डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंजली कीर्तने मूळच्या लेखिका असल्याने त्यांनी हे अनुभव जसे चांगले शब्दांकित केले आहेत, तसेच त्या स्वतःही एक पर्यटक असल्याने त्यांचे ह्या पुस्तकाचे संपादनही चांगले झाले आहे.

केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार' हे आपल्याला माहिती नसते असे नाही, पण आपल्यातील बहुतेकांचे 'काशीस जावे, नित्य वदावे’- असेच झालेले असते.

केसरी पाटील तर बोलूनचालून पयर्टन व्यावसायिक, त्यामुळे त्यांच्या पायावर चक्र असणारच. रजनी दांडेकरही आपल्या व्यवसायानिमित्त त्या काळी सुद्धा सतत फिरत्या राहिलेल्या. पुष्पा त्रिलोकेकर पत्रकार अन् माधव गडकरी तर ह्या गावाहून त्या गावी जाण्यासारखे ह्या देशातून त्या देशी जाणारे पत्रकार. अनंत सामंत जहाजावरच होते अन् रवींद्र पिंगे सतत नावीन्याच्या शोधात राहत आले आहेत. दिलीप प्रभावळकर ह्यांना नाटकासाठी तर पद्मजा फेणाणी यांना गाण्यासाठी नित्य नवा अनुभव घ्यावा लागलेला- अशा साऱ्यांना 'मॅजेस्टिक प्रकाशना’तर्फे अंजली कीर्तने यांनी गेल्या दिवाळीत मुद्दाम लिहिते केले होते. दिवाळी अंकांचा संच आणि त्याबरोबर विशेष काही भेट ह्या अलीकडच्या नव्या उपक्रमातील ही 'मॅजेस्टिक' भेट आहे. ‘आठवणी प्रवासाच्या' देणारी. हे प्रवासवर्णनपर लेखन नाही; तर हे आहे प्रवास अनुभवपर लेखन!

हे सारे लेखन इतके ताजे आहे की, आत्ताआताच घडलेल्या 11 सप्टेंबरचे संदर्भ निदान तीन तरी लेखांत आले आहेत. ह्या घटनेने सर्वसामान्यांच्या मनात अफगाणिस्तानबद्दल एक नफरतच निर्माण झाली आहे. पण चांगली चार वर्षे अफगाणिस्तानातील पाणी प्यालेल्या फिरोझ रानडे यांना मात्र तसे वाटत नाही. मुळातच महाभारतातील गांधारी कंदाहारची, पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव करणारा व मराठी लेखक मंडळींना कादंबऱ्या-नाटकं लिहिण्याकरिता विषय मिळवून देणारा अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानचाच; म्हणून रानडे यांनी त्यांना अफगाणिस्तानला जायची मिळालेली संधी सोडली नव्हती.

माधवराव गडकरी 1978 मध्ये हरिभाऊ जोशींबरोबर खान अब्दुल गफारखानांना भेटायला अफगाणिस्तानात गेले होते. प्रथम दर्शनात त्यांना अफगाणिस्तान जंगलीच वाटलेले आहे. म्हणजे तेथे मोठमोठी जंगले आहेत असे नव्हे, उघडयाबोडक्या फक्तरांचे डोंगर, त्यांमधून वाट काढणारे रस्ते, त्यांमधून धावणाऱ्या सर्व परदेशी मोटारी, त्यांत सकृतदर्शनी रानटी दिसणारे लोक म्हणजे अफगाणिस्तान! दाढ्या वाढलेले, डोक्यावरती पागोटी, शिक्षण-संस्कृती यांच्या मनावर रेघोट्याही नसलेले!

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती विश्वासराव चौगुले हे एकेकाळी मुरगाव बंदरात दीड रुपया रोजावर काम करणारे टॅलीक्लार्क होते. बातानाबे नावाच्या जपानी माणसाने त्यांना अभ्युदयाचा मार्ग दाखविला. त्या बातानाबेकडे माधवराव गडकरी टोकियोत जेवायला गेले होते तर वेल्झच्या मुक्कामात त्यांना बट्रँड रसेलशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली होती.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर दहशतवाद्यांनी जो पाशवी हल्ला केला तेव्हा केसरी टूर्सची अमेरिका सहरू चालू होती. 10 सप्टेंबरला वॉशिंग्टन येथील लिंकन मेमोरियल, कॅपिटल हिल, व्हॉईट हाऊस वगैरे बघून ही मंडळी लॉस एन्जलिसला मुक्कामाला आली होती. केसरी टूर्सची स्थापना 8 जून 1984 ची. त्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पहिली काश्मीर सहल आखली होती. 31 ऑक्टोबर 1984 ला काश्मीरचे सौंदर्य न्याहाळत असतानाच त्यांना बातमी ऐकावी लागली, इंदिरा गांधींची हत्या झाल्याची. त्या दिवशी त्यांनी प्रवाशांसाठी जिलेबीचा बेत आखला होता. स्वयंपाक तयार होता, त्यातील जिलेबी त्यांनी त्या दिवशी हॉलच्या मागून जाणाऱ्या झेलम नदीत विसर्जित करून टाकली होती.

पुष्पा त्रिलोकेकर दोनदा काश्मीरला जाऊन आल्या आहेत. एका भेटीत त्या काश्मिरी मुस्लिमांचे सर्वोच्च धर्मगुरू मीरवाईझ यांनाही भेटलेल्या आहेत. मीरवाईझ ही काश्मीरमधील महत्त्वाची असामी होती. काश्मीर स्वायत्ततेला त्यांचा उजवा कौल होता. मात्र भारतापासून पूर्णतः संबंध तोडावेत हे त्यांना मंजूर नव्हते. पाकिस्तानात सामील होणे तर त्यांना सक्त नामंजूर होते. पुष्पाबाई त्यांच्याशी बोलून, जेवणासाठी थांबण्याचा त्यांचा आग्रह न मानता संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर पडल्या न् त्याच रात्री आठच्या सुमारास मीरवाईझ ह्यांची हत्या झाली! ज्या कॉ.एच.एन.वांच्छू यांना पुष्पाबाई काश्मिरात भेटल्या होत्या, त्या वांच्छूचीही पुढे हत्या झाल्याचे त्यांना ऐकावे लागलेले आहे. म्हणूनच त्या म्हणतात, गोठलेल्या बर्फाखाली जागोजाग आग धुमसत होती, त्याच आगीचे वणवे आता चहुबाजूंनी पिसाटपणे धावू लागले आहेत.

‘तुझ्या हातावर परदेश प्रवासाची रेषा नाही' असे ज्योतिषाने ठामपणे सांगितलेल्या द्वारकानाथ संझगिरी ह्यांच्या हातावर क्रिकेटने ती रेषा ठसठशीतपणे उमटवली; आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करून टाकले. या खेळाने त्यांना परदेशात तर त्यांची दैवते भेटलीतच, पण खुद्द भारतातच एका प्रवासात त्यांना त्यांचा 'विठ्ठल’ नुसताच भेटलेला नाही तर त्यांच्या शेजारी येऊन बसलेला आहे. त्यांचा हा विठ्ठल वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोस नावाच्या पंढरीत राहतो न् त्याच्या मानवरूपाला सारे जग सर गारफिल्ड सोबर्स म्हणून ओळखते! सोबर्सच रेल्वेत शेजारच्या सीटवर आल्यावर तो नको म्हणत असतानाही संझागिरीनी अंजू महेंदूपर्यंत सर्व मुद्यांवर त्याला छेडले आहे. जर्मनीत फ्रँकफर्टवरून म्युनिकला जाताना त्यांनी तेथील एका चिमुरडीशी अशाच मनमोकळ्या गप्पा केल्या आहेत, ज्या संझागिरींच्याच 'खिलाडू' शैलीत वाचण्यासारख्या आहेत.

सुभाष भेंडे ह्यांच्या लेखातूनच काही संगती लावता न येणारे 'तो माझा सांगाती’ अनुभव वाचायला हवेत. भेंडेजींनाही हे अनुभव इथल्या माऊंट अबूपासून हाँगकाँगपर्यंत आलेले आहेत. खिशातले सगळे पैसे संपल्यावर जयपूर ते मुंबई व्हाया दिल्ली असा प्रवास करण्याची वेळ आल्यावरचा त्यांचा अनुभव 'आयुष्यात काही थोडंफार चांगलं तुमच्या हातून घडलं असेल, ती पुण्याई मनुष्यरूपानं उभी राहत असेल' हे सौ. भेंडे यांचं म्हणणं पटावं, असाच आहे.

प्रवास जीवनातील विविधस्पर्शी अनुभव!

ह्या अनुभवात प्रबोधन, मनोरंजन, सौंदर्य, कलात्मकता, संगीत, शिल्प, नृत्य, मानवता, पारदर्शकता, करुणा, सुखाची संबेदना आणि दुःखाची वेदना ह्या सर्वांचं दर्शन घडतं, हे सर्व टिपून घेण्याची कुवत आणि इच्छाशक्ती मात्र हवी. प्रवासात शरीर थकले तरी मन मात्र थरारून जातं. म्हणूनच प्रवास हा एक अपूर्व अनुभव असतो, असे म्हणणाऱ्या मधु दंडवते यांनी अनेकांच्या नजरेतून निसटले असण्याची शक्यता असलेले, ताजमहालच्या प्रांगणात प्रवेश करताना एका भल्या थोरल्या शिलालेखात रेखाटलेले ताजमहालाच्या आंतरिक सौंदर्यात शब्दचित्र अचूक टिपले आहे. ते शब्दचित्र असे आहे- ‘ताजमहाल ही पृथ्वीवरील मानवानं केलेली सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. तिची प्रशंसा विविध अंगांनी केलेली आहे. सौंदर्याची साकारलेली दृष्टी, एक संगमरवरी स्वप्न, भारतीय स्त्रीच्या डौलदारपणास अर्पिलेली आदरांजली आणि काळाच्या कोमल गालावर प्रतिसाद देणारा अश्रूचा अमर थेंब. ताजमहालात प्रतीक आहे भारताच्या संमीलित संस्कृतीचं. ते आहे जगातील एक आश्चर्य आणि युनोस्कोनं वर्णन केलं आहे ‘जगाचा एक सांस्कृतिक वारसा,' रवींद्र माहिमकर ह्यांनीही एक शेर उद्धृत केला आहे :

‘सैर कर दुनियाकी
गाफिल जिन्दगानी फिर कहाँ।
जिन्दगानी अगर कुछ बची,
तो नौजवानी फिर कहाँ।’

‘कॅम्लिन'च्या रजनी दांडेकर ह्यांनी 'नाना देशचे नामा लोक' तर बघितले आहेतच; पण आपल्या देशातही त्यांना लहानथोरांची नाना दर्शने झाली आहेत. एकदा विमानप्रवासात त्यांचे सहप्रवासी होते यशवंतराव चव्हाण. एवढ्या मोठ्या व्यक्तीशी त्या काय बोलणार? शेवटी यशवंतरावांनीच त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांचे नाव समजल्यावर ते म्हणाले, 'आमच्या अनंत वर्तकांची मुलगी कॅम्लिनच्या दांडेकरांकडे दिलीय-' यावर बाई म्हणाल्या, 'मीच ती.' एकदा गिरीश कर्नाड त्यांच्या शेजारी होते तर एकदा मागच्या सीटवर बसली होती शबानी आझमी. त्यावेळी त्यांनी तिला सुनावले होते, 'नोकरी करून पैसे मिळवणाऱ्या माझ्या कामगारांना कायद्याचं पालन करण्यासाठी दीड दोन लाख रुपये खोलीत द्यावे लागतात आणि बेकायदेशीररीत्या बळकावलेल्या जमिनी दुसऱ्यांना फुकट मिळतात. त्यांची बाजू घेऊन लढण्याचे समाजकारण माझ्या समजेच्या पलीकडचं आहे.’

'चिमुकल्या पाहुणीची, झाली निघायची वेळ
आयुष्याच्या पुण्याईची अंथरली मखमल
गेली निघून हासत, घर भरले खुणांनी
सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी'
आपला संगीत प्रवासाचा लेख संपविता संपविता पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांना कवियित्री इंदिरा संत ह्यांच्या या ओळी आठवाव्यात, असाच त्यांचा 'सुरेल’ लेख झाला आहे.

शशी व्यास स्वप्नात तर प्रवास करतातच पण तो प्रवास प्रत्यक्षातही अनुभवतात, म्हणून तर त्यांचा सत्यापेक्षा स्वप्नांवर जास्त विश्वास आहे.

प्रवासी आठवणीचं कोलाज-डॉ. रवी बापट, पक्ष्यांच्या डोळ्यातून कॅप्टन प्रकाश बापट, छंद आकाशाचा- छंद मातीचा- गोपाळ बोधे, हे लेख ह्या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या अंजली कीर्तने ह्यांनीच शब्दांकित केले आहेत. डॉक्टर असूनही लालित्यात रमलेले डॉ.रवी बापट, त्यांना आठवतं आहे तेव्हापासून प्रवासच करीत आहेत. भूगोलाच्या पुस्तकातून भेटणारा निसर्ग हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या प्रवासी आठवणींच्या कोलाजमध्ये लहानपणी आगगाड्यांतून केलेल्या प्रवासाला एक वेगळेच स्थान आहे. कॅप्टन प्रकाश बापट डॉक्टरांचे बंधूच. त्यामुळे त्यांच्याही अंगात हा प्रवास मुरलेला नसला तरच नवल. त्यातून ते लष्करी सेवेतील कसबी वैमानिक. त्यांचे सारे चातुर्य रणभूमीवर म्हणजे रणनभात, पण एकदा वैमानिकांचे प्रशिक्षक असताना त्यांनी आपल्या गावावरूनही घिरट्या मारून बालपणीच्या आठवणी 'हवेत' जागविल्या आहेत. गोपाळ बोधे तर त्यांच्या एक पाऊल पुढेच. नोकरीनिमित्त ते खेड्यातून शहरात आले आणि हवाई छायाचित्रणाच्या छंदामुळे भूमीवरून आकाशात पोहोचले. त्यांना हा छंद कसा जडला, इथपासून ते आपल्या राष्ट्रपतींनी त्यांचे कसे कौतुक केले, ते सारेच विलक्षण आहे. (राष्ट्रपतीही चांगले छायाचित्रकार आहेत म्हणे !)

अंजली कीर्तने मूळच्या लेखिका असल्याने त्यांनी हे अनुभव जसे चांगले शब्दांकित केले आहेत, तसेच त्या स्वतःही एक पर्यटक असल्याने त्यांचे ह्या पुस्तकाचे संपादनही चांगले झाले आहे.

'या प्रवासात नवलाईचं असं खूप काही घडत असतं. अचानक संकटं उद्भवतात, पण परकी माणसं मदतीला धावून येतात. भाषिक अडचणी निर्माण होतात; पण शब्दांपलीकडची हावभावांची, खाणाखुणांची भाषा, नेत्रपल्लवी, करपल्लवी भान प्रकट करतात. जीवन-मरणाच्या सीमेवरचा चित्तथरारक क्षण, नंतरही कित्येक दिवस मन कंपायमान करतो. कधी फजिती होते, पण स्वतःलाच खदखदून हसावंसंही वाटतं. आठवणींची संदूक प्रवासी दिवसांत अनमोल रत्नमाणकांनी गच्च भरते. ती परत परत उघडून न्याहाळावीशी वाटते. असे अंजली कीर्तने ह्यांनी 'प्रवासी पावलांचे ठसे... ह्या आपल्या प्रास्ताविकात म्हटले आहे.

दिवाळी 2001 ची भेट म्हणून 'मॅजेस्टिक’ प्रकाशनाने ही संदूकच वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे. एकच एक प्रवास वाचण्यापेक्षा निरनिराळ्या व्यक्तींनी निरनिराळ्या दृष्टीने, हेतूने केलेल्या निरनिराळ्या प्रवासाची एकच संदूक मिळणे हा वाचकांच्या दृष्टीने चांगलाच लाभ आहे. मात्र ह्यासाठी त्याला 150 रुपये ही पुस्तकाची किंमत द्यावी लागणार आहे.

‘प्रवासी पावलांचे ठसे…’
अंजली कीर्तने

Tags: गिरीश कर्नाड शबाना आजमी यशवंतराव चव्हाण मधु दंडवते सुभाष भेंडे बार्बाडोस द्वारकानाथ संझगिरी रसेल अंजली कीर्तने- प्रवासी पावलांचे ठसे मॅजेस्टिक प्रकाशन पद्मजा फेणाणी दिलीप प्रभावळकर रवींद्र पिंगे अनंत सामंत माधव गडकरी पुष्पा त्रिलोकेकर रजनी दांडेकर आठवणी प्रवासाच्या अनिल बळेल Girish Karnad Shabana Aazmi Yashvantrao Chavan Madhu Dandavate Subhash Bhende Barbados Dwarkanath Sanjhgiri Rasel Anjali Kirtane- Pravasi Pavalanche Thase Majestic Publication Padmaja Fenani Dilip Prabhavalkar Ravindra Pinge Anant Samant Madhav Gadkari Pushpa Trilokekar Rajani Dandekar Aathvani Pravasachya Anil Balel तसेच त्या स्वतःही एक पर्यटक असल्याने त्यांचे ह्या पुस्तकाचे संपादनही चांगले झाले आहे. अंजली कीर्तने मूळच्या लेखिका असल्याने त्यांनी हे अनुभव जसे चांगले शब्दांकित केले आहेत weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल बळेल

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) ते नोकरीस होते. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. त्यानंतर कथा लेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले. पुण्यात ग्रंथाली केंद्राची सुरुवात आणि त्यांचे संचलनही त्यांनी केले. बळेल यांना "विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक' या पुस्तकासाठी कोशकार स. मा. गर्गे पुरस्कार दिला होता. यांसह लेखनासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सत्तावीस पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके