डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

के. आर. दातेप्रणित पर्यायी हरितक्रांतीचा मार्ग

'पर्यायी हरितक्रांती'त शाश्वत समृद्धीसाठी केवळ निसर्गसंपत्तीच्या सुयोग्य वापराचा विचार नाही. पारंपरिक शेतीज्ञान व पारंपरिक कारागिरी याला आधुनिक विज्ञानाची जोड देत या मनुष्यबळाला सामावून घेत भूमिहीनांसह सर्व शेतकऱ्यांना समान पाणी मिळण्यातून समतेकडे वाटचाल होण्याची दिशाही त्यात आहे. पर्यायी हरित क्रांतीकडे वाटचाल करायची तर त्याचे आर्थिक गणितही बसले पाहिजे. त्यासाठी दाते व सहकारी यांनी सूत्र मांडले आहे की किमान आवश्यक उत्पादनासाठी लागणारे भांडवल सवलतीच्या दरात म्हणजे सुरुवातीला ५% व्याजाने द्यायचे; किंवा देखभालीचा खर्च लागेल अशा प्रकारे शुल्क आकारायचे तर किमान उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्यांना बाजारभावाने दर आकारायचे.

आज ज्या पद्धतीने 'विकास' केला जात आहे, त्याची पद्धतच अशी आहे की, तो समाजातील सर्व लोकांच्या मानवी गरजा पुरवू शकत नाही. याचे एक कारण म्हणजे विकासाचा आराखडाच भांडवली नफ्याच्या प्रेरणेवर आधारलेला असल्याने तो विषमता वाढवत पुढे जातो. 

यासोबत दुसरे कारणही महत्त्वाचे आहे. ते म्हणजे या विकासासाठी निसर्ग संपत्तीचा वापर ज्या पद्धतीने होतो ती पद्धतच अतिशय अकार्यक्षम व उधळपट्टीवर आधारलेली आहे. त्यामुळे सध्याची पद्धत चालू ठेवली तर हा विकास सर्वांपर्यंत पोचायला आवश्यक तेवढी निसर्गसंपत्ती उपलब्धच नाही. उदाहरणार्थ आज अमेरिका दरडोई भारताच्या २५ पट ऊर्जा वापरते! अमेरिकेत जगातील ६% लोकसंख्या राहते, पण जगातील पेट्रोल वापरात अमेरिकेचा वाटा ४०% आहे! अमेरिकेच्या निम्मी ऊर्जा वापरायची ठरवली तरी भारताला त्यासाठी लागणारी ऊर्जा उपलब्धच होणार नाही. या ऊर्जा-तुटवड्यावर अणुऊर्जा हेही उत्तर नाही. त्यामुळे आधुनिकीकरणासाठी पाश्चात्त्य देशांपेक्षा वेगळी पद्धत भारतात वापरली तरच भारतातील सर्व जनतेला या आधुनिकीकरणात सामील होता येईल. 

ही पद्धत कोणती असावी याची शास्त्रीय मांडणी द्रष्टे आणि वैज्ञानिक के. आर. दाते व त्यांचे साथीदार यांनी केली आहे. श्री. अ. दाभोळकरांच्या प्रयोग परिवारासकट जगभर ठिकठिकाणी शेती व औद्योगिक विकास यावर बरेच चांगले काम झाले आहे. त्या सर्वांची सांगड घालून के.आर.दातेंनी कृषि-औद्योगिक विकेंद्रित विकासाचा एक मार्ग सांगितला आहे. त्याला थोडक्यात पर्यायी हरितक्रांतीचा मार्ग म्हणता येईल, कारण त्यात वनस्पतीजन्य जैवभार (बायोमास)ला कळीचे स्थान आहे. 

या पर्यायी हरित क्रांतीकडे महाराष्ट्रातील, भारतातील अनेक कार्यकर्ते, अभ्यासक, तंत्रज्ञ आकर्षित झाले आहेत. केआरडी'चे मोल जाणणारे, त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी व चाहते यांनी मुंबईत मार्चमध्ये दातेंचा एक सत्कारसमारंभ आयोजित केला होता. 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मधील या अतिशय हृद्य सत्कार सोहळ्यात भारतभरच्या निरनिराळ्या तज्ज्ञांनी दातेंचे योगदान, त्यांचा अपरिमित अखंड उत्साह, त्यांच्याबरोबर काम करण्याचे अनुभव मांडले. तसेच अतुल पेठे प्रॉडक्शन्सनिर्मित के.आर.दाते-ऊर्जेच्या शोधवाटा' या चित्रफितीचा 'प्रिमिअर शो' झाला. या सर्व कार्यक्रमातून दातेंच्या विचारव्यूहाचा आवाका एकत्रितपणे उभा राहिला. 

या सर्वांगीण विकास विचाराची थोडक्यात ओळख करून घेऊ या! सुहास परांजपे व के.जे.जॉय यांनी दातेंची मांडणी 'बँकिंग ऑन बायोमास' या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. तसेच दातेंच्या सत्कार सोहळ्यानिमित्त लिहिलेल्या निरनिराळ्या पेपर्समध्येही ती थोडक्यात दिली आहे.

ऊर्जा-समस्येवर मात करण्याचा मार्ग 

आधुनिक विकासामध्ये ऊर्जेला कळीचे स्थान आहे. विकासकामामध्ये ४०% काम हे कुठल्या ना कुठल्या बांधकामाच्या रूपात होते. सध्या त्यासाठी खनिज पदार्थ (उदा. लोखंड) व खनिज ऊर्जा तेल, कोळसा इ. यांचा मुख्यतः आधार घेतला जातो व या खनिज कोळसा, तेल यांचे आर्थिकदृष्ट्या परवडणारे साठे २५-५० वर्षांत संपणार आहेत. बांधकामासाठी लागणारे पोलाद, सिमेंट तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. 

या खनिज व उर्जाघन पोलादाऐवजी प्रक्रिया केलेले बांबू व कमी व्यासाची लाकडे यांचा बऱ्याच ठिकाणी वापर करता येतो. रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे हे लाकूड कुजत नाही. बांबू व असे लाकूड यांचे वैशिष्ट्य म्हणजे पोलादाची जागा अनेक बाबतीत ते घेऊ शकते व त्यामुळे खनिज ऊर्जेची प्रचंड बचत होते. कारण एक किलो पोलाद बनवण्यासाठी जेवढी खनिज ऊर्जा लागते, त्याच्या एक तृतीयांश ऊर्जा (उपयुक्तता तेवढीच असूनसुद्धा) एक किलो प्रक्रिया केलेला बांबू बनवायला लागते. दाते-प्रणित बांधकाम पद्धतीमुळे बांधकामातील लोखंडाचे प्रमाण खूप कमी होते. घरे, ऑफिसेस, पाणी अडवण्यासाठी बंधारे एवढेच नव्हे तर रस्ताबांधणीसाठीही बांबूचा/लाकडाचा वापर करता येतो हे वर निर्देशिलेल्या चित्रफितीमध्ये पहायला मिळते.

सिमेंट बनवायलाही प्रचंड ऊर्जा लागते. ती वाचवण्यासाठी एकतर बीमस् व कॉलम्समध्ये (त्यांच्या डिझाईनमध्ये) सुधारणा करून सिमेंटचा अनावश्यक वापर कमी करता येतो. तसेच औष्णिक वीजकेंद्रात तयार होणारी व वाया जाणारी दगडी कोळशाची राख (फ्लाय अँश) तसेच स्लॅग यांचा वापर करून सिमेंटची मोठ्या प्रमाणावर बचत करता येते. खनिज तेलापासून बनवलेले प्लॅस्टिक, पॉलिमर यांचा वापर खूप वाढला आहे. हे ऊर्जाघन पदार्थ कायमस्वरूपी मिळणार नसल्याने त्यांच्याऐवजी वनस्पतीजन्य पदार्थ वापरावे लागतील व हे सहज शक्य आहे असे दाते त्याबाबतच्या संशोधनाचा दाखला देऊन दाखवून देतात. 

खनिज तेलापासून बनवलेली ऊर्जा घन रसायने मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये वापरली जातात. रसायनशास्त्राच्या तंत्रविज्ञानात प्रगती झाल्याने त्यांची जागा वनस्पतीजन्य रसायने घेऊ शकतात. थोडक्यात, कारखान्यांमध्ये आज वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कच्च्या खनिज मालाची जागा वनस्पतीजन्य पदार्थ घेतील. त्यामुळे तेच उत्पादन करण्यासाठी खूप कमी ऊर्जा लागेल व खनिज पदार्थांवरील अवलंबित्वही कमी होईल. फोटो-सिंथेसिसमार्फत सूर्यऊर्जा वनस्पतींमध्ये पकडली जाते. त्यांचा वापर करून बांधकाम वा इतर उद्योगात लागणारा कच्चा माल बनवण्यासाठी सूर्यऊर्जेचा अप्रत्यक्ष वापर करण्याचे धोरण पर्यायी हरित-क्रांतीत अपेक्षित आहे.

सूर्यऊर्जेच्या अप्रत्यक्ष वापराबरोबर त्याच्या थेट वापराबाबतही दाते अभिनव कल्पना मांडतात. सोलर पॅनेलमधील फोटो-होल्टाइक सेलचा वापर करून वीज निर्माण करायची तर सध्या त्याचा खर्च युनिटमागे १२ रुपये म्हणजे फार जास्त येतो. त्याऐवजी तेवढीच म्हणजे १००० किलो कॅलरी एवढीच सूर्यऊर्जा १.५ रुपयातही मिळवता येते. त्यासाठी सूर्यकिरण परावर्तीत करून त्या उष्णतेपासून पाणी किंवा तेल गरम करायचे व ते कारखान्यात उष्णतेचा स्रोत म्हणून वापरायचे हा अधिक कार्यक्षम थेट मार्ग वापरायला हवा. भुसावळचे इंजिनियर श्री.अष्टुणकर व स्मृतीगत रमेश बोरोले यांनी दातेंच्या मार्गदर्शनाखाली फ्रेनेल भिंगाच्या रचनेसारखी रचना असणारा अभिनव प्रकारचा सौर परावर्तक बसवून त्यापासून तेल गरम बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. सूर्य जसा कलेल तसा हा परावर्तक आपला कल आपोआप बदलत राहतो व त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने सूर्यऊर्जेचा वापर होतो. हा परावर्तक पूर्वीपेक्षा खूप कमी खर्चात गावातील सध्याचे कारागीर बनवू शकतात, हा दात्यांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दावा आहे. 

आधुनिकीकरण म्हणजे आहे त्या कारागिरांना बेकार करणे ही सध्याची पद्धती आहे. ती बदलणारी विकासपद्धती अवलंबिली पाहिजे हे तत्त्व मांडून प्रत्यक्षात आणले गेले आहे हे इथे दिसते. हे सूर्य-परावर्तक ज्या चौकटीवर बसवले जातात ती चौकट, सांगाडा हा स्टीलऐवजी बराचसा लाकडू/बांबूचा बनवता येतो व असे लाखो सूर्य-परावर्तक भारतभर वापरता येतील.

वनस्पतीजन्य 'बायो-फ्युएल अतिरेकी व चुकीच्या पद्धतीने वापर करायची प्रवृत्ती सध्याच्या भांडवली विकासात आहे. पण बायो-फ्युएलची योग्य प्रकारे निर्मिती केली व सुयोग्य वापर केला तर खनिज ऊर्जेला पर्याय असणाऱ्या चिरंजीवी ऊर्जास्रोतांपैकी बायो-फ्युएल हा एक स्रोत असेल असे निश्चित म्हणता येते. याकडे दाते लक्ष वेधतात. सूर्य-ऊर्जेचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर वाढवत नेला व पवन ऊर्जा, जलविद्युत अशा इतर चिरंजीवी ऊर्जास्रोतांचीही क्षमता पूर्ण वापरली तर एकूण ऊर्जेपैकी खनिजऊर्जेचे प्रमाण २५% पर्यंत उतरवता येईल; असे गणित दाते मांडतात. सध्या ते ७५% आहे.

इथे एक लक्षात घ्यायला हवे की भारतात आज आपण दरडोई वर्षाला फक्त ५० किलो कोळशाएवढी खनिज ऊर्जा वापरतो. आधुनिक जीवन जगण्यासाठी दरडोई ४०० किलो कोळसा ऊर्जेपासून आज जेवढे राहणीमान कमावता येते तेवढे राहणीमान कमवायचे ध्येय ठेवायला हवे, पण आज आपण अत्यंत सदोष व अकार्यक्षम पद्धतीने ऊर्जा कमावतो व वापरतो. या मार्गाने पुढे गेल्यास सर्व जनतेला आधुनिक जीवन जगता येण्यासाठी आवश्यक एवढी ऊर्जा मिळवता येणार नाही. त्यामुळे दातेंनी व इतर तज्ज्ञांनी मांडलेल्या पद्धतीने ऊर्जास्रोतांचा विकास व ऊर्जेचा वापर केला तर ४०० किलो कोळसा दरडोई दरवर्षी वापरून जेवढे राहणीमान आज कमावता येते तेवढे राहणीमान यापेक्षा कितीतर कमी ऊर्जा वापरून गाठता येईल. उदाहरणार्थ बांधकामासाठी लागणाऱ्या ऊर्जेत ७५% बचत करता येईल.

पुनर्जिवी शेती

विकेंद्रित, चिरंजीवी, कृषि-औद्योगिक विकासाचा मार्ग शास्त्रीय पद्धतीने मांडताना दातेंचा भर सूर्यापासून मिळणारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ऊर्जा आणि वनस्पतीजन्य उत्पादन (बायोमास) यावर आहे. एवढा बायोमास कोण व कसा निर्माण करणार, याचेही गणित पर्यायी हरितक्रांतीच्या संकल्पनेत मांडले गेले आहे. ते समजावून घेण्यासाठी 'पुनर्जिवी शेती' (रिजनरेटिव्ह शेतीची कल्पना लक्षात घ्यावी लागेल. खते, कीटकनाशके इत्यादी बाह्य वस्तूंची मदत न घेता जमिनीची जी उत्पादकता असते ती प्राथमिक उत्पादकता. ही प्राथमिक उत्पादकता वाढवत न्यायची हे पायाभूत धोरण दाते मांडतात. 

श्री.अ.दाभोलकरांसकट अनेकांनी ही प्राथमिक उत्पादकता वाढवण्याचे निरनिराळे यशस्वी प्रयोग केले आहेत व त्यामागचे शास्त्रही सांगितले आहे. त्याचा वापर करायचा तर मर्यादित पण हुकमी पाण्याचा पुरवठा हवा. तो मिळाला तर आपल्या पारंपरिक शेतीज्ञानाला आधुनिक शेतीविज्ञानाची जोड देऊन सामान्य शेतकरी इतर बाह्य संसाधने खर्च न करता जमिनीची उत्पादकता दुप्पट-तिप्पट करतो असा अनुभव आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे गणित थोडक्यात पाहू या.

पाण्याचे गणित:

शेतीची गरज असेल त्याप्रमाणे हुकमी पाणी मिळाले तर दर १० घनमीटर (दर हेक्टर मि.मिटर) पाण्यामागे ३० किलो शेती-उत्पादन निश्चित मिळू शकते. म्हणजे ३ एकराच्या शेतीतून ६००० घनमीटर पाण्यापासून शेतकरी कुटुंब १८ टन शेतउत्पादन मिळवू शकते. (शेतमालाचे हे आकडे वाळलेले शेतमाल उत्पादन' या रूपात मोजतात. हा वाळलेला शेतमाल गवत, धान्य, फळे, लाकडू इत्याद्दीपैकी काहीही किंवा त्यांचे मिश्रण असू शकते. पैकी ६ टनाचा बायोमास परत जमिनीत गाडून जमिनीचा पोत राखण्यासाठी, वाढवण्यासाठी लाकूड वापरायचा; २ टन जळण, २ टन बैलजोडीसाठी चारा, २ टन अन्नधान्य तर ३ टन बाजारात विकण्यासाठी वरकड. हे वरकड वेगवेगळ्या रूपात असू शकते- वुडगॅसिफायरमध्ये जाळून वीज बनवण्यासाठी किंवा कृषिऔद्योगिक विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल या स्वरूपात किंवा बांधकाम उद्योगासाठी लाकडू म्हणून किंवा फळे, भाजीपाला या स्वरूपात हे वरकड विकता येईल. थोडक्यात, चांगला बाजारभाव मिळणारे व आधुनिक जीवनप्रणालीशी सुसंगत असे हे वरकड असेल. जमिनीचा पोत सुधारेपर्यंत काही काळ कृत्रिम खतांचा वापर काही ठिकाणी करावा लागेल, पण काही वर्षांमध्येच ही शेती बहुतांश स्वावलंबी होईल.

पाण्याचे गणित

हे हुकमी पाणी कसे पुरवणार? त्यासाठी स्थानिक तळी, विहिरी याचे महत्त्व आहे. स्थानिक पाणीसाठे तयार करायचे व पाणी उपलब्ध असताना (पावसाळा, कॅनॉलची पाण्याची पाळी) भरून घ्यायचे. नंतर शेतीच्या गरजेप्रमाणे जेव्हा जसे लागेल तसे हे पाणी वापरायचे. त्यासाठी जमिनीखालचे व वरचे पाणी. या दोघांचे एकत्रित नियोजन करण्यावर दाते भर देतात. 

यासाठी किती पाणी लागेल? संशोधनातून दिसते की १८ टन बायोमास उत्पादनासाठी एकूण ६००० घनमीटर पाणी लागते. यात रोपे, पावसाचे पाणी थेट वापरतात ते पाणी, यासोबत जमिनीतील ओलावा व वरून दिले जाणारे पाणी या तिघांचा समावेश आहे. शिवाय घरगुती वापरासाठी रोज ५०० लिटर व तेवढेच जनावरांसाठी असे मिळून एकूण वर्षाला ४०० घनमीटर पाणी लागेल. ते धरून वर्षाला ६४०० घनमीटर पाणी पाच जणांच्या कुटुंबाला लागते. हे पाणी स्थानिक पाणलोट क्षेत्र विकासातून मुख्यत: मिळवायला हवे.

महाराष्ट्रात अवर्षण भागात हे कसे साधायचे? तिथे फक्त ३०० ते ५०० मि.मी. पाऊस पडतो. ८०% विश्वासार्हतेचा, म्हणजे ५ पैकी ४ वर्षे नक्की पडणारा पाऊस या भागात ३०० मि.मि.च आहे. अशा भागात कितीही पाणलोट क्षेत्र विकास केला तरी या भागातील लोकसंख्येची घनता, जमिनीचे स्वरूप, ढाळ इत्यादी लक्षात घेता दर कुटुंबामागे वर्षाला सुमारे ४००० घनमीटरपर्यंत पाणी त्यातून मिळू शकते. दर कुटुंबामागे १५०० ते २५०० घनमीटरची म्हणजे एकूण गरजेच्या २५ ते ३०% तूट भागवण्यासाठी जवळच्या धरणातून पाणी देण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतावर २२०० घनमीटर पाणी मिळायचे तर धरणातून कुटुंबामागे ३००० घनमीटर पाणी सोडायला हवे, कारण वाटेत झिरपा गळती, बाष्पीभवन मधून ८०० घनमीटर गळती होते. 

अवर्षणप्रवण भागात दर कुटुंबामागे दरवर्षी धरणातून ३००० घनमीटर पाणी प्रत्येक कुटुंबाला द्यायचे तर तेवढे पाणी धरणांमध्ये आहे का? डॉ. भारत पाटणकरांनी गणित मांडले आहे की, आज कृष्णा-खोऱ्यातील धरणांमधले पाणी तेथील जनतेला समन्यायी पद्धतीने वाटले तर ते या कामासाठी पुरेसे आहे. 

धरणांकडे पाहण्याच्या दात्यांच्या वेगळ्या दृष्टिकोणाचा इथे उल्लेख करायला हवा. अवर्षणग्रस्त भागात 'बाहेरून' धरणाचे पाणी द्यावे लागेल व त्यासाठी सुयोग्य जागेवरची व विस्थापनाचा प्रश्न किमानपक्षी ठेवणाऱ्या उंचीची धरणे आवश्यक आहेत हे ते मानतात. पण या धरणांमध्ये वर्षभर पाणी साठवण्यापेक्षा स्थानिक पाणीसाठ्यांमध्ये भरून घेण्यासाठी ते वापरायचे यावर त्यांचा जोर आहे. म्हणजे शेतीच्या गरजेप्रमाणे पाणी वेळोवेळी हुकमीपणे, विकेंद्रित पद्धतीने वापरता येईल. धरणाच्या पाण्याचा वापर स्थानिक पाणलोट क्षेत्र विकासाला पर्याय म्हणून नव्हे तर त्याला पूरक म्हणून वापरायला हवा. केंद्रीय पद्धतीने पाणी सोडून त्याच्या वेळापत्रकावर शेतकऱ्यांनी अवलंबून राहायचे ही पद्धत नाकारली पाहिजे हे या धोरणात अभिप्रेत आहे. 

समन्यायी पद्धतीने पाणी वाटायचे तर ते अनेक ठिकाणी उचलून द्यावे लागेल. समतेसाठी अशी जादा ऊर्जा खर्च करावी लागेल. हे परवडेल का? दाते व त्यांचे सहकारी यांनी गणित मांडले आहे की हुकमी पाण्यामुळे जे वाढीव उत्पन्न मिळेल, त्यातून शेतकरी पाणी उचलण्यासाठीच्या वीजेचे बील भरू शकतील. तसेच दर कुटुंब वर्षाला जो ३ टन वरकड जैवभार पिकवेल, त्यातील काही भाग प्रक्रिया केलेले कमी व्यासाचे लाकूड या स्वरूपात बेतला तर बांधकामात हे लाकूड स्टीलऐवजी वापरून जी ऊर्जा वाचेल ती पाणी उचलण्यासाठी लागणारी ऊर्जाची भरपाई करेल.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की केवळ ऊर्जा समस्येच्या सोडवणुकीसाठी एक मार्ग दातेंनी मांडला आहे असे नाही. चिरंजीवी, समतावादी विकासासाठी निसर्गसंपत्तीचा वापर कसा करायचा हे ते सांगतात. त्यासाठी पाण्याचा वापर, धरणांचा उपयोग, शेतीची पद्धत, औद्योगिकीकरणाची रीत याबद्दल एकात्मिक कार्यक्रम या 'पर्यायी हरित-क्रांती' सामावलेला आहे.

'पर्यायी हरितक्रांती'त शाश्वत समृद्धीसाठी केवळ निसर्गसंपत्तीच्या सुयोग्य वापराचा विचार नाही. पारंपरिक शेती ज्ञान व पारंपरिक कारागिरी याला आधुनिक विज्ञानाची जोड देत या मनुष्यबळाला सामावून घेत भूमिहीनांसह सर्व शेतकऱ्यांना समान पाणी मिळण्यातून समतेकडे वाटचाल होण्याची दिशाही त्यात आहे. पर्यायी हरित-क्रांतीकडे वाटचाल करायची तर त्याचे आर्थिक गणितही बसले पाहिजे. त्यासाठी दाते व सहकारी यांनी सूत्र मांडले आहे की किमान आवश्यक उत्पादनासाठी लागणारे भांडवल सवलतीच्या दरात म्हणजे सुरुवातीला ५% व्याजाने द्यायचे; किंवा देखभालीचा खर्च लागेल अशा प्रकारे शुल्क आकारायचे तर किमान उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्यांना बाजारभावाने दर आकारायचे. 

वर थोडक्यात मांडलेल्या या पर्यायी हरितक्रांतीच्या मार्गात अनेक अडचणी आहेत, काही कच्चे दुवे आहेत. पण हे निश्चित की जगभरच्या विविध क्षेत्रांतील संशोधनाच्या आधारे एक सुसंगत, शास्त्रीय विकासधोरण मांडण्याचे पथदर्शी काम के. आर. दातेंनी केले आहे.

माहितीपट : के. आर. दाते : ऊर्जेच्या शोधवाटा

समाजातल्या विविध क्षेत्रांत पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तींची आणि त्यांच्या योगदानाची ओळख करून देणारा दस्तऐवजीकरण प्रकल्प म्हणजे 'ऐवज'. काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास, त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांचे विचार यांचे चित्रीकरण करून ते सी.डी. व डीव्हीडी.च्या माध्यमातून वितरित करणे आणि व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यापर्यंत ते पोहोचविणे अशी योजना या प्रकल्पात आहे. नवीन पिढीला आपला वारसा काय आहे हे माहीत व्हावे आणि नव्या वाटा धुंडाळून कार्य करण्यास प्रेरणा मिळावी असा उद्देश त्यामागे आहे.

हा प्रकल्प अतुल पेठे यांनी स्वबळावर हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला माहितीपट म्हणजे 'के.आर.दाते : ऊर्जेच्या शोधवाटा'. के.आर.दाते हे अतिशय आगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी ते उत्साहाने आणि ऊर्जेने काम करीत आहेत. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या या माणसाने भारतात आणि भारताबाहेर ५० वर्षांहून अधिककाळ जलसिंचन, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये पथदर्शी काम केले आहे. गेली अनेक वर्षे ते ग्रामीण विकासाकरिता झटत आहेत. पाणी, जमीन आणि ऊर्जा हे त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. 

समृद्धीसाठी विकास आवश्यक असतो, मात्र तो साधताना अविचार केला तर पर्यावरणाचा नाश होतो आणि सामाजिक समतोलही बिघडतो. याकरिता दाते यांनी पर्यावरणाला पोषक अशा औद्योगिक तंत्रांसाठी तसेच पर्यायी विकासाच्या मार्गांसाठी कसाड, सारमेट आणि सोपेकॉम या सामाजिक विकास संस्थांची उभारणी करून नवनवे प्रयोग केले आहेत. या सृजनशील तंत्रज्ञाच्या समाजभान देणाऱ्या विचारांचा 'ऐवज' आणि त्यातून मिळणारा 'दृष्टिकोन' सर्वदूर पोहोचविण्यासाठी हा माहितीपट आहे.

या माहितीपटात दातेंची मुलाखत आहे. त्या मुलाखतीतून त्यांचे बालपणातील व कॉलेजमधील शिक्षण, अण्णासाहेब सहस्रबुद्धे व प्रा.डी. डी. कोसंबी यांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, त्यांनी भूदान चळवळीत घेतलेला सहभाग, सरकारी नोकरी व नंतर खाजगी व्यवसाय करताना केलेली कामगिरी यांची माहिती मिळते. त्याबरोबरच लोकविज्ञान चळवळ, 'मुक्ती संघर्ष'ची बळीराजा व समान पाणीवाटप चळवळ यांच्याशी त्यांचा जो संबंध आला, त्याचाही आढावा घेतला आहे. सुहास परांजपे हे दातेंच्या सहकाऱ्यांच्या मुलाखतीद्वारे विकासाच्या या नव्या मार्गाची उकल करतात. मुलाखतीवर आधारित चित्रफितीच्या मर्यादा ओलांडण्यासाठी दातेंनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांचे फोटो कल्पकतेने वापरले आहेत. या माहितीपटाचे प्रयोग ठिकठिकाणी व्हायला हवेत व त्यासोबत या पर्यायी हरित क्रांतीवर चर्चाही व्हायला हव्यात.

(त्यासाठी संपर्क :- सुहास परांजपे : 9987070792 के. जे .जॉय 020-25880786, अतुल पेठे : 9422319717 या माहितीपटाचे सी.डी./डी.व्ही.डी. 'साधना मीडिया सेंटर', ४३१ शनिवार पेठ , पुणे ३० (फोन : 02024459635 आणि बालगंधर्व रंगमंदिरात 'समकालीन' मध्ये मिळतील.)

Tags: पर्यावरण समृद्धी ऊर्जा जमीन environment पाणी prosperity energy land water weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनंत फडके
anant.phadake@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके