अस्पृश्यतेचेही पूर्वीसारखे राहिले आहे का? आता तशी पाळायची फारशी शहामत कोणात उरली नाही. एक तर आंबेडकरी चळवळीने महारांच्या माना ताठ झाल्या. दुसरे म्हणजे- आता महारामांगांनाही मते असतात. देशाच्या संदर्भात बघितले तर या मतांचे महत्त्व फारच असते. जे काही अस्पृश्यता पालनाचे प्रकार पडतात ते कमी हुशार अशा दादांकडून घडत असावेत. कारण अशा अत्याचारांतून स्वतःची राजकीय हानी होते हे जाता त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे.
आम्हांला कळू लागल्यापासून असे सांगण्यात येते की, भारतातील समाजव्यवस्था जातिव्यवस्थेवर आधारित आहे. चार वर्ण पुनर्जन्माच्या, कर्मविपाकाच्या सिद्धांतावर आधारित आहेत असेही जेथे तेथे बोलले लिहिले जाते- जाई.
जातीचे दृश्य स्वरूप जेव्हा पुस्तकांतून वाचायला मिळते तेव्हा त्यात मुख्यतः अस्पृश्यता पाळणे, महाराला मारहाण, त्याच्या पाठीशी झाडू बांधणे इ. किंवा याहून भयंकर प्रकार त्यात असत. जातीचा प्रमुख ब्राह्मण किंवा एखादा उच्चकुलीन देशमुख मराठा पाटील असे. मग गावकी, त्यातून बहिष्कार वगैरे पडे. आताच्या तरुणाला जेव्हा असेच्या असे चित्र खेड्यापाड्यात वा अन्यत्र पाहायला मिळत नाही तेव्हा त्याला ती वर्णने काल्पनिक वाटू लागतात; आणि पुस्तकात लिहिलेले एक तर खरे नाही, किंवा असल्यास आता ती परिस्थिती बदलली असेल म्हणून काळजीचे कारण नाही असेही वाटू शकते. हे असे वाटण्याचे फार धोक्याचे आहे; म्हणून बदलल्या वास्तवाचे वारंवार आकलन करून ते मांडणे आवश्यक ठरते.
जातीचेच घ्या. पूर्वी जातिव्यवस्था ज्या प्रकारे अस्तित्वात होती, किवा ती ज्या साधनांमार्फत वापरली जाई, ते प्रकार किंवा ती साधने आज बदलत चालली आहेत. पूर्वी कुणी खोत असे, कुणी ब्राह्मण, सावकार असे, कुणी देशमुख वतनदार असे, की जो आपली हुकमत आपल्या जातीच्या उच्चपणाच्या जोरावर गाजवीत असे. लोकही त्याचे मानीत. आपली जात कनिष्ठ, कारण आपण पूर्वजन्मी पापे केली म्हणून हे असे, ही त्यांची भूमिका असे.
आज गावावर कोण हुकुमत गाजवतो? केवळ उच्चकुलीन जातीतलीच माणसे असतात का? 1948 सालानंतर ब्राह्मणांची तर सद्दीच संपली. आज ब्राह्मण जवळ जवळ खेड्यांत नाहीत. असलेच तर मेंढरासारखे घाबरट आयुष्य जगतात. मराठ्यांमध्येही कित्येकदा देशमुख माणसे बाजूला पडलेली दिसतात. एखादा मानाने कमी दर्जाचा मराठासुद्धा गावावर हुकुमत चालवताना दिसतो.
इतकी वर्षे समाज बिनधोक घोरत होता. पण स्वातंत्र्यानंतर त्यात चाळवाचाळव सुरू झाली आहे. कारण वेड्यांच्या पातळीवर काही मूलभूत बदल घडत आहे. जे आजवर कधीही घडले नव्हते. प्रत्येक माणसाला मत या घटनेने आता गावचा सर्वाधिकारी व्हायला आता मते मिळवायची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी जात वापरली जाते. पण जात ही काही एकच बाब नव्हे. पैसाही असतो, गावावर काही दादांच्या साहाय्याने वचकही ठेवावा लागतो. हे सगळे जमेल तो यशस्वी होतो. केवळ जातीच्या नावाने पुढारी होता येत नाही.
एकदा निवडून आलेल्या माणसाला हालवणे फार अवघड. कारण त्याने आल्या आल्याच विरुद्ध पळणाऱ्यांच्या वाटांचे दोर कापून टाकलेले असतात. त्याच्या हातात नाना तरीची साधने असतात. कर्जवाटपाची व्यवस्था असते. वेलफेअर राज्याचा त्या खेड्यातील तोच प्रतिनिधी असल्याने त्याचे स्वतः चे वेलफेअर करून घेतले जात असताना त्याला कोण रोकणार? एखाद्याचा काटा काढायचे ठरले तर आज कोणत्याही प्रकारे तो काढू शकतो. पोलिसापासून तो न्यायालयापर्यंत त्याचे वजन असते.
पूर्वीच्या गावदादांपेक्षा आजच्या गावदादाला बऱ्याच गुंतागुंतीच्या साधनांनी आपली हुकुमत गाजवावी लागते. कारण लोक शहाणे झाले आहेत. म्हणून दादांना त्यांच्यापेक्षा शहाणपणाने वागवून त्यांना गुलाम करावे लागते. तसे पूर्वी नव्हते.
अस्पृश्यतेचेही पूर्वीसारखे राहिले आहे का? आता तशी पाळायची फारशी शहामत कोणात उरली नाही. एक तर आंबेडकरी चळवळीने महारांच्या माना ताठ झाल्या. दुसरे म्हणजे- आता महारामांगांनाही मते असतात. देशाच्या संदर्भात बघितले तर या मतांचे महत्त्व फारच असते. जे काही अस्पृश्यता पालनाचे प्रकार पडतात ते कमी हुशार अशा दादांकडून घडत असावेत. कारण अशा अत्याचारांतून स्वतःची राजकीय हानी होते हे जाता त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. महारांची वस्ती गावात पूर्वीसारखी राहिली आहे का? गेल्या पिढीतल्या चळवळीने गाव गाडा मोडला. धर्मांतरे झाली. त्यामुळे उरला सुरला धर्माचा पाशी गेला. महार-मांग झपाट्याने खेडी सोडून शहरात येऊ लागले. झोपडपट्ट्यांत राहू लागले. गावात जिथे पन्नास घरे असायची तिथे पाचही उरायची नाहीत. पूर्वी गावात महाराकडचे कुणी गेले म्हणजे तेराव्याला जातीला जेवण लागायचे. त्या स्वस्ताईत दोनशे रुपयांच्या आत कधी जेवण बसायचे नाही. आता कुणी गेले तर पाच दहा माणसेसुद्धा जेवायला नसतात. पाचपन्नास रुपयांत खर्च आटोपतो.
त्यामुळे पूर्वी नाही म्हटले तरी महारवाड्यात पाचपान्नास तरुण पोरं असायची. आता नसतात. त्यामुळे कोणीही जातायेता महारांना मार देऊ शकतो. अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसते. प्रकारही बदललेले दिसतात. हे प्रकार अगदी क्वचित होतात हेही खरे; पण का होतात हेही बघायला हवे.
पूर्वी ज्या जातीच्या कल्पना लोकांच्या मनात रूढ होत्या त्यांचा वापर व्यवहारात सर्रास होत होता. नंतर महारांची चळवळ झाली. त्या चळवळीने समाजावर दाब निर्माण केला. स्पृश्यांच्या मनात सरसकट बदल होऊ शकला नाही. स्पृश्यांनी अस्पृश्यांची दास्य मुक्ती मनाने स्वीकारली नाही. त्यानंतर मतांचे राजकारण आले. आबेडकरांच्या चळवळीपेक्षाही या घटनेने स्पृश्यांच्या वर्तनात बदल झाला करून घ्यावा लागला. कारण या देशात त्यांना राजकीय शक्ती जमा करायची होती. पण हाही बदल सक्तीचाच होता.
म्हणून सत्तेसाठी अस्पृश्यतापालनाचे बाह्य प्रकार कमी झाले, बंद झाले, व मनातली सफाई खऱ्या अर्थाने झालेलीच नव्हती. या विसंगतीतून एक ताण निर्माण होत आहे, व त्यातून हे अत्याचार घडत आहेत. हे अत्याचार स्पृश्य बहुसंख्य असल्याने ते अस्पृश्यांवर करत आहेत. स्पृश्य समाजातलीच तरुण मुले, आपल्या समाजात मानसिक बदल घडवून आणतील तेव्हाच हा ताण कमी होईल. हरिजनांच्या मुक्तिसंग्रामाची अवस्था काय आहे? चळवळ अशी दिसतच नाही. आहे ती पार्टी. तिने इथल्या सर्वांत हरिजनद्वेष्टचा जातीच्या पक्षाबरोबर राजकीय तहच करून टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या लढ्यातील लोकांची इच्छाशक्तीच दुबळी झाली आहे. त्यांच्या कल्पनेप्रमाणे या कराराने खेड्यांच्या पातळीवरचे त्यांचे अत्याचार कमी होतील. तसे झाले नाही; उलट वाढले. त्यामुळे चळवळीचे उद्दिष्ट आता एवढेच राहिले की, अस्पृश्यांकरिता सवलती मिळवणे, पार्टीच्या माणसास उपमंत्री, मंत्री, उपसभापती किंवा सभापती करून घेणे, व त्यात धन्यता मानणे. हे सगळेच चळवळीच्या जोरावर नसते; मतांच्या जोरावर असते. कारण महाराच्या घरात जन्मलेला प्रत्येक माणूस जन्मतःच पार्टीचा आपोआपच सभासद असतो, आणि पार्टी सोडणे म्हणजे जातीतून बाहेर जाण्यासारखेच भयंकर असते. या हुकमी मतांचा दाब वापरला जातो. जातिव्यवस्था मोडून काढायला निघालेल्या ध्येयवादी चळवळीच्या दाबाची आज उणीव आहे.
असे का झाले? आंबेडकरांची चळवळ गाव गाड्याखाली रगडलेल्या अस्पृश्यांच्या दुःखातून निर्माण झाली. चळवळीमागची ती शक्ती होती. आज तो गाडा नाही. हरिजनातले बहुसंख्य आज शहरातून कामगार झाले आहेत, झोपड्यातून राहात आहेत.
शहरी हरिजन कामगाराची मनःस्थिती पाहू गेले तर त्याला पूर्वीच्या खेड्यासारखी अस्पृश्यता सहन करावी लागत नाही. शहरी जीवनामधल्या सर्वसाधारण जीवनात कोणीच कोणाला अटकाव करू शकत नाही. त्याचे गावाकडचे बांधव आज तिकडे ज्या ताणाखाली वावरत आहेत त्याची त्यांना फारशी चीड येत नाही. तो त्या बाबतीत अलिप्त आहे. त्याचे प्रश्न निराळे झाले आहेत. जातीयतेच्या खेड्याच्या पातळीवरच्या युद्धात लढण्याविषयी तो उत्साही राहिलेला नाही. मुंबईत हरिजन वस्तीत जाता शिवसेना, रिपब्लिकन माणसांचा पराभव करून निवडून येऊ शकते. शिवसेनेच्या बूबवर हरिजन समाजातली तरणीताठ पिढी काम करीत होती, याचा अर्थ लावला गेला पाहिजे. हरिजन चळवळीनंतर मिळालेल्या अग्र हक्कांमुळे त्या समाजातली मुले शिकू लागली. शिक्षणाने आकांक्षा वाढल्या. त्यांच्यात दोन बदल दिसतात. एक तर शिकल्यामुळे ते ब्राह्मण बनायचा प्रयत्न करतात, व स्वतःच्या बांधवांना दूर लोटू पाहतात. शिकलेल्या हरिजनांमध्ये आडनाव बदलून जात लपवण्याची वृत्ती वाढत आहे. एका बाजूला आपल्या जातीला दूर लोटले तरी दुसऱ्या बाजूने तो त्या जातीचा म्हणून चटके सहन करावे लागतातच. पुण्याच्या एका स्थानिक हरिजन पत्रात एक हकीकत आहे 'कामत या नावाने आपले जुने नाव बदलून एक नवबौद्ध हाउसिंग बोर्डात राहात होता. त्याची बाई वारली. तेव्हा तो सी. के. पी. नसल्याने कोणी सौ. के. पी. प्रेत उचलायला आले नाहीत व जातीशी तो फटकून वागत असल्याने जातही आली नाही, तेव्हा प्रेत तसेच पडून राहिले. शेवटी जातीलाच दया आली. 'किती झाले तरी तो आपलाच आहे' असे म्हणून ते गेले व विधी उरकला गेला. शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्या निमित्ताने कामत याची जात समजल्याने त्यांनी इतका त्रास दिला की त्याला काही महिन्यांतच जागा सोडून जावे लागले.
हे तर काहीच नव्हे वाहून किती तरी भयंकर चटके सुशिक्षित हरिजन तरुणास आज शहरात भोगावे लागतात; पण तरी तो ब्राह्मणाळलेला असल्यामुळे लढा देत नाही. आपल्या दलित बांधवांच्या बरोबर चळवळीत उतरत नाही. पूर्वी अत्याचार होत पण त्याचे काही वाटत नसे. कारण 'आपली जातच हलकटाची' असे त्याला मनोमन वाटे. आज तसे नाही. आज शिक्षणाने आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लहानसहान प्रसंगाने हा तरुण प्रक्षुब्ध होऊ शकतो. पण त्या कातडीबचाऊ ताणाने मुख्य चळवळीस मदत होत नाही. एखादा हिंसक उद्रेक औरंगाबादला किंवा सोलापूरला होतो, येवढेच.
जातीसंबंधात हे असे चित्र डोळ्यांना दिसते, पुस्तकात सहसा असे लिहिलेले असत नाही. कारण तेव्हा असे झालेले नव्हते. ही जी जातीची गोष्ट तीच इतर बाबीसंबंधाने आहे असे दिसू लागते.
इतर सामाजिक सुधारणांच्या प्रक्रियांचे चित्र काय आहे? एक पिढी अशी होती की, जी स्त्री-सुधारणांच्या ध्यासाने भारून गेली होती. कोणी स्त्रियांना शिक्षण देई, कोणी अनाथ स्त्रियांचा आश्रम काढी, कोणी पुनर्विवाह करी, कोणी विधवाविवाह करी. एक ना दोन, अनेक प्रकारे लोक लढत होते. समाजाचा कडवा विरोध होत होता. पण शेवटी सुधारणा झाल्या असे सर्वमान्य झाले. बायका शिकू लागल्या. पुनर्विवाह करू लागल्या. त्यामुळे आज आम्हा लोकांची अशी समजूत असते की, तो प्रश्न त्या पिढीने निकालात काढला आहे. प्रत्यक्षात खेड्यापाड्यांत ब्राह्मण सोडून इतर जातीत तसे सुधारलेले चित्र दिसत नाही. देशमुख मराठा समाजात पुनर्विवाह होत नसल्याने कित्येक घरांत अशा तरुण विधवा स्त्रिया धुणी-भांडी करीत आयुष्य कंठीत आहेत. किती टक्के स्त्रिया शिक्षण घेत आहेत हे पाहिल्यावर फार चांगले चित्र दिसत नाही. आणि ज्या सुधारल्या त्याही खऱ्या अर्थाने सुधारल्या का, हेही तपासून पाहावे लागते. पूर्वी वडिलांनी सांगेल त्याच्याशी लग्न करीत. जाता सुधारलेल्या मुली श्रीमंत गाडीवाल्या मुलांच्या मागे लागलेल्या दिसतात. त्यांचा 'चॉइस' कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो? स्वभाव जमतात, वगैरेचा भाग नसतो किंवा अगदी थोडा असतो. मग ही मुलगी खऱ्या अर्थाने मॉडन आहे का? फॅशन्स करणाऱ्या मुली पाहतो. कितीजणी स्वतः विचार करून, स्वतःच्या मनाने फॅशन्स करीत असतील? बहुधा प्रवाहपतिताचेच जिणे बघायला मिळते. मानवी सर्जनशीलता वाढल्याचे चिन्ह कोठे दिसत नाही.
आणि हे समाजाच्या सर्व 'सुधारलेल्या' वर्गाला लागू पडण्यासारखे आहे. आम्ही जुनी गुलामी तोडली. ती तोडल्याच्या आनंदात मश्गुल आहोत. या अवधीत या सुधारलेल्या जगाने आपल्याला किती गुलाम केले आहे याची कल्पनाही येत नाही. अमेरिकेत आज मोटरकार इतक्या वाढल्या आहेत, आणि रस्त्यांची जंगले झाली आहेत की त्याचे प्रश्न त्यांच्यापुढे पडले आहेत. तेथले बरेचसे विचारवंत आता म्हणू लागले की, कार हा प्रकारच बंद केला पाहिजे. घरापासून दीड मैलाच्या आत रेल्वेस्टेशन असले म्हणजे पुरे. आपल्याकडे अमेरिका करण्याचे लोकांचे ध्येय असते. पण तिकडे टेलिव्हिजन संस्कृतीने जे भयानक प्रश्न निर्माण केले आहेत त्याकडे कोणाचे लक्षच नाही. कमविल प्रचारकी संस्कृतीने मानवी सर्जनशीलता मारून टाकली आहे. तरी आपल्याला त्या संस्कृतीची ओढ आहे. आपल्या मनातले ध्येय तेच आहे.
अगदी फी एंटरप्राइझाल्यापासून तो कट्टर समाजवाद्यापर्यंत सगळ्यांची प्रगतीची कल्पना म्हणजे 'Affluent' बनणे हीच असते. हे आपले फार मोठे मानसिक दास्य आहे. भारतासारख्या देशाने वीस-तीस वर्षांनी (जमल्यास) अमेरिका व्हायचे आणि मग त्या वेळेस आज ज्या प्रश्नांना अमेरिका तोंड देत आहे त्यांना तेव्हा तोंड देत बसायचे हा न्याय कुठला हे समजत नाही. आता तिकडे घडणाऱ्या गोष्टींपासून आपण आज येथे धडा घेणार आहोत की नाही? की अमेरिका ज्या टप्प्यातून गेली ते टप्पे अटळ आहेत असे मानायचे?
मानवी संबंधातील वरचेपणा, प्रेमभाव, मानवीपणा यात वाढीला लागेल असे करावे. मग त्यात आपली अमेरिका नाही झाली तरी चालेल. त्यानुसार आपले विकासाचे अग्रक्रम ठरले पाहिजेत. विकासाच्या कल्पना स्पष्ट केल्या पाहिजेत. नाही तर जाहिरातीच्या युगातून आपली सुटका नाही.
आज शहरातून तेच चालले आहे. एका मूर्खपणाच्या मोठ्या शर्यतीत सर्वजण सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत धावत आहेत. कोणीही त्यातून सुटत नाही. मुंबईत राहणारा मुंबईला रोज दहा शिव्या घालतो, पण दहा दिवस काही मुंबईबाहेर राहू शकत नाही:-इतका त्या जीवनाचा तो दास बनला आहे.
आपण ही निरनिराळी दास्ये एकाच वेळी मनात बाळगतो. एकीकडे शहरी 'Affluent' जीवन जगतो व दुसरीकडे मध्ययुगीन धर्म व जातिकल्पना यांच्या आधारावरही जगतो. अद्ययावत शिकलेल्या ब्राह्मण समाजाचे सध्या गणपती हे देवत आहे. ते 'गणपतीला मला शास्त्रातील अमुक एक पदवी मिळो म्हणून नवसही करतात. आणि पीएच. डी. मिळाली म्हणून सत्यनारायणही घालतात. (शिवाय लग्नात हुंडा वगैरे ओघाने आलेच). ज्ञान आणि अंधश्रद्धा यांचे फार मनोरंजक रसायन त्यांनी त्यांनी तयार केले आहे त्याला तोड नाही. उलट एका (उच्चविक्षित व रा. स्व. संघात जाणाऱ्या युवकाने मला असेही सांगितले की, "मी देवाधर्मावर विश्वास ठेवीत नाही. देव नाही असे मी मानतो.' पण 'समाजधारणे 'साठी धर्म आवश्यक आहे असे मात्र मी मानतो. हीही एक गंमतच.
असा समाज जो जुने जीवन नव्या जीवनाच्या संदर्भात जगायला बघतो तो विसंगतीपूर्ण समाज आहे हे सांगायला नकोच. त्यामुळे येथले दास्यमुक्तीचे लढे अधिकाधिक खडतर बनले आहेत. गरिबी मोजता यायची नाही इतकी खूप आहे. पण लढ्यासाठी कोणी उभे राहू शकत नाही. जातींची गुलामगिरी आता कोणा उच्च जातींना अंमलात आणावी लागत नाही, समाजातल्या दलित वर्गानेसुद्धा मनाने ती गुलामगिरी स्वीकारून टाकली आहे. सर्व काही शिस्तशीर चालले आहे. दारिद्र्य वाढतेच आहे. समाजातले बळवंत अधिक बळवंत होतच आहेत. पण गरिबांची प्रखर राजकीय आंदोलने उभी राहू शकत नाहीत.
सुशिक्षित वर्ग या लढाईत स्वतःच्या स्वार्थाची भूमिका घेत आहे. त्याचे दारिद्र्य वाढत असले तरी श्रीमंतांची तळी उचलून धरण्यात आज तो धन्यता बाळगतो. वास्तविक मनाने गुलाम झालेल्या गरिबांना सत्यदर्शन घडवून लढ्याला तयार करण्याचे काम सुशिक्षित वर्गातले तरुणच करू शकतील. त्यांनी त्यांचे दास्य टाकून देऊन सुशिक्षित वर्गास गरिबांचा सहानुभूतीदार बनविले पाहिजे. शेवटी ती निर्णायक लढाई लढायची आहे. त्यासाठी म्हणून समाजातली निरनिराळी मानसिक दास्ये दूर करायची आहेत, ही भूमिका मनाशी पक्की करायला हवी.
हे चित्र आज तरुण माणूस पाहतो. ते कुठे मांडले जात नाही; त्याचे शास्त्रशुद्ध अर्थ लावले जात नाहीत, ही तक्रार आहे. म्हणून असे वाटले की, निदान परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिला पूर्वीच्या विश्लेषणावरून उत्तरे मिळायची नाहीत. नवी उत्तरे शोधायला पाहिजेत हा आग्रह हा अंक - हा अंकातले लेखक व्यक्त करीत आहेत.
अंकाची मूळ कल्पना व प्रत्यक्ष झालेला अंक यात काहीशी तफावत आहे हे मान्यच करायला पाहिजे. पण बहुधा हे असेच होत असते. इतक्या लोकांच्या सहकार्यातून व प्रेसच्या तंत्रातून शेवटी होईल ते रसायनच बाहेर पडत असते. पण काहीही असले तरी बऱ्याच गोष्टी नव्याने लिहिल्या गेल्या आहेत यात समाधान आहे. दलितांची दास्यमुक्ती व्हावी यासाठी बऱ्याच व्यक्तींना कळकळ आहे. बऱ्याच संघटना अहोरात्र कष्ट करीत आहेत. त्या सर्वांचे आपापसात बरेचसे तात्त्विक मतभेदही आहेत. पण ते मान्य करूनसुद्धा वस्तु स्थितीच्या वाचनाविषयी एकत्र विचार करायला हरकत नाही. त्यांच्या मार्गांचीही मुक्त चर्चा करण्याइतकी मने खुली असावीत. शेवटी आपणा सर्वांमिळून एका फार मोठ्या आव्हानाला तोंड द्यायची आपल्याला तयारी करायची आहे.
ही भूमिका डोळ्यांसमोर होती. या दृष्टीने अंक काढावासा वाटला. त्या दिशेने लोकांना भेटलो. चर्चा झाल्या. त्यांतून अंकात समाविष्ट झालेले लेख हाती आले. चर्चांमधून, गप्पांमधून आणखीही किती तरी लेख यायला हवे होते; पण येऊ शकले नाहीत. त्यात काही फार बिझी माणसे आहेत. (त्यांच्या ओढाताणीकडे पाहून लेख येणे कठीणच होते.) दुसरी 'प्रकाश झोतात नसलेली माणसे. त्यांना नवे बदल जाणवलेले असत; पण लिहिण्याची भिती वाटे. या दोन्ही माणसांनाही पुढच्या अंकात लिहायला लावण्याची मला उमेद आहे. या अंकास प्रा. मे. पुं. रेगे व प्रा. रा. म. बापट यांची फार मदत झाली. माझ्या सारख्या नवोदित संपादकास सांभाळून घेतल्याबद्दल साधना प्रेसच्या कर्मचाऱ्यांचाही मी ऋणी आहे.
Tags: साधना दास्यमुक्ती विशेषांक 1970 हरिजन शिवसेना डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. अनिल अवचट Sadhana Dasya Special Issue 1970 Harijan Shiv Sena Dr. Babasaheb Ambedkar Dr. Anil Avachat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या