डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तमाशा एक रांगडी गंमत / बाकी शिल्लक / केशराचा पाऊस / हरवले ते... / पूर्णामायची लेकरं / 'आकाशगंगा' एक वास्तविकता आणि ऊर्जाविरोधी तत्त्व

'तमाशा’ : एक रांगडी गंमत 

:: संदेश ज्ञानेश्वर भंडारे :: 

तमाशा हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे हे झाले एक सर्वसाधारण विधान. ते पटवायचे असेल आणि पटवून घ्यायचे असेल तर बघितलेच पाहिजे आणि वाचलेही पाहिजे असे पुस्तक म्हणजे 'तमाशा : एक रांगडी गंमत'. छायाचित्रकार जेव्हा लिहू लागतो तेव्हा किती देखणी आणि वाचनीय पुस्तकनिर्मिती होते, याचे प्रत्यंतरच संदेश ज्ञानेश्वर भंडारे यांनी ह्या पुस्तकाद्वारे घडविले आहे. 

'जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हणतात त्यात- '... आणि छायाचित्रकारही' अशी वाढ करावीशी वाटावे अशीच भंडारे ह्यांनी समरसून ही छायाचित्रे खेचली तर आहेतच, पण केवळ त्यातच हरवून न जाता ज्याने आपण भारावून गेलो ते जीवन आहे तरी कसे, हेही त्यांनी अचूक टिपले आहे. 

काळू-बाळू, गोविंदराव पाटणकर, बायजाबाई सातारकर, गजराबाई कराडकर, शिवकन्या बडे-नगरकर अशा केवळ तमासगीरांकडूनच नव्हे तर रा. चिं. ढेरे, प्रभाकर मांडे, नामदेव व्हटकर अशा अभ्यासकांचीही मते त्यांनी ह्या बाबतीत जाणून घेतली आहेत. 

अस्सल नव्हे पण नक्कल तमाशाही ज्याने कधीच बघितलेला नाही, अशी व्यक्ती सापडणे जरा कठीणच, पण संदेश भंडारे ह्यांनी ज्या नजरेने तमाशा बघितला आहे, त्या दृष्टीने तमाशा बघितला गेला असणेही जरा कठीणच. तमाशा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सांगली-कोल्हापूर, पुणे-मुंबई ह्यांच्यापलीकडे नाहीच अशीच सर्वसाधारण कल्पना, पण तसे नाही. तो विदर्भातही रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत 'खडी गंमत' करत उभा आहे, कोकणातही ग्रामदेवतेची पालखी वस्तीवर आली म्हणून होतो आहे तर मराठवाड्यात नवस फेडण्यासाठी तखतरावाचा तमाशा केला जातो आहे. मावळात भारूडाचाच तमाशा झाला आहे. 

तमाशाला राजाश्रय मिळाला तसा पेशव्यांकडूनच. सर्वांसाठीही ही गंमत लावली जायची आणि तशी ती लावतानाच दंगामस्ती, आरडाओरड करणाऱ्यांस पैसे परत न करता बाहेर काढले जाईल अशी सज्जड बतावणीही केली जायची. तमाशातही बतावणी असायचीच. 'राघ्या म्हार' असे स्पष्ट करून तमाशा व्हायचा, पण प्रत्यक्ष तमाशात अशी कोणतीही जात-पात नसायची- तेथे अगदी मुसलमानांसकट सगळे एकदिलाने एकत्र वावरत असायचे. 'मुंबई नगरी बडी बाका' अशी पट्ठे बापूरावांचीही असायची आणि आण्णाभाऊ साठे यांची वास्तवदर्शी मुंबईही असायची. तमाशातील शृंगाराला नाके मुरडली गेली खरी, पण तो शृंगार आजच्या बारवाला प्रकरणांसारखा कपडे उतरवणारा नव्हता. तमाशात सोंगाड्या केवळ 'गमत्या' नव्हता तर तो तमाशाची रंगत वाढवणारा होता. तमाशातूनच नाटक- सिनेमा-लावणीचे कार्यक्रम निर्माण झालेत आणि तेच भाव खाऊन गेलेत. तमाशा कलावंत बघता बघता वेठबिगार झाला, त्यांच्या अंत्यसंस्कारालाही वर्गणी जमा करावी लागू लागली. 

आता महाराष्ट्राचे हे एक वैशिष्ट्य लोप पावणार का, अशा विचाराने अस्वस्थ झालेल्या भंडारे ह्यांनी सारा महाराष्ट्र केवळ ह्याच एका विचारासाठी अक्षरशः पिंजून काढला आणि त्यांना आढळले की ही कला जिवंत आहे, ती वेळोवेळी काळाशी जमवून घेत आली आहे ती अशी तथाकथित प्रगत विचारांनी, माध्यमांच्या सुळसुळाटांनी आपला अस्सल बाज असा सहजासहजी सोडून देणार नाही. तसे होऊ नये म्हणून तर त्यांनी आपल्या छायाचित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शने भरविली आणि संदर्भमूल्य, संग्रहमूल्य लाभलेली ग्रंथनिर्मितीही केली. 

'डोळे उघडणारे पुस्तक' म्हणत दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांनीही ह्या पुस्तकाबद्दल हेच म्हटले आहे, संदेश भंडारे यांचे प्रस्तुत पुस्तक आहे या स्वरूपाचे, एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज आहे आणि त्याचा गर्भितार्थ सामाजिक आणि राजकीय दृष्टीने पाहणे जरुरीचे आहे. 

लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई.
किंमत : 500/-

----------

'बाकी शिल्लक' 

:: जयवंत दळवी :: 

ही जयवंत दळवी यांची 'बाकी शिल्लक' आहे जी रविप्रकाश कुलकर्णी ह्यांच्या हाती लागली आहे. 'वाङ्मयचौर्या'बाबत कळत-नकळत आरोप कसे होतात आणि आपण अपराधी नसतानाही आपले आपणच संभ्रमात कसे पडतो आणि हा आरोपच मुळात चुकीचा आहे हे सप्रमाण सिद्ध झाल्यावर कसे वाटते ह्याबद्दल दळवींनी जे लिहून ठेवले आहे, ते असंग्रहितच राहिले आहे, हे लक्षात आल्यावर प्रकाशकांच्या उत्तेजनामुळे रविप्रकाश दळवींचे आणखीन काय काय संग्रहात यायचे राहिले आहे ते धुंडाळत गेले आणि 'बाकी शिल्लक' पुस्तक तयार व्हावे इतकी ही शिल्लक त्यांच्या हाती लागली आहे. 'मी का लिहितो?', 'साहित्याने मला काय दिले' असे इतर संकलित संग्रहातील दळवींचा सहभाग आपल्या पुस्तकाचा बाज बघून रविप्रकाशांनी येथेही त्यांना सामावून घेतले आहे. 

जसे ह्या लेखांचे तसेच 'मराठी साहित्य राजकारण-विन्मुख का?', प्रतिभावंतांची प्रेरणा', 'नीतिमूल्ये सतत बदलणार?' दिवाळी अंकातील अशा परिसंवादांचेही. अशा अंकांतील परिसंवादात मांडलेले विचार बहुधा दुर्लक्षित-अप्रसंगहितच राहतात. म्हणूनच दळवींची अशीही टिपणे ह्या संग्रहात दुर्लक्ष न करता घेण्यात आली आहेत. नियतकालिके नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात. पण नियतकालिकांचा जीव थोडा असतो म्हणून ते लेखन पुढे संग्रहित नाही झाले तर तेही अल्पजीवी ठरते. 'धर्मानंद' कादंबरीतील नायक आपल्या जन्मदात्याकडे म्हणजे लेखकाकडे जाब विचारतो आहे आणि त्याला दळवी म्हणजे लेखक उत्तरे देत आहेत, असा एक अभिनय घाट एका अंकाने घातला होता, तोही ह्यात आला आहे. येथे दळवी वाचक-न्यायालयातही उभे राहिले आहेत आणि त्यांनी वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरेही दिलेली आहेत. 

दळवींनाही वाचकांबद्दल, एकूणच माणसाबद्दल उत्सुकता असायची, पण सार्वजनिकरीत्या माणसात मिसळणे ते टाळायचे, ते त्यांच्या अशा कोशातच असायचे, पण एकदा एका मंडळाने त्यांना आपल्याकडे यायला लावलेच पण ओळख करून देतांना त्यांची ओळख करून दिली मधु मंगेश कर्णिक म्हणून, त्यांच्याशी तेथे गप्पा झडल्या, त्या मधु मंगेश कर्णिक म्हणूनच आणि सरतेशेवटी त्यांना तेथे ऐकवण्यात आले की, पुढच्या महिन्यात आम्ही जयवंत दळवींनाही असेच गप्पांसाठी बोलवणार आहोत! दळवींची 'चक्र' आणि मधु मंगेशांच्या 'माहीमची खाडी' ह्या 'झोपडपट्टीतील जीवन' ह्या एकाच विषयावरील कादंबऱ्यांमुळे हा घोटाळा झाला होता- अशीही आफत ह्या पुस्तकात आली आहे. अशा आफतीपेक्षा मासळी बाजारात फिरणे दळवी अधिक पसंत करायचे. 'मासे' हा त्यांचा एक 'वीक पॉईंटच-तो त्यांच्या लेखनात हातचे न राखता आला आहे. 

दळवी माणूसघाणे मुळीच नव्हते. माणसाला 'न्याहाळणे' त्यांना मनापासून आवडायचे. ह्या माणसात लेखकांबद्दल उत्सुकता असते हे तेही जाणून होते. त्यांनीच म्हटले, 'लेखक या प्राण्याबद्दल सार्वत्रिक कुतूहल असते. मी अमेरिकेत काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा श्रेष्ठ अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांना अशा कुतूहलापोटी भेटण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला होता, परंतु सारे प्रयत्न व्यर्थ गेले. टेलिफोनवरून त्यांच्याशी बोलतासुद्धा आले नाही. मी स्वतः लेखक असूनही मला दुसऱ्या लेखकाबद्दल कुतूहल होते. यावरून सर्वसामान्य रसिक वाचकांना लेखकांबद्दल किती कुतूहल असते याची कल्पनाच केलेली बरी!'

दळवींबद्दलचे कुतूहल शमवणारे आणि वाढवणारेही असे हे 'बाकी शिल्लक'. 

नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.
किंमत : 200/-

----------

केशराचा पाऊस 

:: मारुती चित्तमपल्ली ::

यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे लेखन वेगळे आहे असे म्हटले जात होते, ते वेगळे म्हणजे काय कळावे असेच आहे 'केसराचा पाऊस!' मारुती चितमपल्ली ह्यांचे शिक्षणानंतरचे सारे जीवन जंगलात गेले आहे, केवळ 'चाकरी' म्हणून नव्हे तर मनापासून ते त्या जीवनात रमले आहेत. त्यांनी ते जीवन आपलेसेही केले आहे, म्हणूनच म्हटले तर ह्या आत्मकथा आहेत किंवा आत्मानुभवी कथा आहेत. मुळात हा कथाबाजच वेगळा आहे, त्यात एक सलगताही आहे. हे वेगळे लेखन चितमपल्लींनी अर्पण केले आहे तेही एलेआर बुफे ए. मेंढपाळ (फ्रान्स), हुगो वुडस्- वनाधिकारी (हत्तीचा पर्वत, द. भारत) सिल्टर गिराडबाई (मेळाट) ह्या जंगलप्रेमींनाच!

ह्या कथांतील नायक कधी श्याम आहे, कधी माधव आहे, परंतु त्यांच्यात मारुतरावच दडलेले नाहीत ना असे वाटावे अशी स्थिती आहे. जसे ललित लेखनात लेखक ह्या ना त्या स्वरूपात असतोच, पण येथे ही शव त्यांनी ज्या रीतीने जंगल- अनुभव लिहिले आहेत त्याने वाढली आहे. नायिकाही सुमित्रा, रेवती, अशा वेगवेगळ्या असल्या तरी त्याही 'कल्पित' नव्हे तर खरोखरच्याच वाटतात- ही दाद लेखकाच्या लेखनात देण्यासारखीच! 

दोन हात सहा डोळे ही दीर्घकथा तर ह्यात लाजवाबच! मध्य प्रदेशातील बस्तर वनविभागातील ही कथा. बस्तरच्या जंगलात राहणाच्यांना रायपूर हे जवळचे शहर. तेथेच कथेतील नायकाला राधिका भेंटली भाषाप्रेमी, साहित्यप्रेमी आणि जंगलप्रेमीही. शिकारकथा लिहिणाऱ्या श्यामचे आणि तिचे चांगले जमते आणि त्याच्याशी ती समान आवडीमुळे लमही करते. परंतु त्याला ती समीप येऊ देत नाही. कुंवार बनात कुमारी म्हणून स्वच्छंदपणे फिरल्यानंतरच आणि नंतरही वृक्षाला लगडून बेलीने वाढावे तसेच आपले सहजीवन असावे अशीच तिची भावना असते. 

ह्या कथेत कबीराचा दोहा चपखलपणे आला आहे, तर कोरकू गीतांबरोबर बहरलेल्या प्रेमकथेचे नावच मुळी आहे 'सप्तसूर. ' ओंकारीचे हे मुग्ध प्रेम चटका लावून जाणारे आहे. तुमच्या निसर्गलेखनात नुसतीच वर्णनं आणि शब्दचित्रं येत नाहीत, तर त्यात तुमचे चिंतन-तत्वज्ञान आहे' असे मानणाऱ्या डॉ. अश्विनीने महाबळेश्वरी लेखकाचे चांगलं आदरातिथ्य केले, पण काहीच साधत नाही म्हणून ती मनोमन अस्वस्थ होती तेव्हा लेखकाने तिला 'जीवनरहस्य' उलगडून दाखवताना म्हटले आहे, 'जीवनात अपेक्षेप्रमाणे सर्वच गोष्टी साध्य होत नसतात. त्यातील एखाद दुसरीच हाती लागते. त्यातच समाधान मानायचे असते. 

सुमित्रा लेखकाचा वृत्तपत्रातील परिचय वाचून केवळ पक्षिनिरीक्षणातील पहिले धडे गिरविण्यासाठी दूरवरचा प्रवास करून नागपूरला आलेली असते आणि मग साहजिकच एका भावविश्वाबरोबरच जंगल-निसर्गविश्वही ह्या लेखनातून रंगत जाते. एके दिवशी सुमित्रा त्या साऱ्या थोर आठवणी घेऊन परतते तसेच वाचकांचेही होते आणि परदेशातून भ्रमनिरास होऊन परतलेल्या रेवतीला जसे ह्या 'सरां' बरोबर नर्मदापरिक्रमेला जावेसे वाटते तसेच वाचकांचीही होते. 

ह्या कथेतील एका कथेचे नावच मुळी आहे 'जंगलातला वनस्पतिशास्त्रज्ञ'. ह्या माहितीपूर्ण कथेतील हा शास्त्रज्ञ आहे अस्वल, मात्र ह्या 'अस्वली' अनुभवात कोठेही क्लिष्टता नाही आणि हेच ह्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे की ते कथानकप्रधान नसूनही कंटाळवाणे झालेले नाही. 
'वृक्ष, वनस्पती, सृष्टीतील प्राणिमात्रांशी न घाबरता संवाद साधता येतो' हे लेखकाचे म्हणणे पटावे असाच हा संग्रह आहे-ज्याचे मुखपृष्ठ अनिल उपळेकर ह्यांनी तयार केले आहे आणि आतील रेखाटनांनीही वाचनानंदात भर घातली आहे. 

साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन, नागपूर.
किंमत : 150/-

----------

'हरवले ते...'

:: म. वि. सोवनी ::

हरवले ते... दिवस मनात आठवणींचा पिंगा घालत असतात. त्यात जसे सुखद, दुःखद क्षण असतात; आवडत्या, नावडत्या व्यक्ती असतात तशाच काही वस्तू-चिजाही असतात. कालौघात ते सारे बाजूला पडलेले असते. त्यांची जागा नव्या अत्याधुनिक वस्तूंनी घेतलेली असते. 'भारनियमन' जाचक वाटू लागले कारण आपल्याला विजेची सवय झाली, पण ती मुळात नव्हतीच तेव्हा? आजही ती अगदी सर्वत्र आहेच असेही नाही. तेथे ज्या दिव्यांनी अंधारात वातावरण प्रकाशमय होते, तेच दिवे तेव्हा सर्वत्र होते, त्या दिव्यांतही किती विविधता होती- 'चिमणी' होती, स्टैंड होता आणि भडभडाही!

गोपाळकृष्ण गोखले ह्यांनी रस्त्यावरच्या म्युनिसिपालिटीच्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला म्हणे! पण म्हणजे काय? हा काय प्रकार आहे? मुळात कंदील म्हणजे? हे सारे आता कॉम्प्युटर युगात हरवलेच. 

कॉम्प्युटर युगातील मुलांची खेळणीही मोठ्यांनी थक व्हावे इतकी आधुनिक झाली आहेत आणि ती मिळण्याची दुकानेही ठायीठायी सजली आहेत. पूर्वी अशी दुकाने कोठे होती आणि खेळणी तरी? तेव्हा प्रत्येक घरात 'ठकी' मात्र हमखास असायचीच, सगळीकडे द्याच नावाने संबोधले जावे अशी ती होती कशी?

पूर्वी स्त्री-वर्ग बहुतांशी घरातच असे. कुणाकडे 'बसायला' जायचे झाले तर, चैत्रगौर म्हणून जायचे झाले तर त्या 'फणी-करंडा पेटी' समोर बसून चांगली 'वेणी-फणी' करून जात, त्यांना फणीही लाकडीच लागे. गावाला जायचे झाले तर वाटेत पाणी प्यावेसे वाटले तर 'फिरकीचा तांब्या' बरोबर हवाच असायचा. 

पूर्वी आंघोळीसाठी 'घंगाळा'त पाणी घेणे बरे वाटायचे, बाहेर पडताना गळ्यात शबनम अडकवण्यापेक्षा 'पडशी' बरी वाटायची, 'ढबू पैसा' देऊनही बरेच काही मिळायचे, घरात काहीबाही ठेवण्यासाठी कोनाडा असायचा, काही अडकविण्यासाठी 'खुंटी' असायचीच. हे सारे कोठे गेले? मुळात हे 'घंगाळ, पडशी, खुंटी' वगैरे म्हणजे काय तेच हे हरवले ते... '

मधुकर विष्णू सोवनी ह्या हरवल्यात हरवून गेले आहेत. तो त्यांचा ध्यास आहे आणि हव्यासही. 'मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार' हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता ( ही पीएचडी त्यांनी केली आहे सेवानिवृत्तीनंतर) त्यांनी 'महाराष्ट्राच्या कालमुद्रा' ही टिपल्या आहेत. म्हणजे जुन्या जपून ठेवाव्याशा वाटाव्या अशातच रमणे ही त्यांची आवड, बदलत्या काळाबरोबर बदलले पाहिजे, जुन्यात अडकून न पडता नवे स्वीकारले पाहिजे हे तर खरे पण ज्याने आपण घडत गेलो, त्यात मश्गुल होण्यातही गैर काही नाही. ही मश्गुलता कशाची हे इतरांना सांगितले तर ज्यांनी हे अनुभवलेले असेल, त्यांनाही पुनर्प्रकल्पाचा आनंद मिळेल आणि ज्यांना हे काहीच माहिती नाही त्यांना ते कळेल तरी म्हणून हा सोवनी लेखनप्रपंच! विषयाश 'धरून' मुखपृष्ठ आणि आतील चित्रेही. ही कामगिरी कुमार गोखले-सतीश देशपांडे ह्यांची. 

भारद्वाज प्रकाशन, पुणे.
किंमत : 85/-

----------

पूर्णामायची लेकरं

:: गोपाळ नीलकंठ दांडेकर :: 

गोपाळ नीलकंठ दांडेकर म्हणजे आशिक मस्त फकीरच. पायाला भिंगरी लागल्यासारखी त्यांना अखंड भ्रमंती केली. ह्या भ्रमंतीत ते जितके कोकणातले तितकेच पार विदर्भाचेही. त्यांच्या लेखनात ते वैदर्भीपण वाटावे असा तिकडील भाषेच्या सान्या लकबांसह विदर्भ आला आहे. त्याचा अस्सल इरसाल बाज म्हणजे त्यांची 'पूर्णामायची लेकरं' ही कादंबरी. ही कादंबरी त्यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी लिहिली असावी- तिची पहिली आवृत्तीच 1958 साली प्रसिद्ध झालेली आहे. 

त्यानंतर तिच्या आवृत्त्याही आल्या आहेत, परंतु तरीही ती अलीकडे मिळेनाशीच झाली होती म्हणून तिचे हे पुनर्मुद्रण. शि. द. फडणीस ह्यांच्याच रेखाटनांसह. शि. द. नी गोनीदांच्या लेखणीतून उतरलेली व्यक्तिचित्रे अगदी जशीच्या तशी कुंचल्यात पकडली आहेत आणि त्यांनी मुखपृष्ठावरही स्थान मिळविले आहे. 

बन्हाडातील पूर्णामाय म्हणजे काही गंगा-गोदा नव्हे. ती आपली लहानुलीच. तिच्या काठच्या तशाच लहानशाच बेलोऱ्याचा बळीराम ढोमने त्याच्या मताप्रमाणे आता थकला होता. म्हणजे त्याचे फार वय झाले होते असे नाही; आत्ताशी तर त्याने पन्नाशी ओलांडली होती. त्याची पंचाहत्तरीतील अलोकबुढी 'फुटकी' असली तरी अजूनही खमकी होती. त्याची बायको मेनका एक नंबरची आळशी आणि झोपाळू. सासूला सुनेशी भांडभांडे भांडावेसे वाटे, पण सून अशी की एक नाही आणि दोन नाही. त्यामुळे पंचाईत होई तो बुढीचीच. तरीपण भरीत भर घालायला तिच्या इवलीभोवती इतर बुक्या होत्याच. बळीरामला दोन पोट्टेही होते. रूपराव आणि मोकिदा, रूपरावच्या डोक्यात सारखा 'आखाडा'च असायचा त्यामुळे बळीरामला भरवश्याचा वाटायचा तो धाकला मोकिदाच. 

तसे हे सुखी कुटुंब होते, पण गावात नंगेबाबा येतो आणि कोणाशीही चकार शब्द न बोलणारा हा बाबा अलोकबुढीच्याच झिज्या पकडून 'भाकर- भाकर म्हणतो आणि सान्या गावाच्या दृष्टीने ही बुढीच भाग्यवान ठरते. गावकरी त्या बाबाला भाकर तर द्यायला लावतातच, पण साऱ्या गावालाही गावजेवण घालायला लावतात, ह्या सान्यात कंबरडे मोडते ते ह्या सान्याशी काही देणे-घेणे नसणाऱ्या बळिरामचे. आपल्या मनीचे कोणाजवळ बोलावे तर ते मोकिंदाजवळच असे बळीरामला वाटते, पण घरात काही बोलणे शक्यच नव्हते म्हणून रात्रीचे जेवण झाल्यावर बळीराम गोड बोलून मोकिंदाला वावरात घेऊन जातो आणि तेथपासून भुताटकीचे नवेच नाट्य निर्माण होते. बळीरामला अगदी नको नको होऊन जाते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बाहेर गेलेला बळीराम खरोखरच एका बुवाच्या संगतीत राहू लागतो आणि त्या संगतीत घरापासूनच दूर जाऊन लागतो, पण परत घराकडे येतो तो मुलांमुळेच. ह्यात मोकिंदाला कबूल केलेले काशीबनारशी राहूनच जाते आणि घरावर रागवून त्या यात्रेला निघालेली अलोकबुढोही माघारी परतते ती मुलांमुळेच, पण सुनेवर तोंडसुख घेत घेत! 

मृण्मयी प्रकाशन, पुणे
किंमत : 150/-

----------

विज्ञानाला आवश्यक अशा नवीन शास्त्रीय सिद्धांताची ओळख 

'आकाशगंगा' एक वास्तविकता आणि ऊर्जाविरोधी तत्त्व

:: पद्माकर नगरकर :: 

हे द्वैभाषिक पुस्तक आहे आणि ते काय आहे हे पुस्तकाच्या शीर्षकातच सूचित झालेले आहेच. आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत- हे शतक विज्ञानाचे आहे. ह्या विज्ञानाने आपल्याला पुढे-पुढेच नेले आहे, पण त्या धांदलीत त्याने वैश्विकतेचे गूढ कोडे उकललेच नाही किंवा, ते त्याला जमलेच नाही. हे गूढ़ असे आहे की भलेभलेही ते शेवटी नियतीवर सोडून मोकळे होतात. सारे काही नियमित चालू असते म्हणजे नारळाच्या झाडाला नारळच येतात, आंबे नाही येत पावसाचे पाणी स्वच्छ, शुद्धच असते- खारट नाही; विशाल समुद्रामध्ये माशांची शिकार होते म्हणून माशांनी अंडी न घालण्याचे किंवा पाण्याबाहेर किनाऱ्यावर येऊन आत्महत्या करण्याचे ते ठरवीत नाहीत; आकाशात कोणताही तारा दुसऱ्या तान्यावर जाऊन आदळत नाही किंवा कोणताही ग्रह कोणत्याही ग्रहाशी वितुष्ट अथवा लगट करीत नाही - मग मानवी समाजामध्येच ह्या सर्व विसंगती का? का? ह्या 'का'तूनच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. हा खटाटोप वैश्विकतेप्रमाणेच अमर्याद आहे पण लेखकाने त्यात आटोपशीरताच स्वीकारली आहे. ऊर्जाविरोधी तत्त्वामुळे जी किमया घडली तिचे फक्त स्वरूप मांडण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो स्वाभाविकता न अव्हेरता विचारात घ्यावा अशी लेखकाची इच्छा आहे. 

ही इच्छा व्यक्त करतानाची टिप्पणीही विषयाला धरून आहे ती अशी - 'मनोगत ही मनाची, गतमनाची गती बौद्धिक पक्षाधारित आहे. त्या गतीला एकट्या ऊर्जेचे बळ मिळाल्यास ती चौखूर उधळते. ती उद्दिष्टरहित चौखूर उधळू नये म्हणून विरोधी तत्वाचे लगाम असंतात - गतीमध्येही दोन क्षमता असतात - पुढे जाणारी - थांबवणारी. त्या आळीपाळीने सक्षम होतात, त्यामुळे गतीचे अस्तित्व सिद्ध होते... '

आकाशगंगेची वास्तविकता काय आहे? तिचा आणि पृथ्वीचा काही संबंध आहे का?' ह्याचे प्रतिपादन करताना सजीवात्मकतेच्या निर्माणाकरिता आवश्यक क्षमतेच्या गरजेला लागणाऱ्या दोन वैश्विक मूलतत्त्वांचे सान्निध्य पृथ्वीवरच उपलब्ध आहे आणि ते अस्तित्व आकाशगंगेप्रमाणेच लाभले आहे असे येथे म्हटले गेले आहे. 

हे सारे कदाचित एका वाचनातून पटणार नाही - कळणार नाही परंतु लेखनाच्या नेमकेपणामुळे ते पुनश्च वाचल्यास अधिक विचार करायला लावेल. कदाचित काही लेखकाला विचारायलाही प्रवृत्त करेल. तसे झाले तर लेखकाला हा संवाद हवाच आहे. 
ह्या पुस्तकातून मानवकुंभामधून स्वाभाविक प्रगत होत गेलेला मानव दिसतो.

प्रकाशक : संगीता नगरकर, पुणे
किंमत : 60/-

Tags: वाचन पुस्तक परिचय अनिल बळेल पुस्तक परीक्षण पुस्तक Literature Reading Book Introduction Book Review Books weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल बळेल

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) ते नोकरीस होते. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. त्यानंतर कथा लेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले. पुण्यात ग्रंथाली केंद्राची सुरुवात आणि त्यांचे संचलनही त्यांनी केले. बळेल यांना "विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक' या पुस्तकासाठी कोशकार स. मा. गर्गे पुरस्कार दिला होता. यांसह लेखनासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सत्तावीस पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके