डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शाळेच्या चार भिंतींशीही आमची मैत्री झाली होती. आजवर न दिसलेल्या आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य या दिशा येथेच गवसल्या. रोज भिंतीवर पाहून पाहून आता पक्क्या झाल्या होत्या. मराठी महिन्यांची नावे, नक्षत्रांची नावे, तीसपर्यंत पाढे, ‘प्रयत्ने कण वाळूचे रगडता’सारख्या सकारात्मक म्हणीं त्या वर्गखोलीचे वैभव वाढवित होते. भिंतीवरच्या तसबिरीमध्ये बंदिवान झालेले गांधीजी, चाचा नेहरू, सुभाषबाबू जणू आमच्या चर्चा लक्षपूर्वक ऐकत होते. रात्री झोपल्यावर आमच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे विहार करणारे मूषक देखील शाळेच्या सचेतन वैशिष्ट्‌याची जाणीव करून देत होते. रात्रीचे जेवण आटोपून आम्ही सर्व लवकर झोपी गेलो. कारण सकाळीच आम्हाला घ्यायला नंदुरबारहून तीच गाडी येणार होती.
 

नंदुरबारहून आमची जीपगाडी धडगाव तालुक्याच्या दिशेने निघाली होती. एका जागतिक बँकेच्या प्रकल्पात काम करण्यासाठी आमची निवड झाली होती. पाच युवक, एक युवती आणि मी निवृत्त बँक अधिकारी अशी सातजणांची आमची टीम होती. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर जायला आम्ही निघालो होतो. गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेलगत सातपुडा पर्वतराजीत ते ठिकाण होते. उंच पहाडांवरच्या आदिवासी वस्तीत त्यांचे स्वतःचे उपजीविकेचे साधन सशक्त आणि शाश्वत व्हावे म्हणून स्वयंसहायता गट उभारण्यासाठी केरळ राज्यातून दोन महिला कार्यकर्त्या तेथे आलेल्या होत्या. अतिशय आव्हानात्मक असे ते काम होते. भिन्न भाषा आणि संस्कृतीच्या लोकसमुदायात हे आव्हान कसे पेलल्या जाते याचा आम्ही जवळून अभ्यास करणार होतो. पंधरा दिवसांच्या मुक्कामाचे कपडे व खाण्यापिण्याचे साहित्य भरलेल्या बॅगा आणि आदिवासीं जीवनशैली प्रत्यक्ष जवळून पाहण्याची उत्सुकता भरून एका जीपने आमचा प्रवास सुरु झाला.

आमच्या पैकी बहुतेकांनी यापूर्वी कुठे ना कुठे, लहान मोठ्या NGOमध्ये काम केलेले होते. एक दोघे नवे होते. पण Tata Institute सारख्या नामवंत संस्थेचे पदवीधर होते. नुकतेच सगळ्यांचे पुणे येथे प्रशिक्षण झाले होते. पण वेगवेगळ्या बॅचेसमध्ये विखुरलेले असल्याने आम्हा सगळ्यांची एक दिवसाचीच काय ती ओळख. हा दौरा संपल्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आमचे काम सुरु व्हायचे होते.

गाडी नंदूरबारचा परिसर मागे टाकून पुढेपुढे जात होती. प्रशिक्षणातून उसंत मिळाल्यामुळे चर्चांना आता उत आला होता. पण चर्चेचे विषय Poverty index, social inclusion, gender issues वगैरेच्या पलीकडे जात नव्हते. मधेच मोबाईलवरची फोनाफोनी. एकाचवेळी दोघा तिघांच्या मोबाईल फोनची रिंग वाजायची. कधी सगळे एकाच वेळी बोलायचे तेव्हा एकमेकांच्या संवादांची सरमिसळ  होऊन गमतीदार विनोदी संभाषण तयार व्हायचे.

हिवाळ्याचे दिवस असल्याने दिवस लवकरच उतरणीला लागला होता. रस्त्याच्या डाव्या बाजूचे पठारी जंगल आणि उजवीकडचे डोंगर मागे टाकत गाडी पुढे जात होती. रस्त्यात मधेच गायी बैलांचे कळप आडवे येत होते. खरे तर कळप आपल्या मार्गावरून शिस्तीत चाललेले होते. आमचीच गाडी घुसखोरी करायचा प्रयत्न करत होती. ड्रायव्हर मोठमोठ्याने हॉर्न वाजवून त्यांचा कारवा मोडून रस्ता मोकळा करू पाहात होता. मात्र त्यामुळे गुरे सैरभैर होऊन आकाशात धुळीचे लोळ उठत होते.

गुरांच्या कळपाने आता आमची वाट मोकळी केली होती. मग गाडीने जरा कुठे वेग पकडला. काही वेळाने ड्रायव्हरच्या मोबाईलची रिंग वाजली. एक दोनदा त्याने तो फोन टाळला. पण परत परत रिंग वाजायला लागली. मग गाडीचा वेग कमी करून त्याने मोबाईल कानाला लावला. अहिराणी बोलीत तो मी कालदी येस. मंग देखुत काय करान ते. फोन ठी दे. असे दटावणीच्या सुरात काहीतरी बोलला. बँकेच्या नोकरीत असताना दहा बारा वर्षे मी खानदेशात होतो. त्यामुळे अहिराणी बोली मला येत होती. तो बहुत्येक बायकोशी बोलत असावा. पण तेव्हापासून तो काळजीत दिसत होता.

जरा पुढे गेल्यावर  एक गाव आले. ड्रायवरने गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि एका टपरीवर चहा प्यायला तो निघून गेला. आतापर्यंत गाडीत पेंगत असलेले जागे झाले होते. एकमेकांकडे पाहत मूक भाषेत काहीतरी  बोलले आणि खाली उतरुन ‘सोयीची’ जागा शोधू लागले. तशी जागा त्यांना गवसली नसावी. म्हणून थोडे दूर जाऊन रस्त्याच्या कडेलाच मोकळे होऊन आले. आमच्या टीममध्ये जी मुलगी होती, तिनेही इकडे तिकडे बघितले. पण तिच्या सोयीचे ठिकाण काही दिसले नव्हते..  

गाडी थांबली ते गाव बऱ्यापैकी मोठे असावे. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली होती. तेथे  बाजार भरलेला होता. पण  आता संपत आलेला दिसत होता. रस्त्यात गाड्या, फटफट्या इतस्तत: उभ्या केलेल्या होत्या. काळ्या पिवळ्या रंगाच्या गाड्या भरणारी पोरे प्रवाशांना मोठमोठ्याने हाक मारीत होते.  आदिवासी बाया माणसे टोपल्या गाठोडे घेऊन काळीपिवळी जीप पकडण्यासाठी धडपड करत होती. बेवडी माणसे चणेफुटाणे खात इकडेतिकडे फिरत होती.

खूप वेळ झाला तरी ड्रायवर आला नाही म्हणून महादेव गाडीखाली उतरला. आणि त्याला शोधायला गेला. तेव्हढ्यात ड्रायव्हरच आला. मग पुनः महादेवला परत बोलवण्यासाठी फोनाफोनी सुरु झाली. आमच्यातल्या एकाने मग ड्रायव्हरला फैलावर घेतले. मी त्याला  शांत केले आणि ड्रायव्हरला शांतपणे का उशीर झाला म्हणून विचारले. मात्र त्याने दिलेल्या उत्तराने सगळे गंभीर झाले. त्याची बायको चार वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली होती. रात्री त्याने दारू पिऊन आपल्या बायकोला खूप मारझोड केली होती... ‘पण काही नाही हो, येईल परत. जाते कुठे‘ असे बोलून त्याने गाडी सुरु केली.

थोडे पुढे गेल्यावर महादेव आला नाही हे आमच्या टीम मधल्या मुलीच्या लक्षात आले. गाडी पुन्हा थांबली.  तेव्हढ्यात महादेव आला आणि आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. काल प्रशिक्षण वर्गात Gender issue आणि स्त्रीपुरुष समानता इत्यादी विषयावर बरीच चर्चा झाली होती. चर्चा मधेच थांबवून या मुलीने खूप काही प्रश्न उपस्थित केले होते. पण काही प्रश्नांची उत्तरे शेवटपर्यंत कोणीच दिली नाहीत.

आता गाडी बरेच अंतर कापून पुढे आली होती. या प्रश्नांना आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या नव्या-जुन्या वृक्षांना मागे टाकत आम्ही पुढे पुढे जात होतो.

संध्याकाळ गडद होऊ लागली होती. येथून पुढचा रस्ता कच्चा आणि उंच पहाडातून आहे असे महादेव म्हणाला. त्याला इकडची बरीच माहिती होती. पूर्वी एका NGOसाठी त्याने नंदुरबार जिल्ह्यात काम केले होते. आमच्या गाडीच्या पुढे एक काळीपिवळी गाडी होती. त्यात बायामाणसे कोंबून कोंबून भरलेली होती. पाच सातजण मागच्या दारात लोंबकळून उभे होते. तेव्हढेच ड्रायव्हरच्या दोन्ही बाजूला. चार पाच जण गाडीच्या टपावर. या नंतर गावात येणारे कोणतेही वाहन नसल्याने सगळ्यांनाच आपल्या अंगाखांद्यावर घेऊन लेकुरवाळ्या मातेसारखी ही ‘पीतकृष्ण’ गाडी न डगमगता मार्गक्रमण करत होती. कायद्याने अमान्य पण प्रवासापुरता का होईना हे दृश्य सामाजिक समावेशनाचे आणि सामंजस्याचे अनोखे दर्शन घडवत होते. तिथे बसलेल्या मंडळीत भीतीचा लवलेशही दिसत नव्हता. मात्र ती कसरत पाहून माझ्याच अंगावर काटा आला. त्यात आमचा ड्रायव्हर गाडी ओव्हरटेक करू पाहत होता. उंचीवर जाणारा अरुंद रस्ता, दोन्ही बाजूला खोल दऱ्या, घाट आणि वळणाचा रस्ता असल्याने त्या गाडीला आम्ही ओलांडून जाऊ शकत नव्हतो. मग एका ठिकाणी थोडे पठार आले. आणि आमची गाडी पुढे निघाली.

आता सगळीकडे अंधार भरू लागला होता. दूरवर कुठून तरी आदिवासी पाड्यातून रुदनमिश्रित विचित्र स्वर ऐकू येत होते. गाडीत अधिकच शांतता पसरली होती. पूर्वी अशा डोंगर प्रदेशात जाण्याचा अनुभव नसल्याने टीममधले काहीजण थोडे घाबरले होते. त्यांना महादेव धीर देत होता. पुढे गेल्यावर डोंगरावरच्या पाड्यांमधून मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश दिसायला लागला. वस्ती जवळ येत आहे पाहून आम्हाला थोडा धीर वाटू लागला. पहाड चढून वर आल्यावर मोबाईलचे नेटवर्क गेले होते. एव्हाना गाडी गावात पोहचली होती. सर्वत्र किर्र अंधार. जीवघेणी थंडी. आम्ही गाडीतून आमचे सामान उतरून घेतले. आम्हाला तेथे सोडून ड्रायव्हर परत निघून गेला.

उंच पहाडावरचे पंधरा ते वीस घरांचे ते आदिवासी गाव. तेथे आमच्या आधीच केरळ राज्यातून दोन महिला कार्यकर्त्या आलेल्या होत्या. उद्या सकाळपासून तेथील पाड्यांवर महिला स्वयंसहायता गटांची निर्मिती करण्याचे काम सुरु होणार होते. केरळ राज्यात यापूर्वी अशी चळवळ यशस्वीपणे राबवली गेली असल्याने या केरळच्या महिला कशाप्रकारे हे काम करतात याचे ते आमच्यासाठी schooling होते. 

आता पुढे काय असा प्रश्न घेऊन आम्ही अंधारात इकडे तिकडे पाहू लागलो. इतक्यात लांबून एक विजेरीचा झोत आमच्या दिशेने येताना दिसला. देवचंद नावाचा एक आदिवासी तरुण हातात बॅटरी, पाण्याची घागर आणि पेले घेऊन तेथे आला. आताच तुमची गाडी परत जाताना दिसली, असे म्हणून त्याने आपली ओळख करून दिली. गावात त्याला देवा म्हणून सगळे ओळखतात, असे त्याने सांगितले. गावात थोडंफार चांगलं लिहिता वाचता येणारा तोच एकमेव दुवा होता. पंधरा दिवस आमच्या जेवण खाण्याची व्यवस्था देवाकडेच करण्यात आली होती आणि राहण्याची प्राथमिक शाळेत.

नंतर देवा आम्हाला त्या प्राथमिक शाळेत घेऊन गेला. ती एक बारा बाय पंधरा चौरस फुटाची वर्गखोली होती. तेथे वीज नसल्याने देवाने एक मेणबत्ती पेटवून उजेड करून दिला. त्याने बादलीभर पाणीही  भरून ठेवले होते. त्यातच सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले. खोलीत आणखी  मेणबत्त्या लावल्यावर थोडे अधिक दिसायला लागले. जमिनीवर एक सतरंजी अंथरली होती. त्यावर आम्ही आपापले अंथरूण घातले आणि पाय लांब करून पडलो, तोच देवा आम्हाला जेवायला घेऊन जाण्यासाठी आला. आमच्या टीममधल्या मुलीची- रोहिणीची राहण्याची व्यवस्था सरपंचांच्या घरी केलेली होती. तीही तयार होऊन शाळेकडे आली. तेथून दोन किलोमीटर अंतरावर गावाच्या बाहेर शेतामध्ये देवाचे कौलारू छताचे घर होते. देवाच्या बायकोने छान जेवण बनवले होते. घरात पाय ठेवताच वरणभाताचा छान सुगंध आला. मातीने सारवलेल्या जागेवर आम्ही अर्धवर्तुळ करून बसलो. तेव्हढ्याच जागेत लहान बाळाचा दोरीचा पाळणा होता. येता जाता देवा त्याला झोका देत असे. देवाच्या बायकोने सैपाकघरातून सगळ्यांची ताटे वाढून आणली. आम्ही पंगतीने जेवायला बसलो. रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात ते जेवण अधिकच गोड वाटत होते.

जेवताना देवाने आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची कल्पना दिली - गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शाळेपासून थोड्या अंतरावर एक हातपंप आहे, तेथूनच तुम्हाला वापरायला आणि प्यायला पाणी मिळेल. अंघोळीसाठी सकाळीच वन्या पाटलाच्या शेतातील विहिरीवर जायचे आहे. तेथून वन्या पाटलाचे शेत दीड किलोमीटरवर आहे. उशीर झाला तर जाता येणार नाही. कारण मग तिकडे महिलांची ये जा सुरु होते. सगळ्यांनी त्या पिवळ्या प्रकाशात एकमेकांकडे पाहत माना डोलावल्या. आणि देवाला  ‘आणखी काही ?’ असे विचारले. पाळणा हलवत देवा हसला आणि सांगतो जेवल्यावर असे म्हणाला. सगळ्यांची जेवणं झाल्यावर देवाने शेवटची पण महत्वाची माहिती पुरवली. ती म्हणजे शौचाकडे जाण्याची जागा. ती पाटलाच्या विहिरीपासून आणखी दोन किलोमीटर पुढे आहे असे त्याने सांगितले. रात्र बरीच झाली होती. थोड्यावेळाने देवा आम्हाला परत शाळेत पोहोचवण्यासाठी आमच्यासोबत आला. देवाच्या हाती असलेल्या मोठ्या विजेरीच्या प्रकाशात जेवण झाल्यावर आम्ही शाळेकडे जायला निघालो. थंडी आता वाढली होती. गावातली घरे लवकरच सामसूम झाली होती. त्या शांततेत आमच्या चपलांचा टाप टाप आवाज आम्हाला पुढील पंधरा दिवसांच्या वास्तव्याची जाणीव करून देत होता.

शाळेत पोचल्यावर, उद्या सकाळी सात वाजता मी चहा घेऊन येईल असे सांगून देवा घरी गेला. थकलो असल्यामुळे खाली अंथरलेल्या ताडपत्रीवर आम्ही लवकरच झोपी गेलो.

मला सकाळी लवकरच जाग आली. बाहेर थोडे उजाडले होते. खोलीतलेही शैक्षणिक विश्व आता बऱ्यापैकी दृग्गोचर झाले होते. आमच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी गुरुजींचा टेबल कोपऱ्यात सरकवून दिलेला होता. त्यावर मुलांच्या बसण्याच्या तरटपट्‌ट्या गुंडाळून ठेवल्या होत्या. पृथ्वीचा गोल, शाळेची घंटा, स्वातंत्र्य दिनाच्या जुन्या पताका आणि बरेच काही, ज्याला  शैक्षणिक म्हणतात ते साहित्य लाकडी कपाटावर गुंडाळून ठेवले होते. आमच्या निवास व्यवस्थेसाठी शाळाच गुंडाळून ठेवलेली होती.

आता बाहेर छान उजाडले होते. सूर्याची कोवळी किरणे दूरच्या डोंगरातून डोकावून पाहात होती. पठारावरच्या हिरव्या गवतावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशाचे आच्छादन मनाला मोहून टाकत होते. पश्चिमेकडे दृष्टी वळताच कालच्या अंधारात न दिसलेला गाव स्वतःच आपली ओळख करून देत होता. गवत-मातीची छपरे, स्वच्छ आंगण असलेली लहानमोठी घरे एकमेकांपासून दूर दूर उभी होती. पण गावाशी सख्खेपणाचे नाते जोडून होती. सातपुडा पर्वताच्या कुशीतला तो पावरा आदिवासींचा पाडा आम्हाला जणू सकाळचे अभिवादन करीत होता.  .

कडाक्याची थंडी होती. म्हणून उन्हात उभे राहण्यासाठी मी आणखी थोडा पुढे गेलो. रस्त्याने जाणारी मंडळी माझ्याशी काही बोलू पाहत होती. आम्ही गावात  कशासाठी आलो आहोत हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते कळले असेल असे वाटत नाही. तेव्हढ्यात  काही लहान मुले तेथे आली. शाळेच्या भिंतीवर खडूने पक्षांची चित्रे वगैरे रेखू लागली. काय रे आज सुट्टी का असे विचारल्यावर ते निघून गेले. हे पाहत असलेला एक तरुण माझ्याजवळ येऊन म्हणाला - अहो सर कसली शाळा; ज्या दिवशी गुरुजी गावात येतील त्या दिवशी शाळा भरते. नंदुरबारला राहतात ते. महिन्यातून चारपाच दिवस येतात. तुम्ही थांबलात त्याच खोलीत ते मुक्काम करतात. इतर दिवशी मुलंच ओट्यावर जमतात आणि शाळा-शाळा खेळतात. यावेळी जरा कडक शेरा लिहा.  मला तो शाळा तपासणी अधिकारी  समजला असावा.

थोड्या वेळाने, आम्ही सगळे देवाने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन प्रातर्विधी आणि स्नान वगैरे आटपून पुढच्या दिनक्रमासाठी तयार झालो.   

केरळच्या कार्यकर्त्या महिला आणि रोहिणी इकडेच आल्या. सगळ्यांशी ओळख वगैरे झाल्यावर त्यांनी पंधरा दिवसाच्या कामाचे नियोजन आम्हाला सांगितले. त्यानुसार आज एका पाड्यावर जाऊन तेथल्या महिलांसाठी गट बांधण्याचे प्रबोधन करायचे होते. आम्ही ज्या डोंगरावर होतो तेथून दोन डोंगर पलीकडे चार किलोमीटरवर ते ठिकाण होते. चहा नाश्ता झाल्यावर आमची पदयात्रा सुरु झाली. ही दिनचर्या आठवडाभर चालणार होती. आजूबाजूच्या पाड्यावर जाऊन तिथल्या आदिवासी महिलांशी त्या केरळच्या महिला संवाद साधत होत्या. आम्ही सगळे त्यांच्या कामाची पद्धत अभ्यासात होतो. त्या बऱ्यापैकी हिंदीत बोलत होत्या. पण अनोळखी प्रदेशातील अन्यभाषिक महिलांशी संवाद साधून त्यांना गटबांधणीसाठी उद्युक्त करणे सोपे काम नव्हते. सुरुवातीच्या अडचणींनंतर मग यश मिळू लागले.

पाच-सहा दिवसांच्या प्रयत्नानंतर, दहा आदिवासी महिलांनी एकत्र येऊन त्यांचा स्वयंसहायता गट स्थापन केला. सर्वांच्या चेहेऱ्यावर गड जिंकल्याचा आनंद दिसत होता. मग केरळच्या महिलांनी आठवडाभर गटातील महिलांना प्रशिक्षण दिले. एका मोठ्या झाडाखाली ते प्रशिक्षण चाले. आजूबाजूला निसर्ग, डोंगर, रानात जाण्यासाठी निघालेली गुरे, त्यांची धुळवड, आजूबाजूला खेळणारी लहान मुले, आदिवासी महिलांनी गायलेली त्यांची पारंपारिक गाणी, काय चालले आहे म्हणून मधेच डोकावून जाणारी मंडळी, काही दारुडे, मधेच आपल्या बायकोला प्रशिक्षणातून उठवून घेऊन जाणारे नवरे. असा संमिश्र माहोल.

पण अनेक अडथळ्यांचे डोंगर पार करत त्या दहा आदिवासी महिलांनी त्यांच्या नवनिर्मितीची पायाभरणी केली होती. हा केवळ बचत गट नाही, तर स्वयं सहायता गट आहे. आणि तोही महिलांचा. स्वत:च्या कमाईचे थोडेथोडे पैसे एकत्र करून भविष्यात त्यांचा स्वयंसहायता गट मोठी आर्थिक उलाढाल करू शकतो, त्यांचे स्वतःचे उपजीविकेचे साधन निर्माण करणारी संस्था उभारू शकतो याचा आत्मविश्वास आता त्यांच्या चेहेऱ्यावर दिसू लागला होता. हे सर्व त्या दहा निरक्षर आदिवासी महिलांनी केले होते. इतकेच नाही, तर त्यांच्याच प्रयत्नाने शेजारच्या पाड्यावर देखील असे गट उभे राहू लागले. आम्हीही या नवनिर्मितीचे थोडे पारंपारिक आणि पुष्कळसे अनौपचारिक असे सामाजिक समावेशनाचे नवे सूत्र मनात साठवत होतो. सूत्रधाराचा फार सहभाग न घेता गट निर्मितीची प्रक्रिया त्या आदिवासी महिलांनी कशी पुढे नेली ते कळलेच नाही. गावाची परिस्थिती, संसाधने, भोवतालचा निसर्ग, गावातल्या माणसांच्या बऱ्या वाईट सवयी, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, गावाचे प्रश्न यावर घडलेले मंथन हीच या गटाची निर्मिती प्रक्रिया होती.     

लवकरच पंधरा दिवस व्हायला आले होते. परतायचा दिवस जवळ आला तसे टीम मधले सगळे भावूक झाले. पण प्रत्येकाला घरी जाण्याची घाई देखील झाली होती. पंधरा दिवस घरापासून दूर राहिल्यामुळे बायकामुलांची अनावर झालेली आठवण प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसत होती. असे असले तरी इथले वास्तव्य तसे सुकरच होते.  देवाकडे रमत गमत केलेले जेवण, रात्रीच्या जेवणानंतर अंधारात गाणे गात गात गावाबाहेरच्या पठारावर हिंडायला जाणे, रेंज मिळाला की घरच्यांशी मोबाईलवर बोलणे (तीच एक रेंज मिळण्याची जागा होती.), सकाळी दूर डोंगरकुशीतल्या शेतात विहिरीवर दोर बदलीने पाणी काढून एकमेकांना उघड्यावर घातलेली आंघोळ. असे हे सहवासाचे बंध. त्यांनी टीममधल्या सर्वांची मैत्री अधिक घट्ट केली होती.

शाळेच्या चार भिंतींशीही आमची मैत्री झाली होती. आजवर न दिसलेल्या आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य या दिशा येथेच गवसल्या. रोज भिंतीवर पाहून पाहून आता पक्क्या झाल्या होत्या. मराठी महिन्यांची नावे, नक्षत्रांची नावे, तीसपर्यंत पाढे, ‘प्रयत्ने कण वाळूचे रगडता’सारख्या सकारात्मक म्हणीं त्या वर्गखोलीचे वैभव वाढवित होते. भिंतीवरच्या तसबिरीमध्ये बंदिवान झालेले गांधीजी, चाचा नेहरू, सुभाषबाबू जणू आमच्या चर्चा लक्षपूर्वक ऐकत होते. रात्री झोपल्यावर आमच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे विहार करणारे मूषक देखील शाळेच्या सचेतन वैशिष्ट्‌याची जाणीव करून देत होते.        

रात्रीचे जेवण आटोपून आम्ही सर्व लवकर झोपी गेलो. कारण सकाळीच आम्हाला घ्यायला नंदुरबारहून तीच गाडी येणार होती. सकाळी लवकरच उठून आपापले सामान, पांघरूण आणि कपडे आवरून आम्ही बसलो होतो. इतक्यात एक गृहस्थ हातात काही रजिस्टर आणि पुस्तके असलेली पिशवी घेऊन अवतीर्ण झाले. व माफीचे आर्जव करू लागले. आम्हाला काही कळेना. ते सारखे म्हणत होते की चुलत सासू वारल्यामुळे मला अचानक गावी जावे लागले वगैरे. माझ्या हळूहळू लक्षात आले की हे या शाळेचे गुरुजी असावेत. गावातल्या कोणीतरी त्यांना वर्दी दिली असावी की, शाळा तपासण्यासाठी टीम आलेली आहे म्हणून. लगेच त्यांनी कपाटाचे कुलूप उघडून हजेरी पुस्तक वगैरे बाहेर काढले. तेव्हढ्यात देवा चहा नाश्ता घेऊन आला. आणि गुरुजीना खरे काय ते सांगितले. गुरुजींचा जीव भांड्यात पडला. आता त्यांची देहबोलीही बदलली होती. मग आम्हीही त्यांचे आभार मानले. ‘सर, तुम्ही नव्हता म्हणून काय झाले. आम्ही खूप काही शिकलो येथे’ असे म्हटल्यावर ते थोडे ओशाळले.

थोड्याच वेळात केरळच्या कार्यकर्त्या आणि गटाच्या महिला आम्हाला निरोप द्यायला तेथे आल्या. देवा आणि त्याची बायको त्यांच्या तान्ह्या मुलाला घेऊन आले होते. आम्हाला घेऊन जाणारी गाडीही आली होती. तोच ड्रायव्हर होता. आज मात्र आमच्याशी छान बोलत होता. आमचे सगळ्यांचे सामान त्याने गाडीत भरले. मी त्याला हळूच विचारले - घरी आता ठीक आहे ना?  त्यावर तो म्हणाला ‘सर, पोरीत माझा जीव अडकला आहे ना, आलो दोघीनाही घेऊन. आता दारूही सोडली.’

इतक्यात शाळेच्या घंटीचा आवाज आला. शाळा भरण्याची वेळ झाली होती. आम्ही मागे वळून पहिले तर गुरुजी स्वतः घंटी वाजवत होते. गावातली मुले अंगावरची वस्त्र सावरत, धावत पळत शाळेकडे येत होती. गुरुजींच्या घंटीचा प्रतिध्वनी दूर डोंगरातून ऐकू येत होता. तो प्रतिध्वनीच होता कि आमची डोंगर शाळा आता सुटल्याची घंटी होती, हे कळायच्या आत आमची गाडी परतीच्या मार्गाला लागली होती. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके