ज्यादिवशी तिला वर्गातल्या मुलांबरोबर खेळताना पाहिलं. त्यादिवशी माझंच हरवलेलं बालपण मला परत मिळाल्याचा भास झाला.
शाळेचा पहिला दिवस. महिन्याभराच्या सुट्टीनंतर शाळेत जाण्याची मलाही उत्सुकता वाटत होती. शाळेच्या आवारात पोहोचले. मुलांचा किलबिलाट चालू होता. महिन्या-दीडमहिन्यानंतर ऐकू येणाऱ्या या किलबिलाटाने मन प्रसन्न झाले. सहकारी शिक्षिकांशी सुट्टीविषयी बोलणं चालू असतानाच घंटा झाली. प्रार्थनेनंतर मी वर्गात गेले.
माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता. वर्गात 25-30 मुले होती. आईच्या कुशीतून शाळेच्या आवारात प्रवेश करणारी, डोळ्यांत कुतूहल घेऊन पाहणारी, काही भेदरलेली, काही रडणारी, काही धीट, काही खोड्या करणारी पण सर्वच निरागस. त्या मुलांना विश्वास वाटेल, आपुलकी वाटेल असं काहीतरी बोलायला हवं होतं. काय बोलावं? यासाठी मी क्षणभर थांबले. तेवढ्यात माझं लक्ष एका मुलीकडे गेले. पाच-साडेपाच वर्षांची मुलगी. एवढ्या सगळ्या गोंधळात त्याच्याशी काही संबंध नसल्यासारखी, बालभारतीचे पुस्तक पाहण्यात गढून गेली होती. मला थोडीशी गंमत वाटली.
मी तिच्याजवळ गेले, “काय करतेस?”
ती म्हणाली, “पुस्तक वाचतेय.”
“अरे वा! नाव काय तुझं?”
“सोनाली दीपक काळे.”
मी जरा लक्षपूर्वक तिच्याकडे पाहिलं. गव्हाळ वर्ण, टप्पोरे डोळे, किंचित अपरं नाक, छोटेसेच केस पण व्यवस्थित दोन बो बांधलेले. नवीन युनिफॉर्म अगदी पहिल्याच दिवशी घातलेला. पायात पायमोजे, सँडल. तिच्या पालकांचा व्यवस्थितपणा तिला पाहताच जाणवला. इतक्यात “नमस्ते बाई” दारातून शब्द आले. पाहिलं तर दारात सव्वीससत्तावीस वर्षांची तरुणी उभी होती. “मी यशोदा काळे, सोनालीची आई. तिचं नाव दाखल करायचंय.”
मी फॉर्म त्यांच्या हातांत दिला. त्यांनी तो लगेच भरून माझ्याकडे दिला. फॉर्मवर नजर टाकताना पालकाच्या ठिकाणी तिने स्वतःचे नाव लिहिलेले दिसले. माझ्याही नकळत माझी नजर तिच्याकडे वळली. पालकाच्या ठिकाणी वडिलांचेच नाव असण्याची आपल्याकडे पद्धत आहे.
माझी ती नजर जाणवूनच त्या म्हणाल्या, “ती वर्षाची असतानाच तिचे वडील वारले. त्यामुळे मी माझे नाव लिहिले आहे.”
मी मनातून काहीशी शरमलेच. ती झटकून टाकण्यासाठीच म्हणाले, “मुलगी चुणचुणीत आहे हो तुमची.”
“हो बाई. ती वर्षाची असताना तिचे वडील अपघातात गेले. मला तिच्याशिवाय दुसरं कुणी नाही. माझं जगणं फक्त तिच्यासाठीच आहे. माझा सर्व वेळ मी तिच्यावरच खर्च करते. तिचा पहिलीचा अभ्यास पूर्ण तयार आहे पण तिचं वय आता पाच पूर्ण होतंय, म्हणून तिला पहिलीत घालायचंय. सोनाली, बाईंना वाचून दाखव गं.”
तिच्या बोलण्याचा धबधबा मी हातानेच थांबवला व म्हणाले, “हो, ती दाखवेलच की वाचून. आता माझ्यापाशीच असणार आहे ती.”
“तुमच्याकडे असली तरी तुम्हांला तिचा त्रास नाही हो. तिचा सर्व अभ्यास तर मी करून घेतलेलाच आहे.” हे म्हणजे थोडं अतीच होत होतं. मी स्वतःवर ताबा ठेवत म्हणाले, “बरं झालं. माझं काम हलकं झालं.” आणि दुसऱ्या पालकांकडे वळले.
दुसऱ्या दिवशी बाई परत हजर, “मी चार दिवस रजाच काढली, सोनाली शाळेत रुळेपर्यंत. बाई. तिचा अभ्यास तुम्ही पाहिला का?”
मी सोनालीकडे पाहिलं. सोनाली परिसर अभ्यासाचं पुस्तक चाळीत होती.
“हो पाहणारच आहे. पालक आलेत शाळेत मुलांना दाखल करायला. थोड्या वेळाने पाहते.”
“बालभारतीचा कुठलाही धडा वाचायला लावा. सर्व कविता म्हणते ती. पाढेसुद्धा दहापर्यंत पाठ आहेत.”
ही मला काहीशी डोकेदुखीच वाटायला लागली. आठ-दहा दिवस काहीसे घाईगर्दीचेच गेले. त्या दरम्यान सोनाली कळतनकळत माझे लक्ष वेधून घेत होती.
वर्गातील सर्व मुले दंगा करीत होती. खेळत होती. काही मुले अजूनही शाळेत येताना रडत होती. पण या सर्वांमध्ये सोनाली मात्र वेळेवर शाळेत येत होती. वर्गात आल्याबरोबर शांतपणे पुस्तक उघडून अभ्यास करीत होती. घरी केलेला अभ्यास दाखवीत होती. वर्गात मुले गोंधळ करताना ही कधीच सामील होत नव्हती. मधल्या सुट्टीतही डबा खाऊन झाल्यावर शांतपणे इतर मुलांचा खेळ पाहत बसायची. शाळेच्या पायऱ्यांवर हाताचं कोपर मांडीवर आणि हनुवटी तळहातावर रेलून बसलेली तिची लहानगी मूर्ती व्हरांड्यातून येताजाता मला दिसत असे. एक दिवस मी तिला बोलावले.
“अगं. खेळ ना तू पण सोनाली.”
“नको बाई, आई रागावते. मैदानावर खेळल्यावर माती लागते ना म्हणून.”
“अगं, कपडे धुता येतात.”
“नको. त्या मातीमुळे रोग होतात आणि खेळताना पडले तर मार लागेल.”
त्यावेळी तिला मी काही बोलले नाही. पण तिचं हे अकाली प्रौढपण मला डाचायला लागलं होतं. अतिशय निरागस असं बालपण, मुक्तपणे हसण्याखेळण्याचं वय; पण कसलं तरी ओझं वागवत असल्यासारखी वाटायची. कधी जोरात धावणं नाही, उड्या मारणं नाही, जोरात ओरडणं नाही. अगदी सावकाश चालणं, मोजून पावलं टाकत असल्यासारखी. बोलणं देखील हळू आणि अगदी गरजेपुरतंच. कसल्यातरी दडपणाखाली वावरते. असं मला वाटायला लागलं. एक दिवस मधल्या सुट्टीत तिला जवळ बोलावलं. “अगं सोनाली, शाळेत धावण्याच्या स्पर्धा आहेत, तू भाग घेणार आहेस का?”
“नको बाई. धावताना पडले तर रक्त येईल. मला आई घरच्या ओट्यावर सुद्धा चढू देत नाही. पडले आणि हाडबीड मोडलं तर?”
त्या इवल्याशा मुलीचं हे जगावेगळं बोलणं ऐकून मला काय करावं हेच सुचेना.
“बाकीची मुलं खेळताहेत ना. त्यांना कुठं लगेच रक्त येतंय, त्यांची कुठं हाडं मोडतायत?”
“बाई. माझ्या आईला माझ्याशिवाय दुसरं कुणी नाहीए. मला काही झालं तर माझ्या आईचं काय होईल? मला खूप अभ्यास करायचाय, खूप शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय. माझ्या आईला मी डॉक्टर झालेलं बघायचंय. मी खेळत बसले तर कशी डॉक्टर होणार? जाऊ का बाई मी?” असं म्हणून ती चालायला लागली.
आईच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली ही चिमुकली अकाली मोडून तर पडणार नाही ना?
मला या सोनालीनं अगदी अस्वस्थ करून सोडलं होतं. रोजचं काम, वर्गात शिकवणं चाललं होतं पण सोनालीचा तो गंभीर अकाली प्रौढ चेहरा मला पाहवतच नव्हता. खरं तर तिची अभ्यासाची तयारी वर्गाच्या मानाने अतिशय चांगली होती. तिची अधिक तयारी करून घेण्यासाठी मी गारवेल व त्यासारखेच वेगवेगळे अंक तिच्याकडून सुरुवातीला सोडवून घेत होते. पण आता मात्र तिच्यावरचा बोजा कमी करावासा वाटू लागला, थोडासा मोकळा श्वास तिला घेता यावा यासाठी वर्गाबरोबर जो होईल तितकाच अभ्यास तिचा घेऊ लागले. मोकळ्या वेळात तिला चित्रे काढण्यास प्रोत्साहन देऊ लागले. हळूहळू तिलाही रस वाटू लागला आणि अपेक्षित होते तेच घडले, तिची आई शाळेत आली.
“बाई, तुम्ही लक्षच देत नाही सोनालीकडं. मला तिची दुसरीची तयारी करून घ्यायचीय, पण तुम्ही तिला चित्रांचा नाद लावला. आता ती चित्रंच काढत बसते.”
“अहो पण तिची तयारी चांगली आहे.”
“हो पण ती मी करून घेतलीय. तुम्ही काय करताय?”
इथं मी गप्प राहणंच पसंत केलं. खरं तर मला म्हणायचं होतं, “बाईगं, तू जे तुझ्या मुलीचं करतेयस ना त्यातून नुकसानच होणार आहे. त्यातून थोडंसं तिला बाहेर काढायचा मी प्रयत्न करतेय.”
मी स्वतःशीच एक निश्चय केला की या सगळ्यांतून सोनालीची सुटका केली पाहिजे आणि त्यासाठी अगदी ठरवूनच सोनालीच्या आईशी मी मैत्री प्रस्थापित करायला सुरुवात केली. दोनतीन वेळा तिच्या घरी जाऊन आले. हळूहळू सोनालीची आई माझ्यापाशी मोकळेपणाने बोलू लागली. बोलण्याचा विषय सोनालीच असायचा. प्रत्येक वेळी सोनाली सोबत असायचीच. ती शांतपणे, कुठेही तिचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने बसायची. खेळायला खेळणी दिली तर खेळत बसायची. कधीही आपणहून कुठलंही खेळणं तिनं घेतलं नाही. कधीही मोठ्यानं बोलणं किंवा खायला मागणं असं काही केलं नाही. तिच्या वयाशी अतिशय विसंगत असं तिचं वागणं होतं.
मी तिच्या आईला विचारलं, “इतकी शांत कशी?’
“मी एकटी. जवळचं नात्याचं माणूसही मला नाही. त्यामुळे मी सतत परिस्थितीची जाणीव तिला करून देत असते. माझ्या सर्व आशाआकांक्षा तिच्यावरच आहेत. तिनं डॉक्टर व्हायला हवं. त्यासाठी आतापासूनच तिची तयारी हवी. पूर्णवेळ तिनं अभ्यासालाच द्यायला हवा, हे सतत तिला सांगत असते. त्यामुळे दंगामस्ती किंवा खेळण्यापेक्षा अभ्यासच करत बसणं चांगलं म्हणून ती अभ्यासच करत बसते. खेळताना पडली, मार लागला किंवा काही आजार झाला तर मी एकटी काय करणार? मला कुणाचा आधार नाही. तिला काही झालं ना तर मला वेडच लागेल. म्हणून घरातसुद्धा नाचत फिरण्यापेक्षा एका जागी बसून ती पुस्तक वाचते.”
मला हे ऐकून सोनालीच्या जागी ‘बोन्साय’ दिसू लागला. मुळांना पसरू न देता छाटून आपल्या इच्छेनुसार हव्या त्या आकारात वृक्षाला खुरटविणाऱ्याच्या ठिकाणी मला तिची आई दिसू लागली. तिच्याही नकळत ती सोनालीचं किती नुकसान करीत होती.
मैत्रिणीच्या रूपातच तिच्या या चुकीची जाणीव सोनालीच्या आईला न दुखवता हळूहळू करत गेले. खूप प्रयत्नानंतर आईच्या कोशात अडकलेल्या सुरवंटाचं हळूहळू फुलपाखरात रूपांतर होताना दिसू लागलं. तिच्या अकाली प्रौढ बनलेल्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा हळूहळू कमी होत गेला आणि त्या जागी निरागस हास्य फुलू लागलं. ती वर्गात मोकळेपणानं वावरू लागली.
ज्यादिवशी तिला वर्गातल्या मुलांबरोबर खेळताना पाहिलं. त्यादिवशी माझंच हरवलेलं बालपण मला परत मिळाल्याचा भास झाला.
हळूहळू तिच्यात बदल घडत गेला. तिच्या मोठ्या माणसासारखं बोलण्याच्या शैलीत अवखळपणा डोकावू लागला. अभ्यासाच्या तयारीत थोडासा फरक पडला. तिच्या कुवतीपेक्षा जास्त वेगानं ती पळत होती. तिची दमछाक होण्यापूर्वीच तिचा वेग थोडासा कमी झाला; पण त्यामुळे तिचं हरवलेलं बालपण मात्र तिला परत मिळालं. तिच्या आईच्या अपेक्षेप्रमाणे ती डॉक्टर होईल अथवा होणारही नाही. पण एक सर्वसामान्य आयुष्य मात्र ती निश्चितपणे जगेल. तिच्या डोळ्यांत आता चमक आलीय आणि त्याचवेळी जगाविषयीचं कुतूहलही उमटतंय तिच्या डोळ्यांतून. तिच्या त्या डोळ्यांकडे पाहिलं की एक समाधान वाटतंय. एका अकाली खुरटलेल्या कळीचं सुंदर अशा फुलात रूपांतर होताना पाहण्याचं समाधान!
Tags: सोलापूर मोहोळ शाहीन अ. र. शेख बालपण बोन्साय डॉक्टर मधल्या सुट्टीत कविता बालभारती अभ्यास यशोदा काळे सोनाली काळे पहिला वर्ग शाळा Solapur Mohole Shahin A. R. Sheikh Childhood Bonsai Doctor Recess Poem Blabharati Study Yashoda Kale Sonali Kale Standard First #School weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या