डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांचा हा गौरव आहे. आम्हाला अधिक जोम येणार आहे यामुळे! आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या पाठबळावर आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला आणखी पात्र होऊ अशी दृढ आशा बाळगते. अनुताईंच्या भाषणानंतर सर्व श्रोते अंतर्मुख झाले होते. अभावाने आढळणारा साधेपणा, विनय आणि अनुभवाचे बोल या सगळ्यांचाच तो परिणाम असावा. 

 

“आयुष्यात मला सारे काही चांगले मिळाले. दोन्हीकडचे आईवडील, भावंड, सहकारी, सोबती, सर्वांनी मला भरभरून दिले आहे. तशा अर्थाने मी पूर्ण सुखी आहे. या सर्वांच्या सहवासात जे संस्कार कळत नकळत मनावर झाले, त्याची एक प्रतिक्रिया म्हणून आज हातून जे काही थोडेफार घडते आहे, ते घडवले गेले.” अनुताईंच्या बोलण्याचा प्रवाह शांत पण स्वच्छ आवाजात चालला होता.

 गुरुवारी 10 जानेवारीला स्नेहसदनामध्ये एक अनौपचारिक समारंभ पार पडला. आंतरभारतीच्या वतीने गेल्या महिन्याच्या 24 तारखेला साने गुरुजींच्या ऐंशीव्या जयंतीला अनुताईंना सूसन बी. अॅन्थनी अॅवॉर्ड जाहीर करण्यात आले. दरवर्षी गुरुजींच्या जयंतीला हे पारितोषिक जाहीर होणार आहे. यंदाच्या पहिल्याच वर्षाच्या मानकरी अनूताई भागवत ठरल्या. 

अनूताईंचा परिचय

डॉ. शिवाजीराव पटवर्धन म्हणजे तपोवन हे समीकरण सर्वसाधारण सुशिक्षितांना आता ठाऊक झाले आहे. आणि आता ते इतके ठसले आहे की, “डॉ. पटवर्धन करताहेत ते काम फार चांगले आहे” एवढे कौतुक करून बंद करून टाकायचा. तो विषय झाला आहे. शिवाजीराव आता वयोमानानुसार थकले आहेत.

अनू भागवत ह्या त्यांच्या कन्या. तपोवनाचे काम इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत आता त्या पाहातात. पुण्यात त्यांनी काही काळ कलाशिक्षिका म्हणून नोकरी केली. हा त्यांच्यातला कलेचा पैलू कायम जागा असतो. तपोवनातील कुष्ठरोग्यांची देखभाल करतांना त्यांनी सेवाभावाला कलेची अशी काही चपखल जोड दिली आहे की, तपोवनातले ते वेदनेचे जिणेदेखील आनंदाने उजळून निघते आहे. 

नुकताच महाराष्ट्र सरकारने 'दलित मित्र’ अशी पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सन्मानाचा स्वीकार करताना देखील, “उद्या याच सरकारी अधिका-यांच्या दारामध्ये आपल्या योजना हाती घेऊन आम्हाला चार चार दिवस खेटे हेलपाटे घालायला लागणार” याचे भान अनुताईंना सतत जाणवत होते.

या अ‍ॅवॉर्डचे वृत्त त्यांना दूरध्वनीवरून कळवले. त्या आपल्या कामातच व्यग्र असाव्यात. ‘सागर शक्ती आकाशी’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकाच्या प्रयोगाचे त्या स्थळ आणि वेळापत्रक तपासून पाहात होत्या. त्या नाटकाच्या संदर्भातच आपले अभिनंदन असणार, असे त्यांनी गृहीत धरले होते. जळगाव जिल्ह्याच्या नाट्यस्पर्धेत या नाटकाने पारितोषिक मिळवले आहे. सुसन बी. अ‍ॅन्थनी अ‍ॅवॉर्डबद्दल त्यांनी सविस्तर माहिती करून घेतली. 

गुरुवारच्या समारंभामध्ये याविषयीचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “हे पारितोषिक स्वीकारताना आपली ती पात्रता आहे का? या विचाराने मन संकोचते आहे. नव्या जबाबदारीच्या जाणिवेनं सावधान व्हायला होत आहे.”

 आयुष्याच्या पेटवा मशाली

कार्यक्रमाची सुरवात सहा वाजता झाली होती. स्नेहसदनचा हॉल भरला होता. प्रत्येक श्रोता आपली कौतुकाची पावती देण्यासाठी आणि या विषयांच्या कुतुहलाने आला होता. 

प्रारंभी ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, आणि ‘अमे चालतां रहयां’ अशी आंतरभारतीची दोन गाणी झाली.

सूसन बी. अ‍ॅन्थनी यांची माहिती, अ‍ॅवॉर्डची कल्पना श्रोत्यांनी विशद केली. श्रीमती कृष्णताई मोटे यांनी अ‍ॅवॉर्डची एक हजार एक रुपयांची रक्कम श्रीमती अनुताई भागवत यांना दिली.

अ‍ॅवॉर्डबरोबरच एक मानपत्रही श्रीमती अनुताई भागवत यांना देण्यात आले. आंतरभारतीचे एक चित्रकार मित्र श्री. मधू पाटील यांनी ते थोडक्या वेळात कुशलतेने करून दिले. अनुताई करत असलेल्या कार्याबद्दल आंतरभारतीला त्यांचा अभिमान वाटतो, असा या मानपत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. 

महारोग्यांविषयीची सामान्यांची आस्था? 

शकुंतला बोरगावकर यांनी आपल्या मैत्रिणीचे मन:पूर्वक अभिनंदन केले. महारोगी म्हटला म्हणजे हातपाय झटलेली किळसवाणी माणसे, गाड्यावर आपल्या सोबत्याला बसवून गाडा ओढतो आहे हे दृश्य डोळ्यांसमोर येते. 

क्वचित आपण त्यांची दया येऊन, घृणा वाटून तर कधी त्यांच्या बेडर नजरेला घाबरून पैसे फेकतो. त्या पलीकडे त्यांची वास्तपुस्त करण्याचे अधिक खोलात शिरण्याचे प्रयोजनच आम्हाला वाटत नाही. पण हा समज खोटा ठरला. तो अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, 

“आनंदच्या कुष्ठाश्रमात एक कुष्ठपीडित मुलगा एकाग्रचित्ताने गालीचा विणत होता. त्याची त्या कामात बुडालेली नजर आणि गालीचाचे अप्रतिम डिझाईन थक्क करून टाकणारे होते. त्याची चौकशी केल्यावर त्या मुलाने सांगितले की, तो अमरावतीहून आला होता. तिथल्या अनुताईंकडून तो हे अशा प्रकारचे डिझाईन विणायला शिकला होता.” 

त्याक्षणी शकुंतलाबाईंना आपल्या मैत्रिणीविषयीच्या अभिमानाने भरून आले. थोडीशी खंतही वाटली. तीही त्यांनी जमलेल्या श्रोत्यांपूढे व्यक्त केली. “मी स्वत:ला अनुताईंची मैत्रीण म्हणवते, पण मीही अजून कधी तपोवनात गेलेले नाही. माझ्या मैत्रिणीचं कर्तृत्व डोळा भरून पाहण्याऐवजी तिच्या एका शिष्यामध्ये उतरलेले तिच्या कलेतले रूप मी पाहत होते. तिचं कौतुक ऐकत होते. पण बिनओळखीच्या या शिष्याने आपला अनुताईंबद्दलचा आदर चांगला सूचित केला होता. कुष्ठरोग्याच्या आश्रमातली स्वच्छता आणि टापटीप पाहून हा कुष्ठरोग्यांचा आश्रम हे खरच वाटेना!"

ख्रिस्ती मिशनऱ्यांची सेवावृत्ती आपण एवढ्या बाबतीत फारशी अंगीकारतांना दिसत नाही. महारोग्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमती बोरगावकर म्हणाल्या. 

 आपल्या मैत्रीणीचे तिच्या कार्यातील यश असेच वृद्धींगन होत राहो. तिला त्यासाठी उदंड आयुष्य लाभो, अशी सदीच्छा श्रीमती बोरगावकर यांनी व्यक्त केली. 

श्रीमती कृष्णाताई मोटे यांनी आपल्या भाषणात आपला सार्वजनिक कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून न जाण्याचा नियम या कार्यक्रमासाठी मोडल्याचे सांगितले. 

नियम मोडल्याबद्दल आज आनंदच वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. “कुष्ठरोगाची किळस वाटते, त्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांच्या बेडर नजरेची, तुमच्याकडून पैसे घेईनच अशी वृत्ती बरेच वेळा घाबरवून टाकते व आपण पैसे टाकतो. मनाचं समाधान करून घेतो,” असे श्रीमती कृष्णाबाई म्हणाल्या. 

“जनरेशन गॅपमुळे आपण आमंत्रण स्वीकारत नसल्याचे कारण आहे”, असे त्या म्हणाल्या. पण अनुताईंचा सत्कार करण्याचा समारंभ म्हणताच ताबडतोब यावे असे वाटले. 

तरुणपिढीची उदासीनता 

हल्लीच्या पिढीचा नाकर्तेपणाचा त्यांनी वडीलधाऱ्यांवर केला. आपल्या लहानपणी हा आपला समाज आहे. त्याच्यासाठी थोडा त्याग, झीज सोसायला हवी, काहीही तक्रार किंवा कुरकुर न करता हे आसपास वावरणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यातून आपोआप उमगत होते. आणि तडजोड यांतूनही स्वत:ची मूल्ये, तत्वे आम्ही जोपासत होतो. हल्ली सासू, सुना एकमेकींशी पटवून घेतांना दिसत नाहीत. कोणा एकाची मदत घेऊन पुन्हा त्याची फेड आणखी कोणाला त्यापेक्षा अधिक मदत करून करावी हे आढळतच नाही. भौतिक सुखसोयी, राहणीमान, पैसा सगळ्यांची पातळी उंचावली आहे असे तरी कसे म्हणावे? माणसाच्या माणसाबद्दलच्या भावना दगड व्हायला लागल्या आहेत. मुंबईत रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्रेताच्या हातावर पाय पडला, तरी दुर्लक्ष करणारी भयाण काळजाची माणसे आहेत. समाधान व शांती या बजबजपुरीत दुर्मिळ होईल तर काय? 

मिशनरी लोकांवर ते धर्मांतर करतात, असा एक आरोप सर्रास केला जातो. याची दुसरी बाजू आपण तपासून पाहिली आहे का? आपला स्वत:चा अनुभव सांगतांना त्या म्हणाल्या, 

“कोण्या एका नात्यातल्या स्त्रीचे बाळंतपणात निधन झाले. तिचे तान्हे अर्भक सांभाळावे अशी विनती तिच्या घरातल्या लोकांनी अनेक आश्रमांना केली. मूल जगण्याची शक्यता अगदी कमी होती हे उघड दिसत होते. पाच सात हिंदू अनाथश्रमातून नकार घेऊन घरातले लोक, मिशनरी संस्थेकडे गेले. तिथल्या सिस्टरने ते मूल आधी ताब्यात घेतले. त्याची देखभाल करण्याकरता ती ते घेऊन गेली. मागाहून दप्तरातल्या तांत्रिक नोंदी!” 

चार पाच दिवसांनी नातेवाईक बघायला गेले तो कापसात ठेवून, कापसाच्या बोळ्याने त्याला दूध घालत होते. त्याला जगवण्यासाठी, तो खडखडीत आणि धष्टपुष्ट व्हावा म्हणून शक्य तेवढे प्रयत्न होत होते.

ते मूल पुढे वाचले नाही! हे माहीत असूनही त्याचा प्रतिपाळ करणाऱ्या संस्थेबद्दल अनादर कोण करील? त्यांची सेवावृत्ती, बिनतोड आहे हे मान्य केलेच पाहिजे.  

अनुताई वयाने लहान असल्या तरी त्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटतो, असे सांगून कृष्णाताईंनी आपले भाषण संपविले. 

हा सन्मान तपोवनवासीयांचा!

अनुताई बोलायला उभ्या राहिल्या. शांत, सोज्वळ आणि सात्विक चेहरा. शब्द बाहेर पडत होते ते देखील ह्या वैशिष्ट्यांनी औतप्रोत भरून. 

अ‍ॅवॉर्डचा स्वीकार करतांना त्यांनी आपल्याला संकोच वाटत असल्याचे सांगितले. “हा सन्मान सर्व तपोवनवासीयांचा, माझ्यापेक्षाही अधिक हक्क या सन्मानावर त्या सर्वांचा” त्या म्हणाल्या. 

आपल्या म्हणण्याची खात्री पटावी म्हणून त्यांनी तपोवनातली काही उदाहरणे दिली. 

बालसदनातल्या रडणाऱ्या सचिनला रडत ठेवून त्याच्यासाठी गडबडीने पापड लाटणाऱ्या त्याचा गोवर बाहेर पडावा म्हणून मालनबाई मनाच्या केवढ्या थोर असल्या पाहिजेत! 

“बाई मी आज जेवण घेतले नाही माझे व्रत आज पूर्ण झाले नाही.” व्रत कसले तर स्वच्छतेचे धडे गोरगरिबांना देणाऱ्या गाडगे महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याभोवतीची जागा साफ करण्याचे. आपल्या छोट्या हातांपायांची वेदना अशी श्रमांत बुडवून टाकणारा बाबाजी का दुबळा रोगी म्हणायचा! 

सुखाचा साठा 

ही सगळी माणसे आयुष्यातले सुख कसे शोधून काढावे हे ज्ञान आम्हा सुशिक्षित पुस्तकपंडितांना देतात! आयुष्यात सुखच सुख असते. असतेच ते ‘तिथे’ तुम्ही नको असणारे दु:ख बाजूला फेकून द्या. तुम्हालाही ते मिळेल. 

त्या रोग्याने केलेल्या कामाचे तुम्ही कौतुक करा. त्याला नव्यानव्या गोष्टी शिकवा. त्याच्या वेदना विसरून समाधानाने फुललेला त्याचा चेहरा तुम्हाला एक अलौकिक आनंद देऊन जाईल. असा अलौकिक आनंद मिळविण्याच्या स्वार्थापायी आम्ही तिथे काम करतो. 

त्रासतोदेखील कधी कधी! सचिवल्यातल्या लालफिती चार चार दिवस हेलपाटे मारायला भाग पाडतात. गोऱ्या कातडीवाल्या परदेशी मंडळींची दहा मिनिटांत कामे होतात, तेव्हा हे गोडबंगाल आणखीनच गूढ होते. 

पण परत तपोवनात गेले, तिथे आयुष्यच पणाला लावून बसलेले, जीवनानंद लुटणारे रोगी, कार्यकर्ते डॉक्टर पाहिले की, पुन्हा उभारी येते. 

माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांचा हा गौरव आहे. आम्हाला अधिक जोम येणार आहे यामुळे! आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या पाठबळावर आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला आणखी पात्र होऊ अशी दृढ आशा बाळगते. अनुताईंच्या भाषणानंतर सर्व श्रोते अंतर्मुख झाले होते. अभावाने आढळणारा साधेपणा, विनय आणि अनुभवाचे बोल या सगळ्यांचाच तो परिणाम असावा. 

आभाराचे भाषण करतांना श्री. यदूनाथ थत्ते यांनी एक आठवण सांगितली. 

15 ऑगस्ट 1947 या दिवसाची गोष्ट. आजच्या स्वातंत्र्यदिनी विदेशी लोकांनी इथेच राहायला हवे होते, परत जायला नको होते, अशी खंत व्यक्त करणारे कुणी असेल का? असा एक विचार चालला होता. महात्मा गांधींनी त्यावर सांगितले की, महारोगपीडित मंडळी अशी इच्छा खचित करत असतील. 

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी त्यानंतर आपले आयुष्यच त्यांच्यासाठी ओतले. पित्याचा वारसा पुत्राने चालवावा असा एक जनप्रवाद थोडा सुधारून घेऊन त्यांच्या कन्या हा वारसा चालवतांना दिसताहेत. 

समारंभ संपला तरी अनुताईंच्या विलक्षण व्यक्तिमत्वाने भारलेले कण वातावरणात रेंगाळत राहिले!

Tags: सुनीती जोशी अनुताईं एका सौजन्यमूर्तीचा सत्कार #Weekly sadhana Suniti Joshi Anutai One Courtesy Idol weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके