डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मग माझ्या एकदम लक्षात आलं की हे सगळं मला का लागलंय ते. मी स्वतःला मोठा समजू लागलोय. विशेष व्यक्ती समजू लागलोय. माझ्याशी आसपासचे लोक चांगले वागतात; म्हणून प्रत्येकानेच माझ्याशी चांगलंच वागावं, अशी अपेक्षा तयार झाली आहे. असं होय बच्चमजी? मग तुम्हांला ही चपराक हवीच होती.

गेली आठ दिवस सर्दी रेंगाळत होती. दहा-बारा दिवसांनी परदेशी जायचं असल्यानं लवकर बरं व्हायला हवं होतं. एक-दोन दिवस मधनंच बरं वाटलं की संध्याकाळची उमाताई आणि विरूपाक्ष कुलकर्ण्यांबरोबरची विद्यापीठाच्या मैदानावरची फेरी सुरू व्हायची.

असंच कालही नुसती तेथील हवा खाऊ या म्हणून ग्राऊंडवर गेलो. त्या दोघांना म्हटलं, 'तुम्ही चक्कर मारा, मी गाडीतच बसून राहतो.' सध्याचा आवडता गुलाम मुस्तफा खाँ यांची कॅसेट ऐकत बसलो. एकाएकी अंग भरून आलं. पायातलं त्राण गेलं. बापरे, कणकणच आली की! थोड्या वेळाने ते दोघे आल्यावर पायऱ्यांवर बसलो- तेथून माझ्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले, 
'कणकण आली असेल तर अँटिबायॉटिक्स सुरू करू या.' 
'कुठली घेऊ?'
ते विचार करीत म्हणाले, 'सिफ्रॉन घ्या, 500 मि.ग्रॅ. दिवसातून दोनदा. किंवा असं करा, सिफ्रॉन ओ.डी. घ्या. एकदाच घ्यावी लागते. नाहीतरी सकाळी नऊ वाजता माझं क्लिनिक उघडतं. तिथं या, सँपल्स असतीलच. त्यातनं देईन.' 
बरं, म्हणून फोन ठेवला. 
उमाताई, विरूपाक्षांना मॉडेल कॉलनीतल्या घरापाशी सोडलं. आणि घराच्या दिशेने गाडी वळवली, विचार आला, रात्रीच गोळी सुरू करून टाकू. कशाला वेळ घालवायचा? समोरचं 'बलवंत मेडिको' नावाचं दुकान रविवार असूनही उघडं दिसलं. पैशाचं पाकीट खांद्यावरच्या पिशवीत ठेवतो, ते काढलं. बघतो तर काय, पैसेच नाहीत. मग आठवलं, सकाळी विरूपाक्ष आणि मी मैफिलीला गेलो होतो. येताना कॅसेटच्या दुकानात गेलो. यशोला न्यायला होतील म्हणून भरभरून क्लासिकलच्या कॅसेट्स खरेदी केल्या. त्यात पैसे संपले. पण एक पन्नासची नोट होती. तेवढी पुरेल. म्हणून वरच्या खिशात टाकली आणि दुकानाच्या पायऱ्या चढलो. आत दोन तरुण मुलं आणि एक पन्नाशीचा सीनिअर माणूस होता. मी गोळीचं नाव सांगताच 'सिफ्रान ओ.डी.'चं पाकीट काढलं. त्याची किंमत 103 रुपये. मी जरा हसून त्याला म्हणालो, 'पाकीट विसरलोय. त्यातली एखादी-दुसरी कापून देता येईल का?'

तो चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता म्हणाला, 
'नाही.'
मग मला एकदम सुचलं, त्या निम्म्या स्ट्रेंग्थच्या गोळ्या पाहिजेत तेवढ्या घेता येतील. मग ते विचारता त्याने त्याही गोळ्यांचं पाकीट आणून ठेवलं. त्याची किंमत होती चौसष्ठ रुपये आणि त्यातलीही एखादी कापून घेण्याची सोय नव्हती.
आता काय करावं? मी त्या दुकानदाराला म्हणालो, 'माझ्यासाठीच गोळ्या हव्या आहेत. आता 50 रुपयेच आहेत माझ्याकडे. उद्या मी चौदा रुपये आणून दिले तर चालतील का?'
तो त्याच मख्ख चेहेऱ्याने म्हणाला, 
'नाही.'
तेवढ्यात मुग्धाचा (माझ्या मानलेल्या मुलीचा) मोबाईलवर फोन आला. मी तिला हे सांगितले, ती म्हणाली, 'आत्ता पैसे घेऊन निघते.'
मी म्हटले, 'अगं, जरुरी नाही. मी उद्या घेईनच'

तसं म्हटलं तर गाडी वळवून मी विरूपाक्षांकडून पैसे आणू शकत होतो. पण त्या माणसाचं 'नाही' म्हणणं मला जोराचा धक्का देऊन गेलं. माझी पांढरी दाढी, पांढरे केस, वय, खिशात वाजणारा मोबाईल, मुख्य म्हणजे विश्वास बसावा असा माझा चेहरा.... यांपैकी कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नव्हता.

तशाच सुन्न मनःस्थितीत परत मी त्याच्याकडे वळलो. म्हटलं, 'मी डॉक्टर अनिल अवचट, तुम्हांला विश्वास ठेवावासा नाही का वाटत?'

ती मुलं ओळखीचं नाव म्हणून हसली. त्यांनी कदाचित डॉक्टर एवढंच ऐकलं असावं. सीनियर माणूस म्हणाला, ठीक आहे, घ्या.

मी म्हटलं, 'राहूद्या, आता मलाच तुमचा संबंध नको आहे. त्यावरही तो शांतपणे म्हणाला, 
'ठीक आहे.'

माझ्या मनाला का बरं इतकं लागलं हे? सुरुवातीची तरुणपणातली वर्ष अशी असतात, की अनोळखी माणूस कदाचित विश्वास ठेवणार नाही. पण या वयात? माझ्या विश्वसनीयतेची किंमत या बाजारात चौदा रुपयेही नसावी? आमच्या कोपऱ्यावरचा मेडिकलचा माणूस एखादं औषध फोनवर सांगितलं की घरी पाठवतो. तसं मी काही त्याचं मोठं गिन्हाईक नव्हेच. चष्म्याचं दुकान ठरलेलं, स्वस्तिक. तिथला नाना पाटोळे कधी पैसे मागत नाही, एखादवेळेस मीच हिशोब करायला सांगून चेक फाडतो. युसूफ मिरजकरकडून तबला, पेटी, फ्ल्यूट असं काय काय घेतलं, तरी किंमतच सांगत नाही. तुझ्याकडनं काय घ्यायचं राहू दे. मग भेटेल तेव्हा पाचशे हजार त्याच्या हातावर ठेवतो. असे एकसे बढकर एक. माझ्या मुलांना, मुलींना, सगळ्यांना माझ्या सगळ्या आवडत्या दुकानांतून वाट्टेल ते घेऊन माझ्या नावावर टाकण्याची मुभा आहे, असं जवळच्यांना काय काय देत राहणं, हा माझ्या आनंदाचा भाग आहे. त्यापायी किती पैसे जातात, याची पर्वा मला नसते. 
आणि आज चौदा रुपये कमी पडले म्हणून त्या माणसाने मला नकार द्यावा?

मुग्धाला फोन करून हे सांगितलं. तिचा माझा नेहमीचा वाद आहे. ती म्हणते, 'तुझ्या आसपास तू सगळी चांगली माणसं जमवली आहेस. तुला ती शोधत येऊन भेटतातही. पण त्यावरून जग चांगलं आहे, असं समजू नको.' मी म्हणतो, 'आपण चांगलं वागत राहिलं की आपल्याभोवतालचं जगही चांगलं बनतं.'

'पण तुला जे अनुभव येतात, त्याच्या बरोबर उलटे अनुभव आम्हांला- माझ्या वयातल्या धडपडणाऱ्या मुलांना येतात. तुमच्यापाशी चार पैसे नसतील, तर कोणी तुमचं नसतं.'

मुग्धा एकीकडे शिकत असून दिवसभरात किती किती कामं करते. त्यातून पुढे-मागे आपला आर्थिक पाया पक्का करू पाहतेय. मी, उमाताई, विरूपाक्ष तिला म्हणत असतो, एवढे परिश्रम कशाला करतेस? पण ती ऐकत नाही.

पण आज या 'बलवंत'च्या झटक्याने मी तिच्या म्हणण्याकडे नव्याने पाहू लागलो होतो. माझा मित्र बनलेल्या दुकानदाराव्यतिरिक्त एका प्रातिनिधिक दुकानदाराचं दर्शन मला झालं होतं. मी त्याला पैसे नंतर आणून द्यायची मुभा मागत होतो, ते पैसे द्यायला. ते घरी, बँकेत कुठेतरी होतेच. पण ते कुठेच नाहीत अशा अवस्थेत जेव्हा माणसं असतात, आणि त्यांच्या प्रिय व्यक्तीचा प्राण वाचवण्यासाठी त्यांना औषधं हवी असतात, तेव्हा त्यांच्यासमोर उभे असणारे निर्विकार 'बलवंत 'वाल्यासारखे चेहरे. त्यांनी कितीही परिस्थिती- समजावून सांगितली, तरी त्यांच्यापुढे येणार एक दगडी भिंत- 'नाही'ची. या नकारात कठोरपणा असणार नाही, आक्रस्ताळेपणा असणार नाही. असेल तो फक्त निर्विकारपणा.

मी अनेकवेळा दृश्य पाहिलंय. डॉक्टर औषधांची यादी देताहेत. पेशंटचा नातेवाईक घाबरत विचारतोय, 'यांतली कुठली औषधं नसली तर चालणार आहे?' आणि त्यावर डॉक्टर वैतागून तो कागद त्यांच्यापुढे टाकून, 'ते तुमचं तुम्ही बघा, मला नका विचारू.' असं म्हणून उठतात, किंवा त्याला उठायची सूचना करतात. काय होत असेल अशावेळी माणसाचं? कसे सोसत असतील ते असले जीवघेणे नकार?

आपला झगड्याचा काळ मागे पडला आणि स्थिती स्थिरस्थावर झाली, की आपण समजू लागतो, की सगळ्यांचं तसं झालं. हाती पुरेसे पैसे नसतील तर विशेषतः वृद्धांची अवस्था काय होते, ते परवाच पोस्टात बघितले. मी बाकड्यावर बसून होतो. एक म्हातार्या बाई खिडकीच्या बाजूलाच भकास चेहर्याने उभ्या होत्या. बाजूच्या दोन एजंट स्त्रिया एकमेकींना म्हणत होत्या, त्यावरून कळलं, की त्या बाईंनी पोस्टातून पैसे काढले. एक माणूस मी पैसे मोजून देतो म्हणून पुढं आला. त्यानं मोजून दिले आणि आता लक्षात आलंय की त्यांत अडीच हजार रुपये कमी आलेत. त्या बाईंच्या अंगावरचं लुगडं फाटकं होतं, चेहरा तर त्याहूनही. माझं पाकीट आता पडून गेलं, त्यावर, मी ठीक आहे, गेलं ते गेलं म्हणू शकतो. पण या वृद्ध बाईंचं काय? मला त्या चोराचा संताप आला. चोरीच करायची, तर मोठ्यांवर डाका घाल ना, या म्हातारीला का लुटतो? मित्र हसून म्हणाला, 'कारण ते सर्व सोपं असतं.'

जगाच्या या बाजू मला सहसा बघायला मिळत नाहीत. त्यामुळे पाहिलेल्या एखाद्या दृश्यावरून त्या परिस्थितीत सापडलेल्यांची कल्पना करीत बसतो. पण 'बलवंत 'वाल्याने मात्र प्रत्यक्ष अनुभवच दिला, 'तू कोणीही अस, गाडीवाला- घोडेवाला, फोनवाला, मोबाईलवाला अस, चौदा रुपये खिशात नाहीत ना, मग माझा तुला नकार. धंदा म्हणजे धंदा. पण धंद्यात काही थोडं माणुसकीला मार्जिन असतं का हो? गल्ल्यावरच्या माणसानं दया, करुणा, माणुसकी या जाणिवा दुकानाबाहेर ठेवून मगच दुकानात प्रवेश केला असेल का? नका हो, 'बलवंत 'वाले, असे नका असू तुम्ही. कारण फायद्याबरोबर तोटाही होतोय तुमचा. आणि हा तोटा असतो. गाभ्यातला, तो आकड्यात नाही मांडता येत.

त्याच मनःस्थितीत घरी आलो. सहज औषधाची बॉक्स काढली. खाली ओतली तर आधीच्या राहिलेल्या तसल्याच अँटिबॉयॉटिक्सच्या स्ट्रिप्स माझ्याकडे बघून हसत होत्या. अरेच्या, थोडं थांबलो असतो तर हे घडलंच नसतं. पण घडलं, हेही बरंच झालं. जगातल्या चांगुलपणावरची श्रद्धा ढळली नाही, पण या व्यवहारी जगाचं, हादरवून टाकणारं अस्तित्वही जाणवलं. या दोन्हीसहित आपण जगायचं.

काही दिवसांनी आईसाठी औषधं आणायचा प्रसंग आला. घराजवळच नेहमीचं 'अक्षय मेडिकल' आहे. पस्तिशीचा तरुण ते चालवतो. त्याच्याकडे गेलो. यादीतील काही औषध नव्हती. तो म्हणाला, 'मी ती मागवून घेतो आणि रात्री घरी पाठवून देतो.'

मी म्हणालो, 'तुम्ही मला अशी वागणूक देता, पण त्यामुळे दुसरीकडे गेलं की त्रास होतो. असं म्हणून दुकानाचे नाव न घेता त्याला ती हकीगत सांगितले. तो एरवी कामापुरतं बोलणारा, अबोल मुलगा आहे. पण आता एकदम सात्त्विक संतापाने हात झटकून म्हणाला, 'हे लोक असेच, त्यापेक्षा दुसरा माल का विकत नाहीत? इथं आपण दवा विकतोय, दवा. कधी कुणाची इमर्जन्सी येते, कुणाकडे पैसे नसतात. पैशासाठी अडवून चालत नाही हा धंदाच निराळा आहे.’

मला आश्चर्यच वाटले. हा मुलगा इतक्या वर्षात एवढं बोललाच नव्हता. त्यामुळे त्याची ही व्यावसायिक बांधिलकी माहीत नव्हती. ही बांधिलकी आमच्या उच्च शिक्षित डॉक्टरी व्यवसायात केवढी दुर्मिळ होत चाललीय. मी त्यांच्यावर टीका करतो म्हणून तर ते माझ्याशी नेहमीच वाद घालतात. 'आमच्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे आम्हांला रिटर्न्स नको का मिळायला?’ किंवा 'आमच्याकडूनच अपेक्षा का करता? आम्हांला काही कोणी वस्तू स्वस्त देत नाही...’ असं बरंच काही. या सर्वांना या अबोल अक्षयवाल्याने हे छान उत्तर दिलेय. 'वा! वा! अक्षयवाले, जीते रहो और हमारी हिम्मत बढ़ाओ!’

जाईचं घर
एका सकाळी आवरून बाहेर पडलो. फोटोचा रोल लॅबमध्ये टाकणे, एवढे एकच काम होते. पण ते बाहेर पडायला निमित्त होते. तिथून मग पुढं कुठंतरी जाता येईल. तशी कामं उरकून काढता आली असती. पण गळ्याशी आल्याशिवाय काम करायचं नाही असा स्वभाव आपला. त्याच्यापुढं मी तरी काय करणार? असतात ही काही राहून गेलेली महत्त्वाची काम; पण तीही अशावेळी नेमकी आठवत नाहीत. फिल्म इन्स्टिट्यूट पार करून कोथरूडकडे वळलो. पौडफाट्याला पुलाखालून वळलं की अपेक्स लॅब. पण पुलाच्या अलीकडेच विचार आला, जाईकडे जाऊ या का? पण तिला कसं वाटेल? ती असेल का तिच्या खोलीवर? पण कॉलेज बाराला असतं तिचं. काय हरकत आहे? चकित करू या तिला. त्या मुलीची ओळख झाल्याला महिनाही झाला नसेल. फोन करून तिनं विचारलं होतं, 'भेटायला येऊ का?' मी 'या' सांगताच पाचच मिनिटांत हजर झाली होती. वीसेक वर्षांची, गोरी, तिच्या नावाला शोभेलशी नाजूक. बघता बघता ती आमच्या परिवारात सामीलच झाली. ती छान गाणं म्हणते, म्हणून आई दरवेळी तिच्याकडून गाणी म्हणवून घेते. विरूपाक्ष, उमाताईचं, घरही तिनं आपलंसं केलंय. आमच्याबरोबर फिरायला येते कधी. फिरून झाल्यावर तिच्या नाजूक आवाजात गाणीही म्हणते. माझ्याकडून ओरिगामी तर झपाट्याने शिकतेय. अजून एखाद्या महिन्यात मला जे जे येतं, ते सगळं शिकूनच घेईल पठ्ठी. तिनं काढलेलं वारली पेंटींग आमच्या बोर्डावर लावलंय. तिच्या स्केचबुकात माझ्याकडून तीन-चार चित्रंही तिनं काढून घेतलीत. तिचा आता मी लाडका बाबा आहे. परगावी असलेल्या तिच्या आई-बाबांशी फोनवर बोलतो. त्यांनी माझं बाबापण नुसतं स्वीकारलं नाही, तर त्यांना ते फार छान वाटतंय.

तर त्या माझ्या लाडक्या पिल्लूला आता मला चकित करायचं होतं. ती कोथरूडमध्ये टर्म बेसिसवर राहते. नुकतीच तिथं रहायला आलीय. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत तिच्या मावशीकडे ती रहायची. पण कॉलेज लांब पडतं म्हणून इकडं मैत्रिणींबरोबर रहायला यायचं ठरवलं. तेव्हा मी तिला म्हटलं, 'तुझ्या सामान हलवाहलवीला मी येणार. म्हणून मी गाडीने तिच्या घरी जाऊन तिची बॅग, ड्रॉईंग्ज बोर्ड, कागदांच्या गुंडाळ्या, पिशव्या असं काय काय भरलं, आणि तिच्या खोलीवर येऊन जिन्याने वर चढवून, लावून दिलं. हे करणं, तिच्या मावशीलाही, आईबाबांना खूप आवडलं, तसे फोनही झाले. 

गाडी रस्त्यावर उभी केली आणि चालत त्या गल्लीत आलो. तो एक जुना दुमजली बंगला आहे. भोवती थोडे आवारही आहे. खाली मालक राहतात. वरती जायला बाजूने जिना आहे. वर दोन खोल्या. त्यात तीन तीन मुलींची सोय केलेली आहे. मागच्या वेळी मालक भेटले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या. ते ओतूरच्या जवळच्या एका गावचे निघाले. आता गेटमधून जाताना भाजीवाल्याकडून साठीच्या बाई भाजी घेत असाव्यात. त्यांनी मला ओळखले असावे. प्रश्नार्थक चेहेरा केला. मी म्हटलं, 'वरती आलोय.’ त्या म्हणाल्या, 'ती बाजूच्या दारावरची बेल दाबा.’

मी बेल दाबली. जिन्याने खाली येण्याचा आवाज. दार उघडले गेले. समोर जाई आणि तिचा आश्चर्यानं आणि आनंदानं बुडत चाललेला चेहरा. ‘बाबा? तू कसा यावेळी? कित्ती छान. माझा विश्वासच बसत नाहीय.' असं म्हणत मला वर नेलं. मी म्हटलं, 'तुझ्या मैत्रिणी असतील ना आतमध्ये?’

'नाही, त्या कॉलेजला गेल्यात. ये ना. आपण आतच बसू.’
तिच्या कॉटवर ओरिगामीचा पसारा. मी कालच शिकवलेल्या बॉक्सची तिनं बरीच प्रॅक्टीस केलेली दिसतेय. बासरीही शिकते माझ्याकडून. मी दिलेली बासरीही तिथं पडलेली. मी ते बघितल्यावर म्हटलं, ‘अगं या बॉक्सला छान, फ्लॅट झाकणही करता येतं. घे कागद.' असं म्हणून शिकवणं सुरूच झालं. इतरांना शिकवताना आपण एक घडी घालायची, मग त्यांनी तीच घडी घालायची, अशा पद्धतीने शिकवावं लागतं. पण ही मी करताना नुसतं पहाते आणि नंतर आठवून ते ती करू शकते. त्यामुळे खूप गोष्टी मी तिला शिकवू शकलो आहे. मी अलीकडे एक सांताक्लॉज करतो. तांबड्या कागदाला आतून पांढरा लावून घड्या घालतो. त्यामुळे पांढरा चेहरा लाल कपडे, लाल टोपी त्याला टोकाला पांढरा गोंड्याचा ठिपका... असे सगळं साधता येतं. जाई म्हणाली, 'तो मला शिकायचाय.'

'अगं, तो खूप अवघड आहे. आधी सोप्या गोष्टी शिकवतो.' 
'नाही, मला तोच शिकायचाय.’
या मुलींना मीच डोक्यावर चढवून ठेवतो. आणि मग त्या अशी दादागिरीही करू लागतात. 'बरं, शिकवितो.’ म्हणून माझ्या पिशवीतून लाल, पांढरा कागद काढून सांताक्लॉज करून दाखवला. आणि नंतर तिलाही कागद दिले. ती करत बसली. मी समोरची बासरी उचलली आणि वाजवू लागलो. सकाळी साडेदहा अकराची वेळ. मला सारंग आठवला. मग आधी वृंदावनी, मग मधमाद असे वाजवू लागलो. जाई गाणं शिकते. ती मधनं मधनं दादही देत होती.

तेवढ्यात मघाच्या मालकीणबाई आत डोकावल्या. बहुधा बासरीचा आवाज ऐकून आल्या असाव्यात. जाई म्हणाली, 'या ना काकू, बसा ना.' त्या दुसर्या कॉटवर बसल्या. मी म्हटलं, 'कागदाचं काय काय माझ्याकडून शिकतेय बघा ही. बासरीतून फूंक काढायचा प्रयत्न करतेय. तुम्हांला त्याचा त्रास नाही ना होत? जाई, दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा बेतानेच प्रॅक्टीस करायची, बरं का.'

बाई म्हणाल्या, 'नाही नाही, त्याचा आवाजही खाली ऐकू येत नाही.’ 
'जाईनं सांगितलं, ते अमके गायक आहेत ना, ते काकूंचे सख्खे भाऊ.' 
मी म्हटलं, 'तो तर माझा चांगला मित्र. त्याने मागे भावाला आमच्या मुक्तांगणमध्ये ठेवलं होतं.’
त्या बाई घाईने म्हणाल्या, 'तो मुक्तांगण शाळेत नव्हता कधी.'

त्यांचा शाळा आणि व्यसनमुक्ती केंद्रात घोटाळा झाला असावा. मी म्हटलं, 
'तो नाशिकला असायचा ना?’
‘हो.’
‘तो प्राध्यापक होता ना?’
‘हो.’
एव्हाना तोच तो असा अंदाज आल्याने मी हलकेच म्हटलं, 'तो गेला ना?’
'हो, कॉटवरून पडला आणि हेमरेज झालं. त्यात गेला.'
'बाप रे. अहो आमचा तो लाडका पेशंट होता. तो आला तेव्हा सही करता येत नव्हती, इतका थरथर हात कापायचा. आमच्या लोकांनी त्याचा अंगठा उठवला होता, अॅडमिशन फॉर्मवर. पण एका आठवड्यात तो नॉर्मलवर आला. आणि लक्षात आलं की फार सुंदर अक्षर आहे याचं. त्यावेळी, आमचं हस्तलिखित मासिक असतं, ते त्याच्याच हस्ताक्षरात आहे. त्यात त्याने कथा की लेख लिहिलाही होता. त्या काळात आमचे पेशंट आपापल्या घरी पत्र पाठवायचे, ते त्याच्या अक्षरात. जेव्हा तो घरी जायचा, तेव्हा सगळा वॉर्ड त्याला गेटपर्यंत पोहोचवायला गेला होता.'

मी भरभरून बोलतच होतो. ‘तो गेल्याचं त्याच्या घरच्यांनी कळवल्याचं मला आठवतंय. आम्हांला समाधान आहे की सोबर असताना गेला. शेवटचा काही काळ तरी त्याला चांगला मिळाला.'

त्या बाई मान हलवत होत्या. नंतर त्या उठून गेल्या. मी सहसा असं पेशंटविषयी तिसऱ्या ठिकाणी बोलत नाही. पण तो त्यांचा भाऊ होता. आणि तो आता गेलेला होता. म्हणून त्याच्याविषयी असं व्यक्त होऊन गेलं. त्या बाईंना त्याचा त्रास झाला असेल का?

जाईने सांताक्लॉजचं मनावर घेतलं होतं. मी तिला म्हटलं, आता 'इजाजत' दे जायला.'

तिचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

रात्री जाईचा फोन आला. म्हणाली, 'बाबा, ते काका नंतर वर आले आणि मला बरंच बरंच बोलले. म्हणाले, तुझ्या आईबाबांशिवाय इथं दुसरं कुणी येता कामा नये. आपले नियम तिथं लावलेत ना? मग तरी त्यांना का इथं आणलंस? परत असं होता कामा नये...'

मी ऐकतच राहिलो, सुन्न होऊन. पुढे ती म्हणाली, 'पण मी आनंदात आहे. कारण मी तुझ्याकडून शांत रहायचं शिकले आहे. एरवी मी खूप भांडले असते, पण मी एवढंच म्हणाले, 'तो माझा बाबाच आहे.’ तरीही ते बोलतच राहिले. तुला आठवून मी शांत राहिले.

फोन संपल्यावर मी बसूनच राहिलो. बाप रे, असं म्हणावं त्यांनी? मला? काय हरकत आहे, ते त्यांचं घर आहे. ते नियम करू शकतात. पण तरीही मी त्यांची किती छान ओळख करून घेतली. मी कोण आहे, त्यांना माहीत आहे. मग माझ्या बाबतीत त्यांनी असं का वागावं? वा देवा, तू कोण लागून गेला टिकोजीराव? ह्या मुलींच्या खोल्या आहेत. तिथं कोणीही येऊ लागलं, तर गैरप्रकार होतील. ते कसं चालू देतील ते! बरोबरच आहे त्यांचा नियम. पण मी काय गैरप्रकार करणार होतो? माझ्या त्या छोट्या लाडक्या पिल्लूला ओरिगामी शिकवत होतो. बरं, त्या बाईही येऊन बसल्या होत्या समोर. मग माझ्यात आणि इतरांच्यात त्यांनी फरक नको का करायला?

झोपायला गेल्यावरही मनात तेच विचार. हा नकार पचवायला मोठं जड जात होतं. या कोथरूडमध्ये माझी पंधरा-वीस घरं आहेत. मी तिथं मी गेलो की त्यांना खूप आनंद होतो. या भागात ज्येष्ठ नागरिक संघासमोर, काही महिलांच्या ग्रुप्ससमोर माझी भाषणं झालीत. येथील कोथरूड साहित्य संमेलनाचा तर मी अध्यक्षच होतो. मग माझ्या एकदम लक्षात आलं की हे सगळं मला का लागलंय ते. मी स्वतःला मोठा समजू लागलोय. विशेष व्यक्ती समजू लागलोय. माझ्याशी आसपासचे लोक चांगले वागतात; म्हणून प्रत्येकानेच माझ्याशी चांगलंच वागावं, अशी अपेक्षा तयार झाली आहे.

असं होय बच्चमजी? मग तुम्हांला ही चपराक हवीच होती. कोण आपण समजता स्वतःला? त्या तिथं असा एक माणूस आहे, तो म्हणतोय, मी तुला ओळखत नाही. या, या म्हणणाऱ्यांच्या समूहात एक माणूस म्हणतोय, तू इथं यायचं नाहीस. का आपण ते स्वीकारू नये? पण तरी मी तिथं जाण्याने असं कुठलं नुकसान होणार होतं हो? माझ्या त्या लाडक्या लेकीची आठवण झाल्या झाल्या मला तिच्याकडे नको का जाता यायला? अरे बाबा, तो प्रश्नच नाही आहे इथे, एरवी मी म्हणतो ना, की मी सामान्यत्व जपतो. मी कुठेही बसतो. कुठेही खातो. सिग्नलला भीक मागणाऱ्या छोट्या पोरांच्या केसांतून हात फिरवू शकतो. परवा परवापर्यंत मी रांगेत उभं राहून तिकिटही काढायचो. मग आता ते सामान्यत्व विसरलास की काय, गड्या? पण तरीही? चूप बस. त्या गृहस्थांनी काय करावं, काय विचार करावा, याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही. पण आपण काय विचार करावा, हे मात्र ठरवू शकतोस. कशाला त्यांना दोष देतोस? स्वतःकडे बघ की. याकडे संधी म्हणून बघ.

पहाटे उठलो. तेव्हा ती खंत, ते मळभ दूर झालं होतं. मन प्रसन्न होतं. तो नकार आता पूर्णपणे पचला होता. आता मन म्हणत होतं, अशी एखादी जागा हवीच माणसाला, की जिथं तो जाऊ शकत नाही.

चाळीसगाव स्टेशन
माझी प्रवासाची तयारी जरा अजबच असते. त्यात कपडे आणि टूथ पेस्ट-टूथ ब्रश, कंगवा वगैरे जीवनावश्यक गोष्टींना कमी महत्त्व असतं. मोबाईल आणि त्याचा चार्जर हा लागतोच. कारण घराशी तो संपर्क असतो. कॅमेरा, ओरिगामीचे कागद, अलीकडच्या काळात काढलेल्या फोटोंच्या एन्लार्जमेंटस्, जादू करायला मोठी नाणी, उंदीर करायला रुमालाच्या दोन-चार घड्या, दोऱ्याचे खेळ करायला दोरे, एखादं जोकबुक, प्रवासात चघळायला गोळ्या.... असं काय काय भरलं गेलं, की हँड बॅग आणि खांद्यावरची पिशवी बेढब आकाराची आणि वजनाची होऊन बसते. मग आयत्या वेळची कोंबाकोंबी- म्हणजे सूरपेटी आणि भल्या मोठ्या बासरीची, ती बरोबर हवीच. जरा वेळ मिळाला तर वाजवता येते. मागे सूर धरायला सूरपेटी असल्यावर मग काय विचारता मजा?

अशीच एकदा धुळ्याला जायची तयारी चालली होती. मला थोडा सीनिअर असलेला मित्र विलास पुराणिक तिथे इ.एन.टी. सर्जन आहे. डॉक्टरांच्या आय.एम.ए. या संघटनेला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त मला बोलावलं होतं. त्याचा मोठा बंगला होता. कार्यक्रमाव्यतिरिक्त बासरी वाजवीत बसायचा बेत चालला होता. रात्रीच्या महाराष्ट्र एक्स्प्रेसने निघायचं, सकाळीच चाळीसगाव स्टेशनला उतरायचं, तिथं कुणीतरी मला घ्यायला गाडी घेऊन येणार होतं.

सेकंड ए.सी. च्या डब्यात शिरलो, तर समोर भाई वैद्य. थोड्या गप्पा झाल्यावर बासरी वाजवायची हुक्की आली. भाईंना म्हटलं, 'भाई, थोडी बासरी वाजवली तर चालेल? ते म्हणाले वाः वाः वाजव की! समोरच्या बर्थवरच्या माणसाला 'तुम्हांला त्रास होणार नाही ना, ते विचारून घेतलं; आणि हळू आवाजात वाजवू लागलो. समोरच्या माणसाने इतरत्र बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनाही बोलावून आणलं- टी. सी. ही येऊन बसला. नंतर आमच्या ओळखी, गप्पा झाल्या.

धुळ्याला कार्यक्रम छान झाला. बरोबर अभय बंगही होता. त्याला संगीत खूप आवडतं. त्यालाही ऐकवणं झालं. बासरीवर मी नुसते काही रागांचे सूर काढीत असतो. ऐकून ऐकून काही रागांचे आरोह-अवरोह, स्वरूप एवढं माहीत झालंय. तेच आळवीत बसतो. विस्तार नाही, तानांच्या लड्या उलगडणे नाही, काहीच नाही. त्या शुद्ध स्वरांचा एकातून दुसऱ्यात अलगद शिरण्याचा, कधी वर-खाली जाणारा प्रवास, एवढंच माझं बासरी वाजवणं. माझ्या आसपासच्या लोकांना तेवढंही ऐकायला आवडत असावं.
अभय गडचिरोलीला गेला, आणि माझी पुण्याला परतायची वेळ आली.

चाळीसगाव स्टेशनवर रात्री आठच्या सुमारास महाराष्ट्र एक्स्प्रेस गाठायची होती. धुळ्याहून गाडीने जायला तासभर लागणार होता. विलासच्या मित्राने गाडी- ड्रायव्हर आणि त्याचा कंपाउंडर एवढे बरोबर दिले आणि आमची चाळीसगावला रवानगी केली. आम्ही पोहोचत असताना अंधार पडत होता. प्लॅटफॉर्मवर आलो, तर लोकांची हीऽ गर्दी. आमच्या गाडीला तासभर उशीर होता. बसायला बाक मिळणंच शक्य नव्हतं. मी ड्रायव्हरला म्हटलं, 'बॅग खाली ठेव, त्यावर मी बसतो.' तो म्हणाला, 'नाही नाही. बघू या की जागा.'

आम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत जागा बघत निघालो. बहुतेक सगळी खेड्यातली जनता होती. इतस्ततः पडलेली बोचकी, गाठोडी, ट्रंका. बाकाबाकांवर दाटीने बसलेली, खाली जमिनीवर घोळके करून बसलेली माणसं. या सगळ्यांतून वाट काढीत विशिष्ट आवाज काढीत फिरणारे फेरीवाले. बऱ्याच दिवसांनी ट्रेनने आल्यामुळे क्वचित होणारे जनता-जनार्दनाचं दर्शन मला बुजवून टाकत होतं.

ड्रायव्हर एका गच्च भरलेल्या बाकासमोर जाऊन उभा राहिला आणि एका ठणठणीत दिसणाऱ्या म्हातार्या आजीबाईंना म्हणाला, 'अवो आजी, ते बोचकं काढा की तिथलं, बसू द्या यांना. चला.

आजीबाईंनी बाकावरचं बोचकं उचललं आणि खाली ठेवलं. म्हणाल्या, 'बसा- बसा.' मी बसलो. समोर खांद्यावरची पिशवी ठेवली. आजीबाई बघत होत्या. पिशवीतून डोकावणाऱ्या भल्या मोठ्या बासरीकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'हा दांडू कसला रं बाळा?’
मी जरा आकसलोच. म्हणालो, 'ती बासरी आहे.' 
आजीबाई आश्चर्याने म्हणाल्या, 'हा दांडू वाजतो होय?’ 
मी म्हटले, 'हो.’
'मंग वाजीव की.'
या अर्धवट अंधारात, गर्दीने खच्चून भरलेल्या प्लॅटफॉर्मवर, या अडाणी, उबलेल्या लोकांसमोर? पण विचार आला. काय हरकत आहे? बघू या तरी. 
मी म्हटलं, वाजवितों की..

मी बासरी काढून तोंडाला लावली; आणि एका रागाचे सूर काढू लागलो. जाणारे-येणारे लोक त्या कोलाहलातही वेगळे सूर ऐकून थबकू लागले. आमच्या बाकाच्या पाठीकडे पाठ करून दुसरा बाक जोडलेला होता. तिथले लोक तोंड या बाजूला वळवून ऐकू लागले. जाणाऱ्या येणाऱ्या पाच-पन्नास जणांनी तर माझ्याभोवती अर्धवर्तुळच केलं होतं. काहीजण तर तिथं समोर येऊन खाली बसले आणि ऐकू लागले. कचोरी, वडे विकणाचा खाकी डगले अडकवलेल्या माणसांनी विक्री सोडून त्यांची ताटं डब्यावर ठेवली, आणि गर्दीत उभ्याने किंवा बसून बासरीचे सूर कानावर घेऊ लागले.

बासरी थांबवली. लोक स्तब्ध उभे. म्हणालो, 'गाणं म्हणू का?’ सगळे म्हणाले, 'म्हणा म्हणा.' मग माझा आवडता 'आनंदाचे डोही' हा अभंग म्हटला. तो झाल्यावर त्यांना विचारलं. ‘अरे, तुमच्यापैकी कुणी नाही का म्हणणार?' एक पोरगा म्हणाला, 'मी म्हणतो, मी बँडमध्ये होतो.’ त्यानेही गाणं म्हटल.

त्या गर्दीतून सावळा, सीनिअर माणूस पुढं झाला आणि लोकांना म्हणाला, अरे, तुम्ही यांना ओळखलंत का? यांनी हजारो लोकांची दारू सोडविली आहे. मी मागे यांच्यावर वर्तमानपत्रात लेखही लिहिला आहे.'

त्याबरोबर, दारू सोडवता?’, 'औषध आहे का?’ दवाखाना तुमचा?' असे अनेक प्रश्न अनेक दिशांनी येऊ लागले. मी मुक्तांगणची माहिती सांगू लागलो. आमची छोटीशी सभाच जमली. शेजारच्या आजीबाईंनी म्हटले, 'ये बाळा, तुझा पता लिवून दे, माझ्या पुतन्याची दारू सोडव बरं.’ मग माझ्याकडून पत्ते, नंबर घेण्यासाठी झुंबड...

तेवढ्यात नाशिककडे जाणारी, निळ्या रंगाची गाडी हळूहळू येऊन प्लॅटफॉर्मला लागली. सगळ्यांनी बॅगा, बोचकी गडबडीने उचलली आणि ते गाडीकडे धावू लागले. पण जाताना ते परत फिरून माझा हात हातात घेऊन, दाबून हलवून, घाईने निरोप घेऊन गाडीकडे धावू लागले. 

क्षणात गाडी गच्च भरून गेली. आणि हललीही. दरवाज्यातल्या अनेकांनी त्या धडपडीतही मला हात हलवून टाटा तर केलाच, पण पुढच्या चार सहा खिडक्यांमधून असंख्य फैलावलेले पंजे बाहेर आले होते, आणि माझ्या दिशेने अर्धवर्तुळाकार हलताना माझ्या स्तिमित डोळ्यांना दिसत होते.

जवळपास रिकाम्या प्लॅटफॉर्मवर मी त्या बाकावर एकटाच तृप्त होऊन बसून होतो. पुण्याकडे जाणारी माणसं लांबवर, अधूनमधून उभी, बसलेली दिसत होती. अंधारातच ड्रायव्हर आणि कंपाउंडर स्तब्ध उभे होते. मला हलकं हलकं वाटत होतं. माझं असणं आता नाव, शरीरापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकल्याने मी सर्वसामान्य झालो होतो. आणि ही खूप सुखावणारी संवेदना होती.

गाडी आली. डब्यात चढलो तो समोर परत भाई वैद्य! माझा चेहरा, माझी अवस्था पाहून म्हणाले,
‘काही विशेष?’
म्हणालो, 'काही नाही. पुटं गळून पडली.’
भाई म्हणाले, 'असं? सांग तरी जरा!’

बरा झालो
सकाळी बाल्कनीच्या दारातून समोरच्या आकाशाकडे पाहिलं, निळंभोर स्वच्छ आकाश. झाडांच्या हिरव्यामधून छानपैकी डोकावणारं. गुलमोहराचा, उन्हें पडलेला पोपटी हिरवा आणि त्या सगळ्यांमधून आपल्याकडे बोलावणारी लाल लाल फुलं, वा, वा, आज पडावं का बाहेर?

बाहेर पडावं असं तर काल परवापासून चाललंच आहे मनात. पण कुठं बाहेर पडतोय? आतल्या पोटापासून दादून वर येणारी गिळगिळीत संवेदना, भारी अँटिबायॉटिक्स घेतली ना चार-सहा दिवस. त्याचा असणार तो परिणाम. किंवा रेंगाळलेलं दुखणं असणार. कधी बाहेर पडावं अशी उभारी धरून आत बेडरूममध्ये यावं, आणि गात्रं शिथिल करून तास दोन तास झोपून जावं, असं चाललेलं. तसा ताप खरा एकच दिवसाचा. पण होता तो चारपर्यंतचा. मला तर तसा भासलाच नाही तो. पण थर्मामीटर पाहून माणसं दचकत, तेव्हा त्यांच्यामार्फत जाणवायचा. माझे मित्र, मुली, मानलेली मुलं-मुली ही उशा- पायथ्याशी बसून चर्चा करताहेत. बी.पी. ही उतरलेलं. (ते माझं नेहमी कमी असतंच.) अॅडमिट होऊन जा. एक दिवसात वरं वाटेल. हा सल्ला मी मोडून काढतो आहे. शेवटी अँटिबॉयॉटिक सुरू होतं. त्यापूर्वीच ताप अडीच दोन वरून शंभरवर स्थिर झालेला.

पुढचे चार-सहा दिवस नुसते पडून होतो, अशक्तपणाचे विविध नमुने अनुभवत. कधी पाय दुखत, कधी पाठ दुखे. वाटे, आता ताप उतरलेला आहे, उद्यापर्यंत बरं होऊन जाऊ, पण त्या दिवशी सकाळी मात्र ते सगळं बारगळायचं. जुनी असमाधान असलेली पेन्सिलची चित्रं काढली. एक मोठ्या खोडाचं झाड होतं, त्यावर काम सुरू केलं. त्याच्या वळ्या, त्याचा खडबडीतपणा छान येऊ लागला. एकामागून एक चित्र बाहेर काढून त्यांना नवी टेक्श्चर्स देऊ लागलो. टेकड्यांच्या रांगांना उठाव देऊ लागलो. बासरीवर एरवी रागाचे सूर वाजवतो. पण आजारी पडल्यापासून ती जवळ केली नव्हती. तिच्यावर आवडती प्रवाही हिंदी जुनी गाणी वाजवू लागलो. 'तुम न जाने, वक्तने किया, झुकी झुकीसी नजर...’

पण हे सगळं जमेल तेव्हा. आतून वाटेल तेव्हाच. नाहीतर काय करायचं? पडून विचार किंवा झोप, घरी परगावहून मित्र- मैत्रीण दोन दिवस आले. एरवी त्यांच्याबरोबर राहणं, त्यांना घेणं जाणं-येणं, ही माझी कामं. पण त्या सगळ्यांनी मला यावेळी माफ करून टाकलेलं. त्या सगळ्यांच्या गप्पांमध्ये मी तिथल्याच एखाद्या दिवाणावर शांतपणे डोळे मिटून पडून राहायचो. पुतण्या बाहेरून जिना धडधड चढत यायचा, तेव्हा त्याचा हेवा वाटला. सगळी माणसं मनात येईल तेव्हा उठतात, आणि सरळ बाहेर जाऊ शकतात. याचं अतोनात आश्चर्य वाटे. त्या झोपून राहण्याची इतकी सवय झाली की माणसं अशी सारखी बाहेर का जातात, याचंच आश्चर्य वाटू लागलं. नीट पडून रहायचं तर....

मी म्हातारपणात प्रवेश केलाय की काय? पंडून राहणं, कधी टीव्ही बघणं, याशिवाय काही प्रोग्रॅम नाही. आणि याचीच आवड लागली तर? बाप रे. असं निष्क्रिय नको व्हायला! पण काय हरकत आहे? थांबा की आता खूप फिरलात, खूप लिहिलंत. आणखी किती काळ धावपळ करणार? मी मनातल्या मनात म्हातारपण अनुभवू लागलो. जगाच्या व्यवहारापासून तुटलेली अवस्था. कुणी येत-जात नाही. काही फारसा बदल नाही. बदल एकच, तो म्हणजे रोज नवीन उद्भवणाऱ्या आजारांचा. ताप उतरला होता, तर पोट बिघडलं. पण मी ते स्वतःला ताणून, औषध न घेता बरं करून घेतलं. आता काय? आता तर मी बरा होणार ना? तोच हा गिळगिळीत नॉशिया सुरू झाला.

पण आज समोरच्या निरभ्र, निळ्या आकाशाकडे पाहताना जाणवलं, की आपल्याला काही एक होत नाहीये. समोरून आलेल्या सौम्य झुळकीमुळे मन मोहरून आलं. आपण बरे झालो की काय? शरीरातल्या सर्व सिस्टीम्स बरोबर चालायला लागल्या आणि खट्ट आवाज होऊन सर्व चक्रं एकमेकांमध्ये मस्त अडकून यंत्र पूर्वीसारखे चालू लागल्यासारखं वाटलं. मला आता काहीही झालेलं नव्हतं. समोरचं आकाश, गुलमोहर, त्यावर पडलेलं कोवळं उन्ह मला म्हणू लागलं, मित्रा तू बरा झालायस, आता बाहेर पड कसा.

टॉवेलमध्ये कपड्यांच्या घड्या ठेवून मी जेव्हा आंघोळीला निघालो तेव्हा आईला आश्चर्यच वाटलं, आंघोळीनंतर तर आणखीनच आल्हाद. आजारी पडण्यापूर्वी काढून फेकून दिलेली पँट शोधून काढली. खिसे कॉटवर खाली केले. पाकीट, रुमाल, किल्ल्या या एरवीच्या मित्रांना या मधल्या 8/10 दिवसांत विसरूनच गेलो होतो! कपडे चढवले. उत्साह होता, पण तो भरकटवणारा नव्हता. तो पसरत जाणारा आल्हाद होता. दार उघडून समोरच्या फरशीवर पाय ठेवला. या दाराबाहेर मी दहा दिवसांनी पाऊल ठेवत होतो. समोरची, मागची झाडं नुकताच पाऊस पडून गेल्यासारखी स्वच्छ, ताजी दिसत होती. सिनेमातल्या स्लो मोशन सीनप्रमाणे एकेक पाऊल खालच्या पायरीवर जाऊ लागलं. एकेका पावलागणिक मी माझ्या त्या रुळलेल्या दिनक्रमापासून दूर चाललो होतो. पायाला जमीन लागतच नव्हती.

गाडीत बसलो. माझ्या शरीराचाच भाग असलेली. ती मला विचारत होती, काय कसा आहेस? गाडी सुरू केली हळूहळू पुढे जाऊ लागली. चौकीदार, कॉलनीतले येणारे- जाणारे जसे माझ्याकडे आश्चर्याने पहात होते. मी पहिल्यांदाच बाहेर पडतोय, हे त्यांच्या लक्षात आलं की काय?

बाहेर पडल्यावर कुठं जायचं हा प्रश्नच नव्हता. विरूपाक्ष, उमाताईंचं घर. माझं, मला आपलंसं केलेलं, स्निग्ध, उबदार घर. सेनापती बापट रोडवर आलो. हे काय आज मी पहिल्यांदा बाहेर येतोय, म्हणून सगळे वाहनवाले मला पुढे वाट करून देताहेत की काय? गाडी पेन्शनरांप्रमाणे कडेने संथ चालवू लागलो. हे जग वेगळं. नवं- नवं वाटत होतं. गाडीची चाकं जमिनीला जेमतेमच टेकत असावीत. कुठं गेलं प्रदूषण? कुठं गेली गर्दी? हे पुणं अचानक बेल्जियम, जर्मनीसारखं बनलं की काय? काही बदल नव्यानेच पहात होतो. दीप बंगला चौकातला पुतळा हलवलेला दिसत होता. मॉडेल कॉलनीतील मोठमोठी सदाहरित झाडं दिसली. त्यातनं उमा विरूपाक्षांच्या घरासमोर येऊन पोहोचलोही. पहिल्या मजल्यावर राहतात. चढवेल का आपल्याला? की लिफ्टने जावं? पण पायऱ्यांवर पाय ठेवला आणि त्यांच्या दारासमोर कसा आलो, समजलंच नाही. तिथं लावून ठेवलेल्या सूरपेटीतून निघणारा तंबोर्याचा, सगळ्याला प्रवाही करणारा आवाज ऐकला. सूरपेटीशेजारी तक्क्याला टेकून माझ्या नेहमीच्या जागी बसलो. दोघेही आश्चर्याने, आनंदाने समोर येऊन बसले होते.
विरूपाक्ष म्हणाले, 'काय, कसं वाटतंय आता?’
मी म्हटलं, 'बरा झालो आता.’ 
ते हसले व म्हणाले, 'मग लावा आता सूर...’
 

Tags: Anil Avchat Dhule Nashik Pune Kothrud Bhai Vaidya Abhay Banga Model Colony Pune University Senapati Bapat Road अनिल अवचट धुळे नाशिक पुणे कोथरूड भाई वैद्य अभय बंग मॉडेल कॉलनी पुणे विद्यापीठ सेनापती बापट रोड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल अवचट
aawchat@gmail.com

पत्रकार, लेखक, समाजसेवक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके