आधीच प्रेमविवाह झालेल्या आणि शिष्यवृत्त्या वगैरे मिळवून पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या काही बोटांवर मोजण्याइतक्या मुली सोडल्या तर उरलेल्या सर्वच मुलीपुढे लग्नाचा प्रश्न आ वासून उभा राहतो; आणि दुसरे सर्व प्रश्न लग्नाच्या या प्रश्नावरच अवलंबून असतात. त्यामुळे आतापर्यंत चाललेले आयुष्य एकदम बदलून जाते.
बहुतेक लोकांना डॉक्टरविषयी आदर, कौतुक आणि हेवा वाटतो. डॉक्टरचे समाजातील स्थानही हेवा करण्यासारखे आणि मानाचे वाटते. त्यामुळे सर्वसाधारण मुलीच्या मनात ज्या वयात लग्नाचे विचार येतात त्या वेळी साहजिकच आपला नवरा डॉक्टर असावा असे त्यांना वाटते. अन् त्यात काही अस्वाभाविक नसते. आपला नवरा श्रीमंत असावा, आकर्षक असावा, प्रभाव पाडणारा असावा, समाजात त्याला मानाचे स्थान असावे, असे बहुतेक सर्वच मुलीना वाटते; आणि या सर्व अपेक्षा त्यांच्या दृष्टीने डॉक्टर असलेला नवराच पुऱ्या करू शकतो. मेडिकल कॉलेजला शिकत असताना थोडेफार प्रेमविवाह होतात; पण ते अगदीच अपवादात्मक असतात. अर्थात काही मुलीचा तोही प्रयत्न ठरवून चालूच असतो. बऱ्याचदा केवळ मजेखातर मैत्रिणींना घेऊन हिडणारा मुलगा प्रत्यक्ष लग्नाचा प्रश्न येताच कानांवर हात ठेवून मोकळा होण्याचे अनुभवही बऱ्याच मुलीना येतात.
कॉलेजात शिकत असताना ओळखीच्या लोकांमध्ये ह्या मुलींना खूपच भाव असतो. अन् त्यामुळे स्वतःभोवती त्या एक प्रकारचे वलय निर्माण करून घेतात. आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला की मग आपण म्हणू ती पूर्वदिशा अशा गोड स्वप्नात त्या राहतात. डॉक्टरची पदवी मिळते. समाजातले स्थान एकदम उंचावल्यासारखे वाटते. लग्नसमारंभात, शेजारीपाजारी, नातेवाइकांत, खास प्रकारची वागणूक मिळू लागते. पूर्वी ओळखसुद्धा न दाखवता पुढे जाणारे लोक आवर्जून थांबतात, आणि आपलेपणाने चौकशी करू लागतात. रंगीबेरंगी चित्रांसाठी लहान मुल लाडीगोडी करू लागतात, आणि याचा परिणाम असा होतो की, या मुली जास्तच आत्मकेंद्रित बनतात. पदवी मिळून इन्टर्नशिप संपेपर्यंत साधारणपणे मुली 23-24 वर्षांच्या झालेल्या असतात. आधीच लांबलचक कोर्स, त्यात जरा कठीण. कॉलेज प्रवेशाच्या वेळी असलेले ताजेतवाने सौंदर्य जाऊन आता निब्बरपणा आलेला असतो. प्रकृतीही बेताचीच असते; आणि मग त्यांना एकदम लग्नाच्या प्रॉब्लेमला तोंड द्यावे लागते. आधीच प्रेमविवाह झालेल्या आणि शिष्यवृत्त्या वगैरे मिळवून पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या काही बोटांवर मोजण्याइतक्या मुली सोडल्या तर उरलेल्या सर्वच मुलीपुढे लग्नाचा प्रश्न आ वासून उभा राहतो; आणि दुसरे सर्व प्रश्न लग्नाच्या या प्रश्नावरच अवलंबून असतात. त्यामुळे आतापर्यंत चाललेले आयुष्य एकदम बदलून जाते. प्रॅक्टिसला सुरवात करावी तर जागा, भांडवल, आत्मविश्वास - सर्वांचाच प्रश्न असतो. बरे, हे सर्व असले तरी प्रॅक्टिस करायची की नाही हे ठरत नाही. कारण समजा, लग्न जमले अन् नवरा दुसऱ्या गावचा असला, किंवा बायकोने प्रॅक्टिस करावी अशा मताचा नसला तर घातलेले सर्व भांडवल व कष्ट फुकट जाण्याची शक्यता असते.
पुन्हा प्रश्न पडतो आता काय करावे? पुढील शिक्षणाला जावे, पण तिथे खूपच स्पर्धा असते; आणि कामाचा व्याप फारच असतो. पण तरीही तिकडे वळण्यात एक मोठे प्रलोभन असते ते म्हणजे, शिकत असताना सम व्यवसायी मुलांचा जास्तच घनिष्ट संबंध येऊन लग्न जुळण्याची शक्यता असते. म्हणजे प्रेमविवाहाची आशा अजूनही असतेच. त्यामुळे वाट्टेल त्या उपायांनी काही मुली पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग निवडतात.
पण येथेही मर्यादित जागा असतात. त्यामुळे इतर मुलींना हा प्रश्न येतोच. अन् त्या वेळी बऱ्याच मुली नोकरीकडे वळतात. दिवसाचा ठराविक वेळ देऊन पैसाही बराच मिळतो, आणि लग्नाच्या खटपटीतही राहता येते. इतर डॉक्टरांशी जास्त सलगीने वावरण्यास वाव मिळतो. मुलीचा मोठा पगार घरात येत असल्याने पालकही स्थळे बघण्याच्या मागे फारशा तिडिकीने लागत नाहीत. त्यामुळे एकीकडे वाढते वय, व लग्न नाही या काळजीने ती ग्रासते. त्यात अशीच एक-दोन वर्षे गेली की लग्नाच्या ध्यासाने काही मुली अक्षरशः वेड्या बनतात.
डॉक्टर नवरा- शक्य तो पदव्युत्तर शिक्षणक्रम घेतलेला बंगला, गाडी, उत्तमपैकी प्रॅक्टिस असलेला ह्या अपेक्षा जाऊन हळूहळू कुणी का असेना, कसा का असेना, पण पोटापाण्यापुरता मिळवता येणारा आणि स्वभावाने मनमिळाऊ असला म्हणजे झाले, इथपर्यंत पाळी येते. याची अगदी खूप उदाहरणे आहेत.
माझी मैत्रीण माझ्याबरोबरच डॉक्टर झाली. मुलांमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर होती. पण लग्नाच्या बाजारात मैत्रीला फार थोडी किमत असते. बिचारी लग्नापायी फार वैतागली. वडिलांनी खूप खटपट केली. पण बऱ्याच जणांनी नापसंत केली. ज्यांनी पसंत केली त्यांना 10 हजार हुंडा आणि कन्सल्टिंग रूमचा सर्व खर्च हवा होता. कसा देणार? बरं वडील पडले खानदानी त्यांना हिने कुणाबरोबरही स्वतः ठरवून लग्न करावं (म्हणजे प्रेमविवाह वगैरे) हे मुळीच पसंत पडेना. शेवटी इतकी रडकुंडीला आली व म्हणू लागली, कुणीही मुलगा आणा, मी त्याचा फोटोसुद्धा न बघता त्याच्याशी लग्न करते.'
म्हणजे, एवढं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून, महिना हजार दीड हजार मिळण्याची ऐपत असूनसुद्धा शेवटी लग्नाच्या बाजारात रूप, कूळ, वडिलांचा पैसा, हुंडा वगैरे बाह्य मूल्यांनीच ह्या डॉक्टर मुली जोखल्या जातात.
लग्नासाठी दाखवून घेणे, नुसतं नवऱ्यामुलाचे नाही तर त्याच्या आज्या, काक्या, माम्या सर्वांना पसंत पडले, आणि एवढे करूनही 10-20 हजार हुंडा देणे या सर्व किळसवाण्या प्रकारांतून डॉक्टर झालेली मुलगीही सुटत नाही. आणि त्यावून धडपडही ती करीत नाही. अगतिक होऊन सर्व प्रकारांतून मेलेल्या मनाने तिला जावे लागते.
सुंदर असूनही भागत नाही. तिला श्रीमंतही असावं लागतं. परवाच माझ्या एका मैत्रिणी पसंत पडल्यानंतरही लग्न मोडलं. दिसायला ती अगदी अप्रतिम आहे. आम्हांला तर वाटल आता आमंत्रण पत्रिकाच येणार. विचारल्यावर कळलं की मुलीचे वडील मुलाला एक्स-रे मशिनसाठी 50 हजार रुपये देऊ शकत नाहीत म्हणून मुलानं लग्न मोडलं.
गंमत म्हणजे, थोड्याच दिवसांत त्या मुलाला 50 हजार रुपये देणारा सासरा आणि पाहिजे तशी मुलगीही मिळाली. आता त्या मुलीनं हे लग्न नाकारायला हवं होतं. 6 वर्षांच्या शिक्षणासाठी सुमारे 10 हजार रुपये खर्च येतोय; शिवाय वर ही शिक्षा. वडिलांनी आयुष्यभर कष्टाने कमावलेले पैसे क्षणात दुसऱ्याला देऊन टाकलेले बघावे, आणि तेसुद्धा अगतिक होऊन. किती चीड आणणारी परिस्थिती आहे ही. तुमची कल्पना असेल की एवढ्या उच्च प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास समर्थ असलेल्या या मुलींची मने अतिशय स्वतंत्र आणि तडफदार असतील. त्यांना स्वतःचे असे खास व्यक्तिमत्त्व असेल, त्यांच्या विचारात सर्वांगीणता असेल. नवनवीन शोधांबद्दल त्यांना उत्सुकता असेल. एकंदरीत त्यांचे दैनंदिन जीवन विचाराने संपन्न आणि व्यापक असेल.
पण प्रत्यक्षात मात्र यांतली एखादी गोष्टही एखाद्या मुलीत क्वचितच आढळते. सर्वांच्या कल्पना आपले भावी आयुष्य आणि आपला जीवनाचा जोडीदार यांवरच केंद्रित झालेल्या असतात. या विधानांत जरासुद्धा अतिशयोक्ती नाही. मुली जेथे अगदी मनमोकळेपणाने बोलतात अशा काही जागांवर जर थोडा वेळ तरी हजर राहण्याची तुम्हांला संधी मिळाली तर खालीलप्रमाणे संवाद तुमच्या कानांवर पडतील :
लेडीज् रूम..."अय्या, तो अनाटॉमीचा ट्यूटर काय चिकना आहे ग?" "आहे बुवा. आज पोर्चमध्ये एवढं काय हितगुज चाललं होतं?" "अग आज काय मजा आली ट्युटोरियलला. सरांनी सर्व ट्युटोरियल माझ्याकडे पाहूनच घेतलं." "ए मीने...त्या केळकरचं लग्न झालंय का ग? गटवायला किती चांगला आहे, नाही?"
पिकनिकच्या दिवसांत.... ए आशु, मला अगदी मुळीच मूड नाही पिकनिकला जायचा; पण तो चितळे इतका आग्रह करतोय... तर नाही तरी कसं म्हणायचं बाई!" "ए नले... कुठली साडी नेसणार पिकनिकला जाताना... ए. आणि आपण आदल्या दिवशीच गजरे करून ठेवू या कळ्या आणून... म्हणजे अग आयत्या वेळेला कटकट नको." "अय्या, तू येणार नाही? मग तुझा तो फरचा कोट तरी दे ना मला वापरायला. माझ्या साडीला तो छान मॅच होतो ग."
कँटीनमध्ये खाताना, मेसमध्ये जेवताना, होस्टेलवर, लेक्चर्स चालू असताना कोण मुलगा आपल्याकडे बघतोय, कोण आपल्यावर कॉमेंट करतोय, कोणत्या मुलाशी आपल्याला बोलायला मिळेल याचेच विचार चाललेले असतात. या परिस्थितीमुळे मुलींची मने बनतात. अगदी शिक्षणक्रमाच्या मध्यावर असतानाच पास होऊन गेलेल्या मुलीची स्थिती बघून तिला धोक्याची जाणीव होते, व वर्गातून मिळेल त्या मुलास 'गटवायची ' किंवा 'पटवायची 'केविलवाणी धडपड ती करू लागते. या प्रकारच्या वागण्यामुळे मुलांमधूनही या मुली कटल्या जातात. उच्च शिक्षण घेत असलेले ससूनमधील हाउसमन हे तर त्यांचे सर्वांत मोठे लक्ष्य. हाउसमन लोकांविषयी मुलींना फार औरसुक्य. एखाद्या मुलीचा भाऊ हाउसमन असला तर ती वारंवार हाउसमन क्वार्टरवर जाऊन येते, व तिथला हाउसमनांच्या गप्पा इतर मुलीवर भाव मारून सांगत असते.. माझ्या काही मैत्रिणींचा वेळ तर त्यांच्या मोठ्या भावाचे मित्र काय बोलतात (बहुधा ते बोलले अगदीच फालतु असे), त्यांना काय आवडतं, रागवून तिला ते कसे गुद्दा वगैरे मारतात. याचंच कायम वर्णन करण्यात जात असे. भावाच्या मित्राची फॅमिली हिस्टरी, पर्सनल हिस्टरी - सर्व तिला ठाऊक असे. त्यांच्या मागे स्कूटरवर बसून कॉलेज मधून हॉस्टेलवर येण्यात तिला कोण धन्यता वाटत असे. त्यांच्या क्वार्टर्स वर जाऊन गप्पा करण्याला मिळाले म्हणजे मोठीच पर्वणी वाटत असे. एका वॉर्डमधली एक टर्म संपली की बॉसला पार्टी द्यायची प्रथा असते. आठवडाभर आधी मुली त्या पार्टीच्या तयारीत असतात. बाँस नेहमीप्रमाणे उशीरा येतात, लवकर जातात. उरलेला वेळ हाउसमन मंडळीसमोर पुढे पुढे करण्यात, बळेबळे गप्पा काढण्यात जातो. त्यांनाही ती मजा हवीच असते. पण लग्नाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतच असतो असे नाही.
लग्न झाल्यावर मुलगी डॉक्टर असल्यामुळे वेगळीच वागणूक वाट्याला येते. एक म्हणजे बरेचसे नवरे बायकांना वैद्यकीय व्यवसायत पडू देत नाहीत. 'शो-पीस' म्हणून वावरायचे, ओळख करून द्यायची 'डॉक्टर' म्हणून, उलट विचारले की 'कुठे प्रॅक्टिस करता?' की आपली मान खाली काही नाही, घरीच असते.' माणसांना वाटते, मुलगी येवढी शिकलेली. म्हणजे ती नक्कीच शिष्ठ नि घमेंडखोर असणार. तिला स्वयंपाकाची, घरकामाची काडी इतकीही सवय नसणार. कसले माहेरचे संस्कार नसणार; तेव्हा तिला वाकवले पाहिजे, अशा तरेचा प्रयत्न सर्व दिशांनी होत असतो. आल्या गेल्याजवळ मुलीचं तोंडदेखलं कौतुक केलं जातं, पण ते गेल्यावर त्याची सव्याज भरपाई.
आपल्या दागिन्यांचा कपड्यांचा चॉइस इतरांचा, तिने ते सगळे फक्त घालायचे! सासरच्या खानदानाच्या, संस्कारांच्या गप्पा मुलीला ऐकाव्या लागतात. वाढत्या अपेक्षा कधी संपत नाहीत. घराबाहेर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही डॉक्टर स्त्री घरात नवऱ्याबरोबर अंतर ठेवून वागते, सोवळे नेसून उपाशी पोटी सत्य नारायणाच्या डोक्यावर हजार हजार तुळशीपत्रे वाहते. मुक्याने मंगळा गौरीचे उद्यापन करते, कुलस्वामिनीची ओटी भरते, पिडींवर कड धान्याचा अभिषेक करते. मुलींनी कसे बसावे, कुणाशी बोलावे, एवढेच काय पण नवऱ्याबरोबर किती काळ राहावे हेसुद्धा सासर ठरवते! असे हे जीवन. लावून पाहणाऱ्याला मात्र याचा हेवा वाटत असतो!
Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 प्रेमविवाह सौंदर्य स्वयंपाक दागिने महिला शिक्षण डॉ. अनिता अवचट Dasyamukti Special Issue 1970 Love Marriage Beauty Cooking Jewelry Women Education Dr. Anita Awachat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या