मराठी साहित्यात लहान व कुमार वयातील मुलाचे भावविश्व उघड करून दाखवणाऱ्या कथा वा ललित लेख ना. धों.ताम्हणकर, वि. वि. बोकील यांसारख्या लेखकांनी लिहिल्या आहेत. अलीकडेच श्री. प्रकाश संत या नावाची त्यात भर पडली आहे. 'लंपन' हा त्यांचा कथानायक, त्याचे अनुभव, जगाकडे बघण्याची दृष्टी, त्याची भाषा, त्याला स्वतःलाच न कळणाया त्याच्या भावना अशा त्याच्या अद्भुत भावविश्वाचे दर्शन त्यांनी घडवले आणि वेगळेपणाने साहित्यात उसवले. 15 जुलैला त्यांच्या अकाली व आकस्मिक मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे स्मरण करून देणारा हा लेख.
किशोरवयीन आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मनोव्यापारांचं भावविश्व स्वतःच निर्माण करून, त्याला पोरक करून निघून गेल्याला प्रकाश संतांना दोन वर्ष झाली. 'वनवास', 'शारदासंगीत', 'पंखा' आणि 'झुंबर' या अवघ्या चारच पुस्तकांमधनं हे विश्व विखुरलं आहे. इतकी अल्पप्रसवा असली तरी तिला 'साहित्य संपदा' म्हणून गौरवावं अशी ही संतांची प्रतिभा वाचकाला खिळवून ठेवते. त्यातल्या सर्व व्यक्तिरेखा, वातावरण, अनुभव, कानडी मराठीमिश्रित भाषेचा गोडवा यात आपण कधी रंगून जातो, हे आपल्यालाही कळत नाही. विविध स्यांच्या आणि आकारांच्या काचांचा कॅलिडोस्कोप, एकेक कथा वाचताना आपल्या डोळ्यांसमोरून सरकत जातो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरल्या एका चिमुकल्या गावातल्या 'लंपन' नावाच्या एका गोड मुलाचं बालपण, किशोरावस्था आणि पौगंडावस्थेतून यौवनात पदार्पण करणं हा सगळा प्रवास, या सर्व कथांमधून उलगडत जातो. सर्व कथांना एका विशिष्ट वयातल्या काळाचा परीघ आखलेला असला, तरी बाळगोपाळांच्या मनातली अनेक कुतूहलं, अनेक अनुत्तरित प्रश्न, भावभावनांचे पदर, या सर्वांनी हा परीघ अतिशय समृद्ध केला आहे. सर्व लेखनाला एक स्वतंत्र शैली आहे.
कानडी मिश्रित मराठीचा वापर सर्व कथांमधून त्या प्रादेशिक वातावरणाची, वाचकाला ओळख करून देतो. ज्याला इंग्रजीत 'पिक्चरस्क' म्हणतात, अशी चित्रदर्शी शैली असल्यामुळे; ते सर्व प्रसंग घडताना, आपण त्या प्रसंगांचा एक भाग आहोत, ते आपल्या डोळ्यांसमोर घडताहेत असा भास वाचकाला सतत होत राहतो. घरातले आज्जी-आजोबा, बाबुराव आणि घराबाहेरील सुमी, आरविन कट्ट्या, गंग्या-कणबर्गी, जंब्या ही सर्व मंडळी आपल्या आसपास वावरणारी आहेत, असं वाटत राहतं. वंटमुरीकर देसाई, कणबर्गी गंग्या यांच्यामधली संभाषणं "बेष्ट केलास घे, तू खेळायला नसलास तर काय मजा येत नाही बा!" किंवा "एस्क्या हळदीपूरशी एवढं काय बोलायलाय. आधीच तिचं काय की हरवलय् ते हुडकायचं सोडून ती आणि त्याच्याशीच गप्पा मारायलीय बगा. " अशा वेगळ्याच भाषेचा परिचय आपल्याला घडवतात. आकड्यांचा मजेशीर वापर हा संतांच्या शैलीचा आणखी एक विशेष! "मला बट्टात तेवीशशे प्रश्न पडले. आपल्या एक हजार चौदा चाकांवरून आगगाडी धडधडत आली. रस्त्याच्या चढावरून सायकल ढकलून नेताना नाकाला नऊच काय, चांगले 999 आलेत की काय, असं वाटत होतं. सुमी इतकी छान दिसत होती की तिच्याकडे मॅडसारखं एकोणीस वेळा पहावं, असं वाटत होतं." अशासारखी असंख्य उदाहरणं आपल्याला सगळ्या कथांमधनं सापडतात.
बालसुलभ शब्दांचा वापरही ठिकठिकाणी आढळतो. उदाहरणार्थ - "चिंचेवर मी दगड मारला पण ते दगडसाहेब ऐटीत झाडा-फांद्यांमधून अलगद पलीकडे निघून गेले." किंवा "गवतावरचं पाणी आणि माती यांमुळे अंगठोबा मस्तपैकी झोंबायला लागलेले. पायाला अंगठ्याऐवजी स्टोचा पेटलेला स्पिरिटचा काकडा उगवल्यासारखं वाटत होतं." किंवा कथेतलं "लाकडी फाटक कधी फाटक महाराज किंवा कधी कुरकुरे साहेब होतं." सगळ्या कथांमधनं रंग, गंध, नाद यांची रेलचेल आपल्याला जाणवल्याशिवाय रहात नाही. झुंबर कथेतील गायनाच्या आचरेकरबाईंची खोली आपल्या नजरेसमोर उभी राहते. "खोलीत अमृतांजनाचा वास सणसणीत भरून राहिलेला. त्यातच मिसळलेला धुराचा, ओल्या मातीचा आणि सांडलेल्या दुधाचा वास. खिडकीत अमृतांजनाच्या सात तरी रिकाम्या बाटल्या ओळीत ठेवलेल्या. बाईंनी डोक्याला कापडाची पट्टी बांधलेली. आणि गायनाचा सराव एकदाचा संपला त्याला अमृतांजनाचा वास होता आणि नंतर बाईंनी आम्हांला दिलेल्या वड्यांनाही तोच वास होता." हे वर्णन वाचून, बाई आणि त्यांची खोली आपल्याला 'नीटच' समजते. सगळ्या पुस्तकांमधली सुंदर रेखाटणं हे सर्व रंग, गंध, नाद आपल्यापर्यंत पोचवायला अधिकच मदत करतात.
अत्यंत चपखल अर्थ व्यक्त करणाऱ्या सुंदर उपमा आणि प्रतिमांनी, प्रकाश संतांचं लिखाण अधिकच समृद्ध केलं आहे. 'भेट' कथेमध्ये लंपन म्हणतो, "आजोबांच्या निळसर डोळ्यांत खूप काहीतरी लिहिलेलं असावं, असं वाटत होतं. पण इंग्रजी गोष्टींचं पुस्तक हातांत असूनही, त्यात काय आहे ते समजू नये; तसं त्यांच्या डोक्यात काय आहे, ते मला समजत नव्हतं.” किंवा "काही बहाद्दर, मिटलेल्या छत्र्यांसारखं चापूनचोपून धोतर नेसतात”, अशी आणि अशासारखी अनेक उदाहरणं, आपल्याला ठिकठिकाणी भेटतात. "खिडकीतून आत आलेला उन्हाचा पिवळा हात मला बाहेर बोलवत होता." किंवा "बागेत झाडं टेबलक्लॉथवर पडलेल्या शाईच्या ठिपक्याप्रमाणं दिसत होती." अशी आणि आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील. सुंदर व्यक्तिचित्रणं, आत्मनिवेदन आणि लंपनच्या व्यक्तित्वातून व्यक्त होणारा कथानायक यांच्यातली सीमारेषा पुसट वाटणं, नर्म विनोदात्मक शैली अशी आणखी कितीतरी वैशिष्ट्यं प्रकाश संतांच्या लेखनात जाणवतात. विस्तारभयानं ती सगळी इथं उद्धृत करणं शक्य नाही; पण जे वाचक ह्या पुस्तकवाचनाच्या आनंदापासून दूर राहिले आहेत, त्यांना उद्युक्त करणं, हाच या लेखनाचा हेतू आहे. या सर्व कथा वाचताना, संवेदनशील वाचकाच्या डोळ्यांत 'मॅडसारखं एकोणीस वेळा' पाणी तरळल्याशिवाय रहात नाही आणि प्रकाश संत आपल्यात नसल्याची खंत, 'एकोणीस गुणिले एकोणीस वेळा' जाणवत रहाते.
Tags: कर्नाटक महाराष्ट्र अनुराधा सोमण वि. वि. बोकील ना. धों.ताम्हणकर Karnataka Maharashtra Anuradha Soman V. V. Bokil N. D.Tamhankar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या