरुनाथ धुरींची ग्लोरिया आठवत राहिलो. परत ग्रेस होतेच ‘नाहीच कोणी रे आपले प्राणावर नभ धरणारे’. किंवा ती दुसरी ‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने.’ पण हा रात्रीचा पाऊस अन्‌ मी रेल्वेतून जवळपास एकटा प्रवास करणारा. आणखी दोघे होते माझ्याकडे पाहत असलेले. मी शक्यतो त्यांची नजर टाळीत. महालक्ष्मी गेलीच आहे, आणखी तीन-चार स्टेशने तर बाकी. सगळे कपडे ओले, चपला ओल्या, हातापायांची बोटे कारवंजलेली. जवळ वाचण्यासाठी काही नव्हते. एकटाच खिडकीतून बाहेर अंधारात टक लावून विचार करीत होतो- एवढी वर्षं नोकरी करून काय कमावले?

प्लॅटर्फॉवर फारसे कोणी नव्हतेच. शेवटची ट्रेन असावी एक नंबरवर. बाकड्यावर माझ्यासारखा कोणी या शहरात बेवारस, पोटात पाय घेऊन रात्रीला कलंडणारा. एक स्त्री हावभावांतून वेडी. गाडी पकडण्यासाठी दोन तरुण आले धावत. मी विमनस्कपणे पावले उचलीत. एका हवालदारानं मला हटकले. तिकीट काढलेले होते. त्याने उर्मटपणे विचारले, ‘कोण रे तू, गाव कोणते तुझे?’ सुरुवातीला थोडं बावचाळलो. अभावितपणे बोलून गेलो, ‘विंग’. आणि क्षणात लक्षात आले- तो माझ्याच गावचा असावा! सोबत आणखी दोघे होते. तेवढ्याच दांड भाषेत म्हणालो, ‘का, ओळखत नाहीत का माणसे? काही मॅनर्स?’ नरमून म्हणाला, ‘सॉरी, ओळखीचा चेहरा वाटला म्हणून विचारले.’ राग आला मला त्याचा. म्हणालो, ‘काय पद्धत?’ परत तोंड वर करून ‘इकडं कुठं?’ सांगावेसे वाटले नाही त्याला. वाईट वाटले. माझ्या गावातला असे बोलणारा आजवर कोणी भेटलेला नाही मला.

बाहेर पावसाने हाहाकार मांडलेला सर्वत्र. बी रोडला गुडघाभर पाणी. एकटाच. एवढी वर्षं राहिलो इथं, तरीही हे शहर मला पाहुण्यासारखे परके. रात्री झोप आली नाही. डोक्यात विवंचना. मन लागेना. परत बारा वाजून गेलेत. गावी पाऊस आहे का म्हणून माणदेशात कुणाला फोन करता येत नाही. झोपले असतील सर्व. गिरीश कार्नाडांचे चरित्र वाचत बसलो.

16 जून. सकाळी साडेपाचलाच उठलो. बाहेर पाऊस. झाडून सर्वांना फोन करीत राहिलो. हिवरवाडीच्या छावणीवर असलेल्या तात्या मानेला फोन केला- म्हणाला, ‘नुसता थुका आहे, आठवण होयील तसा. तिकडे?’ म्हणालो, ‘मुंबईला कधी आलाहेस का तुम्ही? असा पाऊस पाहिला नाहीसा कधी. असू द्या, नशीब असते एकाएकाचे. समुद्रावर कोसळून फायदा काय त्याचा?’ वरळीच्या विजय शेळकेला विचारले, ‘अजिबात नाही का? लवकर फोन केलायसा, कुठे हाय?’ झरे, घरनिकी, म्हसवड- कुठेच पाऊस नाही. करगणीचा लक्ष्मण छावणीवर निघालेला, वारे घोंगावत होते त्याच्या मोबाईलात. म्हणाला, ‘इथून पुढे तीन महिने हे असे नुस्तेच वारे मॉन्सूनचा पाऊस पडत नसतो इकडे. कधी येणार हायसा?’

बस झाली ही मुंबई... आजच हे शहर सोडून आपल्या देशाला निघायला हवे.

Tags: आनंद विंगकर कालचा पाऊस आमच्या भागात झालाच नाही.. Anand Wingkar there was no rain in our area .. Yesterday weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके