डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विज्ञान चळवळीची ताकद, मर्यादा आणि भाबडा विज्ञानवाद

भारताच्या राज्यघटनेत 1976 मध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’चा समावेश करण्यामागे ही नेहरूप्रणीत समज होती. यामध्ये पुरोगामी विचाराचे शास्त्रज्ञ, विचारवंत, काही मार्क्सवादीही होते. पण त्यातही ही नेहरूवादी समज वेगळ्या भाषेत मांडली होती. भारतातील विज्ञान चळवळीचा, विज्ञान प्रबोधनाचा वैचारिक पाया हा आधुनिक पाश्चिमात्य जगातून आलेला रेनेसाँप्रणीत वैज्ञानिक दृष्टिकोन राहिलेला आहे. त्याला मानवतावादाची जोड देऊन जनवादी परिवर्तनाचे बरेच काम झाले आहे, अजून केले पाहिजे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनदिनाच्या निमित्ताने मांडणी करताना याचेही भान असावे की,  त्यापलीकडे जाऊन आर्थिक-सामाजिक प्रश्नांच्या चिकित्सेत उतरताना सर्जनशील मार्क्सवादी वैज्ञानिक चिकित्सापद्धतीचा उल्लेखही न करता फक्त रेनेसाँप्रणीत ‘वैज्ञानिक विचारपद्धती आणि दृष्टिकोना’च्या चौकटीत राहून शास्त्रीय उत्तरे मिळतील असे समजणे,  हा भाबडा विज्ञानवाद आहे.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने काढलेला 22 ऑगस्टचा साधनाचा विशेषांक उद्‌बोधक आहे. ‘विज्ञानाने मला व समाजाला काय दिले’ याबाबत महाराष्ट्रातील काही अग्रणी विज्ञानप्रबोधकांना ‘साधना’ने या निमित्ताने लिहिते केले, हे छान झाले. या अंकाच्या निमित्ताने विज्ञानाची, विज्ञानचळवळीची ताकद आणि मर्यादा थोडक्यात नोंदवायचा हा प्रयत्न.

या सर्व अंकात विज्ञान म्हणजे निसर्गविज्ञान असे गृहीत आहे. आपण शिकलेल्या (निसर्ग) विज्ञानाने आपल्याला काय ज्ञान व दृष्टी दिली आणि त्याचा स्वत:साठी, समाजहितासाठी आपण काय उपयोग करू शकलो, हे या निरनिराळ्या विज्ञानप्रबोधकांनी मांडले आहे. निसर्ग-विज्ञान (निसर्ग समजून घेण्याचे ज्ञान), तंत्रविज्ञान (निसर्गात बदल करण्याचे ज्ञान), वैज्ञानिक विचारपद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याला मानवतावादाची जोड देऊन किती व्यापक समाजहित साधता येते याचे उद्‌बोधक विवेचन या लेखांमध्ये आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे याचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. लोकविज्ञान-संघटना याच प्रकारचे काम करत होती, याचाही उल्लेख आला आहे. एकूण समाजपरिवर्तनात अशा प्रकारच्या कामाचे निर्विवादपणे  महत्त्वाचे स्थान आहे. अशा कामाला- विचारव्यूहाला खूप मर्यादा आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी युरोपात निसर्गविज्ञानाच्या विकासासोबत झालेल्या ‘रेनेसाँ’च्या म्हणजे प्रबोधनाच्या प्रक्रियेत जन्मलेली वैज्ञानिक विचारपद्धती आणि वैज्ञानिक दृष्टी यांचे नेमके स्वरूप काय आहे, हे पाहिले पाहिजे. 

रेनेसाँप्रणीत वैज्ञानिक विचारपद्धती आणि वैज्ञानिक दृष्टी

‘लोकविज्ञान चळवळ कशासाठी?’ या 1980 च्या लोकविज्ञान संघटनेच्या पुस्तिकेत हे थोडक्यात मांडले   आहे. आपल्याभोवती जे भौतिक जग आहे, ते निश्चित अशा वस्तुनिष्ठ नियमांनुसार चालते. प्रत्येक घटनेमागे एक भौतिक कारणपरंपरा असते. एक म्हणजे, या कारणपरंपरांचे व नियमांचे आकलन मानवाला होऊ शकते आणि वैज्ञानिक विचारपद्धती हाच असे आकलन घेण्याचा योग्य व सर्वोत्तम मार्ग आहे. विश्वव्यापारामागे काही तरी एक गूढ अतिभौतिक, दैवी शक्ती आहे असे न मानता किंवा ग्रंथप्रामाण्य वा व्यक्तिप्रामाण्य न मानता, या विचारपद्धतीतून मिळणारे ज्ञान हेच खरे व खात्रीलायक ज्ञान असते. दुसरे म्हणजे, या वैज्ञानिक शोधप्रक्रियेतून ताबडतोबीने सर्व उत्तरे मिळतीलच असे नाही. काही प्रश्न आज अनुत्तरित राहतील, काही उत्तरे ही अपुरी वा चुकीची होती, हे विज्ञान जास्त विकसित झाल्यानंतर विज्ञानाच्याच लक्षात येते. तरीही भौतिक जगाचे वास्तविक अस्तित्व, त्यांचे वस्तुनिष्ठ यथार्थ ज्ञान मिळवण्याचा वैज्ञानिक विचारपद्धती हाच एकमेव खात्रीलायक मार्ग आहे. वरील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, डोळस विश्वास आहे. एखाद्या ठोस वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे त्याचा खरे-खोटेपणा ताबडतोबीने तपासता येत नाही. पण आजवरच्या प्रदीर्घ मानवी इतिहासक्रमात त्याचा खरेपणा सिद्ध झालेला आहे. 

वैज्ञानिक चिकित्सापद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन याचा वापर इतिहासात ठिकठिकाणी शेकडो वर्षे होत आला आहे. त्याचा युरोपमध्ये भांडवलशाहीसोबत विकास-प्रसार होऊन तिथे त्याला 16 व्या शतकापासून अधिकाधिक मान्यता मिळू लागली. कोपर्निकस, ब्रुनो, गॅलिलिओ, आदींचे लढे, तसेच दैववादाच्या विरोधात युरोपात समाजसुधारकांनी-तत्त्ववेत्यांनी रेनेसाँच्या प्रक्रियेत विकसित केलेला, पसरवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन युरोपीय साम्राज्यशाहीसोबत जगभर पसरला. तीच गोष्ट विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद याबाबत आहे. आधुनिक पाश्चिमात्य जगातून आलेला हा ‘रेनेसाँप्रणीत वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा भारतातील विज्ञान चळवळींचा वैचारिक पाया काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहिलेला आहे.

या विज्ञानाने, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगाकडे- समाजाकडे पाहायची दृष्टी दिली, असे म्हणताना हे लक्षात घ्यायला हवे की- निसर्गातील घडामोडींकडे पाहायची दृष्टी यापुरतीच ही वैज्ञानिक दृष्टी असते. आपल्यासमोरील आर्थिक-सामाजिक घडामोडी, त्यातील महागाई, बेकारी, भाववाढ, पुरुषसत्ताक हिंसा यासारख्या प्रश्नांचे विश्लेषण करायला ही दृष्टी पुरेशी पडत नाही. त्यासाठी समाज-वैज्ञानिक विश्लेषणपद्धती, दृष्टी आवश्यक असते. समाज-विज्ञानाच्या विश्लेषणपद्धतीत निसर्गविज्ञानाला सामाईक अशा अनेक बाबी आहेत. तसेच काही वेगळी गृहीतकृत्ये आणि विश्लेषणपद्धतीही आहे. रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र या दोन शास्त्रांमध्ये जसा-जेवढा फरक आहे, तसाच-तेवढाच नाही तर अधिक मूलभूत प्रकारचा फरक आहे. तो असा :

निसर्गातील घडामोडी मानवी समाजातील सामाजिक हितसंबंधांवर अवलंबून नसल्याने निसर्गातील घडामोडींकडे आपण निरपेक्षपणे, तटस्थपणे पाहू शकतो. उदा. चंद्रावर कोणती मूलद्रव्ये आहेत किंवा क्लोरोफिलचे कार्य कसे चालते, याचा सामाजिक हितसंबंधांशी संबंध नसतो. त्यामुळे त्याबाबतची चिकित्सा शास्त्रज्ञ तटस्थपणे, निरपेक्षपणे करू शकतात. निसर्ग-वास्तव, त्याबाबतची कारणमीमांसा याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये असलेल्या मतभेदांचा, समाजातील हितसंबंधांचा सहसा जैवसंबंध नसतो. याला काही अपवाद आहेत. उदा. प्रतिगामी शक्ती डार्विनचा सिद्धांत नाकारतात. दुसरे उदाहरण म्हणजे, पृथ्वीचे आज वाढत चाललेले तापमान हे मानवी अधिक्षेपामुळे (नफाकेंद्री तसेच अनिर्बंध औद्योगिकीकरणवादी अर्थ-व्यवस्था) नसून पृथ्वीच्या लाखों-कोटी वर्षे चाललेल्या स्वयंभू निसर्गचक्राचा तो भाग आहे. ही मांडणी खनिज-ऊर्जा क्षेत्रातील भांडवलदारांच्या पथ्यावर पडते. मात्र सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे नैसर्गिक घडामोडींबाबतचे सत्य मांडायला विरोध करणाऱ्या युरोपमधील सरंजामी हितसंबंधांचा पाडाव झाल्यानंतर नैसर्गिक घडामोडींबाबतचे सत्य मांडणे याभोवती सहसा सामाजिक वर्गकलह माजलेला नाही. 

याउलट आर्थिक-समाजिक प्रश्नांबाबत (उदा.बेकारी, महागाई, भ्रष्टाचार इत्यादींवर उपाय) अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांच्यातील सर्व महत्त्वाचे वाद मात्र समाजातील कोणत्या ना कोणत्या सामाजिक स्तरांच्या हितसंबंधांशी ठोसपणे-जैवपणे जोडलेले असतात. एवढेच नव्हे तर- स्वत: त्या शास्त्रज्ञाची एकूण सामाजिक समज किंवा वर्ग/जात/लिंग/देश याचाही या शास्त्रज्ञाच्या विश्लेषणाशी संबंध असू शकतो. उदा.स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा अभ्यास करणारे पुरुष-संशोधक हे स्त्रियांच्या आरोग्याचा कोणता प्रश्न घेतात/घेत नाहीत, त्याकडे ते कोणत्या दृष्टीने बघतात, तो प्रश्न कसा अभ्यासतात, पुढे आलेल्या माहितीचा कसा अर्थ लावतात- यांवर ते पुरुष असण्याचा परिणाम होऊ शकतो. निसर्ग-विज्ञानाबाबत अपवाद वगळता असे नसते. निसर्ग-विज्ञानात शास्त्रज्ञाने निरपेक्ष-तटस्थ असणे ही शास्त्रीयतेची कसोटी असते, तर समाजविज्ञानात हे शक्य नसते. ‘बाजू घेणे’ हे रेनेसाँप्रणीत वैज्ञानिक दृष्टिकोनमध्ये अशास्त्रीय समजले जाते. पण वैज्ञानिक विचारपद्धतीत झालेल्या मार्क्सप्रणीत क्रांतीमुळे लक्षात आले की, सामाजिक संबंधांबाबत बाजू घेणे आणि शास्त्रीय असणे यात अंतर्विरोध असतोच असे नाही.

निसर्गविज्ञानात असणाऱ्या मतभेदांबाबत अधिक चर्चा, अधिक पुरावा या आधारे काही काळानंतर बहुसंख्य शास्त्रज्ञांमध्ये एकमत होते. शिल्लक राहिलेले मतभेद सहसा सामाजिक हितसंबंधांमुळे नसतात. तसे समाजशास्त्र, अर्थशास्त्र याबद्दल नसते. सामाजिक प्रश्नांबाबतचे निरनिराळे सिद्धांत, विश्लेषणे ही अटळपणे कोणत्या ना कोणत्या सामाजिक गटाचे-वर्गाचे हितसंबंध जोपासणारी असतात. उदा. जयंती घोष व रघुराम राजन हे दोघेही अव्वल अर्थशास्त्रज्ञ आहेत. पण भारतातील दारिद्य्र हटवण्यासाठी करायचे उपाय यांबाबत त्यांच्यातील मतभेद न मिटणारे आहेत. हे वैयक्तिक कारणामुळे नाहीत, तर वेगवेगळ्या सामाजिक शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांच्या भूमिका आहेत, म्हणून. दुसरे उदाहरण- पर्यावरणीय प्रश्न सोडवण्यासाठी बाजारपेठी मार्ग वापरले पाहिजेत असे मानणारे अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि याउलट आपली अर्थव्यवस्था बाजारपेठी नियमांनुसार चालवण्यामुळे पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत असे मानणारे समाजशास्त्रज्ञ यांच्यात एकमत कधीच होणार नाही. भांडवली अर्थविचार व मार्क्सवादी अर्थविचार हे दोन्ही शास्त्रीय विचार मानले जातात, पण त्यांच्यात अनेक गोष्टींबाबत एकमत होणे शक्य नसते. 

मार्क्सप्रणीत वैज्ञानिक विचारपद्धती, दृष्टिकोन

सामाजिक वास्तवाचे विश्लेषण करण्यासाठी वैज्ञानिक चिकित्सपद्धतीचा वापर करण्याचा पहिला पद्धतशीर, काटेकोर प्रयत्न मार्क्सने 19 व्या शतकाच्या मध्याला केला. असे करताना त्याने एक वैचारिक क्रांतीच केली. चिद्वादी व भौतिकवादी तत्त्वज्ञान यांच्यात शेकडो वर्षे चाललेला वाद, झगडा हा त्याने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राबाहेर काढला. समाजाची ऐतिहासिक, भौतिकवादी चिकित्सा त्याने मांडली आणि ही तत्त्वज्ञाने व त्यांच्यातील वाद सामाजिक संबंधांतील अंतर्विरोधातून कसे जन्मतात, कोणाच्या ना कोणाच्या हितसंबंधांचे कसे रक्षण करतात याकडे त्याने लक्ष वेधले. उदा. दैवी शक्ती, देव अस्तित्वात नाही याबाबतचे तत्त्वज्ञानात्मक युक्तिवाद किंवा शास्त्रीय पुरावे तो मांडत बसला नाही; तर देव-धर्म या कल्पना समाजविकासाच्या एका टप्प्यावर ज्यासाठी निर्माण झाल्या ती परिस्थिती दूर केली तर दैवी शक्ती, देव या कल्पनांचे राज्य विलयाला जाईल, हे त्याने मांडले. अशा प्रकारे विज्ञान आणि तत्त्वज्ञान या समांतर जाणाऱ्या विश्लेषण-पद्धतींमधील द्वैत ओलांडून त्याने इतिहासाची द्वंद्वात्मक भौतिकवादी चिकित्सा या शास्त्रीय सिद्धांतात विलीन केली. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर या वादांचे तत्त्वज्ञानात्मक चर्चा हे स्वरूप मार्क्सने बदलले आणि सामाजिक संबंधांची चिकित्सा व हे संबंध बदलण्याचा मार्ग हा चर्चेचा आखाडा केला. ही epistemological, ontological revolution (ज्ञानशास्त्र-सत्‌संबंधीशास्त्रामधील क्रांती) होती.

मार्क्सने वैज्ञानिक चिकित्सपद्धतीचे क्षेत्र विस्तारले, आर्थिक-सामाजिक वास्तव विज्ञानाच्या कक्षेत आणले. त्या काळातील अर्थशास्त्र (उदा. स्मिथ-रिकारर्डो), तत्त्वज्ञान (उदा. हेगेल), विचारसरणी (उदा. फ्रेंच-प्रवाह) यांचा प्रवास समांतर रेषेत चालला होता. या तिन्ही प्रवाहांच्या पलीकडे जाऊन केवळ वैचारिक क्षेत्रातील घुसळण/वाद-विवाद हे त्यांचे स्वरूप मार्क्सने बदलले. माणसाचा इतिहास, त्याचे भौतिक वास्तव हे केंद्रस्थानी ठेवणाऱ्या ‘इतिहासाचे किंवा मानवाचे विज्ञान’ असे नवे सिद्धांतन उभारले. (स्टॅलिनप्रणीत वा माओप्रणीत राजवटीत सैद्धांतिक भ्रष्टीकरण झाले. त्यातून मार्क्सवादाच्या नावाखाली एक सर्वंकष, थिजलेले तत्त्वज्ञान मांडले गेले. मार्क्सविचारात तत्त्वज्ञानात्मक पैलू असला तरी ते तत्त्वज्ञान नाहीये, हे लक्षात घेऊन मूळ मार्क्सविचारातील शास्त्रीय प्रेरणा अंगीकारून निरनिराळ्या मार्क्सवाद्यांनी मार्क्सवादाचा सर्जनशील विस्तार केलेला आहे. उदा. जातीय, पितृसत्ताक इ. बिनवर्गीय उतरंडी, पर्यावरणीय विनाश यांचाही आपल्या सिद्धांतनात समावेश केला आहे.) 

हे सर्व लक्षात न घेता, आर्थिक-सामाजिक प्रश्नांचेही शास्त्रीय विश्लेषण करू असे म्हणायचे; निसर्गविज्ञान आणि समाजविज्ञान यातील सामाइकतेसोबत त्यातील मूलभूत फरक लक्षात घ्यायचे नाहीत; मार्क्सने मांडलेली विशिष्ट शास्त्रीय चिकित्सापद्धत, त्यातील विशिष्ट वैज्ञानिक गृहीतकृत्ये, विश्लेषणपद्धती, त्यांचा झालेला विकास हे सर्व बाजूला ठेवून समाजाचे शास्त्रीय विश्लेषण करू बघायचे- हा एक प्रकारचा भाबडा विज्ञानवाद होईल.

वर म्हटल्याप्रमाणे रेनेसाँप्रणीत ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’ला जनहितवादी भूमिकेची जोड देऊन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञान चळवळ यांचे बहुमोल काम निरनिराळ्या संघटना व व्यक्ती यानी केले. नैसर्गिक घडामोडींचे स्पष्टीकरण करताना अतिभौतिकशक्तीचा आधार घेणाऱ्यांना विरोध करणे, देवा-धर्माच्या नावाने जादूटोणा किंवा ‘चमत्कार’ करून केल्या जाणाऱ्या फसवणुकीला किंवा निरर्थक कर्मकांडांना विरोध करणे इत्यादी गोष्टी डॉ.दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली अंनिस करत होती, आजही करत आहे. सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत (दुष्काळ, आरोग्यसेवेची वानवा, अणुयुद्धाचा धोका, पर्यावरण विनाश इ.) वैज्ञानिक जागृती करणे, त्यातील तंत्रवैज्ञानिक पैलूंचा उलगडा करणे व आधुनिक तंत्र-विज्ञानाचा मानवाच्या भल्यासाठी उपयोग करण्यासाठी आग्रह धरणे, हे लोकविज्ञान चळवळीचे काम निरनिराळ्या संघटना-व्यक्ती यांनी केले, करत आहेत. हे सर्व खूप महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धाविरोध, ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा पुरस्कार हे सर्व काम आज तर विशेष महत्त्वाचे आहे, कारण संघप्रणीत शक्ती सरकारी आशीर्वादाने अंधश्रद्धा, दैववाद इत्यादी गोष्टी जोरात पसरवीत आहेत. या कामाच्या व त्यामागील आधारभूत संकल्पनांच्या मर्यादा याचीही स्पष्ट कल्पना हवी. वाढत्या बेकारीसारखे कळीचे आर्थिक-सामाजिक प्रश्न हे ‘विज्ञान-चळवळी’चे कार्यक्षेत्र नाही, विज्ञान-चळवळीतर्फे पसरवला जाणारा रेनेसाँप्रणीत (निसर्ग) वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी पुरा पडणारा नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोनाची नेहरूप्रणीत मांडणी   

वर उल्लेखिलेल्या भाबड्या विज्ञानवादाची सुरुवात भारतात पंडित नेहरूंनी केली. भारतापुढे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, हे मांडताना "Discovery of india' (1945) मध्ये पंडित नेहरूंनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा पुरस्कार केला होता. ते म्हणतात - What is needed is the scientific approach, the adventurous and yet critical temper of science, the search for truth and new knowledge, the refusal to accept anything without testing and trial, the capacity to change previous conclusions in the face of new evidence, the reliance on observed fact and not on pre-conceived theory, the hard discipline of the mind- all this is necessary, not merely for the application of science but for life itself and the solution of its many problems. ही भूमिका अर्थातच स्वागतार्ह होती. पण त्यात एक घोळ होता. निसर्गातील घडामोडींकडे भौतिकवादी-वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, एवढाच अर्थ त्यात अभिप्रेत नाही. भारतीय समाजापुढील प्रश्न सोडवण्यासाठी कोणती दृष्टी अंगीकारली आहे, हेही अभिप्रेत असताना मार्क्सनंतर 100 वर्षांनी मार्क्सचा उल्लेखही नेहरू करत नाहीत! वर्गीय अंतर्विरोध, ऐतिहासिक दृष्टिकोन हे मार्क्सच्या समाजशास्त्रीय विश्लेषण-पद्धतीचा कळीचा भाग होते. पण साम्राज्यवादी, भांडवली हितसंबंध आणि भारतातील जनतेचा विकास यातील अंतर्विरोध नेहरूंच्या ‘आधुनिक विकासवादी, विज्ञानवादी’ भूमिकेत नजरेआड झाले; कारण ते पुरोगामी, भांडवली विकासाचे प्रणेते व वैचारिक-राजकीय नेते होते.

भारताच्या राज्यघटनेत 1976 मध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’चा समावेश करण्यामागे ही नेहरूप्रणीत समज होती.  नंतर 1981 मध्ये "Scientific Temper Statement' बनवण्यामध्ये अनेक पुरोगामी विचाराचे शास्त्रज्ञ, विचारवंत, काही मार्क्सवादीही होते. पण त्यातही ही नेहरूवादी समज वेगळ्या भाषेत मांडली होती. त्यामध्ये सामाजिक संबंधांमधील अंतर्विरोध, त्याची ऐतिहासिकता या मार्क्सवादी संकल्पनांचा समावेश न करता भारतातील प्रश्न सोडवण्याचा संकल्प मांडला होता. हा एक प्रकारचा भाबडा विज्ञानवाद होता. 

सारांश सांगायचा तर- भारतातील विज्ञान-चळवळीचा, विज्ञानप्रबोधनाचा वैचारिक पाया हा आधुनिक पाश्चिमात्य जगातून आलेला रेनेसाँप्रणीत वैज्ञानिक दृष्टिकोन राहिलेला आहे. त्याला मानवतावादाची जोड देऊन बरेच जनवादी परिवर्तनाचे काम झाले आहे, अजूनही केले पाहिजे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनदिनाच्या निमित्ताने मांडणी करताना याचेही भान असावे की- त्यापलीकडे जाऊन आर्थिक-सामाजिक प्रश्नांच्या चिकित्सेत उतरताना सर्जनशील मार्क्सवादी वैज्ञानिक चिकित्सापद्धतीचा उल्लेखही न करता फक्त रेनेसाँप्रणीत ‘वैज्ञानिक विचारपद्धती आणि दृष्टिकोना’च्या चौकटीत राहून शास्त्रीय उत्तरे मिळतील असे समजणे, हा भाबडा विज्ञानवाद आहे.

Tags: लोकविज्ञान चळवळ समाजपरिवर्तन भाबडा विज्ञानवाद नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकविज्ञान-संघटना तंत्रविज्ञान निसर्गविज्ञान विज्ञान वैज्ञानिक दृष्टीकोन विज्ञान चळवळ अनंत फडके weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनंत फडके
anant.phadake@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके