डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही कथा सारंगपूर या तालुक्याच्या स्थळाची आहे. हे सारंगपूर कोकणात आहे, मुंबई- गोवा महामार्गाजवळचे आहे- असे लेखक नलावडे सांगतात. हे सारंगपूरच्या तहसील कार्यालयाच्या सेटिंगवरचे आहे, असं म्हणतात. पण हे रांची, गुवाहटी, खुद्द दिल्ली- कुठलेही असू शकते. हे तहसीलऐवजी डिपार्टमेंट ऑफ पोलीस, कोळसाखाणी, विद्युत्‌ प्रकल्प, पुरवठा खात्याचेही चित्रण असू शकते. शहरांची, खात्यांची, राज्यांची, व्यक्तींची नावे बदलतील; पण त्याचा आत्मा तोच असेल. इन्फ्रास्ट्रक्चर, सांगाडा तोच असेल. 

लोकवाङ्‌मय गृहाने प्रकाशित केलेली ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. कादंबरीची निर्मितिमूल्ये उत्तम आहेत. विषय, आशय व अभिव्यक्ती या सर्व दृष्टीने ही महत्त्वाची कलाकृती आहे. मुखपृष्ठ अर्थपूर्ण आहे. झाडाला लागलेली कीड, निष्पर्ण-उद्‌ध्वस्त झालेले झाड आणि भ्रष्टाचार करून मिळविलेल्या धनातून निर्माण शेजारी उभा असलेला बंगला. मलपृष्ठावरचा ब्लर्ब लाजबाब आहे. हा ब्लर्ब म्हणजे ‘घागर मे सागर’ या वाणाचा आहे. भ्रष्टाचाराबद्दल तो एक दस्तऐवज आहे आणि लेखकाचे मूलगामी व मितमनोगत अतिशय विषादपूर्ण आहे. 

रेव्हेन्यू, पी.डब्ल्यू.डी., फॉरेस्ट सप्लाय, रेशनिंग, इलेक्ट्रिसिटी... ब्रिटिशांनी अशी खाती निर्माण करून सुसूत्र कारभाराची सनदी चौकट उत्तम उभारून या देशाचा कारभार सव्वाशे वर्षं केला आणि आज सरकारी खाती म्हणजे भ्रष्टाचाराची आतून-बाहेरून किडलेली राखीव कुरणे झाली आहेत. बखरगद्यात सांगायचे तर- ज्यास गर्दभ प्राप्त नव्हते, त्यास ऐरावत प्राप्त जाहला आहे. 

फॉर दॅट मॅटर, ही कथा कुठे घडते याला महत्त्व नाही; राज्य, नगर, प्रदेश, व्यक्तींची नावे याला अर्थ उरला नाही. हे सार्वत्रिक वर्तमानचित्रण आहे. मग राज्य बिहार असो, यूपी असो, महाराष्ट्र असो, कोणतेही असो- चित्र एकच... 

ही कथा सारंगपूर या तालुक्याच्या स्थळाची आहे. हे सारंगपूर कोकणात आहे, मुंबई- गोवा महामार्गाजवळचे आहे- असे लेखक नलावडे सांगतात. हे सारंगपूरच्या तहसील कार्यालयाच्या सेटिंगवरचे आहे, असं म्हणतात. पण हे रांची, गुवाहटी, खुद्द दिल्ली- कुठलेही असू शकते. हे तहसीलऐवजी डिपार्टमेंट ऑफ पोलीस, कोळसाखाणी, विद्युत्‌ प्रकल्प, पुरवठा खात्याचेही चित्रण असू शकते. शहरांची, खात्यांची, राज्यांची, व्यक्तींची नावे बदलतील; पण त्याचा आत्मा तोच असेल. इन्फ्रास्ट्रक्चर, सांगाडा तोच असेल. 

तर, सारंगपूरचे तहसील कार्यालय (पूर्वी याला मामलेदार ऑफिस म्हणत असतील)... या खात्याची घडण अशी : कलेक्टर- हाताखाली प्रांत (आताचा मंडल अधिकारी, दोन-तीन तहसील कार्यालयांचा हा वरिष्ठ)- मामलेदार- सर्कल ऑफिसर (चार-पाच तलाठ्यांचा इमिजिएट बॉस)- तलाठी (त्याची सत्ता म्हणजे बीट- यात तीन-चार गावे असतात)- पोलीस पाटील (गाव दफ्तर त्याच्याकडे. जन्म-मृत्यूची पहिली नोंद हा करतो.) तहसीलदार ऑफिसमध्ये भाऊसाहेब- ॲडमिनिस्ट्रेशन क्लार्क- इतर क्लार्क- ट्रेझरीचा स्टाफ- सप्लाय वगैरे काही खाती व त्यांचे प्रमुख- नाईक (हा क्लार्क लोकांचा वरिष्ठ). 

तर सारंगपूर तहसील कार्यालय. तीन दिवसांपूर्वी इथे बाजीराव डोईफोडे हे तहसीलदार म्हणून वर्ग होऊन आले आहेत. हे खात्यात कारकून म्हणून लागले होते. खाते-परीक्षा देऊन सेवाज्येष्ठतेनुसार हे अव्वल कारकून झाले. आता ते तहसीलदार म्हणून बढतीवर सारंगपूरला हजर झाले. त्यांच्या हाताखाली नायब तहसीलदार. या एमपीएससी परीक्षा ए ग्रेडमध्ये पास झाल्या. एक महिन्यापूर्वी त्या प्रोबेशनवर नायब तहसीलदार म्हणून नेमल्या गेल्या. (यापुढची त्यांची करिअर रेखलेली असेल. तहसीलदार काही दिवसांत प्रांत ऑफिसर- असिस्टंट कलेक्टर. मग थेट कलेक्टर म्हणून डोईफोडे यांसारखी जुनी खोडं एमपीएससी करून खात्यात आलेल्या लोकांवर जळत असतात.) 

डोईफोडे खालून वर आलेत. त्यामुळे प्रत्येक काम त्यांच्या हाताखालून गेलंय. प्रत्येक कामाचं माप म्हणजे लूपहोल्स त्यांना माहीत आहेत. अगदी कोणत्या वैध कामासाठीही किती चिरीमिरी सुटते, अवैध कामांसाठी घबाड कसं मिळतं, त्यात कोणाकोणाकडे किती प्रमाणात हिस्सा पोचवावा लागतो, एकूण चंदा किती गोळा होतो, त्यातला वर किती जातो, खाली किती उरतो वगैरे... ही शिडी सांभाळावी लागते. एकट्याने काही खायचं नाही. हे झाले आपल्या  डिपार्टमेंटमधले भागीदार. याव्यतिरिक्तही काही इतर कलमे असतात, तीही भागवावी लागतात. उदाहरणार्थ- त्या भागातला राजकीय प्रतिनिधी ऊर्फ आमदार. याची वैध-अवैध कामं करून याला खूश ठेवावं लागतं. काही उपद्रवमूल्य असलेले होतकरू व महत्त्वाकांक्षी ग्रामीण पुढारी असतात. त्यांची कामं करून द्यावी लागतात; नाही तर मोर्चे, घेराओ, वृत्तपत्रे व इतर माध्यमे यांच्याकडे पेरलेल्या बातम्या यांना तोंड द्यावं लागतं. खालच्यांना डोईजड होऊ द्यायचं नाही, वरच्यांना नाराज करायचं नाही आणि इतरांच्या डोळ्यांवर येईल असं खायचं नाही. अँटी-करप्शनचे कलम अधूनमधून भागवीत जायचं. या सगळ्यात डोईफोडे तयार आहेत. हे सारंगपूरला नव्याने आलेत. तहसीलदार म्हणून आलेत. म्हणजे इथे त्यांना परीक्षा घेऊन, हेरून काही खास आपली माणसं तयार करावी लागतील. इथले दर-दाम समजावून घ्यावे लागतील. जुनं सांभाळून काही नवं वळण आणावं लागेल. 

नलावडे यांनी या खात्यात तीन दशके नोकरी केली, त्यामुळे लोकांच्या जीवनाशी या खात्याचा किती निकटचा संबंध येतो याची त्यांना पूर्ण माहिती आहे. जन्माचा दाखला इथेच मिळू शकतो; कारण पोलीसपाटील जन्माच्या नोंदी घेतो, त्या महिनाभरानंतर इथे रजिस्टरमध्ये नोंदल्या जातात. वारसा आला की, तिथे मृत्यूच्या दाखल्याचा संबंध आला. इस्टेट म्हणजे जमिनीचे सातबाराचे उतारे तलाठ्यामार्फत मिळवायला हवेत. घर-जमिनी खरेदी करणं, विकणं म्हणजे सातबारा उतारा. कर्ज, गहाणवट व्यवहारात हा दाखला हवा. बिल्डर जमिनी खरेदी करतो. शेतजमीन घेऊन ती एन.ए. करून त्यात प्लॉट पाडायचे, तर या दाखल्यावाचून अडतं. कमर्शियल गॅस वापरून हॉटेल्स, खानावळी धंदा करीत नाहीत. ते वितरकांकडून खटपटी-लटपटी करून घरगुती गॅससिलिंडर मिळवतात. म्हणजे हे खातं वितरक व हे ग्राहक यांना पेचात घेतं. तहसीलदारसाहेब डोईफोडे या सगळ्या फटी जाणून आहेत. 

तालुकापातळीवर समाजात घडणाऱ्या घडामोडींचा कादंबरीत उत्तम वेध घेतला गेला आहे. हे तर आलंच- पण माहितीच्या रूपाने नलावडे माहिती देत नाहीत; ही माहिती कथानकाच्या रूपाने व्यक्तींच्या जीवनात घटना म्हणून येते. प्राणांतिक उपोषणाचा व उपोषणकर्त्याचा झालेला बट्‌ट्याबोळ, कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पाटर्या आणि प्रमाणाबाहेर मद्यपान झालं की विवेक गेल्यावर या व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडणारी रहस्ये, बाईबाजीचा नाद असलेला एखादा साहेब त्यासाठी विवेकहीन होऊन कसा आटापिटा करतो- असेही किस्से यात येतात. 

‘आपणासारखे करिती तात्काळ’ हे संतांचं, सज्जनांचं लक्षण आहे; पण दुर्दैवाने व्यसनी व भ्रष्ट लोकांच्या बाबतीतही ते खरं आहे. देशमुख मॅडम ही एका शिक्षकाची मुलगी. चांगल्या संस्कारांत वाढलेली, हुशार, अभ्यासू. या खात्यात काही उत्तम करून दाखवू शकेल, अशी. पण स्वत:चं वय विसरून डोईफोडे तिला पद्धतशीरपणे कसं बिघडवतात, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. नव्या रावसाहेबांचा क्रमाने होत गेलेला अध:पात, तलाठी संघटनेला विकत घेऊन लाच न देणाऱ्या तलाठ्यांना आर्थिक संकटात आणणे, त्यांची बिले अडवणे, त्यांची नावे वगळणे, लक्ष्मणवर काहीही वचक न ठेवता त्याच्याकडून आपला सूड उगवून घेणे, आमदारांच्या भावाची सत्तेची मग्रुरी व त्याने तालुक्यात चालवलेली सुलतानी यांची चित्रणे प्रत्ययकारक आहेत. 

आपल्या चेंबरमध्ये त्यांनी कन्या राजश्रीसमोर तिच्या प्रियकराची केलेली मानहानी हा प्रसंग किंवा पैशांवर अतिरिक्त प्रेम करणारा हा भ्रष्ट बाप मुलीचं तिच्या प्रियकरावर असलेलं प्रेम समजूच शकत नाही, ही वस्तुस्थिती. देशमुख मॅडमना झालेली उपरती किंवा रावसाहेबांची मुलगी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेल्यानंतर तिच्या आईचं बिघडलेलं मानसिक संतुलन... हे प्रसंग काय किंवा चाळकेशेठने डोईफोडे यांच्याविरुद्ध त्यांच्या भ्रष्टाचाराच्या व त्यांनी गोळा केलेल्या अमाप काळ्या पैशांच्या झालेल्या गवगव्याची नोंद घेऊन गृह मंत्रालयाने डोईफोडे यांच्याविरुद्ध सापळा रचणं आणि त्यात चाळकेने सामील होणं- या शेवटाकडे कादंबरी वेगाने सरकते. 

कार्यालयासमोर जनतेने केलेली निदर्शने, वृत्तपत्रात आलेले वृत्तांत, सारंगपुरात झालेली बदनामी, पोलीस कस्टडीत दोन दिवस काढण्याची त्यांच्यावर आलेली वेळ आणि यामुळे मुलानेही घर सोडणे- हा शेवट भाबड्या वाचकांना सुखावणारा आहे, एवढंच. हा भाग जरी मेलोड्रॅमॅटिक असला तरी त्यातून सकारात्मक मिळणारा संदेश आज हवाच आहे, हेही खरं आहे. प्रश्न एवढाच पडतो- हे भ्रष्टासुर एवढे माजेपर्यंत समाज गप्प का राहतो? यांना सहन का करतो? गृह मंत्रालय सूत्रं हलवायला एवढा उशीर का करतं? या विषयाला ही कादंबरी समर्थपणे वाचा फोडते आणि हे श्रेय कमी नाही.

कुरण - (कादंबरी) 
लेखक : रामचंद्र नलावडे 
लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन, मुंबई 
पृष्ठे : 260, 
किं. : 300 रु.  

Tags: सरकार प्रशासन लोकवाङ्मय गृह प्रकाशन रामचंद्र नलावडे अनंत मनोहर पुस्तक परिचय कुरण Sarkar Prashasan Lokvangmay gruh Prakashan Ramchandr Nalavade Anant Manohar Pustak Parichay Kuran weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके