डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘शेंदूर’वर आधारित लघुपट करताना...

2015 मध्ये अवधूत डोंगरे या युवा लेखकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या स्वतंत्र चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत आणि काही इंग्रजी पुस्तकांचे अनुवादही त्याने केले आहेत. परंतु त्याचे अगदी सुरुवातीचे लेखन म्हणजे 2008-09 मध्ये (पत्रकारितेचा विद्यार्थी असताना) प्रकाशित झालेल्या साधना साप्ताहिकातील नऊ बालकथा. त्या कथांचे गेल्या वर्षी ‘तात्पर्य’ या नावाने पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्यातील ‘शेंदूर’ या कथेवर आधारित आठ मिनिटांचा लघुपट 17 जुलै 2019 रोजी पॉकेट फिल्मस या भारतातील नामवंत लघुपट वाहिनीकडून यु-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.

झाडाखालचा शेंदूर फासलेला दगड आपण गावागावात; अगदी शहरातसुद्धा कोपऱ्या- कोपऱ्यावर बघतो. शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलाच्या मनात त्या देवाकडे पाहून निर्माण झालेले प्रश्न, त्याची उत्तरं शोधताना त्याने करून बघितलेला प्रयोग आणि श्रद्धा- अंधश्रद्धा याविषयी त्याच्या मनात निर्माण झालेली संदिग्धता हा या कथेचा गाभा आहे. श्रद्धा या विषयावर कोणालाही अंतर्मुख करू शकेल अशी ही कथा आहे. अनिकेत कुलथे हे ‘शेंदूर’ या लघुपटाचे दिग्दर्शक- छायाचित्रकार आणि संकलक असून त्यांनी याआधी चिकाटी, जाई, गो-सोलो आणि गंज हे लघुपट केलेले आहेत. ‘शेंदूर’च्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न - शेंदूर कथा तुम्हाला कशी मिळाली? कुठे सापडली?

 - माझे एक दिग्दर्शक मित्र आहेत. मी त्यांच्या घरी गेलो होतो. कुणाच्याही घरी गेलं की, त्यांच्या पुस्तकांचा संग्रह चाळायची मला सवय आहे. तिथं मला एक छोटसं पुस्तक मिळालं अवधूत डोंगरे यांचं ‘तात्पर्य’ नावाचं. छोट्या-छोट्या नऊ कथा होत्या. मी सहज त्यातली पहिली कथा वाचली, मग ती आवडली म्हणून दुसरी वाचली. असं करत करत सर्वच कथा वाचल्या. पुस्तक आवडलं होतं. मग साधनात येऊन स्वतःसाठी त्या पुस्तकाची एक प्रत घेतली.

 प्रश्न - या पुस्तकातून ‘शेंदूर’ ही कथा शॉर्ट- फिल्मसाठी निवडण्यामागे काही खास कारण?

- साधनातून पुस्तक आणून परत वाचलं, तेव्हा त्यातली शेवटची कथा ‘शेंदूर’ मला सगळ्यात जास्त आवडली. त्याचं कारण म्हणजे कथेचा विषय. सिनेमाच्या क्षेत्रात काम करायला लागल्यापासून ‘अंधश्रद्धा’ या विषयावर एखादा लघुपट बनवावा असं डोक्यात होतं. पण त्या दृष्टीने चांगली संकल्पना मिळत नव्हती. शेंदूर कथा वाचून असं वाटलं की, ‘येस, यावर लघुपट बनू शकतो.’

प्रश्न - कथा तर ठरली. मग पुढे?

- पुस्तकामध्ये लेखकाचा इ-मेल आयडी होता. मग त्यांना मेल केला की, लघुपट करण्यासाठी परवानगी हवी म्हणून. त्यांनी माझ्या मेलला रिप्लाय केला, माझं आधीचं काम पाठवायला सांगितलं. जेणेकरून त्यांना तपासायचं असावं की, माझ्या हातात कथा देणं योग्य होईल की नाही. युट्युबवर उपलब्ध असणाऱ्या माझ्या एक-दोन लघुपटांची लिंक मी त्यांना पाठवली. त्यांना माझं काम आवडलं असावं. कारण त्यानंतर त्यांचा मेल आला की, अनिकेत तू लघुपट बनव. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रॉयल्टीचा एक रुपयाही घेतला नाही. त्यामुळे, या लघुपटाची सुरुवात खूपच आनंदी आणि सकारात्मक झाली असं म्हणता येईल.

प्रश्न - कथेत काही आवश्यक बदल करण्यापासून ते कलाकारांच्या निवडीपर्यंत... कथेचं लघुपटात रूपांतर करतानाची प्रक्रिया आणि अनुभव कसा होता?

- कथेची पटकथा होताना त्यात काही बदल करावे लागले. पण कथेच्या मूळ संकल्पनेला हात न लावता आम्ही ते केले आणि अवधूत डोंगरे यांनी तशी परवानगी दिली होती. ‘चिकाटी’ हा जो लघुपट मी केला त्यात एक लहान मुलगा होता- अथर्व मांढरे- त्यालाच मी याही लघुपटासाठी घेतलं. चिकाटीच्या वेळी मी ऑडिशन्स वगैरे घेऊन त्याला निवडलं होतं. विजय कोटस्थानी हे अनुभवी नट आहेत, त्यांनी यामध्ये आजोबांची भूमिका केलीय. बाकी सगळे स्थानिक लोक घेतलेत, ते व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यांना फक्त सांगितलं होतं की, ॲक्शन काय करायचीय.

उदाहरणार्थ, त्या झाडाखालच्या देवाला नमस्कार करून पुढे जा, एवढीच सूचना केलेली असायची. कॅमेरा कुठंय, कसा अँगल आहे, वगैरे त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्यांच्या लाईव्ह ऍक्शन शूट केल्या. त्यांच्याकडून काम करून घेणं तसं पाहिलं तर अवघड असतं; पण एकदम रिॲलिस्टिक शॉट मिळतात. लघुपटांना बऱ्याचदा बजेट कमी असतं. त्यामुळं व्यावसायिक कलाकार घेण्यापेक्षा हे परवडतंसुद्धा. हे लोकदेखील खूप हौसेने व प्रामाणिकपणे काम करतात. शेंदूरचं संगीत ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या सिनेमाचे संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केलंय. माझ्या आधीच्या लघुपटांचं संगीतसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. त्यांच्या संगीतानं या लघुपटाला अधिक जान आलीय असं म्हणता येईल.


प्रश्न - तुम्ही काय सांगाल, हा लघुपट कोणासाठी आहे?

- मला वाटतं हा विषय वैश्विक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलं अंतर शोधू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा लघुपट आहे. अधिकाधिक तटस्थ भूमिकेतून कथेला चिकटून राहून तो बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या आशयाच्या वैश्विकतेचा विचार करून संवाद कमी ठेवलेत आणि ॲक्शनमधून पात्रं अधिक बोलतील असं बघितलंय. इंग्रजीमध्ये सबटायटल्ससुद्धा दिलेली आहेत. कथेचा शेवट आश्चर्यकारक व स्वाभाविक आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा यांना पडताळून पाहणारे सर्वजण कथेतल्या त्या लहान मुलाशी स्वत:ला रिलेट करू शकतील. त्यामुळं भाषा, धर्म, प्रांत याची मर्यादा नसलेली ही संकल्पना आहे, म्हणूनच हा लघुपटदेखील तसाच अमर्याद आवाका असणारा आहे. तो सर्वांनी पहावा आणि बघून मला प्रतिक्रियादेखील कळवाव्यात.

हा लघुपट या लिंकवर पाहता येईल.

(मुलाखत व शब्दांकन : मृद्‌गंधा दीक्षित)

Tags: Short film Aniket Kulathe Shendur अवधूत डोंगरे शेंदूर अनिकेत कुलथे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिकेत कुलथे,  पुणे
kultheaniket07@gmail.com

फिल्ममेकर


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके