'रानातल्या कविता' 'वही' या काव्यसंग्रहांनी आणि 'गांधारी' या कादंबरीने ख्यातनाम झालेले साहित्यिक श्री ना. धो. महानोर यांची अलीकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केली. कवी महानोर आमदार महानोर झाले. कवी आणि आमदार या त्यांच्या दोन्ही भूमिकांच्या संदर्भात केलेली ही बातचीत.
प्रश्न : विधान परिषदेवर साहित्यिकांचा प्रतिनिधी या नात्याने आमदार म्हणून नियुक्ती व्हावी असे अनेक प्रथितयश साहित्यिकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप खटपटी लटपटी करणारी साहित्यिक मंडळी मी पाहिली आहेत. यंदाही अनेकांची धावपळ आणि जिवाची घालमेल होत होती. पण अनपेक्षित रीत्या तुमचे नाव पुढे आले आणि माझी माहिती अशी की, ही आमदारकी तुम्हालाही अनपेक्षित होती. हे कसे घडले?
उत्तर : खरोखरच आमदारपदावरील नियुक्ती मला पूर्णपणे अनपेक्षित होती. प्रयत्न तर दूरच राहिले, पण आपण आमदार वगैरे व्हावे अशी पुसटशी इच्छादेखील मनात नव्हती. माझ्या नियुक्तीचे वृत्त आकाशवाणीवरून सायंकाळी सातच्या बातम्यांमध्ये एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून भाषण करीत असताना सांगितले गेले. ते ऐकून काही विद्यार्थी उत्साहाने व्यासपीठावर आले आणि त्यांनी ते घोषित केले.
त्याआधी माझ्याही नावाचा आमदारपदावरील नियुक्तिसाठी विचार होत असावा अशी अंधुकशी कल्पना मला आली होती ती काही जेष्ठ मित्रांच्या पत्रामुळे. 'जर माझं नाव आमदारकीसाठी सुचवले गेले तर मी नकार देऊ नये' अशा आशयाची ती पत्रे होती, कारण ज्यांना माझा स्वभाव व प्रवृत्ती माहीत होती त्यांना मी नकार देईन अशी धास्ती वाटत होती व हा आग्रह नसता तर तसे घडण्याचीही शक्यता होती.
यावेळी 'पुलोद' शासनाने साहित्यिकांचा प्रतिनिधी विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी नाव निश्चित करताना काही नवीन प्रथांचा अवलंब केला अशी मला नंतर माहिती कळली. साहित्यिकांचा प्रतिनिधी साहित्यिकांनीच निश्चित करावा अशी भूमिका शासनाने घेतली. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी विचारविनिमय करून काही प्रमुख ज्येष्ठ साहित्यिकांना अनौपचारिकपणे कुणाची नियुक्ती करावी याबाबत सल्ला मागितला अशी माझी माहिती आहे. दोन- तीन नावे होती त्यांतले एक माझे होते. मला कळले ते असे की ज्या ज्येष्ठ साहित्यिकांकडे ही नावे पाठवली गेली त्या सर्वांनी एकच नाव आपली प्रथम पसंती म्हणून कळवले आणि ते नाव माझेच होते.
मला वाटते की साहित्यकांशी अनौपचारिकपणे विनिमय करून त्यांचा विधान परिषदेवरील प्रतिनिधी निश्चित करण्याची ही प्रथा चांगली आहे. वेगळी आहे. यापूर्वीचे मला निश्चितपणे ठाऊक नाही तरीदेखील ग. दि. माडगूळकर हे यशवंतरावजी चव्हाणांचे मित्र म्हणूनच विधान परिषदेवर घेतले गेले अशी लोकांत बोलवा आहे. माडगूळकर साहित्यिक म्हणून श्रेष्ठ यात शंकाच नाही. तरीपण त्यांच्या यशवंतरावांशी असलेल्या मैत्रीचा संदर्भ लोक विसरू शकत नाहीत व अकारण आक्षेप निर्माण होतो. त्यापेक्षा साहित्यिकांचा सल्ला घेऊन नियुक्ती करण्याची प्रथा मुख्यमंत्री शरद पवारांनी सुरू केल्याने तो खराखुरा साहित्यिकांचा प्रतिनिधी ठरेल.
प्रश्न : तुमचा यशवंतराव चव्हाणांशी 'घरोबा' आहे. शरद पवारांशी 'दोस्ताना' आहे. हे दोघेही जण राजकारणी, मग तुमचे त्यांचे स्नेहसंबंध कसे काय निर्माण झाले?
उत्तर : श्री यशवंतराव चव्हाण ह्यांचा मूलतः पिंड साहित्यिकाचा आहे पण राजकारणात ते गुरफटले आहेत. राजकारणाच्या उलाढालीत अनेक माणसे त्यांच्यामधील 'कलावंत' आणि काही वेळा तर 'माणूस' ही हरवून, गमावून बसतात. राजकारण हेच त्यांचे बेट बनते आणि साहित्य कलेशी असलेले त्यांचे दुवे निखळून पडतात. पण माझा अनुभव असा आहे की राजकारणाच्या वाळवंटातही ज्यांनी आपल्या अंतःकरणात कला-साहित्य प्रेमाचे 'ओर्थेसिस' काळजीपूर्वक, निष्ठापूर्वक जपले आहे अशा मोजक्या राजकीय नेत्यांपैकी यशवंतराव एक आहेत.
यशवंतरावांचे साहित्याचे वाचन खूप आहे. चांगले, निवडक असे आवर्जून ते वाचतात. त्यांचे जीवन कितीही धकाधकीचे, घावपळीचे असले तरी त्यांच्या बोलण्यातून सहज जाणवते की त्यांनी वाचायला हवे असे सारे नवे-जुने वाचलेले आणि लक्षात ठेवलेले आहे.
इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात त्यांचा- माझा प्रथम परिचय झाला. माझ्या काव्यवाचनावर ते निहायत खूष झाल्याचे त्यांनी सांगितले. पण ती केवळ औपचारिक खुषी नव्हती हे नंतर मला उमजले. महिनाभराने सिद्धेश्वर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. मला मुद्दाम बोलावून घेतले होते. मुख्य कार्यक्रम झाल्यावर रेस्ट हाऊसला बसलो. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शेतीबाडी, घरचं, दारचं सर्व अगत्यानं विचारून झाल्यावर 'तुमच्या कवितेनं मला वेड लावलंय, आज नीटपणे भरपूर ऐकवा' असा त्यांनी आग्रह धरला. मी म्हणालो हे कविता गायचं ठिकाण नाही पुन्हा केव्हा तरी बसू या. तर बसलेल्या लोकांना त्यांनी 'आता महानोरांच्या कविता ऐका' म्हणून सांगितले.
सगळेजण मी आता कविता म्हणणार म्हणून माझ्याकडे पाहू लागले व मी गोंधळून यशवंतरावांकडे पाहिले तर त्यांनी स्वतःच माझ्या 'रानातल्या कविता' पाठ म्हणून दाखवायला सुरवात केली. एक नव्हे अनेक कविता त्यांनी तोंडपाठ सर्वांसमोर म्हणून दाखवल्या. मग मीही अनमान केला नाही व आणखी काही कविता म्हटल्या. माझ्या चांगल्या कवितेला चांगल्या जागी चांगली आणि अचूक दाद यशवंतराव देत होते. इतकेच नव्हे तर कवितांच्या काव्यगुणाबद्दलही बोलत होते. या दुसऱ्या भेटीपासून आमची गट्टी जमली. आता जेव्हा केव्हा भेट होते तेव्हा वाङ्मयीन नव्या-जुन्यावरच आमची चर्चा होते. साहित्यकलेविषयी आपलेपण, आस्था असल्याशिवाय आणि तसा पिंड असल्याशिवाय ही रसिकता शक्य नाही.
पैशाप्रमाणेच रसिकतेचेही ढोंग करता येत नाही आणि केले तरी फार वेळ टिकत नाही.
श्री शरद पवारांची पहिली भेट औरंगाबादला झाली. त्याआधी पत्रातून ओळख होती. पहिल्या भेटीत आमचे बहुतेक बोलणे शेतीवरच झाले. शरदराव मुळचे आणि मनाचे शेतकरीच आहे. कवितेइतकाच शेती हा माझ्याही प्रेमाचा विषय आहे. केळी, मोसंबी, हायब्रीड कपाशी, ज्वारी यावर आमचे खूप बोलणे झाले आणि दोन शेतकरी म्हणून आम्ही जवळ आलो. मग साहित्याबद्दल बोलणे निघाले. महत्त्वाचे असे वैचारिक साहित्यिक लेखन वाचण्याचा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे, हे मला जाणवले. 'एक गाव : एक पाणवठा' आणि इतर सामाजिक चळवळींवरही आमचे बोलणे झाले. राजकारण सोडून सर्व विषयांवर आम्ही बोललो, त्यामुळे त्यांच्या राजकारणी व्यक्तिमत्त्वाचा माझा तसा संबंध आलाच नाही.
प्रश्न : विधान परिषदेवर साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करायचे म्हणजे नेमके काय करायचे अशी योजना मनाशी आहे?
उत्तर : साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून आमदारपदी नियुक्ती झाल्याने खूप मोठे जबाबदारीचे काम आपल्यावर आहे असे मला वाटते आहे. दोनतीन पुस्तके आणि 35-36 चे वय ( जन्म तारीख 16 सप्टेंबर 1942 ) महाराष्ट्रातील बड्या लेखकांच्या तुलनेत हे कमी असल्याने थोडे 'लहान तोंडी मोठी घास' तर होणार नाही ना असे वाटले. ‘अनेक कारणांनी या पदी तुझीच निवड सर्वोत्तम आहे असा दिलासा अनेक नामवंत साहित्यिकांनी दिल्याने धीर आला येवढे खरे.
महाराष्ट्रातील साहित्यविषयक चळवळी, संस्था, परिषदा, संमेलने, सरकारी, निमसरकारी किंवा बिनसरकारी संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश योजना, साहित्य संमेलने या सर्व घडामोडींशी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त आमदाराचा निकट आणि जिवंत संबंध आणि सहभाग असायला हवा असे मला वाटते.
आजपर्यंत या सर्व घडामोडींत सक्रिय सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे असे मानले गेले नाही.
मी हे साहित्यिक म्हणून नेमलेल्या आमदाराचे कर्तव्य आहे असे मानतो. उदाहरणार्थ, परवा साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत वाङ्मयीन कोशाचे कार्य करणाऱ्या प्रा. म. वा. धोंड यांना 31 मार्च 1979 पासून अचानक ( तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ) निलंबित केले. काही प्रमुख साहित्यिक प्रा. धोंड यांच्यावर यामुळे झालेल्या अन्यायाचे प्रकरण घेऊन माझ्याकडे आले. मी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून सरकारचे प्रा. धोंड यांच्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. शासनानेही दखल घेऊन प्रा. धोंड यांना बडतर्फ केल्याच्या आदेशाला स्थगिती आदेश दिला.
नव्या साहित्यिकांच्या पुस्तक प्रकाशनाची एक योजना महाराष्ट्र शासनाने आखली आहे. योजनेचा हेतू चांगला पण अंमलबजावणीचा आराखडा सदोष होता. त्यातील दोषांचे निराकरण व्हावे या उद्देशाने मी 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये लेख लिहिला. येवढेच नव्हे तर विधान परिषदेत त्यावर चर्चाही घडवून आणली. त्या कमिटीवरच्या आणि इतरही अनेक साहित्यिकांना 'चांगले केलेत' असा अभिप्राय पत्र किंवा फोनने दिला आणि आता शासकीय पातळीवरदेखील त्या योजनेतील उणीवा दूर करण्याच्या दिशेने नवे निर्णय घेतले जात आहेत. आमदारपदी माझी नियुक्ती झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यावर खूप पत्रे आली. सगळ्यांचे म्हणणे 'कविता जपा.'
आमदारकी योग्य गतीला मिळाल्याच्या आनंदाला 'कवितेचे काय होणार' ह्या काळजीची झालर असल्याचे अनेकांनी लिहिले. आमदारकी म्हणजे काही तरी 'भलते-सलते' आहे अशीही काही जणांची समजूत दिसली.
सर्वश्री श्री. पु. भागवत, मंगेश पाडगावकर, भालचंद्र नेमाडे वगैरे मंडळींनी काही फारच चांगल्या गोष्टी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात करता येतील आणि त्या नेमकेपणे व्यवस्थितपणे कराव्यात असे कळवले.
श्री पु. ल. देशपांडे यांनी लिहिले: 'तुम्ही आमदारकी स्वीकारली ही फार चांगली गोष्ट आहे कारण त्यात राजकारण नाही. सध्या जे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात आले आहे त्यात मनापासून लोकांचे भले व्हावे अशी इच्छा असणारी माणसे आहेत. राजकारण आणि नोकरशाही ह्या कात्रीतला हा रस्ता आहे हे तुमचे म्हणणे खरेच, पण सुदैवाने शरदरावजी, सदानंद वर्दे, विनायकराव पाटील, सुशिलकुमार शिंदे ह्यांच्यासारख्यांशी आपला संवाद होऊ शकतो. पूर्वी तसा फक्त यशवंतराव चव्हाणांशी होऊ शकत असे.'
श्री भालचंद्र नेमाडे यांचे असे म्हणणे पडले की 'साहित्यविषयक चळवळी, पुस्तक प्रकाशन व पारितोषिक योजना, मराठी लेखकांना मिळणारी कमी रॉयल्टी आदी विषयांबाबत आपली म्हणून व शरदरावांच्या 'पुलोद' शासनाची म्हणून काही काँट्रिब्युशन वाङ्मयीन क्षेत्रात होईल असे पाहिले पाहिजे.
प्रश्न : नागपूरचे हिवाळी आणि मुंबईचे उन्हाळी अशी विधिमंडळांची दोन अधिवेशने तुम्ही पाहिली, अनुभवली. काय वाटले?
उत्तर : मी आमदार म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रथम विधिमंडळ सभागृह पाहिले. त्यामुळे बरेच नाविन्य आणि नवखेपण सुरवातीला वाटले. मी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालो असले तरी शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्नांत मला तितकेच स्वारस्य आहे. सामाजिक प्रश्न, सहकारी क्षेत्रातील समस्या, विकास योजनांची अंमलबजावणी यांच्याशी माझा जिवाभावाचा संबंध आहे. त्यामुळे फक्त साहित्याचा विषय निघाला तरच विधिमंडळात आपण बोलायचे असे मी मानीत नाही. करीत नाही.
विधान परिषदेत मी शपथ घेऊन सदस्य झाल्यावर पहिल्याच दिवशी 10 एकरांच्या आतील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माफीचा प्रस्ताव आला. त्यावेळी मी उत्स्फूर्तपणे उभा राहिलो आणि माझे विचार मांडले. अनेकांना साहित्यिकांचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या पोटतिडिकेने आणि माहितगारपणे बोलतो याचे आश्चर्य वाटले पण मला माझ्या जिव्हाळ्याच्या अशा याही विषयातील प्रश्नांना वाचा फोडण्याकरता एक समर्थ व्यासपीठ मिळाल्याचे समाधान लाभले. विधिमंडळातील चर्चेत शेती व ग्रामीण प्रश्नांवर वारंवार चर्चा उपस्थित होते आणि दरवेळी मी इतरांइतक्याच जागृततेने त्यात सहभागी होतो.
आता आमदार म्हणून विधिमंडळातील माझ्या कामकाजात सफाई व सराईतपणा माझा मलाच जाणवू लागला असल्याने या व्यासपीठाच्या मर्यादा आणि शक्तिस्थानेही लक्षात येऊ लागली व अनुभवाने या माध्यमाचा आपल्याकडून लोकांच्या असलेल्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी उपयोग कसा करता येईल हेही उमगू लागले आहे.
प्रश्न : कविता लेखनाकडे तुम्ही केव्हा आणि कसे वळलात?
उत्तर : साधारणतः विशीत असताना म्हणजे 1960 च्या आसपास मी कविता लिहू लागलो. 1958 च्या सुमारास कविता 'भावतेय' हे मला जाणवू लागले होते.
इतरांच्या कवितांचा मी तसा फार आधीपासून वेडा होतो.
शाळेतच कविता वाचायचा नाद मला लागला. शाळेतले विद्यार्थी सहसा पाठ्यपुस्तकाबाहेरच्या कविता वाचत नाहीत, पण मी फार वाचल्या. 11 वी पर्यंतचे माझे शिक्षण हजारभर वस्तीच्या शेंदुर्णी गावात झाले. शेंदुर्णीला मला जे शिक्षक होते त्यांतल्या सोनावणे गुरुजी वगैरेंना साहित्याची विशेषतः कवितेची गोडी आणि समज चांगली होती. गाव छोटेसे असूनही शाळेचे वाचनालय या शिक्षकांच्या हौशीमुळे, प्रयत्नांनी चांगले होते. त्या वाचनाचा मोठा वाटा माझी कवितेविषयीची ओढ घडवण्यात आहे.
शाळेत आम्ही दरवर्षी 'ज्योती' नावाचे छापील वार्षिक काढायचो. मी त्याचे संपादन लेखनात खूप उत्साहाने सहभागी व्हायचो.
प्रत्यक्षात माझी चांगली समजली गेलेली व प्रकाशित कविता 1960 नंतर पळसखेड या माझ्या गावी येऊन शेतीत पडल्यावर सुचली.
जळगावला जेमतेम वर्षभर कॉलेजात गेलो आणि मग सोडून दिले. कॉलेज सोडायला अनेक गोष्टी कारणीभूत झाल्या. एक घरचे प्रचंड दारिद्र्य. दुसरे, गुंतागुंतीचे कौटुंबिक दुःख आणि मॅडनेस! काही गोष्टींचा मॅडनेस!
कॉलेज सोडून घरची जबाबदारी सांभाळायला म्हणून मी पळसखेडच्या आमच्या शेतीत येऊन दाखल झालो.
माझे वडील कठोर मजुरीतून शेतकरी झाले होते. मीही पूर्ण वेळ शेतीच करावी असे ठरल्यावर निसर्ग, बागायती, नदी-नाले या सगळ्या गोष्टी माझ्या नात्यागोत्यातल्याच मला झाल्या. कशा नेमक्या त्या सांगता येणार नाही, पण सावल्या पाण्यात विरघळतात तशा त्या गोष्टी कवितेतून आल्या.
मी 1960 ते 1966 या सहा वर्षांत प्रामुख्याने प्रतिष्ठान आणि सत्यकथा या वाङ्मयीन मासिकांतून कविता लिहल्या.
अगदीच अनपेक्षितपणे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या साहित्यिकांकडून त्यांचे कौतुक होत गेले.
मी काही फार चांगले, वेगळे लिहिले आहे, निसर्गाचे नवीन रूप कवितेतून मांडले आहे. ह्याची कुठलीही वेगळी जाणीव मला नव्हती. उलट आपण खेड्यातील, एक साधारण लिहिणारे, मराठीच्या एवढ्या थोर पसाऱ्यात आपल्याला कोण विचारणार अशी एक भावना मनात कुठेतरी होती.
पॉप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांनी 1966 मध्ये स्वतःहून पत्र लिहिले आणि 'तुमची कविता ही मराठीतील अतिशय चांगली कविता आहे. मी ती पुस्तकरूपाने छापतो' असे कळवले.
1967 साली पॉप्युलरने माझे पहिले, पुस्तक कविता संग्रह प्रकाशित केला. 'रानातल्या कविता'. 1960 साली जेव्हा मी कविता लिहू लागलो तेव्हा साधना, मराठवाडा यांचे दिवाळी अंक आणि सत्यकथा, प्रतिष्ठानला त्या पाठवल्या.
सुरवातीच्या काही कविता परत आल्या. त्या दुसऱ्यांकडे पाठवल्यावर छापल्या गेल्या. प्रतिष्ठानने परत पाठवलेल्या काही कविता 'मुद्रा'ने, 'मुद्रा'ने परत पाठवलेल्या, प्रतिष्ठानाने किंवा अभिरुचीने किंवा इतर एकाद्याकडून साभार परत आलेली कविता 'सत्यकथे'ने छापावी असेही काही वेळा काही कवितांच्या बाबतीत घडले.
एकदम समूहाने (बंचने) आल्यामुळे रानातल्या कवितांचा 'इंपॅक्ट' खूप झाला असे मला वाटते. केशवसुत जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठेवलेले महाराष्ट्र शासनाने वाङ्मयीन पारितोषिक या पुस्तकाला मिळाले. महाराष्ट्रात 'रानातल्या कविता' चे बेहद्द स्वागत झाले.
बक्षीस मिळाल्यामुळे पुस्तकाला उचल मिळते असे मानणारा मी नाही. 'रानातल्या कविता' त्यातील काव्यगुणांमुळे लोकप्रिय ठरल्या. केवळ तीनतीन बक्षिसे मिळाली म्हणून नव्हेत. कित्येक वाङ्मयीन पुरस्कार मिळूनही 'नगण्य' राहिलेली पुस्तके माझ्या डोळ्यांसमोर आहेत. तर नेमाड्यांच्या कोसला किंवा ज्ञानेश्वर नाडकर्णीच्या 'विद्घोष' सारखी बक्षीस न मिळूनही लोकांनी डोक्यावर घेतलेली पुस्तके मला ठाऊक आहेत.
प्रश्न : कवींच्या कवितासंग्रहांचा पाठ्यपुस्तक म्हणून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला की, प्राध्यापक विद्यार्थ्यांपुढे तीची जी परिक्षार्थी चिरफाड करतात त्यामुळे कवीला यातना होत असाव्यात असे मला वाटते. तुमच्या दोन कवितासंग्रह व एका कादंबरीविषयी प्राध्यापक जे शिकवताना सांगतात ते व तुम्हाला स्वतः स्वतःच्या साहित्यविषयी जे वाटते ते यात काय फरक आहे?
उत्तर : पाठ्यपुस्तकातील कविता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माणसांनी जरी शिकवली तरी त्यात काही बिघडत नाही. कारण तो ज्याच्या त्याच्या समजुतीचा भाग आहे. एकच कविता वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने जाणवू शकते. माझ्या कित्येक निसर्ग कवितांबाबत ज्वार, केळी, राघू इत्यादींच्या संदर्भामुळे ती प्रेमकविता आहे अशा समजुतीने शिकवणारे प्राध्यापकही मी पाहिले आहेत.
कवीवर प्राध्यापक त्याची कविता कशी आणि काय अर्थ लावून शिकवतात याचा परिणाम होण्याचे कारण नाही किंवा त्याचे सुखदु:खही मानण्याचे कवीला कारण नाही.
कविता आपण वाचतो तेव्हाही ऐकणारे लोक वेगवेगळ्या अर्थाने ती कविता घेत असतात.
'रानातल्या कविता' ही शेतीवाडीत जगत असलेल्या, खेड्यातल्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक झालेल्या एका जातिवंत शेतकऱ्याची कविता आहे. त्याच्या रूपाने आलेली ती कविता तिथल्या निसर्गाचे भावभावनांचे निर्मळ चित्रण करते येवढीच माझी भावना. प्रतिके आणि बाकीच्या गोष्टी, लय इत्यादी त्या कवितेत इतकी अंगभूत, एकरूप झालेली आहेत की कशासाठी काय केलेले आहे ते मलाही कळले नाही.
पावसाळ्यातले बदलते आभाळ जसे वेगवेगळ्या रूपाने निसर्गतः येते तशी माझी कविता नकळत आली. लयबद्ध झाली तशी आली. लिहिताना जाणीवपूर्वक असे काही केले नाही. हे इतकं चांगलं काही आपल्या हातून लिहून होतेय अशीही फारशी जाणीव नव्हती.
'रानातल्या कविता' नंतरचा कवितासंग्रह 'वही' 1971 साली आणि 'गांधारी' कादंबरी 1973 साली प्रसिद्ध झाली.
या दोन्हींलाही महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार लाभले.
'वही' चे वैशिष्ट्य असे की ती 'रानातल्या कवितां'पेक्षा थोडी सूक्ष्म तरल व भावकवितेच्या जवळ जाणारी कविता वाटते. त्यांत शेवटी लावणीच्या ढंगाचे खेड्यापाड्यात म्हटल्या जाणाऱ्या 'वही'चे प्रयोग केले आहेत. एक नवा फॉर्म, मांडणी, गाणं ह्यासाठी ती गीते यशस्वी आहेत असे जाणकार म्हणतात.
'गांधारी'चे वैशिष्ट्य असे की, 1972 ला स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव झाला; 25 वर्षातले खेड्यांतले जे जीवन होते, नवे-जुने, राजकीय, सामाजिक, कृषिविषयक परिवर्तन होते त्याची या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने चर्चा झाली.
सर्वश्री व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, उद्धव शेळके, इत्यादी मंडळींनी जे ग्रामीण जीवन आपल्या साहित्यातून मांडले ते 1955 च्या आसपासचे होते असे मला वाटते.
माझ्या कवितेत निसर्गकविता, प्रेमकविता अधिक, सामाजिक संदर्भाच्या कविता त्यात कमी आहेत.
खेड्यात जगत असलेला मी एक संवेदनाशील माणूस. खेड्यातले गावकीचे राजकारण, समाजकारण, झगडे, जातीयता, शेतीवाडी, नीतीअनिती, ग्रामपंचायती, सोसायट्या इत्यादी जवळून पाहून मी अस्वस्थ झालेलो होतो. ह्या गोष्टी लिहिण्यासाठी कविता हे माध्यम मला अपुरे वाटले. म्हणून या संदर्भातली जी माझी जाणीव होती, जी अस्वस्थता होती, मनाला आलेली मरगळ आणि मोडलेपण होते ते मी मौजे गांधारीच्या रूपाने उभे केले. गांधारीने मला खूप समाधान दिले.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या, कानाकोपऱ्यातल्या कितीतरी लोकांनी हे चित्रण त्यांच्याच खेड्याचे आहे असे म्हणून त्या कादंबरीचे स्वागत केले.
स्वतःच्या पुस्तकांत 'रानातल्या कविता' हे माझे आवडते पुस्तक आहे तर इतरांच्यात व्यंकटेश माडगूळकरांचे 'माणदेशी माणसे' हे सर्वाधिक आवडते पुस्तक.
प्रश्न : साहित्यिकांचे कडू-गोड, बरे-वाईट असे कोणते अनुभव उमेदवारीच्या काळात तुम्हाला आले?
उत्तर : 1963-64 च्या सुमारास माझी फारशी कविता प्रकाशित झालेली नव्हती. काही साहित्यिकांना, प्राध्यापकांना किंवा संपादकांना भीतभीत मी कविता दाखवल्या तर त्याच्यावर फारशी चांगली प्रतिक्रिया न देणे हे त्यांचे वैशिष्ट्य लक्षात आले. 'कुरणाऐशी उदंड कविता वाढलीय', 'तू एक खेड्यातला पोरगा, तुला कोण विचारणार?' असे ते म्हणायचे.
त्यावेळी कुसुमाग्रजांकडे मी तेरा कविता कच्च्या पाठवल्या होत्या. थोडे उशिरा पण त्यांचे एक दीर्घ पत्र आले. कुसुमाग्रजांनी त्या कवितेवर खुष होऊन समिक्षा लिहिली. 'मी तुमच्यावर बेहद्द खूष आहे आणि हे जर तुम्हीच लिहिलेले असेल तर मला जरूर भेटा' असेही लिहिले. त्यानंतरच्या भेटीत वयाची मोठेपणाची सगळी बंधने तोडून तात्यांनी मला व माझ्या कवितेला कौतुकले.
अशाच पद्धतीने 1964 च्या मौज दिवाळी अंकात माझ्या चार 'रानातल्या कविता' छापून आल्या. नंतर असे कळले की पु. ल. देशपांड्यांनी मौजेत जाऊन माझा पत्ता शोधून काढला आणि 'दिवाळीच काय माझे वर्ष साजरे झाले' असे कुठलीही ओळख नसताना लिहिले.
काही अनुभव सांगण्यासारखे आहेत.
मी काव्यवाचन ठिकठिकाणी गाजवू लागलो. तेव्हा 'रानातल्या कवितेतल्या' 'ग्रीष्मा'सारख्या सामाजिक-राजकीय संदर्भ असलेल्या कवितेला प्रचंड दाद मिळायची. काही विशिष्ट गाण्याच्या पद्धतीची गेय कविता जास्त गाजायची. अशा वेळी विजया राजाध्यक्ष, श्री. पु. भागवत, भालचंद्र नेमाडे अशा काही मित्रांनी इशारावजा प्रेमळ सूचना केली की कवींनी 'त्या' कवितांच्या किंवा तशा लोकप्रिय बाज असलेल्या कविता करण्याच्या फारसं मागे लागू नये. मुळात जशी कविता वाटते तशीच लिहावी, 'मास'च्या 'ऑडियन्स'च्या दाद देण्याच्या पद्धतीचा विचार करून तशी कविता लिहिण्याच्या नादी कवी लागतात ते मी करू नये म्हणून मला सावध केले त्यामुळेच मी बहकलो नाही.
साहित्यिकांमधील कंपूशाही, गटबाजी यांचेही काही अनुभव आले.
साहित्यिकांच्या काही संस्थामध्ये साहित्यापेक्षा राजकारण जास्त चालते असेही पाहिले.
साहित्य संमेलनांना जत्रेचे आणि दाखवेखोरीचे स्वरूप येते असे मी अनुभवले आहे त्यामुळे काही तरी पर्यायी व उपयुक्त प्रथा-पद्धती हवी असे वाटते.
Tags: मौज पु. ल. देशपांडे विजया राजाध्यक्ष भालचंद्र नेमाडे ग. दि. माडगूळकर विधानपरिषद यशवंतराव चव्हाण शरद पवार Mouj ना. धो. महानोर P. L. Deshpande Vijaya Rajadhyaksha Bhalchandra Nemade G. D. Madgulkar Legislative Council Yashwantrao Chavan Sharad Pawar N. D. Mahanor weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या