डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दर महिनाअखेरीला शाळा मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करते. जादूचे प्रयोग, तबलावादन, पेंटिंगचे प्रात्यक्षिक, मान्यवरांनी त्यांच्या आवाजात म्हटलेल्या कविता, गाणीगोष्टी, ओरिगामी, सैनिकांशी गप्पा कितीतरी... यांमुळे मुलांना कित्येक विषयांच्या खिडक्या मोकळ्या होतात.

मुलगी अडीच वर्षांची झाली आणि तिच्यासाठी शाळेची शोधाशोध सुरू केली. 1998 मध्ये नाशिकमधील काही लोकांनी एकत्र येऊन जरा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देणारी ‘आनंदनिकेतन’ शाळा चालू केल्याचे समजले. ‘कृतीतून व अनुभवातून शिक्षण’ वगैरे गोष्टी ब्रोशरमध्ये छापल्या होत्या पण प्रत्यक्षात? तरी शाळेचे वेगळेपण लक्षात घेऊन मी मीटिंगला गेले. संचालकांनी माझ्या सर्व शंकांचं निरसन मोकळेपणाने केलं. शेवटी विश्वासानं घराजवळच्या या ‘मराठी शाळेत’ मुलीला प्रवेश घेतला.

पुढे पालक या नात्याने मीही शाळेच्या उपक्रमांत भाग घेतला आणि बघताबघता शाळेचीच एक बनले. मुलांत रमले. या अनुभवाने माझ्या डोळ्यांवरची झापडं बाजूला झाली आणि मुलीबरोबर खूप काही शिकले.

दुसरीच्या पुस्तकात लपंडाव कविता आहे. कळीमध्ये लपते फूल, फुलामध्ये लपते बी... लपंडाव हा तर मुलांच्या आवडीचा खेळ. उत्साहाने चर्चा चालू होती. एकातून दुसरे कसे तयार होते ते मुले शोधत होती. मग ताई म्हणाल्या अशीच कविता आपण करूया. मुलांना जरा दडपण आलं... पण ताईंनी पहिली ओळ सांगितली. ‘फळांत लपतो रस’ आणि काय आश्चर्य! चिमुकल्या डोक्यांतून आपापल्या कल्पना बाहेर पडू लागल्या.

जमिनीत लपतो लाव्हारस

समुद्रात लपते मीठ

रस्त्यात लपते डांबर

उसात लपते साखर

तबल्यात लपतात बोल

सतारीत लपतात सूर

आणि मुलांची कविता तयार झाली. पाठ्यपुस्तकासारखीच.

तिसरीच्या विज्ञानात वनस्पती व त्यांचे अवयव असा भाग आहे. असे विषय तर इथे अगदी मनोरंजक पद्धतींनी शिकवले जातात. प्रत्येकाला मातीने भरलेली कुंडी देऊन धान्य-कडधान्याच्या बिया पेरल्या, ताईंनी मात्र एका कुंडीत साबुदाणा आणि तांदूळ पेरले. साधारण आठवडाभर रोज कुंड्यांची काळजी. निरीक्षण, टिपणं ठेवणे वगैरे चालू होतं. मोड कसे आले; पानं कधी फुटली; भुईमुगाला मात्र मोठ्ठा एक मोड आला आणि ताईंच्या कुंडीत तर काहीच उगवलं नाही. आपापल्या झाडांची चित्रे काढून झाली, एकमेकांबरोबर फरक बघून झाले. ताईंच्या कुंडीविषयी मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण तेही मुलांनीच सोडवलं बरं का. मुलांनी वेगवेगळी कारणं तपासून बघितली. पाणी कमी झालं का? ते पांढरे होते म्हणून का? एकाचं कुंडीत दोन बिया लावल्यामुळे असेल. बुरशी आली म्हणून... आणि मग कोडं सुटलं. तांदूळ म्हणजे तुटलेलं बी आणि साबुदाणा म्हणजे झाडाचा चीक. ते कसं उगवणार?

मग ताईंनी त्यातल्याच एका रोपाचं मूळ, खोड, पाने, पानांचे देठ, उपमुळे, फांद्या असे अवयव दाखवले. कार्यही समजावून सांगितले. मुळांनी शोषलेलं पाणी खोडावाटे झाडाच्या शेंड्यापर्यंत कसं जातं. हे समजावताना एकाने विचारलं, “झाडाला जर मोठी ढोली असेल, तरीसुद्धा मुळातलं पाणी वरपर्यंत जाऊ शकतं का?” तर दुसरा प्रश्न आला, “उंचावर पाणी चढवायचं असेल तर आपल्याला पंप लावावा लागतो, मग झाडावर इतक्या उंचावर पाणी कसं पोहोचतं?” मुलांच्या या प्रश्नांतूनच आणखी एका प्रयोगाची नांदी झाली.

आमच्या शाळेत दर महिन्याला खाऊ बनविण्याचा कार्यक्रम असतो. दाण्याचा लाडू, पॉपकॉर्न, सँडविचेस्, लिंबू सरबत, कोशिंबीर... यात मुलांचा मोठा सहभाग असतो. काही साहित्य घरून तर काही साहित्य शाळाच खरेदी करते. एकदा मराठीच्या तासाला ताईंनी शब्दकोडं घातलं आणि खरवस हा शब्द मुलांना अडला. गंमत म्हणजे हा पदार्थ कोणीच खाल्ला नव्हता. त्यामुळे नुसतं वर्णन पुरेसं नव्हतं. मग त्या महिन्यात मुलांसाठी खरवसच तयार केला. खरवसाचे दूध म्हणजे चीक, त्याचे वेगळेपण काय? ते सर्वांत ताईंनी सांगितले. ताईंच्या मार्गदर्शनाखाली चिकात साधे दूध, साखर मुलांनी मिसळले आणि शिट्टी न लावता ते कुकरमध्ये उकडायला ठेवले, खरवस. तयार झाल्यावर वड्या पाडण्यासाठी ताटात काढला, तर मुलांना तो, केकच वाटला. ‘दूध नको, गोड नको.’ म्हणून नाक मुरडणाऱ्या मुलांनाही खरवस आवडला. दूध उकळतात हे मुलांना माहीत होतं. पण ‘उकडतात’ हे नवीन होतं. काहींना खरवस स्पंजसारखा वाटला.

या शाळेचा गणेशोत्सवही आगळावेगळा असतो. इयत्ता चवथीची सर्व मुले शाडूचे गणपती बनवतात आणि रंगवतात. ते सर्व गणपती बसवले जातात. दुसरी-तिसरीची मुले पताका, डेकोरेशन, वेगवेगळ्या रांगोळ्या, सजावट करतात. सर्व मिळून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करतात. आरती, प्रसाद, मौज लुटतात.

शाळेत दहीहंडी, गोपाळकाला तर असतोच; शिवाय त्यादिवशी फॅन्सीड्रेस स्पर्धा असते. रमजानला शाळेत तयार होणारा शीरखुर्मा मुले आवडीने खातात. 25 डिसेंबरला तर मज्जाच मज्जा असते. मुले स्वतः कागद रंगवून टोप्या बनवतात. डोक्यावर घालून मिरवतात आणि ख्रिसमसचा केक खात ‘टोपी डे’ साजरा करतात.

दर महिनाअखेरीला शाळा मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करते. जादूचे प्रयोग, तबलावादन, पेंटिंगचे प्रात्यक्षिक, मान्यवरांनी त्यांच्या आवाजात म्हटलेल्या कविता, गाणीगोष्टी, ओरिगामी, सैनिकांशी गप्पा कितीतरी... यांमुळे मुलांना कित्येक विषयांच्या खिडक्या मोकळ्या होतात.

यंदा तिसरीच्या मुलांनी ‘ठो ठो’ नावाचे वर्तमानपत्र चालवले. रोज एक फुलस्केप भरून असलेलं हे हस्तलिखित. मुलांना त्यांच्या मनाने कोणत्याही विषयावर काहीही लिहिण्याची पूर्ण मुभा होती. ताईंचे फक्त मार्गदर्शन. बाकी सारे मुलांनी सांभाळले, न भांडता. शाळेतील घडामोडींच्या बातम्या. वर्गात यमक जुळवा या खेळातून सुचलेल्या कविता, चुटकुले, मेंदी, चित्र, काही अनुभव, उदा. माझी झालेली फजिती, मी बनवलेला पदार्थ किंवा ट्रीपचे वर्णन, वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती, शेजारी राहणाऱ्या खेळाडूची मुलाखत, आजीशी मारलेल्या गप्पा, काही कल्पनाविलास, मनातल्या काही खास गोष्टी, मला नटी व्हावेसे वाटते वगैरे वगैरे.... आणि हो, चिंटूप्रमाणे एक गंपूही होता. हा मोठ्या माणसांच्या तक्रारी सांगायचा. मनापासून. हे कळून चुकळं की मुलांच्या विचारांच्या क्षमता आणि कल्पना अचाट असतात.

या उपक्रमांचे इतरही खूप फायदे झाले. मुलांचे वाचन आपोआप वाढले. शोधक वृत्ती जोपासली गेली. स्वतःहून लिहिण्याचा, शब्दांत मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिवाय गृहपाठाचा बोजा वाटेनासा झाला आणि इतरांच्या कौतुकाची थाप मुलांना उत्साह देऊन गेली.

चौथीच्या मुलांची हस्तलिखिते, कविता, कोड्यांची पुस्तके अशीच वाखाणण्याजोगी आहेत. या शाळेचे असे कितीतरी स्तुत्य उपक्रम सांगता येतील. दरवर्षी एक इयत्ता वाढत वाढत यंदा पाचवीचा वर्ग सुरू होतो आहे. शाळेला मान्यताही मिळाली आहे. मुलांना जाणीवपूर्वक आजूबाजूला बघायला शिकवणाऱ्या आणि शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आनंददायी शाळेला मनःपूर्वक शुभेच्छा.

Tags: अनुराधा कर्वे वर्तमानपत्र जादूचे प्रयोग ख्रिसमस रमजान ईद गोपाळकाला दहिहंडी 25 डिसेंबर गणेशोत्सव सॅंडविच केक भुईमुग तांदूळ साबुदाणा कडधान्य धान्य इयत्ता तिसरी इयत्ता दुसरी विज्ञान कविता मराठी शाळा संचालक आनंदनिकेतन नाशिक शाळा Anuradha Karve News Paper Ramzan Eid Gopal Kala Dahihandi Christmas 25th December Ganesh Utsav Sandwich Cake Rice Sprouts Grains Standard Third Standard Second Science Poem Marathi School Anand Niketan Nashik #School weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके