डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझ्या कवितेतील स्त्रिया बिनचेहऱ्याच्या आहेत!

अनुराधा पाटील यांचे काव्यलेखन 1970 च्या आसपास सुरू झाले. त्यांची पहिली कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये 1972 मध्ये छापून आली. म्हणजे गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (1981), ‘तरीही’ (1985), ‘दिवसेंदिवस’ (1992), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’ (2005) आणि ‘कदाचित अजूनही’ (2017). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे. वेगवेगळ्या पिढ्यांतील समीक्षकांना दखल घ्यायला लावणारी ही कविता अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांत समाविष्ट झालेली आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, गुजराती, राजस्थानी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

कुठल्याही सवंग मोहाला बळी न पडता, निष्ठेनं केलेल्या या कवितालेखनाचा अनेक स्तरांवर गौरव झालेला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, बहिणाबाई प्रतिष्ठान, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र फाउंडेशन अशा अनेक पुरस्कारांत मानाचा तुरा खोवणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला गेल्या महिन्यात जाहीर झालेला आहे. आणि दुधात साखर म्हणजे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना घोषित झाला आहे. या प्रतिष्ठेच्या दोन्ही पुरस्कारांचे वितरण याच महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न - अनुराधाबाई, सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन. आपल्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि दुधात साखर म्हणजे, महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही नुकताच घोषित झालाय. हा चांगल्या कवितेचा सन्मान आहे, तद्वतच आपल्या व्रतस्थ काव्य-लेखनाचा गौरव आहे. या दोन्ही पुरस्कारांचं वितरण याच महिन्यात होत आहे. या प्रसंगी तुमच्या भावना काय आहेत?

- धन्यवाद. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यापासून आत्तापर्यंत लेखक, कवी, पत्रकार, स्नेही अशा सर्व स्तरांतल्या लोकांनी (मला वाटतं, तुम्हीही) केलेली कॉमेंट आधी तुम्हाला सांगते, ‘तुम्हाला हा पुरस्कार मिळाला हे छान झालं, पण हा पुरस्कार तुम्हाला थोडा उशिरा मिळाला.’ गंमत अशी की, इतरांचं ऐकता-ऐकता मीसुध्दा कोणाला तरी सांगितलं की, ‘हो बाबा, थोडा उशिराच मिळाला.’ पण पुरस्कार मिळाल्याचा काळ लोटल्यावर आत्ता मी जेव्हा विचार करते की, खरोखरच उशीर झालाय का? यासाठी थोडं मागं वळून पाहिल्यावर मला असं वाटलं की, तसं नाही म्हणता येणार. तशी बरीच कारणं आहेत, पण त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे यापूर्वी ज्यांना हा पुरस्कार मिळायला पाहिजे होता, अशी बरीच त्या योग्यतेची नावं सुटलेली आहेत. ती नावं तुम्हालाही माहीत आहेत,  मला तर नीटच माहीत आहेत.

आता त्या नावांची पुनरावृत्ती नको करायला. पण बरेच असे कवी-लेखक आहेत की, ज्यांना तो मिळाला नाही आणि ज्यांना खूप तरुण वयातच मिळाला, असेही काही लोक आहेत. साहित्य अकादमीचा नियम नाही, पण असा एक संकेत होता. लेखकाला वयाच्या पन्नास-साठ वर्षांनंतरच हा पुरस्कार दिला गेला. मध्ये काही दलित साहित्यलेखनाचा अपवाद आहे. याशिवाय आणखी दोन-तीन नावं आहेत. पण साधारणपणे साठीनंतरच हा पुरस्कार मिळताना मी पाहत आले. मग हा पुरस्कार मला उशिरा मिळाला, असे सगळे का म्हणतायत, असा मला प्रश्न पडला.

अगदी साहित्य अकादमीच्या सेक्रेटरींचा मला फोन आला तेव्हा ही बातमी सांगताना आणि अभिनंदन करताना तेही म्हणाले, ‘तुम्हाला तो पूर्वीच मिळायला पाहिजे होता. तरी पण ठिकय, चांगलं झालं.’ हे सगळ्यांचं ऐकताना असं वाटतं- कदाचित स्वत:चं कौतुक करून घेतल्यासारखं वाटेल, पण सांगितलं पाहिजे- माझ्या समकालीन लिहिणाऱ्यांमध्ये माझं थोडं अधिक नाव होतं. मी घरी बसूनच लिहीत राहिले, तरी माझं नाव चर्चेत राहिलं. कविता अभ्यासक्रमात आल्या. त्यामुळे मी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत होते. हा पुरस्कार आता मिळाला; आम्हाला वाटलं, तो आधीच मिळालाय. अशी ती विस्मयाची, आश्चर्याची प्रतिक्रिया होती. कौतुकाची पण होती. त्याचा मला आनंदच आहे. सार्वजनिक कार्यक्रमात आणि संपर्कात नसताना अनेकांनी उत्स्फूर्तपणे आनंद व्यक्त केला. त्यात माझा सन्मानच आहे. या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे.

प्रश्न - प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणीचा काळ फार महत्त्वाचा असतो. कारण त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्व जडण-घडणीवर होत असतो. महात्मा गांधी हा माणूस फार दुराग्रही/हट्टी होता, असं म्हटलं जातं, आणि त्याचं एक कारण त्यांच्या बालपणीच्या कर्मठ वातावरणाचा परिणाम, असं सांगितलं जातं. प्रसिध्द दिग्दर्शक हिचकॉक यांच्या भयपटनिर्मितीचं मूळ हे त्यांच्या बालपणातच दडलेलं आहे; ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून’ या आरती प्रभूंच्या ओळीतील नकारात्मक सूरामागे त्यांचं बालपणच आहे, असं बोललं जात असतं. तशी तुमची कविता समजावून घेताना तुमच्या बालपणाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे.

- खेड्यात गेलेल्या माझ्या बालपणाविषयी सांगण्याआधी तुम्ही जी उदाहरणं सांगितलीत, त्याविषयी मी बोलू इच्छिते. महात्मा गांधींचं तुम्ही जे उदाहरण सांगितलं आणि त्यांच्या कर्मठ वैष्णव कुटुंबाचा जो उल्लेख केलात, त्याचा निश्चितच परिणाम होत असतो. बालपणीच्या वातावरणाचा परिणाम पुढे चालून व्यक्तीच्या सत्त्वभावावर होतो, हेही बरोबर आहे. त्यातून त्याची सुटका होत नाही. हिचकॉकचं उदाहरण असेल, आरती प्रभूंचं उदाहरण असेल... यात आरती प्रभू पुढे कवी झाले म्हणून हे उदाहरण आपल्यासमोर आलं. समजा ते कवी नसते, तर त्यांना ती घुसमट जाणवली असती; पण आपल्यासमोर आली नसती.

गांधीजींच्या हट्टीपणाबद्दल आपण खूप ठिकाणी वाचतो. गांधीजी ऐकत नव्हते, म्हणजे काय?  तर, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असायचे. बऱ्याचदा त्यांनी भूमिकाही बदलल्यात, नाही असं नाही. पण जसजसं माणसाला यश मिळत जातं. त्या यशामुळंसुध्दा हट्टीपणा येतो. मग गांधी असोत की वल्लभभाई पटेल असोत; यश तुम्हाला बदलवतं. ते तुम्हाला हट्टी करतं. माणसं मोठी होतात तसतशी ती हट्टी आणि एककल्ली होतात. तिथं बऱ्याचदा लहानपणाचाच संदर्भ असेल, असंही नाही. पण बालपणातूनच खूप गाठी मनात पडत जातात आणि माणूस घडत जातो. त्याच्या उत्तरायुष्यात त्याचा मोठा प्रभाव राहतो. हिचकॉकचं उदाहरण तुम्ही फार सुंदर सांगितलंत. हिचकॉकचे सिनेमे मी फार कमी पाहिले आहेत. पण माणसाला वाटणारी भीती आणि भूक या मूलभूत भावना आहेत.

आता माझं लहानपण घेतलं, तर माझ्या लहानपणात असा तर काही प्रसंग नाही. कुठल्याही चारचौघांतल्या मुलांसारखं माझं लहानपण होतं. पण मी खेड्यात वाढले, जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा गावात. खेड्यात वाढण्याचा म्हणून एक भाग असतो. आता तुम्हाला खेडं माहीतच असेल. साधारणत: साठच्या दशकात लहानच मुलगी होते मी. खेड्यात मुलींना वाढवायची एक विशिष्ट मानसिकता असते. आजही ती खूप बदलली आहे, असं नाही. आज आम्ही वर्तमानात जगताना आधुनिक आहोत का, पुरोगामी आहोत का- असा प्रश्न शहरी लोकांबद्दल पडतो, पण खेड्यातल्यांबद्दल तरी वाद नाही. म्हणजे काळाबरोबर कपडेलत्ते बदलले, भांडीकुंडी बदलली; पण विचार तसेच आहेत. माझ्या काळात तर ते फार कर्मठ होते. म्हणजे मुलगी वाढवायचं माझ्या एकट्या घराचं ते शास्त्र नव्हतं, तर सगळ्याच घरांत तेच वातावरण होतं.

मुलगी म्हणून मी अतिशय बंधनात वाढले. पण मला असं काही सांगता येणार नाही की, मी खूप हट्टी होते,  बंडखोर होते. पण काही गोष्टी मला आवडायच्या नाहीत. उदाहरणार्थ- विश्वास असो वा नसो, काही गोष्टी करायला लावल्या जातात. म्हणजे उपवास असेल, देवाला हात जोडणं असेल- ते मी करायचे. पण मला ते कुठं तरी त्रासदायक वाटायचं. हे आधुनिकतेशी निगडित नव्हतं. सगळ्यांसारखी पाप-पुण्य याबद्दल भीती वाटायची. पण तरीसुध्दा तो मला दिसत का नाही? मला सांगत का नाही? मला आनंद व्हायचा, तर मी बाप्पाला हात जोडायचे. पण मला त्रास व्हायचा. मला अंधाराची भीती वाटते किंवा फलाण्याची भीती वाटते; तेव्हा तो देव कुठं असतो, असा एक प्रश्न मला कायम पडायचा.

तेव्हा तो आम्हाला मदत का नाही करत, असं वाटायचं. त्यामुळे तो नसेलच, असं वाटायचं. भटजीने पूजा सांगणे, व्रत करणे हा आमच्या घरात नसला तरी भोवताली असणारा ब्राह्मणी संस्कार होताच. कारण खेड्यातसुध्दा बहुजनांची परंपरा ही बरीचशी ब्राह्मणीवर्गावरच अवलंबून असल्यामुळं आणि त्यांनीच रुळवलेली मानसिकता घेत असल्यामुळं व्रत-वैकल्यं मी करायचे. त्यामागे चांगला नवरा मिळणं, ही भविष्यातील तापदायक गोष्ट होती. व्रतवैकल्यं करतानाही ही छोटीशी बंडखोरी मी माझ्या मनाशी दीर्घ काळ जपली. पुढं कळत्या वयात या गोष्टींना ओलांडून मी पुढं गेले. अगदी माझा मुलगा गेला, त्याही काळात मला कुठलाही मानसिक-भावनिक आधार नसताना, बौध्दिक आधाराच्या बळावर टिकण्याचा प्रयत्न करत असताना- मला आठवत नाही की मी मंदिरात गेले, प्रार्थना केली किंवा माझ्याच बाबतीत असं का घडलं, असंही नाही म्हटलं. पण यातून दीर्घ काळ बाहेर नाही आले, हा एक अनुभव जमेला आहे.

दुसरा एक अनुभव आहे. माझ्या कवितेतही त्याचे बऱ्याचदा उल्लेख येतात. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज किंवा एकूणच पावसाचा आवाज मला कायम बालपणाशी जोडतो. त्याचं कारण असं होतं- आमचं कुटुंब कोरडवाहू शेतकऱ्याचं. आई-वडील घरची शेती करून शेतमजुरी करायचे. त्यामुळे खेड्यापाड्यांत दारिद्र्याचा आणि दैन्याचा भाग होता, तो आमच्याही घरात होता. पावसाने जर झड लावली, तर आमच्या घरात आठ-आठ दिवस तेलाचा थेंबही नसायचा. पीठ नाही, तेल नाही, कधी अमुक नाही. अशा वेळी आई भाज्या उकडून द्यायची आम्हाला. यात आईला भीती वाटायची- झड थांबली नाही, तर मजुरी कशी मिळणार? मजुरी नाही मिळाली तर लेकरांना काय खाऊ घालणार? आईला वाटणारी भीती आमच्यावरही पसरायची. ही जगण्याची भीती, असुरक्षिततेची भीती, आई-वडील रडतात त्याची भीती पावसाशी नकळत जोडली गेली. त्यामुळे आजही पाऊस पडताना ही भीती जाणवते. आजही रात्री-बेरात्री मी पाऊस ऐकते, तेव्हा मी माझ्या त्या भूतकाळाशी जोडली जाते. तुम्ही उपस्थित केलेला बालपणाचा प्रश्न खरोखरच प्रभाव पाडणारा आहे.

प्रश्न - गोदावरी नदी कितीही दूरपर्यंत वाहत गेली, तिची अनेक रूपं डोळ्यांत साठवली; तरी त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात जाऊन गोदावरीचा उगम पाहण्याची उत्सुकता असतेच. तुमच्या कविता वाचत-वाचत आम्ही मोठे झालो, लिहायला लागलो. तेव्हापासून तुमच्या सर्जनाबद्दल अप्रूप आणि उत्सुकता आहे. तर, या सर्जनाचा साक्षात्कार कसा झाला? पहिली कविता केव्हा लिहिली? पहिली कविता कोणती?

- पहिली कविता फारशी आठवत नाही. पण शाळकरी वयात असताना प्रथम कुठल्या तरी पक्षावर काही तरी दोन ओळी लिहिल्या होत्या. मुळात मला वाचायला खूप आवडायचं. त्याआधी मला शाळेतच घालायचं की नाही, हा प्रश्न होता. त्या काळात खेड्यात मुलीला शिकवण्याची फार इच्छाच नसायची. पण शहरात राहणाऱ्या माझ्या मामाने आईला समजावून सांगितल्यामुळे मला शाळेत घालण्यात आलं. इतर मुलांपेक्षा मी लवकर वाचायला-लिहायला शिकले. मला वाचायला यायला लागलं आणि माझ्या डोक्याला- मेंदूला पाय फुटले. मग मला सापडेल ते मी वाचायची. खेड्यात काही पेपर नव्हते, वाचायला काही नव्हतं. शेतकऱ्याचं घर होतं. पुस्तकं असण्याचं काही कारण नव्हतं. पण दुकानातून पुडीला बांधून आलेला कागद असेल, दुसरा कुठला कागद असेल- तोही मी वाचायचे.

मला वाचायला फार आवडत होतं, हे मला नीटपणानं आठवतंय. शिवाय खेड्यात पोथीवाचन, भारूडं, सप्ताह, मावंद, कीर्तन अशा वातावरणात मी वाढले. माझे वडील स्वत: भारूड चांगलं म्हणायचे. मला शब्दांचा, सूरांचा आणि तालाचा वेगळा नाद होता. आजही वाद्य खूप कळत नाही, पण किशोरी आमोणकर मला खूप आवडतात. त्यातले राग कळत नाहीत; मात्र त्यातला जो एक सूर असतो, तो आपोआप मनापर्यंत पोहोचायचा. त्या काळात अशी पदं म्हणणारे, गाणं म्हणणारे खूप असायचे. बायकांच्याही खूप गोष्टी असतात. म्हणजे भुलाबाई असेल, भजन, आखाजी, दिवाळी, लग्नाची गाणी असतील; मी आपली कायम तिथं खांब धरून उभी असायची, ते सगळं ऐकायची. यातून पुढं काही सुचण्याला मदत झाली.

पाठ्यपुस्तकं मला खूप आवडायची. त्या शब्दांचं, तालासुरांचं पूर्वसंचित म्हणून मी काही लिहिण्याचा प्रयत्न केला. कविता लिहिण्याचाच मी प्रयत्न केला, गद्य लिहिण्याचा नाही. सुरुवातीला लिहिलेल्या कविता वहीत लिहून लपवून ठेवायचे. कदाचित एखाद्या खेड्यातल्या माणसाशीच माझं लग्न झालं असतं, तर त्या कविता तशाच राहिल्या असत्या. पुढं कविताच जन्माला आली नसती. मराठीचा प्राध्यापक असणाऱ्या माणसाशी माझं लग्न झाल्यामुळं माझ्या कवितांना बाहेरचा प्रकाश दिसला. ती सारी ठाले-पाटलांचीच देणगी आहे मला. आमचं लग्न ठरलं, तेव्हा मी त्यांना पत्र लिहिलं. त्यात एक कविता पाठवली होती. त्यांना ते पत्र फार आवडलं. त्यांनी पत्र लिहून मला विचारलं, ‘ही एकच कविता आहे का? अजून किती कविता आहेत? अजून काय लिहितेस?’ यावर त्यांना माझ्या थोड्याशा लेखनाची कल्पना दिली. घरात कुणी लिहू देत नव्हतं. याउलट, लग्न झाल्यावर माझ्या लेखनावर त्यांनी निगराणी ठेवली. सूचना केल्या. प्रोत्साहन दिलं.

आज मला करंदीकरांच्या नावाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळालाय, पण करंदीकरांसंदर्भातील महत्त्वाची आठवण लग्न झाल्यानंतरची आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चांगली कविता वाचली, ती करंदीकरांची. ‘मृद्‌गंध’ हा करंदीकरांचा संग्रह तेव्हा अभ्यासक्रमाला होता. ठाले-पाटील तो शिकवायचे. मला प्रथम तो कवितासंग्रह ठाले-पाटलांनी अलगद माझ्या हातात एखादी ठेव ठेवावी, तसा दिला. करंदीकरांच्या कविता नंतरही मी दीर्घ काळ वाचत होते. पण सुदैवाने माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव पडला नाही. कवितेचं सर्जन सांगताना हे उत्तर शक्यतेच्या खूप जवळ जाणारं आहे. तुम्हीही कवी आहात. त्यामुळे जाणताच- ‘कविता का लिहिली? कविताच का लिहिली?’ या प्रश्नाचं उत्तर चिमटीत येत नाही, हेच खरं.

प्रश्न - वयाच्या अठराव्या वर्षापासून तुम्ही कविता लिहिताय. ‘प्रतिष्ठान’मध्ये तुमची पहिली कविता 1972 मध्ये छापून आली. म्हणजे साधारणपणे गेली पन्नास वर्षं तुमचं कवितालेखन व्रतस्थपणे सुरू आहे. या पन्नास वर्षांत महत्त्वाचे असे पाच कवितासंग्रह तुम्ही वाचकांच्या हाती दिले आहेत. आपल्या प्रत्येक कृतीमागं काही तरी संदर्भ असतात. तुमच्याच ओळी आहेत -

               ‘जगण्यावर जडलेला

               जीवघेणा लोभ

               सुटता सुटत नाही

               म्हणून मी करते

               हे पांढऱ्यावर काळं

               एवढंच’

जीवघेणा लोभ जडलेल्या जगण्याची सृजनसूत्रे काय सांगता येतील?

- ‘प्रतिष्ठान’ मध्ये 1972 ला माझी पहिली कविता छापून आली. तेव्हा सुधीर रसाळ संपादक होते. त्यांचा आणि प्रतिष्ठानचा एक वेगळाच दबदबा होता. कवितालेखनाच्या पन्नास वर्षांचा विचार करायचा तर, थोडा तांत्रिक अंगाने खुलासा करते. माझं लग्न 1971 ला झालं. पहिली कविता 1972 ला छापून आली. नंतर चार-पाच वर्षं मी काहीच लिहिलं नाही. पुन्हा किरकोळ-किरकोळ असं काही लिहिलं. ते घरात पडून राहिलं. कुठं छापून आलं नाही. मात्र तुलनात्मक दृष्ट्या 1977-78 नंतर माझं लिखाण गांभीर्यानं सुरू झालं. तेव्हा मला फारसा अनुभव नव्हता. कोणी काही सुख-दु:ख सांगतंय, त्याचा परिणाम माझ्यावर खूप व्हायचा. त्या 17-18 वर्षांच्या वयात माझ्या अनुभवाचं असं खूप काही नव्हतं. ‘दिगंत’ कवितासंग्रह ज्या काळात आला, त्यातल्या बऱ्याचशा कविता बऱ्या आहेत, असं मला वाटतं. पण एक कवी म्हणून आज मला त्या तशा वाटत नाहीत. त्यात बराच तुटकपणा जाणवतो.

आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगते, ‘तरीही’ या दुसऱ्या कवितासंग्रहात मला माझी भाषा सापडली. कविता हा तसा भाषिक प्रयोग आहे. भाषेच्या अंगानेच कविता ओळखली जाईल. माणसं वेगवेगळी असली तरी अनुभव सारखेच असतात. (राग, लोभ, प्रेम, तीव्रता, उद्‌ध्वस्ततेचे अनुभव) मग तुम्ही वेगळे कधी व्हाल, तर तुमच्या भाषेने. तुमच्या भाषेत सांगाल तेव्हा. हे मला कळलं, ‘तरीही’च्या काळात. या काळात मी जाणीवपूर्वक बदलले. तुम्ही जगण्याच्या सृजनसूत्रांचा उल्लेख केलात. अनेकांजवळ व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमं असतात. माझ्याजवळ मात्र पांढऱ्यावर काळं करण्याशिवाय दुसरं माध्यम नाही. पण हे सांगायलासुध्दा पन्नास वर्षे जावी लागली.

माणसाचा जीवित राहण्याचा धागा खूप चिवट असतो. बऱ्याचदा जगण्यासारखं काहीच उरत नाही, तरी माणसं जगण्याला कवटाळून असतात. जगण्याला आपण फेकून देत नाही. जेव्हा खूपच असह्य होतं, तेव्हा फेकतो. आज आपल्यापुढं शेतकऱ्यांचं उदाहरण आहे. हा जो जगण्याला जोडलेला धागा आहे, तो महत्त्वाचा असतो. सृजनाची ऊर्मी महत्त्वाची असते. कविता हा माणसांच्या दु:खाचा पहिला उद्‌गार आहे. तुम्ही कथा लिहा, चित्र काढा, गाणं म्हणा, नृत्य करा- ही सर्व सृजनसूत्रं आहेत. व्यक्त होण्यासाठीची कोणतीही कला तुमच्या जगण्याशी जोडली जाते, त्या अर्थाने पांढऱ्यावर काळं करण्याचा धागा मी जोडला आहे.

प्रश्न - जुन्या-नव्या समीक्षकांनी आपल्या कवितेवर भरभरून लिहिलं आहे. त्यात डॉ. वसंत पाटणकरांच्या एका निरीक्षणाकडे लक्ष वेधायचे आहे. त्यांच्या मते, ‘अनुराधाबाईंची कविता मुख्यत्वे स्त्रीविषयक असूनही स्त्रीवादी कवितेशी तिचे फारसे नाते नाही.’ अशा स्त्रीवादी म्हणवल्या जाणाऱ्या कवितेकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा स्त्रीवाद काय आहे?

- बरोबर आहे तुमचा प्रश्न. कधी तरी एका मुलाखतीत ‘मी स्त्रीवादी कवयित्री नाही’ असं सांगितलंही होतं. अर्थात ते थोडंसं कॅज्युअलही होतं. पण स्त्रीवादी कवयित्री ज्या पध्दतीने लिहितात, ज्या पध्दतीने मांडणी करतात; त्या पध्दतीने मी लिहीत नाही. लिहिते मी स्त्रियांबद्दलच. पण माझ्या कवितेत येणाऱ्या स्त्रिया बिनचेहऱ्याच्या आहेत. पुरुषांच्या संदर्भात माझ्या कवितेतली स्त्री उभी राहत नाही. लिंगभेद गृहीत धरून, विषमता गृहीत धरून स्त्रीवादी कविता वाढली आणि मोठी झाली. स्त्री-पुरुष नात्यांचे असंख्य कंगोरे घेतले, बऱ्याचदा ढोबळही घेतले. त्या अर्थाने मी माझ्या कवितेतील पुरुषाकडेही बघत नाही. लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषातलं नातं जे मला दिसतं, त्यातले जे अनुभव किंवा एक जगणं आहे- त्याच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून, एक बाई म्हणून तो माझ्याकडं कसं बघतो- त्याच्या नोंदी मी घेते. हे कवी म्हणून माझं मत आहे.

माझ्या कवितेतील बाया बिनचेहऱ्याच्या आहेत, कारण त्या परंपरेशी संघर्ष करीत नाहीत. त्या उभ्या आहेत. त्या जगण्याशी संघर्ष करतात. त्यांची लढाई त्या लढतात, पण त्या पुरुषांच्या विरोधात उभं राहून लढत नाहीत. आहे त्या गोष्टी स्वीकारून, त्याच्यासह किंवा त्याच्याशिवाय त्या आयुष्याला तोंड देतात. त्या अर्थाने माझी कविता स्त्रीवादी नाही.

साधारणपणे 1975 चं वर्ष स्त्रीवादाचं म्हणून घोषित झालं. आपल्याकडेही त्या अनुषंगाने जाग आली. पण तुम्हाला बाहेरच्या जगाचा काही अनुभवच नसेल, त्यापध्दतीचे संघर्ष नसतील किंवा तुम्ही एखाद्या चळवळीशी जोडले गेलेले नसाल, तर तुम्हाला ही बौध्दिक जाग थोडी उशिराने येते; जसं माझं झालं. मी ज्या खेड्याच्या पार्श्वभूमीतून आले, तिथे स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांचं काही स्वतंत्र जग असतं, स्वतंत्र स्पेस असते- असं कुणी मानणारं नव्हतं. कारण खेड्यातलं सगळं जगणं सामूहिक पध्दतीचं असतं. एकत्र कुटुंबपध्दत सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. तिथलं शोषण करणारा व शोषित हे सारे (बाई किंवा पुरुष) एकच असतात. या चौकटीत वाढल्यामुळे व वयाची सोळा-सतरा वर्षं खेड्यात गेल्यामुळं, ज्या वयात या जाणिवा तीव्रतर होतात, जी बौध्दिक आणि मानसिक समज येते; मला वाटतं, त्या काळात ती मला आली नाही.

आणीबाणी 1975 ला आली, तेव्हा ही भयानक गोष्ट आहे, हेही मला कळलं नव्हतं. या सगळ्या जाणिवा मला उशिरा कळल्या, त्या मी उशिरा स्वीकारल्या; तरी माझ्या कविता समजूतदार असतात. स्त्रीवादी पध्दतीने, खूप आक्रमक पध्दतीने माझी मांडणी नसते. मला ती करता येत नाही आणि आजच्या प्रौढ वयात मला ती करावीशी वाटत नाही. माझा एक वेगळा प्रवास होता. तो मी माझ्या पध्दतीने केला.

आजच्या थोड्या कवयित्री 1975 नंतर लिहायला लागल्या. मल्लिका अमरशेख तर आधीच लिहीत होत्या. तिची महानगरीय जाणीवही तीव्र होती. माझ्या काळात अरुणा ढेरे लिहीत होत्या. माझ्या आधी मला सीनिअर असलेल्या रजनी परुळेकर आणि प्रभा गणोरकर लिहीत होत्या. त्यांच्याही कवितेत स्त्रिया होत्या. पण त्यांनाही आपण स्त्रीवादी म्हणणार नाही. एकप्रकारे मी त्यांचं पाहूनही पुढं आले. नंतर प्रज्ञा पवार, नीरजा आल्या. त्या बऱ्याचशा स्त्रीवादी कवयित्री आहेत. पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की, एक चौकटच तयार झाली.

मग पुढच्या सगळ्याच नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या कवयित्रींनी तो फॉरमॅट तसाच उचलला. त्यामुळं काय झालं की- आजच्या कवितेत खूप आक्रोश आहे, आक्रस्ताळेपणा आहे. स्त्री-पुरुष नात्याला केवळ लिंगभेदाची, विषमतेवर आधारितच बाजू नाहीये. त्या चौकटीपलीकडे जाऊन स्त्री-पुरुष नात्यामध्ये ज्या असंख्य छटा असतात, त्याचा विचारच झालेला नाही. फक्त लिंगभेदातूनच पाहिलं गेल्यामुळं आताच्या सर्व कविता मला सारख्या वाटतात. त्या अर्थाने मात्र मी स्त्रीवादी नाहीय.

प्रश्न - नव्याने सायकल शिकणारा प्रत्येक जण पडत-धडपडतच शिकतो. तसा प्रत्येक नवा कवी/कवयित्री आरंभी अनुकरणाचा नाही तर प्रभावाचा तरी ठेपा घेऊन पुढे जाते. आजही आपल्याकडे भालचंद्र नेमाडे, ग्रेस, अरुण कोलटकर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव यांच्या अनुकरणातून लिहिली गेलेली विपुल कविता सापडते. तुमच्या पहिल्या ‘दिगंत’ कवितासंग्रहातही ग्रेसाळलेल्या (ग्रेसचं अनुकरण करणाऱ्या) कविता सापडतात. या अनुकरणाकडे तुम्ही कसं पाहता? ‘तरीही’ या दुसऱ्या कवितासंग्रहातच तुम्हाला कवयित्री म्हणून स्वत:चा चेहरा सापडलेला आहे. हा प्रभाव घालवण्यासाठी तुम्ही काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले का?

- तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. ‘दिगंत’च्या काळात मी नवोदितच होते ना! विशी-बाविशीच्या काळात हातात जे मिळालं ते मी वाचायचे. अर्थात मी संपूर्ण करंदीकरही वाचला, पण करंदीकरांचा माझ्यावर काहीच प्रभाव झाला नाही. कदाचित ते शिवधनुष्य पेलायला मला अवघड वाटलं असेल. मी ग्रेस पहिल्यांदा वाचला. ग्रेसचं एक वैशिष्ट्यही आहे की, विशी-बाविशीच्या वयात ते तुमच्यावर गारूड करतं. त्यांचे शब्द आणि कविताच नाही, तर त्यांचं गद्यसुध्दा तुम्हाला भारावून टाकतं. कारण तो एक गूढाचा आणि रोमँटिक असण्याचा भाग असतो. तुमच्या मनात स्त्री-पुरुषाच्या ज्या काही कल्पना असतात- बऱ्याचदा तर त्या कल्पनाच असतात, प्रत्यक्ष काही नसतंच- त्या कल्पनांना ग्रेसचं लेखन खतपाणी घालतं.

प्रभावित होण्याच्या वयात मी ग्रेस वाचला. नादाचं, शब्दाचं, सूरांचं तसं आधीपासूनच मला वेड होतं. गेयपध्दतीच्या ग्रेसच्या ज्या कविता होत्या, गझल टाईप ज्या कविता होत्या; त्या मला खूप आवडायच्या. मग मी तसं लिहून पाहायचा प्रयत्न करायची. हा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी होत जातो, आपण वाढत जाऊ तसे. काही लेखकांच्या बाबतीत तसं घडतही नाही. म्हणजे त्याची वाढ होतही नाही. त्यांची कारणं त्याच्याजवळ असतील. माझ्या सुदैवाने ग्रेसच्या प्रभावातून मी खूप लवकर बाहेर पडले. पण माझ्यावर ग्रेसचा प्रभाव खूप होता. इतरांचं अनुकरण करणं योग्य नाही, हे कळण्याइतकी समज मला नव्हती. मला ती समज थोडी उशिरा आली. तोपर्यंत ‘दिगंत’ प्रकाशित झाला होता.

‘दिगंत’नंतर थोडं थांबून मी ज्या काही कविता लिहिल्या, ज्या ‘तरीही’त आहेत;  तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण हे असं काही लिहिलं पाहिजे. त्या काळात मी अस्वस्थ होते. कारण माझी जमीन, माझी भूमी मला हवी होती. पण मला ते सापडत नव्हतं, मला ते कळत नव्हतं. ते मला हळूहळू कळलं. त्यात मी काही फार मोठं घडवलं असं नाही, पण ते कळलं. माझ्यापाशी एक भाषा आहे. आशयाच्या अंगानेही मला काही वेगळं सांगायचं आहे. रूढ अर्थाने प्रेमकविता मी लिहिली नाही. प्रेमाच्या गारूडातून बाहेर पडल्यावर नंतर जो एक सहज भाग असतो- माझ्या बऱ्याच कवितांत तर शारीर भावच नाही. त्या काळात शरद्‌चंद्र आणि बंगाली कादंबऱ्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. इंद्रियविरहित प्रेमाची तीव्रता मला आकर्षून घेत होती.

आजच्या वयात अतिशय शांतपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की, अपवाद सोडला तर बायकांचं प्रेम बऱ्याचदा काल्पनिकच राहून जातं. मनातला प्रियकर हा मनातच राहतो. तुमच्या वातावरणाची, तुमच्या समाजाची ती चौकट असते. पण कुणीतरी एक व्यक्ती संवाद करायला लागते- जसा संवाद मीरेनं केला, जनाबाईने केला. आता तो भिन्नलिंगीच का लागतो, हेही विचार करण्यासारखं आहे. माझ्या कवितेतील ‘तो’ आणि ‘ती’चा संवाद अशा प्रकारचा आहे. माझ्या मते, प्रेम हा स्वत:लाच शोधण्याचा एक भाग असतो. म्हणून माझ्या कविता रूढ अर्थाने प्रेमकविता नसल्या, तरी प्रेमाबद्दल खूप काही आर्ततेनं सांगतात.

प्रश्न - मीरेनं आणि जनाबाईनं केलेल्या ‘प्लेटॉनिक’ प्रेमाचा संदर्भ तुम्ही दिलात. ‘तो’ आणि ‘ती’ मुळात अस्तित्वातच नसतात, यावरून एक संदर्भ सांगण्याचा मोह मला होतोय. ना. घ. देशपांडे यांनी वेगळी आणि महत्त्वाची प्रेमकविता लिहिली. शेवटापर्यंत दर वर्षी ‘मौजे’च्या दिवाळी अंकात त्यांची ताजी टवटवीत प्रेमकविता प्रकाशित व्हायची. त्या काळात मी जालन्याला होतो. तिथून मी आणि कवी बलवंत धोंगडे मुद्दाम ना. घं.ना भेटायला मेहकरला जायचो. एका भेटीत मी नाघंना थेट प्रश्न केला होता. तेव्हा त्यांचं वय होतं एक्याण्णव. ऐकू कमी यायचं. कानाशी मोठ्या आवाजात मी त्यांना विचारलं, ‘एवढ्या वयात अजूनही ताजी टवटवीत प्रेमकविता कशी काय लिहिता येते?’ चेहऱ्यावरचं मंद हसू उलगडत नाघ म्हणाले, ‘कारण प्रेयसीच नाही!’ हे उत्तर म्हणजे ना. घ. देशपांडे यांच्या प्रेमकवितांचं गुपित होतं, जे तुमच्या उत्तराशी खूपच जुळणारं आहे.

पुन्हा प्रश्नाकडं वळू या. तुमच्या कवितेत सामाजिक-राजकीय संघर्षाचे संदर्भ ठळकपणे आढळत नाहीत. ‘कदाचित अजूनही’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात तुमची प्रकट मुलाखत ऐकताना माझ्यासारखेच अनेक जण थक्क झाले. तुमचं सामाजिक-राजकीय प्रश्नाचं आकलन नेमकेपणानं मुलाखतीत प्रकट झालेलं होतं. एरवीही तुमच्याशी संवाद साधताना तुमच्या सामाजिक-राजकीय जाणिवा प्रखर आहेत, हे जाणवतं. या जाणिवा कवितेत मात्र ठळकपणे उतरत नाहीत. यामागची कारणं काय असतील?

- तुमचं हेही निरीक्षण बरोबर आहे. अगदी राजकीय नाही- पण सामाजिक म्हणून ज्या काही जाणिवा असतात, त्या माझ्या काही कवितांमध्ये आहेत. अर्थात तीव्रतर नाहीत. त्याचं ठोस कारण खरं तर मलाही नीट सांगता येणार नाही. लिहिण्याच्या प्रक्रियेत या गोष्टी कदाचित बिनमहत्त्वाच्या होत असतील किंवा मनाला जी एक सवय आहे, बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची- या मला बाह्य गोष्टी वाटतात. त्या लिखाणात यायला काहीच हरकत नाही, हे बरोबर; किंबहुना, त्या अधिक तीव्रतेने यायला पाहिजेत. पण या जाणिवा ज्या विशी-बाविशीच्या वयात तीव्र असतात, ते वय  ओलांडून मी खूप पुढे आलेली आहे. त्या वयात मी या जाणिवांवर कधी विचार केला नाही.

तरुण वयात माणसं विद्रोही असतात. त्यांची मतं टोकाला नेणारी असतात. बऱ्याचदा एकांगी पण असतात. आणि त्यातून ते लिखाण येतं. नामदेव ढसाळ असतील, मुक्तिबोध असतील- यांच्या राजकीय जाणिवा ठळक आहेत. राजकीय जाणिवा माझ्या बोलण्यात असल्या तरी लिखाणात नाहीत, हे जरी खरं असलं तरी; माझं एक निरीक्षण असं सांगतंय की, त्या आम्हा सगळ्याच कवयित्रींच्या लिखाणात नाहीयेत. राजकीय भूमिका असतील, पण राजकीय जाणिवा मला कुणाच्या कवितेत आढळल्या नाहीत. तर, त्याचं कारण मग आपल्या सामाजिक व्यवस्थेत आहे का? आपल्या विचारपरंपरेत आहे का? खरं तर आम्हाला कुणी अडवलं नसतं. अडवण्याचा एक काळ होता. पण नंतर आम्ही ते का लिहिलं नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि आत्ता तरी त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत.

प्रश्न - कवीला ‘तुम्ही असं का लिहीत नाही? तसंच का लिहिता?’ असे प्रश्न विचारू शकत नाही. पण तुमचं सामाजिक-राजकीय आकलन परिपक्व असूनही त्याचं प्रतिबिंब तुमच्या कवितेत का पडलं नसेल, या उत्सुकतेपोटी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- या प्रकारच्या राजकीय-सामाजिक जाणिवा मांडणं, ते बंडखोरीचं वय ओलांडून पुढं आल्यामुळे मला ते मांडणं ढोबळही वाटतं. आंतरिक सांगण्याचा जो भाग माझ्यात आहे, त्याची आता चाकोरी बदलून, लिखाण बदलून लिहिणं मला बिनमहत्त्वाचं वाटेल. एवढ्या उपर समजा मी राजकीय जाणिवांचं आज काही मांडलं, तर ते मला थोडं हास्यास्पद वाटेल. विशी-पंचविशीच्या मुलांसारखं मला मांडता येणार नाही. माझा बौध्दिक आणि वैचारिक भाग आहे, त्यात तुम्ही म्हणता त्या गोष्टी आहेत; त्यापेक्षाही तीव्रतर आहेत. आता बाहेर सगळीकडेच बोलण्याची बंदी असल्यामुळं आणि वेगळं काही बोलला की, देशद्रोहीच ठरत असल्यामुळं तो भाग सोडून देऊ या. तरीही मी ठामपणे बोलते, पण लिहिण्यात मात्र तीव्रतेने येत नाही.

असं म्हणताना मी एक सांगेन, प्रत्येक विचार करणाऱ्याला व्यवस्थेच्या विरोधात उभं राहावं लागतं. तशा सामाजिक संदर्भाच्या कविता माझ्या नव्या कवितासंग्रहात (कदाचित अजूनही) आहेत. कदाचित इथून पुढं मी काही लिहीन, पण लिहिनच याची खात्री नाही. तुम्ही काय अन्‌ मी काय, कवी असं काही सांगू शकत नाही की, मी लिहिनच. मी राहीनच, हे तर कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित पुढं अशा प्रकारचं मी लिहिनही.

 प्रश्न - ‘कदाचित अजूनही’ या संग्रहात ‘दिवस’ नावाची फार सुंदर कविता आहे. त्यातल्या चार ओळी पाहू या.

               ‘कवितेशी काही देणं ना घेणं

               असा हा भवताल

               आणि आपल्याला आतच ठेवून

               बुजवली गेलेली काटेकोर

               तळघराची दारं’

वाच्यार्थ्यानं आणि लक्ष्यार्थानं या ओळींचा विचार करता येतो. आतल्या घुसमटीबरोबरच ‘कवितेशी काही देणं ना घेणं, असा हा भवताल’ म्हटल्यावर एकूणच अनास्था जाणवू लागते. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. इंग्रजी माध्यमात शिकणारी आपली नवी पिढी. वाचनच कमी होणं. मराठी कवितेला पुढे वाचक कसा मिळेल, म्हणजे साहित्यसंस्कृती धोक्यात आलीय का- असे अनेक प्रश्न फेर धरू लागतात. मराठी पुस्तकांची एक आवृत्ती संपायला किती तरी दिवस जावे लागतात. ‘सत्यकथे’पासून अंक बंद पडण्याची एक परंपरा निर्माण झालीय. मागील वर्षभराच्या कालावधीत ‘अक्षरधारा’चा अंक बंद पडला. याबाबतीत...

- मी आधी तुम्हाला कवितेबद्दल सांगेन. ‘कवितेशी काही देणं ना घेणं, असा हा भवताल’ याबद्दल तुम्हीच सांगितलंत. एकूणच साहित्यसंस्कृतीबद्दल काही देणं-घेणं असलेला आपला समाज नाही. आपला समाज विशिष्ट जगरहाटीशी बांधलेला, भौतिक सुखांशी जोडलेला. त्याच्या सुखाच्या, चंगळवादाच्या कल्पनाही खूप वेगळ्या आहेत. साहित्य आणि सृजनाशी जोडलेलं असं आपलं जग नाही. त्यात फार थोडे लोक असतात. या भोवतालातल्या तळघरात ठेवून दारं बुजवली गेली. मला माझ्या ध्येयापर्यंत, सृजनात्मक जाणिवांपर्यंत हेतुत: नसलं तरी निर्हेतुकसुध्दा जाऊ देण्यात येत नाही. या भोवतालाची दारं बुजवून टाकली आहेत. घुसमट अटळ आहे. तरीही आम्ही का व्यक्त होतो?  खरं तर या भोवतालात साहित्य, संस्कृती, अभिव्यक्ती आज सुरक्षित नाही. तरी मी का लिहिते? आम्ही समाजप्रबोधन करतो का? समाजाला शिकवतो का? चमकण्यासाठी मी लिहिते का? तर, सांगण्याची तीव्रता आणि संवादाची निकड महत्त्वाची असते.

राहिला मुद्दा मराठी काहीच न वाचणाऱ्यांचा. इंग्रजी वाचणाऱ्यांचा भाषा टिकवण्याचाच मुद्दा असेल, तर इंग्रजी वाचणारे आणि लिहिणारे मराठी भाषा टिकवणार नाहीत. तुम्ही, आम्ही, मजूर, शेतकरी- सर्वसामान्य माणूस जो साहित्याशी जोडलेला नाही पण इंग्रजीशीही जोडलेला नाही, तोच मराठी भाषा टिकवतो आणि टिकवेलही. काळाचा रेटा खूप मोठा आहे. उद्या भविष्यात हे सर्व उरेल का? आपल्याला दिसतंच आहे. पण ते उरावं, अशी तुमची-माझी इच्छा आहे. तिच्यावर माझं नियंत्रण नाही. पण मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतायत, तर चुकीचं काही करत नाहीत. ते व्यवहाराला आणि भोवतालाला धरून चालले आहेत. पण त्यातून आपल्याला जाणवणारी खंत खरी आहे. कवी-लेखक बदलाची भाषा करतात. कवी-लेखकांमुळे क्रांती होते, असं मला वाटत नाही. पण आम्ही कवी-लेखक क्रांतीच्या दिशेने लोकांना नेऊ शकतो. त्यांनी तसं जावं अशी इच्छा बाळगतो.

नियतकालिकं बंद पाडण्यास आपण सारेच जबाबदार आहोत. मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, तरी त्या मुलांच्या मराठीची जबाबदारी घरात आई-वडिलांनी घ्यावी. माझ्या मुलाला मराठी आलीच पाहिजे, ही गोष्ट सक्तीची असावी. मराठी माध्यमं बंद पडतायत त्याला सरकार, आपण आणि मराठीचे प्राध्यापक जबाबदार आहेत. प्राध्यापक असूनसुध्दा अंक विकत घेत नाहीत. मराठीच्या प्राध्यापकांच्या घरात आज दहा पुस्तकं सापडत नसतील, तर आपण किती करंटे आहोत याचा विचार आपणच नीट केला पाहिजे. कायम कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडणं बरोबर नाही. बऱ्याच काळापासून मला असे खूप प्राध्यापक माहितीयत की- जाऊन एक तास घेतला तर घ्यायचा, नाही तर म्हशी पाळायच्या, दुधाचे धंदे करायचे, प्लॉटिंगचे धंदे करायचे. भरपूर पगार असतानादेखील हे उद्योग आहेत. त्यांचं काय करायचं? कार्यक्रमात एखाद्या पाहुण्याची नीट ओळख करून देता येत नसेल, तर हा प्राध्यापक कसा झाला?

आज तर ते फेसबुक आणि व्हाट्‌सॲप काय काय सुरूय. मी त्यात नाहीये. पण मला कुणा-कुणाकडून कळतं. यानं त्याच्या कवितेला लाईक करायचं, त्यानं याच्या कवितेला लाईक करायचं- यातून खूप सुमार गोष्टी पुढं येतात. हे त्याच्यातच खूश आहेत. हे बरोबर नाही. एखादी गोष्ट कुणाला आवडली नाही असं सांगितलं, तर तो नाराज होतो. ‘आवडलं नाही’ असं म्हणायचंच नाही. टीकाच करायची नाही. खरं बोलायचंच नाहीये. ही मानसिकता बनलीय. आणि समीक्षकही फुटाण्यांसारखी गोष्ट झालेलीये- गंभीर नाहीयेत. उभयपक्षी कारभार आहे ना हा? भाषा बुडीत खाती जमा होण्यासाठी आपल्या सगळ्यांचाच हातभार आहे. अर्थात इतक्या लवकर भाषा बुडणार नाही. पण एवढंच समाधान आहे की, ते पाहायला माझ्यासारखी व्यक्ती असणार नाही.

प्रश्न - डॉ. सुधीर रसाळांनी तुमच्या काव्यलेखना-बद्दल एक मत नोंदवलेलं आहे. ‘जाणिवांचा पट मर्यादित असूनही कवितेचा ताजेपणा टिकून आहे.’ याशिवाय मर्यादित जाणिवांच्या बाबतीत तर संपूर्ण स्त्री-कवितेबद्दलच डॉ.वसंत पाटणकरांनी एक व्याप्त विधान केलेलं आहे. त्यांच्या मते, ‘एकूणच स्त्री-कवितेचे अनुभवविश्व मर्यादित आहे. शिवाय स्त्री-कवितेचे प्रयोगशीलतेशी खूपच कमी नाते आहे.’ एक कवयित्री म्हणून व कवितेच्या वाचक-अभ्यासक म्हणून याबद्दल काय सांगाल?

- दोन वेगळ्या पिढ्यांतल्या समीक्षकांनी त्यांची मतं नोंदवलेली आहेत. मी म्हणेन की, त्यांचं निरीक्षण बरोबर आहे. माझ्या कवितेबद्दलचंही बरोबर आहे आणि स्त्री-कवितेचंही बरोबर आहे. एक कवयित्री म्हणून, एक वाचक म्हणून हे मान्य केलं तर, ते असं का आहे याचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. अशी विधानं करायला चमकदार आहेत. ती चांगली पण आहेत. पण असं जेव्हा बायांच्या बाबतीत किंवा स्त्री-कवितेबाबत घडतं, तेव्हा त्या घडण्यामागं काय काय आहे, हे बघायला हवं. बायका किती बंदिस्त चौकटीत राहत होत्या, त्या चौकटी त्यांना मोडता आल्या का? मोडू शकल्या नाहीत, तर का मोडू शकल्या नाहीत? समाजाचा उघड आणि सुप्त असा दबाव बायकांवर असतो, तो त्या झुगारू शकतात का? झुगारू शकत नसतील तर का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सांस्कृतिक परंपरेत, आपल्या मानसिकतेत म्हणजे पुरुषी मानसिकतेत आहेत.

या दोन ज्येष्ठ समीक्षकांना कुठल्याही उपरोधाने प्रश्न न विचारता मी जरा वेगळ्या अंगाने जाईन. स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट नसूनही विचारते- इथं स्त्रियांना कोणतं स्वातंत्र्य दिलं जातं? या संदर्भात मी एक दुर्दैवी उदाहरण सांगते. ज्या कवयित्रीनं हा अनुभव सांगितला, ती पुढच्या पिढीची आहे. शहरात राहणारी- संदर्भ आहे म्हणून सांगते, ब्राह्मण कुटुंबातली आहे. ब्राह्मण कुटुंबात आज बरंच उदार वातावरण आहे. कर्वेंच्या काळाइतकं नसलं तरी, या कवयित्रीचं दु:ख दुर्दैवी आहे. नावासमोर ‘सौ’ लावत नाही, नवऱ्याचं नाव लावत नाही, म्हणून तिला घरातून त्रास दिला जायचा. आताच्या काळात सौ. लावलं नाही, नवऱ्याचं नावं लिहिलं नाही, तर बिघडलं कुठं?  बाईचं स्वतंत्र नाव का लिहिता येऊ नये? या चौकटी झुगारणं सगळ्यांना जमलं नाही. ज्यांनी झुगारल्या, त्यांची अशी कोणती दखल मराठी कवितेने घेतली? आपापल्या चौकटीत राहूनही अनेक कवयित्रींनी चांगलं काम केलं. यांना हे जमलं नाही, त्यांना ते जमलं नाही- असं म्हणणं, हीसुध्दा पुरुषसत्ताक चौकटच आहे. काय जमेल आणि काय जमणार नाही, यामागं पुन्हा एकदा पुरुषच उभे असतात. त्यामुळे स्त्री-कवितेचा सहृदयतेनं विचार केला, तर ती मला आनंदाची गोष्ट वाटेल.

प्रश्न - प्रयोगशीलतेबद्दल मला उत्सुकता आहे. बालपणी तुमची श्रवणभक्ती खूप झाली. श्रवणसंस्कार झाले. कारण भजन, कीर्तन, आखाजी, लग्नाची गाणी, दु:खाची गाणी ऐकतच तुम्ही मोठ्या झालात. तरीही कविता-लेखनात अशा रचनाप्रकारांचा तुम्ही फारसा उपयोग केलेला दिसत नाही. तुमची बहुतांश कविता मुक्तछंदातच आहे. यामागची कारणं काय असतील?

- त्या प्रकारची प्रयोगशीलता माझ्या कवितेत नाही. आशयाच्या अंगाने स्त्री-पुरुष लैंगिकता असे आधुनिक विषयही माझ्या कवितेत येत नाहीत. छंदात-वृत्तात लिहिण्यासाठी एक अभ्यास लागतो. शिवाय मी ज्या पार्श्वभूमीतून आले, तिथं संस्कृत भाषा असणं शक्य नव्हतं. त्या काळात ती काही लोकांचीच भाषा होती. छंद-वृत्त माझ्यापर्यंत आले नाहीत. पण काही रचना मी अभंग, ओवी प्रकारात केल्या आहेत. कारण अभंग, ओव्या माझ्या कानांवर लहानपणापासून पडत होत्या.

प्रश्न - तुमचं वाचन चौफेर आहे. हे सर्व वाचताना किंवा कविता लिहीत असताना कवितेशिवाय दुसरा कुठला ‘फॉर्म’ लेखनासाठी वापरावा वाटला नाही का?

- कवितेला पर्याय म्हणून किंवा कवितेत सांगणं अपुरं वाटतं म्हणून, मला दुसरं काही लिहावं वाटलं नाही. पण कवितेशिवाय म्हणाल तर, मी दहा-बारा कथा लिहिल्या आहेत. त्या छापूनही आल्या. मात्र त्यात काही वेगळेपण आहे, असं मलाच वाटलं नाही. असाच मी कादंबरीही विचार केला होता. एक मोठा पट मला त्यात उलगडायचा होता. पण मुळात मी फार आळशी व्यक्ती आहे. एकाच कादंबरीचं नेमाडेंनी चारदा पुनर्लेखन केलं, हे मी ऐकूनच घाबरले. कारण ते मी करू शकत नाही. कवितेवर मात्र मी मन:पूर्वक काम करते. दहा वेळा फेअर करते. कवितेचा मला कंटाळा येत नाही. गद्य लिहिण्याची मला फार असोशी नाही.

कविता लिहिणं पुरेसं वाटायचं नाही, तेव्हा मी स्वत:ला पत्र लिहायचे. ते व्यक्त होण्याचं एक साधन होतं. मी स्वत:ला सतत पत्र लिहायचे. कारण दोन-तीन नातेवाईक सोडले तर मला मित्र-मैत्रिणी नव्हत्या. मी दीर्घ काळ एकटी राहत आलेली व्यक्ती आहे. माझा एकटेपणा मला भावतो, आवडतो. तशी स्वत:ला लिहिलेली शंभर-दोनशे पत्रं होती, जी मी नंतर फाडून टाकली. कदाचित ती पत्रं आज छापली असती, तर वेगळं पुस्तकही झालं असतं.

प्रश्न - तुमची स्वत:च स्वत:ला लिहिलेली पत्रं ही भन्नाट कल्पना आहे. ती पत्रं तुम्ही फाडून टाकल्यामुळं आम्ही एका वेगळ्या पुस्तकाला मुकलो. पण स्वत:ला पत्र लिहिण्यातील एकटेपणातून महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाट्य धारेतील चंदूकाका मला आठवला. मोठ्या वाड्यात सगळ्यांचं करता-करता स्वत: तसाच राहून गेलेला चंदुकाका गावाबाहेरच्या तळ्यावर जाऊन माशांना चुरमुरे-फुटाणे टाकतो. त्या माशांशी चक्क बोलतो किंवा तेंडुलकरांच्या ‘सखाराम बार्इंडर’मधील मुंगळ्यांशी बोलणारी लक्ष्मी आठवली.

समारोपात आता मला तुमच्या वाचनाबद्दल सांगा. तुमच्या चौफेर वाचनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.

- माझ्या वाचनाला शिस्त नाही. मी कधी जॉब केला नाही, त्यामुळं वाचन नेमकं नाही. खरं तर वाचन ही मला गरजेची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट वाटते. वाचन नसेल, तर मला करमूच शकत नाही. मी उभीच राहू शकत नाही. त्यामुळं मी नेमकं नाही वाचू शकत. मी दर्जेदार, अभिजात असंही वाचते; पण दुसऱ्या बाजूला मराठी साहित्यात गौण समजलं जातं, असंही वाचते. नारायण धारप, अनुवादित शेरलॉक होम्स, ॲगॉथा ख्रिस्ती, रहस्यकथा असं सारखं वाचत राहते. वाचनातून माझी अस्वस्थता कमी होते. बंगालीही खूप वाचलंय. इंग्रजी येत नसल्यामुळे अनुवादित वाचते. मात्र मी समीक्षा कमी वाचते. ती मला कंटाळा आणते. ती माझी कमतरता आहे. कवितेची पुस्तकं तुलनेने सगळ्यात जास्त वाचते. मला भेट आलेला कुणाचाही कवितासंग्रह वाचते. ती माझी जबाबदारी वाटते मला.

आमचे काही मित्र ‘हा फालतू कचरा का वाचता?’ असं विचारतातही. पण मला तसं नाही वाटत. त्या नव्या लिखाणाकडे इतकं तुच्छतेनं पाहावं, असं मला वाटत नाही. बऱ्याचदा त्यात काही सापडत नाही. पण ते वाचणं, ते समजावून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. मराठीत एरवीही खूपच कविता लिहिली जातेय. पण चांगली कविता थोडीच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे- माझ्या वाचनात सातत्य असते, पण दिशा नसते.

मुलाखत: दासू वैद्य, औरंगाबाद 

(मुखपृष्ठावरील व या लेखातील छायाचित्रे : श्रीपाद पदे, औरंगाबाद)

 

पुढील अंकात -

राज्य सरकारचा श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे, त्या अरुण जाखडे यांची सुशील धसकटे यांनी घेतलेली मुलाखत

Tags: महाराष्ट्र शासन विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीपाद पदे दासू वैद्य मराठी कवियत्री मराठी कविता अनुराधा पाटील marathi kaviyitri maharashtra shasan vinda karandikar jeevangaurav purskar marathi kavita kavi interview shripad pade dasu vaidya anuradha patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके