डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यशवंतराव गडाख यांचा वेगळा दृष्टिकोन पुढे त्यांच्या वैयक्तिक जीवनातही दिसतो. आपल्या थोरल्या चिरंजीवाचा विवाह त्यांनी नोंदणी पद्धतीने केला आहे. तर नंतरचे घरातील विवाह 'सामुदायिकरित्या’ झालेले आहेत. एका सामुदायिकतेत त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन वधू-वरांनाही सामील करून घेतले आहे. आपल्या पुतण्याच्या बाबतीत तर विवाहनिश्चय झालेल्या बैठकीतूनच ते सर्व रीतीरिवाज बाजूला ठेवून सुनेला सरळ घरी घेऊन आले आहेत.

‘अर्धविराम' असे समर्पक नाव असलेले, मनात लालित्य जपलेले, राजकीय नेते यशवंतराव गडाख यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. समर्पक ह्यासाठी की यशवंतरावांनी आजवर काही कमी उंच उड्या घेतल्या नाहीत; परंतु त्यांना उंचच उंच उडी अजून घ्यायची आहे. सध्या ते काहीसे थबकलेले आहेत. परंतु अशी उंच उडी ते आता घेणारच नाहीत, असे नाही. अशी उडी कशी घ्यायची ह्याचे कसब त्यांच्याजवळ आहे. ती कशी साधायची यातही ते तरबेज आहेत. सारीपाट मांडल्यावर अचूक दान मिळविण्यासाठी फासे कसे टाकायचे हे त्यांना कळून चुकलेले आहे. बी.एड्. झालेल्या न् राजकारणात शिरल्यावरही शिक्षकी पेशा न सोडलेल्या यशवंतरावांनी आजची उंची गाठलेली आहे. म्हणून हा भरवसा आहे आणि म्हणूनच हा 'अर्धविराम' आहे.

यशवंतराव गडाख ह्यांचे राजकारण हे तसे अलीकडच्या काळातले आहे. म्हणजे शरद पवार ह्यांच्या राजकीय खेळी, त्यांचे पुलोद सरकार, वसंतरावदादा पाटील यांची कारकीर्द, इंदिरा व राजीव गांधी यांच्या हत्या, यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू वगैरे हे आत्ताआत्ताच घडलेले ह्यात आले आहे. यशवंतराव गडाख या साऱ्यात कदाचित आलेली नसते; पण त्यांच्या विद्यार्थी दशेत एक "डबा आंदोलन” झाले, आणि तेथूनच ही ठिणगी पडली, असे म्हणता येण्यासारखे आहे.

गडाखांचे राजकारण जसे अलीकडचेच आहे, तसेच गडाख ज्या वातावरणात लहानाचे मोठे झाले, तशी स्थिती केवळ सोनई परिसरातच होती असे नव्हे; तर महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्रच आत्ताआत्तापर्यंत अशीच स्थिती होती. महाराष्ट्रात सर्वत्र वीज खेळलेली नव्हती. विद्यार्थ्यांना कधी कधी कंदील, दप्तर, सतरंजी-चादरीच्या बिस्तरासह शाळेत जावे लागत होते. आणि दिवसभर शाळेच्या वेळात शिकविलेले पुरेसे झालेले नाही, म्हणून कवडीची अपेक्षा मनात न ठेवता त्यांना स्वतःहून अधिक शिकवणारे, विद्यार्थ्यांकडून धडा पुन्हा घोटून घेणारे तळमळीचे शिक्षकही तेव्हा होते. सातव्या इयत्तेच्या परीक्षेत तेव्हा आजच्या दहावी-बारावीपेक्षा अधिक महत्व होते. 'व्ह. फा.' झालेला विद्यार्थी शिक्षकही होऊ शकत असे. (बहुधा हडकुळा आणि अंगात बिन इस्त्रीचा पण पांढरा स्वच्छ पायजमा-शर्ट न डोक्यावर पांढरी गांधी टोपी घातलेला.) ही व्हर्नाक्युलर फायनल परीक्षाही सर्वत्र होत नसे: तर त्यासाठी विद्यार्थ्याना बहुतेक तालुक्याच्या, नाहीतर जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. यशवंतरावही असेच सोनईहून राहुरीला जाऊन ‘व्ह.फा.’ झालेले आहेत. (तेव्हा असे प्रवास बैलगाडीचेच असायचे.)

सोनईसारख्या ठिकाणी 'सातवी' होण्याचेही कौतुक असे, पण यशवंतरावांसारख्यांचे तेवढ्यावर समाधान होणे शक्यच नव्हते. साहजिकच इच्छा आणि शक्यता असेल तर असे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी जेथे अशी सोय असे, तेथे जात. यशवंतरावही त्याप्रमाणे अहमदनगरला गेले असते; पण त्याचवेळी ‘अहमदनगर एज्युकेशन सोसायटी'चेच सोनईला हायस्कूल झाल्याने यशवंतरावांचे नगरला जाणे अकरावी होईपर्यंत लांबले. अकरावीही ते दोन प्रयत्नांत झाले- त्यामुळे तेथेही एक वर्ष गेले.

महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षीच विवाह होऊन यशवंतरावांच्या व्यक्तिगत जीवनाने जसे एक वळण घेतले, तसेच ह्याच दरम्यान, अशा घरापासून दूर राहणाऱ्यांना, त्यांचे जेवणाचे डबे 'एस.टी.’ व्यवस्थेकडून वेळच्या वेळी अन व्यवस्थित न आल्याने जे हाल होतात. त्या उद्रेकातून ह्या विद्यार्थ्यांनी जो आवाज उठविला -त्यातही आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे अशा तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांच्याही लक्षात यावा असा बेधडक आवाज यशवंतरावांनी काढलेला आहे.

यशवंतरावांचा स्वभाव संकोची आहे, ते मितभाषी आहेत, परंतु वेळ आली की परिणामांची पर्वा न करता कोठेही धडक घेण्याची त्यांची वृत्ती आहे. हे पुढे अनेकदा लक्षात यावे, ह्याची ही सुरुवात होती. नगरच्या शिक्षणकालावधीत श्रमदानाचा एक भाग म्हणून ह्या विद्यार्थ्यांकडून लमाणांसाठी घरे बांधून घेण्यात आली होती. परंतु ज्यांच्यासाठी त्यांनी हे काम केले ते लमाण पुन्हा पुन्हा साफ केलेल्या घरात पुन्हा पुन्हा उकिरडा करीत व स्वतः मोकळ्या हवेत मजेत राहात. ह्याने हे विद्यार्थी चिडले, त्यांनी शिक्षकाकडे तक्रार केली. तेव्हा हळवेसर जे म्हणाले तेही यशवंतरावांचे व्यक्तिमत्व घडायला न कळत साह्यभूत ठरले आहे. हळवेसर म्हणाले होते. ‘लमाणांना घरात राहण्याचं शिक्षण मिळावं, त्यांना ती सवय लागावी, म्हणून तर आपण ही घरं बांधली. त्यांना जर हे सारं समजलं असतं, तर आपली काय गरज होती तिथे?’

शिक्षण संपवून शिक्षक म्हणून नोकरीवर रुजू झाल्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीस उभे राहणार का? असा एक दिवस अचानकपणे प्रश्न विचारला गेला, न तेथूनच यशवंतरावांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे ह्या नवख्या उमेदवाराच्या मानाने प्रतिस्पर्धी चांगला प्रबळ होता, तरीही यशवंतरावांनी ती निवडणूक तर जिंकलीच, पण ते सभापतीही झाले. पंचायत राज्य व्यवस्थेचा प्रयोग नुकताच सुरू झाला होता. त्या सुरुवातीच्या काळातच त्यांना काहीतरी करून दाखवता येईल, अशी संधी मिळाली होती. सभापतीपद एकच वर्षाचे असते, पण यशवंतरावांना ते सलग चार वर्षे लाभले. तथापि, त्याचबरोबर, त्यामुळेच मिळालेली आमदार होण्याची संधी त्यांना साधता आली नाही. काँग्रेसला अनुकूल असलेल्या वातावरणास पडलेल्या फरकाचा फटका यशवंतरावांनाही बसला आणि तेव्हा शेवगाव-नेवासा मतदारसंघात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

ह्या पहिल्याच निवडणूकीत,पराभवास बाहेरच्या कारणांबरोबरच पक्षांतर्गत राजकारण कसे असते- असहमत असलेल्यांकडून समोरच्यांशी कशी हातमिळवणी होते. हेही यशवंतरावांनी अनुभवले. त्याचबरोबर लोकांच्या जीवन-मरणाशीच संबंधित असलेला एखादा प्रश्न आपल्यासमोर कसे प्रश्नचिन्ह उभे करू शकतो, हेही त्यांना कळून चुकले. त्यातून ह्या प्रश्नावरून तेही थोडे बैचेन झाले होते. विकास व्हायलाच पाहिजे पण विकासाची प्रक्रिया संवेदनांच्या रेशीम धाग्यांनी झाली पाहिजे, तसे ते होत नाही हे यशवंतरावांनी ह्या पराभवास कारण ठरलेल्या जायकवाडी धरण प्रकल्पाबाबत स्वतः व्यथित मनाने बघितले होते. म्हणूनच आजही नाथसागराचा तो विस्तीर्ण जलाशय पाहताना त्यांना तीन संस्कृतीची झालेली मोडतोड आठवते. त्याने ते अस्वस्थ होतात, त्यांना नाथसागराचे पाणी दिसत नाही. त्या जागी बुडालेली गावं, नांदती घरं, तेथील माणसं त्यांना दिसू लागतात, राजकारणी- त्यातूनही काँग्रेसचा राजकारणी- माणूस संवेदनाहीन असतो असे समजले जाते- त्याला यशवंतराव हे अपवाद आहेत.

यशवंतरावांनी आपल्या भागात एक भक्कम साखर कारखाना उभा केला आहे. त्याच्या मुळाशीही गरिबांबद्दल कणवच, आहे. एक वेळ अशी आली होती की ह्या परिसरात उसाचे अमाप पीक आले होते, न त्याला काहीच उठाच नव्हता- एवढ्या उसाचे करायचे काय? त्याचे पैसे नाही आले, तर यासाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे; न खायचेही काय? ह्या प्रश्नांनी शेतकरी हवालदिल झाले होते. अर्थात यशवंतरावांना हा प्रश्न दिसला अन् त्यांनी तो साखर कारखाना काढून चुटकीसरशी सोडवला, असे झालेले नाही, आणि अक्षरशः डोंगराएवढ्या अडचणी आल्या आहेत. परिसरातील शक्य त्या सर्वांकडून किडूकमिडूक विकून ह्या कारखान्यासाठीचा पैसा जमा केला आहे. सरकारची रीतसर परवानगी मिळविण्यासाठी, जुन्याऐवजी नवीन यंत्रसामग्री मिळविण्यासाठी अनेक मान्यवरांचे शब्द खर्ची घालावे लागले आहेत.

एवढे करूनही ‘गूळ कम रम' मार्गानेच यशवंतरावांना ही वाट धरावी लागली आहे. ज्या माळावर आता हा कारखाना उभा राहिला आहे. त्या माळावरील लहानशा गणपती देवळाखाली सात कढ्या धन पुरलेले होते म्हणे! खरे-खोटे तो गणपतीच जाणे! पण आज मात्र ह्या परिसराला धनवान बनविणारा हा कारखाना तेथे आहे; न तो गणपतीबाप्पाही! तो कारखान्याचा क्षेत्रपालही आहे आणि कारखानाग्रामाचे ग्रामदैवतही! हा परिसर शनिशिंगणापूरचा, तेथील देवस्थानच्या चौथऱ्यावर महिलांना जायला मज्जाव आहे. यशवंतरावांनी आपल्या कारखान्याचे सभासद जमविण्यासाठी पहिली बैठक या शनिशिंगणापूरलाच घेतलेली आहे पण पहिल्या शेअरची पावती त्यांनी आग्रहपूर्वक एका महिलेच्या नावाची फाडलेली आहे.

[हा वेगळा दृष्टिकोन त्यांनी पुढे आपल्या वैयक्तिक जीवनातही ठेवलेला आहे. आपल्या थोरल्या चिरंजीवाचा विवाह त्यांनी नोंदणी पद्धतीने केला आहे. तर नंतरचे घरातील विवाह 'सामुदायिकरित्या’ झालेले आहेत. एका सामुदायिकतेत त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन वधू-वरांनाही सामील करून घेतले आहे. आपल्या पुतण्याच्या बाबतीत तर विवाहनिश्चय झालेल्या बैठकीतूनच ते सर्व रीतीरिवाज बाजूला ठेवून सुनेला सरळ घरी घेऊन आले आहेत.]

जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा, प्रशासनाचा चेहरामोहराच बदलून टाकला. गावातील पंचायती, नगरपालिका ह्यांची स्वतःची म्हणून एक प्रकृती आहे. तशीच ही एक ‘झेड. पी.’ संस्कृतीच निर्माण झाली आहे. यशवंतराव त्याही कारभारात दीर्घकाळ वावरलेले आहेत. ते तेथे शिक्षण व सार्वजनिक बांधकाम समितीचे अध्यक्ष तर होतेच; पण सहा-सहा वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष न अध्यक्षही होते. पण एवढे दीर्घ काळ तेथे काम करूनही काँग्रेसी राजकारणाच्या वेळीत त्यांना तेथून अखेर बाहेरच पडावे लागणार होते. दरम्यान एका चाभऱ्या तरुणाच्या उचापती त्यांच्या अंगलट येण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. पण वेळीच सावध झाल्याने ते तेथून निभावून गेले.

जिल्हा परिषद ही काही नुसते खड्डे बुजवणारी, बदल्या करणारी संस्था नाही, त्यापलीकडे सांस्कृतिक मूल्ये जपणारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील माणूस समजून घेणारी, त्यांचे महत्त्व जपणारी संस्था असली पाहिजे, अशा मताच्या यशवंतरावांनी आपल्या कारकीर्दीत आपल्या जिल्ह्यातील सृजनशील कलावंतांच्या साहित्यिकांचा सत्कारही घडवून आणला होता, ज्याचे पडसाद पुढेही उमटत राहिले होते. याच दरम्यान त्यांनी आपल्या अखत्यारीत अहमदनगरला 'दलित साहित्य संमेलना’चेही यशस्वी आयोजन केले होते. हे करीत असताना ते काही अधिकारीपदावर तरी होते, परंतु अशा कोणत्याच पदावर नसताना त्यांनी 1997 साली अहमदनगरला सत्तराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अशी काही आखणी केली होती, की आजवर जी अशी संमेलने झाली आहेत, त्यांतील मोजक्या साहित्य संमेलनांपैकी ते एक ठरले आहे.

यशवंतरावांच्या मनात साहित्यप्रेम पहिल्यापासूनचेच आहे. लहानपणी नाथ माधवाच्या कादंबऱ्यापासुन निर्माण झालेली वाचनाची आवड राजकारणाच्या धकाधकीतही त्यांनी टिकवून ठेवली आहे, तीही केवळ वाचनापुरतीच राहिलेली नसून त्यातूनच काही मान्यवर साहित्यिकांच्या सहवासातही ते आले आहेत व ते क्षण त्यांनी जिवापाड जपलेलेही आहेत. साहित्य संमेलनांप्रमाणे त्यांना नेवासे येथे 'श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी’ सोहळा आयोजित करावासा वाटला आहे. नेवासे येथे ‘श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रकल्प' स्थापन करून धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना त्यांनी सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या बाबतीत ते 'थोरल्या' यशवंतरावांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. नाहीतर कै. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल त्यांच्या मनात एक खास कप्पा आहेच, असाच आणखीन एक कप्पा आहे शरद पवारांबद्दल.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार ह्यांच्या कारकीर्दीचा पूर्वाध हा महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा एक चांगला कालखंड होता, इतर प्रांतीयांनी आणि दिल्लीश्वरांनीही थोड़ी विशेष दखल घ्यावी असा! या साऱ्या अनुकरणीय नेत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे यशवंतराव वाढलेले आहेत. गडाखांचे घराणे काही राजकारण्यांचे नाही. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरी करीत होते. यशवंतरावांनाही त्या खात्यात जावेसे वाटत होते, तशी त्यांना संधीही मिळाली होती. पण राजकारण की पोलिसी खाक्या असे बंड त्यांच्या मनात उभे राहिले, तेव्हा त्यांच्या मनाने राजकारणाच्या बाजूने कौल दिला. या कौलाला महाराष्ट्रातील एका उच्च वातावरणाचा लाभ झाला; आणि जिल्हा परिषदेतून यशवंतराव थेट दिल्लीतच पोहोचले तेही राजीव गांधी या तडफदार तरुण नेत्याची कारकीर्द सुरु होत असतानाच.

‘158, साऊथ अवेन्यू' हा यशवंतरावांचा पत्ता जवळजवळ एक दशक कायम होता, कारण 1984, 1989 व 1991 ह्या लागोपाठच्या लोकसभेच्या तीन निवडणुका ते लिलया जिंकून आले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांनी केलेले काम, यामुळे त्यांना मिळालेला जनतेचा पाठींबा आणि यशस्वी लढाईचे त्यांनी साधलेले कसब या साऱ्यांचा हा परिपाक होता, त्यामागे त्यांची जिद्द, त्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कष्टही होतेच. शेवटची निवडणूक तर त्यांनीच लढवली पाहिजे असे खुद्द राजीव गांधी यांचे म्हणणे होते. राजीवजी त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या मतदारसंघात येणार होते; पण अचानक राजीवजींची हत्या झाली आणि सारे चित्रच पालटले. पुन्हा एकदा डाव मांडला गेला आणि ह्या डावातही सरशी झाली ती यशवंतरावांचीच. ज्या घराण्याला खुद्द यशवंतरावही मानत होते आणि त्या पंचक्रोशीतच नव्हे, तर त्या बाहेरही ज्यांचा दबदबा होता अशा विखेपाटील घराण्यातील प्रतिनिधीशी यशवंतरावांना ही लढत द्यायची होती, त्या असह्य ताणातून यशवंतराव निभावून गेले खरे; परंतु त्यांचे हे निभावणे वादग्रस्त ठरले. विरोधक कोर्टात गेले. भावनाशील मनाच्या यशवंतरावांवर त्याचा विपरित परिणाम झाला तरीही त्यांनी कोर्टाचे सोपस्कार तंतोतंत पाळले, पण तेथे मात्र दान त्यांच्या बाजूने पडले नाही. विजय होऊनही ते पराभूत गणले गेले. जगाचा नको तो अनुभव त्यांच्या वाट्यास आला. त्यांचा अश्वमेधी अश्वाला रोखले गेले. खळखळत्या राजकीय प्रवाहातून ते बाजूला झाले किंवा त्यांना केले गेले. यशवंतरावांनी हे सारे लिहिले आहे खरे, पण माफक विस्ताराने लिहिले आहे. ते अगदी जसेच्या तसे लिहायला हवे होते. हाता-तोंडाशी आलेला घास त्यांना असा काढून का टाकावा लागला, हे नेमकेपणाने वाचकाला कळायला हवे होते. हे आत्मचरित्र आहे. म्हणजे हा एक दस्तऐवज आहे. येथे मौलिकाच्या दृष्टीने काहीच हातचे राखले गेले नसते, तर अधिक चांगले झाले असते.

सक्रिय राजकारणातील व्यक्ती शिक्षणाच्या तळमळीने शैक्षणिक संस्था आणि आर्थिकदृष्ट्या बँकिंग व्यवसायात राजकारण सांभाळत गुंतलेली असते असे सर्वसाधारण चित्र दिसते- यशवंतरावही त्याला अपवाद नाहीत. परिसराची आवश्यकता म्हणून साखर कारखान्याबरोबरच निर्लेप भावनेने सुरू केलेल्या अशा संस्था, त्या सुरु करण्यात पुढाकार घेणाऱ्या नेत्यांना त्यांच्या राजकारणातील उज्ज्वल वाटचालीसाठी साह्यभूत ठरत नसतीलच असे नाही. जनसंपर्क आणि जनमानस ह्यासाठी तर या संस्था नक्कीच हातभार लावतात, मग त्या सुरू करताना तसा हेतू असो-नसो! यशवंतरावांनीही ‘मुळा सहकारी साखर कारखान्या’बरोबरच ‘मुळा एज्यूकेशन सोसायटी’ची स्थापना करुन असे जाळे निर्माण केले आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी ते ह्या ना त्या नात्याने संबंधित आहेत-अर्थात हा त्यांच्या कर्तृत्वाचाच एक वाखाणण्याजोगा भाग आहे.

प्रस्तुत आत्मचरित्र यशवंतराव गडाख या एका व्यक्तीचे नसून, अंगी दुर्दम्य उत्साह व सर्जनशील जोष असलेल्या, परिवर्तनाच्या प्रक्रियेची जाण असलेल्या आणि मातीतून आलेल्या शहाणपणाची जोड असलेल्या त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण अशा तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या, पुढाऱ्याच्या प्रवासाचा हा सहृदय आलेख आहे. महाराष्ट्रात तरी फार कमी राजकीय पुढाऱ्यांनी एवढ्या संवेदनशीलतेने आपली आत्मचरित्र लिहिली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची अंतर्दृष्टी देणारे हे पुस्तक आहे. असे अरुण साधू ह्यांनी ह्या लेखनाबद्दल म्हटले आहे आणि ते पटावे असेच हे पुस्तक आहे

‘आठवणींच्या सावल्या’ आणि ‘सखे- सोबती’ असे ह्या आत्मपर लेखनाचे दोन भाग आहेत. तसे हे सारेच लेखन जिव्हाळ्याने झाले आहे, पण तो ‘सखे-सोबती’त अधिक प्रकर्षाने जाणवणे अगदी साहजिक आहे.

खुद्द यशवंतरावांनी काही लेखन केले असेलही, पण येथे मुख्यतः शब्दांकन केले आहे. टी.एन.परदेशी ह्यांनी! अर्थात परदेशी ह्यांची शैली जाणूनच यशवंतरावांनी त्यांच्यासमोर आपले अंतःकरण खुले केले आहे; आणि त्यावर परदेशी ह्यांनी वाचकांना हे सारे यशवंतरावांचेच वाटावे, असा शब्दसाज चढविला आहे, असा शब्दमेळ जमवता येणे हेही एक कौशल्य असते- ते साधण्यात परदेशी 'यशवंत' झाले आहेत.

टी.एन.परदेशी यांनी मुळात यशवंतरावांचे व्यक्तिचित्र ज्या ‘ऋतुरंग’ साठी लिहिले होते त्याच ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी 'अर्ध-विराम’ अतिशय देखणेपणाने प्रकाशित केला आहे. ह्याचे कारण गडाख-शेवते हे नाते ‘प्रकाशक-लेखक’ ह्याच्या पलीकडचे आहे. या दोघांत एक मित्रत्व आहे. त्या मित्रत्वातूनच हे पुस्तक जन्मले असण्याची शक्यता आहे. कारण हा मैत्रीचा पीळ आत्ताआत्ताचा नसून ह्या आधीचा आहे.

सतीश भावसार ह्यांनीही या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी एका पिळाचीच कल्पना रचली आहे हा पीळ यशवंतरावांचाच आहे.

पुस्तकात स्वतंत्र आर्टपेपरवर यशवंतरावांच्या व्यक्तिगत जीवनाची वाटचाल दाखविणारी काही छायाचित्रे जशी आहेत तशीच काही यशवंतरावांचे काम दाखविणारीही छायाचित्रे आहेत- विशेष म्हणजे त्या अनुषंगिक लेखनही तेथेच आहे.

ह्या साऱ्यामुळे या पुस्तकाचे मूल्य 280 रुपये झाले असले, तरी नुकत्याच सरसेल्या शतकाच्या अखेरच्या टप्यात महाराष्ट्रातील राजकारण कसे खेळले गेले हे जाणून घेण्यासाठी तरी निदान हे पुस्तक डोळ्यांखालून घातलेच पाहिजे.

Tags: साहित्य यशवंतराव चव्हाण शरद पवार वसंतदादा पाटील सोनाई अर्धविराम यशवंतराव गडाख sahitya yashvantrao chavan sharad Pawar vasantdada patil sonai ardhviram yashvantrao ghadakh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल बळेल

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) ते नोकरीस होते. सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी लेखन केले. त्यानंतर कथा लेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले. पुण्यात ग्रंथाली केंद्राची सुरुवात आणि त्यांचे संचलनही त्यांनी केले. बळेल यांना "विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक' या पुस्तकासाठी कोशकार स. मा. गर्गे पुरस्कार दिला होता. यांसह लेखनासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सत्तावीस पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके