डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नूरा नावाचा एक तरुण व येनी नावाची एक तरुण मुलगी यांनी आम्हांला सर्व पोर्तगाल दोन दिवसांत दाखवण्याची व आम्हांला हेगडेंकडे पोचवण्याची जबाबदारी घेतली. वाटेत जातानाच हेगडे भेटले. वयस्कर झाल्याने ते मदत करू शकणार नव्हतेच.

1. शिरुभाऊंच्या आई

शिरुभाऊंच्या आई (आम्ही सर्वच त्यांना ‘मामी' म्हणत असू) शेवटच्या काही वर्षांत पूर्ण अंध झाल्या होत्या त्या मूळच्या अंध नव्हत्या, पण दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली होती. त्यातच 1930 सालापासून शिरुभाऊ चळवळीत ओढले गेले होते. 1942 साली तर शिरुभाऊ व माधवकाका दोघेही दीर्घकाळ भूमिगत व नंतर जेलमध्येच होते. सदुकाका चळवळीत नसतानाही शिरुभाऊंचा ठावठिकाणा कळावा म्हणून पोलीस त्यांना त्रास देऊ लागले व ते कशालाच बधले नाहीत तेव्हा त्यांनाही अटकेत ठेवले गेले. हा सर्व ताण त्या वयात मामींना फारच होता. त्यातच त्यांची मोठी मुलगी नरवणे कर्करोगाने आजारी पडून गेली. तेव्हापासून त्या पूर्ण अंधच झाल्या, आमचे लग्न ठरले तेव्हा मी त्यांना नमस्कार करायला गेले : तेव्हा त्यांनी मला उठवलं व म्हणाल्या, 'मला दिसत नाही ग काही - जरा पुढे ये. मग त्यांनी हाताने चाचपडत नाकी-डोळी मी कशी आहे. याचा अंदाज घेतला. शिरुभाऊंचा स्वभाव प्रथमपासूनच खोडकर. त्यातून मामी देखील सुटल्या नाहीत. 

एकदा घरात काही निमित्ताने जिलबी केली होती. मामी जेवायला बसल्यावर त्यांच्या ताटातली पहिली जिलबी संपली तेव्हा शिरुभाऊंनी परातीतील आणखी जिलबी  उचलून एकेक तुकडा हलकेच मामींच्या ताटात वाढायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने मामींच्या लक्षात आले - जिलबी संपत कशी नाही? मग त्यांना उमगले. म्हणाल्या, 'हे सगळं शिरूचं काम दिसतंय? अरे, आता माझे वय आहे का थट्टा करायच? आणि इतकी जिलबी खायचं?' मामींच्या खोड्या करणाऱ्या शिरुभाऊंना गोव्याच्या तुरुंगात खूप काळ राहावं लागलं तेव्हा त्यांना वारंवार आपल्या मामींची आठवण येई. आपण आपल्या कामाने मामीला त्रास खूप दिला असे त्यांना वाटे. अस्वस्थ झाले की ते त्या तुरुंगातल्या बंदिस्त खोलीत डोळे पूर्ण मिटून मामींसारख्या भिंतीच्या बाजूने खूप येरझारा घालीत व अंध मामींची आठवण प्रत्यक्ष कृतीने जागवत. 

2. पोर्तुगीजांची सत्ता व पोर्तुगालमधील लोक 

गोव्याच्या लढयात शिरुभाऊंनी तिसऱ्या तुकडीचे नेतृत्व केले. त्यांच्याबरोबर भाई वैद्य, फैजपूरच्या डॉ. चौधरीबाई आणि अनेक सत्याग्रही होते. ही तुकडी राजमार्गाने आत न शिरुभाऊंच्या जाता जंगलभागातून रात्रीच्या वेळी दोन जीप्स घेऊन व काही अंतर आलटून पालटून चालत अशी गोव्यात पोचली बराच वेळ आत गेल्यानंतर अटक होईना तेव्हा तुकडीने कलेक्टर कचेरीकडे मोर्चा वळवला. मग मात्र सैनिकांनी सर्वांना पकडून वाटेल तसे मारण्यास सुरुवात केली. काठया, लाठया, झाडाची फांदी, बुटाच्या लाथा, जमेल तसे एकेकाला बदडायला सुरुवात झाली काहींची हाडे मोडली तर काही खाली पडले. शिरुभाऊंना प्रत्यक्ष मॉतेरोनेच लाठया-काठ्यांनी खुप मारले. (त्यांनी मला नंतर पत्रात लिहिले होते ओरडायचे नाही असे मी किती ठरवले तरी शेवटी ओरडलोच) पाठीची कातडी सोलून निघाली. हातांना लागले आणि शेवटी मॉतेरोने मार थांबवला व मग खिशातून मलमाची वाटडी काढून पाठीला मलम लावायला लागला. 

शिरुभाऊ चकित होऊन त्याला म्हणाले, 'अरे आतापर्यंत इतके मारलेस आणि आता मलम चोळतोस हे. काय?' तो म्हणाला, That was my military duty. This is my humanitarian duty.' (लष्करी माणूस म्हणून माझे ते कर्तव्य होते. आता माणुसकीपोटी हे कर्तव्य पार पाडत आहे.) शिरुभाऊ अवाकच झाले. पण पुढे सुटल्यानंतर काही वर्षांनी आम्हांला युरोपमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली. शिरुभाऊंनी आवर्जुन पोर्तुगालचा व्हिसा पण मिळवला.

एक दिवस आम्ही लिस्बनला राम हेगडे यांना कळवून पोर्तुगालला गेलो हेगडे स्टेशनवर येणार होते ते दिसले नाहीत पण स्टेशनवर एक फल्क लावलेला होता. 'आम्ही आपल्याला मदत करू शकतो. आम्ही तिथे गेलो. आपल्याकडील  स्काऊटसारखी ही संघटना. नूरा नावाचा एक तरुण व येनी नावाची एक तरुण मुलगी यांनी आम्हांला सर्व पोर्तगाल दोन दिवसांत दाखवण्याची व आम्हांला हेगडेंकडे पोचवण्याची जबाबदारी घेतली. वाटेत जातानाच हेगडे भेटले. वयस्कर झाल्याने ते मदत करू शकणार नव्हतेच. त्यांच्याकडे आम्ही राहिलो पण आम्हांला सर्वत्र हिंडवून विविध ठिकाणे दाखवण्याचे काम या दोघांनीच केले. पोर्तुगीजांच्या सत्तेचा रानटीपणा दिसून आला पण पोर्तुगीज लोक मात्र फारच प्रेमळ, सहकार्य देणारे असे भेटले व आम्हांला तिथे गेल्याचा आनंद झाला.

Tags: पोर्तुगाल  डॉ. चौधरीबाई फैजपूर भाई वैद्य शिरुभाऊ गोवा अनुताई Portugal Dr. Choudharibai Faijapur Bhai Vaidy Shirubhau Anutai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके