डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1 ऑगस्ट 1920 ते 18 जुलै 1969 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभले त्या अण्णा भाऊ साठे यांनी 21 कथासंग्रह, 30 कादंबऱ्या व अन्य लेखनही केले होते. गेल्या वर्षी त्यांची जन्म शताब्दी संपली तेव्हा साधना साप्ताहिकाने त्यांच्यावर विशेषांक काढला होता. आता त्यांचा 101 वा जन्मदिन आहे, त्या निमित्ताने त्यांची एक कथा प्रसिद्ध करीत आहोत. ही कथा सुरेश एजन्सी, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या गजाआड या कथासंग्रहातून घेतली आहे..

मला एकच बॉम्ब द्या’ ही मागणी ऐकून कोर्टाची इमारत हादरली, पोलिस घाबरले. लोक दुश्चित्त झाले आणि माझं डोकं सुन्न झालं...

तो एप्रिल महिना होता. ऊन मी म्हणत होतं. धरणीला भाजून काढीत होतं. त्या वऱ्हाडी उन्हाळ्यानं आम्ही हैराण झालो होतो. आमचं पथक चाळीस दिवसांचा अमरावती जिल्ह्याचा दौरा आटोपून परत मुंबईकडे निघालं होतं. माझ्या डोळ्यापुढे ती सुंदर मुंबापुरी तरळत होती. बाई, बहिणी, भाऊ यांच्या आठवणीनं मन भराऱ्या मारीत होतं.

आम्ही सर्व चांदूर रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत होतो. शेकडो कम्युनिस्ट कार्यकर्ते निरोप द्यायला आले होते नि मी सिग्नलकडे पाहत होतो. सिग्नल पडला. पोर्टरनं टणटण करून घंटा वाजवून गाडी येत असल्याची वर्दी दिली. पण...

पण लगेच पडलेले सिग्नल पुन्हा वर गेले आणि एकदम तीनशे पोलिसांनी स्टेशनला वेढा दिला. बंदुकीवरच्या संगिनी चमकल्या नि कित्येक पोलिसांनी आमच्यावर झडप घातली. क्षणात त्यांनी आमची ससेहोलपट नव्हे लांडगेतोड आरंभली. माझ्यावर एकाच वेळी आठ पोलिसांनी मुरकंड दिली. त्या सर्वांनी एकाच वेळी माझ्या खिशात हात कोंबले नि माझी पँट फाडून चिंध्या केल्या. त्यांना माझं पिस्तूल हवं होतं. ते मी चालवीन अशी त्यांना भीती वाटत होती. इंग्रजी कारकीर्दीतील पोलिस किती भित्रे होते याचा तो नमुना होता. त्यांना माझं पिस्तूल सापडलं नाही. मात्र माझी पँट कामातून गेली.

हे असं का होत आहे हे आम्हांपैकी कुणालाच कळत नव्हतं. उशिरानं मग आम्हा सर्वांना अटक केल्याचं सांगण्यात आलं आणि कातरदढी गावचा दरोडा, दोन खून, दोन लाखांची लूट नि हत्यारं जमवणं, इंग्रज सरकार उलथून पाडण्याचा कट करणं हे भयंकर आरोप आम्हांवर ठेवण्यात आले होते.

पाच तास आमची झडती चालू होती. त्याच वेळी पोलिसांनी विदर्भाची सर्व कम्युनिस्ट पार्टीच कैद केली होती. फक्त एकटे श्री. भूपेन्द्रनाथ मुकर्जी फरारी झाले होते.

पाच तास झडती झाल्यानंतर मग जाब-जबान्या सुरू झाल्या. त्या किती वेळ गेला ते मला आठवत नाही.

सर्वत्र गडद अंधार झाला. चांदूर गाव शांत झाला नि मग पोलिसांनी आम्हाला मोटारीत भरलं. एक एकाला दोन दोन पोलिस अशी मोटारीत रचना केली. पुढे एक पोलिस मोटार, मागे एक अशा थाटानं आम्हाला गावाबाहेर काढलं. कुठे नेणार? काय काय करणार? याचा आम्हाला पत्ता लागू दिला नाही.

रात्रीचे दोन वाजले आणि आमची ती मोटार वडनेरा पोलिस स्टेशनच्या आवारात शिरली तेव्हा एकच गोंधळ उडाला. बंदूकधारी पोलिस बंदुका लोड करून जागोजाग उभे राहिले. वातावरण तंग झालं. एखादी भयंकर लढाई पुकारली जावी तशी स्थिती भासली.

नंतर आम्हा सर्वांना मोटारीतून काळजीपूर्वक उतरवून एका कस्टडीत कोंडण्यात आले.

उशिरानं पोलिसांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. ते मोठमोठे अधिकारी मोठ्यानं हसू लागले. काही चहा-सोडा ढोसू लागले. परंतु गरीब शिपाई बंदुकांची ओझी खांद्यावर घेऊन आमच्यावर खडा पहारा करीत होते. आम्ही म्हणजे भयंकर माणसं आहोत असा त्यांचा समज होता.

त्या कस्टडीत दिवा नव्हता. एक फाटकी चटई पडली होती. ढेकणांना आमचा वास लागला होता. मी त्या घोर अंधारात विचार करीत होतो.

आता पुढे काय होणार?

आता पुढे काय होणार हा एकच प्रश्न माझ्यापुढे थैमान घालीत होता. एखादा माणूस जर का एकदा पोलिसी चक्रात गुरफटला की त्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं.

दोन वाजून गेले आणि एक पोलिस आला. त्यानं दरवाजा खोलून विचारलं, ‘द. ना. गव्हाणकर कोण ? चल, बाहेर ये.’ शाहीर द. ना. गव्हाणकर मला चिमटून उठले आणि त्या पोलिसामागून गेले. तो पोलीस गव्हाणकरांच्या घरी घरकाम करायच्याही लायकींचा नव्हता. पण त्याचा पोलिसी थाट काही औरच होता.

गव्हाणकर गेले. आता पुढं काय? हा प्रश्न पुन्हा आम्हाला सतावू लागला. आम्ही कानांत प्राण घेऊन ऐकू लागलो, परंतु आम्हाला काहीच ऐकू आलं नाही. एक तासानंतर स्वत: गव्हाणकरच आले आणि मला आनंद झाला. मी त्या अंधारात त्यांच्याकडे डोळे फाडून पाहू लागलो, तो त्या पोलिसाचा उर्मट आवाज घुमला - ‘अण्णाभाऊ साठे चल, बाहेर ये.’ मी ‘आलो,’ असं म्हणून उठलो नि पायात बूट घालू लागलो. पण तेवढ्यानंच तो पोलिस भडकला. म्हणाला, ‘अरे चल ना! का येथूनच सुरू करू?’

मी काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्याबरोबर गेलो. म्हणजे त्यानं प्रथम माझ्या दोन्ही हातांत बेडी घालून तिला एक साखळी लावली. तिचे टोक घरून तो चालू लागला. म्हणजे वाघाचा बछडा पिंजऱ्यातून काढून घेऊन चालावे तसा. काळजीपूर्वक त्यानं मला सर्कल साहेबापुढे उभं केलं. तेव्हा तो साहेब टेबलावर तंगड्या पसरून आरामशीर पडला होता. मला पाहून तो कृत्रिम हसला, पण तसाच पडून म्हणाला, ‘या! तुम्हाला थोडा त्रास झाला आज, पण त्याला इलाज नाही. त्याचं ते बोलणं ढोंगीपणाचं होतं हे मला कळलं होतं. पण त्यालाही ते कळत नव्हतं असंही नाही, पण ती त्याची सलामी होती.

‘मी ह्या खुर्चीवर बसू का?’ मी त्याला विचारलं नि तो म्हणाला, ‘ वा वा! बसा ना! मग त्यानं मला घरून उभ्या असलेल्या पोलिसाला जायचा हुकूम केला. तसा तो पळाला. नंतर तो म्हणाला, ‘मला असं सांगा की, इंग्रजी राज्य कुणाला उलथून पाडता येईल, यावर तुमचा विश्वास आहे का?’

‘निश्चित’, मी उत्तर दिलं.

‘म्हणजे?’ तो चमकला.

म्हणजे हे सरकार अवश्य उलथून पाडता येईल.’ मी उत्तरलो आणि मग त्यानं पुढे पेच टाकला. म्हणाला, म्हणूनच ना तुम्ही तो दरोडा घातला? कारण त्या पैशानंच तुम्ही दारूगोळा आणि हत्यारं घेणार आहात. परंतु मी म्हणतो, तुम्हाला ते शक्यच नाही. कारण आम्ही तुम्हाला आधीच अटक केली आहे. आता तुम्ही काहीच करू शकत नाही.

‘खोटं आहे हे.’

मी म्हणालो, ’आम्ही तो दरोडा घातला नाही. आता आपण मला आपलं मत काय ते सांगा.’

हे ऐकून तो गंभीर झाला. त्याचं नाक फुगलं, डोळे गरगरा फिरले नि खणखणीत आवाजात तो म्हणाला, ‘माझं मत आहे की, तो गुन्हा तुम्ही गुमान कबूल करा. लुटीची रक्कम परत करा आणि देशाच्या नावे केलेल्या पापाचं फळ भोगा.’

यावर मी हसलो नि म्हणालो, ‘जे कृत्य मी केलंच नाही ते मी कबूल करणार नाही आणि जी रक्कम मी लुटली नाही ती परत कशी करू? मी काहीही कबूल करणार नाही’

‘अरे वा! ठीक. पण आमच्यापुढं दगडही बोलतो’,तो म्हणाला.

‘कसा बोलतो?’

‘ते आता कळेल’

‘ठीक आहे’

‘तुमचं गाव कोणतं?’

‘सातारा’

‘मग भयंकरच आहे. तुम्ही लोक म्हणे जीवावर उदार असता. तुम्ही खुनी लोक म्हणून वऱ्हाडाला लुटता ना?’ तो भुवया चढवून म्हणाला.

‘तसं मुळीच नाही.’ मी उद्गारलो.

‘बोल, गुन्हा कबूल? ’ तो गरजला. नाऽऽहीऽऽ! मी उत्तर दिलं.

आणि तो भडकला. आहो जाहोवरून एकदम आरे कारेवर आला, ओरडला, ‘अरे, तिकडे कोण आहे का?’

तसे दोन पोलिस धावले. त्यांना तो सर्कल म्हणाला, ‘ या डाकूला घेऊन जा नि बोलता करा. पण लक्षात ठेवा. हा सातारा डाकू आहे! जा’

पोलिसांनी माझी साखळी धरली आणि मी म्हणालो, ‘तुम्ही काहीही केलंत तरी मी मुळीच बोलणार नाही. तुम्ही मला उद्याच कोर्टात उभे करणार आहात. तेव्हाच मी जे बोलायचं ते बोलेन. अच्छा’

कोर्टाचं नाव ऐकताच त्याचा चेहरा पडला. डोकीत दगड घालावा तसा तो पाहू लागला. त्यानं घडयाळात पाहिलं. तेव्हा चार वाजून गेले होते. मग त्यानं डोळे झाकून विचार केला. म्हणाला, ‘तो उद्या बोलणार आहे. त्याला बंद करा. परंतु सेप्रेट बंद करा’

त्या हुकुमानं पोलिसांची निराशाच झाली. त्यांनी मला आमच्या लोकांपासून वेगळ्या खोलीत बंद केलं.

मी भिंतीला पाठ लावून अंधारात बसलो होतो. शेजारच्या खोलीत शाहीर गव्हाणकर नि इतर मित्र होते. दारात एक हत्यारी पोलिस पहारा करीत होता. तो इकडून तिकडे ये-जा करीत होता.

पोलिस अधिकारी घमेंडीत होते. कारण त्यांनी विठ्ठल नावाच्या एका मुलाला अटक करून माफीचा साक्षीदार केलं होतं. त्या बळावर ते बिनघोर होते.

मी सूर्योदयाची वाट पाहात होतो. रात हळूहळू वितळत होती. आज उद्यात विलीन होत होता. अंधारात प्रकाश मिसळून पहाट होत होती. काळ्या वस्त्राची जरभरी किनार झगमगावी तद्वत दक्षिणेची किनार दिसत होती. एक लखलखीत पट्टा दिसत होता नि शेजारी कुठं तरी कोंबडा आरवत होता.

सकाळी आम्ही, ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गीत गात कोर्टात हजर झालो. तेव्हा इतर आरोपींना पुढे आणले होते. एकूण आम्ही सर्व एकोणीस आरोपी होतो. फक्त एक श्री. भूपेन्द्रनाथ मुकर्जीच नव्हते.

पोलिसांनी आम्हा सर्वांना बेड्या घालून, मग त्या बेड्यांतून एक सलग साखळी खेळवून एक माळच गुंफली नि प्रत्येकाजवळ एक पोलिस उभा केला. आम्हांला कोर्टात आणलं आहे हे समजताच लोकांनी आमच्याभोवती प्रचंड गर्दी केली.

खटला पुकारला. आमच्या बेडया काढून आम्हाला कोर्टापुढे हजर करण्यात आलं तेव्हा माफीचा साक्षीदार केलेला विठ्ठल एका कोपऱ्यात उभा होता. एक पोलिस त्याला धरून उभा होता. न्यायाधीशांनी आम्हा सर्वांवरून नजर फिरवली नि गप्पकन ती या सर्कलवर स्थिर केली. विचारलं, ‘हेच का सर्व आरोपी?’

‘होय महाराज.’ सर्कल उत्तरला.

‘पुरावा?’ न्यायमूर्तींनी मागणी केली आणि पोलिसांची पाचावर धारण बसली. सर्कल म्हणाला, ’महाराज, पुरावा एकत्र करीत आहोत. तूर्त यांना संशयावरून अटक केली आहे.’

‘संशयावरून? आहे काय हे? न्यायाधीश आश्चर्याने म्हणाले, ‘हे सर्व लोक सुशिक्षित आहेत नि तुम्ही सर्व आरोपी निराळे ठेवले आहेत.’

‘यांच्यापैकी एक माफीचा साक्षीदार झाला आहे.’ सर्कल बोलला. आणि त्याच वेळी विठ्ठल ओरडला. म्हणाला, ‘नाही, मी माफीचा साक्षीदार नाही. मला मारून पोलिस माफीचा साक्षीदार करीत आहेत ’

या विठ्ठलाच्या जबाबानं सर्कलचा चेहरा पांढराफट्‌ पडला. न्यायाधीशांनी गंभीरपणे त्याची दखल घेतली. पण सर्कल हा इंग्रजी राजवटीतील एक निगरगट्ट माणूस होता. तो म्हणाला, ‘हा खोटं बोलत आहे. शिवाय एक आरोपी फरारी आहे. तो होतो आला की सर्व पुरावा हाती येणार आहे.’ असं म्हणून त्यानं एक वर्तमानपत्र पुढं केलं. त्यात होतं, कॉ. भूपेन्द्रनाथ मुकर्जी फरारी असून दहीगावच्या दरोड्यातील नं. एक आरोपी आहेत. पोलिस त्यांना शोधीत आहेत.

तो मजकूर वाचून कोर्टाचा कल फिरला आणि पोलिसांना पुढली तारीख मिळाली आणि कोर्टानं अशी सूचना दिली की, पुढील तारखेला ज़र फरारी आरोपी नाही सापडला, तर मी त्याचा वेगळा खटला चालवीन आणि हा वेगळा होईल. तेव्हा तुम्ही पुरावा हजर करा.

श्री. नूपेन्द्रनाथ मुकर्जी भूमिगत होते, पण ते अमरावतीतच होते नि त्यामुळे घोटाळा झाला होता. त्यांना बाहेर पडताच येत नव्हतं कारण साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड देह नि लोकप्रिय नेता, त्यांना सर्वच ओळखत होते आणि पोलिसांनी सर्व वाटा रोखल्या होत्या. तरीही त्यांनी अमरावती शहरात बसून नागपुरशी संबंध जोडले आणि आमच्या वकिलाची सोय केली. नागपूरचे प्रख्यात वकील श्री. जयवंत यांच्यावर ती कामगिरी सोपविली होती.

आली आली म्हणत ती तारीख आली आणि आम्ही कोर्टात हजर झालो. तेव्हा श्री. जयवंत हे आमच्या पुढे येऊन आमची वाट पहात होते. आम्ही कोर्टात येताच ते पिसाळल्यासारखे दिसू लागले. पोलिसांकडे ते संतप्त दृष्टीनं पाहू लागले नि जेव्हा आमचा खटला उभा राहिला; तेव्हा ते उसळून म्हणाले, हे पोलिस चांगल्या लोकांना फासावर चढवून स्वतःची चमडी वाचवू पाहात आहेत. महाराज, या पोलिसांनी मला पुरावा आज दिलाच पाहिजे. आणि तेच मत न्यायमूर्तीचं पडलं. त्यांची तीच मागणी होती व म्हणाले, पुरावा हजर करा.

महाराज, फरारी आरोपी हाती लागत नाही, तोपर्यंत काहीच पुरावा हजर करणं शक्य नाही, तरी पुन्हा तारीख मिळावी.’ सर्कल निर्लज्जपणे म्हणाला.

त्यावर न्यायमूर्तीनी नकारार्थी मान डोलावली. जयवंत वळून म्हणाले, ‘नाही, नाही महाराज, पोलिसांना मुदत देऊ नये. हे लोक मृताला जिवंत करण्याचा प्रयत्न करावा, तद्वत ही बनावट केस उभी करू पहात आहेत.’

‘जेल कस्टडी’ न्यायाधीशांनी हुकूम दिला आणि पोलिसांच्या भयंकर जाचातून आमची मुक्तता झाली.

बरोबर पाच वाजता आम्हाला घेऊन ती मोटार अमरावती मध्यवर्ती तुरुंगापुढे जाऊन उभी राहिली आणि मी आयुष्यात प्रथमच तुरुंगाच्या दारातून आत प्रवेश केला. दाराच्या आत कचेरी होती नि पुढं दुसरा मुख्य दरवाजा होता. त्या कचेरीत आमची नोंद झाली. आम्हाला आरोप कार्ड देण्यात आलं नि दोन तासांनंतर आम्ही दुसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. तेव्हा तुरुंग म्हणजे माणसांचा दगड बनवण्याचा कारखाना आहे, असं माझं मत झालं. अनेक कैदी समोर उभे होते. त्यांची लग्न करून झटती घेण्यात येत होती. ते सर्व राकट नि क्रूर दिसत होते.

ज्या बराकीत चक्रवर्ती राजगोपालाचारी कैद होते त्या बराकीत आम्हा एकोणीस लोकांना ठेवण्यात आले. त्या बराकीच्या आवारात दुसरी एक बराक होती. तिथं बरेच अन्डरट्रायल प्रिझनर्स होते. ते सगळे आमचं ते एकोणीस लोकांचं मेटगं पाहून बावरले होते.

तो तुरुंग म्हणजे त्यावेळी दहशतीचं एक माहेर मानलं जात होतं.

त्या तुरुंगात कित्येक देशभक्त चरफडत होते. बेचाळीस साली झालेल्या उठावातील अनेक लोक तिथं होते. आष्टी चिमूरचे देशभक्तही तिथंच होते. त्यांना चाळीस वर्षांपासून सत्तर वर्षापर्यंत शिक्षा झाल्या होत्या. नागपूरचे साया मगनलाल बागडी हे ऐशी वर्षांची शिक्षा भोगत होते. या भयंकर शिक्षा म्हणजे इंग्रजांनी कायद्याची केलेली विटंबनाच होती.

दिवस उगवत होते नि मावळत होते. तसे नवे कैदी येत होते आणि जुने सुटून जात होते. त्यांपैकी अनेक कैदी माझ्या ओळखीचे झाले होते. पोट भरत नाही म्हणून आत्महत्या करू पाहणारा तो गुलतान, गरीब भोळा भोमक्या, फाशीची शिक्षा झालेला शेरखान नि त्याचा दोस्त बहादूरखान, प्रेयसीचं नाक कापून आलेला किसन, सात बलात्कार करणारा तरशा, घरच्या लोकांनी वेडा ठरविलेला उत्तम, तो दादा न्हावी नि असे अनेक लोक माझ्याभोवती जमले होते. त्यांच्या सहवासात मी दिवसभर आनंदात असे.

परंतु रात्री मला झोप लागत नव्हती. आई, बहिणी, भाऊ, नातलग यांची आठवण होत होती. माझा गाव माझ्या डोळ्यांपुढं उभा राहात होता. तो सुंदर शिवार, ती गर्द हिरवी झाडी, त्या पांदी यांची मला आठवण होत होती. जात्याची घरघर, बाईचं जात्यावरचं गीत, काकणांची कुणकूण, मोटेच्या चाकाची कुईकुई, कोंबडयाचं आरवणं, हे सर्व ऐकण्यासाठी माझा जीव आतुर झाला होता परंतु हे तिथं ऐकू येत नव्हतं. तर तिथं दिवसा कावळ्यांची काव काव नि बेड्यांचा खळखळाट आणि रात्री ती ऑलबेलची कर्कश आरोळी एवढंच ऐकू येत होतं.

पंधरा दिवस गेले आणि आमची तारीख आलो. आम्ही कोर्टात हजर झालो. आमचे वकील श्री. जयवन्त हे नागपूरहून कधीच येऊन बसले होते.

खटला पुकारला. त्याबरोबर पुन्हा ती पुराव्याची मागणी उद्भवली. पोलिसांनी कसलाही पुरावा आणला नव्हता. उलट पुन्हा ते मुदत मागू लागले. तेव्हा आमचे वकील खवळून उठले आणि म्हणाले, ‘महाराज, या पोलिसांना माझं सांगणं आहे की, तुम्ही मला एकच बॉम्ब द्या.’ ही मागणी ऐकून कोर्टाची इमारत हादरली. पोलिस बावरले. लोक दुश्चित झाले. जयवंत पुन्हा बोलू लागले, ‘ठीक आहे, जर हे आरोपी भयंकर आहेत, तर मग मला एक पिस्तूल द्या. ते नसेल तर मग एक काडतुस तरी कोर्टात हजर करा.’ भले ते जिवंत नसेल, तर रिकामं तरी हजर करा आणि जर हे कुणी करीत नाही, तर आपली नालायकी मान्य करून मोकळे व्हा नि आरोपी मुक्त करा. परंतु यावेळी सर्कल साहेबानं दडी मारली होती. तो हजर नव्हता, म्हणून पुन्हा तारीख पडली. मी पुन्हा तुरुंगात दाखल झालो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अण्णा भाऊ साठे

लोकशाहीर, साहित्यिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके