डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

धनंजय / समग्र बालकवी / शरद पवार आणि मी / जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग / कंगालांचे अर्थशास्त्र  / आम्ही भगीरथाचे पुत्र 

धनंजय

:: राजेन्द्र खेर :: 

महाभारतातील आणखीन एक कादंबरी असे 'धनंजय' कादंबरीबद्दल नाही म्हणता येणार; कारण राजेन्द्र खेर ह्या नव्या पिढीतील लेखकाने वाचले महाभारत आणि लिहिली कादंबरी, असे हे केलेले नसून त्यांनी महाभारत सखोल अभ्यासिले आहे. एकदा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनातून त्यांनी (लेखकाने) अर्जुनाच्या गुणांचे संकीर्तन ऐकले तेव्हाच तो विषय त्यांच्या मनात जाऊन स्थिरावला आणि लगेच त्यांनी लिहायला नव्हे, तर अभ्यासाला सुरुवात केली. जी माहिती आहे त्या 'मळलेल्या वाटेवरून' त्यांना जायचे नव्हते; तर तौलनिक अभ्यास करून त्यांना आपली अशी वाट तयार करायची होती. त्यासाठी त्यांनी मराठीतीलच नव्हे तर इंग्रजीतीलही अनेक ग्रंथ आधी नीटपणे वाचलेत.

असा अभ्यास केला तरी महाभारत ते महाभारत, ते काय बदलता येणार? कथानक जरी जवळजवळ तसेच असले, तरी त्याची उकल बदलता येते न् राजेन्द्र खेर ह्यांचे भाग्य म्हणजे त्यांनी लेखन सुरू करण्यावेळी पुण्यातच अलेक्झांडर', 'ट्रेस' हे चित्रपट झळकले व ते बघितल्याचा त्यांना महाभारतीय युद्ध रंगवायला चांगला उपयोग झाला. दिग्विजय करताना अर्जुन मानस सरोवराजवळ गेला होता तो प्रसंग लिहिण्यापूर्वी त्यांना अवचितपणे 'संस्कार' चॅनेलवर 'मानस सरोवर यात्रा' बघायला मिळाली, पांडवांचे स्वर्गारोहण लिहिण्याच्यावेळी अशीच 'बद्रीनाथ-स्वर्गारोहिणी' ही व्ही.सी.डी. त्यांच्या हाती लागली. 'हिस्टरी’ चॅनेल वर ते देवांची विमाने बघत होते, तेव्हाच त्यांचे अर्जुनाचे देवलोकात झालेले गमन लिहिणे चालू होते. साहजिकच ह्या साच्याचा त्यांच्या लेखनात वास्तव यायला उपयोग होऊन ते केवळ अद्भुत, चमत्कारिक, अनाकलनीय राहिले नाही.

पितामह भीष्म शरपंजरी पडले होते. राजेन्द्र खेर ह्यांच्या मते त्याचे असे झाले, पितामह जोवर युद्धात उभे आहेत तोवर हे युद्ध निकाली होणे नाही, हे लक्षात आल्यावर श्रीकृष्ण, युधिष्ठिर, अर्जुन वेषांतर करून त्यांना भेटायला गेले होते. त्यांची अडचण लक्षात घेऊन पितामहच त्यांना म्हणाले होते, 'मी इच्छामरणी आहे. माझ्याच इच्छेनं माझा मृत्यू होणार, दुसऱ्याच्या नव्हे, हा धनंजय माझ्याशी निकराचं युद्ध करीत नाही, हे माझ्या ध्यानात आले आहे. अमंगल माणसाला पुढे करून युद्ध करणाच्या वीराशी मी कधीही लढत नाही, तुम्ही तुमच्याकडील शिखंडीमुळे असं करू शकता. मनाविरुद्ध का होईना अर्जुनाने तसेच करून वेगवान बाणांचा अविरत शरवर्षाव केला, त्याच शरसंधानाने पांडवांना जे साधायचे होते ते साधले गेले, अनिच्छेने का होईना! ह्याचप्रमाणे द्रौपदी पाचही पांडवांच्या मनात भरली होती खरी; पण तिला जिंकली होती अर्जुनानेच. तरीही ती पाचहीजणांची झाली ती केवळ 'सासूच्या गाफीलपणामुळे नव्हे तर भेदनीती राहू नये म्हणूनही!

खांडववन कृष्णार्जुनांनी का जाळले ह्याचे समर्पक उत्तर शोधण्याचा जसा खेर ह्यांनी प्रयत्न केला आहे तसेच द्वारकेनजीकच्या सुमद्रात सापडलेले जुन्या द्वारकेचे अवशेष, त्या अनुषंगाने मिळालेली माहिती ह्या आधारे त्यांनी येथे 'द्वारकाबुडी' सविस्तरच लिहिली आहे. तसेच ह्या द्वारकेची आणि इतरत्र न बघायला मिळणारी अनेक छायाचित्रे ह्या कादंबरीच्या अखेरीस देण्यात आली आहेत. अखेरची 'कुरुंची वंशावळ' ही ह्या नातेसंबंधातली तणाव उलगडण्यास उपयोगी पडणारी आहे.

येथील महाभारत, अर्थातव अर्जुनाद्वारे सांगितले आहे आणि ते त्याने अंतिम प्रवासाकडून सांगणे सुरू केले आहे. मुखपृष्टकार आहेत सतीश देशपांडे.

विहंग प्रकाशन, पुणे
किंमत : रु. 350/-

----------

समग्र बालकवी 

:: संपादक - नंदा आपटे :: 

'श्रावणमासी हर्ष मानसी 
हिरवळ दाटे चोहिकडे 
क्षणात येते सरसर शिरवे, 
क्षणात फिरुनी ऊन पड़े

किंवा

हिरवे हिरवे गार गालिचे 
हरित तृणांच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती 
फुलराणी ती खेळत होती...

हे काव्य माहिती नाही; आणि ते बालकवींचे आहे, हेही माहिती नाही, असा मराठी रसिक भेटणे अशक्यच पण त्या रसिकातल्या रसिकालाही 'समग्र बालकवी' माहिती असतीलच असे नाही. 'बालकवी' म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि त्यांनी पद्याबरोबर गद्य लेखनही केलेले आहे हेही नव्या पिढीतील सांगू शकणारे रसिक दुर्मिळच, म्हणूनच 'पॉप्युलर' प्रकाशनाने त्यांच्या श्रेष्ठ ग्रंथांच्या परिपूर्ण संहिता, सुबक मुद्रण व टिकाऊ बांधणी स्वरूपात प्रकाशित करण्याच्या श्रेयस योजनेअंतर्गत हा संग्राह्य ग्रंथ प्रकाशित केला आहे.

बालकवींचे काव्य, इतकी वर्षे होऊन गेलीत तरी, अजूनही मोहविते, परंतु त्यांच्या हयातीत मात्र त्यांचा एकही संग्रह प्रकाशित होऊ शकला नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतरही पाच वर्षांनी म्हणजे 1923 साली भा. ल. पाटणकर यांनी 'बालकवींची समग्र कविता' परिश्रमपूर्वक संपादित केली होती. त्यानंतर बालकवींच्या खुद्द पत्नीनेही असा प्रयत्न केला होता; पण हेही सारे आता दुर्मिळ झाले आहे आणि त्या त्या संपादकांनी ह्या कविता संकलित करताना आपले असे स्वातंत्र्यही घेतले होते. नंदा आपटे यांनी मात्र ही ‘श्रेयस' आवृत्ती संपादित करताना 'बालकवी' जसेच्या तसे पेश केले आहेत न् त्यासाठी त्या केवळ आधीच्या संग्रहांवर अवलंबून न राहता अधिक खोलात गेल्या आहेत. जेथे असा पर्याय नव्हता, तेथे त्यांनी हे काव्य टीपांसह, पाठभेदांसह मांडले आहे. हा प्रवास काव्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी बालकवीच्या गद्यांचाही वेध घेतला आहे. 

मात्र या संग्रहात गद्याचा समावेश करताना ह्या कवीची 'कवी' म्हणून असलेली छापच अधिक लक्षात घेतली गेली आहे. 'पर्जन्यदेवी', 'आप्रदेवी', 'घोसळीचा वेल' अशा त्यांच्या कथाशीर्षकांवरूनही हे लक्षात येण्यासारखे आहे. ह्या संकलनातील शेवटची खार' ही कथा खारूताईसारखीच चिटुकलीशी आहे. बालकवींची काही पत्रेही या संग्रहात आहेत. त्यांतील एका पत्रावर पाठविण्याचा पत्ता असा आहे : अहमदनगर, फर्ग्युसन गेट, टिळकांची वाडी, मधले घर, माठानजीक, जात्याशेजारी लहानसे अंथरुण, त्यावर निजलेल्या लक्ष्मीबाईंच्या उशानजीक 3.3.1914.

ह्या संग्रहातील काव्य काय, गद्य काय किंवा त्यांची पत्रे काय हे सर्व कोमलहृदयी बालकवी न् त्यामागे दडलेली वेदनाही कळावी असेच आहे. संपादिकेने आपल्या दीर्घ 'प्रास्ताविका’मधून ही कविता जशी अलगदपणे उलगडवून दाखविली आहे, तसेच तिने या कवीच्या व्यक्तिगत जीवनावरही प्रकाश टाकला आहे. त्यानेही काव्य आकलणे अधिक सुलभ झाले आहे.

बालकवी हा ध्यासाचा विषय असलेले गोव्यातील प्राध्यापक एस. एस. नाडकर्णी यांनी ह्या ग्रंथाला दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ते नुसते प्रस्तावनाकार नसून त्यांनी हा ग्रंथ निर्दोष आणि परिपूर्ण कसा होईल याचीही दक्षता घेतली आहे. बालकवींच्या वेळोवेळी प्रकाशित झालेल्या कविता, त्यांचे झालेले संग्रह, त्या काव्यावर जाणकारांनी निमित्तानिमित्ताने व्यक्त केलेली मते ह्या साऱ्यांचा परामर्ष घेत आपली मतेही ठोसपणे मांडली आहेत, त्यामुळे ही समग्रता वाचून वाचकाला 'श्रेयस’ लाभल्याचे समाधान मिळणार आहे.

बालकवींनी पहिली कविता केली त्याला आता शंभर वर्षे होऊन गेली आहेत. 1903 सालची ह्या संग्रहाच्या प्रारंभीची ती कविता आहे

'निंब जांब, जांभूळ शेंदरी
तुळशी बहुतचि झोक मारी।
जणू काय ती येइ धाउनी 
असेच वाटे पहा साजणी।

पाँप्युलर प्रकाशन, पुणे
किंमत : रु. 400/-

----------

शरद पवार आणि मी 

:: ना. धों. महानोर ::

‘शरद पवार आणि मी’ हे पुस्तकाचे नावच पुरेसे बोलके आहे. या पुस्तकातून शरद पवार जसे कळणार आहेत तसेच ना. धों. महानोर. राजकारण, राजकीय पद बाजूला ठेवता शरद पवार शेतकरी असून काव्यप्रेमी आहेत, तर ना. धों. महानोर कवी असून शेतकरीही आहेत. ह्या दोघांमधील हे समान धागे आहेत आणि ह्या धाग्यांनीच ह्या दोघांमधील मैत्री अतूट राहिलेली आहे. एवढेच नव्हे तर ती केवळ ह्या दोन फेऱ्यांतच फिरत राहिलेली नसून तिने ह्या दोघांची व्यक्तिगत सुखदुःखेही आपलीशी केली आहेत. हे सारे कसे घडत गेले ते ह्या कवीने वाचकांना विश्वासात घेऊन सांगावे म्हणूनच प्रकाशकांनी मुद्दाम त्यांना ह्या विषयावर लिहिते केले आहे.

राजकारण, समाजकारण, क्रीडा, खेळ, साहित्य अशा नानाविध क्षेत्रांत रस असलेल्या मूळच्या शेतकरी शरद पवारांबद्दल महानोरांना कुतूहल होतेच. अशा व्यक्तिमत्त्वाने ते तरुण वयात मंत्रीही झाले होते. तेव्हा त्यांना एकदा भेटावे म्हणून 1973 साली शरदराव औरंगाबादला आले असता महानोरांनी तसा प्रयत्न केला होता. मंत्र्यांभोवती किंवा कोणत्याही 'व्ही.आय.पी.' भोवती लोकांचा जो वेढा असतो, तो ह्या बाबतीत टोलवाटोलवीच करत असतो. महानोरांनाही त्यावेळी तो अनुभव आला. अखेर महानोरांनी आपल्या नावाची चिट्ठी आत पाठवल्यावर त्यांना आतून लगेच 'बोलावा' आला न् तीच त्यांची अशी आडकाठी न होता झालेली पहिली भेट ठरली. शरदराव महानोरांचे नाव ऐकून होतेच, त्यामुळे त्या पहिल्या भेटीत त्यांनी त्यांचे कवी म्हणून स्वागत तर केलेच पण शेतीतल्या नव्या प्रयोगाविषयी गप्पाही केल्यात. दोघांनाही आपला खरा भिडू सापडल्याचा आनंद देणारा तो दिवस होता.

यशवंतराव चव्हाण यांनीही महानोरांना वेळीच 'जोखले' होते. त्यांच्यातही अतूट स्नेह निर्माण झाले होतेच. त्यांनीही ह्या मैत्रीला उत्तेजनच दिले, कारण अन्य क्षेत्रांत नाव कमवत असले तरी हे दोघेही मुळात शेतकरी आहेत, काळ्या मातीत रमणारे आहेत आणि तिच्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेता येईल ह्याबद्दल दक्ष आहेत, हे ते जाणून होते.

यशवंतराव काय किंवा शरदराव काय ह्या दोघांनाही साहित्याचा ओढा, साहित्यक्षेत्री काय चालले आहे ह्याची जानकारी, नव्या पुस्तकांबद्दल उत्सुकता, यानेही ही मैत्री दृढ झाली न् महानोर आपल्या जवळ कसे येतील असाही शरदरावांनी प्रयत्न केला. ह्यावर कवी फ. मु. शिंदे एकदा जाहीरपणे शरदरावांना म्हणाले होते, 'राज्यपाल, नामनियुक्त आमदार आता भरायचे आहेत. तुम्हांला कवीशिवाय सभागृहात करमत नाही आणि तुम्ही कवी महानोरांसारखे तिथे घेता. मी कवी असून तुम्हांला दिसत नाही.' त्यावर शरद पवार यांनीही त्यांना सुनावले होते, 'कवी महानोर ग्रामीण भागातून शेती, पाणी यांचे महत्त्वाचे अनुभवाचे प्रयोग व मुद्दे घेऊन आले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष काम केलेले आहे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेतही उमटलं आहे. तुम्ही असं काही करून दाखवा; वात्रटिका न् करमणुकीच्याच कविता न करता असं काही केलंत तर तुमच्याही नावाचा विचार होईलच...'

चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना आपल्या नामदेवाचे, त्यांच्या पारदर्शक भाषेचे जसे कौतुक केले आहे तसेच शरदरावांचेही - त्यांच्या अचूक वेध घेण्याचेही.

संतुक गोलेगावकर यांनी प्रकाशकांच्या ह्या एक हजाराव्या पुस्तकाची मुखपृष्ठरचना केली आहे. 

साकेत प्रकाशन, औरंगाबाद 
किंमत : रु. 100/-

----------

जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग

:: रत्नप्रभा जोशी :: 

चित्रपट-नाट्यक्षेत्रातील कलावंतांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल त्यांच्या चाहत्यांत जसे सुप्त कुतुहल असते तसेच साहित्यप्रेमी वाचकांच्या मनातही साहित्यिकांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल असतेच. ज्यांचे लेखन आपण एवढ्या आवडीने वाचतो ते लेखक दिसतात कसे, बोलतात कसे हे बघायला साहित्य संमेलनासारख्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने वाचक येतात, ते याच जिज्ञासेपोटी. हे सारस्वत घरात कसे वागतात, राहतात, त्यांच्या लेखनातून जे संसारचित्र निर्माण होते तसाच त्यांचा संसार असतो का, असे काही जाणून घ्यावेसे वाचकांना वाटत असते. रत्नप्रभा जोशी हे सारे समजून घेण्यासाठी निरनिराळ्या साहित्यिकांच्या जीवनसाथींना भेटल्या आहेत व तेथे त्यांचे जे बोलणे झाले ते ह्या पुस्तकात आले आहे. 

हे जीवनसाथी आहेत; म्हणजे लेखकाची पत्नी आणि लेखिकेचा पती ह्यांना येथे बोलते करण्यात आले आहे. अर्थात तेथे पहिलाच प्रश्न असा निर्माण होतो, की हे तरी आपल्या जोडीदाराचे लेखन वाचतात का, त्यांना त्याबद्दल आत्मभाव वाटतो की नाही? ह्याबद्दल रत्नप्रभाबाईंची शालिनीताई (ज्ञानेश्वर नाडकर्णी) बद्दलची नोंद अशी आहे-शालिनीताई पोटतिडकीने बोलत होत्या. मराठी लेखनाचं साहित्यिक मूल्य व भारतीय साहित्य-कला-संस्कृती यांची समीक्षा इंग्रजीत करून जगभर पोहोचण्याचा नाडकर्णीचा सतत चाललेला प्रयत्न, जागतिक संस्कृतीशी त्यांचा येणारा संपर्क याबद्दलही शालिनीताईंच्या बोलण्यात अभिमान प्रकट होत होता. पद्मजा फाटक ह्यांचे पती श्रीयुत शशिकांत ह्यांच्याबद्दल रलप्रभावाईचे म्हणणे आहे, 'फाटकांशी बोलल्यावर मला जाणवलं की पद्मजाताईंचे 'बबलिंग' व्यक्तिमत्त्व हे आम्हाला दिसत असले तरी ते सागरासारखं आहे. विचारप्रक्रियेत त्यात मूळ शांत उठलेले बुडबुडे क्षोभक न होता फक्त लोभस रूप घेतात इतकंच.

श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, के. ज. पुरोहित, दया पवार, वसंत बापट, नारायण सुर्वे, रत्नाकर मतकरी इत्यादींच्या सौभाग्यवती आणि मृणालिनी देसाई, अनुराधा वैद्य, शैलजा राजे इत्यादींचे श्रीयुत ह्यांच्याशी रत्नप्रभाबाईंनी संपर्क साधला खरा पण त्याला आता झालीत 15-16 वर्षे. दरम्यानच्या काळात ह्यातील काहींचे देहावसान झाले. प्रथम एका साप्ताहिकासाठी केलेले हे लेखन तेव्हाच पुस्तकरूपाने यायला हवे होते. 'रोहन’ प्रकाशनाचे मनोहरपंत चंपानेरकर यांनी तशी तयारीही केली होती, पण मृत्यूने त्यांनाच गाठले न् हे पुस्तक मागे पडले ते मागेच पडले. आता याच प्रकाशनाने उचल खाल्यामुळे विलंबाने का होईना ते चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांच्या देखण्या मुखपृष्ठासह वाचकांसमोर आले आहे.

काही मूलभूत प्रश्न आणि शन्नांच्या पत्नीला आपला होणारा नवरा ‘नवरेच’ आहे ह्याची वाटलेली गंमत. अशा गमतीने हे लेखन 'ताजे' राहणार आहे.

रोहन प्रकाशन, पुणे
किंमत : रु. 150/-

----------

कंगालांचे अर्थशास्त्र

:: हेमंत देसाई ::

सर्वसामान्यांची अचूक छबी उमटलेले हे कंगालांचे अर्थशास्त्र' केवळ अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेचा चेहरा समजून घेणान्यांनाही उपयुक्त ठरणारे आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्यांच्या प्रक्रियेमुळे हा नया चेहरा तयार झाला आहे. भारतात उदारीकरणामुळे एक नवा मध्यमवर्ग तयार झाला; सरकारीकरणावे जंजाळ कमी झाले; परमिट राज मोडीत निघाले, भ्रष्टाचाराच्या वाटा बुजू लागल्या, उपक्रमशीलतेला व संपत्तीनिर्मितीस चालना मिळाली, व्यापारी व उद्योगपती हे सरसकट चोर आहेत, असे मानणे चुकीचे आहे, असा दृष्टिकोन तयार होऊ लागला मात्र त्याच वेळी अर्थव्यवस्थेतील शिक्षण, आरोग्य, कुटुंबनियोजन, पोषण, आहार, पाणीपुरवठा या क्षेत्रांत सरकारने रास्त हस्तक्षेपही केला पाहिजे, या कल्याणकारी दृष्टिकोनाचा विसर पडू लागला. दारिद्र्य, शोषण आणि बेकारी या समस्यांची उपेक्षा होऊ लागली. या देशातील कोट्यवधी कंगालजनांचे अस्तित्व नाकारण्याचे प्रयत्न होऊ लागले, ह्या ना त्या प्रकारे लोक पांगळे होऊ लागले आहेत, हेच आपले मत लेखकाने ह्या संग्रहातील तीस लेखांतून ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

विषय तसा गुंतागुंतीचा आणि अनाकलनीय वाटावा असा असला तरी लेखकाने मुळातच तो सुलभतेने मांडला आहे आणि ह्या लेखकाचा एक पैलू चित्रपटांकडे झुकणारा असल्याने तेही लालित्य ह्या लेखनात आले आहे. 'समतेचा कैवारी' असे शीर्षक असले तरी ह्या लेखाची सुरुवातच अशी झाली आहे, 'साधारणतः 1930च्या आसपास जेव्हा अवघे जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते, सगळेच जण 'देवदास’ प्रमाणे 'दुख के दिन बितते नही’ अशा पद्धतीचे सूर आळवत होते, त्याचवेळी केन्सने 'फिर सुबह कभी तो आयेगी’ अशी आशा व्यक्त करून तमाम दुनियेला चकित करून सोडले होते. 'मुंबईचे सिंगापूर' लेखाच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे, "जगन्नाथ शंकरशेठ, विश्वनाथ मंडलिक, भाऊ दाजी लाड, काशीनाथ तेलंग, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांची मुंबई आता राहिली नाही. आचार्य अत्रे डांगे, जॉर्जची मुंबई ही तर नव्हेच. ही उपटसुंभांची, गुंडांची, उल्लूमशालांची मुंबई आहे. पूल पार्लर, बॉक्सिंग क्लब आणि बारवाल्यांची मुंबई आहे. पठ्ठे बापूरावांच्या मुंबईचे सिंगापूर जवळजवळ झाले आहेच- आणि या सिंगापुरात मराठी लोकांचे काय काम?”

होणारी प्रगती वाढत्या लोकसंख्येपुढे थिटी पडते हे जसे त्यांनी लक्षात आणून दिले आहे, तसेच शेवटी 'परंपरावादाचा पगडा जास्त व आधुनिक दृष्टिकोन कमी' ह्यातून शेतकऱ्यांनाही बाहेर पडायला सांगितले आहे.

ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ विनोद क्षीरसागर यांचे आहे. 

पद्मगंधा प्रकाशन, पुणे
किंमत : रु. 160/-

----------

आम्ही भगीरथाचे पुत्र

:: गो. नी. दांडेकर :: 

धरण आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, हा विषय मराठी कादंबरीकारांना नवा राहिलेला नाही, परंतु सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी गोपाळ नीलकंठ दांडेकर ह्यांनी ही कादंबरी लिहिण्याचे भगीरथ प्रयत्न केले तेव्हा हा विषय तसा नवाच होता. स्वातंत्र्य मिळाल्याचे वातावरण अजून ताजे होते, देश उभा करण्यातील प्रयत्नांत लहानथोर भान विसरून गेले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी धरणे म्हणजे आधुनिक मंदिरे आहेत असे म्हटले होते. अशा वेळी काश्मीर पाहून परतत असता ते भाकडा-नानगल बघायला गेले, तेव्हा धरणाची उभी रहात असलेली भिंत आणि सतलजचे झेपावणारे पाणी बघून लेखकाच्या निसर्गप्रेमी मनाने हेरले, अरे! हा तर कादंबरीचा विषय आहे.

तेव्हा पंजाबचे राज्यपाल होते न. वि. गाडगीळ. राजकारणात मुरलेले काकासाहेब साहित्यातही रममाण झाले होते. गोनीदांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी उभे न राहते तरच नवल. ह्यामुळे पुन्हा स्वतंत्रपणे गोनीदा धरणाच्या कुशीतच काही दिवस जाऊन राहिले. त्यांनी ह्या धरणाचे कागदोपत्री आणि प्रत्यक्षातील कामकाज तर अभ्यासूपणे जाणून घेतलेच पण तेथील लोकजीवन, त्यांची सुखदुःखेही बारकाईने जाणून घेतली व भाषाही... कारण गोनीदांना धरणावर केवळ तांत्रिक कादंबरी लिहायची नव्हती तर त्या मोहमयी निसर्गाबरोबर तेथील जनजीवन वाचकांसमोर ठेवायचे होते. तेही उपन्यासारखे नव्हे तर त्या मातीशी एकरूप होऊन. त्यांनी असे केले म्हणून ही कादंबरी आजही 'सतलज' आहे.

इंग्रजही निसर्गप्रेमी होते आणि आहे त्या स्थितीचा लोककल्याणार्थ कसा उपयोग करता येईल ह्याबाबत तत्पर होते हे गोनीदांनी सुरुवातीलाच लक्षात घेतले आहे. पण भगीरथ प्रयत्नाने शंकराच्या जटेतून पृथ्वीवर आलेल्या ह्या अवखळ धारेला बांध घालून अडविण्याचा जो प्रयत्न झाला तोही भगीरथाचा वारसा सांगणाच्यांचाच असेही त्यांना वाटले आहे. म्हणूनच त्यांनी ह्या कादंबरीचे नाव निश्चित केले - 'आम्ही भगीरथाचे पुत्र. '

ह्या कादंबरीसाठी 'चार शब्द’ लिहिताना न. वि. गाडगीळांनी म्हटले आहे - 'जे आज या भाकडा-नानगल योजनेचे व तेथील कार्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांना यथार्थ कल्पना देणारी ही कादंबरी आहे.'

आता 24 वर्षांनी नव्याने ही कादंबरी वाचकांपुढे आली आहे चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांच्या मुखपृष्ठासह.

मृण्मयी प्रकाशन, पुणे
किंमत : रु. 250/-

Tags: पुस्तक परीक्षण मराठी साहित्य साहित्य परिचय पुस्तक परिचय Marathi Books Marathi Literature Book Review Books weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल बळेल

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) ते नोकरीस होते. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. त्यानंतर कथा लेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले. पुण्यात ग्रंथाली केंद्राची सुरुवात आणि त्यांचे संचलनही त्यांनी केले. बळेल यांना "विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक' या पुस्तकासाठी कोशकार स. मा. गर्गे पुरस्कार दिला होता. यांसह लेखनासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सत्तावीस पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके