डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तंबाखूमध्ये तीन मार्गांनी माणसाला गुलाम बनविण्याची क्षमता आहे व त्या तीनही प्रकारांवर उपाय करता येण्यासारखे आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे 'सवय'. दुसऱ्या प्रकारचे कारण म्हणजे तंबाखू सेवनातून मिळणारा आनंददायी वा उत्तेजक अनुभव. तंबाखूच्या व्यसनाचे तिसरे अधिक गंभीर प्रकारचे कारण म्हणजे तंबाखूतील निकोटिनचा मेंदूवर होणारा परिणाम. म्हणून आपल्या आयुष्याचा ताळेबंद जमेच्या बाजूला राखण्यासाठी तंबाखूच्या तडाख्यातून लवकरात लवकर सुटका करून घ्यायला हवी.
31 मे आंतरराष्ट्रीय तंबाखूसेवनविरोधी दिनानिमित्त विशेष लेख.
 

तंबाखू अनेकांच्या जीवनात नित्याची बाब झाली आहे. इतकी, की तिच्यापासून मुक्तता हा विषयच कित्येकांच्या मनातसुद्धा येत नाही. सातारा येथे आम्ही परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र चालवितो. तिथे दारूचे व्यसन सुटण्याकरिता दाखल असणाऱ्या व्यक्तींना तंबाखूचे रेशन पुरविण्याची वेळ आमच्यावर येते. अन्यथा रुग्ण तर उपचार नाकारतात; पण त्यांना दारू सोडण्याकरिता प्रसंगी जबरदस्ती करावयास तयार असणारे त्यांचे नातेवाईक त्यांचा तंबाखू बंद करण्याची आवश्यकता मात्र समजू शकत नाहीत. आपल्या रुग्णाच्या आठवडा भेटीमध्ये प्रेमपूर्वक भेट म्हणून ते तंबाखूच्या पुड्या आणून देतात! दुसरीकडे आपला नवरा दारूच्या व्यसनाधीन झाला आहे; तो दारू सोडतो म्हणतो, तरी परत परत त्याच वाटेने जातो असे म्हणून त्याला शिव्या- शाप देणारी महिला पाहा. तिला तिच्या मिश्री घासण्याच्या सवयींविषयी बोललेले आवडत नाही! ते तिला पूर्णतः गैरलागूच वाटते. आम्ही अनेकदा दारूच्या भयानक दुष्परिणामांविषयी बोलतो; दारूच्या व्यसनाधीनतेविरुद्ध सर्व प्रकारचे लढे पुकारतो. तेव्हा धूम्रपानबंदी हे मृत्यू टाळण्याचे सर्वांत किफायतशीर धोरण असल्याचे कसे विसरतो? तंबाखूची ही मोहिनी सर्वावर पडण्याचे कारण काय असावे?

याची अनेक कारणे पुढे येतात- एक तर तंबाखू सेवनाचे तात्कालिक परिणाम- जे झिंगण्यासारखे- इतरांच्या डोळ्यावर येत नाहीत. खेरीज तो सेवन करणाच्यांची कार्यक्षमता तात्पुरती का होईना वाढवितात. त्यामुळे तंबाखू सेवन या ना त्या मार्गाने (तंबाखू मळून खाणे, मिश्री लावणे, गुटखा, मावा खाणे.. तपकीर ओढणे किंवा धूम्रपान करणे) कुटुंबातील स्त्रियांपासून मुलांपर्यंत कोणीही केव्हाही करू शकतो. परंतु - तंबाखूतील निकोटीन-जे एक प्रभावी रसायन आहे- ते लवकरच सर्वाँच्या शरीराचा व मनाचा ताबा घेऊन टाकते आणि त्याचा पत्तादेखील लागू देत नाही. मग आम्ही म्हणतो, 'सवय लागली.’ व्यसन हा शब्द आमच्या मनातही येत नाही. अशी सवय की जिला कोणी नावे ठेवत नाहीत; उलट एकमेकांशी संवाद करण्याला निमित्त म्हणून चांगलीच उपयोगी पडते. कोणीकोणी तर म्हणतात, ‘तंबाखू औषधीसुद्धा आहे. आणि खरंच नाही का तंबाखूमुळे शौचाला साफ होत? आळस जातो; डोक्याचा ठणका यांबतो! आणि तोटा? तो प्रश्न कुठे येतो? कारण चिमूटभर तंबाखू मायबाप सरकारने अजूनतरी महाग केलेली नाही, नि तीदेखील परवडू नये अशी वेळ आम्हावर आलेली नाही! या अशा उत्तरांनी आम्ही खूष राहतो. त्यातून कधी तंबाखू बंद करण्याचा प्रसंग उद्भवलाच तर तो अनुभव भलताच तापदायक ठरतो. मग आम्ही म्हणतो, कशाला त्या फंदात पडा!

सशक्त तंबाखू लॉबी

खरोखरच तंबाखू सोडण्याच्या फंदात का पडावे? याचे स्पष्ट उत्तर देण्यात आम्ही कमी पडतो. हे तंबाखू सेवनाच्या प्रचंड प्रमाणाचे मुख्य कारण दिसते. तंबाखू ही माणसाला व्यसनाधीन करून आरोग्याला निश्चित हानी पोहोचविते, हे राजमान्य होण्याला 1964 साल उजाडावे लागले. तोवर धूम्रपान हे तारुण्य आणि मस्तीचे प्रतीक बनून गेलेले होते. स्त्रिया व मुलांनी यात कुठे कमी पडू नये यासाठी प्रसारमाध्यमांनी कंबर कसलेली होती व तंबाखू उत्पादकांना चांगलाच सूर गवसलेला होता. तेव्हा आरोग्य संघटना काहीही म्हणोत; त्याच्याविरुद्ध प्रचार करणे ओघानेच येते; आणि ते कोणत्याही पातळीवर घडविणे शक्यही होते. यामध्ये धूम्रपानाने स्मरणशक्ती सुधारते यांसारखे अर्धशास्त्रीय पुरावे सादर करणे कठीण नसते. संशोधनाचा देखावा त्याकरता उभारला जातो. (अमेरिकेमध्ये सध्या काही बड्या तंबाखू कंपन्यांविरुद्ध जनहितार्थ खटला चालू आहे. त्या कामकाजादरम्यान नुकतीच काही गुप्त कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यात आली. त्यातील ‘आगामी 10 वर्षांकरिता नावीन्यपूर्ण उत्पादने' या नावाच्या एका तंबाखू कंपनीच्या रिपोर्टमध्ये तंबाखू ही व्यसनाधीन बनविते हे मान्य करून अशाच प्रकारची आणखी उत्पादने बाजारात आणून आपला नफा वाढविण्याचा घाट घातल्याचे दिसून येते.) भरीस भर म्हणजे दारू तंबाखूच्या अबकारी महसुलाशिवाय शासन चालविताच येणार नाही, अशी नपुंसक वृत्ती जगभरातल्या सर्व राज्यकत्यांनी बनविलेली असते.

मग तंबाखू बंदीसाठी राजकीय इच्छाशक्ती सोडाच; उलट प्रसारासाठीच वरदहस्त लावणार नाही तर काय?

आजघडीला भारतातील सुमारे 0.2 टक्के इतकी जमीन तंबाखू लागवडीखाली असून भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा तंबाखू उत्पादक देश आहे. जगातील सर्व तंबाखूजन्य उत्पादनांपैकी 13.5 टक्के उत्पादन भारतातून होते. 1993 च्या माहितीनुसार 43 लाखांहून अधिक भारतीय लोक तंबाखू उत्पादन, प्रक्रिया व विक्रीशी संबंधित व्यवसायात आहेत. दुसऱ्या बाजूला सुमारे 65 टक्के भारतीय पुरुष तंबाखू सेवन करत आहेत. (भारतीय स्त्रियांबाबतीत वेगवेगळी आकडेवारी उपलब्ध असून गुजरातमध्ये हे प्रमाण 15 टक्के, तर आंध्र प्रदेशात 67 टक्के इतके प्रचंड आहे.) त्यांपैकी अधिक तर पुरुष (85 टक्के) धूम्रपान करतात पण स्मोकलेस टोबॅकोबाबत स्त्रिया पुरुषांबरोबरीने आहेत. (शीख व पारशी समाजात मात्र तंबाखू सेवनाचे प्रमाण खूपच कमी आहे.) ग्रामीण भागात धूम्रपानाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. भारतात एकंदर तंबाखूवर कर कभी प्रमाणात आहेतच, शिवाय स्थानिक पातळीवर होणाऱ्या सुट्या तंबाखू आणि बिडी उत्पादनविक्रीवर शासकीय अंकुश जवळजवळ नसल्यातच जमा आहे. त्यामुळे अशा तंबाखू उत्पादनांचा वापर अधिक आहे. त्याचवेळी भारतात आज राष्ट्रीय पातळीवर एकही तंबाखूविरोधी संघटन नाही. परिणामतः तंबाखूविरोधी सुस्पष्ट व जोरदार प्रचार करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा समंजस व जागृत सर्वसामान्य माणसावर आहे. अन्यथा त्याचेच जीवनमान धोक्यात आहे. अशा परिस्थितीत आपण काय करायला हवे?

तंबाखूविरोधी कार्यक्रम

सर्वप्रथम तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत पुरेशी जागृती व्हायला हवी. तोंडातील कर्करोगाचे जगात सर्वाधिक प्रमाण भारतात असून त्यांपैकी 90 टक्के रुग्णांबाबत तंबाखूच कारणीभूत असते. इथल्या पुरुषांना होणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी निम्मे, तर स्त्रियांना होणाऱ्या एकंदर कर्करोगांपैकी 1/4 इतके कर्करोग हे तंबाखूमुळे होतात. (उदा. फुफ्फस, श्वासनलिका, अन्ननलिका, जठर, मूत्राशय, गर्भाशय, स्वादुपिंड इत्यादी अवयवांना तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो.) 40 वर्षे वयापूर्वी उद्भवणाऱ्या हृदयरोगांमध्ये 60 टक्के तर चाळीशीनंतरच्या हृदयरोगांमध्ये 50 टक्के प्रमाण हे तंबाखूजन्य हृदयरोगांचे असते. याखेरीज शरीरातील रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण होणे, मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे, रक्तप्रवाहात गुठळ्या होणे; दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसातील फुगे फुटणे, अल्सर, हाडे ठिसूळ होणे यांसारख्या अनेक गंभीर आजारांची उत्पत्ती नियमित तंबाखू सेवनामुळे होत असते. या गोष्टींची सुशिक्षित भारतीयांनाही अभावानेच कल्पना असते. धूम्रपान करणाऱ्यांमुळे आगी लागण्याचे प्रमाणही कल्पनातीत मोठे आहे. इतरांच्या धूम्रपानामुळे होणारा उपद्रवदेखील गांभीर्याने घ्यावयाची गोष्ट आहे. कारण असा सेकंडहँड स्मोक आपल्याला नैसर्गिक होऊ शकणाऱ्या कर्करोगांचे व हृदयविकारांचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढवितो.

या नकळत घडणाऱ्या धूम्रपानामुळे मुलांच्या वाचन, आकलन, कार्यकारणभाव व गणिती क्षमता मंदावतात असेही सिद्ध झाले आहे. गरोदर मातांनी कळत वा नकळत धूम्रपान केल्यास जन्माला येणाऱ्या बालकांमध्येही शारीरिक व मानसिक विकृती निर्माण होऊ शकतात. 1990 सालच्या अभ्यासानुसार जगात प्रत्येक दहाव्या सेकंदास 1 व्यक्ती तंबाखूमुळे मृत्युमुखी पडते. (भारतात सध्या दरवर्षी सुमारे 10 लाख मृत्यू तंबाखूमुळे होतात.) जर याच गतीने तंबाखू सेवन वाढत राहिले, तर 2020-30 सालापर्यंत दर तिसऱ्या सेकंदालाच 1 मृत्यू तंबाखू घडवू शकेल! विशेष ध्यानात घ्यावयाची गोष्ट म्हणजे अति धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू वयाच्या चाळीशीतच गाठतात. हे आपले मोठे सामाजिक नुकसान मानायला हवे आहे. शिवाय तंबाखूसेवनामुळे अधिक प्रमाणात आजारी पडणारे लोक अधिक प्रमाणात कामावर गैरहजर राहतात. सिगारेटींसाठी तसेच तंबाखूच्या क्यूरींगसाठी वृक्षसंपत्तीचा हास होतो; यांसारख्या गोष्टींमुळे होणारे सामाजिक नुकसान कसे मोजावे? तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जागृती वाढवीत असतानाच तिची उपलब्धता कमी व कठीण करण्याचेही उपाय योजले जायला हवेत. या दृष्टीने तंबाखूवरील कर मोठ्या प्रमाणात वाढविण्याकरिता सरकारवर दबाव आणायला हवा. खरेतर तंबाखुमुळे सर्व समाजच पीडित असल्यामुळे तंबाखूविरोधी आरोग्यशिक्षण तसेच तंबाखूजन्य आजारांवरील सरकारी उपचार यांसाठीचा खर्च तंबाखू व्यावसायिकांकडूनच वसूल करण्याची यंत्रणा असायला हवी. शक्य तेथे तंबाखूबंदी व धूम्रपानबंदीचाही आग्रह धरायला हवा. तरुण वयातच नपुंसकता व तोंडाच्या कॅन्सरने मृत्यू अशा दोन्ही गोष्टी बहाल करणाऱ्या गुटख्यावरील बंदीसाठी केव्हाही जनआंदोलन उभे राहू शकते, अशी परिस्थिती आहे.

सरतेशेवटी स्वतःदेखील तंबाखूच्या मोहिनीतून मुक्त व्हायला हवे. ते कठीण असले तरी अशक्य नाही. त्याकरिता तंबाखूमुक्ती स्वतःसाठी अनिवार्य मानणे मात्र गरजेचे आहे. सर्वसाधारण अनुभव असा आहे की तंबाखू सोडणाऱ्यांपैकी शेकडा 90 जण स्वतः कोणत्याही मदतीशिवायच ते साध्य करतात. त्यांपैकी 70 टक्के जणांना 3 महिन्यांत पुन्हा तलफ अनावर होऊ शकते; परंतु तरीसुद्धा बिघडत नाही. कारण असे प्रयत्न पुनःपुन्हा करताना येणाऱ्या अनुभवांतूनच यशाचा अंतिम टप्पा सापडतो असे अनेकांच्या अनुभवांतूनच सिद्ध झालेले आहे. तंबाखूचे व्यसन लागते, म्हणजे नेमके काय होते, हेदेखील याकरिता समजून घेण्यासारखे आहे. तंबाखूमध्ये तीन मार्गांनी माणसाला गुलाम बनविण्याची क्षमता आहे. व त्या तीनही प्रकारांवर उपाय करता येण्यासारखे आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे ‘सवय'. माणसाला ठरावीक दैनंदिन कृती करताना तंबाखू सेवनाची सवय जडते. उदाहरणार्थ, पेपर वाचताना चहासोबत सिगारेटचे झुरके घ्यायचे किंवा गाडी चालविताना तंबाखूचा बार तोंडामध्ये भरायचा. त्यामुळे मेंदूला इतके वळणच पडते की पेपर वाचताना किंवा गाडी चालविताना स्वतःच्या नकळतच तो तंबाखू सेवन करू लागतो. यावर उपाय म्हणजे स्वतःच बारकाईने आपल्या या प्रकारच्या सवयी शोधणे आणि त्यांमध्ये जाणीवपूर्वक बदल करणे. जसे की पेपर वाचताना चहा प्यायचा नाही व पेपर दोन्ही हातात पकडून वाचण्याची पद्धत अवलंबायची किंवा गाडी चालवायला बसण्यापूर्वीच आपल्या खिशात वा गाडीत तंबाखूची पुडी असणार नाही याची खात्री करून घ्यायची.

तंबाखूच्या व्यसनाला कारणीभूत ठरणारे दुसऱ्या प्रकारचे कारण म्हणजे तंबाखू सेवनातून मिळणारा आनंददायी वा उत्तेजक अनुभव. त्यामुळे दुःखद वा तापदायक प्रसंग कमी त्रासदायक करण्याकरिता तंबाखूचा वापर सुमारे 65 टके लोक करतात. म्हणून त्यांच्याकरिता मानसिक ताण निवारणाचे योग्य प्रशिक्षण तंबाखू व्यसनमुक्तीकरिता आवश्यक ठरते. मानसिक ताण निवारणाची अनेक सोपी व आरोग्यपूर्ण साधने किंवा पद्धती आहेत. (जसे शवासन व इतर योग प्रकार, स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस, दीर्घ श्वसन इ.) यासोबत आपल्या भावनिक स्वरूपातील समस्यांचे स्वतःच्या विचारपद्धतीतील कारण शोधून विवेकाने ते दूर करण्याची सवय अत्यावश्यक आहे. मात्र बहुतेकांपाशी तिचा अभावच आढळतो. विवेकनिष्ठ विचारपद्धतीचे व्यवस्थित प्रशिक्षण याकरिता घेता येते. याचाच उपप्रकार म्हणता येईल तो म्हणजे सुमारे 25 टक्के लोक तंबाखू सोडलेला असताना आनंदाच्या प्रसंगी पुन्हा सुरुवात करतात. आनंद द्विगुणीत करण्याच्या भावनेपोटी हे घडते. म्हणून अशा प्रसंगांतही विशेष सावधानता बाळगावी. एक तर काही विशिष्ट आनंददायी गोष्टी जर पहिल्या प्रकारच्या (तंबाखू सेवनाशी सवयीने जोडलेल्या) असतील तर त्या सरळ टाळाव्यातच! उदाहरणार्थ, मित्रांच्या टोळक्यात सहजपणाच्या गप्पा मारण्याचा आनंद जर एकत्र सिगारेटी फुकण्याशी सवयीने जोडला असेल तर तो आनंद आणि त्यापाठोपाठ सिगारेट ओढल्याचा पश्चात्ताप मुळातच टाळलेला बरा. किंवा अशाप्रसंगी आपल्याला बंधनाची आठवण योग्यप्रकारे करून देणारा सोबती आवर्जून बरोबर असेल याची पूर्व खबरदारी घ्यायला हवी.

तंबाखूच्या व्यसनाचे तिसरे अधिक गंभीर प्रकारचे कारण हे तंबाखूच्या मेंदूतील परिणामांतून निर्माण होत असते. तंबाखूतील निकोटीनच्या सततच्या साहचर्याने मेंदू अनैसर्गिक वळणाने काम करू लागलेला असतो! हे नवे वळण शरीराला अचानक सोडूनही देता येत नाही. त्यामुळे जर शरीरात निकोटीन कमी पडू लागले तर शरीर कासावीस होते. डोके दुखणे, हातपाय कापणे, चित्त एकाग्र होऊ न शकणे, विनाकारण भयभीत किंवा संत्रस्त होणे, सतत भूक लागणे, शौचास वेळेवर न येणे या प्रकारची वियोगलक्षणे तंबाखूअभावी जाणवू लागतात. ती कमी प्रमाणात असतील तर माणूस निर्धाराने ती सोसून पार पाडूही शकतो. नाईलाज झाल्यास औषधोपचारही करता येतो. तंबाखूसेवनाने हा त्रास करण्याचा मोह जोरदारपणे परतवून लावला नाही तर पुन्हा पूर्वीच्याच गुलामगिरीत रवानगी होते. (नवीन संशोधनातील ताजी बातमी खूप उत्साहवर्धक आहे. तंबाखूमधील निकोटीनचे व्यसन लागू नये याकरिता एक प्रकारची 'टी.ए.-एन.आय.सी.' नामक लस तयार होण्याची शक्यता बेल्जीयममध्ये निर्माण झाली. मात्र ती तंबाखूमधील या तिच्या धुरामधील इतर विषांपासून रक्षण करू शकणार नाही!)

तंबाखू सोडण्यासाठी इतकी खटपट एखाद्याने का करावी? याला सबळ कारणे आहेत- उदा. तंबाखूसेवन थांबवून एक वर्षभरानंतर लगेचच हार्ट-अटॅकची आधी वाढलेली शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते, तर तंबाखूसेवन थांबवून एक दशक लोटता लोटता तंबाखूजन्य मृत्यूची (कॅन्सर, दमा, हृदयविकार वगैरे) शक्यता जवळजवळ नष्ट होते! इतर मादक पदार्थांच्या मानाने ही जमेची बाजू आहे. तेव्हा आपल्या आयुष्याचा ताळेबंद जमेच्या बाजूला राखण्यासाठी आपणच लवकरात लवकर कंबर कसायला हवी; नाही का?

Tags: हृद्यविकार धुम्रपान तंबाखू आरोग्य जागतिक आरोग्य संघटना अनिमिष चव्हाण 31 मे आंतरराष्ट्रीय तंबाखू सेवन विरोधी दिन 31st May- International Anti-tobacco day डॉ. अनिमिष चव्हाण Dr. Animish Chavan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिमिष चव्हाण,  सातारा
maitraclinic@gmail.com

मनोविकारतज्ञ, मानसोपचारतज्ञ,मैत्र क्लिनिक.
'स्वतंत्रा ब्रेन अँड माइंड जीम'चे संस्थापक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके