डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निसर्गाला ओरबाडणं, बोचकारणं थांबवू. शांत राहू. प्रगतीचा उन्माद रोखू. निसर्गाला चालेल, आवडेल अशीच गती ठेवू. तसं नाही केलं तर निसर्ग फटके देईल. तसे तो देतो आहेच. दुष्काळ दाखवतो आहे. सुनामी आणतो आहे. महापुराचा अनुभव देतो आहे. हळुच इंद्रधनुष्यदेखील काढून घेतलं आहे त्यानं. हे थांबवलं पाहिजे. अनेक इंद्रधनुष्यं दिसतील, राहतील हे पाहायला पाहिजे. ह्या गोष्टी आपोआप नाही होणार. त्यासाठी तुम्हा-आम्हांला, सरकारला, सर्वांनाच अथक मेहनत केली पाहिजे.

कामानिमित्त बीडला जाणं-येणं सुरू असतं. दिवसभराची कामं संपवून साधारण चार-पाचच्या सुमारास मी निघतो. त्यावेळेस निघालं की झोपायला बारा-साडेबारापर्यंत घरी पोचतो आणि मग दुसरा दिवस सुरू होतो.

त्या दिवशी असाच निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस भुरभुर चालू होता. चारी बाजूंनी श्रीमंत निसर्ग आपला दिमाख दाखवत होता. सगळीकडे हिरव्या रंगाच्या विविध छटा. शेतांत काम चाललेली, सर्वत्र आनंद भरलेला.

बीड सोडले आणि नगरच्या दिशेनं जाऊ लागलं की, मोरांचं सुंदर अभयारण्य लागतं. एक छोटासा घाट आहे. त्या घाटातल्या नागमोडी रस्त्यांवरून जाताना दोन्ही बाजूंना हमखास मोर दिसतात. शेतांत, झुडुपांत किंवा छोट्या झाडांच्या फांद्यांवर क्वचित रस्त्यात समोर येतात. वाहन आलं की टुणकन् उडी मारून बाजूलाही होतात. बीडहून येताना हा माझा एक आवडीचा खेळ आहे.

त्या पावसाच्या दिवशीही हेच चालू होतं; आणि अचानक आकाशात एक अद्भुत दृश्य दिसलं. केवळ अद्भुत. निदान मी तरी कधीही न पाहिलेलं. एकाच वेळी आकाशात दोन इंद्रधनुष्यं दिसत होती. दोन इंद्रधनुष्यं. आम्ही गाडी डावीकडे घेतली. गाडीतून उतरून बराच वेळ ती दोन इंद्रधनुष्य बघत राहिलो. बराच वेळ. नंतर ती अंधुक झाल्यावर आम्ही निघालो, पण तरीही खिडकीतून मागे पहात ते मनोहारी दृश्य मनात साठवत राहिलो. बराच, बराच वेळ. 

दुसरा दिवस आला तरीही ती इंद्रधनुष्यं मनातून जाईनात. मनातच जणू त्या इंद्रधनुष्यांनी घर केलेलं. त्या इंद्रधनुष्यांनी मग आपला असर दाखवायला सुरुवात केली आणि मग मी भेटेल त्याला, फोन करील त्याला, एकच प्रश्न करायला सुरुवात केली. "आता शेवटचं इंद्रधनुष्य तुम्ही कधी पाहिलंत?" वीस-पंचवीस जणांना तरी मी त्या दिवशी हा प्रश्न विचारला असेल.

उत्तरं आली ती अगदी अगदी मजेशीर. कुणी नुकतंच प्रवासाला गेलं असता पाहिलं होतं, तर कुणाला आठवतच नव्हतं. त्यांना फक्त शाळेतला इंद्रधनुष्यावरचा धडा आठवत होता. मुंबईतील लोक म्हणत होते, "इंद्रधनुष्य मुंबईत दिसत नाहीत. ते सगळे गावाकडलं." कुणी म्हणालं, "इंद्रधनुष्यं आजकाल कमी झाली आहेत' कुणी म्हटलं, 'एका वेळी दोन दिसणं अवघडच.’

कुणी काहीही म्हणो. इंद्रधनुष्याच्या आठवणींनी सर्वांच्या मनात उल्हास निर्माण झाला होता, ह्यात शंका नाही. इंद्रधनुष्य, पाण्याच्या एका नाजूक, छोटयाशा थेंबानं प्रखर, बलाढ्थ सूर्यप्रकाशाला अडवून केलेला चमत्कार. स्वच्छ आकाश नसेल तर न दिसणारं इंद्रधनुष्य. चहूबाजूंनी इमारतींची गर्दी नसेल, तरच दिसणारं इंद्रधनुष्य. विस्तीर्ण इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्याला स्वच्छ आकाश हवं. मोकळेपणा हवा. विस्तीर्ण जागा हवी. शुद्ध हवा हवी. सूर्याचा एक किरण हवा. त्याला विभागणारा पाण्याचा एक थेंब हवा, आणि इंद्रधनुष्य उघडल्यावर ते बघायला आपल्याकडे वेळ हवा. स्वस्थता हवी. विश्राम हवा. स्वच्छ इंद्रधनुष्याचा आनंद घेऊ शकेल असं मन हवं.

काहीजण म्हणतात ते खरं आहे. इंद्रधनुष्यं आजकाल दिसत नाहीत. इंद्रधनुष्यं आताशा, कमी झाली. इंद्रधनुष्यं कमी झाली तशी निर्मळ पाण्याची झुळझुळही कमी झाली. कमळं, गवतांचे गालीचे, जंगलाचा वास सारं सारं कमी झालं. भाज्या, फळ ह्यांचे वास कमी झाले. मातीचा वास गेला. पावसाचा शिडकावा झाल्यावर येणारा मातीचा धुंद वास. ह्या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी असणारा वेळही कमी झाला. वृत्तीही संपत चालली. सर्वत्र कचकड्याचं, खोटं पसरलेलं, वास नसलेलं, जान नसलेलं. माणसाला इंद्रधनुष्यापासून तोडणारं. माणसाला माणसापासून तोडणारं, माणसाला मुळापासून उखडणारं. शुष्क, निर्जीव वातावरण. 

प्रश्न हा आहे की, इंद्रधनुष्य आपल्याला दिसत राहावं म्हणून आपण काय करणार आहोत? पुढच्या पिढीकडे इंद्रधनुष्य कसं देणार आहोत? असं समजू नका, की तुम्ही एकटे काय करणार? असं म्हणू नका की तुम्ही दुर्बल, छोटे. एक एवढासा पावसाचा थेंब जर प्रखर सूर्यप्रकाशाला भेदून इंद्रधनुष्याचा चमत्कार दाखवत असेल तर आपल्याला का नाही जमणार? सुंदर इंद्रधनुष्यासाठी? 

साध्या, सोप्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी करता येतील आणि आपल्यासारख्या अनेकांना त्या करायला भाग पाडता येतील. पाण्याची काळजी घेऊ. वाया जाऊ न देऊ. शुद्ध ठेवू. परिसरात एकतरी सुंदर, विस्तीर्ण बाग असावी असा प्रयत्न करू. सरकारला तसं सांगू. प्लॅस्टिक कमी वापरू, सेंद्रीय पदार्थच खाऊ, वाहनांचा उगाच वापर टाळू. ओला आणि कोरडा कचरा वेगळा करू. परसात बाग करू. झाडं लावू, सुती कपडे वापरू. कृत्रिम रसायनांचा अती वापर टाळू.

निसर्गाला ओरबाडणं, बोचकारणं थांबवू. शांत राहू. प्रगतीचा उन्माद रोखू. निसर्गाला चालेल, आवडेल अशीच गती ठेवू. तसं नाही केलं तर निसर्ग फटके देईल. तसे तो देतो आहेच. दुष्काळ दाखवतो आहे. सुनामी आणतो आहे. महापुराचा अनुभव देतो आहे. हळूच इंद्रधनुष्यदेखील काढून घेतलं आहे त्यानं. हे थांबवलं पाहिजे. अनेक इंद्रधनुष्यं दिसतील, राहतील हे पहायला पाहिजे. ह्या गोष्टी आपोआप नाही होणार. त्यासाठी तुम्हा-आम्हांला, सरकारला, सर्वांनाच अथक मेहनत केली पाहिजे.

पाण्याचा एक थेंब बनून, प्रखर सूर्यप्रकाशाला अडवून इंद्रधनुष्याचा चमत्कार दाखवला पाहिजे!

Tags: इंद्रधनुष्य पर्यावरण निसर्ग वायू प्रदूषण Pollution Rainbow Environment Nature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके