डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वेदनांना पोटतिडकीने उजागर करणारी कादंबरी

पोटासाठी गावोगाव भटकणाऱ्या  वडार जमातीतील तुक्याचे जीवनानुभव रेखाटणारी ‘पडझड’ ही कादंबरी खरे तर आजच्या बेरोजगार युवकाचे प्रतिनिधित्व करते. जो ध्येयवाद, आशा-आकांक्षा घेऊन जीवनाशी आणि परिस्थितीशी दोन हात करीत तरुण शिकतो; त्याच्यावरही शेवटी बेरोजगार म्हणून  शिक्का मारला जातो. इथेच नव्या पिढीतील युवकांचा खऱ्या अर्थाने अपेक्षाभंग  होत असेल, तर नव्या युगातील भारताच्या प्रगतीचे शिलेदार कुणाला म्हणायचे?    

अशोक पवार यांना महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार आजवर मिळाले, परंतु महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळणे म्हणजे अशोक पवार साता समुद्रापलीकडे गेल्याची साक्ष दर्शविणारे आहे. बारा गावचं पाणी पिऊन जगलेल्या माणसाचा हा खऱ्या अर्थाने सत्कार होय. ज्या आसरूबा (अशोक) नावाच्या मुलाने मराठवाड्याच्या मातीचा गुणधर्म उरी बाळगून भटक्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने वाचा फोडणारे साहित्य जन्माला घातले, तेच साहित्य आज आत्मकथन (बिराड) आणि कादंबऱ्यांच्या (इळनमाळ, दर कोस, दर मुक्काम, पडझड, तसव्या) रूपाने मराठी वाचकांच्या कानापर्यंत पोहोचले याला मुख्य कारण त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये बेलदार, पारधी, वडारांसारख्या सतरा पगड जातींतील जीवनसंघर्षाचा वास्तवपणे वेध घेण्याची जाणीव आहे. स्वातंत्र्याच्या पासष्टीनंतरही जो भटका समाज अन्न, वस्त्र, निवाऱ्यांसारख्या मौलिक गरजांपासून वंचित राहिला; त्यांचे भटकंतीमय जगणे पवारांच्या साहित्याचे केंद्रस्थान आहे. माणसाला जाती-धर्माच्या नावावर बंदिस्त न करता माणूस म्हणून सन्मानाने जगता आले पाहिजे, सामाजिक न्यायाच्या प्रवाहात तोसुद्धा सामील झाल्यास आयुष्य कल्याणकारी होईल- हा आत्मविश्वास उरी बाळगून पवारांचे साहित्य जन्म घेताना दिसते.

अशोक पवारांच्या आयुष्याला वाङ्‌मयीन दृष्ट्या कलाटणी देणारी पहिली साहित्यकृती म्हणून 2001 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘बिराड’ आत्मकथनाचा विचार करावा लागतो. वास्तविक पाहता, ज्या 24 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात डॉ.आ.ह.साळुंकेंच्या हस्ते ‘बिराड’चं इचलकरंजीला प्रकाशन होणार होते, त्या कार्यक्रमाला जाण्यासाठीही पवारांकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत बायकोच्या अंगावरचे मंगळसूत्र विकून ते कार्यक्रमाला हजर झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीशी संघर्ष चाललेला असताना आकाराला आलेले हे आत्मकथन अंगावर काटे आणणारे आहे. शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष, पावसाळ्यातील उपासमारीचे दिवस, उपाशीपोटी पोटाची भूक शमविण्यासाठी पावसाळ्यात सडलेली बकरी खाण्याचा प्रसंग, आडगावच्या वसतिगृहातील पुस्तके आणि कपड्यांसाठी केलेला संघर्ष, साहेबांकडे खरे सांगितले म्हणून संचालकाचे वसतिगृहाच्या बाहेर काढणे, दहावीत पहिले लग्न, यशोदापासून विजय नावाचा मुलगा, यशोदाने सोडून मायबापाकडे जाणे, टीबी झाल्यामुळे मौलवीचे विजयला अनाथाश्रमात टाकण्यापासूनचे अनेक मरणोसन्न प्रसंग पवारांनी जीवनात प्रत्यक्षपणे अनुभवले. पालावर राहणाऱ्या भटक्यांच्या आयुष्यातील इतके बेदर्दी जगणे यापूर्वी इतक्या सशक्तपणे कुणीही मांडले नव्हते. त्यामुळे नेमक्या शब्दांतून मोठा आशय दर्शविणारे पवारांचे हे आत्मकथन वाचकाला पानोपानी अस्वस्थ आणि सुन्न करते.

‘बिराड’च्या निर्मितीनंतर जवळपास सात-आठ वर्षे संसाराचा गाडा ओढण्यासाठी पवारांचा संघर्ष चालू होता. पालावरून आल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत बचतगटाचे काम करून अवघ्या तीन-साडेतीन हजारांच्या मानधनावर चरितार्थ चालवणारा अशोक पवार नावाचा माणूस, कलावंत आणि मित्र मी मागील सात-आठ वर्षांपासून अनुभवतो आहे. माझी त्याच्याशी पहिली भेट झाली ती साधारणपणे ‘इळनमाळ’ या कादंबरीच्या लेखन- काळातच. अनुभवाचं कधीही न संपणारं गाठोडं या माणसाजवळ असल्यामुळे आजही चार-पाच नव्या कादंबऱ्या सहजपणे लिहू शकेल, यात गैर नाही. मात्र ‘इळनमाळ’मधून पवारांनी मारोती आणि राधा या साक्षरांच्या जगण्याचे जे भेदक वास्तव मांडले आहे, ते वाचताना वाचकाच्या अंगाचा थरकाप उडतो. आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून या कादंबरीकडे समीक्षकांनी पाहिल्याचे स्पष्टरीत्या जाणवते. मारुतीचे पहिले लग्न मीराबरोबर होते, परंतु तो मीराकडे वेळत जात नसल्यामुळे ती दुसऱ्याबरोबर लग्न करते. मीराला त्याच्यापासून दोन मुले झाल्यानंतर तो टीबी होऊन मरतो आणि पुन्हा तिच्या आयुष्याची वाताहत होते. मारुती मात्र मीरानंतर लग्न झालेल्या राधाच्या प्रेमात पडतो. तिच्यासाठी प्रसंगी मारही खाऊन पोट भरण्यासाठी रेडिओ, घड्याळे विकण्यापर्यंतचे फसवाफसवीचे उद्योगही करतो. बेलदारांच्या जगण्यातील एक सखोल विदारकता ‘इळनमाळ’मध्ये पानोपानी वाचायला मिळते. म्हणून ‘बिराड’ आणि ‘इळनमाळ’च्या लेखनासाठी अखिल भारतीय पातळीवरील संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्लीचा पुरस्कारही त्यांना मिळाला.

पारधी समाजातील भटक्यांचे जगणे असो वा बेलदारांचे; साऱ्याच जगण्याच्या पातळ्यांवर जीवनातील संघर्षमय अनुभव पवारांनी सामर्थ्याने उभा केलेला दिसतो. पोलीस, पाटील आणि गावातील सरपंच यांच्या भीतीने दारूचा धंदा सोडून मध्य प्रदेशात चोरी करण्यासाठी निघालेले पारधी ‘दर कोस, दर मुक्काम’मध्ये पवार जिवंतपणे मांडतात. पोट भरण्यासाठी पैसा लागतो म्हणून हेच पारधी कधी दादा लोकांकडून पैसा घेतात, तर कधी दरोडा टाकण्यासाठी रात्रभर योजना आखून आलेला दिवस मौजमस्तीत घालवण्याची स्वप्नं रंगवतात; परंतु जेव्हा गावातील स्त्रीचा खून करण्याची वेळ अंगलट येते, तेव्हा हे पाप आपल्या हातून घडू नये म्हणून खबरदारी घेत गाव सोडून मानवीपणाची जाणीवसुद्धा देतात. सुख-दु:खाचे वाटेकरी होऊन हे भटके भुकेवर मात करतात. प्रत्येक पात्राच्या अंगी जिव्हारी लागणारी शब्दकळा वापरण्याचे कसब पवारांना भटकंतीच्या जगण्यातून प्राप्त झालेले आहे. गुलब्यासारख्या नायकाच्या वेदनामय संघर्षातून विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळच्या परिसरात घडलेली कथानकता पवारांनी चिंतनशीलपणे रेखाटलेली आहे.

ज्या ‘पडझड’साठी अशोक पवारांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला, ती वडार समाजातील तुक्या नावाच्या नायकावर लक्ष केंद्रित करणारी कादंबरी आहे. एखाद्या बांडगुळासारखे पालावर जीवन जगूनही इथला भ्रष्टाचार आणि राजकारणी प्रवृत्तीने भटक्यांच्या जगण्याचे आरक्षणाच्या नावाखाली कसे वाटोळे करून ठेवले आहे याचा प्रत्यय त्यात येतो. नाम्यासारखे उच्च शिक्षण घेऊन मोठ्या शहराच्या ठिकाणी गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवावी, या ध्येयाने तुक्या वसतिगृहात मुलांना शिकवून स्वत:ही शिकतो. बी.ए. झाल्यानंतर नोकरीसाठी धडपडतो आणि शेवटी शहरातील रस्ते पहिल्यांदा शेणामातीने घाण करून येताना सफाई करण्याचे काम मनाविरोधात जाऊन करण्याची वेळ येते. या देशात भटक्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत दारूण आहे. कितीही शिकला तरी भ्रष्टाचार, हुंडा, मतलबीपणा आणि राजकारणाच्या प्रवाहात तो स्वत:च्या जीवनाला स्थिर करण्यासाठी नोकरी मिळवू शकत नाही याची एक खोल सल तुक्याच्या मनात उतरते. अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्याचा फायदा आपल्याला काय मिळाला, याचे उत्तर ‘काहीच नाही’- आपण कालही बेवारशासारखे होतो आणि आजही आहोत, हेच वेळोवेळी मिळत जाते.

पोटासाठी गावोगाव भटकणाऱ्या वडार जमातीतील तुक्याचे जीवनानुभव रेखाटणारी ‘पडझड’ ही कादंबरी खरे तर आजच्या बेरोजगार युवकाचे प्रतिनिधित्व करते. जो ध्येयवाद, आशा-आकांक्षा घेऊन जीवनाशी आणि परिस्थितीशी दोन हात करीत तरुण शिकतो; त्याच्यावरही शेवटी बेरोजगार म्हणून शिक्का मारला जातो. इथेच नव्या पिढीतील युवकांचा खऱ्या अर्थाने अपेक्षाभंग होत असेल, तर नव्या युगातील भारताच्या प्रगतीचे शिलेदार कुणाला म्हणायचे? मराठवाड्यातील परभणीचा परिसर घेऊन येणारी तुक्याची जीवनगाथा मांडणारी ही कादंबरी लोकशाही व्यवस्थेने नव्या पिढीच्या वाट्याला घातलेल्या अंधाऱ्या आयुष्याची जाणीव करून देते. इतकेच नव्हे तर, एम.ए.पर्यंतचे उच्च शिक्षण नाम्याने घेऊनसुद्धा पैसे भरण्याची सोय नसल्यामुळे मुंबईला जाऊन भीक मागण्याचा मार्ग स्वीकारवा लागतो. आजपर्यंत तुक्या ज्या नाम्याकडे आदर्श म्हणून पाहत होता, त्याच्याच जीवनाची वाताहत पाहून तो पूर्णपणे कोलमडून पडतो. आजही समाजात असे सुशिक्षित नाम्या गल्लोगल्ली आहेत. त्यांच्याही वाट्याला भीक मागून जगणेच आले आहे.

ज्या ऐतिहासिक काळात वडारांनी टोलेजंग इमारती, किल्ले, बुरुज, तटबंद्या आणि राजवाडे बांधले; त्यांची चौथी पिढी कशी नेस्तनाबूत झाली याचे मार्मिक चित्रण ‘पडझड’मध्ये ताकदीने मांडले आहे. आजही ही बिनचेहऱ्याची माणसं आमच्यासारख्या सुजाण वाचकांना गावोगावी, शहरोशहरी जीवाचा आटापिटा करून, मिठात पीठ घालून जगताना दिसतात; परंतु त्यांच्या आयुष्यातील धग जाणून घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. माणसाचे आयुष्य समजून घेण्यासाठी वेळ नसलेले आम्ही ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी कोणती प्रतिज्ञा आपल्या तोंडी अभिमानाने घेतो, हे कळत नाही. भविष्यात या वडारांचे कोणते आणि किती प्रश्न सुटतील, याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र त्यांच्या वेदनांना इतक्या पोटतिडिकीने उजागर केल्याबद्दल आणि त्यांच्या जीवनसंघर्षातून आलेली ‘पडझड’ जन्माला घातल्याबद्दल  अशोक पवार नावाचा माझा मित्र, माणूस आणि कलावंत निश्चितच गौरवास पात्र आहे. अलीकडेच स्त्री-संघर्षाला वाचा फोडणारी त्यांची ‘तसव्या’ नावाची कादंबरी मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली. केवळ भटक्यांच्याच नव्हे, तर निखळ स्त्री-लढ्याच्या प्रश्नालासुद्धा आपण वाचा फोडू शकतो, हे गिरिजा या नायिकेच्या माध्यमातून पवारांनी सिद्ध करून दाखविले.

Tags: आ. ह. साळुंखे लोकवाङ्‌मय गृह जातपंचायत भटकी-विमुक्त तसव्या आ.ह.सांळुखे कादंबरी पडझड पाल अशोक पवार Lokvagmany Gruh Jatpanchayt Bhataki-Vimukt Tasvya A.H. Salunkhe Kadambari Padjhad Pal Ashok Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके